प्रामाणिक विवेकभाव
प्रामाणिक विवेकभाव
एकदा, कामाहून घरी परतताना, केनिया विद्यापीठात कामाला असलेल्या चार्ल्झ यांचा मोबाईल हरवला. केनियात, मोबाईल फोन अजूनही एक महागडी वस्तू समजली जाते.
चार्ल्झ म्हणतात, “तो [फोन] कोणी मला आणून देईल असं मला वाटलंच नाही.” परंतु, काही दिवसांनंतर, केनियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातून त्यांना एक फोन आला. त्यांना फोनवर जे सांगण्यात आले त्यावर त्यांचा विश्वासच बसेना! तुम्ही येऊन आपला फोन घेऊन जा, असे त्यांना सांगण्यात आले. त्याचे असे झाले की, चार्ल्झसोबत त्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका पूर्ण-वेळेच्या सेवकाला हा फोन मिळाला. तो फोन कोणाचा असावा हे शोधण्याकरता त्या सेवकाने शाखा दफ्तराला तो फोन आणून दिला आणि तेथील स्वयंसेवकांनी शेवटी फोनवरचा नंबर पाहून चार्ल्झचा पत्ता लावला.
चार्ल्झ यांनी शाखा दफ्तराला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले: “मला शोधणे कठीण असतानाही तुम्ही माझा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून मी कृतज्ञ आहे. ज्यांना माझा फोन मिळाला व ज्यांनी माझा शोध लावून तो मला परत केला त्या तुमच्या संघटनेच्या सदस्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आज प्रामाणिक व्यक्ती पाहायला मिळत नाहीत पण यहोवा देवाचे खरे साक्षीदार म्हणून वेगळे दिसणारे असे मोजके लोक पाहून फार बरे वाटते.”
यहोवाचे साक्षीदार सगळीकडे प्रामाणिकतेसाठी प्रसिद्ध आहेत. ते प्रेषित पौलाचे अनुकरण करतात, ज्याने म्हटले: “सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला [“प्रामाणिक,” NW] आहे अशी आमची खातरी आहे.” (इब्री लोकांस १३:१८; १ करिंथकर ११:१) त्यांना माहीत आहे की अशा वर्तणुकीने यहोवा देवाचे गौरव होते; याविषयी येशूने म्हटले: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्में पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे.”—मत्तय ५:१६.