व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे गौरव करा मानवाचे नाही

देवाचे गौरव करा मानवाचे नाही

देवाचे गौरव करा मानवाचे नाही

अलीकडील महिन्यांमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांच्या “देवाचे गौरव करा” या प्रांतीय अधिवेशनांमधून देवाचे गौरव कसे करावे हे जगभरातील नीतिमत्त्वाच्या प्रेमींना शिकायला मिळाले. तेथे प्रस्तुत केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमाची आपण उजळणी करू या.

बहुतेक अधिवेशनांमध्ये बायबल आधारित कार्यक्रम तीन दिवस चालला आणि खास आंतरराष्ट्रीय मेळाव्यांमध्ये ज्यांना उपस्थित राहता आले त्यांच्याकरता तो चार दिवसांचा होता. सर्व उपस्थितांना एकूण ३० हून अधिक शास्त्रवचनीय भाग ऐकायला मिळाले; यांमध्ये आध्यात्मिक समज वाढवणारी भाषणे, विश्‍वास मजबूत करणारे अनुभव, बायबल तत्त्वांच्या व्यावहारिक उपयोगावर जोर देणारी प्रात्यक्षिके आणि पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना तोंड द्याव्या लागलेल्या आव्हानांचे चित्रण करणारे व त्या काळातील वेश धारण करून सादर केलेले एक नाटक यांचा समावेश होता. तुम्ही यांतील एका अधिवेशनाला हजर राहिला असाल, तर हा लेख वाचत असताना तुम्ही लिहून घेतलेल्या मुद्द्‌यांची उजळणी करू शकता. यामुळे आध्यात्मिक मेजवानीच्या तुमच्या आठवणींना उजाळा मिळेल आणि तुम्हाला पुष्कळ शिकायलाही मिळेल.

पहिल्या दिवसाचे शीर्षक: “हे प्रभो . . . गौरव . . . स्वीकार करावयास तू योग्य आहेस”

सुरवातीच्या गीत आणि प्रार्थनेनंतर, पहिल्या वक्‍त्‌याने उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत, अधिवेशनाच्या मुख्य कारणावर जोर देणाऱ्‍या “देवाचे गौरव करावयास जमलेले” या भाषणाने केले. प्रकटीकरण ४:११ मधील शब्द वाचून वक्‍त्‌याने संपूर्ण अधिवेशनाच्या शीर्षकावर जोर दिला. मग सरळ विषयाकडे जाऊन, त्यांनी देवाला गौरव करण्याचा काय अर्थ होतो हे समजावले. स्तोत्रसंहितेच्या पुस्तकाच्या आधारे त्यांनी हे ठासून सांगितले की, देवाचे गौरव करणे यात “उपासना,” “स्तवन,” आणि “उपकारस्तुती” यांचा समावेश होतो.—स्तोत्र ९५:६; १००:४, ५; १११:१, २, पं.र.भा.

पुढील भागाचे शीर्षक होते, “देवाचे गौरव करणारे आशीर्वादित आहेत.” वक्‍त्‌याने एक मनोवेधक निरीक्षण केले. संपूर्ण जगात २३४ देशांमध्ये ६० लाखांहून अधिक यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे यहोवाचे गौरव करणाऱ्‍यांवर सूर्य कधीही मावळत नाही असे म्हणता येईल. (प्रकटीकरण ७:१५) खास पूर्ण-वेळेच्या सेवेतील कोणत्या न कोणत्या प्रकारात असलेल्या अनेक ख्रिस्ती बंधू-बहिणींच्या मुलाखती घेण्यात आल्या; प्रेक्षकांतील सर्वांनी यांची प्रशंसा केली, व त्यांचे अनुभव ऐकून सर्वांना आनंद वाटला.

“निर्मिती देवाचे गौरव वर्णिते” हे पुढील भाषण होते. खरोखरचे आकाश जरी मूक असले तरी ते देवाच्या महानतेचे वर्णन करते आणि त्याच्या प्रेमळ काळजीबद्दल आपली कदर वाढवते. याचे तपशीलवार स्पष्टीकरण देण्यात आले.—यशया ४०:२६.

छळ, विरोध, जगिक प्रभाव आणि पापी प्रवृत्ती हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या सचोटीला आव्हान देतात. त्यामुळे, “सचोटीच्या मार्गात चाला” हे भाषण खरोखरच पूर्णपणे लक्ष देऊन ऐकण्याजोगे होते. २६ व्या स्तोत्रातील प्रत्येक वचनाची चर्चा करण्यात आली; त्यासोबत, नैतिक विषयाबाबत स्थिर राहिलेल्या एका शालेयवयीन साक्षीदाराची आणि आक्षेपार्ह मनोरंजनात भरपूर वेळ घालवत असलेल्या परंतु नंतर या समस्येवर मात करण्यासाठी पावले उचललेल्या आणखी एकाची मुलाखत घेण्यात आली.

“प्रोत्साहक असलेले वैभवी भविष्यसूचक दृष्टान्त” या मुख्य भाषणाने सकाळचा कार्यक्रम समाप्त झाला. वक्‍त्‌याने संदेष्टा दानीएल आणि प्रेषित योहान व पेत्र यांची उदाहरणे देऊन म्हटले की, देवाच्या मशीही राज्याची स्थापना आणि कार्य यांसंबंधीच्या वैभवशाली भविष्यसूचक दृष्टान्तांनी त्यांचा विश्‍वास आणखी बळकट झाला. आपण शेवटल्या काळात जगत असल्याच्या स्पष्ट पुराव्याबद्दल जर कोणाला विसर पडला असेल, तर अशा बांधवांच्या संदर्भात वक्‍त्‌याने म्हटले: “आमची मनापासून अशी आशा आहे की, असे लोक पुन्हा एकदा राज्य वैभवातील ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करतील आणि त्यांना पुन्हा आध्यात्मिक ताकद मिळवण्यास मदत मिळेल.”

दुपारच्या कार्यक्रमाची सुरवात, “यहोवाचे गौरव नम्र लोकांना प्रकट केले जाते” या भाषणाने झाली. यहोवा, संपूर्ण विश्‍वातील सर्वोच्च व्यक्‍ती असूनही त्याने नम्रतेचे उदाहरण कसे मांडले हे वक्‍त्‌याने दाखवले. (स्तोत्र १८:३५) जे खरोखर नम्र आहेत अशांवर यहोवाची कृपा असते पण जे आपल्या बरोबरीच्या लोकांशी किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांशी केवळ नम्रतेने वागण्याचा आव आणतात आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्यांशी कठोरतेने वागतात त्यांचा तो विरोध करतो.—स्तोत्र १३८:६.

त्यानंतर, “आमोसची भविष्यवाणी—आपल्या दिवसाकरता त्याचा संदेश” या केंद्रीय विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर जोर देणारी बायबलची भविष्यवाणी एका परिसंवादात सादर करण्यात आली. आमोसचे उदाहरण देऊन पहिल्या वक्‍त्‌याने, आपल्याला यहोवाच्या येणाऱ्‍या न्यायाची ताकीद लोकांना देण्याची जबाबदारी आहे याकडे लक्ष वेधले. त्यांच्या भाषणाचे शीर्षक होते, “धैर्याने देवाच्या वचनाविषयी बोला.” दुसऱ्‍या वक्‍त्‌याने असा प्रश्‍न विचारला: “यहोवा कधी या पृथ्वीवरील दुष्टता आणि दुःख यांचा अंत करील का?” “दुष्टांविरुद्ध ईश्‍वरी न्याय” या त्यांच्या भागात दाखवले गेले की, देवाचा न्याय नेहमी रास्त, चुकवता न येण्याजोगा आणि निवडक असतो. परिसंवादाच्या शेवटच्या वक्‍त्‌याने “यहोवा अंतःकरण पारखतो” या विषयावर लक्ष दिले. यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा असलेले, आमोस ५:१५ येथील शब्दांकडे लक्ष देतील: “वाइटाचा द्वेष करा, बऱ्‍याची आवड धरा.”

मद्य असलेली पेये, जसे की, द्राक्षारस हे मनाला आनंद देते पण त्याचा गैरवापर होऊ शकतो. “मद्याचा गैरवापर करण्याचा पाश टाळा” या भाषणात, एखाद्या व्यक्‍तीला मद्याची नशा चढली नाही तरी मद्याचा अमर्याद वापर केल्याने कोणते शारीरिक आणि आध्यात्मिक धोके संभावू शकतात हे वक्‍त्‌याने सांगितले. त्यांनी एक मार्गदर्शक तत्त्व दिले: प्रत्येक व्यक्‍तीवर मद्याचा वेगवेगळा परिणाम होत असतो, त्यामुळे एखाद्याच्या ‘व्यावहारिक बुद्धीवर आणि विचारशक्‍तीवर’ त्याचा परिणाम झाला तर ते प्रमाण तुमच्यासाठी जास्त समजावे.—नीतिसूत्रे ३:२१, २२.

आपण कठीण काळात जगत असल्यामुळे, “यहोवा, आपला ‘संकटकाळचा बुरूज’” हा पुढील विषय सांत्वन देणारा ठरला. प्रार्थना, पवित्र आत्मा आणि सह-ख्रिस्ती आपल्याला सामना करण्यास मदत करू शकतात.

त्या दिवसाच्या शेवटल्या भाषणात, “उत्तम देश—परादीसची पूर्वझलक,” यात सर्वांकरता एक आनंदाची वस्तू होती—अनेक बायबल नकाशे असलेले नवीन प्रकाशन. त्याचे शीर्षक आहे उत्तम देश पाहा (इंग्रजी).

दुसऱ्‍या दिवसाचे शीर्षक: “राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव करा”

दैनिक वचनाची चर्चा केल्यावर, अधिवेशनातील दुसरे परिसंवाद सादर करण्यात आले; त्याचे शीर्षक होते, “आरशांप्रमाणे यहोवाचे गौरव प्रतिबिंबित करा.” पहिल्या भागात “सगळीकडे सुवार्ता प्रचार करणे” या विषयावर अधिक तपशीलवार माहिती देण्यात आली आणि क्षेत्र सेवेतील खरे अनुभव प्रत्यक्षात सादर करण्यात आले. दुसऱ्‍या भाषणात “डोळे बंद असलेल्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढणे” हा विषय सादर करताना वक्‍त्‌याने एका पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक सादर केले. “आपल्या सेवाकार्यात अधिकाधिक करत राहणे” या शेवटल्या भागात, क्षेत्र सेवेतील अनुभवांच्या लक्षवेधक मुलाखती सादर करून तो भाग अधिक रुचकर करण्यात आला.

कार्यक्रमाच्या पुढील भागाचा विषय, “विनाकारण द्वेषाचे बळी” असा होता. यात विश्‍वासू व्यक्‍तींच्या उत्तेजनदायक मुलाखती घेण्यात आल्या ज्यांनी देवाच्या शक्‍तीने विरोध होत असताना सचोटी राखली.

बाप्तिस्म्याचे भाषण व त्यानंतर पात्र ठरणाऱ्‍या सर्व उमेदवारांनी पाण्यात संपूर्णतः बुडून बाप्तिस्मा घेणे हा अधिवेशनांतील एक उत्सुकतेचा प्रसंग असतो. पाण्यातील बाप्तिस्मा हे यहोवाला एका व्यक्‍तीने केलेल्या संपूर्ण समर्पणाचे द्योतक आहे. यास्तव, याचा विषय अगदी उचित होता: “आपल्या समर्पणाला जागल्याने देवाचे गौरव होते.”

दुपारच्या कार्यक्रमाची सुरवात, “महानतेविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन विकसित करणे” या भाषणाने झाली ज्यात आत्म-परीक्षण करण्यास उत्तेजन देण्यात आले. वक्‍त्‌याने हा लक्षवेधक मुद्दा सामोरा आणला: ख्रिस्ताच्या नम्रतेचे अनुकरण करून महानता लाभते. यास्तव, एका ख्रिश्‍चनाने व्यक्‍तिगत महत्त्वाकांक्षा तृप्त करण्यासाठी जबाबदारीचे पद मिळवण्याचा प्रयत्न करू नये. त्याने स्वतःला विचारावे, ‘कोणाच्याही सहज लक्षात येणार नाहीत अशी मदतदायी कृत्ये करण्यास मी तयार आहे का?’

तुम्हाला कधी थकवा जाणवतो का? याचे उत्तर स्पष्टच आहे. “थकलेले पण पूर्णपणे खचलेले नाही” हे भाषण सर्वांना आवडले. दीर्घकाळापासून साक्षीदार असलेल्यांच्या मुलाखतींनी दाखवले की, यहोवा आपल्याला “त्याच्या आत्म्याच्या द्वारे . . . बलसंपन्‍न” करू शकतो.—इफिसकर ३:१६.

उदारतेचा गुण आपल्यात जन्मतः नसतो, तो शिकून घ्यावा लागतो. या मुख्य मुद्द्‌यावर, “उदार असा, इतरांना देण्यास तयार असा” या भागात जोर देण्यात आला. पुढील विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारण्यात आला: “वृद्ध, आजारी, खिन्‍न किंवा एकटे असलेल्या बंधू-बहिणींना आपल्या दिवसातील काही वेळ काढण्यास आपण तयार आहोत का?”

“‘परक्यांच्या वाणीपासून’ सावधान” या भाषणाने श्रोत्यांचे लक्ष आकर्षित केले. यात, येशूच्या अनुयायांची तुलना मेंढरांशी करण्यात आली जे “उत्तम मेंढपाळ” या नात्याने केवळ त्याचा आवाज ऐकतात आणि दियाबलाच्या अनेक सूत्रांद्वारे येणारी “परक्यांची वाणी” ऐकत नाहीत.—योहान १०:५, १४, २७.

गायकसमूहाचे गीत समजावे म्हणून त्यांनी एकसाथ गायिले पाहिजे. देवाचे गौरव करण्यासाठी, संपूर्ण जगातील खऱ्‍या उपासकांनी एक असले पाहिजे. यास्तव, “‘एकाच मुखाने’ देवाचे गौरव करा” यात आपण सर्वजण एक “शुद्ध भाषा” कशी बोलू शकतो आणि यहोवाची “एकचित्ताने” सेवा कशी करू शकतो याविषयी फायदेकारक सूचना देण्यात आल्या.—सफन्या ३:९.

पालकांना, खासकरून ज्यांची लहान मुले आहेत त्यांना, “आपली मुले—एक मौल्यवान देणगी” हे त्या दिवसाचे शेवटले भाषण फार आवडले. २५६ पानांच्या एका नवीन प्रकाशनाचे त्या वेळी अनावरण करण्यात आले आणि श्रोतेगणांना आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) हे पुस्तक पालकांना आपल्या मुलांसोबत—जे देवाकडून त्यांना मिळालेली देणगी आहेत—आध्यात्मिकरित्या फलदायी वेळ घालवण्यास मदत करील.

तिसऱ्‍या दिवसाचे शीर्षक: “सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा”

दैनिक वचनाच्या आठवणींनी अधिवेशनाच्या शेवटल्या दिवसाला आध्यात्मिक विचारांची सुरवात दिली. या दिवसाच्या कार्यक्रमातील पहिला भाग खास कुटुंबांकरता होता. “पालकांनो, कुटुंबाची उभारणी करा” या पहिल्या भाषणाने याची सुरवात झाली. पालक आपल्या कुटुंबाची भौतिक काळजी घेण्यास जबाबदार आहेत याची उजळणी केल्यावर वक्‍त्‌याने हे सिद्ध करून दाखवले की, आपल्या मुलांची आध्यात्मिक गरज पुरवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे.

पुढील वक्‍त्‌याने मुलांना उद्देशून “युवक यहोवाची स्तुती कसे करत आहेत” या विषयावर भाषण दिले. त्यांनी म्हटले की, तरुण लोक “दहिंवरासारखे” आहेत कारण त्यांची संख्या अधिक आहे आणि त्यांच्या तारुण्यातील आवेश तजेला देणारा आहे. त्यांच्यासोबत यहोवाच्या सेवेत कार्य करण्यास प्रौढांना आनंद मिळतो. (स्तोत्र ११०:३) या भागात, आदर्श तरुणांच्या आनंदविणाऱ्‍या मुलाखती घेण्यात आल्या.

पूर्ण वेष धारण करून सादर केलेली बायबल नाटके नेहमीच प्रांतीय अधिवेशनांचे आकर्षक वैशिष्ट्य राहिले आहे आणि या अधिवेशनातही ते सादर करण्यात आले. “विरोध असतानाही धैर्याने साक्ष देणे” हे नाटक पहिल्या शतकातील येशूच्या अनुयायांविषयी होते. ते मनोरंजक होतेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते बोधकारक होते. नाटकानंतर, “‘हार न मानता’ सुवार्तेची घोषणा करा” या भाषणातून नाटकातील मुख्य मुद्द्‌यांवर जोर देण्यात आला.

उपस्थित असलेले सर्वजण, रविवारच्या कार्यक्रमातील मुख्य भागाची अर्थात “आज कोण लोक देवाचे गौरव करत आहेत?” या जाहीर भाषणाची वाटत पाहून होते. वक्‍त्‌याने पुरेसा पुरवा देऊन सिद्ध केले की, कशाप्रकारे वैज्ञानिक आणि धार्मिक समाजांनी सामान्यपणे देवाचे गौरव केले नाही. केवळ त्याचे नाव धारण केलेले लोक, जे यहोवाविषयी प्रचार करतात आणि शिकवतात तेच आज त्याच्या नावाचे गौरव करत आहेत.

जाहीर भाषणानंतर, टेहळणी बुरूज पत्रिकेच्या त्या आठवड्याच्या धड्याचा सारांश देण्यात आला. त्यानंतर, “‘अधिक फळ देऊन’ यहोवाचे गौरव करा” हे शेवटले भाषण सादर करण्यात आले. वक्‍त्‌याने उपस्थित असलेल्या सर्वांकरता दहा मुद्द्‌यांचा एक ठराव प्रस्तुत केला. तो ठराव निर्माणकर्ता यहोवा याचे गौरव करण्याच्या विविध मार्गांवर केंद्रित होता. एकसुरातील “होय” हे उत्तर पृथ्वीच्या एका कोपऱ्‍यातून दुसऱ्‍या कोपऱ्‍यापर्यंत सर्व अधिवेशनांमध्ये ऐकू आले.

अशाप्रकारे, अधिवेशनाचा शेवट झाला आणि “देवाचे गौरव करा” हे शीर्षक उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या कानांत निनादत राहिले. आपण यहोवाच्या आत्म्याच्या मदतीने आणि त्याच्या संघटनेच्या दृश्‍य भागाकरवी मनुष्यांना नव्हे तर नेहमी देवाला गौरव देण्याचा प्रयत्न करू या.

[२३ पानांवरील चौकट/चित्रे]

आंतरराष्ट्रीय अधिवेशने

आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि उत्तर व दक्षिण अमेरिकेत चार दिवसांची आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवण्यात आली. जगभरातील काही नेमलेल्या साक्षीदारांना या मेळाव्यांमध्ये प्रतिनिधी म्हणून आमंत्रित केले होते. अशाप्रकारे, आलेले प्रतिनिधी आणि यजमान यांना परस्परांकडून “उत्तेजन प्राप्त” झाले. (रोमकर १:१२) जुन्या ओळखी काढण्यात आल्या आणि नवीन जणांशीही परिचय करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमधील कार्यक्रमात, “इतर देशांतील अहवाल” हा खास वैशिष्ट्यपूर्ण भाग सादर करण्यात आला.

[२५ पानांवरील चौकट/चित्रे]

देवाला गौरव देणारी नवीन प्रकाशने

“देवाचे गौरव करा” प्रांतीय अधिवेशनांमध्ये दोन नवीन प्रकाशनांचे अनावरण करण्यात आले. उत्तम देश पाहा या बायबल ॲटलासचे आवरण जाडसर आहे आणि यामध्ये बायबल प्रदेशांच्या नकाशांची व चित्रांची ३६ पाने आहेत. प्रत्येक पान पूर्ण रंगीत आहे आणि यात अस्सिरिया, बॅबिलोन, मेडो-पर्शिया, ग्रीस आणि रोम या साम्राज्यांचे नकाशे दिले आहेत. येशूचे सेवाकार्य आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार यासंबंधी वेगळे नकाशे आहेत.

थोर शिक्षकापासून शिका हे २५६ पानांचे पुस्तक असून यात २३० चित्रे आहेत. केवळ चित्रे पाहून आणि पुस्तकातील विचारप्रवर्तक प्रश्‍नांची उत्तरे देऊन मुलांसोबत पुष्कळ आनंददायक वेळ घालवला जाऊ शकतो. हे नवीन प्रकाशन, तरुणांवरील सैतानाच्या हल्ल्याचा—जो त्यांची नीतिमूल्ये नष्ट करण्याच्या उद्देशाने केला जातो—प्रतिरोध करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

[२३ पानांवरील चित्र]

मिशनऱ्‍यांनी विश्‍वास मजबूत करणारे अनुभव दिले

[२४ पानांवरील चित्रे]

“देवाचे गौरव करा” अधिवेशनांमधील एक मुख्य भाग होता बाप्तिस्मा

[२४ पानांवरील चित्रे]

अबालवृद्धांची आवडती बायबल नाटके