व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या मानवी कुटुंबाबद्दल शिकणे

येशूच्या मानवी कुटुंबाबद्दल शिकणे

येशूच्या मानवी कुटुंबाबद्दल शिकणे

येशूचा बाप्तिस्मा होईपर्यंत म्हणजे पृथ्वीवरील त्याच्या जीवनाची पहिली ३० वर्षे पूर्ण होईपर्यंत तो ज्यांच्यासोबत राहिला त्या त्याच्या जवळच्या कुटुंबियांविषयी तुम्हाला काय माहीत आहे? शुभवर्तमानाच्या अहवालांतून आपल्याला काय कळते? त्याच्या कुटुंबाबद्दल अधिक जाणून आपण काय शिकू शकतो? याच्या उत्तरांचा तुम्हाला फायदा होईल.

येशू गर्भश्रीमंत घरी जन्मला का? येशूचा दत्तक पिता, योसेफ हा एक सुतार होता. हे काम मेहनतीचे होते कारण लाकडासाठी झाडे तोडून आणावी लागत असे. येशूचे मानवी पालक त्याच्या जन्मानंतर ४० दिवसांनी जेरूसलेमला गेले तेव्हा नियमशास्त्रानुसार त्यांनी अर्पण चढवले. नियमशास्त्रात सांगितल्यानुसार त्यांनी मेंढा आणि त्यासोबत होला किंवा पारवा अर्पिला का? नाही. ही अर्पणे करण्याची त्यांची ऐपत नव्हती असे दिसते. परंतु, नियमशास्त्रात गरिबांकरता एक व्यवस्था होती. त्या व्यवस्थेनुरूप, योसेफ आणि मरीयेने “होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले” अर्पिली. अर्पणासाठी स्वस्त प्राण्यांची निवड त्यांनी केली यावरून ते गरीब होते हे दिसते.—लूक २:२२-२४; लेवीय १२:६, ८.

तुम्हाला दिसेल की, मानवजातीचा भावी शासक, येशू ख्रिस्त गरीब लोकांमध्ये, ज्यांना पोटापाण्याची सोय करण्यासाठी काबाडकष्ट करावे लागत अशांमध्ये जन्मला. मग, तो आपल्या दत्तक पित्याप्रमाणे मोठा होऊन सुतार बनला. (मत्तय १३:५५; मार्क ६:३) स्वर्गातील शक्‍तिशाली आत्मिक प्राणी या नात्याने “[येशू] धनवान” होता तरीपण बायबल म्हणते की, तो आपल्याकरता “दरिद्री” झाला. त्याने मानवाचे कनिष्ठ रूप धारण केले आणि सामान्य लोकांच्या कुटुंबात तो वाढला. (२ करिंथकर ८:९; फिलिप्पैकर २:५-९; इब्री लोकांस २:९) येशूचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला नव्हता ज्यामुळे कदाचित काही लोकांना तो आपल्यापैकीच एक आहे असे वाटले असावे. त्याचे पद किंवा स्थान यांनी ते विर्कषित झाले नाहीत. त्याच्या शिकवणी, त्याचे प्रिय वाटणारे गुण आणि त्याची अद्‌भुत कृत्ये यांचे मूल्य त्यांना वाटत होते. (मत्तय ७:२८, २९; ९:१९-३३; ११:२८, २९) यहोवाने एका सामान्य कुटुंबात येशूचा जन्म होऊ दिला त्यावरून त्याची बुद्धी आपल्याला दिसून येते.

आता येशूच्या कौटुंबिक सदस्यांविषयी आणि त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो ते पाहू या.

योसेफ—एक सात्विक पुरुष

योसेफाला जेव्हा कळले की, आपली होणारी पत्नी “सहवास होण्यापूर्वी” गर्भवती राहिली तेव्हा एकीकडे मरीयेवरचे प्रेम आणि दुसरीकडे अनैतिकतेच्या विचाराचाही तिटकारा यांनी त्याची किती वाईट दशा झाली असावी. हा सगळा प्रसंगच, भावी पती यानात्याने त्याच्या अधिकाराचा जणू अनादर होता. त्याच्या काळात, मागणी घातलेली स्त्री त्या पुरुषाच्या पत्नीसारखीच होती. या गोष्टीचा फार विचार केल्यावर, मरीयेला व्यभिचारिणी म्हणून दगडमार करून ठार मारले जाऊ नये म्हणून योसेफाने तिला गुप्तरित्या सोडून द्यायचे ठरवले.—मत्तय १:१८; अनुवाद २२:२३, २४.

तेव्हा, योसेफाच्या स्वप्नात एक देवदूत आला व त्याला म्हणाला: “तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” देवाकडून अशी सूचना मिळाल्यावर योसेफाने त्यानुसार कार्य केले व मरीयेला आपल्या घरी नेले.—मत्तय १:२०-२४.

हा निर्णय घेतल्यामुळे, तो धर्मी आणि विश्‍वासू पुरुष, यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे भाकीत केलेल्या भविष्यवाणीत सामील झाला: “पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्‍निध देव) असे ठेवील.” (यशया ७:१४) योसेफ खरोखर एक आध्यात्मिक वृत्तीचा पुरुष होता; मरीयेचा पहिला पुत्र त्याचा स्वतःचा मुलगा नसणार हे त्याला माहीत असतानाही त्याला मशीहाचा दत्तक पिता बनण्याचा सुहक्क बहुमोलाचा वाटला.

मरीयेने आपल्या मुलाला जन्म दिला नाही तोपर्यंत त्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवला नाही. (मत्तय १:२५) या नवविवाहित जोडप्याला लैंगिक संबंध न ठेवणे कठीण गेले असेल, परंतु त्या बाळाचा पिता कोण होता यासंबंधी त्यांना कसलाही गैरसमज नको होता. आत्म-संयमाचे केवढे उत्तम उदाहरण! योसेफाने नैसर्गिक इच्छांपेक्षा आध्यात्मिक मूल्यांना महत्त्व दिले.

चार प्रसंगी योसेफाला आपल्या दत्तक पुत्राला वाढवण्यासंबंधी देवदूताकडून मार्गदर्शन मिळाले. तीन वेळा तर या मुलाला कोठे वाढवावे यासंबंधी त्याला सूचना मिळाल्या. मुलाचा जीव वाचवण्याकरता या सूचनांचे तात्पर्याने पालन करण्याची आवश्‍यकता होती. सर्व प्रसंगी, योसेफाने लगेच कार्य केले व पहिल्यांदा त्याने बाळाला ईजिप्तला नेले आणि त्यानंतर पुन्हा इस्राएलले नेले. यामुळे हेरोदने चालवलेल्या बालकांच्या हत्येपासून बाळ येशूचा जीव वाचला. योसेफाच्या आज्ञापालनामुळे मशीहासंबंधी केलेल्या भविष्यवाणींची पूर्णता देखील झाली.—मत्तय २:१३-२३.

योसेफाने येशूला काम शिकवले ज्यामुळे तो स्वतःची काळजी घेऊ शकेल. यामुळे, येशूला लोक केवळ “सुताराचा पुत्र” म्हणून नव्हे तर “सुतार” म्हणूनही ओळखत होते. (मत्तय १३:५५; मार्क ६:३) प्रेषित पौलाने लिहिले की, येशू “सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता.” साहजिकच, त्यालाही कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी कष्ट करावे लागले असतील.—इब्री लोकांस ४:१५.

शेवटी, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत योसेफाविषयी असलेल्या शेवटल्या अहवालात देखील त्याने खऱ्‍या उपासनेकरता दाखवलेल्या निष्ठेचा पुरावा आपल्याला पाहायला मिळतो. योसेफ आपल्या कुटुंबाला वल्हांडणासाठी जेरूसलेमला घेऊन गेला. यासाठी केवळ पुरुषांना उपस्थित राहण्याची आवश्‍यकता होती परंतु योसेफाने “दरवर्षी” आपल्या कुटुंबाला जरूसलेमला नेण्याची रीत पाडली होती. त्याने पुष्कळ त्याग केला होता कारण त्यांना नासरेथपासून जेरूसलेमपर्यंत १०० किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागे. परंतु, शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे एका प्रसंगी येशू आपल्या कुटुंबापासून विलग झाला. तो मंदिरात सापडला जेथे तो नियमशास्त्राच्या गुरूजनांचे ऐकत व त्यांना प्रश्‍न विचारात होता. येशू तेव्हा अवघ्या १२ वर्षांचा होता तरीपण देवाच्या वचनाबद्दल त्याची बुद्धी आणि ज्ञान अपूर्व होती. या घटनेवरून आपण हे पाहू शकतो की, येशूच्या पालकांनी त्याला उत्तम शिक्षण दिले असावे व आध्यात्मिक वृत्तीचा बनण्यास त्याला मदत केली असावी. (लूक २:४१-५०) योसेफ या प्रसंगानंतरच केव्हा तरी मरण पावला असावा कारण नंतरच्या शास्त्रवचनांतील अहवालांमध्ये त्याचा उल्लेख आढळत नाही.

होय, योसेफ हा सात्विक पुरुष होता, त्याने आध्यात्मिक व शारीरिकरित्या आपल्या कुटुंबाची उत्तम काळजी घेतली. आज आपल्याकरता देवाची इच्छा काय आहे हे समजल्यावर तुम्ही योसेफाप्रमाणे आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देता का? (१ तीमथ्य २:४, ५) देवाच्या वचनात दिलेली देवाची आज्ञा पाळण्याची तयारी दाखवून तुम्ही योसेफासारखी आज्ञाधारकता दाखवता का? तुम्ही आपल्या मुलांना इतरांसोबत आध्यात्मिकरित्या अर्थपूर्ण संभाषण करण्याकरता शिकवता का?

मरीया—देवाची निःस्वार्थ सेविका

येशूची आई मरीया ही देवाची उत्कृष्ट सेविका होती. तिला पुत्र होणार असे गब्रीएल देवदूताने तिला सांगितल्यावर तिला आश्‍चर्य वाटले. कुमारिका असल्यामुळे, तिला “पुरुष ठाऊक” नव्हता. हा मुलगा पवित्र आत्म्याद्वारे जन्मणार होता हे तिला कळल्यावर तिने नम्रतेने तो संदेश स्वीकारला आणि म्हणाली: “पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” (लूक १:३०-३८) तिला हा आध्यात्मिक सुहक्क इतका बहुमोल वाटला की, तिच्या या निर्णयाने होणारी कोणतीही अडचण ती सहन करायला तयार होती.

आणि खरोखर, तिने ही कामगिरी निवडल्याने स्त्री म्हणून तिचे जीवन पार बदलले. जेरूसलेमला ती शुद्धीकरणासाठी गेली असता शिमोन नावाच्या एका भक्‍तिमान वृद्धाने तिला म्हटले: “तुझ्या स्वतःच्याहि जिवातून तरवार भोसकून जाईल.” (लूक २:२५-३५) येशूला अनेकजण नाकारतील आणि शेवटी त्याला वधस्तंभावर खिळतील तेव्हा मरीयेला कसे वाटेल याविषयी तो बोलत असावा असे दिसते.

येशू मोठा होत असताना, तिने त्याच्या जीवनातल्या घटनांकडे लक्ष दिले व “त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या.” (लूक २:१९, ५१) योसेफाप्रमाणे ती आध्यात्मिक प्रवृत्तीची स्त्री होती आणि भविष्यवाणींची पूर्ती करणाऱ्‍या घटना व बोलणे तिने आपल्या स्मरणात ठेवले. गब्रीएल देवदूताने तिला जे सांगितले ते कदाचित तिच्या मनात राहिले असावे: “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) होय, तिने मशीहाची मानवी आई होण्याची जबाबदारी गांभीर्याने पार पाडली.

मरीया जेव्हा अलीशिबेला भेटली तेव्हा देखील तिची आध्यात्मिकता स्पष्ट दिसली—अलीशिबा मरीयेची नातेवाईक होती आणि तीसुद्धा चमत्कारिकपणे गरोदर राहिली होती. तिला पाहून मरीयेने यहोवाची स्तुती केली आणि देवाच्या वचनाबद्दल आपले प्रेम व्यक्‍त केले. तिने १ शमुवेल २ ऱ्‍या अध्यायातील हन्‍नाच्या प्रार्थनेचा आणि इब्री शास्त्रवचनांच्या इतर पुस्तकांतील विचारांचाही उल्लेख केला. शास्त्रवचनांच्या तिच्या या ज्ञानातून ती समर्पित व देव-भीरू माता बनण्यास पात्र आहे हे तिने दाखवले. आपल्या मुलाची आध्यात्मिकतेत वाढ करण्यास ती योसेफाला सहकार्य करणार होती.—उत्पत्ति ३०:१३; १ शमुवेल २:१-१०; मलाखी ३:१२; लूक १:४६-५५.

मरीयेला मशीहा असलेल्या आपल्या पुत्रावर पक्का विश्‍वास होता आणि तो विश्‍वास त्याच्या मृत्यूनंतरही कायम राहिला. त्याच्या पुनरुत्थानानंतर, प्रेषितांसोबत प्रार्थनेकरता एकत्र आलेल्या विश्‍वासू शिष्यांपैकी ती एक होती. (प्रेषितांची कृत्ये १:१३, १४) आपल्या पुत्राचा वधस्तंभावर मृत्यू पाहण्याचा यातनामय अनुभव सहन करूनही ती विश्‍वासू राहिली.

मरीयेच्या जीवनातून तुम्हाला काय शिकायला मिळाले? देवाची सेवा करण्याचा बहुमान, कितीही त्याग करावे लागले तरी तुम्ही स्वीकारता का? या बहुमानाचे महत्त्व तुम्हाला आहे का? येशूने भाकीत केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांची, आज घडणाऱ्‍या घटनांशी तुलना करून तुम्ही “त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या” आहेत का? (मत्तय, अध्याय २४ आणि २५; मार्क, अध्याय १३; लूक, अध्याय २१) देवाच्या वचनात पारंगत होण्यामध्ये, आपल्या संभाषणात त्याचा सर्रास वापर करण्यामध्ये तुम्ही मरीयेचे अनुकरण करता का? येशूचा अनुयायी असल्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागत असला तरी तुम्ही विश्‍वासू राहाल का?

येशूचे भाऊ—बदल करणे शक्य आहे

असे भासते की, येशूच्या बांधवांनी त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. वधस्तंभावर त्याने प्राण सोडला त्या प्रसंगी ते तेथे नव्हते व म्हणून त्याला आपल्या आईची देखभाल करायला प्रेषित योहानाला सांगावे लागले हा काही योगायोग नव्हता. येशूच्या आप्तांनी हे दाखवले की त्यांना त्याच्याबद्दल आदर नव्हता; इतकेच नव्हे तर, एके प्रसंगी त्यांनी असेही म्हटले की, येशूला “वेड लागले आहे.” (मार्क ३:२१) येशूचे कौटुंबिक सदस्य विश्‍वासात नव्हते त्यामुळे आज ज्यांचे कौटुंबिक सदस्य विश्‍वासात नाहीत त्यांना ही शाश्‍वती मिळू शकते की, विश्‍वासात असल्यामुळे नातेवाईक त्यांची थट्टा करतात तेव्हा कसे वाटते हे येशूला कळते.

परंतु, येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या भावांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवायला सुरवात केली असे दिसते. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या आधी जेरूसलेममध्ये एकत्र जमलेल्या गटात त्यांचाही समावेश होता आणि त्यांनी प्रेषितांसोबत एकत्र मिळून कळकळीने प्रार्थना केली. (प्रेषितांची कृत्ये १:१४) स्पष्टतः, त्यांच्या सावत्र भावाच्या पुनरुत्थानामुळे त्यांचे मन बदलले आणि ते त्याचे शिष्य बनले. त्यामुळे, आपले काही नातेवाईक विश्‍वासात नसले तरी आपण आशा सोडू नये.

येशूचा सावत्र भाऊ, याकोब ज्याला तो व्यक्‍तिशः भेटला, त्याची ख्रिस्ती मंडळीत उल्लेखनीय भूमिका असल्याचे शास्त्रवचनांत सांगण्यात आले आहे. त्याने सह-ख्रिश्‍चनांना एक ईश्‍वरप्रेरित पत्र लिहून त्यांना आपला विश्‍वास शाबूत राखण्यास उत्तेजन दिले. (प्रेषितांची कृत्ये १५:६-२९; १ करिंथकर १५:७; गलतीकर १:१८, १९; २:९; याकोब १:१) यहूदा या येशूच्या आणखी एका सावत्र भावाने सह-विश्‍वासू लोकांना विश्‍वासाकरता झटून झुंज देण्यास उत्तेजन देण्याकरता एक प्रेरित पत्र लिहिले. (यहूदा १) एक गोष्ट उल्लेखनीय आहे की, सह-ख्रिश्‍चनांना प्रभावित करण्यासाठी याकोब किंवा यहूदाने येशूसोबत असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाचा आपल्या पत्रांमध्ये एकदाही उल्लेख केला नाही. त्यांच्या या उदाहरणातून आपण नम्रतेचा किती उत्तम धडा शकतो!

तर मग, येशूच्या कुटुंबाकडून आपल्याला शिकायला मिळणाऱ्‍या काही गोष्टी कोणत्या आहेत? निश्‍चितच, आपल्याला भक्‍तीचे काही धडे शिकायला मिळाले जे पुढील गोष्टींमध्ये व्यक्‍त केले जाऊ शकतात: (१) देवाने व्यक्‍त केलेल्या इच्छेला विश्‍वासूपणे अधीन होणे आणि असे केल्याने येणाऱ्‍या सर्व परीक्षांचा सामना करणे. (२) आध्यात्मिक मूल्यांना प्राधान्य देणे, त्यासाठी त्याग करावे लागले तरीही. (३) आपल्या मुलांना शास्त्रवचनांच्या एकवाक्यतेत प्रशिक्षण देणे. (४) विश्‍वासात नसलेल्या कौटुंबिक सदस्यांबद्दल आशा सोडू नका. (५) ख्रिस्ती मंडळीतील महत्त्वाच्या व्यक्‍तींशी तुमचा काही संबंध असल्यास त्याची फुशारकी मारू नका. येशूच्या मानवी कुटुंबांविषयी जाणून घेतल्याने आपण त्याच्या अधिक जवळ येतो आणि येशूच्या संगोपनाकरता यहोवाने एक सामान्य कुटुंब निवडल्याबद्दल आपली कदर वाढते.

[४, ५ पानांवरील चित्रे]

योसेफाने मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले व मशीहासंबंधी भविष्यवाणींच्या पूर्णतेत तो सामील झाला

[६ पानांवरील चित्रे]

योसेफ आणि मरीयेने आपल्या मुलांमध्ये आध्यात्मिक मूल्ये बिंबवली आणि त्यांना कामाचे महत्त्व शिकवले

[७ पानांवरील चित्रे]

येशूच्या भावांचे संगोपनही आध्यात्मिक प्रवृत्तीच्या कुटुंबात झाले असतानाही त्यांनी येशूचा मृत्यू होईपर्यंत त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही

[८ पानांवरील चित्रे]

येशूचे सावत्र भाऊ याकोब आणि यहूदा यांनी सह-ख्रिश्‍चनांना उत्तेजन दिले