व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मिशनरी आत्मा टिकवून ठेवल्यामुळे प्रतिफळ मिळाले

मिशनरी आत्मा टिकवून ठेवल्यामुळे प्रतिफळ मिळाले

जीवन कथा

मिशनरी आत्मा टिकवून ठेवल्यामुळे प्रतिफळ मिळाले

टॉम कूक यांच्याद्वारे कथित

गोळीबाराच्या आवाजानं दुपारच्या शांततेचा अचानक भंग झाला. आमच्या बागेतल्या झाडांमधून बेछूट गोळीबार चालला होता. काय झालं होतं? एका राजकीय सत्तेनं अनपेक्षितपणे कारवाई करण्यास सुरवात केली होती व युगांडा आता जनरल इदी अमीनच्या सत्तेखाली आले होते, हे समजायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. हे सर्व १९७१ साली घडलं.

पण माझी पत्नी ॲन व मी, इंग्लंडसारखा शांत देश सोडून आफ्रिकेच्या या अराजकता माजलेल्या भागात राहायला का आलो होतो? तसा मी स्वभावानं साहसी आहे पण, आवेशी राज्य सेवेच्या माझ्या आईवडिलांच्या उदाहरणाने प्रामुख्याने माझ्यामध्ये मिशनरी आत्मा उत्पन्‍न केला होता.

१९४६ सालच्या ऑगस्ट महिन्यातला तो रखरखीत दिवस मला अजूनही आठवतो जेव्हा माझ्या आईवडिलांना पहिल्यांदा यहोवाचे साक्षीदार भेटले होते. आमच्या दारावर ते किती तरी वेळपर्यंत या दोन पाहुण्यांबरोबर बोलत उभे होते. फ्रेझर ब्रॅडबरी आणि मॅमी श्रीव अशी नावं असलेले हे पाहुणे त्यानंतर पुष्कळदा आमच्या घरी आले आणि पुढील काही महिन्यांदरम्यान आमच्या कुटुंबातील सर्वांचे जीवन नाट्यमयरीत्या बदलत गेले.

माझ्या पालकांचं निडर उदाहरण

माझे पालक अनेक सामाजिक कार्यांत भाग घ्यायचे. उदाहरणार्थ, बायबलचा अभ्यास सुरू करण्याआधी आमच्या घराच्या भिंतींवर विन्स्टन चर्चिल यांची चित्रं लावलेली होती. युद्धानंतरच्या राष्ट्रीय निवडणुकांदरम्यान आमचं घर, स्थानीय हुजूर पक्ष मंडळाचे केंद्र म्हणून वापरलं जात होतं. आमच्या कुटुंबाचे संबंध, धार्मिक व सामाजिक प्रमुख लोकांबरोबर देखील होते. त्या वेळी मी फक्‍त नऊ वर्षांचा होतो तरीपण, आम्ही यहोवाचे साक्षीदार होत आहोत, असं आमच्या नातेवाईकांना कळलं तेव्हा त्यांना किती धक्का बसला हे मला समजत होतं.

आईबाबा ज्या साक्षीदारांबरोबर सहवास राखायचे ते संपूर्ण मनाने व निडरतेने सेवा करत असल्याचे पाहून आईबाबा देखील प्रचार कार्यात सक्रिय बनले. बाबांनी लगेच, आम्ही ज्या गावात राहायचो त्या स्पॉन्डन गावातील प्रमुख बाजारपेठेत ॲम्लिफायरवर भाषणे द्यायला सुरवात केली; आणि आम्ही मुलं हातात टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकं घेऊन सर्वांना दिसेल अशा ठिकाणी उभं राहायचो. पण मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा माझ्या शाळेतली मुलं माझ्या दिशेनं येताना दिसायची तेव्हा मला वाटायचं, की मी क्षणात गायब झालो तर किती बरं होईल!

आईबाबांचं उदाहरण पाहून माझी थोरली बहीण डॅफ्नी हिनंही पायनियरींग करायला सुरवात केली. १९५५ साली ती वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेत उपस्थित राहिली आणि तिला नंतर जपानला मिशनरी म्हणून नेमण्यात आलं. * माझी धाकटी बहीण झोई हिनं मात्र यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं.

तोपर्यंत मी, चित्रकला आणि आरेख्यक कलेत प्रशिक्षण घेतलं. त्या दिवसांत, माझ्या सोबतच्या विद्यार्थ्यांमध्ये, सक्‍तीची राष्ट्रीय सेवा या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा चालत असे. मी त्यांना जेव्हा सांगितलं, की धार्मिक कारणांमुळे मी अशा सेवांत भाग घेऊ शकत नाही तेव्हा मी मजा करतोय असं त्यांना वाटलं. यामुळे मला काही विद्यार्थ्यांबरोबर अनेक बायबल आधारित चर्चा करायला वेळ मिळाला. लगेचच, मला लष्करी सेवा नाकारल्याबद्दल १२ महिने तुरुंगात डांबण्यात आलं. बायबलच्या संदेशात आवड दाखवलेल्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी नंतर माझी पत्नी बनली. ॲन सत्य कसं शिकली हे मी तिलाच सांगू देतो.

ॲनचा सत्याशी संपर्क

“माझं कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचं नव्हतं आणि माझा कोणत्याही धर्मात बाप्तिस्मा झाला नव्हता. परंतु धर्म या विषयात मला रुची होती व माझे मित्रमैत्रिणी ज्या चर्चला जायचे त्यांच्याबरोबर मीही जात असे. टॉम आणि आणखी एक साक्षीदार, महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांबरोबर उत्साही चर्चा करत; या चर्चा ऐकल्यावर मीही बायबलमध्ये आवड घेऊ लागले. टॉम आणि या साक्षीदाराने लष्करी सेवेत भाग घेण्याचं नाकारल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा मला धक्काच बसला.

“टॉम तुरुंगात होता तेव्हा मी त्याच्याशी पत्रव्यवहार चालू ठेवला आणि बायबलबद्दलची माझी आवड आणखी वाढली. पुढच्या शिक्षणासाठी मी लंडनला आले तेव्हा म्युरियल अल्ब्रेक्ट हिच्याबरोबर मी बायबलचा अभ्यास करायला तयार झाले. म्युरियलने एस्टोनियामध्ये मिशनरी म्हणून सेवा केली होती आणि तिनं व तिच्या आईनं मला खूप उत्तेजन दिलं. काही आठवड्यांतच मी सभांना उपस्थित राहू लागले आणि व्हिक्टोरिया स्टेशनच्या बाहेर उभी राहून टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकं सादर करू लागले.

“मी दक्षिण लंडनच्या साऊथवाक मंडळीत जाऊ लागले. या मंडळीत विविध देशांतले आध्यात्मिक बंधूभगिनी होते, जे भौतिकरीत्या गरीब होते. मी अनोळखी होते तरीपण ते मला त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवायचे. मंडळीतलं प्रेम पाहून खरं तर मला खात्री पटली होती, की हेच सत्य आहे; १९६० साली माझा बाप्तिस्मा झाला.”

एकसारखीच ध्येये—परिस्थिती विभिन्‍न

१९६० साली ॲन आणि माझं लग्न झालं त्यानंतर आम्हां दोघांचं मिशनरी सेवा सुरू करण्याचं ध्येय होतं. पण आम्हाला बाळ होणार आहे असं कळलं तेव्हा आमची परिस्थिती बदलली. आमची मुलगी सारा हिचा जन्म झाल्यावरही ॲन व मला, राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या राष्ट्रात जाऊन सेवा करण्याची इच्छा होती. मी अनेक राष्ट्रांमध्ये नोकरीसाठी अर्ज पाठवले; १९६६ सालच्या मे महिन्यात युगांडातील शिक्षण मंत्रालयाकडून मला नोकरी मिळाल्याचं पत्र मिळालं. पण, आता ॲनला पुन्हा दिवस गेले होते; आम्हाला दुसरं बाळ होणार होतं. इतक्या दूर राहायला जाणं आमच्यासाठी बरोबर असेल की नाही, याबद्दल काहींनी शंका व्यक्‍त केली. आम्ही डॉक्टरांना भेटलो तेव्हा ते म्हणाले: “तुम्ही जाणारच असाल तर, सातवा महिना पूर्ण व्हायच्या आधी जा.” त्यामुळे मग आम्ही लगेच युगांडाला विमानानं गेलो. आमच्या दोघांच्या पालकांनी आमची दुसरी मुलगी रेचल हिला ती दोन वर्षांची झाल्यानंतर पहिल्यांदा पाहिलं. आता आम्ही स्वतः आजी-आजोबा झाल्यामुळे, आमच्या पालकांनी केलेला आत्म-त्याग आम्हाला चांगल्याप्रकारे समजतो.

१९६६ साली युगांडात आल्यावर आम्हाला आनंदही झाला आणि भीतीही वाटत होती. विमानातून उतरताना आमचं लक्ष लगेच आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या रंगीबेरंगी कपड्यांकडे गेलं. किती भडक रंग होते ते. नाईल नदीच्या उगमाजवळ असलेल्या जिंजा गावापासून ५० किलोमीटर दूर असलेल्या इगांगाच्या लहान गावाशेजारी आमचं पहिलं घर होतं. जिंजा येथील एक लहानसा एकाकी गट हाच आमच्या घराच्या सर्वात जवळ असलेला साक्षीदारांचा गट होता. गिल्बर्ट आणि जोन वॉल्टर्स आणि स्टीवन व बार्बरा हार्डी हे मिशनरी या गटाची काळजी घ्यायचे. मी जिंजा येथे नोकरीची बदली मिळण्यासाठी अर्ज केला जेणेकरून मीही या गटाला साहाय्य करू शकेन. रेचलचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांतच आम्ही जिंजाला राहायला गेलो. तिथं आम्हाला विश्‍वासू साक्षीदारांच्या एका लहान गटाबरोबर सेवा करण्याचा आनंद मिळाला; या गटात नंतर वाढ होऊन युगांडातील दुसरी मंडळी बनली.

एका विदेशी क्षेत्रात कुटुंब या नात्याने सेवा करणे

ॲन व मला वाटतं, की आमच्या मुलांना वाढवण्यासाठी आम्ही उत्तम ठिकाण निवडलं होतं. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या व नव्यानं वाढत चाललेल्या मंडळीला साहाय्य करणाऱ्‍या मिशनऱ्‍यांसोबत सेवा करण्याचा आम्हाला सुहक्क लाभला. आमच्या घरी नेहमी येणाऱ्‍या युगांडातील बंधूभगिनींचा सहवास आम्हाला खूप आवडायचा. स्टॅन्ली व एसीनाला मकुंबा हे दोघं खासकरून आम्हाला खूप प्रोत्साहन द्यायचे.

पण फक्‍त बंधूभगिनीच आम्हाला भेटायला यायचे नाहीत तर जंगली प्राणी देखील यायचे कारण आमच्या सभोवती विविध प्रकारचे प्राणी होते. रात्रीच्या वेळी पाणघोडे नाईल नदीतून थेट आमच्या घरापर्यंत यायचे. एकदा आमच्या बागेत एक १८ फूट लांबीचा अजगर पाहिल्याचं मला अजूनही चांगलं आठवतं. आम्ही कधीकधी, सिंह आणि इतर जंगली प्राणी मुक्‍त संचार करत असलेली अभयारण्ये पाहायला जायचो.

सेवेमध्ये गेल्यावर स्थानीय लोक आमच्याकडे खूप कुतूहलानं पाहायचे, कारण त्यांनी बाबा-गाडी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. घरोघरी जाताना आमच्या मागं मुलांचं लटांबर असायचं. लोक आम्हाला अगदी आदरानं न्याहाळून पाहायचे आणि मग आमच्या गोऱ्‍यापान बाळाला हात लावायचे. तिथले लोक नम्र असल्यामुळे त्यांना साक्ष द्यायला आम्हाला खूप आवडायचं. आम्हाला वाटायचं सर्वच लोक सत्यात येतील कारण त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सहजपणे सुरू करता येत होता. पण, पुष्कळ लोकांना शास्त्रवचनांनुसार नसलेल्या प्रथा सोडायला कठीण जायचं. तरीपण, बऱ्‍याच लोकांनी बायबलचे उच्च नैतिक दर्जे स्वीकारले आणि मंडळीतील प्रचारकांची संख्या वाढत गेली. १९६८ साली जिंजा येथील आमचं पहिलं विभागीय संमेलन महत्त्वाचं संमेलन होतं. आम्ही ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास केला होता अशांनी नाईल नदीत बाप्तिस्मा घेतला, ही आमच्या गोड आठवणींपैकीची एक आठवण आहे. पण आम्ही उपभोगत असलेली शांतता जास्त काळ टिकणार नव्हती.

बंदी—विश्‍वास आणि कल्पकतेची परीक्षा

१९७१ साली जनरल इदी अमीननं सत्ता बळकावली. तेव्हा जिंजामध्ये अंदाधुंदी माजली; आम्ही आमच्या बागेत बसून चहा घेत होतो तेव्हा, या लेखाच्या सुरवातीला मी ज्याच्याविषयीचं वर्णन केलं आहे तसा गोळीबार सुरू झाला. त्यानंतरच्या दोन वर्षांपर्यंत, अनेक आशियाच्या लोकांची हकालपट्टी झाली. पुष्कळ विदेश्‍यांनी देश सोडून जायचं ठरवलं; याचा जबरदस्त परिणाम शाळा, इस्पितळांवर झाला. आणि मग, यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी घालण्यात आली आहे, ही धक्कादायक घोषणा करण्यात आली. आमच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण खात्यानं आम्हाला राजधानी शहर कंपाला इथं राहायला पाठवलं. यामुळे दोन प्रकारे फायदा झाला. कंपालामध्ये लोक आम्हाला ओळखत नव्हते त्यामुळे आम्हाला बरंच स्वातंत्र्य होतं. शिवाय मंडळीत व क्षेत्र सेवेतही बरंच काम करायचं होतं.

ब्रायन व मरियन वॉलस आणि त्यांची दोन मुलं, यांचीसुद्धा आमच्यासारखीच गत झाली होती; त्यांनीसुद्धा युगांडातच राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वांनी, या कठीण काळात कंपाला मंडळीत एकत्र मिळून कार्य करताना एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटला. इतर राष्ट्रांतील आपल्या बंधूभगिनींनी बंदी असताना यहोवाची कशाप्रकारे सेवा केली याविषयी आम्ही वाचलेले अहवाल आमच्यासाठी खास उत्तेजन देणारे ठरले. आम्ही लहान लहान गटांमध्ये एकत्र यायचो आणि महिन्यातून एकदा एन्टेबे बॉटॅनिकल गार्डनमध्ये हे सर्व गट एकत्र यायचे; लोकांना वाटायचे की आम्ही पार्टीसाठीच जमलो आहोत. आमच्या दोन्ही मुलींना ही कल्पना खूप आवडली.

प्रचार कार्य करताना आम्हाला सावधगिरी बाळगावी लागायची. गोरे लोक युगांडातील काळ्या लोकांच्या घरी जात आहेत, हे लोकांच्या चटकन्‌ लक्षात आल्याशिवाय राहिले नसते. त्यामुळे दुकानं, अपार्टमेंट, शैक्षणिक वसतीगृहे आमची क्षेत्रे बनली. दुकानात प्रचार करण्याची माझी एक पद्धत अशी असायची; दुकानदाराला मी अशी वस्तू मागायचो की जी तेव्हा उपलब्ध नसायची, जसे की साखर किंवा तांदूळ. दुकानदारानं मग देशांत काय चाललं यावर नाराजी व्यक्‍त केली की मी लगेच राज्य संदेश सांगायचो. माझी ही पद्धत परिणामकारक होती. कधीकधी, मी दुकानदाराला पुन्हा जाऊन भेटही द्यायचो शिवाय त्याच्या दुकानातून, सहजपणे उपलब्ध नसलेल्या एखाद्या सामानाचा थोडासा साठाही न्यायचो.

आमच्या आजूबाजूला हिंसाचार माजला होता. युगांडा आणि ब्रिटनमधले संबंध अधिकच बिघडत गेल्यामुळे अधिकाऱ्‍यांनी माझ्या कॉन्ट्रॅक्टचं नविनीकरण केलं नाही. त्यामुळे, १९७४ साली युगांडात आठ वर्षं राहिल्यानंतर आम्हाला आपल्या बंधूभगिनींचा निरोप घ्यावा लागला. पण आमच्यातला मिशनरी आत्मा मात्र कमी झाला नाही.

न्यू गिनीला

१९७५ सालच्या जानेवारी महिन्यात, पापुआ न्यू गिनीत कामाची संधी मिळाली तेव्हा आम्ही लगेच त्याचा फायदा घेतला. अशाप्रकारे पॅसिफिक क्षेत्रातील आमच्या आठ वर्षांच्या आनंददायक सेवेची सुरवात झाली. बांधवांबरोबर आणि सेवेमध्ये आम्ही घालवलेला वेळ अर्थपूर्ण व प्रतिफलदायी ठरला.

पापुआ गिनीत असताना, आम्ही बायबल नाटकात भाग घ्यायचो तेव्हाचा तो काळ मला आठवतो. दर वर्षी आम्ही प्रांतीय अधिवेशनांच्या वेळी नाटकांच्या तयारीला लागायचो; खूप मजा यायची त्या वेळेला! अशा वेळी आम्हाला अनेक आध्यात्मिक मनोवृत्तीच्या कुटुबांबरोबर सहवास राखायला मिळायचा; याचा आमच्या मुलींवर उत्तम परिणाम झाला. आमच्या थोरल्या मुलीनं, सारानं रे स्मीथ नावाच्या एका खास पायनियर बांधवाबरोबर विवाह केला व त्या दोघांनी मिळून इरियान जयाच्या (आता, पापुआ, एक इंडोनेशियन प्रांत) सरहद्दीजवळ खास पायनियर सेवा केली. त्यांचं घरं म्हणजे, स्थानीय गावात एक गवताची खोपटी. सारा म्हणते, की या नेमणुकीत राहिल्यामुळे तिला उत्तम प्रशिक्षण मिळाले.

बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे

पापुआ गिनीत आम्हाला येऊन आठ वर्षं झाल्यानंतर, माझ्या आईवडिलांना आमची गरज भासू लागली. पण, आम्ही सर्वांनी इंग्लंडला पुन्हा जाण्याऐवजी त्यांनीच आमच्याबरोबर येऊन राहायचं ठरवलं; त्यामुळे १९८३ साली आम्ही सर्व ऑस्ट्रेलियात राहायला गेलो. मग काही दिवसांसाठी ते जपानला माझी बहीण डॅफ्ने हिच्याकडेही जाऊन राहिले. आईबाबांच्या मृत्यूनंतर, आम्ही दोघा पतीपत्नीनं सामान्य पायनियर सेवा करण्याचा निर्णय घेतला; यामुळे आम्हाला एक सुहक्क मिळाला जो माझ्याकरता खरोखरच आव्हानात्मक होता.

आम्ही पायनियरींग करायला नुकतीच सुरुवात केली होती तेवढ्यात आम्हाला विभागीय कार्यासाठी आमंत्रण मिळालं. लहानपणापासूनच मला विभागीय पर्यवेक्षकांची भेट, म्हणजे एक खास प्रसंग वाटायचा. आता ही जबाबदारी माझ्याकडे आली होती. विभागीय कार्य ही, आतापर्यंतच्या आमच्या जीवनातली सर्वात आव्हानात्मक नेमणूक होती. पण यहोवानं मात्र आम्हाला वेळोवेळी आम्ही पूर्वी अनुभवले नव्हते अशा मार्गांनी मदत केली.

१९९० साली ऑस्ट्रेलियात बंधू थिओडोर जॅरझ यांच्या झोन भेटीच्या वेळी आम्ही त्यांना विचारलं, की आमच्या वयाच्या मानानं आम्ही बाहेरच्या देशांत जाऊन पूर्ण वेळेची सेवा करू शकतो का? त्यांनी आम्हाला विचारलं: “तुम्ही सॉलमन बेटांवर जायला तयार आहात का?” मी व ॲननं वयाच्या पन्‍नाशीत, सॉलमन बेटांवर जायचं ठरवलं; ही आमची पहिली अधिकृत मिशनरी नेमणूक होती.

‘आनंदी बेटांवर’ सेवा

सॉलमन बेटांना आनंदी बेटं म्हटलं जातं आणि गेल्या दशकात इथं आम्ही सेवेत घालवलेला वेळ खरोखरच आनंदाचा होता. प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करताना मला व ॲनला इथल्या बंधूभगिनींच्या प्रेमळ दयेचा प्रत्यय आला आहे. यांनी दाखवलेला पाहुणचार आमच्या मनात कायमचा राहिला आहे. मला वाटत होतं, की मला सॉलमन आयलंड्‌स पिजिन भाषा बोलता येते, आणि माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत मी त्यांना समजावून सांगायचो तेव्हा ते अगदी शांतपणे माझं ऐकून घ्यायचे. ही जगातली सर्वात लहान शब्दसंग्रह असलेली भाषा आहे.

सॉलमन बेटांवर आल्याबरोबर विरोधकांनी, आम्ही आमच्या संमेलन गृहाचा वापर करताना व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. ॲग्लीकन चर्चनं यहोवाच्या साक्षीदारांवर आरोप लावला की होनायरा येथील आमच्या संमेलन गृहाचा काही भाग त्यांच्या जमिनीवर बांधण्यात आला आहे. सरकारनंही त्यांची बाजू घेतली, त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाकडे अपील केलं. अपीलच्या निर्णयावरून हे ठरवलं जाणार होतं की आम्हाला आमचे १,२०० बैठकांचे नवे संमेलन गृह पाडावे लागणार की नाही.

संपूर्ण आठवडाभर या केसवर कोर्टात खटला चालला होता. तुमच्या बाजूनं निकाल लागणारच नाही, अशी घमेंड विरोधी पक्षाच्या वकिलाला होती. पण आमच्यावतीने केस लढणाऱ्‍या न्यूझीलंडच्या बंधू वॉरन कॅथकर्ट यांनी मुद्देसूदपणे विरोधी पक्षाचे पोम बाहेर आणले आणि त्यांनी लावलेला एकेक आरोप निकामी केला. शुक्रवारपर्यंत, या केसची बातमी दूरपर्यंत पोहंचली होती; कोर्ट चर्चमधल्या मान्यवरांनी, सरकारी अधिकाऱ्‍यांनी, आपल्या ख्रिस्ती बांधवांनी गच्च भरले होते. मला अधिकृत कोर्टातील अनुसूची सूचनेतील चूक अजूनही आठवते. त्यात असे लिहिले होते: “सॉलमन बेटे सरकार आणि मेलनेशिया चर्च विरुद्ध यहोवा.” साहजिकच, केस आम्हीच जिंकलो!

परंतु आनंदी बेटांवरील तुलनात्मकरीत्या असलेली शांती जास्त काळ टिकणार नव्हती. पुन्हा, ॲन व मी एका लष्करी अनपेक्षित कारवाईमुळे झालेल्या उलथापालथीत व हिंसेत अडकलो. वांशिक स्पर्धेमुळे मुलकी युद्ध सुरू झाले. २००० सालच्या जून ५ तारखेला सरकार पडले आणि सशस्त्र संघर्षवाद्यांनी राजधानीवर कब्जा केला. काही आठवड्यांपर्यंत आमचे संमेलन गृह निराश्रीत लोकांचे केंद्र बनले. विरोधी बाजूच्या वांशिक गटांतील आपले ख्रिस्ती बंधूभगिनी संमेलन गृहात शांतीने एका कुटुंबाप्रमाणे राहत आहेत हे पाहून अधिकाऱ्‍यांना खूप आश्‍चर्य वाटलं. यामुळे त्यांना खूप चांगली साक्ष मिळाली!

संघर्षवाद्यांनीसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांच्या तटस्थ भूमिकेचा आदर केला. यामुळे आम्ही एका कमांडरला, विरोधी पक्षाच्या लष्कराच्या हद्दीत राहणाऱ्‍या एका लहान गटाच्या बांधवांपर्यंत ट्रकनं साहित्य आणि इतर गोष्टींचा साठा पाठवण्यासाठी पटवू शकलो. काही महिन्यांसाठी आमच्यापासून विलग झालेल्या कुटुंबांची आणि आमची पुन्हा भेट झाली तेव्हा आमच्या सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले!

यहोवाचे जितके आभार मानू तितके कमीच

यहोवाची सेवा करण्यात आम्ही घालवलेल्या जीवनाकडे आम्ही पाहतो तेव्हा त्याचे आम्ही जितके आभार मानू तितके कमीच आहेत. आमच्या दोन्ही मुलींना आणि जावई रे आणि जॉन यांना विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होतो. आमच्या मिशनरी नेमणुकीत त्यांनी खरोखरच आम्हाला खूप पाठबळ दिले.

गेल्या १२ वर्षांपासून ॲन व मला सॉलमन बेटांवरील शाखा दफ्तरात काम करण्याचा सुहक्क मिळाला आहे आणि या काळादरम्यान आम्ही या बेटांवरील राज्य प्रचारकांची संख्या दुप्पट झाल्याचे, १,८०० पर्यंत वाढल्याचे पाहिले आहे. अलीकडेच मला न्यूयॉर्क, पॅटरसन येथे शाखा समितीच्या सदस्यांसाठी झालेल्या प्रशालेत उपस्थित राहण्याचा आणखी एक सुहक्क लाभला. खरंच, मिशनरी आत्मा टिकवून ठेवल्यामुळं आम्ही अनेक आशीर्वादांच्या समाधानकारक जीवनाचा आनंद लुटू शकलो आहोत!

[तळटीप]

^ परि. 10 टेहळणी बुरूज जानेवारी १५, १९७७ च्या इंग्रजी अंकातील “आम्ही दिरंगाई केली नाही” हा लेख पाहा.

[२३ पानांवरील चित्र]

१९६० साली आमच्या लग्नाच्या दिवशी

[२४ पानांवरील चित्र]

युगांडात असताना, स्टॅन्ली आणि एसीनाला मकुंबा यांनी आमच्या कुटुंबाला बरेच प्रोत्साहन दिलं

[२४ पानांवरील चित्र]

सारा, शेजारच्या खोपटीत जाताना

[२५ पानांवरील चित्र]

सॉलमन बेटांवरील रहिवाशांना चित्र काढून मी समजावू शकलो

[२५ पानांवरील चित्र]

सॉलमन बेटांवरील एका दूरच्या मंडळीला भेट देताना

[२६ पानांवरील चित्र]

आज आमचं कुटुंब