व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भरवशालायक वचने

भरवशालायक वचने

भरवशालायक वचने

देवाचा संदेष्टा मीखा याला माहीत होते की, वचने खोटी शाबीत होऊ शकतात. त्याच्या काळात, जवळच्या सोबत्यांच्या शब्दांवरही प्रत्येक वेळी भरवसा ठेवता येऊ शकत नव्हता. म्हणून मीखाने अशी ताकीद दिली: “सोबत्याचा भरवसा धरू नको, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नको, तुझ्या उराजवळ निजणाऱ्‍या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर.”—मीखा ७:५.

परंतु, या दुःखमय परिस्थितीमुळे सर्व वचनांवर मीखा संशय करू लागला का? नाही! त्याचा देव, यहोवा याने दिलेल्या वचनांवर त्याने पूर्ण भरवसा दाखवला. त्याने लिहिले, “मी तर परमेश्‍वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.”—मीखा ७:७.

मीखाने असा भरवसा का व्यक्‍त केला? कारण यहोवा नेहमी आपला शब्द पाळतो हे त्याला ठाऊक होते. देवाने मीखाच्या पूर्वजांना दिलेले प्रत्येक वचन न चुकता सत्य ठरले. (मीखा ७:२०) गतकाळातील यहोवाच्या विश्‍वासूपणामुळे भविष्यातील त्याचे वचन तो निश्‍चित पूर्ण करेल असा विश्‍वास बाळगण्यास मीखाला कारण मिळाले.

‘एकही शब्द व्यर्थ गेला नाही’

उदाहरणार्थ, मीखाला हे माहीत होते की, यहोवाने इस्राएली लोकांना ईजिप्तमधील दास्यातून सोडवले. (मीखा ७:१५) ती सुटका अनुभवलेल्या यहोशवाने आपल्या सह इस्राएलांना देवाच्या सर्व वचनांवर विश्‍वास ठेवायला उत्तेजन दिले. कोणत्या आधारे? यहोशवाने त्यांना आठवण करून दिली, “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.”—यहोशवा २३:१४.

इस्राएलांना या गोष्टीची चांगली जाणीव होती की, यहोवाने त्यांच्याकरता अद्‌भुत गोष्टी केल्या होत्या. त्याने देव-भीरू पूर्वज अब्राहाम याला असे अभिवचन दिले होते की, त्याची संतती ताऱ्‍यांइतकी अगणित होईल आणि तिला कनान देशाचा वतन प्राप्त होईल आणि यानुसार देवाने आपले वचन पूर्ण केले. यहोवाने अब्राहामाला असेही सांगितले होते की, त्याच्या वंशजाला ४०० वर्षे छळ सहन करावा लागेल परंतु ‘चौथ्या पिढीत’ ते कनानमध्ये माघारी येतील. हे सर्वकाही सांगितल्यानुसार पूर्ण झाले.—उत्पत्ति १५:५-१६; निर्गम ३:६-८.

याकोबाचा पुत्र योसेफ याच्या काळात इस्राएली लोकांचे ईजिप्तमध्ये चांगले स्वागत करण्यात आले. नंतर ईजिप्शियन लोकांनी अत्याचाराने त्यांच्याकडून कष्टदायक मजुरी करवून घेतली पण देवाच्या वचनानुसार त्यांना ईजिप्तमध्ये जाऊन चार अतिव्यापी पिढ्या झाल्यानंतर अब्राहामाच्या या वंशजांना ईजिप्शियन बंधनातून मुक्‍त करण्यात आले. *

पुढील ४० वर्षांत, इस्राएली लोकांना आणखी पुरावा मिळाला की, यहोवा नेहमी आपले वचन पाळतो. अमालेखी लोकांनी इस्राएली लोकांवर अन्यायाने आक्रमण केले तेव्हा देवाने आपल्या लोकांकरता लढून त्यांचे रक्षण केले. अरण्यात त्यांनी ४० वर्षे घालवली तेव्हा त्यांच्या सर्व भौतिक गरजा त्याने तृप्त केल्या आणि सरतेशेवटी त्यांना वाग्दत्त देशात नेऊन वसवले. अब्राहामाच्या या वंशजांसोबत यहोवाने कसा व्यवहार केला याच्या इतिहासाची यहोशवाने आठवण केली तेव्हा तो आत्मविश्‍वासाने म्हणू शकला: “परमेश्‍वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.”—यहोशवा २१:४५.

देवाच्या अभिवचनांवर आत्मविश्‍वास वाढवा

मीखा आणि यहोशवाप्रमाणे तुम्ही यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा कसा वाढवू शकता? इतरांवर तुम्ही भरवसा कसा वाढवता? तुम्ही त्यांच्याविषयी होता होईल तितके जाणण्याचा प्रयत्न करता. उदाहरणार्थ, ते विश्‍वासूपणाने आपली सर्व वचने पाळायचा प्रयत्न करतात हे पाहून ते विश्‍वासयोग्य आहेत याविषयी तुम्ही जाणू शकता. अशा लोकांविषयी तुम्हाला अधिक माहीत होते तसतसा त्यांच्यावरचा तुमचा भरवसा हळूहळू वाढू लागतो. देवाच्या अभिवचनांवर भरवसा वाढवण्याकरताही तुम्ही हेच करू शकता.

निसर्ग आणि त्याचे नियम यांवर चिंतन करणे हा एक मार्ग आहे. या नियमांवर शास्त्रज्ञ विश्‍वास करतात; जसे की, एका मानवी पेशीतून अब्जावधी पेशी तयार होण्याच्या क्रियेला नियंत्रित करणाऱ्‍या नियमांवर ते विश्‍वास करतात. उलट, संपूर्ण विश्‍वातील पदार्थ आणि ऊर्जेच्या वापरावर नियंत्रण करणारे नियम निश्‍चितच कोणा विश्‍वसनीय नियंत्याने ठरवले असावेत. त्याच्या निर्मितीला नियंत्रित करणाऱ्‍या नियमांवर तुम्हाला भरवसा आहे त्याप्रमाणेच त्याच्या अभिवचनांवरही तुम्ही भरवसा ठेवू शकता.—स्तोत्र १३९:१४-१६; यशया ४०:२६; इब्री लोकांस ३:४.

मीखाचा समकालीन, यशया संदेष्टा, याच्याद्वारे यहोवाने आपले वचन किती विश्‍वसनीय आहे हे समजवण्याकरता ऋतूंचा नियमितपणा आणि अद्‌भुत पाण्याच्या चक्राचा उपयोग केला. प्रत्येक वर्षी पाऊस पडायचा. ते पाणी जमिनीत झिरपायचे आणि त्यामुळे लोकांना पेरणी व पीकाची कापणी करता येत होती. याबाबतीत यहोवा म्हणाला: “पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्‍यास बीज, खाणाऱ्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:१०, ११.

परादीसचे पक्के वचन

निर्मितीचा अभ्यास केल्याने निर्माणकर्त्यावरील आपला भरवसा वाढू शकतो परंतु ‘त्याच्या मुखातून निघणाऱ्‍या वचनाशी’ संबंधित असलेल्या वचनांविषयी तुम्हाला शिकायचे असल्यास केवळ निर्मितीचा अभ्यास पुरेसा नाही. या वचनांवर भरवसा ठेवता यावा म्हणून त्याविषयी शिकून घेण्यासाठी पृथ्वीकरता देवाचा उद्देश आणि मानवजातीसोबत त्याचे व्यवहार यांच्या ईश्‍वरप्रेरित शास्त्रवचनीय अहवालाचा अभ्यास करण्याची आवश्‍यकता आहे.—२ तीमथ्य ३:१४-१७.

मीखा संदेष्ट्याला यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा होता. मीखाजवळ जितका ईश्‍वरप्रेरित अहवाल नव्हता तितका आज तुमच्याजवळ आहे. त्यामुळे बायबल वाचून त्यावर मनन करताना देवाच्या वचनांच्या पूर्णतेवर तुम्ही देखील आपला विश्‍वास वाढवू शकता. ही वचने केवळ अब्राहामाच्या नैसर्गिक वंशजांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला देण्यात आली होती. यहोवाने या देव-भीरू पूर्वजाला असे वचन दिले: “तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१८) अब्राहामाच्या ‘संतानाचा’ किंवा वंशजाचा प्रमुख भाग मशीहा अर्थात येशू ख्रिस्त आहे.—गलतीकर ३:१६.

येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वाद मिळतील याची खात्री यहोवा करील. पण आपल्या काळात देवाने काय करण्याचे वचन दिले आहे? मीखा ४:१, २ याचे उत्तर पुढील भविष्यसूचक शब्दांमध्ये देते: “शेवटल्या दिवसात असे होईल की, परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील. देशोदेशीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”

यहोवाच्या मार्गाविषयी शिकून घेणारे ‘आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतात, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतात.’ त्यांच्या युद्धासमान सर्व प्रवृत्ती नाहीशा होतात. लवकरच, पृथ्वी धार्मिक लोकांनी भरून जाईल आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही. (मीखा ४:३, ४) होय, देवाचे वचन असे अभिवचन देते की, येशू ख्रिस्ताच्या राज्य शासनात, यहोवा पृथ्वीवरून सर्व उपद्रव करणाऱ्‍यांना काढून टाकील.—यशया ११:६-९; दानीएल २:४४; प्रकटीकरण ११:१८.

मानवाने देवाविरुद्ध केलेल्या बंडाळीचा परिणाम म्हणून जे दुःख भोगून मरतात त्यांनाही पुनरुत्थित करून पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा दिली जाईल. (योहान ५:२८, २९) दुष्टतेला चालना देणारा सैतान व त्याचे दुरात्मे राहणार नाहीत आणि आदामाच्या पापाचे परिणाम येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे नाहीसे करण्यात येतील. (मत्तय २०:२८; रोमकर ३:२३, २४; ५:१२; ६:२३; प्रकटीकरण २०:१-३) शिवाय आज्ञाधारक मानवांचे काय होईल? त्यांना तर, परादीस पृथ्वीवर परिपूर्ण आरोग्यातील सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त होईल!—स्तोत्र ३७:१०, ११; लूक २३:४३; प्रकटीकरण २१:३-५.

खरोखर किती अद्‌भुत वचने! पण त्यांच्यावर भरवसा करता येऊ शकतो का? निश्‍चित करता येऊ शकतो. ही वचने मानवांनी दिलेली नाहीत ज्यांचे हेतू चांगले असतात परंतु ते पूर्ण करण्याचे त्यांच्याजवळ सामर्थ्य नसते. तर ती वचने सर्वसमर्थ देवाने दिली आहेत जो खोटे बोलू शकत नाही आणि जो “आपल्या वचनाविषयी [विलंब] करीत नाही.” (२ पेत्र ३:९; इब्री लोकांस ६:१३-१८) तुम्ही बायबलमधील सर्व वचनांवर पूर्ण भरवसा ठेवू शकता कारण ‘यहोवा, सत्याचा देव’ हा त्यांचा स्रोत आहे.—स्तोत्र ३१:५, पं.र.भा.

[तळटीप]

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड १, पृष्ठे ९११-१२ पाहा.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही.”—यहोशवा २३:१४

[४, ५ पानांवरील चित्रे]

यहोवाने इस्राएलांशी तांबड्या समुद्राजवळ आणि अरण्यात

केलेली वचने पाळली

[७ पानांवरील चित्रे]

अब्राहामाला दिलेले वचन यहोवाने पूर्ण केले. त्याचे संतान, येशू ख्रिस्त, मानवजातीला आशीर्वादित करील