व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वास ठेवण्याचे योग्य कारण

विश्‍वास ठेवण्याचे योग्य कारण

विश्‍वास ठेवण्याचे योग्य कारण

तरुण लोक चर्च का सोडतात याची ३१ कारणे या कोरियन पुस्तकात असा दावा केला आहे की, अनेकजणांना आपल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे ते चर्चला जाण्याचे सोडून देतात. उदाहरणार्थ, ते विचारतात, ‘देवावर विश्‍वास करणाऱ्‍या लोकांना दुःख का सहन करावे लागते?’ आणि ‘चर्चेसच्या पुष्कळ शिकवणी गोंधळविणाऱ्‍या व परस्परविरोधी असताना चर्चेस जे शिकवतात ते सगळे आम्ही का स्वीकारावे?’

पाळकांकडून मिळणाऱ्‍या उत्तरांनी निराश झालेले अनेकजण हा निष्कर्ष काढतात की, बायबलमध्ये याचे उत्तरच नाही. एखादा पाळक आपल्या व्यक्‍तिगत मतावर आधारित स्पष्टीकरण देतो तेव्हा सहसा गैरसमज होतो, इतकेच नव्हे तर देवावर आणि बायबलवर विश्‍वास करण्याचेही सोडून दिले जाते.

दक्षिण आफ्रिकेतील एबलचा हाच अनुभव होता; लहानपणापासून त्याच्यावर ल्यूथरन पंथाचे संस्कार झाले होते. तो आठवतो: “चर्च असे शिकवते की, मरणाऱ्‍या प्रत्येकाला देव ‘नेत’ असतो. पण, प्रेमळ परमेश्‍वर आईवडिलांना त्यांच्या मुलांपासून का दूर ‘नेईल’ हे मला कळत नव्हतं. मी लहानाचा मोठा झालो त्या ग्रामीण आफ्रिकेत आम्ही कोंबडीची पिले मोठी होईपर्यंत तिला कापत नव्हतो. एखादी दुभती गाय असली तर तिला वासरू होऊन ते दूध पिण्याचे सोडेपर्यंत आम्ही तिला कापत नव्हतो. मग, मानवांबद्दल देव अशीच दया का दाखवत नाही हे मला समजत नव्हतं.”

कॅनडातील आरॉम याच्याही मनात अशाच शंका होत्या. तो सांगतो, “मी १३ वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील वारले. अंत्यविधीच्या वेळी पाळक म्हणाले की, माझे वडील देवाजवळ स्वर्गात जाऊ शकतील म्हणून त्यांनी मरावे अशी देवाची इच्छा होती. ते म्हणाले, ‘देव चांगल्या लोकांना नेतो, कारण देवाला धार्मिक लोक आवडतात.’ पण देव इतका स्वार्थी कसा असू शकतो हे मला कळत नव्हतं.”

कालांतराने, एबल आणि आरॉम या दोघांची भेट यहोवाच्या साक्षीदारांशी झाली, त्यांनी त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास केला आणि शेवटी त्यांना आपल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. त्यांना देवाबद्दल प्रेम निर्माण झाले आणि त्याच्यावरील त्यांचा विश्‍वास पक्का झाला. शेवटी, त्यांनी आपले जीवन यहोवाला समर्पित केले आणि ते त्याचे विश्‍वासू सेवक बनले.

अचूक ज्ञान—देवावर विश्‍वास करण्याचे मुख्य कारण

या अनुभवांतून आपण काय शिकू शकतो? हेच की, देवावर विश्‍वास करण्याच्या बाबतीत, बायबलचे अचूक ज्ञान असणे आवश्‍यक आहे. प्रेषित पौलाने फिलिप्पैच्या प्राचीन शहरातील ख्रिश्‍चनांना सांगितले: “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.” (फिलिप्पैकर १:९) येथे पौल, देवाबद्दलच्या आणि सह-विश्‍वासू लोकांबद्दलच्या प्रेमाचा संबंध देवाचे अचूक ज्ञान व त्याच्या इच्छेची समज यांच्याशी लावतो.

आणि हे योग्यच आहे कारण एका व्यक्‍तीवर भरवसा आणि विश्‍वास असण्याकरता तिला जाणणे ही पहिली आवश्‍यकता असते—व जितके अधिक आणि अचूकपणे आपण तिला जाणू तितके उत्तम. त्याचप्रमाणे, देवावर विश्‍वास ठेवायला तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून अचूक ज्ञान आवश्‍यक आहे. “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टीबद्दलची खातरी आहे,” असे पौल म्हणाला. (इब्री लोकांस ११:१) बायबलचे अचूक ज्ञान नसताना देवावर विश्‍वास ठेवणे हे पुठ्ठ्याने तयार केलेल्या घरासारखे आहे. एका फुंकेत ते कोसळते.

एबल आणि आरॉम यांना लोक का मरतात या प्रश्‍नाने गोंधळवून टाकले होते; परंतु, बायबलचा अभ्यास केल्याने तुम्हाला अशा भेडसावणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतील. बायबल म्हणते की, “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) देव मानवांना आपल्याकडे घेतो म्हणून मानव वृद्ध होऊन मरत नाहीत तर ते आदामाच्या पापामुळे वृद्ध होतात व मरतात. (उत्पत्ति २:१६, १७; ३:६, १७-१९) शिवाय, बायबलमध्ये यहोवा देवाने दिलेली खरी आशा आहे. आपला पुत्र, येशू ख्रिस्त याच्याद्वारे तो पापी मानवजातीला पुनरुत्थानाची आशा देतो.—योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

पुनरुत्थानाबद्दलचे सत्य आपल्याला समजावे म्हणून बायबलमध्ये कित्येक व्यक्‍तींची उदाहरणे नोंदली आहेत ज्यांना येशूने पुन्हा जिवंत केले. (लूक ७:११-१७; ८:४०-५६; योहान ११:१७-४५) हे बायबल अहवाल वाचताना, पुनरुत्थित लोकांच्या मित्रांना व कुटुंबाला कशाप्रकारे आनंद झाला ते पाहा. तसेच ते देवाची स्तुती करण्यास आणि येशूवर विश्‍वास ठेवण्यास प्रवृत्त झाले हे देखील पाहा.

देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दलच्या अचूक ज्ञानाचा आजही लोकांवर असाच परिणाम होऊ शकतो. अनेकजणांना महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांच्या मनावर दडपण होते व ते गोंधळून आणि भांबावून गेले होते. पण त्यांनी बायबलचा अभ्यास केल्यावर त्यांना उत्तरे सापडली आणि त्यांचे जीवन एकदम बदलून गेले.

देवाबद्दल प्रेम—त्याची सेवा करण्याचे सर्वात मुख्य कारण

देवावरील विश्‍वासाकरता अचूक ज्ञान आवश्‍यक असले तरी त्याची आज्ञा पाळण्याची व सेवा करण्याची प्रेरणा मिळण्याकरता एवढेच पुरेसे नाही. देवाची सर्वात मोठी आज्ञा कोणती असे येशूला विचारले असता त्याने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” (मार्क १२:३०) येशूने दाखवल्याप्रमाणे एखाद्याने देवावर प्रेम केल्यास त्याची आज्ञा पाळण्यास व सेवा करण्यास तो आनंदाने तयार होईल. तुमच्याबाबतीत हे खरे आहे का?

कित्येक दशके कोरियात मिशनरी असलेल्या रेचलने स्वतःच्या विश्‍वासाचे पुढील कारण दिले: “यहोवा आपल्या निर्मितीला किती उदारता दाखवतो, आपल्या लोकांशी व्यवहार करताना त्यांना कसे माफ करतो आणि आपल्याकडून त्याला काय अपेक्षा आहेत हे सांगून आपला फायदा व्हावा अशी इच्छा करतो यांचा मी विचार करते. आणि या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर देवाबद्दल माझे प्रेम आणखी वाढते. व त्याच्याबद्दल प्रेम वाटत असल्याने त्याची सेवा करण्याची मला इच्छा होते.”

मार्था नावाची एक विधवा जर्मनीत राहते. ती ४८ वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहे. ती म्हणते: “यहोवाची मी सेवा का करते? कारण माझे त्याच्यावर प्रेम आहे. दररोज संध्याकाळी मी प्रार्थनेद्वारे यहोवाशी बोलते आणि त्याच्या सर्व आशीर्वादांकरता व खासकरून खंडणी बलिदानाकरता मी त्याचे फार उपकार मानते हे मी त्याला सांगते.”

होय, देवाबद्दलचे प्रेम आपल्याला त्याची मनापासून सेवा करण्यास प्रवृत्त करते. परंतु हे प्रेम कसे निर्माण होते? देवाने आपल्याकरता जे प्रेम दाखवले त्याबद्दल गहिरी कदर बाळगल्याने त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करायला आपल्याला सर्वात अधिक प्रेरणा मिळेल. बायबलमध्ये, आपल्या मनाला दिलासा मिळेल अशा एका गोष्टीची आठवण करून दिली आहे; ती म्हणजे, “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्‍यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, ह्‍यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली. प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हांआम्हांवर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.”—१ योहान ४:८-१०.

ही केवढी मोठी प्रीती आहे याची जाणीव तुम्हाला आहे का? कल्पना करा की, तुम्ही जोरदार प्रवाह असलेल्या एका ओढ्यात गटांगळ्या खात आहात. एक मनुष्य स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवतो. त्या मनुष्याला तुम्ही कधी विसराल का? की तुम्ही त्याचे खूप उपकार मानाल? त्याच्यासाठी तुम्ही वाटेल ते करायला तयार होणार नाही का? देवाने आपला पुत्र, येशू ख्रिस्त याचे खंडणी बलिदान देऊन याहूनही कित्येक पटीने मोठी प्रीती दाखवली आहे. (योहान ३:१६; रोमकर ८:३८, ३९) देवाच्या प्रीतीने तुम्ही भारावून जाता तेव्हा पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावर प्रेम करण्यास आणि त्याची सेवा करण्यास तुम्ही प्रवृत्त होता.

सध्या आणि भविष्यातील आशीर्वाद

देवाची इच्छा करण्यामागे त्याच्याबद्दल प्रीती हे सर्वात मुख्य कारण असले पाहिजे तरीपण त्याची सेवा करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो हे जाणून आपले मन सुखावते. प्रेषित पौल म्हणतो: “विश्‍वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.

देवावर जे प्रेम करतात आणि त्याची आज्ञा मानतात त्यांना खरोखर त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. अनेकांना बायबलच्या तत्त्वांचे अनुसरण केल्याने आरोग्य प्राप्त होते. (नीतिसूत्रे २३:२०, २१; २ करिंथकर ७:१) प्रामाणिकपणा आणि मेहनतीपणासंबंधी बायबलच्या तत्त्वांचा जे अंमल करतात त्यांच्यावर सहसा त्यांच्या मालकांचा विश्‍वास असतो व त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य लाभते. (कलस्सैकर ३:२३) यहोवावर भरवसा ठेवल्याने, देवाच्या सेवकांना अगदी कठीण परिस्थितींमध्येही मनःशांती प्राप्त होते. (नीतिसूत्रे २८:२५; फिलिप्पैकर ४:६, ७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येणाऱ्‍या पार्थिव परादीसातील सार्वकालिक जीवनाच्या आशीर्वादाची ते आत्मविश्‍वासाने वाट पाहतात.—स्तोत्र ३७:११, २९.

यहोवाकडून ज्यांना असे आशीर्वाद प्राप्त होतात त्यांना त्याच्याविषयी काय वाटते? कॅनडात राहणारी एक ख्रिस्ती स्त्री जॅकलीन, देवाचे अशाप्रकारे आभार मानते: “तो नेहमी आपल्याला चांगल्या चांगल्या भेटी देत असतो आणि सार्वकालिक जीवनाची खात्रीलायक आशा देखील तो देतो.” लेखात आधी उल्लेखिलेला एबल अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्‍त करतो: “परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याच्या प्रत्याशेविषयी मी पूर्वी कधीच ऐकले नव्हते पण आता मी त्याची वाट पाहून आहे. तथापि, परादीस नसते तरी देवाची सेवा करून त्याच्याबद्दल प्रेम दाखवण्याला मी केव्हाही आनंदच मानेन.”

तुम्ही देखील खरा विश्‍वास बाळगू शकता

“हे सैन्यांच्या यहोवा, . . . तू न्यायीपणाने न्याय करतोस, . . . तू अंतर्यामे आणि हृदये पारखतोस,” असे बायबल म्हणते. (यिर्मया ११:२०, पं.र.भा.) होय, आपल्या अंतर्यामात काय दडले आहे त्याची पारख यहोवा करतो. प्रत्येकाने देवावर विश्‍वास करण्याच्या हेतूचे परीक्षण केले पाहिजे. देवाविषयी चुकीचे विश्‍वास आणि कल्पना असल्यामुळे गतकाळात आपल्या हातून चुका झाल्या असतील. परंतु बायबलचे अचूक ज्ञान घेतल्याने आपल्याला निर्माणकर्ता, यहोवा देव याच्यासोबत उचित नातेसंबंध राखता येऊ शकतो.—१ तीमथ्य २:३, ४.

मोफत गृह बायबल अभ्यासाच्या योजनेकरवी, यहोवाचे साक्षीदार देवाविषयी अचूक ज्ञान घेण्यास मदत करत आहेत. (मत्तय २८:२०) अशी मदत स्वीकारलेले अनेकजण देवावर प्रेम करू लागले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर खरा विश्‍वास वाढवला आहे. बायबलचा अभ्यास केल्याने त्यांनी “व्यावहारिक बुद्धी व विचारशक्‍ती” संपादन केली आहे ज्याने त्यांना या संकटमय काळात ‘निर्भयतेने चालण्यास’ मदत केली आहे. (नीतिसूत्रे ३:२१-२३) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भविष्याकरता “स्थिर व अढळ” अशी आशा त्यांना आता आहे. (इब्री लोकांस ६:१९) तुम्ही देखील खरा विश्‍वास प्राप्त करू शकता आणि या आशीर्वादांचा लाभ घेऊ शकता.

[६ पानांवरील चौकट]

गोंधळात टाकणारे अनुत्तरित प्रश्‍न

“दवाखान्यात मेडिकल विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण घेतेवेळी मी चांगल्या लोकांनाही रोगांनी पीडित आणि त्रासांनी घेरलेले पाहिले. देव आहे तर मग या सगळ्या गोष्टी का होतात? धर्म केवळ मनःशांती मिळवण्याचा एक मार्ग आहे का?”—पूर्वी प्रेसबिटेरियन असलेला कोरियातील एक इसम.

“माझ्या मनात सतत हा विचार असायचा की माझे दारूडे वडील नरकात गेले आहेत की स्वर्गात गेले आहेत. मला मृतांची आणि नरकाग्नीची अत्यंत भीती होती. मला कळत नव्हतं की, एक प्रेमळ देव एखाद्या व्यक्‍तीला सर्वकाळासाठी नरकात यातना भोगण्यासाठी कसा पाठवू शकतो.”—पूर्वी कॅथलिक असलेली ब्राझीलमधील एक स्त्री.

“पृथ्वी आणि मानवजातीचे भविष्य काय? मानवांना सर्वकाळ जगणे कसे शक्य आहे? मानवजातीला खरी शांती कशी प्राप्त होईल?”—पूर्वी कॅथलिक असलेला जर्मनीतील एक इसम.

“पुनर्जन्माची शिकवण मला मुळीच पटत नव्हती. प्राणी तर देवाची भक्‍ती करत नाहीत, मग तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी प्राण्याचा जन्म मिळाला असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करून त्या अवस्थेतून वर येणे कसे शक्य आहे?”—पूर्वी हिंदू असलेला दक्षिण आफ्रिकेतील एक इसम.

“मी एका कन्फ्यूशियन कुटुंबात लहानाचा मोठा झालो. पूर्वजांना शांती मिळण्यासाठी केल्या जाणाऱ्‍या विधीत मी भाग घ्यायचो. अर्पणाचा टेबल तयार करताना व त्यापुढे नमस्कार करताना मला प्रश्‍न पडायचा की, मृत पूर्वज खरोखर अर्पण केलेले अन्‍न खायला येत असावेत का आणि माझा नमस्कार पाहत असावेत का?”—पूर्वी कन्फ्यूशियन पंथात असलेला कोरियातील एक इसम.

या सर्व व्यक्‍तींनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केला तेव्हा त्यांना त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली.