व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करा

शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करा

शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करा

“प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्‍यांनी [अप्पुलोचे] भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.”—प्रेषितांची कृत्ये १८:२६.

१. अपुल्लो “आत्म्याने आवेशी” असला तरीसुद्धा त्याला कशाची आवश्‍यकता होती?

पहिल्या शतकातील एक खिस्ती दांपत्य प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी इफिसस शहरातील एका सभास्थानात अपुल्लो याला भाषण देताना पाहिले. अपुल्लो याने त्याच्या मनोवेधक शब्दांनी व खात्रीलायक शैलीने त्याच्या श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तो “आत्म्याने आवेशी” होता व “येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत [होता].” पण “त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता” हे त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट होत होते. अपुल्लोने ख्रिस्ताविषयी जे शिकवले ते खरे होते. पण त्याचे ज्ञान अर्धवट होते. यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत येशू ख्रिस्ताच्या भूमिकेविषयी अपुल्लोला त्याचे ज्ञान वाढवण्याची गरज होती.—प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६.

२. प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी कोणते आव्हान स्वीकारले?

अपुल्लोला ख्रिस्ताने आज्ञापिलेले “सर्व” पाळता यावे म्हणून त्याला मदत करण्यासाठी प्रिस्किल्ला व अक्विल्ला आनंदाने पुढे आले. (मत्तय २८:१९, २०) अहवालात म्हटल्याप्रमाणे, त्यांनी अपुल्लोला “जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.” पण अपुल्लोच्या संबंधाने काही गोष्टी अशा होत्या ज्यामुळे कदाचित काही ख्रिश्‍चनांना त्याला शिकवावेसे वाटले नसते. या कोणत्या गोष्टी होत्या? आणि प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी अपुल्लोसोबत शास्त्रवचनांवर चर्चा करण्याची जी तसदी घेतली त्यावरून आपण काय शिकू शकतो? या ऐतिहासिक अहवालाची उजळणी केल्याने गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर अधिक लक्ष देण्यास आपल्याला कशाप्रकारे मदत होऊ शकेल?

लोकांकडे लक्ष द्या

३. अपुल्लोच्या पार्श्‍वभूमीमुळे प्रिस्किल्ला व अक्विल्ला त्याला मदत करण्यापासून का परावृत्त झाले नाहीत?

यहुदी वंशाचा असलेला अपुल्लो आलेक्सांद्रिया शहरात लहानाचा मोठा झाला होता. त्याकाळी आलेक्सांद्रिया हे ईजिप्तचे राजधानी शहर होते आणि तेथे एक मोठे ग्रंथालय असल्यामुळे हे शहर उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून सुविख्यात होते. या शहरात यहुद्यांची लोकसंख्या मोठी होती आणि यांपैकी कित्येकजण विद्वान होते. त्यामुळे इब्री शास्त्रवचनांचे सेप्टुअजिंट नावाचे ग्रीक भाषांतर येथेच तयार करण्यात आले होते. तेव्हा अपुल्लो “शास्त्रपारंगत” होता यात काही नवल नाही! अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांचा व्यवसाय तंबू बनवण्याचा होता. अपुल्लो हा मोठा वक्‍ता असल्याने ते घाबरले का? नाही. तर प्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी त्या व्यक्‍तीकडे, तिच्या गरजांकडे आणि आपल्याला तिला कशी मदत करता येईल याकडे लक्ष दिले.

४. अपुल्लोला आवश्‍यक असलेली मदत त्याला कोठे आणि कशाप्रकारे मिळाली?

अपुल्लो कितीही चांगला वक्‍ता असला तरीसुद्धा त्याला शिक्षणाची गरज होती. त्याला ज्याप्रकारच्या मदतीची गरज होती ती कोणत्या विद्यापीठात जाऊन मिळणार नव्हती तर ख्रिस्ती मंडळीतल्या सदस्यांकडूनच ती मिळणे शक्य होते. अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांच्याकडून अपुल्लोला तारणाकरता देवाची तरतूद अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करणारे मुद्दे शिकायला मिळणार होते. अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी “त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.”

५. प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांच्या आध्यात्मिकतेविषयी काय म्हणता येईल?

प्रिस्किल्ला व अक्विल्ला हे आध्यात्मिकरित्या दृढ आणि विश्‍वासात स्थिर होते. कदाचित ‘आपल्या ठायी असलेल्या आशेविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला,’ मग तो श्रीमंत असो वा गरीब, विद्वान असो किंवा गुलाम त्याला ‘उत्तर देण्यास ते नेहमी सिद्ध’ राहिले असतील. (१ पेत्र ३:१५) अक्विल्ला व त्याची पत्नी ‘सत्याचे वचन नीट हाताळण्यास’ समर्थ होते. (२ तीमथ्य २:१५) त्यांना शास्त्रवचनांचा गांभिर्याने अभ्यास करण्याची सवय होती असे दिसते. ‘देवाच्या सजीव, सक्रिय’ व अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्‍या वचनावर आधारित असलेले शिक्षण मिळाल्याने अपुल्लोच्या मनावर गहन प्रभाव पडला.—इब्री लोकांस ४:१२.

६. अपुल्लोला मिळालेल्या मदतीची त्याने कदर केली हे कशावरून दिसून येते?

अपुल्लोवर त्याच्या शिक्षकांच्या आदर्शाचा प्रभाव पडला आणि तो शिष्य बनवण्यात अधिकच निपुण बनला. त्याने खासकरून यहुदी लोकांत सुवार्तेच्या प्रचाराकरता आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग केला. यहुद्यांना ख्रिस्ताविषयी खात्री पटवून देण्यात तो अतिशय उपयोगी ठरला. “शास्त्रपारंगत” असल्यामुळे तो त्यांना शाबीत करून दाखवू शकत होता की प्राचीन काळातले सर्व संदेष्टे ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहात होते. (प्रेषितांची कृत्ये १८:२४) या अहवालात पुढे असेही सांगितले आहे की नंतर अपुल्लो अखया प्रांतात गेला. तेथे, “ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्‍वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करीत असे.”—प्रेषितांची कृत्ये १८:२७, २८.

इतर शिक्षकांच्या उदाहरणावरून शिका

७. अक्विल्ला व प्रिस्किल्ला निपुण शिक्षक कसे काय बनले?

अक्विल्ला व प्रिस्किल्ला देवाच्या वचनाचे निपुण शिक्षक कसे काय बनले? वैयक्‍तिक अभ्यास नेटाने केल्यामुळे आणि सभांना उपस्थित झाल्याने नक्कीच हातभार लावला असेल पण याशिवाय प्रेषित पौलासोबतच्या त्यांच्या निकट सहवासाचेही यात बरेच योगदान राहिले असावे. करिंथ शहरात प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांच्या घरी पौलाने १८ महिन्यांपर्यंत मुक्काम केला होता. त्यांच्यासोबत तोही तंबू बनवण्याचे व त्यांची डागडुजी करण्याचे काम करत असे. (प्रेषितांची कृत्ये १८:२, ३) त्यांच्यामध्ये किती गहन आध्यात्मिक विषयांवर चर्चा होत असतील याची कल्पना करा. आणि पौलाच्या सहवासामुळे त्यांच्या आध्यात्मिकतेत किती भर पडली असेल याचाही विचार करा! नीतिसूत्रे १३:२० म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.” चांगल्या सहवासामुळे अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांच्या आध्यात्मिक सवयींवर उत्तम परिणाम झाला.—१ करिंथकर १५:३३.

८. प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी पौलाच्या सेवाकार्याचे निरीक्षण केल्यामुळे त्यांना काय शिकायला मिळाले?

प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी पौलाला राज्याचा प्रचार करताना पाहिले तेव्हा ते प्रत्यक्षात एका उत्तम शिक्षकाला पाहात होते. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील अहवालात म्हटल्याप्रमाणे, पौल “दर शब्बाथ दिवशी [करिंथमधील] सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खात्री करून देत असे.” नंतर, सीला व तीमथ्य आले तेव्हा “येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला.” सभास्थानाच्या सदस्यांनी फारशी आस्था दाखवली नाही तेव्हा पौलाने आपले प्रचाराचे कार्य दुसऱ्‍या ठिकाणी, म्हणजे सभास्थानाला लागून असलेल्या एका घरात सुरू केले हे अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी पाहिले. तेथे पौलाला “सभास्थानाचा अधिकारी” क्रिस्प याला शिष्य बनण्यास मदत करता आली. त्या एका व्यक्‍तीला शिष्य बनवल्याने सबंध क्षेत्रावर मोठा फलदायक प्रभाव पडला हे प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांच्या लक्षात आले. अहवालात सांगितल्याप्रमाणे: “क्रिस्प ह्‍याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्‍वास ठेवला, आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्‍वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.”—प्रेषितांची कृत्ये १८:४-८.

९. प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी पौलाच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण केले?

क्षेत्र सेवेतील पौलाच्या आदर्शाचे प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांच्यासारख्या इतर राज्य प्रचारकांनीही अनुकरण केले. प्रेषित पौलाने इतर ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला, की “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करूनच प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी अपुल्लोला ख्रिस्ती शिकवणुकी अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास मदत केली. आणि पुढे त्याने देखील इतरांना मदत केली. प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी रोम, करिंथ आणि इफिस येथील लोकांनाही शिष्य बनवण्यास मदत केली असेल यात शंका नाही.—प्रेषितांची कृत्ये १८:१, २, १८, १९; रोमकर १६:३-५.

१०. शिष्य बनवण्याच्या कार्यात कामी पडेल अशी कोणती गोष्ट, प्रेषितांची कृत्ये अध्याय १८ यातून तुम्हाला शिकायला मिळाली?

१० प्रेषितांची कृत्ये अध्याय १८ याचे परीक्षण केल्यावर आपल्याला काय शिकायला मिळते? ज्याप्रकारे पौलाकडून अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांना शिकायला मिळाले असावे, त्याचप्रमाणे आपण देखील देवाच्या वचनाच्या उत्तम शिक्षकांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याद्वारे शिष्य बनवण्यात अधिक पारंगत होऊ शकतो. ‘वचन सांगण्यात जे गढून’ गेले आहेत आणि जे इतरांना “पूर्ण साक्ष” देत आहेत त्यांच्यासोबत आपण संगती करू शकतो. (प्रेषितांची कृत्ये १८:५, किंग्डम इंटरलिनियर भाषांतर) लोकांना शिकवताना ते त्यांचे मन वळवण्याकरता कशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात व कशाप्रकारे त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतात याचे आपण निरीक्षण करू शकतो. या प्रभावी पद्धती आपल्यालाही शिष्य बनवण्यास मदत करू शकतात. एखादी व्यक्‍ती आपल्यासोबत बायबलचा अभ्यास करते तेव्हा आपण तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा शेजाऱ्‍यांना देखील अभ्यासात सहभागी होण्यास निमंत्रित करण्याचा सल्ला देऊ शकतो. किंवा आपण त्यांना अशा काही व्यक्‍तींविषयी विचारू शकतो ज्यांना आपल्यासोबत बायबल अभ्यास करायला आवडेल.—प्रेषितांची कृत्ये १८:६-८.

शिष्य बनवण्याच्या संधी तयार करा

११. नवीन शिष्य आपल्याला कोठे सापडतील?

११ पौल व त्याच्या सह ख्रिस्ती बांधवांनी घरोघरी, बाजारपेठेत, प्रवासादरम्यान, किंबहुना जेथे कोठे ते जातील तेथे प्रचार करण्याद्वारे शिष्य बनवण्याचा प्रयत्न केला. शिष्य बनवण्याचा प्रयत्न करणारा आवेशी राज्य कामगार या नात्याने तुम्ही तुमचे क्षेत्र सेवाकार्य वाढवू शकता का? योग्य व्यक्‍तींचा शोध घेण्याच्या व त्यांना प्रचार करण्याच्या संधींचा तुम्ही फायदा उचलू शकता का? सुवार्तेच्या आपल्या सहप्रचारकांना कोणकोणत्या मार्गांनी शिष्य बनवण्यात यश आले आहे? प्रथम, दूरध्वनी साक्षकार्याच्या क्षेत्राकडे लक्ष देऊ या.

१२-१४. टेलिफोन साक्षकार्याचे फायदे स्पष्ट करण्याकरता तुमचा स्वतःचा किंवा या परिच्छेदांतील एखादा अनुभव सांगा.

१२ ब्राझीलमध्ये घरोघरचे साक्षकार्य करताना एका ख्रिस्ती स्त्रीने (तिला आपण मारीया म्हणू) अपार्टमेंट बिल्डिंगमधून बाहेर पडणाऱ्‍या एका तरुणीला एक पत्रिका दिली. या पत्रिकेच्या शीर्षकाचाच प्रस्तावनेकरता उपयोग करून मारीयाने विचारले: “तुम्हाला बायबलविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल का?” स्त्रीने उत्तर दिले “होय, जरूर आवडेल. पण समस्या अशी आहे की मी शिक्षिका आहे आणि त्यामुळे मला अजिबात सवड नाही.” मारीयाने तिला सुचवले की टेलिफोनवर पण चर्चा करणे शक्य आहे. त्या स्त्रीने मारीयाला आपला फोननंबर दिला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मारीयाने देव आपल्याकडून काय अपेक्षितो? * या माहितीपत्रिकेतून टेलिफोनवर तिच्यासोबत अभ्यास सुरू केला.

१३ टेलिफोन साक्षकार्य करताना, इथियोपियातील एका पूर्ण वेळेच्या सेविकेने एका माणसाशी बोलण्यास सुरवात केली; पण मागून काहीतरी गोंधळ चालल्यासारखा आवाज येत होता, त्यामुळे ती थोडी घाबरली. त्या माणसाने तिला नंतर फोन करण्यास सांगितले. तिने नंतर फोन केला तेव्हा त्या माणसाने क्षमा मागितली व तिला सांगितले की आधी तिने फोन केला होता, तेव्हा त्याचे व त्याच्या बायकोचे कडाक्याचे भांडण सुरू होते. बहिणीने या संधीचा फायदा उचलून बायबलमध्ये कौटुंबिक समस्या सोडवण्यासंबंधी दिलेल्या सुज्ञ सल्ल्याकडे लक्ष वेधले. तिने त्या माणसाला सांगितले की कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले पुस्तक, कित्येक कुटुंबांना सहायक ठरले आहे. हे पुस्तक त्या माणसाला पाठवण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्या बहिणीने पुन्हा त्याला फोन केला. तो म्हणाला: “या पुस्तकाने आमच्या संसाराला उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचवले!” त्याने आपल्या कुटुंबाला एकत्र बोलावून या पुस्तकात वाचलेले उत्तम मुद्दे सगळ्यांना सांगितले. त्याच्यासोबत गृह बायबल अभ्यास सुरू करण्यात आला आणि लवकरच हा माणूस ख्रिस्ती सभांना नियमित येऊ लागला.

१४ डेन्मार्कमध्ये, एका बहिणीने टेलिफोनवर बायबल अभ्यास सुरू केला; ती सांगते: “सेवा पर्यवेक्षकांनी मला टेलिफोन साक्षकार्यात सहभाग घेण्याचे प्रोत्साहन दिले. पण ‘नको बाबा, मला नाही जमायचं ते’ असे म्हणून मी सुरवातीला थोडी कचरले. नंतर काही दिवसांनी मी कसेबसे धैर्य केले आणि पहिला नंबर लावला. सोन्या नावाच्या एका स्त्रीने फोन उचलला आणि काही वेळ तिच्याशी बोलल्यानंतर तिने बायबल आधारित साहित्य वाचायला आवडेल म्हणून सांगितले. एकदा संध्याकाळी आम्ही निर्मितीविषयी बोलत होतो. जीवन—कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? * (इंग्रजी) हे पुस्तक वाचण्याची तिने इच्छा दर्शवली. मी तिला प्रत्यक्ष भेटून या विषयावर चर्चा करण्यासंबंधी सुचवले. ती तयार झाली. मी गेले तेव्हा सोन्या अभ्यासाकरता अगदी तयार होऊन बसली होती. तेव्हापासून आम्ही दर आठवडी अभ्यास करत आहोत.” आपली ख्रिस्ती बहीण शेवटी म्हणते: “कित्येक वर्षांपासून मी बायबल अभ्यासाकरता प्रार्थना करत होते, पण फोनवर साक्ष दिल्यामुळे मला तो मिळेल असे कधी वाटले नव्हते.”

१५, १६. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या विविध मार्गांविषयी सतर्क राहिल्यामुळे कशाप्रकारे चांगले परिणाम होतात हे दाखवण्याकरता तुम्ही कोणते अनुभव सांगू शकता?

१५ लोक जेथे भेटतील तेथे साक्षकार्य करण्याविषयीच्या सूचनांचे पालन केल्यामुळे अनेकांना यश आले आहे. संयुक्‍त संस्थानांतील एका ख्रिस्ती स्त्रीने आपली कार पार्किंगच्या जागेत एका प्रवासी व्हॅनच्या शेजारी उभी केली. व्हॅनमध्ये बसलेल्या स्त्रीने तिला पाहिले तेव्हा बहिणीने आपल्या बायबल आधारित शैक्षणिक कार्याविषयी खुलासा केला. त्या स्त्रीने ऐकून घेतले आणि मग ती व्हॅनमधून बाहेर येऊन बहिणीच्या कारजवळ आली. तिने म्हटले: “किती बरं झालं तुम्ही थांबून माझ्याशी बोलल्या. बऱ्‍याच काळापासून माझ्याजवळ तुमचे कोणतेच साहित्य नव्हते. शिवाय, मला पुन्हा एकदा बायबल अभ्यास करण्याची इच्छा आहे. तुम्ही कराल का माझ्यासोबत अभ्यास?” अशारितीने आपल्या बहिणीने सुवार्ता सांगण्याकरता स्वतः एक प्रसंग निर्माण केला.

१६ संयुक्‍त संस्थानांत एक बहीण एका शुश्रूषालयात गेली तेव्हा तिला खालील अनुभव आला. तिने त्या संकुलातील विशिष्ट विभागांची देखरेख करणाऱ्‍या संचालकाची भेट घेतली. आणि त्यांना सांगितले की तेथे राहणाऱ्‍यांना आध्यात्मिक साहाय्य करण्याकरता तिला स्वयंसेविका म्हणून कार्य करण्यास आवडेल. तिने असेही सांगितले की ज्या कोणाला इच्छा असेल त्यांच्यासोबत दर आठवडी विनामूल्य बायबल अभ्यासही चालवण्यास तिला आनंद वाटेल. संचालकाने तिला तिथल्या खोल्यांमध्ये जाऊन लोकांच्या भेटी घेण्याची परवानगी दिली. लवकरच ती एकूण २६ निवासी रुग्णांसोबत आठवड्यातून तीन वेळा बायबल अभ्यास चालवू लागली; त्यांच्यापैकी एक व्यक्‍ती तर आपल्या सभांनाही नियमित हजर राहते.

१७. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यात कोणती पद्धत बऱ्‍याचदा परिणामकारक ठरते?

१७ काही राज्य प्रचारकांना थेट बायबल अभ्यासाविषयी विचारण्याची पद्धत परिणामकारक असल्याचे आढळले आहे. १०५ प्रचारक असलेल्या एका मंडळीने एके दिवशी सकाळी एक खास प्रयत्न म्हणून सेवाकार्यात भेटणाऱ्‍या प्रत्येक घरमालकाला बायबल अभ्यासाविषयी थेट विचारण्याचे ठरवले. त्यादिवशी ८६ प्रचारकांनी सेवाकार्यात भाग घेतला आणि दोन तास प्रचारकार्य केल्यानंतर त्यांना १५ नवीन बायबल अभ्यास सुरू करण्यात आल्याचे आढळले.

योग्य व्यक्‍तींचा शोध घेत राहा

१८, १९. येशूने दिलेले कोणते महत्त्वाचे निर्देशन आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

१८ एक राज्य प्रचारक या नात्याने तुम्हाला कदाचित या लेखातील काही सूचना अवलंबून पाहण्याची इच्छा असेल. अर्थात, साक्षकार्याच्या पद्धती विचारात घेताना स्थानिक प्रथा लक्षात घेणे शहाणपणाचे ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य व्यक्‍तींना शोधून त्यांना शिष्य बनण्यास मदत करण्याविषयी येशूचे निर्देशन आपण नेहमी आठवणीत ठेवू या.—मत्तय १०:११; २८:१९.

१९ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण ‘सत्याचे वचन नीट हाताळू’ या. हे आपल्याला शास्त्रवचनांवर पूर्णपणे आधारित असलेल्या विधानांच्या मदतीने मन वळविण्याचा प्रयत्न करण्याद्वारे साध्य करता येईल. असे केल्याने ग्रहणील मनोवृत्तीच्या लोकांच्या अंतःकरणाचा ठाव घेणे आणि त्यांना कृती करायला प्रेरित करणे आपल्याला सोपे जाईल. यहोवावर प्रार्थनापूर्वक अवलंबून राहण्याद्वारे आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्याकरता काहीजणांना मदत करू शकू. आणि हे कार्य खरोखर किती प्रतिफलदायी आहे! तेव्हा, या आपण सर्वजण ‘देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके करू’ आणि शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करणारे आवेशी राज्य प्रचारक या नात्याने सदैव यहोवाचे गौरव करू या.—२ तीमथ्य २:१५.

[तळटीपा]

^ परि. 12 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्हाला आठवते का?

• अपुल्लोला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवण्याची का गरज होती?

• प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना प्रेषित पौलाकडून कोणकोणत्या प्रकारे शिकायला मिळाले?

प्रेषितांची कृत्ये अध्याय १८ यातून तुम्हाला शिष्य बनवण्याच्या कार्यासंबंधाने काय शिकायला मिळाले?

• शिष्य बनवण्याच्या संधी तुम्ही कशा निर्माण करू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी अपुल्लोला “देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला”

[२० पानांवरील चित्र]

अपुल्लो शिष्य बनवण्यात निपुण बनला

[२१ पानांवरील चित्र]

पौल जेथे कोठे गेला तेथे त्याने प्रचार केला

[२३ पानांवरील चित्रे]

प्रचार करण्याच्या संधी निर्माण करा