व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे

जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे

जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे

“जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” —मत्तय २४:४२.

१, २. आपण या व्यवस्थीकरणाच्या अंतिम भागात राहात आहोत हे कशावरून दिसून येते?

लेखक बिल एमट म्हणतात, “विसाव्या शतकावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा युद्धाची अधिक छाप आहे.” मानव इतिहासाच्या सगळ्याच काळांत युद्धे व हिंसा यांचे अस्तित्व राहिले आहे हे कबूल करून ते पुढे असे म्हणतात, “विसाव्या शतकात काही वेगळे घडले अशातला भाग नाही, वेगळे होते ते या गोष्टींचे प्रमाण. हे पहिलेच शतक होते ज्यात सबंध जगाला गोवणारे युद्ध घडले . . . आणि जणू मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी अशी एक नव्हेत तर दोन जागतिक युद्धे झाली.”

ज्यात “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य” उठतील अशी मोठी युद्धे होतील हे येशू ख्रिस्ताने भाकीत केले होते. पण, ‘ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या आणि या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या चिन्हाचा’ हा केवळ एक पैलू आहे. या महान भविष्यवाणीत येशूने दुष्काळ, मऱ्‍या व भूमिकंपांचाही उल्लेख केला होता. (मत्तय २४:३, ७, ८, NW; लूक २१:६, ७, १०, ११) बऱ्‍याच प्रकारे, या घटनांचे प्रमाण व तीव्रता वाढली आहे. मनुष्य दुष्टाईत सरसावला आहे; देव व सहमानवांप्रती त्याच्या मनोवृत्तीवरून हे स्पष्ट आहे. अनैतिकता, गुन्हेगारी व हिंसाचार सर्वत्र आहे. देवावर प्रेम करण्याऐवजी माणसे धनलोभी झाली आहेत, सुखविलासासाठी वेडी झाली आहेत. या सर्व गोष्टी दाखवतात की आपण ‘कठीण दिवसांत’ राहात आहोत.—२ तीमथ्य ३:१-५.

३. ‘काळाच्या लक्षणांचा’ आपल्यावर कसा परिणाम होण्यास हवा?

मानवी जीवनाच्या या अवनतीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? बरेचजण या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात; सध्याच्या दुःखद घटनांप्रती ते भावनाशून्य बनले आहेत. जगातील प्रभावशाली व बुद्धिवंत व्यक्‍ती या “काळाची लक्षणे” काय सूचित करताहेत हे ओळखू शकत नाहीत; शिवाय, धार्मिक पुढाऱ्‍यांनीही या बाबतीत योग्य मार्गदर्शन पुरवलेले नाही. (मत्तय १६:१-३) पण येशूने आपल्या अनुयायांना असा सल्ला दिला: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्तय २४:४२) येथे येशू केवळ जागृत असण्याचाच नव्हे, तर ‘जागृत राहण्याचा’ सल्ला देतो. जागृत राहण्याकरता सतत सतर्क व सावध राहणे आवश्‍यक आहे. केवळ आपण शेवटल्या दिवसांत राहात आहोत, दिवस कठीण आहेत हे कबूल करणे पुरेसे नाही. तर “सर्वांचा शेवट जवळ आला आहे” या गोष्टीची आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे. (१ पेत्र ४:७) तरच आपण काळाची निकड ओळखून जागृत राहू शकू. म्हणूनच आपण या प्रश्‍नावर मनन केले पाहिजे की: ‘अंत जवळ आला आहे यावर आपला भरवसा वाढवण्याकरता आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?’

४, ५. (अ) या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत निकट आला आहे याविषयी आपली खात्री कशामुळे आणखी पक्की होईल आणि का? (ब) नोहाच्या काळात व मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या काळात एक समानता कोणती आहे?

मानवी इतिहासात घडलेल्या एका अद्वितीय घटनेच्या आधी, अर्थात, नोहाच्या काळातील मोठ्या जलप्रलयाआधी पृथ्वीवर कशी परिस्थिती होती याकडे लक्ष द्या. लोक इतके दुष्ट होते की यहोवाच्या “चित्ताला खेद झाला.” त्याने म्हटले: “मी उत्पन्‍न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन.” (उत्पत्ति ६:६, ७) आणि त्याने खरोखर असे केले. तेव्हाच्या व आताच्या काळातील समानता दाखवून येशूने म्हटले: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.”—मत्तय २४:३७.

जलप्रलयाआधीच्या जगाविषयी यहोवाच्या ज्या भावना होत्या त्याच सध्याच्या जगाविषयीही आहेत असे गृहित धरल्यास वावगे ठरणार नाही. नोहाच्या काळातील अभक्‍त जगाचा ज्याअर्थी त्याने नाश केला त्याअर्थी तो आजच्या जगाचाही नाश करेल यात शंका नाही. त्या काळाच्या व आपल्या काळाच्या समानतेविषयी स्पष्ट समज असल्यास सध्याच्या या जगाच्या अंताविषयी आपली खात्री अधिकच पक्की होईल. तर मग, त्या व आपल्या काळात कोणत्या काही समानता आहेत? कमीतकमी पाच समानता आहेत. सर्वात पहिली म्हणजे, येणाऱ्‍या नाशाविषयी अगदी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.

“तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते” त्याविषयी सूचना

६. नोहाच्या काळात यहोवाने साहजिकच कोणती आगाऊ सूचना दिली?

नोहाच्या काळात यहोवाने असे घोषित केले: “माझ्या आत्म्याच्या [मनुष्याच्या] ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशेवीस वर्षांचा काळ देईन.” (उत्पत्ति ६:३) सा.यु.पू. २४९० साली देवाने हा निवाडा दिला तेव्हा त्या अभक्‍त जगाचा अंत होण्यास सुरवात झाली आहे असे सूचित झाले. त्या काळी जिवंत असलेल्यांकरता याचा काय अर्थ होता याची कल्पना करा! आणखी केवळ १२० वर्षांनंतर यहोवा, ‘ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून पृथ्वीवर प्रलयाचे पाणी’ आणणार होता.—उत्पत्ति ६:१७.

७. (अ) जलप्रलयासंबंधी देण्यात आलेल्या सूचनेप्रती नोहाची काय प्रतिक्रिया होती? (ब) या व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी देण्यात आलेल्या सूचनांप्रती आपली काय प्रतिक्रिया असावी?

नोहाला येणाऱ्‍या संकटाची कित्येक दशकांआधीच सूचना मिळाली आणि त्याने बचावाकरता तयारी करण्यासाठी त्या काळाचा सुज्ञपणे उपयोग केला. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे, “तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्‍त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्‍वासाने तारू तयार केले.” (इब्री लोकांस ११:७) आपल्याविषयी काय? या व्यवस्थीकरणाच्या अंतिम काळाला १९१४ साली सुरवात झाल्यापासून आता जवळजवळ ९० वर्षे होऊन गेली आहेत. आपण निश्‍चितच ‘अंतसमयात’ आहोत. (दानीएल १२:४) आपल्याला देण्यात आलेल्या सूचनांप्रती आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? बायबल म्हणते, “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) तेव्हा, काळाच्या निकडीची तीव्र जाणीव बाळगून यहोवाची इच्छा करण्याची ही वेळ आहे.

८, ९. आधुनिक काळात कोणते इशारे देण्यात आले आहेत आणि या सूचना कशाप्रकारे घोषित केल्या जात आहेत?

आधुनिक काळात, बायबलच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना प्रेरित शास्त्रवचनांतून हे कळून आले आहे की सध्याच्या व्यवस्थीकरणाचा नाश ठरलेला आहे. यावर आपला खरोखर विश्‍वास आहे का? येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्टपणे काय म्हटले याकडे लक्ष द्या: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्तय २४:२१) येशूने असेही म्हटले की तो देवाच्या नियुक्‍त न्यायाधीशाच्या भूमिकेत येऊन मेंढपाळ शेरड्यामेंढरांना वेगळे करतो त्याप्रमाणे लोकांना वेगळे करील. जे अयोग्य असल्याचे आढळतील ते “सार्वकालिक नाशाकडे जातील; आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.”—मत्तय २५:३१-३३, ४६, NW.

‘विश्‍वासू व बुद्धिमान दासामार्फत’ वेळोवेळी दिल्या जाणाऱ्‍या समयोचित सूचनांद्वारे यहोवाने आपल्या लोकांना येणाऱ्‍या नाशाचे इशारे दिले आहेत. (मत्तय २४:४५-४७) शिवाय, प्रत्येक राष्ट्र, वंश व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांना पुढील आवाहन दिले जात आहे: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:६, ७) देवाचे राज्य लवकरच मानवी शासन काढून टाकेल ही सूचना, यहोवाचे साक्षीदार जगभरात जो राज्याचा संदेश घोषित करत आहेत त्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. (दानीएल २:४४) ही सूचना आपण किरकोळ समजू नये. सर्वसमर्थ देव दिलेले वचन नेहमी पूर्ण करतो. (यशया ५५:१०, ११) नोहाच्या काळात त्याने केले आणि आपल्या काळातही तो करेल.—२ पेत्र ३:३-७.

लैंगिक भ्रष्टता माजली आहे

१०. नोहाच्या काळातील लैंगिक भ्रष्टतेविषयी काय म्हणता येईल?

१० आपला हा काळ आणखी एकप्रकारे नोहाच्या काळासमान आहे. यहोवाने पहिला पुरुष व स्त्री यांना वैवाहिक तरतुदीच्या चौकटीत राहून व देवाने दिलेल्या लैंगिक क्षमतेचा आदरणीय वापर करून त्यांच्यासारख्या मानवांनी ही पृथ्वी “व्यापून टाका” अशी आज्ञा दिली होती. (उत्पत्ति १:२८) नोहाच्या काळात, आज्ञाभंजक देवदूतांनी अनैसर्गिक लैंगिक संबंधांनी मानवजातीला दूषित केले. ते पृथ्वीवर आले आणि शारीरिक देह धारण करून त्यांनी रूपवान स्त्रियांसोबत संभोग केला; त्यांना झालेली अपत्ये अर्धी मानवी व अर्धी पैशाच्चिक होती. त्यांना नेफिलिम हे नाव पडले. (उत्पत्ति ६:२, ४) या कामासक्‍त देवदूतांच्या पापाची तुलना सदोम व गमोरा येथील लोकांच्या लैंगिक अपवर्तनाशी करण्यात आली आहे. (यहूदा ६, ७) यामुळे, त्याकाळात लैंगिक भ्रष्टता सर्वत्र माजली होती.

११. कशाप्रकारच्या नैतिक वातावरणामुळे आपला काळ नोहाच्या काळासमान आहे?

११ आजच्या काळातील नैतिक वातावरणाविषयी काय? या शेवटल्या काळात बऱ्‍याच जणांचे जीवन सेक्सवर केंद्रित आहे. पौल अशा लोकांचे वर्णन करताना म्हणतो की “ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले आहे.” (इफिसकर ४:१९) अश्‍लील साहित्य, विवाहपूर्व सेक्स संबंध, लहान मुलांचे लैंगिक शोषण, आणि समलैंगिकता अगदी सामान्य झाली आहे. काही तर लैंगिकरित्या संक्रमित रोग, मोडकळीस आलेली कुटुंबे आणि इतर सामाजिक समस्यांच्या रूपात ‘आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगतही’ आहेत.—रोमकर १:२६, २७.

१२. जे वाईट आहे त्याविषयी घृणा उत्पन्‍न करणे का महत्त्वाचे आहे?

१२ नोहाच्या काळात यहोवाने मोठा जलप्रलय आणून त्या कामासक्‍त जगाचा नाश केला होता. आजचा काळही खरोखर नोहाच्या काळासारखाच आहे ही वस्तुस्थिती आपण कधीही विसरू नये. येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटात’ या पृथ्वीवरून ‘जारकर्मी, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे’ लोक कायमचे काढून टाकले जातील. (मत्तय २४:२१; १ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८) जे वाईट आहे त्याविषयी घृणा उत्पन्‍न करून अनैतिकतेकडे नेतील असे सर्व प्रसंग टाळणे किती निकडीचे आहे!—स्तोत्र ९७:१०; १ करिंथकर ६:१८.

पृथ्वी “जाचजुलमांनी भरली”

१३. नोहाच्या काळात पृथ्वी का “जाचजुलमाने भरली” होती?

१३ बायबल नोहाच्या काळातील आणखी एका वैशिष्ट्याकडे लक्ष वेधते: “त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.” (उत्पत्ति ६:११) खरे पाहता, हिंसाचार काही नवीन नव्हता. आदामाचा पुत्र काईन याने आपल्या नीतिमान भावाचा खून केला होता. (उत्पत्ति ४:८) लामेखने रचलेल्या एका कवितेत तो आपल्या काळात अस्तित्वात असलेल्या हिंसक प्रवृत्तीचे दर्शन घडवतो. या कवितेत तो आपल्यावर हल्ला करणाऱ्‍या एका तरुणाला ठार मारण्याविषयी फुशारकी मारतो. (उत्पत्ति ४:२३, २४) नोहाच्या काळात फरक होता तो हिंसाचाराच्या प्रमाणात. देवाच्या आज्ञाभंजक देवदूत पुत्रांनी पृथ्वीवरील स्त्रियांशी विवाह करून नेफिलिम म्हटलेले संतान उत्पन्‍न केले तेव्हा पृथ्वीवर अभूतपूर्व प्रमाणात हिंसाचार वाढला. नवे जग भाषांतर दाखवते की या हिंसक राक्षसांच्या संदर्भात वापरलेला मूळ इब्री शब्द, ‘पाडणारे’—म्हणजे ‘जे दुसऱ्‍यांना खाली पाडतात’ या अर्थाचा आहे. (उत्पत्ति ६:४) यामुळे, सबंध पृथ्वी “जाचजुलमाने भरली” होती. (उत्पत्ति ६:१३, पंडिता रमाबाई भाषांतर) अशा वातावरणात आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करताना नोहासमोर किती समस्या आल्या असतील याची कल्पना करा! तरीसुद्धा नोहा ‘त्या पिढीत परमेश्‍वरापुढे नीतिमान’ राहिला.—उत्पत्ति ७:१.

१४. आज जग किती प्रमाणात ‘जाचजुलमाने भरले’ आहे?

१४ मानव इतिहासात हिंसाचार तसा पूर्वापार चालत आला आहे. पण नोहाच्या काळाप्रमाणेच आपल्या काळातही तो अभूतपूर्व प्रमाणात पाहण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसा, दहशतवादी कृत्ये, जातीसंहार आणि काहीही कारण नसताना जमावांवर गोळीबार करणाऱ्‍यांची वृत्ते आपण दररोजच ऐकतो. याशिवाय, युद्धांत जो रक्‍तपात होतो तो वेगळा. पृथ्वी खरोखर पुन्हा एकदा जाचजुलमाने भरली आहे. का? वाढलेल्या हिंसाचारामागे काय कारण आहे? या प्रश्‍नांची उत्तरे, नोहाच्या काळाची आपल्या काळाशी आणखी एक समानता असल्याचे स्पष्ट करतात.

१५. (अ) या शेवटल्या काळात हिंसाचारात वाढ कशामुळे झाली आहे? (ब) आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?

१५ देवाचे मशीही राज्य १९१४ साली स्वर्गात स्थापन झाले तेव्हा सिंहासनारूढ झालेल्या येशू ख्रिस्ताने ऐतिहासिक कारवाई केली. दियाबल सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून काढून पृथ्वीवर टाकण्यात आले. (प्रकटीकरण १२:९-१२) जलप्रलयाआधी, आज्ञाभंजक देवदूतांनी स्वतःहून आपले स्वर्गीय स्थान सोडले; पण आधुनिक काळात मात्र त्यांना हुसकावून लावण्यात आले. शिवाय, आता त्यांच्याजवळ मानवी शरीर धारण करून पृथ्वीवर येण्याचे व अनैतिक शरीरसुख उपभोगण्याचे सामर्थ नाही. त्यामुळे, निराश होऊन, क्रोधित होऊन आणि ठरलेल्या नाशामुळे भयभीत होऊन ते आज मानवांना व संस्थांना नोहाच्या काळापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची व हिंसेची अमानवी कृत्ये करण्यास प्रवृत्त करत आहेत. सबंध पृथ्वी या आज्ञाभंजक देवदूतांनी व त्यांच्या संतानांनी दुष्टाईने भरली तेव्हा यहोवाने जलप्रलयाआधीच्या त्या सबंध जगाचा सर्वनाश केला. आपल्या काळातही तो असेच करेल यात शंका नाही! (स्तोत्र ३७:१०) पण जे आज जागृत राहात आहेत त्यांना जाणीव आहे की त्यांची सुटका जवळ आली आहे.

संदेशाचा प्रचार

१६, १७. नोहाच्या व आपल्या काळातील चवथी समानता कोणती आहे?

१६ सध्याच्या काळात आणि जलप्रलयाआधीच्या जगात समान असलेली चवथी गोष्ट नोहाला देण्यात आलेल्या कार्याशी संबंधित आहे. नोहाला एक मोठे तारू बांधण्यास सांगण्यात आले होते. तो एक “उपदेशक” देखील होता. (२ पेत्र २:५) त्याने कशाविषयी उपदेश, अथवा प्रचार केला? नोहाचे प्रचार कार्य हे लोकांना पश्‍चात्ताप करण्यासाठी एक आवाहन होते आणि येणाऱ्‍या नाशाची एक पूर्वसूचना होती. येशूने म्हटल्याप्रमाणे, “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी लक्ष दिले नाही.”—मत्तय २४:३८, ३९, NW.

१७ त्याचप्रकारे, यहोवाचे साक्षीदार आज त्यांना नेमण्यात आलेले प्रचार कार्य परिश्रमपूर्वक पार पाडत आहेत आणि त्यामुळे देवाच्या राज्याचा संदेश जगाच्या पाठीवर सर्वत्र घोषित केला जात आहे. पृथ्वीच्या जवळजवळ प्रत्येक भागात लोकांना स्वतःच्या भाषेत राज्याचा संदेश ऐकण्याची व वाचण्याची संधी उपलब्ध आहे. यहोवाच्या राज्याची घोषणा करणाऱ्‍या टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रत्येक अंकाच्या २,५०,००,००० प्रती १४० भाषांत मुद्रित केल्या जातात. खरोखर, देवाच्या राज्याची सुवार्ता “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून . . . सर्व जगात” घोषित केली जात आहे. हे काम पूर्ण झाले आहे याविषयी यहोवाचे समाधान होईल तेव्हा अंत आल्याशिवाय राहणार नाही.—मत्तय २४:१४.

१८. आपल्या प्रचार कार्याला मिळणाऱ्‍या प्रतिसादाची नोहाच्या काळातील लोकांच्या प्रतिक्रियेशी कशाप्रकारे तुलना करता येईल?

१८ जलप्रलयाधीच्या काळातील आध्यात्मिक व नैतिक दुर्दशा लक्षात घेतल्यास, नोहाच्या संदेशावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍या त्याच्या शेजाऱ्‍यांनी त्याच्या कुटुंबाची कशाप्रकारे थट्टा केली व कशाप्रकारे त्यांच्याशी दुर्व्यवहार केला असेल याची आपण सहज कल्पना करू शकतो. पण अंत यायचा तो आलाच. त्याचप्रकारे या शेवटल्या काळातही ‘थट्टेखोर लोकांची’ कमी नाही. पण बायबल सांगते त्याप्रमाणे, “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” (२ पेत्र ३:३, ४, १०) त्याच्या नियुक्‍त वेळी तो आल्याशिवाय राहणार नाही. त्याला विलंब लागावयाचा नाही. (हबक्कूक २:३) यामुळे जागृत राहणे किती शहाणपणाचे आहे!

फार कमी लोक बचावतात

१९, २०. जलप्रलय आणि या व्यवस्थीकरणाच्या नाशात आपण कोणती समान गोष्ट पाहू शकतो?

१९ लोकांची दुष्टाई व त्यांचा नाश, एवढ्यावरच नोहाच्या व आपल्या काळातील समानता संपत नाही. जलप्रलयातून काही लोक बचावले त्याचप्रकारे सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या अंतातूनही काहीजण बचावतील. जलप्रलयातून बचावलेले लोक नम्र जन होते ज्यांनी सर्वसामान्य लोकांप्रमाणे आपले जीवन व्यतीत केले नाही. तर त्यांनी देवाच्या सूचनेकडे लक्ष देऊन स्वतःला त्या काळातील जगापासून अलिप्त ठेवले. बायबल म्हणते, “नोहावर परमेश्‍वराची कृपादृष्टि होती. . . . नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता.” (उत्पत्ति ६:८, ९) सर्व मानवजातीपैकी केवळ एक कुटुंब, “केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले.” (१ पेत्र ३:२०) आणि त्यांना यहोवा देवाने आज्ञा दिली: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.”—उत्पत्ति ९:१.

२० देवाचे वचन आपल्याला आश्‍वासन देते की एक ‘मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून येईल.’ (प्रकटीकरण ७:९, १४) या मोठ्या लोकसमुदायात किती लोक असतील? येशूने स्वतः म्हटले: “जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) सध्या पृथ्वीवर राहणाऱ्‍या अब्जावधी लोकांच्या तुलनेत, येणाऱ्‍या मोठ्या संकटातून बचावणारे लोक खरोखर फार कमी असतील. त्यांनासुद्धा जलप्रलयातून बचावणाऱ्‍या लोकांप्रमाणे कदाचित विशेषाधिकार देण्यात येतील. बचावणाऱ्‍यांना कदाचित काही काळपर्यंत नव्या पार्थिव समाजाची उभारणी करण्याकरता संतान उत्पन्‍न करण्याची सुसंधी दिली जाईल.—यशया ६५:२३.

“जागृत राहा”

२१, २२. (अ) जलप्रलयाविषयीच्या चर्चेतून तुम्हाला कशाप्रकारे फायदा झाला आहे? (ब) येत्या २००४ सालाकरता वार्षिक वचन कोणते आहे आणि त्यातील सल्ल्याचे आपण पालन का केले पाहिजे?

२१ जलप्रलय बऱ्‍याच काळाआधी होऊन गेलेला असला तरीसुद्धा, तो आपल्याला एक स्पष्ट सूचना पुरवतो ज्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. (रोमकर १५:४) नोहाच्या काळात व आपल्या काळात असलेल्या समान गोष्टींनी आपल्याला आज जे घडत आहे त्याविषयी अधिकच जागरूक व दुष्टांना न्याय देण्याकरता येशू चोराप्रमाणे येईल त्या दिवसाविषयी सतर्क केले पाहिजे.

२२ आज येशू ख्रिस्त एका प्रचंड आध्यात्मिक बांधकामाचे नेतृत्व करत आहे. खऱ्‍या उपासकांच्या सुरक्षेकरता व बचावाकरता आज तारवाप्रमाणे एक आध्यात्मिक परादीस अस्तित्वात आहे. (२ करिंथकर १२:३, ४) मोठ्या संकटातून बचावण्याकरता आपण त्या परादिसात राहिले पाहिजे. या आध्यात्मिक परादीसाच्या क्षेत्राबाहेर सैतानाचे जग आहे, आध्यात्मिकरित्या सुस्त झालेल्यांना लगेच आपल्यात समावून घेण्यास ते तयार असते. म्हणूनच आपण ‘जागृत राहावे’ आणि यहोवाच्या दिवसाकरता आपण तयार आहोत हे शाबित करणे अत्यावश्‍यक आहे.—मत्तय २४:४२, ४४.

तुम्हाला आठवते का?

• येशूने त्याच्या येण्याविषयी कोणता सल्ला दिला?

• येशूने आपल्या उपस्थितीच्या काळाची तुलना कशाशी केली?

• आपला काळ कोणकोणत्या प्रकारे नोहाच्या काळासमान आहे?

• नोहाच्या व आपल्या काळातील समान गोष्टींवर मनन केल्यावर या काळाच्या निकडीची आपल्याला जी जाणीव आहे, तिच्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

साल २००४ साठी पुढील वार्षिक वचन राहील: “जागृत राहा . . . सिद्ध असा.”—मत्तय २४:४२, ४४.

[१५ पानांवरील चित्र]

नोहाने देवाच्या सूचनेकडे लक्ष दिले. आपणही असाच प्रतिसाद देतो का?

[१६, १७ पानांवरील चित्र]

“नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल”