व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची प्रेमळ-दया व काळजी अनुभवणे

यहोवाची प्रेमळ-दया व काळजी अनुभवणे

जीवन कथा

यहोवाची प्रेमळ-दया व काळजी अनुभवणे

फे किंग यांच्याद्वारे कथित

माझे आईबाबा स्वभावाने दयाळू होते पण इतर अनेकांप्रमाणे त्यांनाही धर्मात मुळीच रस नव्हता. आई म्हणायची: “कोणीतरी देव असेलच, नाहीतर, ही फुलं, ही झाडं कोणी बनवलीत?” बस्सं, इतकेच. या उपर ती धर्माविषयी काही विचार करायचीच नाही.

मी ११ वर्षांची होते तेव्हा, म्हणजे १९३९ साली बाबा मरण पावले; मी आईबरोबर इंग्लंडमधील मॅनचेस्टरच्या दक्षिणेकडील स्टॉकपोर्ट येथे राहत होते. मला पहिल्यापासून, माझ्या निर्माणकर्त्याविषयी जाणून घ्यायची इच्छा होती, मला तशी बायबलची काहीच माहिती नव्हती तरीपण मी त्याचा आदर करायचे. त्यामुळे त्याविषयी अधिक समजून घेण्याकरता मी चर्च ऑफ इंग्लंडला जाण्याचं ठरवलं.

चर्च सेवांचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही; परंतु बायबलमधून शुभवर्तमान अहवाल वाचले जायचे तेव्हा येशूच्या शब्दांवरून माझी खात्री पटू लागली, की बायबलच सत्य असावे. पण आता मी विचार करते तेव्हा मला एक गोष्ट विचित्र वाटते, की मी स्वतःहून कधी बायबल वाचले नाही. शिवाय, आमच्या एका ओळखीच्या बाईनं मला आधुनिक भाषेतला “नवा करार” दिला तेव्हाही मी तो कधी वाचला नाही.

१९५० साली कोरियन युद्धाचा उद्रेक झाला तेव्हा मात्र माझ्या मनात अनेक प्रश्‍न आले. दुसऱ्‍या महायुद्धाप्रमाणे हे युद्धसुद्धा सर्वत्र पसरत राहील का? झालेच तर, मी येशूने आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याची जी आज्ञा दिली आहे ती कशी काय पाळू शकेन? पण, परकीयांना माझ्या देशावर कब्जा करत असताना मी फक्‍त पाहत कशी राहू, त्यांना रोखण्यासाठी मी काहीच करू नये? जर मी असे केले तर मी माझी जबाबदारी टाळतेय असेच होईल. माझी अशी द्विधा मनःस्थिती झाली होती तरीपण मला एका गोष्टीची मात्र खात्री होती, की माझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे बायबलमध्ये नक्कीच असली पाहिजेत; फक्‍त कुठे आहेत आणि ती कशी शोधायची हे मला माहीत नव्हतं.

ऑस्ट्रेलियात सत्याचा शोध

१९५४ साली, आम्ही दोघी मायलेकींनी, माझी मोठी बहीण जीन राहत होती तेथे म्हणजे ऑस्ट्रेलियात राहायला जायचं ठरवलं. तिथं गेल्यावर काही वर्षांनंतर जीननं मला सांगितलं, की तुला बायबलमध्ये आवड आहे आणि तू चर्चला जातेस त्यामुळे मी यहोवाच्या साक्षीदारांना तुझी भेट घ्यायला सांगितलं आहे. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल माझं काय मत आहे हे तिला ऐकायचं होतं. तिनं मला सांगितलं: “यहोवाचे साक्षीदार देत असलेली स्पष्टीकरणे बरोबर आहेत की चूक आहेत हे मला माहीत नाही पण, ते निदान स्पष्टीकरणे तरी देतात, चर्चमध्ये तर तेवढंही करत नाहीत.”

मला भेटायला आलेले बिल आणि लिंडा खूप चांगले होते. त्या दोघांनीही साठी ओलांडली होती व ते अनेक वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार होते. ॲडलेडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या आकाशवाणी केंद्रात त्यांनी काम केलं होतं आणि दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी होती तेव्हा त्यांनी पूर्ण वेळचे सुवार्तिक म्हणून सेवा केली होती. बिल आणि लिंडा मला खूप मदत करायचे, पण त्यासोबतच मीही वेगवेगळ्या धर्मांचं परीक्षण चालूच ठेवलं.

माझ्याबरोबर काम करणाऱ्‍या एकानं मला बिली ग्रॅहम नावाच्या एका सुवार्तिकाच्या सभेला नेलं; मग तुमचे काही प्रश्‍न असतील तर विचारा असे पाळकाने विचारल्यावर आमच्यातील काहीजण त्यांच्याकडे गेलो. मला सतावत असलेला प्रश्‍न मी त्यांना विचारला: “युद्धात भाग घेऊन आपल्या शत्रूंना ठार मारल्यावरसुद्धा आपण स्वतःला ख्रिस्ती कसे काय म्हणवून घेऊ शकतो आणि आपल्या शत्रूंवर प्रेम कसे करू शकतो?” जमलेल्या लोकांनी लगेच मला साथ दिली; कारण त्यांनाही हा प्रश्‍न सतावत होता. काही वेळानंतर पाळकाने म्हटले: “मला या प्रश्‍नाचं उत्तर माहीत नाही. मी अजूनही या प्रश्‍नाचा विचार करतोय.”

इकडे बिल आणि लिंडाबरोबर माझा बायबलचा अभ्यास चालू होता; मग १९५८ सालच्या सप्टेंबर महिन्यात मी बाप्तिस्मा घेतला. बिल आणि लिंडाप्रमाणे होण्याचा मी निर्धार केल्यामुळे पुढील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून मी सामान्य पायनियर अर्थात पूर्ण वेळेची सुवार्तिक म्हणून सेवा सुरू केली. आठ महिन्यांनंतर मला खास पायनियर होण्याचे निमंत्रण देण्यात आले. माझी बहीण जीन हिनं देखील अभ्यासात प्रगती करून बाप्तिस्मा घेतला होता, हे ऐकून मला खूप आनंद झाला.

संधीचे द्वार उघडण्यात येते

मी सिडनीतील एका मंडळीशी सहवास राखून होते आणि अनेक गृह बायबल अभ्यास चालवत होते. एके दिवशी मी चर्च ऑफ इंग्लंडच्या एका निवृत्त पाळकांना भेटले आणि त्यांना विचारलं, की जगाच्या अंताविषयी चर्च काय शिकवते. त्यांनी मला सांगितलं, की ते गेल्या ५० वर्षांपासून चर्चच्या शिकवणी देत होतो; परंतु मी विचारलेल्या प्रश्‍नाचं त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून मी थक्क झाले; ते म्हणाले: “मला संशोधन करायला वेळ लागेल कारण यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणे मला बायबलची माहिती नाही.”

ही घटना घडल्यानंतर काही दिवसांतच, पाकिस्तानमध्ये स्वेच्छेने सेवा करू इच्छिणाऱ्‍यांसाठी एक आमंत्रण आले. हे आमंत्रण अविवाहित स्त्रियांसाठी नव्हे तर फक्‍त अविवाहित पुरूषांसाठी किंवा विवाहित जोडप्यांसाठी आहे, हे मला माहीत नसल्यामुळे मी माझं नाव दिलं. मला वाटतं, की माझा अर्ज ब्रुकलिन मुख्यालयास पाठवण्यात आला कारण, मला लगेच एक पत्र मिळाले ज्यात म्हटले होते, की भारतातील बॉम्बे (आता मुंबई) येथे एक जागा आहे तुम्ही ती स्वीकारण्यास तयार आहात का. ही १९६२ सालची गोष्ट आहे. मी होकार दिला आणि दीड वर्षांसाठी मुंबईत राहिले व त्यानंतर अलाहाबादला गेले.

मी हिंदी भाषा शिकण्याचा निश्‍चय केला. या भारतीय भाषेत सहसा जसे शब्द लिहिले जातात त्याचप्रकारे उच्चारलेही जातात त्यामुळे त्यावर प्रभुत्व मिळवणं इतकं कठीण नाही. परंतु, घरमालक जेव्हा मला, त्याच्या भाषेत बोलण्यापेक्षा इंग्रजीतच बोला असे सांगायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. या नव्या राष्ट्रात माझ्यासमोर अनेक लक्षवेधक व प्रेरणादायक आव्हाने आली; शिवाय, ऑस्ट्रेलियाहून आलेल्या सहसाक्षीदारांच्या सहवासाचा देखील मी आनंद लुटला.

तरुण असताना मी लग्नाचा विचार केला होता परंतु माझा बाप्तिस्मा होईपर्यंत, मी यहोवाच्या सेवेत इतकी व्यस्त होऊन गेले होते, की मला लग्नाविषयी आणखी विचार करायला वेळ मिळाला नाही. पण पुन्हा मला जीवनात एका सोबत्याची गरज भासू लागली होती. अर्थातच, त्यासाठी मला माझी विदेशातील नेमणूक सोडायची इच्छा नव्हती, त्यामुळे मी ही गोष्ट यहोवापुढे मांडली आणि मग त्याच्याविषयी विचार करायचं सोडून दिलं.

अनपेक्षित आशीर्वाद

बंधू एडवीन स्कीनर त्या वेळी भारत शाखेच्या कार्यावर देखरेख करायचे. ते, इतर अनेक विश्‍वासू बांधवांबरोबर आणि चीनला नेमण्यात आलेल्या हॅरल्ड किंग व स्टॅन्ली जोन्स यांच्याबरोबर, १९४६ साली वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या आठव्या वर्गात उपस्थित होते. * १९५८ साली हॅरल्ड व स्टॅन्ली यांना शांघायमध्ये प्रचार कार्य केल्याबद्दल एकांतवासात डांबण्यात आले होते. १९६३ साली हॅरल्ड यांची सुटका झाल्यानंतर एडवीन स्कीनरनं त्यांना पत्र लिहिलं. संयुक्‍त संस्थाने आणि ब्रिटनहून हाँगकाँग येथे आल्यावर हॅरल्डनं त्यांच्या पत्राचं उत्तर दिलं आणि लग्न करण्याची आपली इच्छा व्यक्‍त केली. त्यांनी एडवीन यांना सांगितलं, की तुरुंगात असताना मी याविषयी यहोवाला प्रार्थना केली होती. आणि बंधू एडवीन यांना असं विचारलं, की माझ्यासाठी सुयोग्य साथीदार ठरेल अशा कोणा साक्षीदाराला तुम्ही ओळखता का.

भारतातील बहुतेक विवाह जुळवले जातात आणि एडवीन यांना अनेक वेळा असे विवाह जुळवण्यास सांगितले जायचे, परंतु त्यांनी नेहमी याला नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी हॅरल्ड यांचं पत्र रूथ मॅके या भगिनीला दिलं; या भगिनीचे पती, होमर तेव्हा प्रवासी पर्यवेक्षक होते. कालांतराने रूथनं मला पत्र लिहून सांगितलं, की अनेक वर्षांपासून सत्यात असलेला एक मिशनरी बांधव लग्न करू इच्छितोय तर तुला त्याच्याशी पत्र व्यवहार करायला आवडेल का. रूथनं मला तो बांधव कोण होता किंवा काय याविषयी जास्त काही सांगितलं नाही.

सोबत्याविषयी मी केलेल्या प्रार्थनेविषयी यहोवाला सोडून इतर कोणाला माहीत नव्हतं; आणि जेव्हा हे स्थळ आलं तेव्हा मी सुरवातीला नकार देणार होते. तरीपण मी जितका याचा विचार करू लागले तितके मला तीव्रपणे वाटू लागले, की यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर आपल्याला वाटते त्या मार्गाने फार क्वचित वेळा देतो. त्यामुळे मी रुथला लिहून सांगितलं, की जोपर्यंत मी त्या बांधवाशी विवाह करण्यास बांधील नाही तोपर्यंत ती त्या बांधवाला मला पत्र लिहायला सांगू शकते. दुसरं पत्र हॅरल्ड किंग यांच्याकडून मला आलं.

चीनमध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हॅरल्ड यांचे फोटो आणि त्यांची कथा अनेक बातमीपत्रांमध्ये व मासिकांमध्ये छापून आली होती. संपूर्ण जगात ते सुप्रसिद्ध झाले होते परंतु त्यांच्या विश्‍वासू ईश्‍वरशासित सेवेचा रेकॉर्ड पाहून मी प्रभावित झाले. आम्ही पाच महिने एकमेकांशी पत्रव्यवहार केला आणि मग मी हाँगकाँगला गेले. ऑक्टोबर ५, १९६५ रोजी आमचं लग्न झालं.

लग्न करायची व पूर्ण वेळेच्या सेवेमध्ये राहायची आमच्या दोघांचीही इच्छा होती व जसजसं आमचं वय वाढत चाललं होतं तसतसं आम्हाला सहचार्याची आणखीनच गरज भासू लागली. हॅरल्ड यांच्याविषयी माझं प्रेम वाढू लागलं, लोकांबरोबर ते कसे दयाळुपणे व विचारीपणे वागायचे, आमच्या सेवेमध्ये समस्या यायच्या तेव्हा त्या समस्या ते कसे हाताळायचे हे सर्व पाहून मी मनापासून त्यांचा आदर करू लागले. २७ वर्षं आम्ही सुखाने नांदलो शिवाय यहोवाकडून अनेक आशीर्वादही आम्हाला मिळाले.

चिनी लोक खूप कष्टाळू लोक आहेत; मला ते खूप आवडतात. हाँगकाँगमध्ये कॅन्टोनीझ भाषा बोलली जाते; या चिनी पोटभाषेत मॅन्डरिनपेक्षा अनेक स्वर किंवा चढउतार आहेत जे शिकायला खूप अवघड आहेत. आम्ही दोघा पतीपत्नीनं, यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातील मिशनरी गृहात आमच्या वैवाहिक जीवनाला सुरवात केली; त्यानंतर आम्ही हाँगकाँगच्या विविध भागांमध्ये सेवा केली. आमचं सर्वकाही सुरळीत चाललं होतं; मग, १९७६ मध्ये मी गंभीररीत्या आजारी पडले.

आरोग्य समस्या हाताळणे

मला काही महिन्यांपासून रक्‍तस्राव होत होता आणि माझं रक्‍त खूपच कमी झालं होतं. माझ्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्‍यकता होती, पण मला ज्या इस्पितळात नेण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, की त्यांनी जर रक्‍ताविना शस्त्रक्रिया केली तर आघातामुळे ते माझ्या जीवावर बेतू शकते; त्यामुळे रक्‍ताविना शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टर तयार नव्हते. एके दिवशी तिथले डॉक्टर माझ्या केसची चर्चा करत होते तेव्हा तिथल्या नर्सेसनं माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला, त्या मला म्हणाल्या की मी विनाकारण माझा जीव धोक्यात घालत होते. त्या दिवशी १२ शस्त्रक्रियांची योजना करण्यात आली होती; त्यांपैकी १० गर्भपात होते; पण मी एक गोष्ट पाहिली, की आपल्या बाळाचा जीव घेणाऱ्‍या त्या गर्भवती स्त्रियांना एकानंही अडवलं नाही.

शेवटी, हॅरल्ड यांनी लिहून दिलं ज्यात म्हटलं होतं की जर का मी मेलेच तर इस्पितळ याला जबाबदार नाही; तेव्हा कुठे डॉक्टर माझ्यावर शस्त्रक्रिया करायला तयार झाले. मला शस्त्रक्रियेच्या खोलीत नेण्यात आले आणि भूल देण्याची तयारी सुरू झाली. परंतु शेवटल्या मिनिटाला, भूल देणाऱ्‍या डॉक्टरनं नकार दिला आणि मला डिस्चार्ज देण्यात आला.

मग आम्ही दुसऱ्‍या एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेलो. माझी गंभीर अवस्था ओळखून त्यांनी, आमच्याकडून किती पैसे घेतले होते हे आम्ही कोणाला सांगणार नाही या अटीवर अगदी कमी पैशात माझ्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली—विशेष म्हणजे रक्‍ताचा वापर न करता! त्या विशिष्ट समयी हॅरल्ड व मी यहोवाची प्रेमळ-दया आणि काळजी अनुभवली.

१९९२ साली हॅरल्ड यांना असाध्य रोग जडला. आम्ही शाखा दफ्तरात राहायला गेलो; तिथं सर्वांनी आमची प्रेमानं काळजी घेतली. मग १९९३ साली वयाच्या ८१ व्या वर्षी माझ्या प्रिय हॅरल्डनं पृथ्वीवरील आपली सेवा समाप्त केली.

इंग्लंडला परतणे

मला हाँगकाँग बेथेल कुटुंबाची सदस्या म्हणून राहायला आवडत होते, पण तिथल्या उष्ण व दमट वातावरणाचा मला त्रास होऊ लागला. अचानक, ब्रुकलिन मुख्यालयातून मला एक पत्र मिळालं; त्यात मला विचारण्यात आलं होतं, की तुमच्या तब्येतीचा विचार करून, तुम्ही अधिक प्रमाणात आरोग्य-सेवा असलेल्या शाखा संकुलात राहू इच्छिता का. म्हणून मग २००० साली मी इंग्लंडला परतून लंडनमधील बेथेल कुटुंबात राहायला गेले. ही खरोखरच खूप प्रेमळ योजना होती! माझं प्रेमानं स्वागत करण्यात आलं; मला वेगवेगळ्या नेमणुका करायला तसेच बेथेल कुटुंबाच्या पुस्तकालयाची व त्यातील २,००० खंडांची काळजी घ्यायला खूप आवडतं.

मी लंडनमधील चिनी मंडळीत जाते; इथं पुष्कळ गोष्टी बदलल्या आहेत. आजकाल, खूप कमी लोक हाँगकाँगहून येतात, अधिकतर मेनलँड चीनहून येतात. ते मॅन्डरिन भाषा बोलतात, यामुळे प्रचार कार्य करताना हे एक नवीन आव्हान आहे. शिवाय, संपूर्ण देशांत, चीनहून आलेल्या अनेक आस्थेवाईक पदवीधर विद्यार्थ्यांबरोबर बायबल अभ्यास संचालित केले जात असल्याचे अहवाल आहेत. हे विद्यार्थी कष्टाळू आहेत आणि ते शिकत असलेले बायबल सत्य त्यांना खरोखरच आवडते. त्यांना मदत करण्यात खूप आनंद मिळतो.

माझ्या नव्या घराच्या शांत वातावरणात मी पुष्कळदा माझ्या आनंदी जीवनाचा विचार करत असते आणि यहोवाने किती मार्गांनी आम्हाला प्रेमळ-दया दाखवली होती त्याचे मला आश्‍चर्य वाटते. त्याची प्रेमळ-दया त्याच्या उद्देशांच्या संबंधाने असलेल्या सर्व गोष्टींमधून दिसून येते, शिवाय तो आपल्या प्रत्येक सेवकाची कशी काळजी घेतो हेही स्पष्ट दिसते. त्यानं माझी अतिशय प्रेमानं काळजी घेतल्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानते.—१ पेत्र ५:६, ७.

[तळटीप]

^ परि. 19 या दोन मिशनऱ्‍यांच्या जीवन कथा, इंग्रजीतील टेहळणी बुरूज जुलै १५, १९६३, पृष्ठे ४३७-४२ आणि डिसेंबर १५, १९६५, पृष्ठे ७५६-६७ वर पाहा.

[२४ पानांवरील चित्र]

भारतात सेवा करताना

[२५ पानांवरील चित्रे]

१९६३ साली हॅरल्ड किंग व १९५० च्या दशकात चीनमध्ये सेवा करताना

[२६ पानांवरील चित्रे]

ऑक्टोबर ५, १९६५, हाँगकाँगमध्ये आमच्या लग्नाच्या दिवशी

[२६ पानांवरील चित्र]

हाँगकाँग बेथेलमधील सदस्यांबरोबर, मध्ये लिआंग्ज आणि उजवीकडे गानावेज