व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संकोचित मार्गाचा त्यांनी शोध केला

संकोचित मार्गाचा त्यांनी शोध केला

संकोचित मार्गाचा त्यांनी शोध केला

सुमारे ५५० वर्षांआधी, सध्या चेक प्रजासत्ताक म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या देशातील प्राग, केल्चीस, व्हिलेमोव्ह, क्लाटव्ही आणि इतर शहरांमधील ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या लोकांच्या लहान लहान गटांनी आपली घरे सोडली. त्यांनी ईशान्य बोहेमियातील एका खोऱ्‍यातील कुनवॉल्ट गावापाशी तळ ठोकला, तेथे घरे बांधली आणि जमिनीची शेतीसाठी मशागत केली; ते बायबल वाचायचे आणि त्यांनी स्वतःला बंधुवर्गाची एकता किंवा लॅटिन भाषेत युनिटास फ्राट्रुम हे नाव दिले.

येथे वसाहत केलेल्या लोकांमध्ये विविध पार्श्‍वभूमीतील लोक होते. त्यांच्यात शेतकरी होते, उमराव होते, विद्यापीठातील विद्यार्थी होते, श्रीमंत व गरीब होते, पुरुष व स्त्रिया होत्या, विधवा आणि अनाथ होते. आणि या सर्वांची एकच इच्छा होती. त्यांनी लिहिले, “आम्ही देवाला प्रार्थना केली आणि सर्व गोष्टींबाबत त्याची इच्छा आम्हाला प्रकट करण्यासाठी त्याला विनंती केली. आम्हाला त्याच्या मार्गात चालायचे होते.” होय, या बंधुवर्गाने किंवा चेक बंधू असे नाव पडलेल्या या समाजाने ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या संकोचित मार्गाचा’ शोध केला. (मत्तय ७:१३, १४) त्यांनी शोध केल्यावर त्यांना बायबलची कोणती सत्ये आढळली? त्यांच्या युगात सर्वमान्य असलेल्या विश्‍वासांपेक्षा त्यांचे विश्‍वास कसे वेगळे होते आणि त्यापासून आपण काय शिकू शकतो?

हिंसा नाही—हातमिळवणी नाही

हा बंधुवर्ग तयार करण्यासाठी १५ व्या शतकाच्या मध्यात अनेक धार्मिक चळवळींनी हातभार लावला. एक होती १२ व्या शतकातली वॉल्देन्सेस चळवळ. सुरवातीला, वॉल्देन्सेस यांनी मध्य युरोप येथील रोमन कॅथलिक राष्ट्रीय धर्मापासून स्वतःला विलग केले. परंतु, नंतर

त्यांनी काही कॅथलिक शिकवणुकी आत्मसात केल्या. आणखी एक मोठा गट हुसाईट्‌स यांचा होता; या पंथाचे लोक यान हुस नावाच्या व्यक्‍तीचे अनुयायी होते. बहुतांशी चेक लोक या पंथाचे होते पण त्यांच्यात कसलीच एकता नव्हती. एका पंथाचे लोक सामाजिक विषयांवरून लढत तर दुसऱ्‍या पंथाचे लोक धर्माच्या नावाखाली राजकीय कारणांसाठी लढत. बंधुवर्गाच्या पंथाच्या लोकांवरही चिलीयास्टिक गटांचा त्याचप्रमाणे स्थानीय व परदेशी बायबल विद्वानांचा प्रभाव होता.

पीटर केल्चेस्की (सु. १३९०-सु. १४६०) हा चेक बायबल विद्वान आणि सुधारक वॉल्देन्सेस आणि हुसाईट्‌स यांच्या शिकवणुकींबद्दल चांगले जाणून होता. हुसाईट्‌स यांच्या चळवळीने हिंसात्मक वळण घेतल्यामुळे आणि वॉल्देन्सेस यांनी शिकवणुकींच्या बाबतीत हातमिळवणी केल्यामुळे त्याने त्या दोन्ही पंथांना नाकारले. त्याच्या मते, युद्ध ख्रिश्‍चनांना शोभत नव्हते. त्याला असे वाटत होते की, ख्रिस्ती व्यक्‍तीने ‘ख्रिस्ताच्या नियमानुसार’ वागावे मग त्याचा परिणाम काहीही असो. (गलतीकर ६:२; मत्तय २२:३७-३९) १४४० साली, केल्चेस्कीने आपल्या शिकवणुकी विश्‍वासाचे जाळे (इंग्रजी) या पुस्तकात नमूद केल्या.

प्राग येथील ग्रेगरी हा विद्वान केल्चेस्कीचा एक तरुण समकालीन, केल्चेस्कीच्या शिकवणुकींनी इतका प्रभावित झाला की त्याने हुसाईट चळवळ सोडून दिली. १४५८ मध्ये, ग्रेगरीने पूर्वी हुसाईट असलेल्यांच्या लहान गटांना चेचियाच्या विविध भागातील आपली घरे सोडण्यास पटवले. कुनवॉल्ट गावात त्याच्या मागे आलेले हे लोक देखील होते ज्यांनी तेथे एक नवीन धार्मिक समाज स्थापन केला. नंतर, चेक व जर्मन वॉल्देन्सेस लोक त्यांना येऊन सामील झाले.

गतकाळावर प्रकाश

१४६४ पासून १४६७ पर्यंत, नुकताच स्थापन झालेल्या परंतु झपाट्याने वाढणाऱ्‍या या गटाने कुनवॉल्ट भागात अनेक मंडळे स्थापन केली आणि त्यांच्या नवीन धार्मिक चळवळीसंबंधी अनेक ठराव मान्य केले. हे सगळे ठराव आक्टा युनिटाटिस फ्राट्रुम (बंधुवर्गाची कृत्ये) नावाच्या पुस्तक संग्रहात लिहून ठेवण्याची तसदी त्यांनी घेतली; हा संग्रह आजही उपलब्ध आहे. आक्टा हा गतकाळावर प्रकाश टाकणारा आणि बंधुवर्गाचा काय विश्‍वास होता याचे स्पष्ट चित्र दर्शवणारा संग्रह आहे. या पुस्तकांमध्ये, पत्रे, भाषणांचे उतारे आणि त्यांच्यातील वादविवादांचे तपशीलही दिले आहेत.

बंधुवर्गाच्या विश्‍वासांविषयी आक्टा यात असे म्हटले आहे: “[बायबलचे] नुसते वाचन करून आणि आपल्या प्रभूचे व पवित्र प्रेषितांचे उदाहरण पाहून मनन करून, नम्रता आणि सहनशीलता दाखवून, आमच्या शत्रुंवर प्रेम करून, त्यांच्याप्रती भले करून व त्यांचे भले चिंतून आणि त्यांच्याकरता प्रार्थना करून आम्ही आपले मंडळ स्थापन करण्याचा निर्धार करतो.” या लिखाणांवरून हे देखील स्पष्ट होते की, सुरवातीला बंधुवर्गातील लोक प्रचार करत होते. ते दोघे-दोघे मिळून जायचे आणि स्त्रिया स्थानीय क्षेत्रात यशस्वी मिशनरी ठरल्या. बंधुवर्गातील लोक राजकीय पद स्वीकारत नव्हते, शपथा घेत नव्हते, कोणत्याही लष्करी हालचालीत भाग घेत नव्हते व हत्यारे बाळगत नव्हते.

एकतेत फूट

परंतु काही दशकांनंतर बंधुवर्गातील एकता टिकून राहिली नाही. विश्‍वास नेमके कसे अनुसरावेत यावरून त्यांच्यात वाद झाले आणि फूट पडली. १४९४ मध्ये, बंधुवर्गाचे दोन गट झाले—श्रेष्ठ आणि कनिष्ठ पक्ष. एकीकडे, श्रेष्ठ पक्ष मूळ शिकवणुकीत जरा ढिला पडला तर दुसरीकडे, कनिष्ठ पक्ष असा प्रचार करत राहिले की, बंधुवर्गाने राजकीय आणि जगाच्या मामल्यात भाग घेण्याविषयी आपली बाजू दृढ ठेवावी.—पाहा पेटी “श्रेष्ठ पक्षाविषयी काय?”

उदाहरणार्थ, कनिष्ठ पक्षाच्या एका सदस्याने लिहिले: “दोन मार्गावर चालणारे लोक देवासोबत राहतील याची शाश्‍वती नाही, कारण केवळ क्वचित व लहानसहान गोष्टींमध्ये ते त्याच्यासाठी काही करायला किंवा त्याच्या अधीन व्हायला तयार असतात परंतु मोठ्या गोष्टींमध्ये ते स्वतःच्या मर्जीचे मालक असतात. . . . जे दृढ आहेत आणि चांगला विवेक बाळगतात—संकोचित मार्गावर आपला क्रूस उचलून दररोज येशू ख्रिस्ताच्या मागे चालतात—त्यांच्यापैकी एक असण्याची आमची उत्कट इच्छा आहे.”

कनिष्ठ पक्षाचे सदस्य पवित्र आत्मा ही देवाची सक्रिय शक्‍ती अर्थात त्याचा “हात” आहे असे मानत. येशूच्या खंडणीविषयी त्यांची अशी समज होती की, पापी आदामाने गमावलेली गोष्ट, परिपूर्ण मानव येशूने आपले मानवी जीवन देऊन मिळवली. ते येशूची आई, मरीया हिची पूजा करत नव्हते. सर्व अनुयायी अविवाहित न राहता याजक बनू शकतात ही शिकवण ते मानू लागले. मंडळीच्या सर्व सदस्यांनी जाहीरपणे प्रचार करावा असे ते उत्तेजन देत आणि पश्‍चात्ताप न दाखवणाऱ्‍या पापी लोकांना बहिष्कृत करत. लष्करी व राजकीय हालचालींपासून ते पूर्णपणे दूर राहत. (पाहा पेटी “बंधुवर्गाच्या कनिष्ठ पक्षाचा विश्‍वास.”) हा कनिष्ठ पक्ष, आक्टा यात केलेल्या ठरावांचे तंतोतंत पालन करत असल्यामुळे तोच मूळ बंधुवर्गाचा वारस आहे असे मानत होता.

सडेतोड व छळलेले

कनिष्ठ पक्ष इतर धर्मांची तसेच श्रेष्ठ पक्षाचीही उघड उघड टीका करत. अशा धर्मांविषयी त्यांनी लिहिले, “ज्यांचा स्वतःचा विश्‍वास नाही अशा लहान मुलांना बाप्तिस्मा देण्याची शिकवण तुम्ही देता आणि अशाने तुम्ही डायोनिसियस नावाच्या बिशपची शिकवण अनुसरता ज्याने काही मूर्ख लोकांच्या म्हणण्यावरून बाळांचा बाप्तिस्मा करण्यावर जोर दिला होता . . . बहुतेक सर्व शिक्षक आणि धर्मशास्त्रज्ञ, ल्यूथर, मेलांकथन, बुत्सेरुस, कोर्व्हिन, यिलेश, बुलिंगर, . . . श्रेष्ठ पक्ष हेच करतात; ते सर्व सारखे आहेत.”

म्हणूनच, कनिष्ठ पक्षाचा छळ करण्यात आला. १५२४ साली, त्या पक्षाचा एक नेता, यान कॅल्नेट्‌स याला चाबकाने मारून जाळून टाकण्यात आले. नंतर कनिष्ठ पक्षाच्या तीन सदस्यांना खांबावर जाळण्यात आले. १५५० च्या सुमारास कनिष्ठ पक्ष, त्याच्या शेवटच्या नेत्याच्या मृत्यूनंतर नाहीसा झाला.

तरीपण, कनिष्ठ पक्षाच्या अनुयायांचा मध्ययुगीन युरोपातील धार्मिक परिस्थितीवर प्रभाव पडला. कनिष्ठ पक्षाच्या काळात ‘खऱ्‍या ज्ञानाची’ वृद्धी अद्याप झाली नव्हती म्हणून दीर्घ काळापासून असलेला आध्यात्मिक अंधकार घालवून देण्यात त्यांना यश मिळाले नाही हे मान्य आहे. (दानीएल १२:४) परंतु, संकोचित मार्गाचा शोध करण्याची त्यांची उत्कट इच्छा आणि विरोध असतानाही त्या मार्गावर चालण्याचा त्यांचा प्रयत्न या गोष्टी ख्रिश्‍चनांनी दखल घेण्याजोग्या आहेत.

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

१५०० ते १५१० सालापर्यंत छापलेल्या ६० बोहेमियन [चेक] पुस्तकांपैकी ५० बंधुवर्गाच्या सदस्यांनी लिहिलेली आहेत

[११ पानांवरील चौकट]

श्रेष्ठ पक्षाविषयी काय?

श्रेष्ठ पक्षाचे काय झाले? कनिष्ठ पक्ष मिटल्यावर, एक धार्मिक चळवळ म्हणून श्रेष्ठ पक्ष बंधुवर्ग या नावाखाली टिकून राहिला. कालांतराने, या गटाने आपल्या मूळ शिकवणुकींमध्ये फेरफार केली. १६ व्या शतकाच्या शेवटी, बंधुवर्ग, चेक युत्राकवीस्ट्‌स * (जे खरे तर ल्यूथरन होते) यांच्या पक्षात सामील झाले. परंतु, बंधुवर्गाने बायबलचे त्याचप्रमाणे इतर धार्मिक पुस्तकांचे भाषांतर करण्याचे व प्रकाशन करण्याचे काम जारी ठेवले. गंमत म्हणजे, त्यांच्या आधीच्या प्रकाशनांच्या पहिल्या पानावर टेट्राग्रमॅटन अर्थात देवाच्या व्यक्‍तिगत नावाची चार इब्री अक्षरे असायची.

१६२० साली, चेक राज्याला जबरदस्तीने रोमन कॅथलिक वर्चस्वाखाली पुन्हा आणण्यात आले. परिणामतः, बंधुवर्गाच्या श्रेष्ठ पक्षातील अनेकांनी देश सोडला आणि दुसऱ्‍या देशी जाऊन आपले कार्य सुरू ठेवले. तेथे या गटाला मोरेव्हियन (मोरेव्हिया हे चेक देशांचा भाग होते) चर्चच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि आजही हे चर्च अस्तित्वात आहे.

[तळटीप]

^ परि. 24 हा शब्द युत्राक्वे या लॅटिन शब्दापासून तयार होतो ज्याचा अर्थ “दोन्हींतील प्रत्येक” असा होतो. पवित्र भोजादरम्यान रोमन कॅथलिक पाळक सामान्य लोकांना द्राक्षारस देत नव्हते परंतु युत्राकवीस्ट्‌स (हुसाईट्‌सचे भिन्‍न गट) भाकरी आणि द्राक्षारस देत असत.

[१२ पानांवरील चौकट]

बंधुवर्गाच्या कनिष्ठ पक्षाचा विश्‍वास

पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील आक्टा युनिटाटीस फ्राट्रुम यातील पुढील उतारे कनिष्ठ पक्षाचे काय विश्‍वास होते ते दाखवतात. कनिष्ठ पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली विधाने विशेषकरून श्रेष्ठ पक्षाला उद्देशून होती.

त्रैक्य: “संपूर्ण बायबल चाळून पाहिले तरी, लोकांनी कल्पना केली त्याप्रमाणे देवाचे त्रैक्यात विभाजन केलेले व तीन नावे असलेल्या व्यक्‍ती आढळणार नाहीत.”

पवित्र आत्मा: “पवित्र आत्मा हा देवाचा हात आहे आणि देवाकडील दान आहे, किंवा सांत्वनदाता आहे, किंवा देवाची शक्‍ती आहे आणि ख्रिस्ताच्या योग्यतेच्या आधारे पिता त्यास विश्‍वास करणाऱ्‍यांना देतो. पवित्र आत्म्याला देव किंवा व्यक्‍ती म्हटले जावे असे पवित्र शास्त्रवचनात आपल्याला आढळत नाही; प्रेषितांच्या शिकवणुकींमध्ये देखील तसे दिसत नाही.”

याजकपद: “ते उगाच तुम्हाला ‘पाळक’ ही पदवी देतात; तुमचे डोके मुंडावलेले नसले आणि हातात मलम नसला तर सामान्य माणसापेक्षा तुम्ही वेगळे दिसत नाही. सेंट पीटरने सर्व ख्रिश्‍चनांना याजक बनण्यास सांगितले; त्याने म्हटले: तुम्ही आध्यात्मिक यज्ञ अर्पण करणारे पवित्र याजकगण आहात. (१ पेत्र २)”

बाप्तिस्मा: “प्रभू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना म्हटले: सर्व जगात जा, सर्व सृष्टीला, जे विश्‍वास करतील त्या सर्वांना सुवार्तेचा प्रचार करा. (मार्क अध्याय १६) केवळ पुढील शब्दांची पूर्ती झाल्यावर: आणि बाप्तिस्म्यानंतर ते तारले जातील. आणि तुम्ही लहान मुलांना बाप्तिस्मा द्यायला शिकवता ज्यांना स्वतःचा विश्‍वास नाही.”

तटस्थता: “तुमच्या आधीच्या बांधवांनी ज्या गोष्टी किळसवाण्या आणि अशुद्ध मानल्या होत्या, लष्करात सामील होणे आणि खून करणे किंवा हत्यारे बाळगणे हे सर्व तुम्ही आता चांगले मानता . . . त्यामुळे आम्हाला वाटते की, तुम्ही आणि तुमच्यासोबत इतर शिक्षक, भविष्यसूचक शब्दांकडे केवळ डाव्या नजरेने पाहता: अशाप्रकारे त्याने शक्‍तिशाली बाण, ढाली आणि तरवारी व लढाया नष्ट केल्या. (स्तोत्र ७५) आणि पुन्हा असे म्हटले आहे: माझ्या पवित्र डोंगरावर ते कसलाही उपद्रव किंवा हानी करणार नाहीत कारण प्रभूची पृथ्वी ईश्‍वरी ज्ञानाने भरून जाईल, वगैरे. (यशया अध्याय ११).”

प्रचार: “आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, सर्व पाळक आणि बिशप यांनी जितक्या लोकांना पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त केले नाही तितके स्त्रियांनी सुरवातीला केले. आणि आता पाळक त्यांच्या घरांमध्ये आणि नेमलेल्या निवासांमध्ये आराम करत आहेत. केवढा हा मोठा अपराध! संपूर्ण जगात जा. सर्व सृष्टीला . . . प्रचार करा.”

[१० पानांवरील नकाशे]

जर्मनी

पोलंड

चेक प्रजासत्ताक

बोहेमिया

एल्ब नदी

प्राग

व्हिटाव्हा नदी

क्लाटव्ही

चेल्चीस

कुनवॉल्ट

व्हिलेमोव्ह

मोराव्हिया

डेन्यूब नदी

[११ पानांवरील चित्रे]

डावीकडे: पीटर केल्चेस्की; खाली: “विश्‍वासाचे जाळे” यातील एक पान

[११ पानांवरील चित्रे]

प्रागचा ग्रेगरी

[१३ पानांवरील मथळा]

सर्व चित्रे: S laskavým svolením knihovny Národního muzea v Praze, C̆esko