व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘परमेश्‍वराचे वृक्ष रसभरित असतात’

‘परमेश्‍वराचे वृक्ष रसभरित असतात’

यहोवाच्या निर्मितीतील शोभा

‘परमेश्‍वराचे वृक्ष रसभरित असतात’

एखाद्या अरण्यात उभे राहून उंचच उंच वृक्षांमधून सूर्यप्रकाश पाझरत असलेला तुम्ही पाहिला आहे का? वाऱ्‍याची झुळक आल्यावर पानांचा सळसळ आवाज तुम्ही ऐकला आहे का?—यशया ७:२.

पृथ्वीच्या काही भागांमध्ये वर्षाच्या काही विशिष्ट वेळी, विविध झाडांची पाने लाल, नारंगी, पिवळी व इतर रंग धारण करतात. जणू काही अरण्याने पेट घेतला आहे असे वाटते! पुढील वर्णनाशी याचा किती मेळ बसतो: “अहो पर्वतांनो, हे वना, त्यांतील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा.”—यशया ४४:२३. *

पृथ्वी ग्रहाचा जवळजवळ एक तृतीयांश भाग अरण्यांनी व्यापलेला आहे. अरण्ये आणि त्यातील विपुल जीव, त्यांचा रचनाकार आणि निर्माणकर्ता, यहोवा देव याचे अद्‌भुतरीतीने गौरव करतात. प्रेरित स्तोत्रकर्त्याने गायिले: “फळझाडे व सर्व गंधसरू परमेश्‍वराचे स्तवन करा.”—स्तोत्र १४८:७-९.

“भौतिकदृष्ट्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने मानवाच्या अस्तित्वाकरता वृक्ष महत्त्वाचे आहेत,” असे आपल्या भोवतालचे वृक्ष (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते. अरण्यांमुळे गोड्या पाण्याच्या पुरवठ्याचे रक्षण होते, ते टिकवले आणि वाढवले जाते. वृक्ष, वायुचे शुद्धीकरणही करतात. प्रकाशसंश्‍लेषणाच्या आश्‍चर्यकारक प्रक्रियेद्वारे पानांतील पेशी, कार्बन डायोक्साईड, पाणी, खनिज पदार्थ आणि सूर्यप्रकाश यांचे पोषक पदार्थ आणि ऑक्सीजन यांत परिवर्तन करतात.

अरण्यांना सौंदर्य आणि रचनेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. सहसा उंच वृक्ष ही जंगलाची शान असतात. त्यांच्यामधून फर्न, शेवाळ, वेली, झुडुपे आणि वनस्पती वाढतात. ही झाडे वृक्षांनी तयार केलेल्या वातावरणावर अवलंबून त्यांच्या छायेत वाढतात आणि जंगलातून मिळणारी आर्द्रता शोषत असतात.

काही पानझडी अरण्यांमध्ये, वर्षाच्या उत्तरार्धात एक एकर जमिनीवर जवळजवळ एक कोटी पाने गळून पडू शकतात. मग या पानांचे काय होते? कीटक, कवक, कृमी आणि इतर जीवजंतू या सर्व जैविक पदार्थांचे ह्‍यूमसमध्ये परिवर्तन करतात; सकस जमिनीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. होय, हे सगळे मूक कामकरी नवीन वाढीसाठी जमीन तयार करतात तेव्हा त्यातील काहीच वाया जात नाही.

मृत पानांखालच्या मातीत असंख्य जीवजंतू असतात. अरण्य (इंग्रजी) या पुस्तकानुसार, “जवळजवळ १,३५० जीवजंतू . . . एक इंच खोली असलेल्या एक फूटाच्या भागात आढळतात; एका मुठीत मावेल इतक्या जमिनीच्या मातीत अब्जावधी सूक्ष्म जीवजंतू असतात ते वेगळेच.” शिवाय, अरण्यांमध्ये सरपटणारे प्राणी, पक्षी, कीटक आणि सस्तन प्राणीही विपुलतेत असतात. या सौंदर्याचे आणि विविधतेचे श्रेय कोणाला जावे? निर्माणकर्ता अगदी उचितपणे असे घोषित करतो: “वनांतील सर्व पशु, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत.”—स्तोत्र ५०:१०.

काही प्राण्यांमध्ये शीतकाळात निष्क्रिय अवस्थेत असण्याची अद्‌भुत क्षमता असते; अशाप्रकारे ते कडाक्याच्या हिवाळ्याचा सामना करू शकतात आणि दीर्घकाळापर्यंत उपाशी राहू शकतात. परंतु, सगळेच प्राणी अशी शीतकालसमाधी घेत नाहीत. अगदी ऐन हिवाळ्यातही तुम्हाला एखाद्या शेतातून हरणांचा कळप उड्या मारत जात असताना दिसेल. हरणे हिवाळ्यात शीतकालसमाधी घेत नाहीत किंवा अन्‍न साठवत नाहीत, पण सोबत दिलेल्या जर्मनीतील या चित्रात दिसते त्याप्रमाणे ते अन्‍नाच्या शोधात फिरत राहतात आणि कोवळा झाडपाला खात असतात.

वनस्पतींचा शास्त्रवचनांमध्ये खास उल्लेख करण्यात आला आहे. एका मोजणीनुसार, बायबलमध्ये जवळजवळ १३० वेगवेगळ्या वनस्पतींचा आणि सुमारे ३० वेगळ्या जातीच्या वृक्षांचा उल्लेख केला आहे. अशा संदर्भांच्या महत्त्वावर टिपणी करताना वनस्पतीशास्त्रज्ञ मायकल जोहारी म्हणतात: “जीवनाच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या वनस्पतींचा, बायबलमध्ये आढळतो तितका अधिक संदर्भ सामान्य लौकिक साहित्यात देखील आढळत नाही.”

वृक्ष आणि अरण्ये, एका प्रेमळ निर्माणकर्त्याकडील उत्कृष्ट देणग्या आहेत. तुम्ही अरण्यांमध्ये गेला असाल तर निश्‍चितच तुम्ही स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांशी सहमत असाल: “परमेश्‍वराचे वृक्ष, लबानोनावर त्याने लाविलेले गंधसरू, रसभरित असतात; त्यावर पक्षी आपली घरटी बांधितात; करकोचाचे घर देवदारूंमध्ये असते.”—स्तोत्र १०४:१६, १७.

[तळटीप]

^ परि. 4 जानेवारी/फेब्रुवारी, २००४ यहोवाच्या साक्षीदारांचे कॅलेंडर (इंग्रजी) पाहा.

[९ पानांवरील चौकट/चित्रे]

मध्यपूर्वेतील सर्वात भारदार फळझाड म्हणजे बदामाचे झाड. वर्षामध्ये सर्वांपेक्षा आधी—बहुतेक झाडांपेक्षा आधी—ते जागे होते. प्राचीन इब्री लोक बदामाच्या झाडाला सर्वात आधी फुले यायची म्हणून त्याला जागवणारे झाड म्हणायचे. गुलाबी किंवा पांढरी नाजूक फुले ल्यालेले हे झाड खरोखर जागे झाल्यासारखे भासते.—उपदेशक १२:५.

पक्ष्यांच्या जवळजवळ ९,००० ज्ञात असलेल्या जातींमधील सुमारे ५,००० पक्षी गाणी गाणारे आहेत. त्यांची गाणी दाट अरण्याला भेदणारी असतात. (स्तोत्र १०४:१२) उदाहरणार्थ, साँग स्पॅरोचे गाणे अत्यंत मधुर असते. या चित्रात दाखवलेले मोर्निंग वारब्लर्स हे गाणी गाणारे चिमुकले पक्षी आहेत; यांच्या अंगावरचा करडा, पिवळा आणि मेंदी हिरवा रंग फार उठावदार दिसतो.—स्तोत्र १४८:१, १०.

[९ पानांवरील चित्र]

नॉरमंडी, फ्रान्स येथील अरण्य