व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—२

उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—२

यहोवाचे वचन सजीव आहे

उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—२

पहिला मनुष्य आदाम याच्या निर्मितीपासून याकोबाचा पुत्र योसेफ याच्या मृत्यूपर्यंत उत्पत्तीच्या पुस्तकात मानवी इतिहासाच्या २,३६९ वर्षांचा कालावधी सामावलेला आहे. निर्मितीपासून बाबेलच्या बुरूजापर्यंतचा अहवाल देणाऱ्‍या पहिल्या १० अध्यायांची त्याचप्रमाणे ११ व्या अध्यायाच्या ९ वचनांची चर्चा या नियतकालिकाच्या आधीच्या अंकात करण्यात आली होती. * या लेखात, अब्राहाम, इसहाक, याकोब आणि योसेफ यांच्यासोबत देवाच्या व्यवहाराविषयी उत्पत्तीच्या उर्वरित भागातील ठळक मुद्दे देण्यात आले आहेत.

अब्राहाम देवाचा मित्र बनतो

(उत्पत्ति ११:१०–२३:२०)

जलप्रलयानंतर सुमारे ३५० वर्षांनंतर, देवाला अतिशय खास वाटणारा एक पुरुष नोहाचा पुत्र शेम याच्या वंशावळीत जन्माला येतो. त्याचे नाव आहे अब्राम जे नंतर बदलून अब्राहाम केले जाते. देवाच्या आज्ञेप्रमाणे, अब्राम खास्द्यांचे उर शहर सोडतो आणि यहोवाने त्याला व त्याच्या वंशजांना जो देश देण्याचे वचन दिले होते तेथे तो तंबूत निवास करू लागतो. त्याचा विश्‍वास आणि आज्ञाधारकता यांमुळे अब्राहामाला “देवाचा मित्र” म्हणण्यात आले.—याकोब २:२३.

सदोम आणि जवळपासच्या शहरांतील दुष्ट लोकांविरुद्ध यहोवा कारवाई करतो पण लोट आणि त्याच्या मुलींना बचावण्यात येते. अब्राहामाचा पुत्र इसहाक याच्या जन्माने देवाचे एक वचन पूर्ण केले जाते. अनेक वर्षांनंतर, जेव्हा यहोवा अब्राहामला आपल्या पुत्राचे बलिदान करायची सूचना देतो तेव्हा त्याच्या विश्‍वासाची पारख केली जाते. अब्राहाम ही आज्ञा मानायला तयार होतो पण एक देवदूत त्याला रोखतो. अब्राहाम हा विश्‍वासू मनुष्य होता यात कसलीच शंका नव्हती; त्याच्या संततीकरवी सर्व राष्ट्रे स्वतःला आशीर्वादित करतील अशी हमी त्याला दिली जाते. त्याची प्रिय पत्नी, सारा हिचा मृत्यू झाल्यावर अब्राहामाला अतीव दुःख होते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१२:१-३—अब्राहामासोबत केलेला करार केव्हापासून अंमलात आला आणि किती काळापर्यंत? “[अब्रामा]द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील,” हा यहोवाने अब्रामासोबत केलेला करार अब्रामाने कनानला जाताना इफ्रात नदी पार केली तेव्हापासून अंमलात आला. हे सा.यु.पू. १९४३ च्या निसान १४ रोजी अर्थात ईजिप्तमधून इस्राएलची सुटका होण्याच्या ४३० वर्षांआधी झाले असावे. (निर्गम १२:२, ६, ७, ४०, ४१) अब्राहामासोबत केलेला करार हा “पिढ्यानपिढ्या” केलेला करार आहे. पृथ्वीवरील सर्व कुळांना आशीर्वाद मिळेपर्यंत आणि देवाच्या सर्व शत्रुंचा नाश होईपर्यंत तो जारी राहील.—उत्पत्ति १७:७; १ करिंथकर १५:२३-२६.

१५:१३—अब्रामाच्या संतानाला ४०० वर्षे छळले जाईल हे भाकीत केव्हा पूर्ण झाले? छळाच्या या कालावधीची सुरवात सा.यु.पू. १९१३ मध्ये झाली जेव्हा अब्राहामाचा पुत्र इसहाक ५ वर्षांचा असताना त्याचे दूध तोडले होते आणि त्याचा १९ वर्षांचा मोठा सावत्र भाऊ इश्‍माएल त्याच्यावर ‘खिदळत’ होता. (उत्पत्ति २१:८-१४; गलतीकर ४:२९) याचा शेवट, सा.यु.पू. १५१३ मध्ये ईजिप्शियन लोकांच्या बंधनातून इस्राएलची मुक्‍ती झाली तेव्हा झाला.

१६:२—सारायने आपली दासी हागार हिला पत्नी म्हणून अब्रामाला देणे योग्य होते का? सारायने जे केले ते त्या वेळेच्या रीतीनुसार होते—एक वांझ पत्नी वंश प्राप्त करण्याकरता आपल्या पतीला उपपत्नी देण्यास बाध्य होती. बहुपतीकत्व अथवा बहुपत्नीकत्वाची प्रथा काईनाच्या वंशावळीत प्रथम सुरू झाली. नंतर ही एक रीत बनली आणि यहोवाच्या काही उपासकांनी देखील ती रीत अनुसरली. (उत्पत्ति ४:१७-१९; १६:१-३; २९:२१-२८) परंतु, यहोवाने एकच पती अथवा पत्नी असण्याविषयी आपला दर्जा कधीही बदलला नाही. (उत्पत्ति २:२१, २२) ‘फलद्रुप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका’ ही आज्ञा ज्यांना दुसऱ्‍यांदा देण्यात आली होती त्या नोहाला व त्याच्या पुत्रांना एक-एकच पत्नी होती असे स्पष्ट होते. (उत्पत्ति ७:७; ९:१; २ पेत्र २:५) एकच पती अथवा पत्नी असण्याच्या या आदर्शाला येशू ख्रिस्तानेही दुजोरा दिला.—मत्तय १९:४-८; १ तीमथ्य ३:२, १२.

१९:८—लोटने आपल्या मुली सदोमच्या लोकांना देऊ केल्या हे चुकीचे नव्हते काय? पौर्वात्य देशांच्या नीतितत्त्वांनुसार, आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचे संरक्षण करणे हे यजमानाचे कर्तव्य होते; गरज पडल्यास मरेपर्यंत त्यांचे रक्षण करण्याची रीत होती. लोट हे करायला तयार होता. तो धीटपणे बाहेर जमावात गेला, त्याने आपल्यामागे दार बंद केले आणि एकट्याने त्यांचा सामना केला. आपल्या मुली लोटने देऊ केल्या तेव्हा त्याने हे जाणले होते की, त्याच्याकडे आलेले पाहुणे देवाचे संदेष्टे होते आणि त्याने कदाचित असा तर्क केला असावा की, ज्याप्रमाणे देवाने त्याची काकी सारा हिला ईजिप्तमध्ये वाचवले होते त्याचप्रमाणे देव आपल्या मुलींनाही वाचवू शकेल. (उत्पत्ति १२:१७-२०) आणि असेच घडले; लोट आणि त्याच्या मुली सुरक्षित राहिल्या.

१९:३०-३८—लोट दारू पिऊन तर्र झाला आणि आपल्या दोन मुलींच्या पुत्रांचा पिता बनला या गोष्टींना यहोवाने माफ केले का? यहोवा गोत्रगमन किंवा दारूबाजी या दोन्ही गोष्टींना माफ करत नाही. (लेवीय १८:६, ७, २९; १ करिंथकर ६:९, १०) खरे पाहता, लोटला सदोमवासीयांच्या ‘स्वैराचाराच्या कृत्यांबद्दल’ खेद वाटत होता. (२ पेत्र २:६-८) लोटच्या मुलींनी त्याला दारू पाजवली यावरूनच स्पष्ट होते की, शुद्धीवर असताना तो त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास तयार नव्हता. परंतु, ते त्या देशात परकीय असल्यामुळे, लोटच्या कुळाचा संपूर्ण नाश होऊ नये म्हणून हा एकच मार्ग होता असे त्याच्या मुलींना वाटले. बायबलमध्ये हा अहवाल, मवाबी लोकांचा (मवाबद्वारे) आणि अम्मोनी लोकांचा (बेनअम्मीद्वारे) अब्राहामाचे वंशज, इस्राएली यांच्याशी संबंध दाखवण्यासाठी दिला आहे.

आपल्याकरता धडे:

१३:८, ९. मतभेद सोडवण्याच्या बाबतीत अब्राहामाने केवढे उत्तम उदाहरण मांडले! आपण आर्थिक लाभ, स्वतःची आवड किंवा अभिमान यांच्याखातर शांतीपूर्ण संबंध कधीही त्यागू नयेत.

१५:५, ६. अब्राहाम वृद्ध होत होता आणि त्याला अजून पुत्र झाला नव्हता तेव्हा तो देवाशी याविषयी बोलला. मग यहोवाने त्याला आश्‍वासन दिले. परिणाम? अब्राहामाने ‘यहोवावर विश्‍वास ठेवला.’ आपण प्रार्थनेद्वारे यहोवाजवळ आपले मन मोकळे केले, बायबलमधील त्याची आश्‍वासने स्वीकारली आणि त्याच्या आज्ञा मानल्या तर आपला विश्‍वास मजबूत होईल.

१५:१६. यहोवाने अम्मोरी (किंवा, कनानी) लोकांवर चार पिढ्यांपर्यंत न्याय रोखून धरला. का? कारण तो सहनशील देव आहे. सुधारणेची आशा पूर्णपणे नाहीशी होईपर्यंत त्याने वाट पाहिली. यहोवाप्रमाणे, आपणही सहनशील असले पाहिजे.

१८:२३-३३. यहोवा सरसकट लोकांचा नाश करत नाही. तो नीतिमानांचा बचाव करतो.

१९:१६. लोट “दिरंगाई करू लागला” आणि देवदूतांना त्याला व त्याच्या कुटुंबाला सदोम शहरातून अक्षरशः ओढून बाहेर आणावे लागले. दुष्ट जगाच्या अंताची आपण वाट पाहत असता आपण निकडीची भावना गमावू नये यात शहाणपण आहे.

१९:२६. जगामध्ये मागे सोडलेल्या गोष्टींकडे परत आकर्षित होणे किंवा त्यांच्याबद्दल ओढ निर्माण करणे किती मूर्खपणाचे ठरेल!

याकोबाला १२ पुत्र होतात

(उत्पत्ति २४:१–३६:४३)

अब्राहाम इसहाकाचे लग्न, यहोवावर विश्‍वास असलेल्या स्त्रीशी अर्थात रिबकाशी ठरवतो. ती एसाव आणि याकोब या जुळ्यांना जन्म देते. एसाव आपल्या जन्मसिद्ध हक्काला तुच्छ लेखतो आणि तो आपला हक्क याकोबाला विकतो ज्याला नंतर त्याच्या पित्याकडून आशीर्वाद प्राप्त होतो. याकोब पदन-अरामला पळून जातो जेथे तो लेआ आणि राहेल यांच्याशी लग्न करतो आणि त्यांच्या पित्याच्या कळपांची राखण सुमारे २० वर्षांसाठी करतो आणि मग आपल्या कुटुंबाला घेऊन तेथून निघून जातो. लेआ, राहेल आणि त्यांच्या दोन दासींकरवी याकोबाला १२ पुत्र आणि पुत्रीही होत्या. याकोब एका देवदूताशी झुंज करतो आणि त्याला आशीर्वाद मिळतो, आणि त्याचे नाव बदलून इस्राएल ठेवले जाते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२८:१२, १३—याकोबाने ‘एका शिडीसंबंधी’ जे स्वप्न पाहिले त्याचे काय महत्त्व होते? दगडी पायऱ्‍यांसारखी दिसलेली ही “शिडी”, पृथ्वी आणि स्वर्ग यांत संवाद चालत असल्याचे दर्शवते. देवाचे देवदूत त्यावरून चढतउतरत होते यावरून हे दाखवले गेले की, यहोवामध्ये आणि त्याची मर्जी असलेल्या मानवांमध्ये देवदूत कोणत्या न कोणत्या महत्त्वाच्या मार्गाने सेवा करतात.—योहान १:५१.

३०:१४, १५—राहेलने पुत्रदात्रीच्या फळांच्या बदल्यात आपल्या नवऱ्‍यापाशी निजण्याची संधी का जाऊ दिली? प्राचीन काळी, पुत्रदात्रीच्या झाडाचे फळ गुंगीकारी औषध म्हणून आणि वेदना घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरले जायचे. हे फळ कामोत्तेजना वाढवण्यासाठी, प्रसवण्याची क्षमता वाढवण्यासाठी किंवा गर्भधारणेत मदत होण्यासाठीही वापरले जायचे. (गीतरत्न ७:१३) राहेलने पुत्रदात्रीच्या फळांच्या बदल्यात आपल्या नवऱ्‍यापाशी निजण्याची संधी का जाऊ दिली याविषयी बायबल काहीही सांगत नसले तरी या फळांनी तिला गर्भधारणा होईल आणि वांझपणाचा कलंक एकदाचा मिटवला जाईल असे तिला कदाचित वाटले असावे. तथापि, ही घटना, यहोवाने “तिची कूस वाहती” करण्याच्या काही वर्षांआधी घडली होती.—उत्पत्ति ३०:२२-२४.

आपल्याकरता धडे:

२५:२३. जन्माला न आलेल्या बालकातील आनुवांशिक रचना ओळखण्याची आणि आपल्या पूर्वज्ञानाचा वापर करून आपल्या उद्देशांकरता एखाद्याला आधीच निवडण्याची क्षमता यहोवाला आहे. तरीपण, तो लोकांचे नशीब आधीच ठरवत नाही.—होशेय १२:३; रोमकर ९:१०-१२.

२५:३२, ३३; ३२:२४-२९. याकोबाला जन्मसिद्ध हक्क मिळवण्याची चिंता लागून होती आणि त्याने आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एका देवदूताशी संपूर्ण रात्र झुंज केली यावरून स्पष्ट होते की, त्याला पवित्र गोष्टींबद्दल खरोखर कदर होती. यहोवाने आपल्याला अनेक पवित्र गोष्टी बहाल केल्या आहेत जसे की, त्याच्यासोबत आणि त्याच्या संघटनेसोबत आपला नातेसंबंध, खंडणी, बायबल आणि आपली राज्याची आशा. या गोष्टींबद्दल कदर दाखवण्यात आपण याकोबासारखे होऊ या.

३४:१, ३०. दीनाने यहोवाशी प्रेम न करणाऱ्‍या लोकांसोबत मैत्री केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येने याकोबाला “संकटात घातले.” आपण शहाणपणाने आपले साथीदार निवडावेत.

यहोवा ईजिप्तमध्ये योसेफाला आशीर्वाद देतो

(उत्पत्ति ३७:१–५०:२६)

ईर्ष्येमुळे याकोबाचे पुत्र, आपला भाऊ योसेफ याला दास म्हणून विकतात. ईजिप्तमध्ये, योसेफ विश्‍वासूपणे आणि धैर्याने देवाच्या नैतिक दर्जांनुसार राहतो म्हणून त्याला तुरुंगात टाकले जाते. कालांतराने, त्याला फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी तुरुंगातून बाहेर आणले जाते; या स्वप्नात सुकाळाची सात वर्षे असतील आणि नंतर दुष्काळाची सात वर्षे येतील असे भाकीत करण्यात आले होते. मग योसेफाला ईजिप्तमध्ये धान्याचा मुख्याधिकारी नेमले जाते. दुष्काळामुळे त्याचे भाऊ अन्‍नाच्या शोधात ईजिप्तला येतात. त्यांच्या कुटुंबाचे पुनर्मिलन होते आणि गोशेनच्या सुपीक प्रांतात ते वसू लागतात. याकोब मरण्याआधी आपल्या पुत्रांना आशीर्वाद देतो आणि एक भविष्यवाणी करतो ज्यात अनेक शतकांनंतर मिळणाऱ्‍या महान आशीर्वादांची पक्की आशा दिली जाते. याकोबाचे अवशेष कनानला नेऊन पुरण्यात येतात. योसेफ ११० वर्षांचा होऊन मरतो तेव्हा वाग्दत्त देशात नंतर नेण्याकरता त्याच्या देहाला मसाले लावून सुरक्षित ठेवले जाते.—निर्गम १३:१९.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

४३:३२—इब्री लोकांसोबत भोजन करणे ही ईजिप्शियन लोकांकरता किळसवाणी गोष्ट का होती? याचे प्रमुख कारण धार्मिक भेदभाव किंवा जातीय गर्व असावा. ईजिप्शियन लोकांना मेंढपाळही किळसवाणे वाटायचे. (उत्पत्ति ४६:३४) का? कदाचित ईजिप्शियन लोकांमध्ये मेंढपाळांची जात सर्वात कनिष्ठ असावी. किंवा, शेतजमीन फार मर्यादित असल्यामुळे कळपांसाठी कुरणांचा शोध करणाऱ्‍यांचा ईजिप्शियन लोकांना राग येत असावा.

४४:५—योसेफाने प्याल्याद्वारे शकुन पाहिला का? चांदीचा प्याला आणि त्याविषयी जे सांगण्यात आले ते केवळ एक डाव होता. योसेफ हा यहोवाचा विश्‍वासू उपासक होता. ज्याप्रमाणे बन्यामिनाने प्याला चोरला नव्हता त्याचप्रमाणे योसेफानेही त्या प्याल्याद्वारे शकुन पाहिला नाही.

४९:१०—“राजवेत्र” आणि “राजदंड” यांचा काय अर्थ होतो? राजवेत्र हा शासकाजवळ असणारा दंडुका असतो आणि तो राजेशाही अधिकाराला सूचित करतो. राजदंड ही एक लांब काठी असते जी हुकूम देण्याच्या त्याच्या अधिकाराला सूचित करते. याकोबाने या गोष्टींचा संदर्भ दिला यावरून सूचित होते की, शिलो येईपर्यंत यहूदाच्या गोत्राजवळ भारी अधिकार आणि शक्‍ती असणार होती. यहूदाचा हा वंशज येशू ख्रिस्त होता ज्याला यहोवाने स्वर्गीय सत्ताधिकार दिला आहे. ख्रिस्ताजवळ राजेशाही अधिकार व आज्ञा देण्याची शक्‍ती आहे.—स्तोत्र २:८, ९; यशया ५५:४; दानीएल ७:१३, १४.

आपल्याकरता धडे:

३८:२६. यहूदाने आपली विधवा सून, तामार हिच्याशी चुकीचा व्यवहार केला. परंतु, तिच्या गरोदरपणाची जबाबदारी त्याची आहे ही गोष्ट त्याच्यासमोर आणण्यात आली तेव्हा त्याने नम्रतेने आपली चूक कबूल केली. आपण देखील आपल्या चुका लगेच मानल्या पाहिजेत.

३९:९. योसेफाने पोटीफरच्या पत्नीला दिलेल्या उत्तरावरून दिसते की, त्याचे विचार नैतिकतेबाबत देवाच्या विचारांशी जुळत होते आणि त्याचा विवेक ईश्‍वरी तत्त्वांनी मार्गदर्शित होता. सत्याचे आपले अचूक ज्ञान वाढत जाते तसे आपणही असेच होण्याचा प्रयत्न करू नये का?

४१:१४-१६, ३९, ४०. यहोवाचे भय ज्यांना आहे त्यांच्या परिस्थितीत तो बदल आणू शकतो. आपत्तीच्या वेळी, यहोवावर भरवसा ठेवून त्याला विश्‍वासू राहण्यातच शहाणपण आहे.

त्यांचा विश्‍वास चिरकालिक होता

अब्राहाम, इसहाक, याकोब आणि योसेफ हे खरोखर देव-भीरू विश्‍वासू पुरुष होते. उत्पत्तीच्या पुस्तकातील त्यांच्या जीवनाचा अहवाल खरोखर विश्‍वास मजबूत करणारा आहे आणि तो आपल्याला अनेक मौल्यवान धडे शिकवतो.

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेकरता तुम्ही साप्ताहिक बायबल वाचनाची नेमणूक पार पाडत असताना तुम्ही या अहवालातून फायदा प्राप्त करू शकता. वरील माहितीचा विचार केल्याने हा अहवाल तुम्हाला खरा वाटेल.

[तळटीप]

^ परि. 1 “यहोवाचे वचन सजीव आहे—उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—१” हा टेहळणी बुरूजच्या जानेवारी १, २००४ अंकातील लेख पाहा.

[२६ पानांवरील चित्र]

यहोवा योसेफाला आशीर्वाद देतो

[२६ पानांवरील चित्र]

अब्राहाम हा विश्‍वासू मनुष्य होता

[२६ पानांवरील चित्र]

नीतिमान लोटाचा आणि त्याच्या मुलींचा बचाव करण्यात आला

[२९ पानांवरील चित्र]

याकोबाला पवित्र गोष्टींची कदर होती. तुम्हाला देखील आहे का?