व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

मीखाच्या पुस्तकाचे किती अध्याय आहेत, ते केव्हा लिहिण्यात आले आणि त्या वेळची परिस्थिती काय होती?

मीखाच्या पुस्तकाचे सात अध्याय आहेत. संदेष्टा मीखाने सा.यु. आठव्या शतकात हे पुस्तक लिहिले; त्या वेळेला देवाचे करारबद्ध लोक दोन राष्ट्रांत विभाजित झालेले होते—इस्राएल आणि यहुदा.—८/१५, पृष्ठे ९.

मीखा ६:८ नुसार देव आपल्याकडून काय अपेक्षितो?

आपण ‘नीतीने वागावे,’ अशी तो अपेक्षा करतो. देवाची कार्य करण्याची पद्धत न्यायी असल्यामुळे आपणही त्याची प्रामाणिकतेची व एकनिष्ठेची तत्त्वे उंचावून धरली पाहिजेत. तो आपल्याला “आवडीने दया” करण्यास सांगतो. संकटे किंवा गरजेच्या वेळी इतरांच्या आवश्‍यकता भागवण्यासाठी धावून जाण्याद्वारे ख्रिश्‍चनांनी प्रेमळ-दया दाखवली आहे. यहोवासोबत “राहून नम्रभावाने” चालण्याकरता आपण आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि त्याच्यावर विसंबून राहिले पाहिजे.—८/१५, पृष्ठे २०-२.

एखाद्या ख्रिश्‍चनाची नोकरी गेल्यास तो काय करू शकतो?

त्याने आपल्या जीवनशैलीचा पुनःविचार करणे सुज्ञपणाचे ठरेल. लहानशा घरात राहायला गेल्याने किंवा अनावश्‍यक भौतिक मालमत्ता कमी केल्याने आपली जीवनशैली सोपी करता येईल. होय, दररोजच्या गरजांविषयी काळजी करण्याचे थांबवून यहोवा आपल्या गरजा पुरवेल असा भरवसा बाळगणे महत्त्वाचे आहे. (मत्तय ६:३३, ३४)—९/१, पृष्ठे १४-१५.

विवाहाच्या वेळी भेटवस्तू देताना किंवा घेताना आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

महागड्या भेटवस्तूंची आवश्‍यकता नाही किंवा त्यांची अपेक्षा देखील आपण करू नये. देणाऱ्‍याच्या अंतःकरणाची मनोवृत्ती सर्वात मौल्यवान आहे. (लूक २१:१-४) एखादी भेटवस्तू कोणी दिली त्याचे नाव जाहीर करणे, प्रेमळपणा नाही. असे केल्याने त्या व्यक्‍तीला संकोचल्यासारखे होईल. (मत्तय ६:३)—९/१, पृष्ठ २९.

आपण निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?

नियमितरीत्या प्रार्थना केल्याने देवाबरोबरचा आपला नातेसंबंध मजबूत होतो आणि अनेक परीक्षांना तोंड द्यायला आपण तयार होतो. आपल्या प्रार्थना, गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार संक्षिप्त किंवा लांबलचक असू शकतात. प्रार्थनांमुळे विश्‍वास वाढतो आणि समस्यांना तोंड द्यायला आपल्याला मदत मिळते.—९/१५, पृष्ठे १५-१८.

आपण १ करिंथकर १५:२९ हे वचन कसे समजावे कारण काही आवृत्तींमध्ये “मृतांसाठी बाप्तिस्मा घेणे,” असे भाषांतर करण्यात आले आहे?

प्रेषित पौलाला असे म्हणायचे होते, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा बाप्तिस्मा अशा एका जीवनशैलीशी निगडीत आहे ज्यामुळे, ख्रिस्ताप्रमाणे ते त्यांच्या मृत्यूपर्यंत एकनिष्ठ राहतात. नंतर, ख्रिस्ताप्रमाणेच आत्मिक जीवनासाठी त्यांचे पुनरुत्थान होते.—१०/१, पृष्ठ २९.

ख्रिश्‍चन होण्यात, १ करिंथकर ६:९-११ मध्ये उल्लेखलेल्या गोष्टीच केवळ टाळणे समाविष्ट नाही, हे आपल्याला कसे कळते?

प्रेषित पौल, जारकर्म, मूर्तिपूजा, दारूबाजी अशा पापांविषयी सांगून एवढ्यावरच थांबला नाही. या व्यतिरिक्‍तही काही बदल करण्याची गरज असल्याचे त्याने सूचित केले कारण त्याने पुढे म्हटले: “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही.”—१०/१५, पृष्ठे १८-१९.

ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा प्राचीन काळात कोणकोणत्या स्त्रिया होत्या?

यांमध्ये, शिप्रा व पुवा नावाच्या दोन सुइणींचा समावेश होतो ज्यांनी, जन्माला येणाऱ्‍या प्रत्येक इब्री मुलाला ठार मारण्याविषयी फारोची आज्ञा मानली नाही. (निर्गम १:१५-२०) कनानी वेश्‍या राहाब हिने दोन इस्राएली हेरांचा जीव वाचवला. (यहोशवा २:१-१३; ६:२२, २३) सुज्ञपणा दाखवून अबीगईलने अनेक लोकांचे जीव वाचवले आणि दावीदाला रक्‍तपात करण्यापासून आवरले. (१ शमुवेल २५:२-३५) आजच्या स्त्रियांसाठी ही उदाहरणे आहेत.—११/१, पृष्ठे ८-११.

शास्ते ५:२० मध्ये म्हटल्याप्रमाणे सीसराशी “आकाशातून तारे” कसे काय लढले?

या वाक्यावरून देवाकडून साहाय्य मिळाल्याचे सूचित होते, असे काहींचे म्हणणे आहे. इतर काहींचे म्हणणे आहे, की हे देवदूतांकडून मिळालेल्या साहाय्याला, उल्कापाताला किंवा सीसरा ज्यांच्यावर अवलंबून होता त्या खोट्या ठरलेल्या फलज्योतिषांच्या भविष्यांना सूचित करते. याविषयी बायबलमध्ये कसलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्यामुळे, इस्राएलच्या सैन्याला देवाकडून कोणत्यातरी प्रकारे साहाय्य मिळाले असावे, असा अर्थ आपण घेऊ शकतो.—११/१५, पृष्ठ ३०.

आज धर्माबद्दल बेपर्वा मनोवृत्ती आणि उदासीनता वाढत असताना इतके लोक देवावर अजूनही विश्‍वास असल्याचा दावा का करतात?

काही लोक मनःशांतीच्या शोधात चर्चला जातात. इतर, मृत्यूनंतर अनंतकालिक जीवन असण्याची आशा धरतात किंवा आरोग्य, धनसंपत्ती आणि यशाच्या शोधात असतात. काही क्षेत्रात, लोक कम्युनिस्ट मतप्रणालीची जागा भांडवलशाहीच्या उद्दिष्टांनी घेतल्यानंतर निर्माण झालेली आध्यात्मिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करू लागले. या सर्व कारणांची जाणीव बाळगल्याने एखाद्या ख्रिश्‍चनाला घरमालकाबरोबर अर्थपूर्ण चर्चा करण्यास मदत होऊ शकते.—१२/१, पृष्ठ ३.