व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा’

‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा’

‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा’

‘त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा.’ —लूक ११:१.

१. येशूच्या शिष्यांपैकी एकाने त्याला प्रार्थना करावयास शिकवण्याची विनंती का केली?

सा.यु. ३२ व्या शतकात, एके प्रसंगी येशू प्रार्थना करत असताना त्याच्या एका शिष्याने त्याचे निरीक्षण केले. येशू आपल्या पित्याला नेमके काय म्हणत होता हे त्याला ऐकू आले नाही कारण येशू कदाचित मनातल्या मनात प्रार्थना करत होता. पण येशूचे प्रार्थना करून झाल्यावर त्या शिष्याने त्याला म्हटले: ‘प्रभुजी, आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा.’ (लूक ११:१) अशी विनंती त्या शिष्याने का केली असावी बरे? यहुद्यांच्या जीवनात व उपासनेत प्रार्थनेला स्थान होते. इब्री शास्त्रवचनांतील स्तोत्रसंहिता व इतर पुस्तकांत कित्येक प्रार्थना लिखित आहेत. त्याअर्थी हा शिष्य, ज्याविषयी त्याला अजिबातच माहिती नव्हती किंवा जे त्याने पूर्वी कधीच केले नव्हते अशा विषयासंबंधी माहिती मागत नव्हता. यहुदी धर्मपुढाऱ्‍यांच्या औपचारिक प्रार्थनांशी तो नक्कीच परिचित असावा. पण या विशिष्ट प्रसंगी, येशू प्रार्थना करत असताना त्याने त्याचे निरीक्षण केले आणि रब्बींच्या आडंबरयुक्‍त प्रार्थना व येशूची प्रार्थना करण्याची पद्धत यात त्याला जमीन अस्मानाचा फरक असल्याचे आढळले.—मत्तय ६:५-८.

२. (अ) आदर्श प्रार्थना तोंडपाठ करून जशीच्या तशी म्हणण्यासाठी येशूने दिली नव्हती हे कशावरून सूचित होते? (ब) प्रार्थना कशी करावी हे जाणून घेण्यास आपण उत्सुक का आहोत?

या घटनेच्या जवळजवळ १८ महिन्यांपूर्वी डोंगरावरील उपदेश देत असताना येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थनेचा एक नमुना दिला होता; या नमुन्याच्या आधारावर ते प्रार्थना करू शकत होते. (मत्तय ६:९-१३) कदाचित त्या वेळी हा शिष्य उपस्थित नसावा. त्यामुळे, येशूने त्याच्या विनंतीला मान देऊन आदर्श प्रार्थनेतील मुख्य मुद्दे पुन्हा सांगितले. येथे एक गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे, ती अशी की येशूने आदर्श प्रार्थना जशीच्या तशी म्हणून दाखवली नाही. यावरून सूचित होते की, सार्वजनिक उपासनेत तोंडपाठ करून पुनरुच्चार करण्यासाठी येशूने ही प्रार्थना दिली नव्हती. (लूक ११:१-४) या निनावी शिष्याप्रमाणेच आपल्यालाही प्रार्थना कशी करावी हे शिकून घ्यायला आवडेल कारण आपल्या प्रार्थनांमुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ यावे असे आपल्यालाही वाटते. यासाठी, प्रेषित मत्तयाने अधिक सविस्तरपणे नोंदलेल्या आदर्श प्रार्थनेचे आपण परीक्षण करू या. या प्रार्थनेत एकूण सात विनंत्या आहेत; सातपैकी तीन देवाच्या उद्देशांशी निगडीत आहेत तर चार आपल्या ऐहिक आणि आध्यात्मिक गरजांशी संबंधित आहेत. या लेखात, आपण पहिल्या तीन विनंत्यांकडे लक्ष देणार आहोत.

प्रेमळ पिता

३, ४. यहोवाला “आमच्या पित्या” असे म्हणण्याद्वारे काय सूचित होते?

या प्रार्थनेच्या सुरवातीपासूनच येशूने दाखवले की आपल्या प्रार्थनांवरून यहोवासोबत आपला एक घनिष्ट, तरीसुद्धा आदरणीय नातेसंबंध आहे हे दिसून आले पाहिजे. येशूने खासकरून, त्या डोंगरावर आपल्याजवळ येऊन बसलेल्या शिष्यांना उद्देशून सांगितले की प्रार्थना करताना त्यांनी यहोवाला “हे आमच्या स्वर्गातील पित्या” असे म्हणावे. (मत्तय ६:९) एका विद्वानानुसार, येशू एकतर इब्री भाषेच्या एका लोकप्रिय बोलीत अथवा अरेमिक भाषेत बोलत असावा; “पित्या” हा जो शब्द त्याने वापरला तो त्या भाषेत ‘लहान मूल’ आपल्या वडिलांना प्रेमाने जशी हाक मारेल त्यासारखा आहे. यहोवाला “आमच्या पित्या” असे संबोधल्यामुळे त्याच्यासोबत आपला एक प्रेमळ, विश्‍वासाचा नातेसंबंध आहे हे सूचित होते.

“आमच्या पित्या” असे म्हणताना आपण आणखी एक गोष्ट कबूल करत असतो; ती अशी, की आपण अनेक स्त्रीपुरुष असलेल्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत, व ते सर्वजण यहोवाला आपला जीवनदाता म्हणून स्वीकारतात. (तिरपे वळण आमचे.) (यशया ६४:८; प्रेषितांची कृत्ये १७:२४, २८) आत्म्याने अभिषिक्‍त असलेले ख्रिस्ती “देवाचे पुत्र” म्हणून दत्तक घेण्यात आले आहेत आणि ते त्याला ‘अब्बा, बापा, अशी हाक मारू’ शकतात. (रोमकर ८:१४, १५) लाखो जण त्यांचे एकनिष्ठ साथीदार बनले आहेत. या लाखो जणांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करून पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याद्वारे हे सूचित केले आहे. ही “दुसरी मेंढरे” देखील येशूच्या नावाने यहोवाला प्रार्थना करू शकतात व त्याला “आमच्या पित्या” असे संबोधू शकतात. (योहान १०:१६; १४:६) आपण आपल्या स्वर्गीय पित्याला नियमितपणे प्रार्थना करून त्याने आपल्याप्रती दाखवलेल्या चांगुलपणाबद्दल त्याची उपकारस्तुती करू शकतो, आपल्या काळज्या, विवंचना त्याच्याजवळ व्यक्‍त करू शकतो, या आत्मविश्‍वासाने की तो आपली काळजी वाहतो.—फिलिप्पैकर ४:६, ७; १ पेत्र ५:६, ७.

यहोवाच्या नावाबद्दल प्रीती

५. आदर्श प्रार्थनेतील पहिली विनंती कोणती आहे आणि ती योग्य का आहे?

पहिली विनंती, सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला प्राधान्य देते. अर्थात: “तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) होय, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण हे आपल्याकरता सर्वात महत्त्वाचे असले पाहिजे कारण आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याच्या नावाची जी निंदा करण्यात आली आहे ती आपल्याला पाहवत नाही. सैतानाने विद्रोह केल्यामुळे व पहिल्या मानवी जोडप्याला यहोवा देवाची आज्ञा मोडण्यास उद्युक्‍त केल्यामुळे यहोवाच्या नावावर कलंक आला कारण यहोवा आपल्या सार्वभौमत्वाचा योग्यप्रकारे वापर करतो किंवा नाही अशी यामुळे शंका उपस्थित करण्यात आली. (उत्पत्ति ३:१-६) शिवाय, शतकानुशतके यहोवाच्या नावाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा दावा करणाऱ्‍या लोकांच्या लज्जास्पद कृत्यांमुळे व शिकवणुकींमुळेही त्याच्या नावाची बेअब्रू झाली आहे.

६. यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणाबद्दल प्रार्थना करताना आपण काय करणार नाही?

यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणाकरता आपण प्रार्थना करतो तेव्हा विश्‍वाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयात आपली भूमिका आपण स्पष्ट करतो—अर्थात, यहोवालाच या विश्‍वावर शासन करण्याचा अधिकार आहे या गोष्टीला आपले पूर्ण समर्थन असल्याचे आपण व्यक्‍त करतो. यहोवाची इच्छा आहे की या विश्‍वात अशा बुद्धिमान प्राण्यांनी वस्ती करावी ज्यांचे त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्या नावाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींवर प्रेम आहे; आणि या प्रेमाखातर जे त्याच्या नीतिमान सार्वभौमत्वाला स्वेच्छेने व आनंदाने अधीन होतात. (१ इतिहास २९:१०-१३; स्तोत्र ८:१; १४८:१३) यहोवाच्या नावाबद्दल असलेल्या प्रेमामुळे आपण आपोआपच अशी कोणतीही गोष्ट करण्यास धजणार नाही की जिच्यामुळे त्या पवित्र नावावर कलंक येऊ शकेल. (यहेज्केल ३६:२०, २१; रोमकर २:२१-२४) या विश्‍वाची व त्यातील रहिवाशांची शांती यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणावर व प्रेमामुळे त्याच्या सार्वभौमत्वाला अधीन होण्यावर अवलंबून आहे. त्याअर्थी, “तुझे नाव पवित्र मानिले जावो” ही प्रार्थना करण्याद्वारे आपण, यहोवाचा हा उद्देश अवश्‍य पूर्ण होईल व सबंध विश्‍वात त्याची स्तुती केली जाईल या गोष्टीबद्दल आपला आत्मविश्‍वास व्यक्‍त करतो.—यहेज्केल ३८:२३.

राज्याबद्दल प्रार्थना करणे

७, ८. (अ) येशूने ज्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवले ते राज्य काय आहे? (ब) दानीएल व प्रकटीकरण या पुस्तकांतून आपल्याला या राज्याविषयी कोणती माहिती मिळते?

आदर्श प्रार्थनेतील दुसरी विनंती ही आहे: “तुझे राज्य येवो.” (मत्तय ६:१०) ही विनंती पहिल्या विनंतीशी निगडित आहे. आपल्या पवित्र नामाचे पवित्रीकरण करण्याचे यहोवाचे माध्यम म्हणजे त्याचे मशीही राज्य होय. अर्थात, त्याचे स्वर्गीय राज्य ज्याचा नियुक्‍त राजा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा आहे. (स्तोत्र २:१-९) दानीएलाच्या भविष्यवाणीत मशीही राज्याला एका “पर्वतापासून” निघालेल्या ‘एका पाषाणाच्या’ रूपात चित्रित करण्यात आले आहे. (दानीएल २:३४, ३५, ४४, ४५) हे पर्वत यहोवाच्या वैश्‍विक सार्वभौमत्वाला सूचित करते. त्याअर्थी, राज्याचा पाषाण हा यहोवाच्या वैश्‍विक शासनाचे एक नवे प्रकटन होते. भविष्यवाणीत, नंतर हा पाषाण “एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापिली.” यावरून असे सूचित होते की पृथ्वीवर राज्य करत असताना मशीही राज्य देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिनिधीत्व करेल.

ख्रिस्तासोबत या राज्य शासनात आणखी १,४४,००० व्यक्‍ती आहेत, ज्यांना त्याच्यासोबत राजे व याजक या नात्याने शासन करण्याकरता “माणसातून विकत घेतलेले” आहे. (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१-४; २०:६) दानीएल यांना ‘परात्पर देवाचे पवित्र जन’ म्हणून संबोधतो. त्यांचा नेता ख्रिस्त याच्यासोबत त्यांना “राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव” देण्यात येईल व “त्यांचे राज्य सनातन आहे, सर्व सत्ताधीश त्यांची सेवा करितील, त्यांचे अंकित होतील.” (दानीएल ७:१३, १४, १८, २७) ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना ज्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवले त्या स्वर्गीय शासनाचे वरीलप्रमाणे वर्णन करता येईल.

राज्यासाठी अजूनही प्रार्थना करणे आवश्‍यक का?

९. देवाचे राज्य यावे अशी प्रार्थना करणे योग्य का आहे?

ख्रिस्ताने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेत त्याने आपल्याला देवाचे राज्य यावे म्हणून प्रार्थना करण्यास शिकवले. बायबलच्या भविष्यवाण्यांची पूर्णता, १९१४ साली मशीही राज्य स्वर्गात स्थापन झाल्याचे सूचित करते. * असे असताना, अजूनही राज्य “येवो” अशी प्रार्थना करणे योग्य आहे का? निश्‍चितच. कारण दानीएलाच्या भविष्यवाणीत, पाषाणाच्या रूपात चित्रित केलेले मशीही राज्य, मानवी राजकीय सरकारांवर (एका प्रचंड प्रतिमेच्या रूपात चित्रित) येऊन आदळण्याच्या बेतात आहे. हा पाषाण भविष्यात या प्रतिमेवर येऊन आदळेल व तिचा चुराडा करेल. दानीएलाच्या भविष्यवाणीप्रमाणे: “त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.

१०. देवाचे राज्य येण्याची आपण आतुरतेने वाट का पाहात आहोत?

१० देवाचे राज्य सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाविरुद्ध कारवाई करेल त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत कारण हे घडेल तेव्हा यहोवाच्या पवित्र नावाचे पवित्रीकरण होईल आणि देवाच्या सार्वभौमत्वाच्या सर्व विरोधकांचा नाश होईल. त्यामुळे “तुझे राज्य येवो” अशी आपण हिरीरीने प्रार्थना करतो आणि प्रेषित योहानासोबत आपणही म्हणतो: “आमेन. ये, प्रभु येशू, ये.” (प्रकटीकरण २२:२०) होय, आपली हीच प्रार्थना आहे की येशूने यावे व यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण व त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करावे जेणेकरून स्तोत्रकर्त्याच्या या पुढील शब्दांची पूर्णता व्हावी: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.

“तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”

११, १२. (अ) “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” अशी विनंती करताना आपण खरे तर कोणती प्रार्थना करत असतो? (ब) यहोवाच्या इच्छेप्रमाणे होवो अशी प्रार्थना करण्याद्वारे आणखी काय सूचित होते?

११ यानंतर येशूने आपल्या शिष्यांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले: “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) हे विश्‍व यहोवाच्या इच्छेनेच अस्तित्वात आले. स्वर्गातील शक्‍तिशाली प्राणी असे घोषित करतात: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटीकरण ४:११) ‘स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे त्या सर्वाकरता’ यहोवाचा एक निश्‍चित उद्देश आहे. (इफिसकर १:८-१०) देवाच्या इच्छेप्रमाणे होवो अशी प्रार्थना करताना आपण यहोवाला त्याचा हा उद्देश पूर्ण करण्याची विनंती करतो. शिवाय, असे करण्याद्वारे आपण दाखवतो की सबंध विश्‍वात जेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे घडेल त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहात आहोत.

१२ या प्रार्थनेद्वारे आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे जीवन व्यतीत करण्याची आपली तयारी देखील दर्शवतो. येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) येशूप्रमाणेच, समर्पित ख्रिस्ती या नात्याने आपण देखील देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद मानतो. यहोवाबद्दल व त्याच्या पुत्राबद्दल असलेल्या आपल्या प्रेमामुळे, आपण आपले जीवन “माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे” व्यतीत करण्यास प्रवृत्त होतो. (१ पेत्र ४:१, २; २ करिंथकर ५:१४, १५) ज्या गोष्टी यहोवाच्या इच्छेच्या विरोधात असल्याचे आपल्याला माहीत आहे, त्या गोष्टी करण्याचे आपण आवर्जून टाळतो. (१ थेस्सलनीकाकर ४:३-५) बायबल वाचन व अभ्यासाकरता वेळ विकत घेण्याद्वारे आपण ‘प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घेतो’ व यात ‘राज्याची सुवार्ता’ घोषित करण्याच्या कार्यात हिरीरीने भाग घेणे समाविष्ट आहे.—इफिसकर ५:१५-१७; मत्तय २४:१४.

स्वर्गात यहोवाच्या इच्छेप्रमाणे

१३. सैतानाने विद्रोह करण्याच्या कितीतरी काळाआधीपासूनच देवाच्या इच्छेप्रमाणे कशाप्रकारे घडत होते?

१३ यहोवाच्या एका आत्मिक पुत्राने विद्रोह केला व तो सैतान बनला, त्याआधी कितीतरी काळापासून स्वर्गात यहोवाच्याच इच्छेप्रमाणे घडत होते. नीतिसूत्रांच्या पुस्तकात देवाच्या ज्येष्ठ पुत्राला बुद्धीच्या रूपात चित्रित केले आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे, अगणित काळापासून देवाचा एकुलता एक पुत्र ‘त्याच्यासमोर सर्वदा हर्ष पावत असे,’ अर्थात, तो आनंदाने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करत होता. कालांतराने तो “आकाशात व पृथ्वीवर” करण्यात आलेल्या सर्व “दृश्‍य व अदृश्‍य” गोष्टींच्या निर्मितीत यहोवाचा “कुशल कारागीर” बनला. (नीतिसूत्रे ८:२२-३१; कलस्सैकर १:१५-१७) यहोवाने येशूचा उपयोग आपला शब्द अर्थात प्रवक्‍ता या नात्याने केला.—योहान १:१-३.

१४. देवदूत स्वर्गात यहोवाची इच्छा कशाप्रकारे पूर्ण करत आहेत याविषयी स्तोत्र १०३ यातून आपण काय शिकू शकतो?

१४ स्तोत्रकर्ता स्पष्ट करतो की यहोवाचे सार्वभौमत्व सर्वश्रेष्ठ असून असंख्य देवदूत त्याच्या निर्देशांचे व त्याच्या आज्ञांचे पालन करतात. आपण असे वाचतो: “परमेश्‍वराने आपले राजासन स्वर्गांत स्थापिले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्‍वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्‍न आहा, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्‍वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्‍वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्टपदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा, परमेश्‍वराचा धन्यवाद कर.”—स्तोत्र १०३:१९-२२.

१५. येशूला राज्याधिकार मिळाल्यामुळे स्वर्गात देवाच्या इच्छेप्रमाणे घडण्यासंबंधी काय साध्य झाले?

१५ सैतानाने विद्रोह केल्यानंतरही, ईयोबाच्या पुस्तकात सांगितल्यानुसार त्याला स्वर्गात जाण्याची मुभा होती. (ईयोब १:६-१२; २:१-७) पण प्रकटीकरणाच्या पुस्तकात भाकीत करण्यात आले की भविष्यात सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून बाहेर हाकलण्यात येईल. ही वेळ १९१४ साली येशू ख्रिस्ताला राज्याधिकार देण्यात आल्याच्या थोड्याच काळानंतर आली. त्यानंतर या विद्रोही प्राण्यांना स्वर्गात मुळीच थारा मिळाला नाही. ते पृथ्वीच्या क्षेत्रात बंदिस्त आहेत. (प्रकटीकरण १२:७-१२) स्वर्गात आता कोणतीही विरोधाची वाणी ऐकू येत नाही, केवळ ‘कोकऱ्‍याचा’ अर्थात येशू ख्रिस्ताचा जयजयकार करणाऱ्‍यांचा व यहोवाच्या अधीन होऊन त्याची स्तुती करणाऱ्‍यांचा आवाज ऐकू येतो. (प्रकटीकरण ४:९-११) यहोवाची इच्छा खरोखरच स्वर्गात पूर्ण होत आहे.

पृथ्वीकरता यहोवाची इच्छा

१६. मानवजातीच्या आशेविषयी ख्रिस्ती धर्मजगताची शिकवण कशाप्रकारे आदर्श प्रार्थनेच्या विरोधात आहे?

१६ ख्रिस्ती धर्मजगताचे चर्चेस देवाच्या उद्देशांत पृथ्वीचा समावेश करत नाहीत कारण सर्व चांगले लोक स्वर्गात जातात असा दावा ते करतात. पण येशूने अशी प्रार्थना करण्यास शिकवले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) हिंसाचार, अन्याय, रोगराई व मृत्यूने पीडित असलेल्या या पृथ्वीवर यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडत आहे असे म्हटल्यास, स्वप्नातही ते खरे वाटेल का? निश्‍चितच नाही. म्हणूनच आपण या पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे घडावे यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली पाहिजे. प्रेषित पेत्रानेही याच धर्तीवर हे आश्‍वासन नमूद केले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश [ख्रिस्ताचे मशीही राज्य सरकार] व नवी पृथ्वी [नीतिमान मानवी समाज] ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”—२ पेत्र ३:१३.

१७. या पृथ्वीकरता यहोवाचा काय उद्देश आहे?

१७ ही पृथ्वी निर्माण करण्यामागे यहोवाचा एक उद्देश होता. त्याने संदेष्टा यशयाला असे लिहिण्यास प्रेरित केले: “आकाशाचा उत्पन्‍नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली; हा परमेश्‍वर म्हणतो, मीच परमेश्‍वर आहे; अन्य कोणी नाही.” (यशया ४५:१८) देवाने पहिल्या मानवी जोडप्याला परादीसात ठेवले व त्यांना अशी आज्ञा केली: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ति १:२७, २८; २:१५) या पृथ्वीवर नीतिमान, परिपूर्ण मानवजातीने राहावे व यहोवाच्या सार्वभौमत्वाला आनंदाने अधीन होऊन, ख्रिस्ताने वचन दिलेल्या परादीसात त्यांनी सर्वकाळ जगावे हा निर्माणकर्त्याचा उद्देश आहे हे अगदी स्पष्ट आहे.—स्तोत्र ३७:११, २९; लूक २३:४३.

१८, १९. (अ) या पृथ्वीवर पूर्णार्थाने देवाच्या इच्छेप्रमाणे घडण्याकरता आधी काय करणे आवश्‍यक आहे? (ब) येशूच्या आदर्श प्रार्थनेचे आणखी कोणत्या पैलूंचे पुढील लेखात परीक्षण केले जाईल?

१८ यहोवाच्या सार्वभौमत्वाला झिडकारणारे स्त्रीपुरुष या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत या पृथ्वीकरता यहोवाची इच्छा कधीही पूर्णपणे साध्य होऊ शकत नाही. ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली शक्‍तिशाली आत्मिक सैन्यांचा उपयोग करून देव “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करेल. सैतानाची संपूर्ण दुष्ट व्यवस्था, त्यातील खोटा धर्म, भ्रष्ट राजकारण, स्वार्थी व बेईमान व्यापारविश्‍व आणि विघातक लष्करी संस्था कायमचे अस्तित्वातून जातील. (प्रकटीकरण ११:१८; १८:२१; १९:१, २, ११-१८) यहोवाचे सार्वभौमत्व निर्विवादपणे स्थापित केले जाईल आणि त्याचे नाव पवित्र केले जाईल. “आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” अशी प्रार्थना करताना आपण वरील गोष्टी घडण्याची विनंती करत असतो.—मत्तय ६:९, १०.

१९ पण आदर्श प्रार्थनेद्वारे येशूने दाखवले की आपण प्रार्थनेत वैयक्‍तिक गोष्टींचाही उल्लेख करू शकतो. प्रार्थनेसंबंधी त्याने दिलेल्या मार्गदर्शनाचे हे विशिष्ट पैलू आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

[तळटीप]

^ परि. 9 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) या पुस्तकातील ६ वा अध्याय पाहा.

उजळणी

• यहोवाला “आमच्या पित्या” असे संबोधणे का योग्य आहे?

• यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणासंबंधी प्रार्थना करणे सर्वात महत्त्वाचे का आहे?

• देवाचे राज्य यावे अशी प्रार्थना आपण का करतो?

• जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही देवाच्या इच्छेप्रमाणे घडावे अशी प्रार्थना करण्याद्वारे काय सूचित होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

परुशांच्या आडंबरयुक्‍त प्रार्थनांपेक्षा येशूच्या प्रार्थना खूप वेगळ्या होत्या

[१० पानांवरील चित्र]

देवाचे राज्य यावे, त्याचे नाव पवित्र मानले जावे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे घडावे यासाठी ख्रिस्ती प्रार्थना करतात