व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध”

“प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध”

“प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध”

“त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्‍यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; . . . अशी त्यांना आठवण दे.” (तीत ३:१, २) प्रेषित पौलाने सहविश्‍वासू बांधवांना हे लिहिले तेव्हा त्याच्या मनात कोणती चांगली कामे होती? बायबल विद्वान ई. एफ. स्कॉट यांनी एक प्रकारच्या चांगल्या कामाविषयी सांगत असे म्हटले: “ख्रिश्‍चनांनी केवळ अधिकाऱ्‍यांच्याच अधीन असू नये तर त्यांनी कोणतेही चांगले कार्य करण्यास तयार असले पाहिजे. . . . गरज भासेल तेव्हा ख्रिश्‍चनांनी समाजासाठी कार्य करणाऱ्‍यांमध्ये पुढे असले पाहिजे. आग लागणे, आजारांच्या साथी येणे, विविध प्रकारची संकटे, यांसारख्या गोष्टी होतच राहतात; चांगले नागरिक आपल्या शेजाऱ्‍यांना मदत करू इच्छितात.”

ख्रिस्ती जन अशा विशिष्ट सामाजिक कार्यांमध्ये भाग घेतात की जी कार्ये देवाच्या नियमांच्या विरोधात जात नाहीत. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) जसे की, स्थानीय अग्नीशामक विभागाच्या निर्देशनानुसार, एबिना जपान येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातील सदस्य, दर वर्षी फायर ड्रील अर्थात आगीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा सराव करतात. अशा वेळी, स्थानीय अग्नीशामक विभागाचा एक प्रतिनिधी सूचना द्यायला येतो तेव्हा बेथेल कुटुंबातील सर्व सदस्य या सूचना ऐकण्यासाठी एकत्र येतात.

याशिवाय, दहापेक्षा अधिक वर्षांपासून हे शाखा दफ्तर, अग्नीरोधक जागृतीला बढावा देण्याकरता स्थानीय अधिकारी आयोजित करत असलेल्या एका प्रदर्शनाला सहकार्य देत आहे. या प्रदर्शनात, शहरातील अनेक कंपन्या, आग विझवण्याकरता आणि आग आटोक्यात आणण्याकरता आपापली प्रात्यक्षिके दाखवतात. शाखा दफ्तराच्या सदस्यांनी दाखवलेल्या कौशल्यांबद्दल आणि सहकार्याबद्दल अनेकदा शाखेला बक्षिसे मिळाली आहेत. २००१ साली झालेल्या प्रदर्शनात त्यांना पहिले बक्षीस मिळाले. अग्नीच्या बाबतीत जीवनरक्षक ठरू शकणारे चांगले कार्य करण्यास ते तयार आहेत.

अमूल्य सेवा

परंतु यहोवाचे साक्षीदार जीवनरक्षक असलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या चांगल्या कार्यात आवड घेतात. ते नियमितरीत्या आपल्या शेजाऱ्‍यांना भेटून त्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगतात. (मत्तय २४:१४) साक्षीदार, लोकांना बायबल तत्त्वे शिकून ती आपल्या जीवनात लागू करण्याचे उत्तेजन देतात जेणेकरून या लोकांना आता आपल्या जीवनाचा दर्जा सुधारता येईल आणि खरी शांती व सुरक्षितता असलेल्या भावी जगात सार्वकालिक जीवनाची आशा मिळवता येईल.

काही लोक, यहोवाचे साक्षीदार करत असलेल्या अमूल्य सेवेची कदर करत नाहीत; ते त्यांना एक पीडा समजतात. परंतु, कॅनडातील क्यूबेक येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झॉन क्रेपो यांचे यहोवाच्या साक्षीदारांबद्दल वेगळे मत होते. तेथील यहोवाच्या साक्षीदारांनी क्यूबेक, ब्लेनवीलच्या एका शहराच्या नियमावर आक्षेप घेतला होता; घरोघरी जाण्यासाठी परवाना असण्याविषयी हा नियम होता. कोर्टाच्या निकालात, न्यायाधीश क्रेपो यांनी म्हटले: “यहोवाचे साक्षीदार घरोघरी जाऊन देत असलेल्या भेटी ख्रिस्ती सामाजिक सेवा आहे आणि . . . आस्थेवाईक नागरिकांना ते देत असलेली प्रकाशने साधीसुधी प्रकाशने नाहीत; त्यामध्ये धर्म, बायबल, ड्रग्ज, मद्य, तरुणांना शिक्षण, वैवाहिक समस्या आणि घटस्फोट यांसारखे विषय असतात.” ते पुढे म्हणाले: “कोर्टाद्वारे शेवटी केवळ एवढेच म्हटले जाऊ शकते, की यहोवाच्या साक्षीदारांची तुलना फेरीवाल्यांशी करणे, अपमानजनक, अवमानजनक, इजा पोहंचवणारे व बदनामकारक आहे.”

यहोवाचे साक्षीदार समाजाच्या कल्याणाला हातभार लावतात; दररोजच्या आपल्या समस्यांवर मात कशी करायची याबाबतीत मदत करण्याद्वारे व भवितव्यासाठी आशा देण्याद्वारे ते लोकांना मदत करतात. बायबल त्यांना हे कार्य करण्यास मदत करते. “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”—२ तीमथ्य ३:१६, १७.

यहोवाचे साक्षीदार “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध” कसे होतात हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? बायबलविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी ते देत असलेल्या मदतीचा स्वीकार करण्याचे आणि अशाप्रकारे तुमच्या क्षेत्रात तसेच संपूर्ण जगभरात ते करत असलेल्या महत्त्वपूर्ण सामाजिक सेवेचा फायदा करून घेण्याचे आमंत्रण आम्ही आपल्याला देतो.

[३०, ३१ पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार लौकिक अधिकाऱ्‍यांना सहकार्य देण्याचा प्रयत्न करतात

[३१ पानांवरील चित्र]

साक्षीदार आपल्या शेजाऱ्‍यांना मदत करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत