व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची थोरवी अगम्य आहे

यहोवाची थोरवी अगम्य आहे

यहोवाची थोरवी अगम्य आहे

“परमेश्‍वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.”—स्तोत्र १४५:३.

१, २. दावीद कशाप्रकारचा माणूस होता आणि देवाच्या संबंधाने त्याचा स्वतःबद्दल कसा दृष्टिकोन होता?

स्तोत्रसंहितेतील १४५ वे स्तोत्र रचणारा इतिहासतला एक सुप्रसिद्ध पुरुष आहे. बालपणी त्याने एका शस्त्रधारी राक्षसी योद्ध्‌याचा सामना करून त्याचा वध केला. योद्धाराजा या नात्याने त्याने कितीतरी शत्रूंना पराभूत केले. त्याचे नाव होते दावीद. प्राचीन इस्राएलचा तो दुसरा राजा होता. दावीदाच्या मृत्यूनंतरही त्याचे नाव घेतले जायचे, जेणेकरून आज लाखो लोकांना त्याच्याविषयी काही ना काही माहिती आहे.

इतके काही साध्य केल्यावरही, स्वतःविषयी विचार करताना दावीद नम्र होता. आपल्या एका स्तोत्रात त्याने यहोवाची या शब्दांत स्तुती गायिली: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?” (स्तोत्र ८:३, ४) आपण स्वतःच फार महान आहोत असा विचार करण्याऐवजी आपल्या सर्व शत्रूंकडून मिळालेल्या सुटकेचेही श्रेय त्याने यहोवालाच दिले व म्हटले: “तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (२ शमुवेल २२:१, २, ३६) यहोवा पापी मानवांना दया दाखवतो ही त्याची नम्रता आहे आणि देवाच्या या अपात्र कृपेबद्दल दावीदाने कृतज्ञता व्यक्‍त केली.

‘मी देवाची थोरवी गाईन’

३. (अ) इस्राएलाच्या राज्यपदाविषयी दाविदाचा कसा दृष्टिकोन होता? (ब) यहोवाची कितपत स्तुती करण्याची दाविदाची मनिषा होती?

दावीद देवाचा नियुक्‍त राजा होता. तरीसुद्धा त्याने यहोवालाच इस्राएलचा खरा राजा मानले. दाविदाने म्हटले: “हे परमेश्‍वरा, राज्यहि तुझेच, तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्‍नत आहेस.” (१ इतिहास २९:११) आणि देवाच्या राजपदाबद्दल दाविदाला मनस्वी आदर होता! त्याने गायिले, “हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.” (स्तोत्र १४५:१, २) प्रतिदिवशी, नव्हे सदासर्वकाळ यहोवा देवाचे स्तवन करण्याची दाविदाची मनिषा होती.

४. स्तोत्र १४५ कोणत्या खोट्या दाव्यांना फोल ठरवते?

सैतान हे सिद्ध करू इच्छितो की देव एक स्वार्थी शासक असून आपल्या अधीन असलेल्या प्राण्यांना तो स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही. (उत्पत्ति ३:१-५) पण १४५ वे स्तोत्र सैतानाचा हा दावा खोटा ठरवते. तसेच, जे देवाच्या आज्ञेत राहतात ते देवाबद्दल प्रेम असल्यामुळे नव्हे, तर स्वार्थापोटी असे करतात, या सैतानाच्या आणखी एका खोट्या दाव्यास हे स्तोत्र खोडून काढते. (ईयोब १:९-११; २:४, ५) दाविदाप्रमाणे आज खरे ख्रिस्ती दियाबलाच्या खोट्या दाव्यांना जबाब देत आहेत. देवाच्या राज्य शासनाखालील सार्वकालिक जीवनाची आशा त्यांना प्रिय आहे कारण यहोवाची सदासर्वकाळ स्तुती करण्याची त्यांचीही मनिषा आहे. किंबहुना, येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवण्याद्वारे, तसेच, यहोवाचे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले उपासक या नात्याने प्रेमापोटी त्याची आज्ञाधारकपणे सेवा करण्याद्वारे आजही लाखो जण त्याची स्तुती करत आहेत.—रोमकर ५:८; १ योहान ५:३.

५, ६. यहोवाचा धन्यवाद करण्यासाठी व त्याची स्तुती करण्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत?

यहोवाचे सेवक या नात्याने त्याला धन्य म्हणण्याच्या आणि त्याची स्तुती करण्याच्या कितीतरी संधी आपल्याजवळ आहेत याचा विचार करा. त्याचे वचन बायबल वाचत असताना एखादी गोष्ट आपल्या मनाला स्पर्शून जाते तेव्हा आपण प्रार्थनेत त्याची स्तुती करू शकतो. देव आपल्या लोकांसोबत किती अद्‌भुतरित्या व्यवहार करतो याचा एखाद्या वेळी आपल्याला प्रत्यय येतो, किंवा त्याच्या आश्‍चर्यकारक निर्मितीतली एखादी गोष्ट पाहून आपण रोमांचित होतो तेव्हा देखील आपण स्तुती व आभार व्यक्‍त करू शकतो. तसेच ख्रिस्ती सभांमध्ये अथवा एरवी संभाषण करताना जेव्हा आपण सहविश्‍वासू बांधवांसोबत यहोवा देवाच्या उद्देशांबद्दल चर्चा करतो तेव्हा देखील आपण एका अर्थाने त्याला धन्यवाद देत असतो. थोडक्यात, देवराज्याच्या हिताकरता केली जाणारी सर्व “सत्कर्मे” यहोवाला स्तुती आणतात.—मत्तय ५:१६.

अशा सत्कर्मांची अलीकडील उदाहरणे द्यायची झाल्यास, यहोवाच्या लोकांनी अनेक गरीब देशांत केलेल्या उपासना स्थळांच्या बांधकामाविषयी सांगता येईल. यातील बहुतांश कार्य इतर देशांतील सहविश्‍वासू बांधवांच्या आर्थिक मदतीने करण्यात आले आहे; तसेच, राज्य सभागृहांच्या बांधकामाला हातभार लावण्याकरता स्वखर्चाने अशा ठिकाणी जाऊन काम करण्याकरता पुढे आलेल्या ख्रिस्ती बांधवांचीही बरीच मदत लाभली आहे. आणि सर्व सत्कर्मांपेक्षा सर्वात महत्त्वाचे सत्कर्म म्हणजे, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे यहोवाची स्तुती करणे. (मत्तय २४:१४) स्तोत्र १४५ यातील नंतरची वचने दाखवतात त्याप्रमाणे दाविदाला देवाच्या राज्यत्वाच्या महानतेची कदर होती आणि त्याने त्याच्या राजपदाची स्तुती केली. (स्तोत्र १४५:११, १२) देवाच्या प्रेमळ शासनाविषयी तुम्हालाही दाविदाप्रमाणे कदर वाटते का? आणि त्याच्या राज्याबद्दल तुम्ही नियमितरित्या इतरांशी बोलता का?

देवाच्या थोरवीची उदाहरणे

७. यहोवाची स्तुती करण्याचे एक मुख्य कारण सांगा.

स्तोत्र १४५:३ यहोवाची स्तुती करण्याचे एक महत्त्वाचे कारण आपल्या लक्षात आणून देते. दावीद गातो: “परमेश्‍वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.” यहोवाच्या महानतेला सीमा नाही. मानव तिचा पूर्णपणे थांग लावू शकत नाहीत, समजू शकत नाहीत किंवा तिला मापू शकत नाहीत. पण यहोवाच्या या अगम्य थोरवीची काही उदाहरणे विचारात घेतल्याने निश्‍चितच आपल्याला फायदा होईल.

८. यहोवाची थोरवी व त्याचे सामर्थ्य यांविषयी हे विश्‍व काय प्रकट करते?

शहरातील दिव्यांच्या झगमगाटापासून दूर अशा एखाद्या ठिकाणी जाऊन रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे पाहण्याचा कधी तुम्हाला योग आला आहे का? काळ्याकभिन्‍न आकाशात कोट्यवधी तारे पाहून तुम्ही विस्मित झाला नाहीत का? अंतराळातील त्या सर्व ज्योती निर्माण करणाऱ्‍या यहोवाच्या महानतेची स्तुती करण्यास तुम्ही आपोआपच प्रेरित झाला नाहीत का? पण तुम्ही जे पाहिले ते पृथ्वी ग्रहाला सामावणाऱ्‍या आकाशगंगेतील केवळ मोजके तारे होते. शिवाय, अशा दहा हजार कोटीपेक्षा जास्त आकाशगंगा आहेत असा अंदाज आहे; यांपैकी केवळ तीन आकाशागंगा दूर्बिणीचा वापर न करता पाहता येतात. खरोखर या अतिविशाल विश्‍वातील अगणित तारे व आकाशगंगा यहोवाच्या निर्मिती सामर्थ्याची आणि त्याच्या अगम्य थोरवीची ग्वाही देतात.—यशया ४०:२६.

९, १०. (अ) येशू ख्रिस्ताच्या संबंधाने यहोवाची थोरवी कशाप्रकारे प्रकट झाली आहे? (ब) येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्या विश्‍वासावर कोणता परिणाम होण्यास हवा?

यहोवाच्या महानतेचे इतर पैलू लक्षात घ्या, खासकरून येशू ख्रिस्ताच्या संबंधाने. यहोवाने आपल्या या पुत्राला निर्माण केले आणि अगणित काळापर्यंत त्याचा “कुशल कारागीर” या नात्याने उपयोग करून घेतला, यात त्याची महानता दिसून आली. (नीतिसूत्रे ८:२२-३१) तसेच यहोवाने आपल्या या एकुलत्या एका पुत्राला मानवजातीकरता खंडणी यज्ञार्पण म्हणून वाहून दिले तेव्हाही त्याचे महान प्रेम प्रकट झाले. (मत्तय २०:२८; योहान ३:१६; १ योहान २:१, २) शिवाय येशूचे पुनरुत्थान झाले तेव्हा यहोवाने त्याच्याकरता जे गौरवशाली, अविनाशी आत्मिक शरीर तयार केले ते देखील मनुष्याच्या समजबुद्धीपलीकडले आहे.—१ पेत्र ३:१८.

१० येशूच्या पुनरुत्थानाशी यहोवाच्या अगम्य थोरवीचे अनेक रोमांचक पैलू निगडीत आहेत. साहजिकच देवाने दृश्‍य व अदृश्‍य अशा सर्व वस्तूंच्या निर्मितीकार्याविषयी येशूच्या सर्व स्मृती पुनरुज्जिवित केल्या. (कलस्सैकर १:१५, १६) या दृश्‍य व अदृश्‍य वस्तूंत इतर आत्मिक प्राणी, हे विश्‍व, फलदायी पृथ्वी आणि पृथ्वीगोलावरील सर्व सजीव वस्तूंचा समावेश आहे. तसेच मानवपूर्व अस्तित्वादरम्यान आपल्या पुत्राने स्वर्ग व पृथ्वीवरील जीवनाच्या संपूर्ण इतिहासाविषयी मिळवलेले ज्ञान तर यहोवाने त्याला परत दिलेच, पण त्यासोबत, परिपूर्ण मानव या नात्याने त्याने जे अनुभवले होते त्याविषयीच्या सर्व स्मृती देखील यहोवाने पुनरुज्जिवित केल्या. होय येशूच्या पुनरुत्थानाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा यहोवाची अगम्य थोरवी प्रकट होते. शिवाय, या महान कृत्याद्वारे आपल्याला एक आश्‍वासन मिळाले आहे, ते असे की इतर जणांचे पुनरुत्थान देखील शक्य आहे. देवाच्या परिपूर्ण स्मृतीत असलेल्या कोट्यवधी मृत जनांना तो जिवंत करू शकतो हा विश्‍वास देखील यामुळे दृढ होण्यास हवा.—योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये १७:३१.

महान कार्ये व सामर्थ्यशाली कृत्ये

११. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाच्या कोणत्या महान कार्याला सुरवात झाली?

११ येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतरही यहोवाने इतर कित्येक महान व आश्‍चर्यकारक कृत्ये केली आहेत. (स्तोत्र ४०:५) सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने एक नवे राष्ट्र, अर्थात ‘देवाचे इस्राएल’ अस्तित्वात आणले; या राष्ट्राचे सदस्य, पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झालेले ख्रिस्ताचे शिष्य होते. (गलतीकर ६:१६) या नव्या आत्मिक राष्ट्राची तेव्हाच्या जगात अतिशय सामर्थ्यशाली रितीने वाढ झाली. येशूच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर धर्मत्याग व त्यातून ख्रिस्तीजगताचा जन्म झाला तरीसुद्धा आपल्या उद्देशाची खात्रीशीरपणे पूर्णता करण्यासाठी यहोवा अनेक आश्‍चर्यकारक कृत्ये करत राहिला.

१२. बायबल आज पृथ्वीवरील सर्व मुख्य भाषांतून उपलब्ध आहे ही गोष्ट काय दर्शवते?

१२ उदाहरणार्थ, संपूर्ण बायबलचे जतन करण्यात आले आणि कालांतराने पृथ्वीवर आज अस्तित्वात असलेल्या सर्व मुख्य भाषांतून त्याचे भाषांतर करण्यात आले. बायबलचे भाषांतर अनेकदा अत्यंत कठीण परिस्थितीत करण्यात आले, तेसुद्धा कित्येकदा सैतानाच्या हस्तकांकडून घातपाताची टांगती तलवार सतत डोक्यावर असताना. नक्कीच अगम्यपणे थोर अशा यहोवा देवाची इच्छा नसती, तर २,००० पेक्षा अधिक भाषांतून बायबलचे भाषांतर होऊच शकले नसते!

१३. एकोणीसशे चवदापासून यहोवाच्या राज्याच्या उद्देशांसंबंधाने यहोवाची महानता कशाप्रकारे प्रकट झाली आहे?

१३ यहोवाच्या राज्याविषयीच्या त्याच्या उद्देशांच्या संबंधातही त्याची थोरवी प्रकट झाली आहे. उदाहरणार्थ, सन १९१४ मध्ये त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त याला स्वर्गीय राजा म्हणून सिंहासनाधिष्ट केले. त्यानंतर काही काळातच, येशूने सैतान व त्याच्या दुरात्म्यांविरुद्ध कारवाई केली. त्यांची स्वर्गातून हकालपट्टी करण्यात आली व त्यांना पृथ्वीच्या क्षेत्रात फेकण्यात आले आणि आता ते येथेच असून अथांग डोहात टाकले जाण्याची वाट पाहत आहेत. (प्रकटीकरण १२:९-१२; २०:१-३) तेव्हापासून येशूच्या अभिषिक्‍त शिष्यांना अधिकच छळाला तोंड द्यावे लागले आहे. पण यहोवाने त्यांना ख्रिस्ताच्या अदृश्‍य उपस्थितीच्या या काळात सांभाळून ठेवले आहे.—मत्तय २४:३; प्रकटीकरण १२:१७.

१४. यहोवाने १९१९ साली कोणते आश्‍चर्यकारक कार्य केले आणि यामुळे काय साध्य झाले?

१४ यहोवाने १९१९ साली आणखी एक आश्‍चर्यकारक कार्य केले ज्यामुळे त्याची महानता दिसून आली. येशूचे अभिषिक्‍त अनुयायी, ज्यांचे आध्यात्मिक कार्य जवळजवळ ठप्प झाले होते, त्यांना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आले. (प्रकटीकरण ११:३-११) त्यानंतरच्या वर्षांत, या अभिषिक्‍त शिष्यांनी स्वर्गात स्थापन झालेल्या राज्याच्या सुवार्तेची आवेशाने घोषणा केली आहे. इतर अभिषिक्‍तांना एकत्रित करून १,४४,००० ही संख्या पूर्ण करण्यात आली. (प्रकटीकरण १४:१-३) आणि ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांच्या माध्यमाने यहोवाने ‘नव्या पृथ्वीचा,’ अर्थात एका नीतिमान मानवी समाजाचा पाया घातला आहे. (प्रकटीकरण २१:१) पण सर्व विश्‍वासू अभिषिक्‍त अनुयायी स्वर्गात गेल्यानंतर, या ‘नव्या पृथ्वीचे’ काय होईल?

१५. अभिषिक्‍त ख्रिश्‍चन आज कोणत्या कार्याचे नेतृत्व करत आहेत आणि याचा काय परिणाम घडून येत आहे?

१५ या नियतकालिकाच्या १९३५ सालच्या ऑगस्ट १ व ऑगस्ट १५ या अंकांत प्रकटीकरण अध्याय ७ मधील ‘मोठ्या लोकसमुदायाविषयी’ अग्रलेख प्रकाशित झाले होते. तेव्हापासून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यातून या सह विश्‍वासू शिष्यांना शोधून त्यांना आपल्या बंधुसमाजात सामील करण्यास आवेशीपणे सुरवात केली. या ‘मोठ्या लोकसमुदायात’ सामील असलेले, ‘मोठ्या संकटातून’ बचावून परादीसात ‘नव्या पृथ्वीचे’ कायमचे सदस्य म्हणून सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगतील. (प्रकटीकरण ७:९-१४) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यामुळे आज जवळजवळ ६० लाखापेक्षा जास्त लोक पृथ्वीवरील परादीसात सार्वकालिक जीवनाची आशा बाळगून आहेत. सैतान व त्याचे भ्रष्ट जग यांच्याकडून विरोध होत असतानाही ही जी वाढ होत चालली आहे तिचे श्रेय कोणाला मिळाले पाहिजे? (यशया ६०:२२; १ योहान ५:१९) केवळ यहोवाच आपल्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने हे सर्वकाही साध्य करू शकतो.—यशया ६०:२२; जखऱ्‍या ४:६.

यहोवाचा गौरवयुक्‍त प्रताप व वैभव

१६. मानव यहोवाच्या “वैभवाचा गौरवयुक्‍त प्रताप” प्रत्यक्ष का पाहू शकत नाहीत?

१६ यहोवाची “अद्‌भुतकृत्ये” व “पराक्रम” कोणत्याही स्वरूपाची असोत, त्यांचे कधीही विस्मरण होणार नाही. दाविदाने लिहिले: “एक पिढी दुसऱ्‍या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील. त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करितील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्‍त प्रताप व तुझी अद्‌भुतकृत्ये ह्‍यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करितील; मी तुझी थोरवी वर्णीन.” (स्तोत्र १४५:४-६) पण, “देव आत्मा आहे” आणि त्याअर्थी तो मानवांना दिसत नाही, मग दाविदाला यहोवाच्या गौरवयुक्‍त प्रतापाबद्दल अशी कितपत माहिती होती?—योहान १:१८; ४:२४.

१७, १८. ‘यहोवाचा गौरवयुक्‍त प्रताप व वैभव’ यांविषयी दाविदाची कदर कशाप्रकारे वाढू शकत होती?

१७ दावीद जरी यहोवाला पाहू शकत नव्हता तरीसुद्धा, यहोवाच्या वैभवाविषयी त्याची कदर वाढण्याचे अनेक मार्ग होते. तो देवाच्या पराक्रमांविषयी शास्त्रवचनांतील लिखित अहवाल वाचू शकत होता, उदाहरणार्थ, जागतिक जलप्रलयाद्वारे देवाने एका अभक्‍त जगाचा कशाप्रकारे नाश केला होता याविषयी तो वाचू शकत होता. तसेच, देवाने इस्राएलांना ईजिप्तच्या गुलामीतून सोडवले तेव्हा त्याने ईजिप्तच्या खोट्या देवतांना कशाप्रकारे नमवले हे देखील कदाचित त्याने वाचले असावे. या घटना यहोवाच्या वैभवाची व त्याच्या थोरवीची ग्वाही देतात.

१८ अर्थातच, शास्त्रवचनांचे केवळ वाचन करण्याद्वारे देवाच्या वैभवाविषयी दाविदाची कदर वाढली नाही, तर त्याने या शास्त्रवचनांवर मनन देखील केले. उदाहरणार्थ यहोवाने इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र दिले त्याप्रसंगी काय घडले याविषयी दाविदाने मनन केले असावे. आकाशात गडगडाट झाला, विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले आणि शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. सिनाय पर्वत थरथरू लागला आणि सर्व पर्वतावर धूर पसरला. पर्वताच्या पायथ्याशी जमलेल्या इस्राएलांनी, अग्नी व मेघांतून यहोवा देवदूताच्या माध्यमाने त्यांच्याशी बोलला तेव्हा, ती “दहा वचने” स्वतः ऐकली. (अनुवाद ४:३२-३६; ५:२२-२४; १०:४; निर्गम १९:१६-२०; प्रेषितांची कृत्ये ७:३८, ५३) यहोवाच्या महानतेचे केवढे हे भव्य प्रकटन! देवाचे वचन प्रिय मानणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीने हे अहवाल वाचून त्यांवर मनन केल्यास, ‘यहोवाचा गौरवयुक्‍त प्रताप व वैभव’ पाहून ती प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात, आज आपल्याजवळ संपूर्ण बायबल आहे, ज्यात यहोवाच्या महानतेची आपल्या मनावर कायमची छाप पाडणारे अनेक वैभवी दृष्टान्त आहेत.—यहेज्केल १:२६-२८; दानीएल ७:९, १०; प्रकटीकरण, अध्याय ४.

१९. यहोवाच्या वैभवाबद्दल आपली कदर कशामुळे वाढेल?

१९ देवाच्या वैभवाने प्रभावित होण्याचा आणखी एक मार्ग दाविदाजवळ होता आणि तो म्हणजे देवाने इस्राएलांना दिलेल्या नियमांचा अभ्यास करण्याद्वारे. (अनुवाद १७:१८-२०; स्तोत्र १९:७-११) यहोवाच्या नियमांचे पालन केल्यामुळे इस्राएल राष्ट्राला वैभव प्राप्त झाले आणि इतर सर्व राष्ट्रांपासून ते वेगळे ठरले. (अनुवाद ४:६-८) दाविदाप्रमाणेच, आपणही शास्त्रवचनांचे नियमितपणे वाचन केल्यास, त्यांवर मनन केल्यास आणि त्यांचा मनःपूर्वक अभ्यास केल्यास यहोवाच्या वैभवाविषयी आपली कदर उत्तरोत्तर वाढत जाईल.

यहोवाचे नैतिक गुण किती महान!

२०, २१. (अ) स्तोत्र १४५:७-९ ही वचने यहोवाच्या थोरवीची कोणत्या गुणांच्या संबंधाने प्रशंसा करतात? (ब) येथे उल्लेखलेल्या देवाच्या गुणांचा त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांवर कसा परिणाम होतो?

२० आपण पाहिल्याप्रमाणे, स्तोत्र १४५ यातील पहिली सहा वचने आपल्याला यहोवाच्या अगम्य थोरवीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींबद्दल त्याची स्तुती करण्याची कारणे सांगतात. ७-९ वचने यहोवाच्या नैतिक गुणांचा उल्लेख करून त्याच्या थोरवीचा महिमा वर्णितात. दावीद या वचनांत म्हणतो: “ते तुझ्या परमदयेची आठवण काढितील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करितील. परमेश्‍वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्‍वर सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.”

२१ येथे दावीद सर्वप्रथम यहोवाची परमदया व न्यायपरायणता या गुणांकडे लक्ष वेधतो; याच त्याच्या गुणांविषयी दियाबल सैतानाने वादविषय उभा केला होता. जे देवावर प्रेम करतात व स्वतःला त्याच्या शासनाच्या अधीन करतात, त्यांच्यावर या गुणांचा कसा परिणाम होतो? यहोवाची परमदया व त्याची न्यायपरायणता त्याच्या उपासकांना इतकी आनंदविते की त्यांना त्याची भरभरून स्तुती केल्याशिवाय राहावत नाही. शिवाय, यहोवा “सगळ्यांना” चांगला आहे. तेव्हा, आणखी बऱ्‍याच जणांना पश्‍चात्ताप करण्यास आणि खूप उशीर होण्याआधी खऱ्‍या देवाचे उपासक बनण्यास मदत होईल अशी आपण आशा करू शकतो.—प्रेषितांची कृत्ये १४:१५-१७.

२२. यहोवा आपल्या सेवकांशी कशाप्रकारे व्यवहार करतो?

२२ ‘परमेश्‍वराने मोशेच्या समोरून जाताना अशी घोषणा केली: “परमेश्‍वर, परमेश्‍वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर.”’ (निर्गम ३४:६) या गुणांचे दाविदानेही मोल जाणले. म्हणूनच तो म्हणू शकला: “परमेश्‍वर कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.” यहोवाची थोरवी अगम्य असली तरीसुद्धा तो आपल्या मानवी सेवकांशी दयाळूपणे व्यवहार करण्याद्वारे त्यांचा आदर करतो. तो क्षमाशील आहे आणि येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर पश्‍चात्तापी मानवांना क्षमा करण्यास तयार आहे. तसेच यहोवा मंदक्रोध देखील आहे, कारण त्याच्या नीतिमान नव्या जगात प्रवेश करण्यापासून जे गुणदोष त्याच्या सेवकांना रोखू शकतील अशा गुणदोषांवर मात करण्याकरता तो त्यांना संधी देतो.—२ पेत्र ३:९, १३, १४.

२३. पुढच्या लेखात आपण कोणत्या महत्त्वपूर्ण गुणाविषयी चर्चा करणार आहोत?

२३ दावीद देवाच्या प्रेमदयेची अर्थात एकनिष्ठ प्रीतीची स्तुती करतो. किंबहुना १४५ व्या स्तोत्रातील उरलेली वचने दाखवतात की यहोवा कशाप्रकारे हा गुण प्रदर्शित करतो आणि त्याचे एकनिष्ठ सेवक त्याच्या प्रेमदयेला कसा प्रतिसाद देतात. याविषयी पुढील लेखात चर्चा केली आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाची “प्रतिदिवशी” स्तुती करण्याच्या कोणत्या संधी आहेत?

• यहोवाची थोरवी अगम्य आहे हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

• यहोवाच्या गौरवयुक्‍त प्रतापाबद्दल आपल्याला वाटणारी कदर आपण कशी वाढवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

विश्‍वातील आकाशगंगा यहोवाच्या थोरवीचे वर्णन करतात

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Anglo-Australian Observatory, photograph by David Malin

[१२ पानांवरील चित्र]

येशू ख्रिस्ताच्या संबंधाने यहोवाची थोरवी कशाप्रकारे प्रकट झाली आहे?

[१३ पानांवरील चित्र]

सिनाय पर्वतावर इस्राएलांना नियमशास्त्र देण्यात आले तेव्हा त्यांना यहोवाच्या गौरवयुक्‍त प्रतापाचे दर्शन घडले