व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

उत्पत्ति ३८:१५, १६ मध्ये म्हटल्याप्रमाणे यहूदाने कोणत्या परिस्थितीमुळे, तो जिला वेश्‍या समजत होता तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले?

यहूदाने एका स्त्रीला वेश्‍या समजून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले हे खरे आहे; परंतु वास्तविकतेत ती स्त्री वेश्‍या नव्हती. उत्पत्तिच्या ३८ व्या अध्यायानुसार काय घडले ते पाहा.

यहूदाच्या ज्येष्ठ पुत्राला आपली पत्नी तामार हिच्याकडून मुले होण्याआधीच मारून टाकण्यात आले कारण तो “परमेश्‍वराच्या दृष्टीने दुष्ट होता.” (उत्पत्ति ३८:७) त्या वेळी, दीराबरोबर लग्न करण्याची प्रथा होती. एखादा पुरुष वारस उत्पन्‍न न करताच मरण पावला तर त्याच्या भावाने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून तिच्याशी संबंध ठेवायचे होते जेणेकरून ती वारस उत्पन्‍न करेल. परंतु यहूदाचा दुसरा पुत्र ओनान याने ही जबाबदारी झटकली. त्यामुळे देवाने त्याला ठार मारले. यहूदाने मग तामारला, आपला तिसरा मुलगा शेला वयात येईपर्यंत तिच्या वडिलांच्या घरी पाठवून दिले. परंतु अनेक वर्षे सरत गेली तरीसुद्धा यहूदाने शेलाचा विवाह तामारशी करून दिला नाही. त्यामुळे, जेव्हा यहूदाची पत्नी मरण पावली तेव्हा तामारने, आपला इस्राएली सासरा यहूदा याच्याकडून वंश चालू ठेवण्यासाठी एक युक्‍ती केली. तिने मंदिरातील वेश्‍येचे कपडे घातले आणि यहूदा ज्या मार्गावरून जात असे त्या मार्गावर ती बसून राहिली.

यहूदाने तामारला ओळखले नाही; त्याने तिच्याशी संबंध ठेवले. पण या बदल्यात तिनेही अतिशय चतुराईने त्याच्याकडून काही वस्तू मागितल्या व या वस्तुंद्वारे तिने नंतर शाबीत करून दाखवले की तिला त्याच्याकडून दिवस गेले होते. सत्य उघडकीस आल्यावर यहूदाने तामारला दोषी ठरवले नाही तर नम्रपणे म्हटले: “ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे; कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही.” आणि विशेष म्हणजे, “यापुढे त्याने कधी तिजशी संबध केला नाही.”—उत्पत्ति ३८:२६.

यहूदा चुकला होता; त्याने वचन दिल्याप्रमाणे आपला मुलगा शेला याचा विवाह तामारशी करून दिला नाही. शिवाय त्याने, मंदिरातील वेश्‍या समजून एका स्त्रीबरोबर लैंगिक संबंध ठेवला. विवाहाच्या चाकोरीत राहून लैंगिक संबंध ठेवण्याबद्दल देवाचा मनुष्यासाठी जो उद्देश होता त्याच्या हे विरुद्ध होते. (उत्पत्ति २:२४) त्याने ज्या स्त्रीबरोबर संबंध ठेवले ती वास्तविकतेत वेश्‍या नव्हती. उलट त्याने अजाणतेत, दिराबरोबर विवाह करण्याच्या प्रथेनुसार शेलाची जागा घेतली आणि तो वारसाचा कायदेशीर पिता झाला.

आणि निश्‍चितच तामारची ही वागणूक अनैतिक नव्हती. तिला झालेल्या जुळ्या मुलांना व्यभिचाराचे पुत्र समजण्यात आले नाही. बेथलेहामाच्या बोआजने दिराबरोबर विवाह करण्याच्या प्रथेनुसार मवाबी रूथशी लग्न केले तेव्हा बेथलेहेमाच्या वडिलांनी तामारचा पुत्र पेरेस याच्याविषयी चांगले मत मांडले; ते बवाजला म्हणाले: “तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्‍वर जे संतान देईल त्याच्या योगे होवो.” (रूथ ४:१२) पेरेसचे नाव येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत देखील येते.—मत्तय १:१-३; लूक ३:२३-३३.