व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युद्धाचा निराळा चेहरा

युद्धाचा निराळा चेहरा

युद्धाचा निराळा चेहरा

युद्ध हे नेहमीच निर्दयी असते. युद्धाने नेहमीच सैनिकांचे जीवन उद्‌ध्वस्त केले आहे आणि नागरिकांवर दुःख आणले आहे. परंतु अलीकडील वर्षांमध्ये युद्धाचा चेहरा बदलला आहे. कशाप्रकारे?

आजची युद्धे मुख्यतः मुलकी युद्धे असतात—एकाच देशातील विरोधी नागरिकांच्या गटांमधील युद्धे. आणि मुलकी युद्धे सहसा फार काळ चालू राहतात, त्यांची जनतेवर दहशत बसते आणि दोन देशांमधील युद्धांपेक्षा या मुलकी युद्धांमुळे राष्ट्रे पूर्णपणे नष्ट होतात. स्पॅनिश इतिहासकार हूल्यन कासानोव्हा यांच्या मते, “मुलकी युद्धे सैनिकांच्या क्रूर, रक्‍तरंजित हालचाली असतात ज्यांमुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो, लैंगिक अत्याचार होतात, लोकांना आपला देश सोडून पळावे लागते आणि काही टोकाच्या परिस्थितींमध्ये जातीसंहार देखील होतो.” शेजाऱ्‍याने दुसऱ्‍या शेजाऱ्‍याविरुद्ध केलेल्या अत्याचाराच्या जखमा भरून यायला कित्येक शतके लागतात.

शीत युद्ध संपल्यावर दोन राष्ट्रांमध्ये फार क्वचित युद्ध झाले आहे. “१९९०-२००० सालांदरम्यान नोंदलेल्या मोठ्या सशस्र युद्धांपैकी तीन वगळता बाकीची सर्व आंतरिक युद्धे होती,” असे वृत्त स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूट (एसआयपीआरआय) देते.

हे खरे की, आंतरिक युद्धे इतकी धोकादायक वाटत नाहीत आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्यांकडे लक्षही देत नाहीत परंतु या युद्धांमुळे होणारी यातना आणि विनाश तितकाच उद्‌ध्वस्त करणारा ठरतो. आंतरिक युद्धांमध्ये कोट्यवधी लोक ठार मारले गेले आहेत. गेल्या दोन दशकातच, केवळ तीन युद्धग्रस्त देशांमध्ये—अफगानिस्तान, काँगो आणि सुदानमध्ये—जवळजवळ ५० लाख लोक ठार झाले आहेत. बाल्कन राष्ट्रांमध्ये, जाती-जातींमधील तीव्र संघर्षांमुळे सुमारे २,५०,००० लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि कोलंबियात दीर्घ काळापासून गनिमी युद्ध चालले असल्यामुळे १,००,००० लोक बळी पडले आहेत.

मुलकी युद्धांचा सर्वात भयंकर परिणाम लहान मुलांवर होतो. निर्वासितांचे संयुक्‍त राष्ट्र उच्च आयुक्‍त यांच्यानुसार, गेल्या दशकात, २० लाखांहून अधिक मुले मुलकी संघर्षांमध्ये बळी पडली. आणखी ६० लाख जखमी झाले. अधिकाधिक मुलांना सैनिक बनवण्यात आले आहे. एक बाल सैनिक म्हणतो: “त्यांनी मला प्रशिक्षण दिलं. मला एक बंदूक दिली. मी ड्रग्ज घेतलेत. मी लोकांना ठार मारलं. पुष्कळ लोकांना मारलं. ते युद्ध होतं . . . मी फक्‍त सांगितल्यानुसार करत होतो. हे वाईट आहे मला ठाऊक होतं. मी माझ्या मनानुसार असं केलं नाही.”

मुलकी युद्धांनी ग्रस्त असलेल्या देशांमधील अनेक मुलांनी शांती कधीच अनुभवलेली नसते. त्यांच्या जगात शाळा जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, भाषा चालते ती फक्‍त बंदुकीची. १४ वर्षांची दुंजा म्हणते: “कितीतरी लोक मारले गेलेत . . . पक्ष्यांची मंजुळ गाणी ऐकायला मिळत नाही; ऐकायला मिळतो तो फक्‍त मेलेल्या आई, वडील, भाऊ किंवा बहीणीसाठी केलेला लहान मुलांचा आक्रोश.”

याची कारणे काय?

अशी क्रूर मुलकी युद्धे मुळात होतातच कशाला? वांशिक, जातीय द्वेषभाव, धार्मिक भेदभाव, अन्याय आणि राजकीय अस्थिरता ही सर्व महत्त्वाची कारणे आहेत. आणखी एक मूळ कारण आहे हाव—सत्तेची हाव, पैशाची हाव. राजकारणातील लोभी पुढारी द्वेषभाव निर्माण करतात आणि याची परिणती युद्धांमध्ये होते. एसआयपीआरआयने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, सशस्त्र संघर्षांमध्ये भाग घेणारे बहुतांश लोक “स्वार्थापायी” यात सामील होतात. तोच अहवाल पुढे म्हणतो: “लष्करी व राजकीय नेत्यांच्या मोठ्या प्रमाणातील हिऱ्‍यांच्या व्यापारापासून हातात बंदुका घेतलेल्या गावातील तरुणांच्या लुटमारीपर्यंत सगळे लोभाचेच प्रकार आहेत.”

या हत्येला आणखी बढावा मिळतो तो स्वस्त परंतु जीवघेण्या शस्त्रांच्या उपलब्धतेमुळे. तथाकथित लहान शस्त्रांमुळे दरवर्षी सुमारे ५,००,००० मृत्यू होतात—यांमध्ये मुख्यतः स्त्रिया व लहान मुलांचा समावेश असतो. एका आफ्रिकन देशात, AK-४७ बंदूक एका कोंबडीच्या किंमतीत खरेदी करता येते. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही ठिकाणी बंदुका कोंबड्यांप्रमाणेच मुबलक झाल्या आहेत. असा अंदाज केला जातो की, जगभरात, ५० कोटी छोटी हत्यारे आहेत—प्रत्येक १२ जिवंत व्यक्‍तींमागे एक अशा हिशेबाने.

भयंकर मुलकी युद्धे हे २१ व्या शतकाचे वैशिष्ट्य बनतील का? मुलकी युद्धांवर नियंत्रण करणे शक्य आहे का? लोक हत्या करण्याचे कधी थांबवतील का? या प्रश्‍नांची उत्तरे पुढील लेखात दिली आहेत.

[४ पानांवरील चौकट]

मुलकी युद्धांची भारी किंमत

स्वस्त शस्त्रांच्या परंतु क्रूर मुलकी युद्धांमध्ये, ठार मारले जाणारे ९० टक्के लोक लढणारे नसून नागरिक असतात. सशस्त्र संघर्षांचा मुलांवर होणारा परिणाम यावर युनायटेड नेशन्स सेक्रेटरी-जनरलची तज्ज्ञा ग्रासा माशेल म्हणते, “हे स्पष्ट होत आहे की, अधिककरून लहान मुलेच सशस्त्र संघर्षांमध्ये अपघाताने पडणारे बळी नव्हे तर मुख्य लक्ष्य असतात.”

बलात्कार, तर एक मुद्दामहून वापरले जाणारे तंत्र बनले आहे. काही युद्ध-ग्रस्त भागांमध्ये तर, बंडखोरांनी एखाद्या गावावर धाड घातली तर तेथील जवळजवळ सर्व वयात आलेल्या मुलींवर ते बलात्कार करतात. लोकांमध्ये दहशत पसरवणे किंवा विरोधी वांशिक गटाच्या लोकांमधील कौटुंबिक बंधने नष्ट करणे हे त्यांचे ध्येय असते.

युद्ध सुरू झाले की, दुष्काळ आणि रोगराई मागोमाग येतातच. मुलकी युद्ध म्हटले की, पीकांची पेरणी आणि कापणी मंदावते, वैद्यकीय सेवा चालत नाहीत आणि आंतरराष्ट्रीय मदत गरजवंतांपर्यंत पोचत नाही. एका आफ्रिकन देशातील मुलकी युद्धाच्या अभ्यासातून असे निष्पन्‍न झाले की, २० टक्के लोक रोगांमुळे मरण पावले आणि ७८ टक्के उपासमारीमुळे. प्रत्यक्ष लढाईत फक्‍त २ टक्के ठार मारले गेले.

सरासरी, प्रत्येक २२ मिनिटांना सुरूंगावर पाय पडल्याने कोणाचे हात-पाय निकामी होतात तर कोणाचा जीव जातो. अंदाजे सहा ते सात कोटी सुरूंग ६० हून अधिक देशांमध्ये पेरलेले आहेत.

लोकांना आपली घरे सोडून पळून जाण्यास भाग पडते. संपूर्ण जगभरात, सध्या पाच कोटी निर्वासित आणि बेघर व्यक्‍ती आहेत—त्यांच्यापैकी निम्मे जण लहान मुले आहेत.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Photo by Chris Hondros/Getty Images