व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद कर”

“यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद कर”

“यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद कर”

“यहोवामध्ये पराकाष्टेचा आनंद कर, म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करील.” स्तोत्र ३७:४, NW.

१, २. खऱ्‍या आनंदाचा उगम कोण आहे आणि राजा दावीद याने याकडे कशाप्रकारे आपले लक्ष वेधले?

‘जे आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव ठेवतात, जे दयाळू, जे शांती करणारे ते आनंदी आहेत.’ येशूने आपल्या डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचनाच्या लक्षवेधक प्रस्तावनेत, या व अशा इतर सहा विधानांतून आनंदी लोकांचे वर्णन केले. ही विधाने आपल्याला मत्तयकृत शुभवर्तमानात वाचायला मिळतात. (मत्तय ५:३-११, NW) येशूचे शब्द आपल्याला ही हमी देतात की आनंद मिळवणे शक्य आहे.

प्राचीन इस्राएलातील राजा दाविदाने लिहिलेल्या एका स्तोत्रात यहोवाच खरा आनंद देणारा आहे ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे. दाविदाने म्हटले: “यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद कर, म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करील.” (स्तोत्र ३७:४) पण यहोवाला व त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे विविध पैलू जाणून घेतल्यामुळे कशाप्रकारे “पराकाष्ठेचा आनंद” मिळतो? आपल्या उद्देशाच्या पूर्णतेकरता त्याने आजपर्यंत काय केले आहे आणि भविष्यात तो काय करणार आहे याविषयी विचार केल्यामुळे तुमचे “मनोरथ” पूर्ण होण्याची आशा तुम्हाला कशाप्रकारे मिळते? स्तोत्र ३७ अध्यायाच्या १-११ वचनांचा बारकाईने अभ्यास केल्यास या प्रशनांची उत्तरे मिळू शकतील.

“जळफळू नको”

३, ४. स्तोत्र ३७:१ येथे लिहिल्यानुसार दावीद कोणता सल्ला देतो आणि त्याकडे लक्ष देणे आज का योग्य आहे?

आपण आज ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ जगत आहोत. दुष्टाई सर्वत्र माजली आहे. “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील,” या प्रेषित पौलाच्या शब्दांची पूर्णता झालेली आपण पाहिली आहे. (२ तीमथ्य ३:१, १३) दुष्ट लोकांचे यश व त्यांची भरभराट होताना आपण पाहतो, तेव्हा याचा आपल्यावर अगदी सहज परिणाम होऊ शकतो. आपण विचलित होऊ शकतो व आपली आध्यात्मिक एकाग्रता देखील भंग होऊ शकते. ३७ व्या स्तोत्राचे सुरवातीचे शब्द आपल्याला या संभाव्य धोक्याविषयी सतर्क करतात: “दुष्कर्म्यांवर जळफळू नको; अन्याय करणाऱ्‍यांचा हेवा करू नको.”

जगातील विविध प्रसिद्धी माध्यमे दररोज होणाऱ्‍या अन्यायांच्या असंख्य घटनांचे आपल्याला सतत वृत्त देत असतात. बेईमान व्यापारी ठकबाजी करूनही निर्दोष सुटतात. गुन्हेगार असहाय्य लोकांचा गैरफायदा घेतात. खून करणारे खुलेआम फिरतात. या सर्व अन्यायांमुळे कधीकधी आपण संतापतो आणि आपले मन अस्वस्थ होते. दुष्ट कृत्ये करणारे यशस्वी होत आहेत असे भासत असल्यामुळे कधीकधी आपल्याला त्यांचा हेवा देखील वाटू शकतो. पण आपल्याला मनःस्ताप झाल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होऊ शकते का? दुष्टांच्या वरकरणी भरभराटीचा हेवा केल्यामुळे त्यांचे भविष्य बदलणार आहे का? निश्‍चितच नाही! आपण ‘जळफळण्याचे’ खरे तर काहीच कारण नाही. का नाही?

५. दुर्जनांची तुलना गवताशी का करण्यात आली आहे?

स्तोत्रकर्ता उत्तर देतो: “ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.” (स्तोत्र ३७:२) गवताच्या कोवळ्या हिरव्यागार पाती दिसायला सुंदर दिसतात, पण त्या लवकरच कोमेजून, वाळून जातात. त्याप्रकारे दुष्टांच्या बाबतीतही घडते. त्यांची भरभराट होताना दिसते पण ती कायमची नसते. त्यांचा मृत्यू होतो तेव्हा बेईमानीने कमवलेले त्यांचे धन त्यांची मदत करू शकत नाही. शेवटी सर्वांना न्यायाला सामोरे जावे लागते. पौलाने लिहिले: “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) दुष्टाई करणारे आणि सर्व अधार्मिक यांना शेवटी हे “वेतन” मिळतेच. किती व्यर्थ जीवन!—स्तोत्र ३७:३५, ३६; ४९:१६, १७.

६. स्तोत्र ३७:१, २ यातून आपल्याला काय शिकायला मिळते?

मग आपण दुष्टांच्या बेईमानीने कमवलेल्या समृद्धीमुळे अस्वस्थ व्हावे का? स्तोत्र ३७ च्या पहिल्या दोन वचनांतून आपल्याला हाच धडा मिळतो की: यहोवाची सेवा करण्याचा तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्यापासून, दुष्टांचे यश पाहून विचलित होऊ नका. त्याऐवजी, आपले लक्ष आध्यात्मिक आशीर्वादांवर केंद्रित ठेवा.—नीतिसूत्रे २३:१७.

“परमेश्‍वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग”

७. आपण यहोवावर भरवसा का ठेवला पाहिजे?

स्तोत्रकर्ता आपल्याला प्रोत्साहन देतो, “परमेश्‍वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग.” (स्तोत्र ३७:३अ) आपण चिंतातूर असतो किंवा आपल्याला शंकाकुशंका ग्रासतात तेव्हा देखील आपला भरवसा पूर्णपणे यहोवावर असला पाहिजे. तोच आपल्याला आत्मिक सुरक्षितता देण्याची हमी देतो. मोशेने लिहिले: “जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.” (स्तोत्र ९१:१) या व्यवस्थीकरणातील वाढता अनाचार पाहून आपले मन खिन्‍न होते तेव्हा आपण अधिकच यहोवावर विसंबून राहणे गरजेचे आहे. पाय मुरगळल्यावर एखाद्या मित्राने हात धरून आपल्याला आधार दिल्यास आपल्याला बरे वाटते. त्याचप्रमाणे, विश्‍वासूपणे चालत राहण्याकरता आपल्यालाही यहोवाच्या आधाराची गरज आहे.—यशया ५०:१०.

८. ख्रिस्ती सेवाकार्यात सहभाग घेतल्यामुळे, दुष्टांची भरभराट पाहून अनावश्‍यकपणे अस्वस्थ होण्याचे आपल्याला कसे टाळता येईल?

दुष्टांच्या भरभराटीमुळे अस्वस्थ होण्याचे टाळण्याकरता एक उत्तम उपाय म्हणजे मेंढरांसमान लोकांना शोधण्यात व त्यांना यहोवाच्या उद्देशाविषयी अचूक ज्ञान घेण्यास मदत करण्यात आपला जास्तीत जास्त वेळ खर्च करणे. वाढत्या दुष्टतेच्या या काळात आपण इतरांना मदत करण्यातच अधिक व्यग्र राहिले पाहिजे. प्रेषित पौलाने म्हटले: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” सर्वात “चांगले” कार्य म्हणजे इतरांना देवाच्या राज्याच्या वैभवी सुवार्तेविषयी सांगणे. आपले सार्वजनिक प्रचार कार्य खरोखर एक “स्तुतीचा यज्ञ” आहे.—इब्री लोकांस १३:१५, १६; गलतीकर ६:१०.

९. दावीदाने ‘देशात वस्ती करण्याविषयी’ जे म्हटले त्याचा खुलासा करा.

दावीद पुढे म्हणतो, “देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल.” (स्तोत्र ३७:३ब) दाविदाच्या काळात ‘देश’ हा शब्द यहोवाने इस्राएलला दिलेल्या क्षेत्राला, अर्थात वाग्दत्त देशाला सूचित करत होता. शलमोनाच्या शासनकाळात या देशाच्या सीमा उत्तरेकडील दानापासून दक्षिणेतील बैरशेब्यापर्यंत विस्तारलेल्या होत्या. हे इस्राएलाचे निवासस्थान होते. (१ राजे ४:२५) आज आपण पृथ्वीवर कोठेही राहात असलो तरीसुद्धा आपण आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहात आहोत जेव्हा सबंध पृथ्वी ग्रह नीतिमान नव्या जगात एक परादीस बनेल. तोपर्यंत आपण आध्यात्मिक सुरक्षिततेत वास करत आहोत.—यशया ६५:१३, १४.

१०. आपण ‘ईमानाने चालतो’ तेव्हा काय परिणाम घडून येतो?

१० आपण ‘इमानाने चालल्यास’ काय परिणाम होईल? प्रेरित नीतिसूत्र आपल्याला आठवण करून देते, की “स्थिर मनाच्या [“इमानदार,” NW] मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते.” (नीतिसूत्रे २८:२०) आपण जेथे कोठे राहतो तेथे आणि ज्या कोणाला शक्य असेल त्याला सुवार्तेचा प्रचार करण्यात विश्‍वासूपणे टिकून राहिल्यास यहोवाकडून निश्‍चितच आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. उदाहरणार्थ, फ्रँक व त्यांची पत्नी रोझ यांनी उत्तर स्कॉटलंडच्या एका गावात ४० वर्षांआधी पायनियर नेमणूक स्वीकारली. या गावात ज्यांना सत्याविषयी थोडीबहुत आस्था होती ते हळूहळू सत्यापासून दूर गेले होते. पण या पायनियर दांपत्याने हिंमत न हारता प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य सुरू केले. आज त्या गावात एक मोठी प्रगतीशील मंडळी आहे. या दांपत्याच्या इमानदार सेवेवर निश्‍चितच यहोवाचा आशीर्वाद होता. फ्रँक नम्रपणे सांगतो, “सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे आम्ही आजही सत्यात आहोत आणि यहोवाला उपयोगी पडत आहोत.” होय, आपण ‘इमानाने चालतो’ तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात व अनेक आशीर्वादांची आपल्याला जाणीव होते.

“यहोवामध्ये पराकाष्टेचा आनंद कर”

११, १२. (अ) आपण ‘यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद’ कसा करू शकतो? (ब) वैयक्‍तिक अभ्यासासंबंधी तुम्ही कोणते ध्येय ठेवू शकता आणि यामुळे काय घडून येईल?

११ यहोवासोबतचा आपला नातेसंबंध बळकट करण्याकरता आणि त्याच्यावरील आपला भरवसा कायम राखण्याकरता आपण ‘यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद केला’ पाहिजे. (स्तोत्र ३७:४अ) हे कसे करता येईल? आपण कदाचित कठीण परिस्थितीला तोंड देत असू, पण तरीसुद्धा स्वतःच्याच परिस्थितीबद्दल सतत विचार करण्याऐवजी आपण यहोवावर आपले लक्ष केंद्रित करतो. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याचे वचन वाचण्याकरता वेळ काढणे. (स्तोत्र १:१, २) बायबल वाचनातून तुम्हाला आनंद मिळतो का? यहोवाला अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्याच्या हेतूने जेव्हा तुम्ही बायबल वाचाल तेव्हा तुम्हाला जरूर आनंद वाटेल. बायबलचा एखादा भाग वाचल्यानंतर थोडे थांबून स्वतःशीच विचार करा, ‘या उताऱ्‍यातून मला यहोवाविषयी काय शिकायला मिळाले?’ बायबल वाचताना एखादी नोटबुक किंवा कागद तुम्ही जवळ ठेवू शकता. वाचलेल्या भागाचा अर्थ समजून घेण्याकरता तुम्ही अधूनमधून थांबता व विचार करता, तेव्हा देवाच्या एखाद्या मोहक गुणाची आठवण करून देणारा शब्द अथवा वाक्यांश लिहून घ्या. दुसऱ्‍या एका स्तोत्रात दाविदाने असे म्हटले: “हे देवा, माझ्या आश्रयाच्या खडका आणि माझ्या उद्धारका, माझे उच्चारलेले शब्द आणि न उच्चारलेले विचार तुला संतोष देणारे असोत.” (स्तोत्र १९:१४, सुबोध भाषांतर) देवाच्या वचनावर आपण अशाप्रकारे एकाग्रतेने लक्ष दिल्यामुळे यहोवाला “संतोष” आणि आपल्याला आनंद प्राप्त होतो.

१२ अभ्यास व मनन यांतून आपल्याला आनंद कशाप्रकारे मिळू शकेल? यासाठी आपण यहोवा व त्याच्या मार्गांविषयी जितके शिकता येईल तितके शिकून घेण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य आणि यहोवाजवळ या * (इंग्रजी), यांसारख्या प्रकाशनांतून आपल्याला अशी बरीच माहिती मिळते जिच्याविषयी आपण कृतज्ञतापूर्वक मनन करू शकतो. असे केल्यास, दावीद सर्व धार्मिक जनांना आश्‍वासन देतो त्याप्रमाणे, यहोवा “[तुमचे] मनोरथ पूर्ण करील.” (स्तोत्र ३७:४ब) याच भरवशामुळे कदाचित प्रेषित योहान पुढील शब्द लिहिण्यास प्रवृत्त झाला असावा: “त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्‍यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेहि आपल्याला ठाऊक आहे.”—१ योहान ५:१४, १५.

१३. अलीकडील वर्षांत बऱ्‍याच देशांत राज्य प्रचाराच्या कार्यात कशाप्रकारे विस्तार घडून आला आहे?

१३ यहोवाचे विश्‍वासू सेवक या नात्याने त्याचे सार्वभौमत्व शाबीत होताना पाहणे हा आपल्याकरता सर्वात आनंद देणारा क्षण असेल. (नीतिसूत्रे २७:११) ज्या देशांत पूर्वी जुलमी, हुकूमशाही सरकारे होती त्या देशांतही आपले बांधव आज प्रचंड प्रमाणात प्रचार कार्य करत आहेत हे ऐकून आपले मन आनंदाने भरून येत नाही का? या व्यवस्थीकरणाचा शेवट होण्याआधी प्रचार कार्यासाठी आणखी कितपत स्वातंत्र्य मिळेल हे पाहण्यास आपण उत्सुक आहोत. पाश्‍चात्त्य देशांत राहणारे यहोवाचे अनेक सेवक, काही काळ त्यांच्या देशांत येऊन राहणाऱ्‍या व बऱ्‍याच प्रमाणात धार्मिक स्वातंत्र्य असणाऱ्‍या विद्यार्थ्यांना, निर्वासितांना आणि इतरांना प्रचार करण्यात हिरीरीने भाग घेतात. आपली मनःपूर्वक इच्छा ही आहे की या व्यक्‍तींनी आपल्या मायदेशी परतल्यावर देखील, अभेद्य भासणाऱ्‍या आध्यात्मिक अंधकारात सत्याचा प्रकाश चमकू द्यावा.—मत्तय ५:१४-१६.

“आपला जीवितक्रम परमेश्‍वरावर सोपवून दे”

१४. आपण यहोवावर विसंबून राहू शकतो हे कशावरून शाबीत होते?

१४ हे जाणून किती दिलासा मिळतो की आपल्या चिंता आपल्याला मोठ्या ओझ्यासारख्या वाटत असल्या तरीसुद्धा त्या दूर केल्या जाऊ शकतात. कशा? दावीद म्हणतो, “आपला जीवितक्रम परमेश्‍वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धि करील.” (स्तोत्र ३७:५) यहोवावर खरोखर भरवसा ठेवला जाऊ शकतो, याचा भरपूर पुरावा आपल्या मंडळ्यांमध्येच मिळतो. (स्तोत्र ५५:२२) पूर्ण वेळेच्या सेवेत असलेले, मग ते पायनियर, प्रवासी पर्यवेक्षक, मिशनरी किंवा बेथेलमध्ये सेवा करणारे स्वयंसेवक असोत, ते सर्वजण यहोवाच्या प्रेमळ काळजीविषयी स्वतःच्या अनुभवावरून खात्री देऊ शकतात. तुमच्या ओळखीतल्या अशा सेवकांना, यहोवाने त्यांना कशी मदत केली आहे हे विचारून पाहा. तुम्हाला नक्कीच असे अनेक अनुभव ऐकायला मिळतील जे दाखवतात की कठीण परिस्थितीतही यहोवाचा हात कधी तोकडा पडत नाही. जीवनाच्या आवश्‍यकता तो नेहमी पुरवतो.—स्तोत्र ३७:२५; मत्तय ६:२५-३४.

१५. देवाच्या लोकांची धार्मिकता कशाप्रकारे चमकते?

१५ आपण यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवतो तेव्हा स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांची पूर्णता आपण अनुभवू शकतो: “तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रगट करील.” (स्तोत्र ३७:६) यहोवाचे साक्षीदार या नात्याने बऱ्‍याचदा आपल्याविषयी खोटी माहिती पसरवली जाते. पण यहोवा प्रामाणिक मनाच्या लोकांचे डोळे उघडतो आणि त्यांना हे समजून घेण्यास मदत करतो की आपली सार्वजनिक सेवा यहोवाबद्दल व शेजाऱ्‍यांबद्दल असलेल्या प्रेमावर आधारित आहे. त्याचवेळेस, लोकांनी कितीही खोटी माहिती पसरवली तरीसुद्धा आपले प्रामाणिक आचरण लपत नाही. सर्व प्रकारच्या विरोधात आणि छळातही यहोवा आपल्याला टिकून राहण्यास मदत करतो. यामुळे, देवाच्या लोकांची धार्मिकता मध्यान्हाच्या उन्हासारखी चमकते.—१ पेत्र २:१२.

‘स्वस्थ राहा, शांतपणे प्रतीक्षा करीत राहा’

१६, १७. स्तोत्र ३७:७ यानुसार आज काय करण्याची वेळ आहे आणि का?

१६ स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “परमेश्‍वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नको.” (स्तोत्र ३७:७) येथे दावीद आपल्याला यहोवाने कार्य करेपर्यंत शांतपणे प्रतीक्षा करण्याचे महत्त्व सांगतो. या व्यवस्थीकरणाचा अंत अद्याप आलेला नसला तरीसुद्धा आपण तक्रार करू नये. यहोवाची दया व सहनशीलता आपण आधी विचार केला त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी असल्याचे आपण अनुभवलेले नाही का? अंत येण्याआधी सुवार्तेचा प्रचार करण्यात व्यस्त राहून आपणही सहनशीलपणे प्रतीक्षा करत असल्याचे आता दाखवू शकतो का? (मार्क १३:१०) आपला आनंद आणि आध्यात्मिक सुरक्षा ज्यांमुळे गमवावी लागेल अशी अविचारी कृत्ये टाळण्याची ही वेळ आहे. ही वेळ सैतानाच्या जगाच्या नीतिभ्रष्ट प्रभावाचा अधिकच प्रकर्षाने धिक्कार करण्याची आहे. तसेच नैतिक शुद्धता कायम राखून यहोवासोबत आपली धार्मिक स्थिती कधीही धोक्यात न घालण्याची ही वेळ आहे. आपण सतत अनैतिक विचारांना मनातून दूर करून, विरुद्धलिंगी व समलिंगी व्यक्‍तींशीही अयोग्य कृत्ये करण्याचे टाळू.—कलस्सैकर ३:५.

१७ दावीद आपल्याला सल्ला देतो, “राग सोडून दे, कोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते. दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्‍वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:८, ९) होय आपण आता अगदी जवळ आलेल्या त्या काळाची पूर्ण विश्‍वासानिशी प्रतीक्षा करू शकतो जेव्हा यहोवा सबंध पृथ्वीवरून सर्व प्रकारची नीतिभ्रष्टता आणि तिच्याकरता जबाबदार असणाऱ्‍यांना कायमचे काढून टाकेल.

“थोडक्याच अवधीत”

१८, १९. स्तोत्र ३७:१० यातून तुम्हाला कोणते प्रोत्साहन मिळते?

१८ “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही.” (स्तोत्र ३७:१०) आपण या व्यवस्थीकरणाच्या अंताच्या आणि यहोवापासून दूर झाल्यामुळे आलेल्या संकटमय काळाच्या समाप्तीच्या जवळ येत असताना हे शब्द किती दिलासा देतात! मानवाने निर्माण केलेली सर्व प्रकारची सरकारे व अधिकार पूर्णपणे अयशस्वी ठरली आहेत. आणि आता आपण त्या समयाच्या जवळ आलो आहोत जेव्हा पृथ्वीवर पुन्हा एकदा ईश्‍वरशासित सरकार, अर्थात यहोवा देवाचे राज्य येशू ख्रिस्ताच्या हाती स्थापन होणार आहे. हे सरकार जगाचा कारभार आपल्या हाती घेऊन देवाच्या राज्याच्या सर्व विरोधकांचा नाश करील.—दानीएल २:४४.

१९ देवाच्या राज्याखालील नव्या जगात कितीही शोधले तरीसुद्धा तुम्हाला “दुर्जन” सापडणार नाही. किंबहुना त्या राज्यात जो कोणी यहोवाच्या विरोधात विद्रोह करील त्याला लगेच नाश केले जाईल. यहोवाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणारा किंवा देवाच्या अधिकाराला अधीन होण्यास नकार देणारा एकही जण तेथे राहणार नाही. तुमचे सर्व शेजारी एकाच मनोवृत्तीचे अर्थात यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास इच्छुक असतील. यामुळे किती सुरक्षित वातावरण निर्माण होईल याची कल्पना करा—कुलुपे व लोखंडी गज यांची गरज उरणार नाही. परिपूर्ण भरवसा व आनंद यात कोणतीही गोष्ट बाधा आणू शकणार नाही!—यशया ६५:२०; मीखा ४:४; २ पेत्र ३:१३.

२०, २१. (अ) स्तोत्र ३७:११ यातील “लीन जन” कोण आहेत आणि त्यांना “उदंड शांतिसुखाचा” उपभोग कोठे घेता येईल? (ब) आपण थोर दावीदाचे अनुकरण केल्यास कोणते आशीर्वाद आपल्याला मिळतील?

२० मग, “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:११अ) पण हे “लीन जन” कोण आहेत? “लीन” असे भाषांतर केलेला शब्द “छळणे, नमवणे किंवा अपमानित करणे” या अर्थाच्या मूळ शब्दापासून आला आहे. होय, “लीन जन” म्हणजे जे आपल्यावर होणाऱ्‍या अन्यायांचा नायनाट करण्यासाठी नम्रपणे यहोवाची वाट पाहतात. “ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:११ब) आजही खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीशी संबंधित असलेल्या आध्यात्मिक परादीसात आपल्याला विपुल शांती असल्याचे आढळते.

२१ अद्याप आपले दुःख व कष्ट दूर झालेले नाहीत तरीसुद्धा आपण एकमेकांना आधार देतो आणि निराश झालेल्यांचे सांत्वन करतो. यामुळे, यहोवाच्या लोकांमध्ये खरे आंतरिक समाधान नांदते. मेंढपाळ म्हणून नेमण्यात आलेले बंधू प्रेमळपणे आपल्या आध्यात्मिक आणि वेळ पडल्यास शारीरिक गरजांचीही काळजी वाहतात आणि अशा रितीने आपल्याला धार्मिकतेकरता त्रास सहन करण्यास साहाय्य करतात. (१ थेस्सलनीकाकर २:७, ११; १ पेत्र ५:२, ३) ही शांती खरोखर किती अनमोल आहे! आपल्याजवळ लवकरच येणाऱ्‍या शांतिमय परादीसात सार्वकालिक जीवन मिळवण्याची आशा देखील आहे. तर मग आपण, यहोवाबद्दलच्या आवेशामुळे त्याची शेवटपर्यंत विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या थोर दावीदाचे, अर्थात येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू या. (१ पेत्र २:२१) असे केल्याने आपण सदोदित आनंदी राहू, व ज्याच्यामध्ये आपण पराकाष्ठेचा आनंद करतो त्या आपल्या यहोवा देवाची सदैव स्तुती करत राहू.

[तळटीप]

^ परि. 12 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

स्तोत्र ३७:१, २ यातून तुम्हाला काय काय शिकायला मिळाले?

• तुम्ही ‘यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद’ कसा करू शकता?

• आपण यहोवावर विसंबून राहू शकतो हे दाखवणारा कोणता पुरावा आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती या नात्याने आपण ‘अन्याय करणाऱ्‍यांचा हेवा करत नाही’

[१० पानांवरील चित्र]

“परमेश्‍वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग”

[११ पानांवरील चित्र]

यहोवाविषयी तुम्हाला जितके शिकून घेता येईल तितके शिकून त्याच्यामध्ये पराकाष्ठेचा आनंद करा

[१२ पानांवरील चित्र]

“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”