व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे गौरव करा

यहोवाचे गौरव करा

यहोवाचे गौरव करा

“परमेश्‍वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्‍वराच्या नावाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्या अंगणांत या.”—स्तोत्र ९६:७, ८.

१, २. यहोवाची स्तुती कोण करतात आणि त्यांच्यासोबत आपला आवाज मिळवण्यास कोणाला प्रोत्साहित केले जाते?

यिशैचा पुत्र दावीद हा बेथलेहेमच्या परिसरात लहानाचा मोठा झाला. लहानपणापासून तो मेंढपाळाचे काम करीत होता. रात्रीच्या अंधारात, निर्मनुष्य कुरणांत आपल्या वडिलांच्या कळपांची राखण करत असताना, कितीदा तरी तो वरती विस्तीर्ण आकाशातील चांदण्याकडे बघत बसला असेल! आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने १९ व्या स्तोत्राचे सुरेख शब्द रचले आणि गायिले तेव्हा ती स्मृतीचित्रे नक्कीच त्याच्या मनात पुन्हा उभी राहिली असतील: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहंचतात.”—स्तोत्र १९:१, ४.

वाचा नाही, शब्द नाहीत, वाणी नाही पण तरीसुद्धा यहोवाने निर्माण केलेले विस्मयकारक आकाश दर दिवशी व दर रात्री त्याचे गौरव करतात. निर्मितीकृत्ये कधीही देवाचे गौरव करण्याचे थांबवत नाहीत आणि पृथ्वीतलावरील सर्व रहिवाशांच्या देखत ती यहोवाच्या महानतेला मूक ग्वाही देत असल्याचे पाहून आपण किती क्षुल्लक आहोत याची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. पण निर्मितीची मूक ग्वाही पुरेशी नाही. विश्‍वासू मानवांना आपला आवाज यात मिळवण्यास प्रोत्साहित केले जाते. एका निनावी स्तोत्रकर्त्याने विश्‍वासू उपासकांना उद्देशून पुढीलप्रमाणे म्हटले: “परमेश्‍वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्‍वराच्या नावाची थोरवी गा.” (स्तोत्र ९६:७, ८) ज्यांचा यहोवासोबत जवळचा नातेसंबंध आहे ते मोठ्या आनंदाने या आवाहनाला प्रतिसाद देतात. पण देवाचे गौरव करण्यात काय सामील आहे?

३. मानव कोणकोणत्या मार्गांनी देवाचे गौरव करतात?

केवळ मुखाने गौरव करणे पुरेसे नाही. यशयाच्या काळातील इस्राएल लोक आपल्या तोंडाने देवाची स्तुती करत होते पण त्यांची भक्‍ती मनःपूर्वक नव्हती. यशयाच्याद्वारे यहोवाने म्हटले: “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करितात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखितात.” (यशया २९:१३) या लोकांनी केलेली स्तुती अर्थहीन होती. अर्थपूर्ण होण्याकरता, ती यहोवाबद्दल प्रेमाने भरलेल्या हृदयातून आणि त्याच्या एकमेव गौरवाच्या प्रांजळ जाणिवेतून व्यक्‍त झाली पाहिजे. केवळ यहोवाच निर्माणकर्ता आहे. तो सर्वशक्‍तिमान आहे, न्यायी आहे आणि प्रेमाचे मूर्तिमान रूप आहे. तो आपला उद्धारकर्ता आणि यथान्याय सार्वभौम आहे ज्याला स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक जीवित प्राण्याने अधीन झाले पाहिजे. (प्रकटीकरण ४:११; १९:१) या सर्व गोष्टींवर आपला मनापासून भरवसा असेल तर आपण पूर्ण मनाने त्याचे गौरव करू.

४. देवाचे गौरव करण्यासंबंधी येशूने कोणते मार्गदर्शन दिले आणि आपण त्याचे कशाप्रकारे पालन करू शकतो?

देवाचे गौरव आपण कसे करू शकतो याविषयी येशू ख्रिस्ताने आपल्याला मार्गदर्शन दिले. त्याने म्हटले: “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.” (योहान १५:८) आपण कशाप्रकारे विपुल फळ देऊ शकतो? सर्वप्रथम, ‘राज्याच्या सुवार्तेच्या’ प्रचारात मनःपूर्वक सहभाग घेऊन देवाच्या ‘अदृश्‍य गोष्टींविषयी’ वर्णन करण्यात सर्व निर्मित वस्तुंसोबत सामील होण्याद्वारे. (मत्तय २४:१४; रोमकर १:२०) शिवाय असे केल्याने, यहोवा देवाच्या स्तुतीगीतात आपला स्वर जोडणारे नवीन शिष्य बनवण्यात, प्रत्यक्षरित्या असो वा अप्रत्यक्षरित्या आपण सर्वजण सहभाग घेतो. दुसरे म्हणजे, आपण पवित्र आत्म्याने आपल्यात उत्पन्‍न केलेले फळ विकसित करतो आणि यहोवाच्या अद्‌भुत गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. (गलतीकर ५:२२, २३; इफिसकर ५:१, कलस्सैकर ३:१०) परिणामस्वरूप, आपल्या दैनंदिन आचरणानेही देवाचे गौरव होते.

“सर्व पृथ्वीवर”

५. इतरांना आपल्या विश्‍वासाविषयी सांगण्याद्वारे देवाचे गौरव करण्याची ख्रिश्‍चनांवर जी जबाबदारी आहे तिच्याविषयी पौलाने कशाप्रकारे जोर देऊ सांगितले?

रोमकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने, इतरांना आपल्या विश्‍वासाविषयी सांगण्याद्वारे देवाचे गौरव करण्याची ख्रिश्‍चनांवर जी जबाबदारी आहे तिच्याविषयी जोर देऊन सांगितले. रोमकरांना लिहिलेल्या पत्राचा मुख्य विषय हाच आहे, की केवळ जे येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवतात त्यांचाच बचाव होऊ शकतो. आपल्या पत्राच्या १० व्या अध्यायात पौलाने दाखवले की “ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ति” असूनसुद्धा, त्याच्या काळातील नैसर्गिक इस्राएल लोक अजूनही मोशेच्या नियमशास्राचे पालन करून स्वतःला नीतिमान ठरवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणूनच पौल म्हणतो, “येशू प्रभु आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करिशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा ‘आपल्या अंतःकरणात’ विश्‍वास ठेवशील तर तुझे तारण होईल.” तेव्हापासून, “यहूदी व हेल्लेणी ह्‍यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभु तोच आणि जे त्याचा धावा करितात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्‍न आहे.” कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”—रोमकर १०:४, ९-१३.

६. स्तोत्र १९:४ या वचनाचे पौलाने कशाप्रकारे स्पष्टीकरण दिले?

यानंतर पौल एक तर्कशुद्ध प्रश्‍न विचारतो: “ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील?” (रोमकर १०:१४, १५) इस्राएलाच्या संदर्भात पौल म्हणतो: “सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही.” इस्राएल राष्ट्राने सुवार्ता का बरे मान्य केली नाही? संधी मिळाली नाही म्हणून नव्हे, तर विश्‍वास नसल्यामुळे त्यांनी सुवार्तेला प्रतिसाद दिला नाही. हे दाखवण्याकरता पौल स्तोत्र १९:४ हे वचन उद्धृत करून त्याचा संबंध निर्मितीकृत्यांच्या मूक साक्षीशी नव्हे तर ख्रिस्ती प्रचार कार्याशी जोडतो. तो म्हणतो: “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोंचले.” (रोमकर १०:१६, १८) होय, अचेतन निर्मिती यहोवाचे गौरव करते त्याचप्रमाणे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी तारणाच्या सुवार्तेचा सर्वदूर प्रचार केला आणि अशाप्रकारे देवाची “सर्व पृथ्वीवर” स्तुती केली. कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात, सुवार्तेचा किती दूरवर प्रचार करण्यात आला आहे हे देखील पौलाने सांगितले. त्याने म्हटले की “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेची घोषणा झाली आहे.—कलस्सैकर १:२३.

आवेशी साक्षीदार

७. येशूने सांगितल्यानुसार ख्रिश्‍चनांवर कोणती जबाबदारी आहे?

येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर जवळजवळ २७ वर्षांनंतर पौलाने कलस्सैकरांना पत्र लिहिले. इतक्या कमी काळात प्रचाराचे कार्य कलस्सैपर्यंत कसे काय पोचले? पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या आवेशामुळे हे साध्य होऊ शकले, शिवाय यहोवानेही त्यांच्या या आवेशाला आशीर्वादित केले. येशूने भाकीत केले होते की त्याचे अनुयायी सक्रिय प्रचारक असतील. त्याने म्हटले: “प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) या भविष्यवाणीसोबत मत्तयाच्या शेवटल्या वचनांत आपण वाचतो त्याप्रमाणे येशूने ही आज्ञा देखील जोडली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर थोड्याच काळानंतर त्याच्या अनुयायांनी या शब्दांची पूर्तता करण्यास सुरवात केली.

८, ९. ख्रिश्‍चनांनी प्रेषितांची कृत्ये यात सांगितल्यानुसार येशूच्या आज्ञेला कसा प्रतिसाद दिला?

सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतण्यात आल्यानंतर, येशूच्या एकनिष्ठ अनुयायांनी सर्वप्रथम बाहेर पडून प्रचार करण्यास सुरवात केली व जेरूसलेम येथे जमलेल्या लोकसमुदायाला ते ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ सांगू लागले. त्यांचा प्रचार अतिशय परिणामकारक होता आणि त्यामुळे ‘सुमारे तीन हजार माणसांनी’ बाप्तिस्मा घेतला. या शिष्यांनी देवाची जाहीररित्या आवेशाने स्तुती करण्याचे जारी राखले आणि यामुळे उत्तम परिणाम घडून आले.—प्रेषितांची कृत्ये २:४, ११, ४१, ४६, ४७.

त्या ख्रिश्‍चनांच्या कार्यांकडे लवकरच धर्मपुढाऱ्‍यांचे लक्ष गेले. पेत्र व योहान यांच्या वक्‍तव्याने अस्वस्थ होऊन त्यांनी त्या दोन प्रेषितांना प्रचार कार्य थांबवण्याची आज्ञा दिली. तेव्हा प्रेषितांनी त्यांना उत्तर दिले: “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” त्यांना धमकी देऊन सोडून देण्यात आले तेव्हा पेत्र व योहान बांधवांजवळ परत गेले आणि सर्वांनी मिळून यहोवाला प्रार्थना केली. त्यांनी निर्भयपणे यहोवाला अशी विनंती केली: “आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.”—प्रेषितांची कृत्ये ४:१३, २०, २९, ३०.

१०. कशाप्रकारचा विरोध होऊ लागला आणि खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कसा प्रतिसाद दिला?

१० ही प्रार्थना यहोवाच्या इच्छेशी सुसंगत होती हे काही काळानंतर स्पष्ट झाले. प्रेषितांना अटक करण्यात आली आणि मग चमत्कारिकरित्या एका देवदूताच्या माध्यमाने त्यांची सुटका करण्यात आली. देवदूताने त्यांना सांगितले: “जा आणि मंदिरात उभे राहून ह्‍या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा.” (प्रेषितांची कृत्ये ५:१८-२०) प्रेषितांनी या आज्ञेचे पालन केले आणि त्यामुळे यहोवाने त्यांना निरंतर आशीर्वादित केले. म्हणूनच, “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ५:४२) कडवा विरोधही येशूच्या अनुयायांना जाहीररित्या देवाचे गौरव करण्यापासून परावृत्त करू शकला नाही हे यावरून स्पष्ट झाले.

११. सुरवातीच्या ख्रिश्‍चनांची प्रचार कार्याप्रती कशी मनोवृत्ती होती?

११ लवकरच स्तेफनाला अटक करून दगडमार करून ठार मारण्यात आले. त्याच्या खुनामुळे सबंध जेरूसलेममध्ये छळाची लाट उसळली आणि प्रेषितांना सोडून इतर सर्व शिष्यांची पांगापांग झाली. या छळामुळे त्यांचा उत्साह मावळला का? मुळीच नाही. बायबल सांगते: “ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.” (प्रेषितांची कृत्ये ८:१,) देवाचे गौरव करण्याचा तो उत्साह वारंवार दिसून आला. प्रेषितांची कृत्ये याच्या ९ व्या अध्यायात आपण तार्सकर शौल या परुशाबद्दल वाचतो जो येशूच्या शिष्यांचा दिमिष्कात छळ सुरू करण्याच्या उद्देशाने तेथे जात होता; पण वाटेतच त्याला येशूचा दृष्टान्त झाला, ज्यामुळे त्याची दृष्टी गेली. दिमिष्कात हनन्याने चमत्कार करून शौलाचे अंधत्व दूर केले. शौल, ज्याला नंतर प्रेषित पौल म्हणून ओळखण्यात आले, त्याने सर्वप्रथम काय केले? अहवाल सांगतो: “त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की, तो देवाचा पुत्र आहे.” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये ९:२०.

सर्वांनी प्रचारात सहभाग घेतला

१२, १३. (अ) इतिहासकारांच्या मते सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीसंबंधी कोणती गोष्ट उल्लेखनीय होती? (ब) इतिहासकारांच्या विधानांना प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक कशाप्रकारे दुजोरा देते?

१२ सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीत सर्वजण प्रचार कार्यात सहभाग घेत होते ही बाब सर्वज्ञात आहे. त्या काळातील ख्रिश्‍चनांविषयी फिलिप शॅफ लिहितात: “प्रत्येक मंडळी जणू एक मिशनरी संस्था होती आणि प्रत्येक ख्रिस्ती एक मिशनरी होता.” (ख्रिस्ती चर्चचा इतिहास) ग्लोरियस मिनिस्ट्री ऑफ द लेइटी या पुस्तकात डब्ल्यु. एस. विल्यम्स म्हणतात: “सर्वसामान्य साक्ष हीच आहे की आरंभीच्या चर्चमध्ये सर्व ख्रिस्ती खासकरून ज्यांच्याजवळ विशेष दाने [आत्म्याची दाने] होती, ते सर्व शुभवर्तमानाचा प्रचार करीत होते.” ते असेही ठामपणे म्हणतात, की “प्रचार हा केवळ काही विशेष गटाच्या लोकांचा विशेषाधिकार असेल असे येशूने कधीही सुचवले नव्हते.” ख्रिस्ती धर्माचा एक प्राचीन विरोधक सेल्सस यानेही असे लिहिले: “विणकरी, चांभार, कातडे कमावणारे, आणि सर्वात अडाणी व गावंढळ लोक देखील शुभवर्तमानाचे आवेशी प्रचारक होते.”

१३ या विधानांच्या अचूकतेला प्रेषितांची कृत्ये यातील अहवाल दुजोरा देतो. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतण्यात आल्यानंतर सर्व शिष्यांनी, स्त्रिया व पुरुषांनी जाहीररित्या देवाच्या महत्कृत्यांची घोषणा केली. स्तेफनाच्या वधानंतर सुरू झालेल्या छळामुळे पांगापांग झालेल्या ख्रिश्‍चनांनी दूरदूरच्या प्रदेशांत सुवार्तेचा प्रचार केला. सुमारे २८ वर्षांनंतर पौलाने एका लहानशा पाळकवर्गाला नव्हे तर सर्व इब्री ख्रिश्‍चनांना पत्र लिहिताना असे म्हटले: “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्री लोकांस १३:१५) प्रचार कार्याविषयी स्वतःचा दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट करताना पौलाने म्हटले: “जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” (१ करिंथकर ९:१६) पहिल्या शतकातील सर्व विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्याही याच भावना होत्या यात शंका नाही.

१४. विश्‍वास व प्रचाराचा काय संबंध आहे?

१४ वस्तुतः, कोणत्याही प्रामाणिक ख्रिस्ती व्यक्‍तीने प्रचार कार्यात सहभाग घेतलाच पाहिजे कारण त्याचा विश्‍वासाशी अतूट संबंध आहे. पौलाने म्हटले: “जो अंतःकरणाने विश्‍वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते.” (रोमकर १०:१०) मंडळीतला एक लहानसा गट, उदाहरणार्थ पाळक वर्गच केवळ विश्‍वास ठेवतो का आणि त्याअर्थी केवळ त्यांच्यावरच प्रचार करण्याची जबाबदारी आहे का? निश्‍चितच नाही! सर्व खरे ख्रिस्ती प्रभू येशू ख्रिस्तावर दृढ विश्‍वास उत्पन्‍न करतात आणि यामुळे त्यांना आपल्या विश्‍वासाविषयी जाहीर घोषणा करण्याची आपोआपच प्रेरणा होते. याच्या शिवाय त्यांचा विश्‍वास मृतवत आहे. (याकोब २:२६) सामान्य युगाच्या पहिल्या शतकातील सर्व एकनिष्ठ ख्रिश्‍चनांनी अशारितीने आपला विश्‍वास प्रकट केल्यामुळे यहोवाच्या नावाचा मोठा जयजयकार झाला.

१५, १६. समस्या असूनही प्रचार कार्यात प्रगती होत राहिली हे दाखवणारी उदाहरणे सांगा.

१५ पहिल्या शतकात मंडळीच्या आत व बाहेरूनही बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा यहोवाने आपल्या लोकांमध्ये वाढ करून त्यांना आशीर्वादित केले. उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये यातील ६ व्या अध्यायात इब्री बोलणाऱ्‍या व ग्रीक बोलणाऱ्‍या मतांतरित लोकांमध्ये झालेल्या एका मतभेदाविषयी वर्णन केले आहे. ही समस्या प्रेषितांनी सोडवली. परिणामस्वरूप आपण असे वाचतो: “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गांतीलहि पुष्कळ लोकांनी ह्‍या विश्‍वासाला मान्यता दिली.”—प्रेषितांची कृत्ये ६:७.

१६ नंतर, यहुदीयाचा राजा, हेरोद अग्रिप्पा आणि सोर व सिदोन येथील लोकांमध्ये राजकीय तणाव उत्पन्‍न झाला. त्या शहरांतील रहिवाशांनी शांतीकरता प्रस्ताव केला व अग्रिप्पाची स्तुती केली. याला प्रतिसाद म्हणून हेरोदने जाहीर भाषण केले. भाषण ऐकल्यावर लोकसमुदाय गजर करू लागला: “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” त्याच क्षणी यहोवाच्या दूताने हेरोद अग्रिप्पावर प्रहार केला व तो मेला कारण “त्याने देवाला गौरव दिले नाही.” (प्रेषितांची कृत्ये १२:२०-२३) मानवी शासकांवर भिस्त टाकणाऱ्‍यांना किती जोरदार फटका बसला असेल! (स्तोत्र १४६:३, ४) ख्रिस्ती मात्र यहोवाचे गौरव करत राहिले. यामुळे राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीतही “देवाच्या वचनाची वृद्धि व प्रसार होत गेला.”—प्रेषितांची कृत्ये १२:२४.

तेव्हा व आता

१७. पहिल्या शतकात वाढत्या संख्येने येणारे नवीन शिष्य कोणत्या कार्यात सामील झाले?

१७ होय, पहिल्या शतकातील जागतिक ख्रिस्ती मंडळीचे सर्व सदस्य यहोवा देवाचे आवेशी सक्रिय स्तुतीकर्ते होते. सर्व एकनिष्ठ ख्रिश्‍चनांनी सुवार्तेच्या प्रसारात सहभाग घेतला. काहींना प्रतिसाद देणारे लोक भेटले आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्याने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना शिकवल्या. (मत्तय २८:१९) परिणाम असा झाला की मंडळीत वाढ होत गेली आणि प्राचीन काळच्या राजा दाविदासोबत यहोवाची स्तुती करण्यासाठी अधिकाधिक व्यक्‍तींची भर पडली. या सर्वांनी पुढील प्रेरित शब्दांत आपला आवाज जोडला: “हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णीन. कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासूनच तू माझा जीव उद्धरिला आहे.”—स्तोत्र ८६:१२, १३.

१८. (अ) पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी आणि आजचे ख्रिस्ती जगत यात कोणता फरक दिसतो? (ब) पुढील लेखात कशाविषयी चर्चा करण्यात येईल?

१८ यासंदर्भात थियॉलॉजीच्या प्राध्यापिका ॲलसन ए. ट्राइट्‌स यांचे शब्द विचारप्रवर्तक आहेत. आधुनिक काळातील ख्रिस्ती धर्माची तुलना पहिल्या शतकातील ख्रिस्ती धर्माशी करताना त्या म्हणतात: “आजकाल चर्चेसमध्ये वाढ होते ती सहसा एकतर जैविक वाढ असते (स्थानिक चर्चमधील कुटुंबातली मुले आपल्या विश्‍वासाचा पत्कर करतात तेव्हा) किंवा स्थलांतरामुळे होणारी वाढ असते (जेव्हा एक नवीन व्यक्‍ती दुसऱ्‍या एखाद्या स्थानिक चर्चमधून आपले सदस्यत्व काढून विशिष्ट ठिकाणी स्थलांतर करते). प्रेषितांची कृत्ये यातील वाढ मात्र मतपरिवर्तनामुळे झालेली वाढ होती, कारण चर्चचे कार्य नुकतेच सुरू झाले होते.” याचा अर्थ येशूने सांगितले होते त्याप्रमाणे आता वाढ होण्याचे थांबले आहे का? मुळीच नाही. खरे ख्रिस्ती जाहीररित्या देवाची स्तुती करण्यात पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांइतकेच आवेशी आहेत. याविषयी पुढील लेखात पाहू.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?

• आपण कोणकोणत्या मार्गांनी देवाचे गौरव करतो?

• पौलाने स्तोत्र १९:४ या वचनाचा कशाप्रकारे खुलासा केला?

• विश्‍वास व प्रचार कार्याचा काय संबंध आहे?

• पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत कोणती उल्लेखनीय बाब होती?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८, ९ पानांवरील चित्र]

आकाश सर्वदा यहोवाच्या गौरवाला साक्ष देते

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Anglo-Australian Observatory, photograph by David Malin

[१० पानांवरील चित्रे]

प्रचार कार्य प्रार्थनेशी निगडीत आहे