व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युद्धाची समाप्ती

युद्धाची समाप्ती

युद्धाची समाप्ती

‘आम्ही फक्‍त १२ वर्षांचे आहोत. राजकारण आणि युद्धावर आम्ही प्रभाव पाडू शकणार नाही, पण आम्हाला जगायचंय! आम्ही शांतीची वाट पाहतोय. तोपर्यंत आम्ही जिवंत राहू का?’—पाचवीच्या वर्गातील शाळकरी मुले.

‘आम्हाला शाळेत जायचंय, आमच्या मित्रांना आणि कुटुंबाला भेटायला जायचंय पण पळवून नेण्याची भीती नसली पाहिजे. सरकारनं आमचं ऐकलं तर बरं होईल. आम्हाला एक चांगलं जीवन हवंय. आम्हाला शांती हवीय.’—अल्हाजी, वय १४.

हे मर्मभेदक शब्द, मुलकी युद्धाचा अनेक वर्षांपासून परिणाम भोगणाऱ्‍या तरुणांच्या मनातली आशा आहे. त्यांना केवळ सामान्य जीवन जगायचे आहे. परंतु, त्यांची आशा वास्तविकतेत उतरवणे हे सोपे काम नाही. युद्ध नसलेले जग पाहायला आपण जिवंत राहू का?

अलीकडील वर्षांमध्ये, शांती करारावर सह्‍या करण्यास विरोधी पक्षांवर दबाव आणून काही मुलकी युद्धे संपुष्टात आणण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले आहेत. काही देशांनी हे करार लागू करण्यासाठी शांती सैन्य पाठवले आहे. परंतु, फार कमी राष्ट्रांजवळ दूरवरच्या देशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पैसा किंवा इच्छा असते कारण कित्येक वर्षांपासून तीव्र झालेला द्वेषभाव आणि शंकेखोर वृत्ती यांमुळे विरोधी गटांमधील कोणताही करार उपयोगी ठरत नाही. आणि सहसा असे होते की, शांती करारावर सह्‍या करून दोन-तीन आठवडेच झालेले असतात की, पुन्हा संघर्ष सुरू होतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूट दाखवते त्याप्रमाणे, “लढणाऱ्‍यांकडे लढण्याची इच्छा व कुवत आहे तोपर्यंत शांती प्रस्थापित करणे फार कठीण आहे.”

पृथ्वीच्या विविध भागांमध्ये चालणारी ही त्रासदायक युद्धे ख्रिश्‍चनांना बायबलमधील एका भविष्यवाणीची आठवण करून देतात. प्रकटीकरणाच्या पुस्तकात इतिहासाच्या एका कठीण काळाचे वर्णन केले आहे ज्यात एक लाक्षणिक घोडेस्वार “पृथ्वीवरील शांतता हरण” करतो. (प्रकटीकरण ६:४) कधीही न संपणाऱ्‍या युद्धाचे हे चित्र एका संयुक्‍त चिन्हाचा भाग आहे ज्यावरून आपण सध्या ‘शेवटला काळ’ असे बायबलमध्ये म्हटलेल्या समयात जगत आहोत असे दाखवले जाते. * (२ तीमथ्य ३:१) परंतु देवाचे वचन आपल्याला अशी शाश्‍वती देते की, हा शेवटला काळ शांतीची नांदी असेल.

स्तोत्र ४६:९ येथे बायबल म्हणते की, खरी शांती यायची असेल तर युद्धाचा अंत व्हावा लागेल आणि हे केवळ पृथ्वीच्या एका भागात नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवर व्हावे लागेल. शिवाय, याच स्तोत्रात बायबल काळातील हत्यारे—धनुष्य, भाला आणि रथ—नष्ट केल्याचा उल्लेख आहे. मानवजातीला शांती हवी असेल तर आज उपलब्ध असलेली सगळी हत्यारे देखील अशाचप्रकारे नष्ट करावी लागतील.

परंतु, युद्धे, बंदुकाच्या गोळ्यांमुळे आणि बंदुकांमुळे नव्हे तर द्वेष आणि लोभामुळे होतात. अभिलाषा किंवा लोभ हे युद्धाचे मूलभूत कारण आहे आणि सहसा द्वेषामुळे हिंसा घडते. या विनाशकारी भावना काढून टाकण्यासाठी लोकांना आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. त्यांना शांतीचे मार्ग शिकवले जाण्याची गरज आहे. म्हणूनच, प्राचीन संदेष्टा यशया ही वास्तविकता पुढे आणतो की, लोक “युद्धकला शिकणार नाहीत” तेव्हा युद्ध संपुष्टात येईल.—यशया २:४.

तथापि, सध्याच्या जगात प्रौढांना आणि मुलांना शांतीचे महत्त्व नव्हे तर युद्ध किती गौरवशाली आहे हे शिकवले जाते. दुःखाची गोष्ट म्हणजे लहान मुलांनाही इतरांना कसे ठार मारायचे ते शिकवले जाते.

ते ठार मारायला शिकले

अल्हाजी १४ वर्षांचा झाला तेव्हा त्याला सैन्यातून काढण्यात आले. त्याला बंडखोर सैन्याने धरून AK-४७ बंदूक वापरायला शिकवली तेव्हा तो फक्‍त दहा वर्षांचा होता. सैन्यात जबरदस्तीने भरती केल्यावर अन्‍न मिळवण्यासाठी तो धाड घालायचा आणि घरे जाळून टाकायचा. त्याने लोकांना ठार मारले आणि काहींना जखमी देखील केले. आज, अल्हाजीला युद्धाच्या आठवणी विसरून सामान्य नागरी जीवनात मिसळून जायला कठीण जाते. आणखी एक बाल सैनिक अब्राहाम, याने देखील लोकांना ठार मारण्याचे प्रशिक्षण घेतले आणि तो आपले हत्यार द्यायला तयार नव्हता. तो म्हणाला: “त्यांनी मला बंदुकीशिवाय जायला सांगितले तर मी काय करीन मला ठाऊक नाही, मी माझं पोट कसं भरीन.”

आपल्या ग्रहावर चाललेल्या अंतहीन मुलकी युद्धांत अजूनही ३,००,००० लाखांहून अधिक बाल सैनिक—मुले व मुली—लढत आहेत आणि मरत आहेत. बंडखोर टोळीच्या एका नेत्याने म्हटले: “त्यांना जे सांगितले जाते त्यानुसार ते करतात; त्यांना आपल्या बायकोकडे किंवा कुटुंबाकडे जाण्याची आस नसते; आणि त्यांच्यात कसलीही भीती नसते.” या मुलांना एक उत्तम जीवन हवे आहे आणि त्यांना ते मिळाले पाहिजे.

विकसित देशांमध्ये, बाल सैनिकांची धक्केदायक परिस्थिती काल्पनिक वाटेल. परंतु, अनेक पाश्‍चात्त्य मुले देखील आपल्याच आरामदायी घरात लढाई करायला शिकत आहेत. कशाप्रकारे?

आग्नेय स्पेनमधील होसेचे उदाहरण घ्या. तो किशोरवयात होता आणि त्याला मार्शल आट्‌र्स शिकण्यात फार आनंद वाटत होता. त्याच्या वडिलांनी नाताळाकरता त्याला सामुराई तलवार भेट म्हणून दिली आणि त्यावर त्याचा फार जीव होता. त्याला व्हिडिओ गेम्स देखील आवडायच्या; त्यातल्या त्यात हिंसक प्रकारातील गेम्स जास्त आवडायच्या. एप्रिल १, २००० रोजी, त्याने टीव्हीवरील आपल्या आवडत्या हिरोसारखी आक्रमक वृत्ती प्रत्यक्षात दाखवली. त्यात त्याने आपले वडील, आई आणि बहीण या तिघांनाही त्याच्या वडिलांनीच दिलेल्या तलवारीने खल्लास केले. “मला जगात एकटं राहायचं होतं; माझ्या आईवडिलांनी मला शोधत फिरावं हे मला नको होतं,” असे त्याने पोलिसांना सांगितले.

हिंसक मनोरंजनाच्या परिणामाविषयी लेखक आणि लष्करी अधिकारी डेव्ह ग्रोसमन म्हणतात: “आपण भावनाशून्यतेच्या अशा टोकाला पोहंचत आहोत जेथे इतरांना दुःख आणि यातना दिल्याने आपले मनोरंजन होते: त्याचा तिटकारा वाटण्याऐवजी आपण ॲक्शनमध्ये सामील आहोत यातून एकप्रकारचे सुख लाभते. आपण ठार मारायला शिकत आहोत आणि आपल्याला ते आवडू लागले आहे.”

अल्हाजी आणि होसे हे दोघेही ठार मारायला शिकले होते. त्यांना खूनी व्हायचे नव्हते पण त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाने त्यांचे विचार विकृत झाले. असे प्रशिक्षण—मग ते प्रौढांकरता असो नाहीतर मुलांकरता—हिंसा आणि युद्धाचे बीज पेरते.

युद्धाऐवजी शांती शिकणे

लोक एकीकडे ठार मारायला शिकत असताना कायमची शांती कधीही प्रस्थापित केली जाऊ शकणार नाही. अनेक शतकांआधी संदेष्टा यशयाने लिहिले: “तू [देवाच्या] आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, . . . झाली असती.” (यशया ४८:१७, १८) लोकांना देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान प्राप्त होते आणि देवाचे नियम त्यांना प्रिय वाटू लागतात तेव्हा हिंसा आणि युद्धाचा त्यांना तिटकारा वाटू लागतो. आता देखील पालकांनी, आपली मुले हिंसात्मक खेळ खेळत नाहीत याकडे लक्ष द्यावे. प्रौढ देखील द्वेषभाव आणि लोभ यांवर मात करायला शिकू शकतात. यहोवाच्या साक्षीदारांना अनेकदा याचा प्रत्यय आला आहे की, देवाच्या वचनात लोकांना बदलण्याची ताकद आहे.—इब्री लोकांस ४:१२.

ओर्टनस्योलाच पाहा. तो तरुण होता तेव्हा त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला सैन्यात भरती व्हावे लागले. “आमच्यात इतर लोकांना ठार मारण्याची इच्छा निर्माण करणे व ठार मारण्याची भीती घालवून देणे” हा लष्करी प्रशिक्षणाचा हेतू होता असे तो म्हणतो. आफ्रिकेत दीर्घ काळापासून चाललेल्या एका मुलकी युद्धात तो लढला. तो म्हणतो, “या युद्धाचा माझ्या व्यक्‍तिमत्त्वावर परिणाम झाला. मी जे काही केले ते आजही मला जसेच्या तसे आठवते. माझ्याकडून जे करवून घेण्यात आले त्याचे मला फार वाईट वाटते.”

एका सह-सैनिकाने ओर्टनस्योला बायबलविषयी सांगितले तेव्हा त्याचे बोलणे त्याच्या अंतःकरणाला भिडले. स्तोत्र ४६:९ मध्ये देवाने सर्व प्रकारच्या युद्धांचा शेवट करण्याचे वचन दिले आहे हे पाहून तो प्रभावित झाला. बायबलचा त्याने जितका अधिक अभ्यास केला तितकीच त्याची लढण्याची इच्छा नाहीशी होऊ लागली. काही काळातच, त्याला व त्याच्या दोन साथीदारांना सैन्यातून काढून टाकण्यात आले आणि त्यांनी यहोवा देवाला आपले जीवन समर्पित केले. ओर्टनस्यो म्हणतो, “बायबलच्या सत्याने मला शत्रूंवरही प्रेम करायला मदत केली. मला कळाले की, युद्धात लढून मी खरे तर यहोवाविरुद्ध पाप करत होतो कारण आपल्या शेजाऱ्‍याला ठार मारू नको असे तो म्हणतो. हे प्रेम दाखवण्याकरता मला माझी विचारसरणी बदलावी लागली आणि लोक माझे शत्रू आहेत हा दृष्टिकोन बदलावा लागला.”

खरोखर घडलेल्या या अनुभवांतून बायबलच्या शिक्षणाने शांतीच्या वातावरणाला बढावा मिळतो हे दिसते. यात काही आश्‍चर्य नाही. संदेष्टा यशयाने म्हटले की, ईश्‍वरी शिक्षण आणि शांती यांमध्ये एक थेट संबंध आहे. त्याने भाकीत केले: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” (तिरपे वळण आमचे.) (यशया ५४:१३) याच संदेष्ट्याने भविष्यातील एका काळाविषयी सांगितले जेव्हा सर्व राष्ट्रांतील लोक यहोवा देवाच्या शुद्ध उपासनेकडे त्याच्या मार्गांविषयी शिकायला लोटतील. याचा काय परिणाम होईल? “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (तिरपे वळण आमचे.)—यशया २:२-४.

त्या भविष्यवाणीच्या एकवाक्यतेत, यहोवाचे साक्षीदार एका जगव्याप्त शैक्षणिक कार्यात गोवलेले आहेत ज्यामुळे लाखो लोकांना, मानवी युद्धांचे मूळ कारण द्वेष, यावर मात करायला मदत मिळाली आहे.

जागतिक शांतीची हमी

शिक्षण देण्याव्यतिरिक्‍त देवाने एक सरकार, किंवा “राज्य” प्रस्थापित केले आहे जे जागतिक शांती निर्माण करण्यास समर्थ आहे. देवाचा निवडलेला राजा, येशू ख्रिस्त याचे बायबलमध्ये “शांतीचा राजकुमार” असे वर्णन करण्यात आले आहे. पुढे ते आपल्याला हमी देते की, “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”—यशया ९:६, ७.

ख्रिस्ताचे शासन सर्व प्रकारच्या युद्धाला समाप्त करण्यात यशस्वी ठरेल याची काय खात्री आहे? संदेष्टा यशया म्हणतो: “सेनाधीश परमेश्‍वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.” (यशया ९:७) कायमची शांती टिकवण्याची देवाला इच्छा आहे आणि ताकद देखील आहे. या अभिवचनावर येशूला पूर्ण भरवसा आहे. म्हणूनच त्याने आपल्या अनुयायांना देवाचे राज्य यावे आणि या पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे अशी प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९, १०) ती प्रामाणिक विनंती सरतेशेवटी उत्तरली जाईल तेव्हा युद्धाचे सावट या पृथ्वीवर पुन्हा कधी राहणार नाही.

[तळटीप]

^ परि. 6 आपण शेवटल्या काळात जगत आहोत याचा पुरावा पाहण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील अध्याय ११ पाहा.

[७ पानांवरील चित्र]

बायबल शिक्षणाने खऱ्‍या शांतीला बढावा मिळतो