व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर पोहंचला’

‘त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर पोहंचला’

‘त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर पोहंचला’

“सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.”—मत्तय २८:१९.

१, २. (अ) येशूने आपल्या शिष्यांना कोणती कामगिरी दिली? (ब) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना इतके कार्य साध्य करणे कसे शक्य झाले?

स्वर्गात जायच्या काही काळ आधी, येशूने आपल्या शिष्यांना एक कामगिरी दिली. त्याने त्यांना म्हटले: “सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.” (मत्तय २८:१९) ही केवढी मोठी कामगिरी होती!

जरा विचार करा! सा.यु. ३३च्या पेन्टेकॉस्ट रोजी, सुमारे १२० शिष्यांवर पवित्र आत्मा आला आणि ते सर्वांना सांगू लागले की, येशू हा वाग्दत्त मशीहा असून, त्याच्याकरवी तारण प्राप्त करता येते; आणि अशाप्रकारे येशूने दिलेली कामगिरी ते पूर्ण करू लागले. (प्रेषितांची कृत्ये २:१-३६) इतका लहान गट ‘सर्व राष्ट्रांतील लोकांपर्यंत’ कसा काय पोहंचणार होता? मानवी दृष्टीने हे शक्य नव्हते पण “देवाला . . . सर्व शक्य आहे.” (मत्तय १९:२६) प्रारंभिक ख्रिश्‍चनांना यहोवाच्या पवित्र आत्म्याचे पाठबळ होते आणि त्यांना काळाच्या निकडीची जाणीव होती. (जखऱ्‍या ४:६; २ तीमथ्य ४:२) त्यामुळे, काही दशकांतच, प्रेषित पौल असे म्हणू शकला की, सुवार्तेची “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” घोषणा झाली होती.—कलस्सैकर १:२३.

३. शुद्ध ख्रिस्ती “गहू” कशामुळे दिसेनासे झाले?

पहिल्या शतकाच्या जवळजवळ सबंध काळादरम्यान, खऱ्‍या उपासनेचा प्रसार होत राहिला. परंतु, येशूने हे भाकीत केले होते की, एक समय येईल जेव्हा सैतान “निदण” पेरेल आणि खरे ख्रिस्ती “गहू” कापणीच्या वेळेपर्यंत कित्येक शतके त्यात दिसेनासे होतील. प्रेषितांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट खरी ठरली.—मत्तय १३:२४-३९.

आज जलद वाढ

४, ५. सन १९१९ पासून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी कोणते कार्य हाती घेतले आणि ते एक मोठे आव्हान का होते?

सन १९१९ मध्ये, शुद्ध ख्रिस्ती गव्हाला निदणापासून वेगळे करण्याची वेळ आली होती. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना ठाऊक होते की, येशूने सोपवलेली महान कामगिरी अद्यापही पूर्ण झालेली नव्हती. आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत असा त्यांचा ठाम विश्‍वास होता आणि येशूच्या पुढील भविष्यवाणीविषयी त्यांना ठाऊक होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (२ तीमथ्य ३:१; मत्तय २४:१४) होय, भरपूर काम अद्याप शिल्लक आहे हे त्यांना चांगले ठाऊक होते.

तरीपण, सा.यु. ३३ मधील शिष्यांप्रमाणे त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपुढे एक मोठे आव्हान होते. दोन-चार देशांत मिळून त्यांची संख्या केवळ काही हजारांपर्यंत होती. मग, “सर्व जगात” सुवार्ता सांगण्याचे काम ते कसे करू शकत होते? हे देखील लक्षात घ्या की, पृथ्वीची लोकसंख्या, जी कैसरांच्या काळात कदाचित ३० कोटी होती, ती पहिल्या महायुद्धानंतर २ अब्जांच्या घरात गेली होती. आणि सबंध २० व्या शतकादरम्यान ती जलद गतीने वाढणार होती.

६. एकोणीसशे तीसच्या दशकापर्यंत सुवार्तेच्या प्रचारासंबंधी कोणती प्रगती करण्यात आली होती?

परंतु, यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांनी आपल्या पहिल्या शतकातील बांधवांप्रमाणे यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून आपल्यासमोर असलेल्या कामाला सुरवात केली आणि यहोवाचा आत्मा त्यांच्या पाठीशी होता. १९३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, सुमारे ५६,००० सुवार्तिकांनी ११५ देशांमध्ये बायबलच्या सत्याची घोषणा केली होती. आधीच, पुष्कळसे काम करण्यात आले होते, पण अजूनही भरपूर काम बाकी होते.

७. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसमोर कोणते नवीन आव्हान उभे राहिले? (ब) ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ साहाय्याने लोकांना जमा करण्याच्या कार्यात कितपत प्रगती झाली आहे?

मग, प्रकटीकरण ७:९ मध्ये सांगितलेला “मोठा लोकसमुदाय” कोण आहे याची गहन समज प्राप्त झाल्यामुळे एक नवीनच आव्हान सामोरे उभे राहिले परंतु त्याच वेळी या मेहनती ख्रिश्‍चनांना मदतीचेही आश्‍वासन मिळाले. ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ अगणित संख्येचा जमाव, पार्थिव आशा असलेले विश्‍वासी, यांना ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यातून’ एकत्रित करायचे होते. (योहान १०:१६) ते ‘अहोरात्र यहोवाच्या मंदिरात त्याची सेवा करणार होते.’ (प्रकटीकरण ७:१५) याचा अर्थ, ते प्रचाराच्या व शिक्षणाच्या कार्यात मदत करणार होते. (यशया ६१:५) त्यामुळे, सुवार्तिकांची संख्या हजारोंपासून लाखोंच्या घरात गेलेली पाहून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना अत्यानंद झाला. २००३ साली, ६४,२९,३५१ जणांच्या नवीन उच्चांकाने प्रचार कार्यात सहभाग घेतला—यातील बहुतांश जण मोठ्या लोकसमुदायातले आहेत. * या मदतीकरता अभिषिक्‍त ख्रिस्ती कृतज्ञ आहेत आणि अभिषिक्‍त बांधवांना मदत करण्याचा सुहक्क प्राप्त झाल्यामुळे दुसरी मेंढरे देखील कृतज्ञ आहेत.—मत्तय २५:३४-४०.

८. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान आलेल्या भयंकर दबावांना यहोवाच्या साक्षीदारांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

गहू वर्ग पुन्हा दिसू लागला तेव्हा सैतानाने त्यांच्याविरुद्ध तीव्र लढाई केली. (प्रकटीकरण १२:१७) मोठा लोकसमुदाय जमा होऊ लागला तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती? त्याने एकदम हिंसक प्रतिक्रिया दाखवली! दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान खऱ्‍या उपासनेवर झालेल्या जागितक हल्ल्यामागे त्याचा हात होता याविषयी आपल्या मनात काही शंका आहे का? लढाईच्या दोन्ही बाजूंनी ख्रिश्‍चनांवर अत्यंत दबाव आला. अनेक प्रिय बंधू-बहिणींना भयंकर परीक्षांना तोंड द्यावे लागले; काहींना तर आपल्या विश्‍वासाकरता प्राणही द्यावा लागला. तरीही, त्यांनी स्तोत्रकर्त्यासारख्याच भावना व्यक्‍त केल्या: “देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन; देवावर मी भरवसा ठेविला आहे, मी भिणार नाही; मानव माझे काय करणार?” (स्तोत्र ५६:४; मत्तय १०:२८) यहोवाच्या आत्म्याने बळकट झालेले अभिषिक्‍त ख्रिस्ती आणि दुसरी मेंढरे खंबीर राहिले. (२ करिंथकर ४:७) परिणामस्वरूप, “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला.” (प्रेषितांची कृत्ये ६:७) १९३९ साली, युद्ध सुरू झाले तेव्हा, ७२,४७५ विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी प्रचार कार्यात भाग घेतल्याचा अहवाल आहे. परंतु, युद्ध संपुष्टात आले त्या वर्षाच्या, अर्थात १९४५ सालाच्या अपूर्ण अहवालातून हे स्पष्ट झाले की, १,५६,२९९ सक्रिय साक्षीदार सुवार्तेचा प्रचार करत होते. सैतानाचा किती मोठा पराजय!

९. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान कोणत्या नवीन प्रशालांची घोषणा करण्यात आली?

दुसऱ्‍या महायुद्धाच्या गोंधळात, प्रचाराचे कार्य पूर्ण केले जाईल की नाही अशी शंका यहोवाच्या सेवकांना वाटली नाही. उलट, १९४३ साली, युद्ध जोरात चालू असताना, दोन नवीन प्रशालांची घोषणा करण्यात आली. एक होती, जिला आज ईश्‍वरशासित सेवा प्रशाला म्हटले जाते; ही प्रशाला प्रत्येक साक्षीदाराला प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे प्रशिक्षण देण्याकरता सर्व मंडळ्यांमध्ये चालवली जाणार होती. दुसरी होती, वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला; ही प्रशाला, परदेशात जाऊन प्रचाराचे कार्य करण्यासाठी मिशनऱ्‍यांना प्रशिक्षण देण्याकरता होती. होय, युद्ध संपले तेव्हा खरे ख्रिस्ती अधिक कार्याकरता सुसज्ज होते.

१०. यहोवाच्या लोकांचा आवेश २००३ दरम्यान कशाप्रकारे दिसून आला?

१० त्यांनी केवढी मोठी कामगिरी बजावली आहे! ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतून प्रशिक्षित होऊन सर्वांनी—लहान-थोर, पालक आणि बालके, अगदी दुर्बळ असलेल्यांनी देखील—येशूने दिलेली महान कामगिरी पूर्ण करण्यात भाग घेतला आहे आणि अजूनही घेत आहेत. (स्तोत्र १४८:१२, १३; योएल २:२८, २९) २००३ साली, दर महिन्याला सरासरी, ८,२५,१८५ जणांनी पायनियर सेवेत तात्पुरता किंवा नियमितपणे भाग घेऊन त्यांना काळाच्या निकडीची जाणीव असल्याचे प्रदर्शित केले. त्याच वर्षी, यहोवाच्या साक्षीदारांनी राज्याच्या सुवार्तेविषयी इतरांशी बोलण्यात १,२३,४७,९६,४७७ तास खर्च केले. निश्‍चितच, आपल्या लोकांचा आवेश पाहून यहोवा संतुष्ट आहे!

परदेशी क्षेत्रात

११, १२. कोणत्या उदाहरणांवरून मिशनऱ्‍यांचा उत्तम अहवाल प्रदर्शित होतो?

११ कित्येक वर्षांदरम्यान, गिलियडमधून पदवीधर झालेल्यांनी आणि अलीकडील काळात, सेवा सेवक प्रशिक्षण प्रशालेतून पदवीधर झालेल्यांनी उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये १९४५ साली पहिले मिशनरी आले तेव्हा ४०० हून कमी प्रकाशक होते. यांनी आणि त्यांच्यानंतर आलेल्या मिशनऱ्‍यांनी आपल्या आवेशी ब्राझीलियन बांधवांसोबत मिळून मेहनत केली आहे आणि यहोवाने त्यांच्या मेहनतीचे भरपूर फळ त्यांना दिले आहे. त्या आधीच्या दिवसाची आठवण असलेल्यांना २००३ साली ब्राझीलने ६,०७,३६२ जणांचा नवीन उच्चांक गाठला हे पाहून किती आनंद झाला असेल!

१२ आता जपानचे उदाहरण घ्या. दुसऱ्‍या महायुद्धाच्या आधी, त्या देशात सुमारे शंभर राज्याचे प्रचारक होते. युद्धादरम्यान, क्रूर छळामुळे त्यांची संख्या एकदम कमी झाली आणि युद्ध संपले तेव्हा तर मोजकेच साक्षीदार आध्यात्मिकरित्या आणि शारीरिकरित्या सक्रिय होते. (नीतिसूत्रे १४:३२) १९४९ मध्ये पहिले १३ गिलियड-प्रशिक्षित मिशनरी आले तेव्हा उल्लेखनीय विश्‍वास दाखवलेल्या त्या मोजक्या बांधवांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले आणि मिशनऱ्‍यांना देखील हे उत्साही, अतिथीप्रिय जपानी बांधव आपलेसे वाटले. ५० हून अधिक वर्षांनंतर, २००३ साली जपानने एकूण २,१७,५०८ प्रचारकांचा विक्रमी अहवाल दिला! यहोवाने त्या देशात खरोखरच आपल्या लोकांवर अपरंपार आशीर्वादांचा वर्षाव केला आहे. इतर अनेक देशांचे असेच अहवाल आहेत. परदेशात प्रचार करणे ज्यांना शक्य आहे त्यांनी सुवार्तेचा प्रसार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे जेणेकरून २००३ साली, जगभरातील २३५ देशांमध्ये, द्वीपांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये ती ऐकवण्यात आली. होय, मोठा लोकसमुदाय ‘सर्व राष्ट्रांमधून’ येत आहे.

‘सर्व वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यातून’

१३, १४. ‘निरनिराळ्या भाषांमध्ये’ सुवार्ता प्रचार करण्याचे महत्त्व यहोवाने कसे दाखवले?

१३ सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट रोजी येशूचे शिष्य पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झाले त्यानंतर त्यांचा सर्वात पहिला नमूद केलेला चमत्कार म्हणजे तेथे जमलेल्या जमावापुढे अन्य भाषांमध्ये बोलणे. तेथे जमलेले सर्वजण एक आंतरराष्ट्रीय भाषा, कदाचित ग्रीक भाषा बोलत असावेत. ते सर्व “भक्‍तिमान” असल्यामुळे कदाचित मंदिरातील इब्री भाषेतील उपासना देखील त्यांना समजत असावी. पण स्वतःच्या मातृभाषेत त्यांनी सुवार्ता ऐकली तेव्हा ते आणखी आतुरतेने ऐकू लागले.—प्रेषितांची कृत्ये २:५, ७-१२.

१४ आज देखील अनेक भाषांमध्ये प्रचार कार्य केले जात आहे. मोठा लोकसमुदाय केवळ राष्ट्रांमधून नव्हे तर ‘वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यातून’ येईल असे भाकीत करण्यात आले होते. याच धर्तीवर, यहोवाने जखऱ्‍याद्वारे अशी भविष्यवाणी केली: “सेनाधीश परमेश्‍वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (तिरपे वळण आमचे.) (जखऱ्‍या ८:२३) यहोवाच्या साक्षीदारांना आता अन्य भाषेचे दान प्राप्त होत नाही तरीपण लोकांना त्यांच्या भाषेत शिकवणे किती महत्त्वाचे आहे याची जाण त्यांना आहे.

१५, १६. मिशनऱ्‍यांनी आणि इतरांनी स्थानीय भाषांमध्ये प्रचार करण्याचे आव्हान कसे स्वीकारले आहे?

१५ हे खरे की, आज इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनीश सारख्या काही भाषा आहेत ज्या सर्वदूर बोलल्या जातात. परंतु, इतर देशांमध्ये सेवा करण्यासाठी ज्यांनी आपला देश सोडला आहे ते स्थानीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांना’ सुवार्ता सुलभतेने प्राप्त व्हावी. (प्रेषितांची कृत्ये १३:४८) हे नेहमीच सोपे नसते. दक्षिण पॅसिफिकच्या तुवालु राष्ट्रातील बांधवांना स्वतःच्या भाषेत प्रकाशने हवी होती तेव्हा एका मिशनरीने हे आव्हान स्वीकारले. त्या भाषेत शब्दकोश नसल्यामुळे त्याने तुवालु भाषेतील शब्दांची यादी करायला सुरवात केली. कालांतराने, तुवालु भाषेत तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल * हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. मिशनरी जेव्हा कुराकाओ येथे पोहंचले तेव्हा तेथील पापिआमेन्टो या स्थानिक भाषेत कसलेही बायबल साहित्य नव्हते किंवा शब्दकोश नव्हता. शिवाय, भाषा कशी लिहिली जावी यावरही बराच वाद होता. असे असतानाही, पहिले मिशनरी आल्यानंतर दोन वर्षांच्या आत त्या भाषेतील पहिली ख्रिस्ती बायबल-आधारित हस्तपत्रिका प्रकाशित करण्यात आली. आज, इंग्रजीच्या बरोबरीने प्रकाशित होणाऱ्‍या टेहळणी बुरूजच्या १३३ भाषांपैकी पापिआमेन्टो ही देखील एक भाषा आहे.

१६ नामिबियात आलेल्या पहिल्या मिशनऱ्‍यांना, भाषांतर करण्यात मदत करण्यासाठी एकही स्थानिक साक्षीदार भेटला नाही. शिवाय, नामा नावाच्या एका स्थानीय भाषेत “परिपूर्ण” अशा सामान्य संकल्पनांसाठी शब्द नव्हते. एका मिशनरीने सांगितले: “भाषांतरासाठी मी मुख्यतः शाळा शिक्षकांची मदत घेतली जे बायबलचा अभ्यास करत होते. त्यांना सत्याविषयी किरकोळ ज्ञान असल्यामुळे प्रत्येक वाक्य बरोबर आहे की नाही हे मला त्यांच्यासोबत बसून तपासावे लागत होते.” तरीपण, नवीन जगातील जीवन ही पत्रिका शेवटी चार नामिबियन भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली. आज, टेहळणी बुरूज नियतकालिक क्वानयामा व नडोंगा या स्थानीय भाषांतून नियमितपणे प्रकाशित होत आहे.

१७, १८. मेक्सिको आणि इतर देशांमध्ये कोणती आव्हाने स्वीकारली जात आहेत?

१७ मेक्सिकोत, स्पॅनिश ही मुख्य भाषा आहे. परंतु, स्पॅनिश लोक येण्यापूर्वी तेथे अनेक भाषा बोलल्या जात होत्या आणि आजही त्या बोलल्या जातात. यास्तव, यहोवाच्या साक्षीदारांचे साहित्य सध्या सात मेक्सिकन भाषांमध्ये तसेच मेक्सिकन संकेत भाषेतही तयार केले जाते. माया भाषेतील राज्य सेवा हे अमेरिकन इंडियन भाषेतील, निश्‍चित तारखेला प्रकाशित होणारे पहिलेच प्रकाशन होते. मेक्सिकोतील ५,७२,५३० राज्य प्रचारकांमध्ये माया, ॲझ्टेक आणि इतर गटांमधील हजारो जण आहेत.

१८ अलीकडील काळात, लाखो लोकांनी परदेशात आसरा घेतला आहे किंवा आर्थिक कारणांमुळे त्यांनी स्थलांतर केले आहे. परिणामस्वरूप, आज पहिल्यांदा अनेक देशांमध्ये परदेशी भाषेची मोठी क्षेत्रे आहेत. यहोवाच्या साक्षीदारांनी हे आव्हान स्वीकारले आहे. उदाहरणार्थ, इटलीत, इटालियन भाषा वगळता २२ भाषेच्या मंडळ्या आणि गट आहेत. इतर भाषा बोलणाऱ्‍या लोकांना प्रचार करता यावा म्हणून आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी अलीकडे १६ भाषा आणि इटालियन संकेत भाषा देखील शिकवण्यासाठी वर्ग आयोजित करण्यात आले होते. इतर अनेक देशांमध्ये, स्थलांतर केलेल्या बहुसंख्यीयांपर्यंत पोहंचण्यासाठी यहोवाचे साक्षीदार असेच प्रयत्न करत आहेत. होय, यहोवाच्या मदतीने, मोठा लोकसमुदाय खरोखर अनेक भाषांमधून गोळा होत आहे.

“सर्व पृथ्वीवर”

१९, २०. आज पौलाचे कोणते शब्द उल्लेखनीय पद्धतीने पूर्ण होत आहेत? स्पष्टीकरण द्या.

१९ पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने लिहिले: “त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. ‘त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोंचले.’” (रोमकर १०:१८) पहिल्या शतकात हे शब्द खरे ठरले तर, आपल्या काळात किती मोठ्या प्रमाणात ते खरे ठरले आहेत! लाखो जण म्हणजे इतिहासात कदाचित पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात लोक म्हणत आहेत: “परमेश्‍वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.”—स्तोत्र ३४:१.

२० शिवाय, हे कार्य मंदावण्याचे कोणतेही चिन्ह नाही. राज्य प्रचारकांची संख्या वाढतच आहे. प्रचारकार्यात अधिकाधिक वेळ खर्च केला जात आहे. कोट्यवधी पुनर्भेटी दिल्या जात आहेत आणि लाखो बायबल अभ्यास संचालित केले जात आहेत. आणि तरीही आस्थेवाईक लोक भेटतच आहेत. मागच्या वर्षी, येशूच्या मृत्यूचा स्मारक विधी पाळण्यासाठी एकत्रित झालेल्यांनी १,६०,९७,६२२ नवीन उच्चांक गाठला. यावरून स्पष्ट होते की, अद्याप पुष्कळ काम बाकी आहे. तीव्र छळ सहन केलेल्या आपल्या बांधवांच्या सचोटीचे आपण अनुकरण करत राहू या. आणि १९१९ पासून ज्यांनी यहोवाच्या सेवेत स्वतःला वाहून दिले आहे त्या बांधवांसारखा आवेश आपण दाखवू या. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण सर्वजणही म्हणू या: “प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा.”—स्तोत्र १५०:६.

[तळटीपा]

^ परि. 7 या पत्रिकेच्या पृष्ठे १८ ते २१ वरील वार्षिक अहवाल पाहा.

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• बांधवांनी १९१९ मध्ये कोणते कार्य हाती घेतले आणि ते एक आव्हान होते असे का म्हणता येईल?

• प्रचारकार्याला पाठिंबा देण्यासाठी कोणाला गोळा करण्यात आले?

• मिशनऱ्‍यांचा आणि परदेशात सेवा करणाऱ्‍या इतरांचा काय अहवाल राहिला आहे?

• यहोवा आज आपल्या लोकांना आशीर्वादित करत आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही कोणता पुरावा देऊ शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८-२१ पानांवरील तक्‍ता]

जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांचा २००३ सेवा वर्षाचा अहवाल

(बाऊंड व्हॉल्यूम पाहा)

[१४, १५ पानांवरील चित्रे]

दुसऱ्‍या महायुद्धाच्या गोंधळातही ख्रिश्‍चनांनी सुवार्तेचा प्रचार होईल की नाही याविषयी शंका व्यक्‍त केली नाही

[चित्राचे श्रेय]

विस्फोट:U.S. Navy photo; इतर:U.S. Coast Guard photo

[१६, १७ पानांवरील चित्रे]

मोठा लोकसमुदाय सर्व वंश आणि भाषा बोलणाऱ्‍यांपैकी असणार होता