व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची प्रेमदया अफाट आहे

यहोवाची प्रेमदया अफाट आहे

यहोवाची प्रेमदया अफाट आहे

“[यहोवाची] प्रेमदया अफाट आहे.”—स्तोत्र १४५:८, NW.

१. देवाची प्रीती कोणा कोणाला सामावते?

“देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) हा वाक्यांश मनात सुखावह भावना उत्पन्‍न करतो आणि यहोवाची शासन करण्याची पद्धत प्रीतीवर आधारित आहे हे शाबीत करतो. खरे पाहता, जगात कितीतरी लोक यहोवाच्या आज्ञा जुमानत नाहीत; पण तरीसुद्धा त्याने प्रेमळपणे पुरवलेला सूर्यप्रकाश व पर्जन्य यांसारख्या नैसर्गिक तरतुदींचा त्यांनाही फायदा होतोच! (मत्तय ५:४४, ४५) देवाचे मानवजातीवर प्रेम असल्यामुळेच, त्याचे शत्रू देखील पश्‍चात्ताप करून त्याच्याकडे वळू शकतात व सार्वकालिक जीवन मिळवू शकतात. (योहान ३:१६) पण जे आपल्या दुष्टपणात निर्ढावलेले आहेत त्यांचा यहोवा लवकरच सर्वनाश करेल जेणेकरून त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या मानवांना एका नीतिमान नव्या जगात सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटता येईल.—स्तोत्र ३७:९-११, २९; २ पेत्र ३:१३.

२. आपल्या समर्पित सेवकांप्रती यहोवा कोणते खास प्रकारचे प्रेम व्यक्‍त करतो?

आपल्या खऱ्‍या उपासकांसाठी मात्र यहोवा एका खास, कायमस्वरूपी मार्गाने प्रीती व्यक्‍त करतो. इब्री भाषेतला एक शब्द या खास प्रीतीला सूचित करतो आणि त्याचे भाषांतर “प्रेमदया” अथवा “एकनिष्ठ प्रीती” असे केले जाऊ शकते. प्राचीन इस्राएलच्या राजा दाविदाला देवाच्या प्रेमदयेबद्दल मनस्वी कृतज्ञता होती. स्वतःच्या अनुभवामुळे आणि इतरांसोबत देवाने कशाप्रकारे व्यवहार केला याविषयी मनन केल्यामुळे दावीद आत्मविश्‍वासाने एका स्तोत्रात असे म्हणू शकला, “यहोवा कृपाळू व दयाळू आहे; तो मंदक्रोध आहे व त्याची प्रेमदया अफाट आहे.”—स्तोत्र १४५:८.

देवाचे एकनिष्ठ उपासक कोण आहेत?

३, ४. (अ) स्तोत्र १४५ यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांना ओळखण्यास कशाप्रकारे आपली मदत करते? (ब) देवाचे एकनिष्ठ उपासक त्याचा “धन्यवाद” करतात म्हणजे नेमके काय करतात?

यहोवा देवाबद्दल संदेष्टा शमुवेलची आई हन्‍ना हिने म्हटले: “तो आपल्या भक्‍तांची [“एकनिष्ठ जनांची,” NW] पावले संभाळील.” (१ शमुवेल २:९) हे “एकनिष्ठ जन” कोण आहेत? राजा दावीद या प्रश्‍नाचे उत्तर देतो. यहोवाच्या आश्‍चर्यकारक गुणांची प्रशंसा केल्यानंतर तो म्हणतो: “तुझे भक्‍त [“एकनिष्ठ जन,” NW] तुझा धन्यवाद करितात.” (स्तोत्र १४५:१०) मानव देवाचा धन्यवाद करतात म्हणजे नेमके काय करतात? तर ते त्याची स्तुती करतात किंवा त्याची प्रशंसा करतात.

यहोवाचे एकनिष्ठ जन कोण आहेत हे सहज ओळखता येते कारण ते आपल्या मुखाने यहोवाची प्रशंसा करतात. एकमेकांशी भेटीगाठी करताना आणि ख्रिस्ती सभांमध्ये त्यांच्या चर्चेचा मुख्य विषय कोणता असतो? अर्थात, यहोवाचे राज्य! दाविदाच्या भजनातल्या पुढील शब्दांप्रमाणेच देवाच्या एकनिष्ठ सेवकांच्या भावना आहेत: “ते तुझ्या [यहोवाच्या] राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करितात.”—स्तोत्र १४५:११.

५. यहोवाचे एकनिष्ठ सेवक त्याची प्रशंसा करतात तेव्हा तो दखल घेतो हे आपल्याला कसे कळते?

यहोवाचे एकनिष्ठ उपासक त्याची स्तुती करतात तेव्हा तो खरेच दखल घेतो का? होय, त्यांच्या प्रशंसोद्‌गारांकडे तो लक्ष देतो. आपल्या काळातील खऱ्‍या उपासनेशी संबंधित असलेल्या एका भविष्यवाणीत मलाखीने लिहिले: “तेव्हा परमेश्‍वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्‍वराने कान देऊन ऐकले व परमेश्‍वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” (मलाखी ३:१६) आपल्या एकनिष्ठ सेवकांना आपली स्तुती करताना यहोवा ऐकतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो त्यांना स्मरणात ठेवतो.

६. कोणते कार्य आपल्याला देवाच्या एकनिष्ठ जनांना ओळखण्यास साहाय्य करते?

यहोवाच्या एकनिष्ठ सेवकांना ओळखण्याचा आणखी एक मार्ग आहे. ते खऱ्‍या देवाचे उपासक नसलेल्या लोकांशी निर्भयपणे आणि स्वतः पुढाकार घेऊन देवाविषयी बोलतात. खरोखर, देवाचे एकनिष्ठ जन ‘त्याचे पराक्रम व त्याच्या राज्याचे वैभवयुक्‍त ऐश्‍वर्य मानवजातीस कळवतात.’ (स्तोत्र १४५:१२) तुम्ही देखील अनोळखी लोकांशी यहोवाच्या राज्याबद्दल बोलण्याच्या संधींचा पुरेपूर फायदा उठवता का? मानवी राज्ये लवकरच नामशेष होतील, पण यहोवाचे राज्यपद सार्वकालिक आहे. (१ तीमथ्य १:१७) लोकांनी यहोवाच्या सार्वकालिक राज्यपदाबद्दल शिकून त्याचे समर्थन करण्याची हीच वेळ आहे. दाविदाने म्हटले, “तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.”—स्तोत्र १४५:१३.

७, ८. सन १९१४ मध्ये काय घडले आणि देव आज त्याच्या पुत्राच्या राज्याच्या माध्यमाने शासन करत आहे याचा कोणता पुरावा आहे?

यहोवाच्या राज्यपदाविषयी लोकांना सांगण्याची आणखीनच जोरदार प्रेरणा आपल्याला १९१४ नंतर मिळाली आहे. त्या वर्षी, देवाने आपले स्वर्गीय मशीही राज्य स्थापन केले आणि दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त याला त्या राज्याचा राजा नियुक्‍त केले. अशारितीने, दाविदाचे राज्यत्व युगानुयुग टिकेल अशी जी यहोवाने प्रतिज्ञा केली होती ती त्याने पूर्ण केली.—२ शमुवेल ७:१२, १३; लूक १:३२, ३३.

आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या राज्याच्या माध्यमाने यहोवा आज शासन चालवत आहे; आणि येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाची सातत्याने पूर्णता होत असताना आपण पाहात आहोत हा या गोष्टीचा पुरावा आहे. देवाचे सर्व एकनिष्ठ सेवक एक कार्य करतील असे येशूने भाकीत केले होते आणि हे कार्य येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. येशूने म्हटले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:३-१४) देवाचे एकनिष्ठ जन या भविष्यवाणीची आवेशीपणे पूर्णता करत असल्यामुळे आता साठ लाखांपेक्षा जास्त स्त्रिया, पुरुष व मुले या भव्य कार्यात सहभागी होत आहेत; हे असे कार्य आहे, जे भविष्यात पुन्हा कधीही केले जाणार नाही. लवकरच यहोवाच्या राज्याच्या सर्व विरोधकांचा नाश होईल.—प्रकटीकरण ११:१५, १८.

यहोवाच्या सार्वभौमत्वाचा फायदा घेणे

९, १०. यहोवा व मानवी शासक यांच्यात कोणता फरक आहे?

आपण समर्पित ख्रिस्ती असल्यास, सार्वभौम प्रभू यहोवाच्या सोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. (स्तोत्र ७१:५; ११६:१२) आपण देवाचे भय धरतो आणि नीतिमत्तेने चालतो, त्यामुळे आपल्याला त्याची संमती प्राप्त होते आणि आध्यात्मिकरित्या आपण त्याच्या जवळ आहोत. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; याकोब ४:८) त्याउलट, मानवी शासक सहसा नामवंत लोकांच्या सहवासात आढळतात, उदाहरणार्थ, लष्करी नेते, श्रीमंत व्यापारी किंवा खेळक्रीडा व मनोरंजन विश्‍वातील ख्यातनाम व्यक्‍ती. आफ्रिकन वृत्तपत्र सोवीटन यात एका नामवंत सरकारी अधिकाऱ्‍याने त्या देशातील दारिद्र्‌यपूर्ण वसत्यांबद्दल असे विधान केले: “अशा भागांत जाण्यास बरेचजण का कचरतात हे मी समजू शकतो. याचे साधे कारण म्हणजे अशी परिस्थिती अस्तित्वात आहे हे खरे तर, आपण विसरू इच्छितो. ते दारिद्र्‌य पाहून आपल्या विवेकबुद्धीला बोचणी होते आणि आपल्या महागड्या मोटारींची आपल्याला लाज वाटू लागते.”

१० अर्थात, काही मानवी शासक त्यांच्या प्रजेच्या कल्याणासाठी खरोखर झटतात. पण सर्वात उदात्त मनाचा शासक देखील आपल्या प्रजाजनांना खऱ्‍या अर्थाने ओळखत नाही. कोणी असा प्रश्‍न विचारेल: असा खरेच कोणी शासक आहे का, जो आपल्या सर्व प्रजाजनांची काळजी वाहतो आणि त्याच्यापैकी कोणीही संकटात असल्यास लगेच त्याच्या मदतीला धावून येतो? होय असा शासक आहे. दाविदाने लिहिले: “पतन पावणाऱ्‍या सर्वांना परमेश्‍वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करितो.”—स्तोत्र १४५:१४.

११. देवाच्या एकनिष्ठ जनांवर कोणत्या परीक्षा येतात आणि त्यांना कोणती मदत उपलब्ध आहे?

११ यहोवाच्या एकनिष्ठ उपासकांवर अनेक परीक्षा व संकटे येतात; एकतर त्यांच्या स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळे आणि दुसरे म्हणजे ते अशा एका जगात राहात आहेत जे “दुष्टाला,” अर्थात सैतानाला वश झाले आहे. (१ योहान ५:१९; स्तोत्र ३४:१९) ख्रिस्ती लोकांचा छळ केला जातो. काहींना असाध्य रोगांमुळे किंवा एखाद्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे दुःख सहन करावे लागते. कधीकधी यहोवाच्या एकनिष्ठ जनांच्या चुकांमुळे ते निराशेने ‘वाकतात.’ पण त्यांच्यावर कोणतेही संकट आले तरीसुद्धा यहोवा त्यांच्यापैकी प्रत्येकाला सांत्वन व आध्यात्मिक बळ देण्यास तयार आहे. राजा येशू ख्रिस्त याला देखील त्याच्या सर्व एकनिष्ठ उपासकांविषयी अशीच प्रेमळ काळजी वाटते.—स्तोत्र ७२:१२-१४.

समयोचित तृप्तिदायक अन्‍न

१२, १३. ‘प्राणिमात्रांच्या’ गरजा यहोवा कशाप्रकारे पुरवतो?

१२ अफाट प्रेमदया दाखवणारा यहोवा देव आपल्या सेवकांच्या सर्व गरजा पुरवतो. यात त्यांना पौष्टिक अन्‍न देऊन तृप्त करणे देखील समाविष्ट आहे. राजा दाविदाने लिहिले: “सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्‍न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” (स्तोत्र १४५:१५, १६) संकटाच्या प्रसंगी देखील आपल्या एकनिष्ठ जनांना “रोजची भाकर” मिळावी म्हणून घटनांना वळण देण्यास यहोवा समर्थ आहे.—लूक ११:३; १२:२९, ३०.

१३ दाविदाने ‘प्राणिमात्र’ तृप्त होतात असा उल्लेख केला. यात पशूपक्षी देखील सामील आहेत. पृथ्वीवरील विपुल वनस्पती आणि समुद्रातील वनस्पती नसत्या तर समुद्रातील प्राणी, आकाशात उडणारे पक्षी आणि जमिनीवर राहणाऱ्‍या प्राण्यांना श्‍वास घेण्याकरता प्राणवायू नसता किंवा खाण्याकरता अन्‍नही नसते. (स्तोत्र १०४:१४) पण त्यांच्याही सर्व गरजा यहोवा तृप्त करतो.

१४, १५. आज आध्यात्मिक अन्‍न कशाप्रकारे पुरवले जात आहे?

१४ पण मानव, प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत; त्यांना आध्यात्मिक गरज देखील आहे. (मत्तय ५:३) यहोवा आपल्या एकनिष्ठ जनांच्या आध्यात्मिक गरजा किती अद्‌भुतरित्या तृप्त करतो! आपल्या मृत्यूआधी येशूने आश्‍वासन दिले की ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ त्याच्या अनुयायांना “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न देईल. (मत्तय २४:४५) १,४४,००० अभिषिक्‍त जनांपैकी शेषवर्ग आज हा दास वर्ग आहे. त्यांच्याद्वारे यहोवाने खरोखर विपुल प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न पुरवले आहे.

१५ उदाहरणार्थ, आज यहोवाच्या लोकांपैकी अनेकांना स्वतःच्या भाषेत बायबलचे नवे आणि अचूक भाषांतर मिळाल्यामुळे बराच फायदा झाला आहे. खरोखर, पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) हे किती अद्‌भुत आशीर्वाद ठरले आहे! शिवाय, ३०० पेक्षा जास्त भाषांतून बायबल अभ्यासाच्या साधनांच्या कोट्यवधी प्रती मुद्रित केल्या जात आहेत. हे सर्व आध्यात्मिक अन्‍न सबंध पृथ्वीवरील खऱ्‍या उपासकांकरता आशीर्वाद ठरले आहे. या सर्वाचे श्रेय कोणाला जाते? यहोवा देवाला. त्याच्या अफाट प्रेमदयेमुळे त्याने दास वर्गाला “यथाकाळी” हे अन्‍न पुरवण्यास समर्थ केले आहे. अशा तरतुदींद्वारे सध्याच्या आध्यात्मिक परादीसातील “प्राणिमात्रांची इच्छा” पुरी केली जात आहे. आणि लवकरच या पृथ्वीचे रूपांतर एका भौतिक परादिसात केले जाईल ही आशा देखील यहोवाच्या सेवकांकरता किती आनंदविणारी आहे!—लूक २३:४२, ४३.

१६, १७. (अ) यथाकाळी मिळालेल्या आध्यात्मिक अन्‍नाची कोणती उदाहरणे आहेत? (ब) सैतानाने उठवलेल्या मुख्य वादविषयाच्या संदर्भात, स्तोत्र १४५ देवाच्या एकनिष्ठ जनांच्या भावना कशाप्रकारे व्यक्‍त करते?

१६ यथाकाळी प्राप्त झालेल्या आध्यात्मिक अन्‍नाचे उल्लेखनीय उदाहरण विचारात घ्या. १९३९ साली युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्याच वर्षी, टेहळणी बुरूजच्या नोव्हेंबर १ च्या इंग्रजी अंकात “तटस्थता” या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला. त्यात सादर केलेल्या सुस्पष्ट माहितीमुळे सबंध जगातील यहोवाच्या साक्षीदारांना युद्धात सामील असलेल्या देशांच्या कारभारांत पूर्णपणे तटस्थ राहण्याचे महत्त्व ओळखता आले. यामुळे साहजिकच, सहा वर्षे चाललेल्या या युद्धात सामील असलेल्या दोन्ही बाजूंच्या सरकारांचा रोष त्यांनी ओढवला. त्यांच्यावर प्रतिबंध आला आणि त्यांचा छळ करण्यात आला तरीसुद्धा देवाच्या एकनिष्ठ जनांनी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार सुरू ठेवला. १९३९ ते १९४६ सालापर्यंत त्यांच्या संख्येत १५७ टक्क्यांची अद्‌भुत वाढ झाली. शिवाय, त्या युद्धादरम्यान त्यांनी राखलेल्या सचोटीचा लक्षवेधक अहवाल आजही लोकांना खरा धर्म ओळखण्यास मदत करत आहे.—यशया २:२-४.

१७ यहोवा जे आध्यात्मिक अन्‍न पुरवतो ते केवळ समयोचितच नाही तर अतिशय समाधानदायक देखील आहे. दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान राष्ट्रे युद्धात पूर्णपणे बुडालेली असताना यहोवाच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या तारणापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाच्या अशा एका मुद्द्‌यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यात आली. यहोवाने त्यांना हे समजण्यास मदत केली की सबंध विश्‍वाला गोवणारा मुख्य वादविषय यहोवाच्या न्याय्य सार्वभौमत्वासंबंधी आहे. प्रत्येक साक्षीदाराने आपल्या एकनिष्ठतेमुळे यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्यात आणि दियाबल लबाड आहे हे सिद्ध करण्यास लहानसा का होईना पण भाग घेतला हे जाणून किती समाधान मिळते! (नीतिसूत्रे २७:११) सैतान, यहोवाची व त्याच्या शासनपद्धतीची निंदा करतो, पण यहोवाचे एकनिष्ठ जन सातत्याने ही जाहीर घोषणा करत आहेत: “परमेश्‍वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे.”—स्तोत्र १४५:१७.

१८. समयोचित व अतिशय तृप्तिदायक अशा आध्यात्मिक अन्‍नाचे अलीकडचे कोणते उदाहरण देता येईल?

१८ समयोचित व तृप्तीदायक आध्यात्मिक अन्‍नाचे आणखी एक उदाहरण म्हणजे यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक, २००२/०३ साली संपन्‍न झालेल्या शेकडो “आवेशी राज्य उद्‌घोषक” प्रांतीय अधिवेशनांत प्रकाशित करण्यात आले. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ तयार केलेले आणि यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक यहोवा देवाच्या अद्‌भुत गुणांचे मुख्यतः वर्णन करते; यात स्तोत्र १४५ यात वर्णन केलेल्या त्याच्या गुणांचाही समावेश आहे. हे उत्तम पुस्तक देवाच्या एकनिष्ठ जनांना त्याच्या अधिकच जवळ येण्यास निश्‍चित सहायक ठरेल.

यहोवाच्या जवळ येण्याचा समय

१९. कोणती निर्णायक घडी येऊ घातली आहे आणि त्या प्रसंगाला आपण कसे तोंड देऊ शकतो?

१९ यहोवाच्या सार्वभौमत्वाचा वादविषय तडीस नेण्याच्या प्रक्रियेतला एक निर्णायक टप्पा येऊ घातला आहे. यहेज्केल अध्याय ३८ यात भाकीत केल्याप्रमाणे सैतान लवकरच “मागोगचा गोग” या नात्याने आपली भूमिका पूर्ण करणार आहे. यहोवाच्या लोकांवर एक जागतिक हल्ला केला जाईल. देवाच्या एकनिष्ठ जनांचा विश्‍वास खचवण्याचा हा सैतानाकडून शेवटला पूर्ण शक्‍तीनिशी केलेला प्रयत्न असेल. त्या घडीला, यहोवाच्या उपासकांना कधी नव्हे इतक्या अगतिकपणे त्याच्या मदतीकरता त्याचा धावा करावा लागेल, मदतीकरता अक्षरशः आक्रोश करावा लागेल. देवाबद्दल त्यांनी दाखवलेले श्रद्धापूर्ण भय आणि प्रीती व्यर्थ ठरेल का? निश्‍चितच नाही कारण स्तोत्र १४५ म्हणते: “जे कोणी त्याचा धावा करितात, जे खऱ्‍या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्‍यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. परमेश्‍वर आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो, पण सर्व दुर्जनांचा नाश करितो.”—स्तोत्र १४५:१८-२०.

२०. स्तोत्र १४५:१८-२० यातील शब्द नजीकच्या भविष्यात कशाप्रकारे खरे ठरतील?

२० यहोवा सर्व दुष्टांचा नाश करेल तेव्हा त्याच्या निकट असणे आणि त्याचे सामर्थ्यशाली संरक्षण अनुभवणे किती रोमांचक असेल! त्या निर्णायक घडीला, जी आता अतिशय जवळ आली आहे, यहोवा केवळ अशा लोकांचे ऐकेल “जे खऱ्‍या भावाने त्याचा धावा करितात.” ढोंग करणाऱ्‍यांचे तो मुळीच ऐकणार नाही. देवाचे वचन अगदी स्पष्टपणे दाखवते की दुष्टांनी शेवटल्या घडीला देवाच्या नावाचा धावा केला तरी ते नेहमीच व्यर्थ ठरते.—नीतिसूत्रे १:२८, २९; मीखा ३:४; लूक १३:२४, २५.

२१. देवाच्या नावाचा वापर करण्यास आपल्याला आनंद वाटतो हे यहोवाचे एकनिष्ठ जन कशाप्रकारे दाखवतात?

२१ यहोवाचे भय धरणाऱ्‍यांनी ‘खऱ्‍या भावाने त्याचा धावा करणे’ पूर्वी कधी नव्हते इतके आज महत्त्वाचे आहे. त्याचे एकनिष्ठ जन आपल्या प्रार्थनांमध्ये, आणि सभांमध्ये उत्तरे देताना त्याच्या नावाचा वापर करतात तेव्हा त्यांना आनंद वाटतो. एकमेकांशी बोलताना देखील ते यहोवाचे नाव घेतात. आणि आपल्या सार्वजनिक प्रचार कार्यात ते निर्भयतेने यहोवाचे नाव घोषित करतात.—रोमकर १०:१०, १३-१५.

२२. जगिक प्रवृत्ती व इच्छा आकांक्षा सातत्याने टाळणे महत्त्वाचे का आहे?

२२ यहोवा देवासोबतच्या आपल्या घनिष्ठ नातेसंबंधाचा फायदा आपल्याला होत राहण्याकरता, भौतिकवाद, अपकारक मनोरंजन, दुसऱ्‍यांना क्षमा न करण्याची प्रवृत्ती किंवा गरजू लोकांप्रती निष्काळजी प्रवृत्ती यांसारख्या आध्यात्मिकरित्या हानीकारक गोष्टी आपण सातत्याने टाळणे देखील महत्त्वाचे आहे. (१ योहान २:१५-१७; ३:१५-१७) अशा प्रवृत्तींना आळा न घातल्यास त्या गंभीर पापी आचरणाचे रूप घेऊ शकतात आणि यामुळे कालांतराने आपण यहोवाची संमती गमावून बसू शकतो. (१ योहान २:१, २; ३:६) आपण जर यहोवाला विश्‍वासू राहिलो तरच तो आपल्याला प्रेमदया अथवा एकनिष्ठ प्रीती दाखवेल हे आठवणीत ठेवणे शहाणपणाचे ठरेल.—२ शमुवेल २२:२६.

२३. देवाच्या सर्व एकनिष्ठ जनांकरता कोणते अद्‌भुत भविष्य राखून ठेवले आहे?

२३ तेव्हा, आपण यहोवाच्या सर्व एकनिष्ठ जनांकरता राखून ठेवलेल्या अद्‌भुत भवितव्यावर आपले लक्ष केंद्रित करूया. असे केल्यास, जे “प्रतिदिवशी,” नव्हे “सदासर्वकाळ” यहोवाची स्तुती, धन्यवाद, महिमा करतात त्यांच्यात सामील होण्याची सुसंधी आपल्याला मिळेल. (स्तोत्र १४५:१, २) तर मग आपण स्वतःला ‘सार्वकालिक जीवनासाठी देवाच्या प्रीतिमध्ये राखू.’ (यहूदा २०, २१) आपल्या स्वर्गीय पित्याच्या अद्‌भुत गुणांचा फायदा घेत असतानाच—ज्यात त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांप्रती तो जी प्रेमदया दाखवतो ती देखील समाविष्ट आहे—आपल्या भावना देखील स्तोत्र १४५ यातील दाविदाच्या शेवटल्या शब्दांप्रमाणे असोत. “माझे मुख परमेश्‍वराचे स्तवन करील; प्राणिमात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानयुग करो.”

तुम्ही कसे उत्तर द्याल?

स्तोत्र १४५ आपल्याला देवाच्या एकनिष्ठ जनांना ओळखण्यास कशी मदत करते?

• यहोवा सर्व ‘प्राणिमात्रांची इच्छा पुरी’ कशी करतो?

• यहोवाच्या जवळ येणे का गरजेचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

देवाच्या एकनिष्ठ जनांना त्याच्या पराक्रमांविषयी चर्चा करण्यास आनंद वाटतो

[१७ पानांवरील चित्र]

यहोवाचे सेवक त्याच्या गौरवयुक्‍त राज्यपदाविषयी शिकून घेण्यास अनोळखी लोकांना निर्भयपणे मदत करतात

[१८ पानांवरील चित्रे]

यहोवा सर्व ‘प्राणिमात्रांकरता’ अन्‍न पुरवतो

[चित्राचे श्रेय]

प्राणी: Parque de la Naturaleza de Cabárceno

[१९ पानांवरील चित्र]

यहोवा आपल्या एकनिष्ठ जनांना, अर्थात प्रार्थनेद्वारे त्याला मदतीची याचना करणाऱ्‍यांना सामर्थ्य व मार्गदर्शन पुरवतो