व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“या जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत जात आहे”

“या जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत जात आहे”

“या जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत जात आहे”

“भावांनो, मी हेच म्हणतो की, काळ थोडाच आहे.”—१ करिंथकर ७:२९, पं.र.भा.

१, २. तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणते बदल पाहिले आहेत?

तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणते बदल झालेले पाहिले आहेत? त्यांपैकी काहींचा उल्लेख तुम्ही करू शकता का? उदाहरणार्थ, वैद्यकीय शास्त्रात झालेली प्रगती. या क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळेच, २० व्या शतकाच्या सुरवातीला काही देशांत सामान्य आयुर्मान जे ५० वर्षांपेक्षा कमी होते, ते आता ७० वर्षांपेक्षा अधिक वाढले आहे! शिवाय, रेडिओ, दूरचित्रवाणी, मोबाईल फोन आणि फॅक्स मशीन्स यांसारख्या साधनांमुळे किती वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला फायदा होतो याचाही विचार करा. शिक्षण, वाहतूक आणि मानवी हक्क यांसारख्या क्षेत्रात झालेल्या उन्‍नतीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण यामुळे लक्षावधी लोकांचे जीवन अधिक सुखकर झाले आहे.

अर्थात, सगळेच बदल फायदेकारक ठरलेले नाहीत. वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा दुरुपयोग, घटस्फोटांचे प्रमाण, महागाई, दहशतवाद, आणि दुसरीकडे झुकती नैतिकता यांमुळे होणारे विनाशकारक दुष्परिणाम दुर्लक्षित करता येत नाहीत. प्रेषित पौलाने बऱ्‍याच काळाआधी लिहिलेल्या शब्दांशी कदाचित तुम्ही सहमत व्हाल: “या जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत जात आहे.”—१ करिंथकर ७:३१, पं.र.भा.

३. “या जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत जात आहे,” असे पौल कोणत्या अर्थाने म्हणत होता?

पौलाने हे विधान केले तेव्हा तो जगाची तुलना एका रंगमंचाशी करत होता. या रंगमंचावरील पात्र, अर्थात राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्‍ती येतात, आपापली भूमिका वठवतात आणि मग रंगमंच दुसऱ्‍यांच्या हवाली करतात. हेच कित्येक शतकांपासून चालत आले आहे. गतकाळात कधीकधी एक राजघराणे कित्येक दशके, किंबहुना कित्येक शतके सत्ता चालवत असे आणि या काळात बदल फार मंद गतीने होत. पण आज चित्र बदलले आहे. आज एखाद्या राजकीय पुढाऱ्‍याला गोळी लागून त्याचा मृत्यू होतो, आणि एका क्षणात इतिहासाचे वळण बदलते! होय, या उलथापालथीच्या काळात उद्या काय घडेल हे कोणालाही सांगता येत नाही.

४. (अ) ख्रिस्ती लोकांचा जगातील घटनांसंबंधी कोणता संतुलित दृष्टिकोन असला पाहिजे? (ब) आता आपण कोणते दोन खात्रीलायक पुरावे लक्षात घेणार आहोत?

हे जग जर रंगमंच असेल आणि पुढारी पात्र असतील तर ख्रिस्ती लोक प्रेक्षक आहेत. * पण ‘जगाचे नसल्यामुळे,’ ते नाटकातील पात्र आपापली भूमिका कशी वठवतात किंवा ते कोण आहेत यातही अनावश्‍यक रस घेत नाहीत. (योहान १७:१६) उलट नाटकाचा शेवट—एक संकटमय कळस—जवळ येण्याची चिन्हे पाहण्याकरता ते आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण त्यांना माहीत आहे, की ते बऱ्‍याच काळापासून ज्याची वाट पाहात आहेत ते नीतिमत्त्वाचे नवे जग यहोवा आणील त्याआधी या व्यवस्थीकरणाचा नाश झाला पाहिजे. * तेव्हा, आपण शेवटल्या काळात जगत आहोत आणि नवे जग जवळ आले आहे हे दाखविणारे दोन पुरावे आपण आता लक्षात घेऊ. हे दोन पुरावे म्हणजे (१) बायबलमधील घटनांचा कालक्रम आणि (२) जगाची बिघडत चाललेली परिस्थिती.—मत्तय २४:२१; २ पेत्र ३:१३.

एका रहस्याचा शेवटी उलगडा!

५. “परराष्ट्रीयांचे नियुक्‍त काळ” काय आहेत आणि आपल्याला त्यांविषयी आस्था का वाटावी?

कालगणनविद्या म्हणजे काळ आणि घटनांमधील संबंधाची चर्चा. येशूने अशा एका काळाविषयी सांगितले जेव्हा जगातील पुढारी रंगमंचावरील मुख्य पात्र असतील; देवाचे राज्य त्यांच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. या काळाला येशूने “परराष्ट्रीयांचे नियुक्‍त काळ” म्हटले. (लूक २१:२४, NW) या ‘नियुक्‍त काळाच्या’ शेवटी देवाचे स्वर्गीय राज्य सत्तेवर येणार होते व येशू त्याचा न्याय्य शासक असणार होता. प्रथम त्याला “[त्याच्या] वैऱ्‍यांमध्ये” राज्य करायचे होते. (स्तोत्र ११०:२, पं.र.भा.) त्यानंतर दानीएल २:४४ यानुसार देवाचे राज्य सर्व मानवी राज्यांचे “चूर्ण करून त्यांस नष्ट करील” व ते सर्वकाळ टिकेल.

६. ‘नियुक्‍त काळांची’ सुरवात केव्हा झाली, ते किती कालावधीचे होते आणि त्यांचा अंत केव्हा झाला?

“परराष्ट्रीयांचे नियुक्‍त काळ” संपुष्टात येऊन देवाचे राज्य केव्हा सुरू होणार होते? याचे उत्तर ‘अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते’ व त्याचा संबंध बायबलच्या कालक्रमाशी आहे. (दानीएल १२:९) तो ‘समय’ जवळ आला तेव्हा यहोवाने याचे उत्तर नम्र बायबल विद्यार्थ्यांच्या एका गटाला प्रकट करण्यासाठी पावले उचलली. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्यांनी ओळखले की “परराष्ट्रीयांचे नियुक्‍त काळ” सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमचा नाश झाला तेव्हा सुरू झाले आणि हे “काळ” एकूण २,५२० वर्षांपर्यंत चालणार होते. यावरून त्यांनी हिशेब लावला की १९१४ साली “परराष्ट्रीयांचे नियुक्‍त काळ” संपुष्टात येतील. १९१४ या वर्षी सद्य व्यवस्थीकरणाच्या समाप्तीची सुरवात होते हे देखील त्यांच्या लक्षात आले. बायबलचा विद्यार्थी या नात्याने, १९१४ ही तारीख कशी काढता येते हे तुम्ही शास्त्रवचनांतून स्पष्ट करू शकता का? *

७. दानीएलच्या पुस्तकात उल्लेख केलेले सात काळ केव्हा सुरू होतात, त्यांची लांबी किती आणि ते केव्हा संपतात हे आपण कोणत्या शास्त्रवचनांच्या मदतीने ठरवू शकतो?

एक सुगावा दानीएलच्या पुस्तकात दडलेला आहे. यहोवाने ‘नियुक्‍त काळांच्या’ सुरवातीला, अर्थात सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमचा नाश करण्याकरता राजा नबुखद्‌नेस्सर याचा उपयोग केल्यामुळे त्याने या राजाच्या माध्यमाने प्रगट केले की परराष्ट्रीयांचे राज्य देवाच्या हस्तक्षेपाशिवाय एकूण सात लाक्षणिक काळांपर्यंत चालेल. (यहेज्केल २१:२६, २७; दानीएल ४:१६, २३-२५) हे सात काळ किती अवधीचे होते? प्रकटीकरण ११:२, ३ व १२:६, १४ या वचनांनुसार साडे तीन काळ १,२६० दिवसांचे आहेत. त्याअर्थी सात काळ याचे दुप्पट असले पाहिजेत, अर्थात २,५२० दिवस. एवढीच माहिती पुरवण्यात आली का? नाही. दानीएलचा समकालीन संदेष्टा यहेज्केल यास यहोवाने या लाक्षणिक काळाचा अर्थ समजण्याकरता एक सूत्र दिले: “प्रत्येक वर्षाबद्दल तुझ्या हिशोबी मी एक दिवस धरिला आहे.” (यहेज्केल ४:६) त्याअर्थी, सात काळ २,५२० वर्षे असणार होती. सा.यु.पू. ६०७ पासून सुरवात केल्यास, आणि २,५२० वर्षांचा काळ धरल्यास आपण निष्कर्ष काढू शकतो की १९१४ साली नियुक्‍त काळ संपणार होते.

‘अंतसमय’ निश्‍चित करणे

८. जागतिक परिस्थिती १९१४ पासून बदलली आहे यासंबंधात तुम्ही कोणता पुरावा देऊ शकता?

जागतिक घडामोडींनी १९१४ सालापासून जसे वळण घेतले आहे त्यावरून निश्‍चितपणे असे म्हणता येते की बायबलच्या कालक्रमावर आधारित असलेली वरील माहिती अचूक आहे. स्वतः येशूने म्हटले की लढाया, दुष्काळ व रोगराई ‘युगाच्या समाप्तीचा’ संकेत देतील. (मत्तय २४:३-८; प्रकटीकरण ६:२-८) १९१४ सालापासून हे सर्व घडले आहे यात शंका नाही. प्रेषित पौलाने हे चित्र आणखी स्पष्ट केले जेव्हा त्याने सांगितले की लोकांची एकमेकांप्रती असलेली वृत्ती लक्षणीयरित्या बदलेल. त्याने भाकीत केलेल्या अचूक बदलांचे आपण सर्वजण साक्षी आहोत.—२ तीमथ्य ३:१-५.

९. जगाच्या परिस्थितीचे निरीक्षण करणारे १९१४ पासून घडलेल्या बदलांसंबंधी काय सांगतात?

“या जगाचे बाह्‍यस्वरूप” १९१४ सालापासून खरोखरच इतके बदलले आहे का? १९१४ ची पिढी (इंग्रजी) या पुस्तकात प्राध्यापक रॉबर्ट वोल म्हणतात: “या युद्धातून बचावलेल्या लोकांच्या मनात एक कल्पना घर करून राहिली; ती अशी की, १९१४ च्या ऑगस्ट महिन्यात एक युग संपले आणि दुसरे सुरू झाले.” जागतिक आरोग्य संघटनेचे मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. झोर्झे ए. कोस्टा ई सिल्व्हा याला दुजोरा देऊन असे लिहितात: “आपण अतिशय वेगाने बदलत असलेल्या काळात जगत आहोत, ज्यामुळे चिंता व तणावाचे प्रमाण मानव इतिहासात कधी पाहण्यात आले नाही इतके वाढले आहे.” हा तुमचा वैयक्‍तिक अनुभव आहे का?

१०. जगाची परिस्थिती १९१४ पासून अधिकाधिक बिघडत जाण्याच्या कारणावर बायबल कशाप्रकारे प्रकाश टाकते?

१० अधिकाधिक बिघडत चाललेल्या जागतिक परिस्थितीमागे कोणाचा हात आहे? प्रकटीकरण १२:७-९ याकरता जबाबदार असलेल्या व्यक्‍तीला उजेडात आणते: “मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल [येशू ख्रिस्त] व त्याचे दूत अजगराबरोबर [दियाबल सैतान] युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणहि उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, . . . खाली पृथ्वीवर टाकण्यात आला.” तेव्हा पृथ्वीवरील अशांततेकरता जबाबदार असणारा दियाबल सैतान आहे आणि १९१४ साली त्याला स्वर्गातून फेकण्यात आले त्यामुळे “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.”—प्रकटीकरण १२:१०, १२.

शेवटला अंक कसा असेल

११. (अ) “सर्व जगाला” ठकवण्याकरता सैतान कोणत्या पद्धतींचा उपयोग करतो? (ब) प्रेषित पौलाने सैतानाच्या कोणत्या खास प्रयत्नाकडे लक्ष वेधले?

११ आपला काळ थोडा आहे हे माहीत असल्यामुळे १९१४ पासून “सर्व जगाला” ठकवण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांना अधिक जोर आला आहे. ठकवण्यात तरबेज असलेला सैतान पडद्याच्या मागून खेळ खेळतो आणि रंगमंचावर भूमिका वठवण्याकरता तो राजकीय नेते व पायंडा पाडणाऱ्‍या सुप्रसिद्ध हस्तींचा उपयोग करतो. (२ तीमथ्य ३:१३; १ योहान ५:१९) त्याचा एक हेतू मानवांना असा विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा आहे, की त्याच्या शासनाकरवी त्यांना खरी शांती मिळू शकते. सर्वसामान्यपणे त्याचा हा मतप्रचार यशस्वी ठरला आहे कारण परिस्थिती अधिकाधिक बिघडत असल्याचा पुरेसा पुरावा असूनही लोक आशावादी आहेत. प्रेषित पौलाने भाकीत केले होते, की या व्यवस्थीकरणाचा नाश होण्याआधी सैतानाच्या मतप्रचाराचा उल्लेखनीय प्रत्यय येईल. त्याने लिहिले: “शांति आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो.”—१ थेस्सलनीकाकर ५:३; प्रकटीकरण १६:१३.

१२. आपल्या काळात शांती स्थापित करण्याचे कोणते प्रयत्न सुरू आहेत?

१२ अलीकडील वर्षांत राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या मानवी योजनांचे वर्णन करण्याकरता ‘शांती व निर्भय’ ही अभिव्यक्‍ती उपयोगात आणली आहे. त्यांनी १९८६ हे वर्ष शांतीचे वर्ष असेही घोषित केले होते पण त्या वर्षात शांती स्थापित झाली नाही. राजकीय पुढाऱ्‍यांच्या अशा प्रयत्नांना १ थेस्सलनीकाकर ५:३ याची पूर्णता म्हणता येईल का? की पौल अतिशय नाट्यमयरित्या होणाऱ्‍या विशिष्ट घटनेविषयी भाकीत करत होता, अशी घटना जी सर्व जगाचे लक्ष वेधून घेईल?

१३. ‘शांती व निर्भय’ या घोषणेविषयी पौलाने भाकीत केले तेव्हा, त्यानंतर होणाऱ्‍या नाशाची त्याने कशासोबत तुलना केली आणि यावरून आपण काय शिकू शकतो?

१३ बायबलच्या भविष्यवाण्या सहसा त्या पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण होण्याच्या स्थितीत असताना पूर्णपणे स्पष्ट होतात; त्यामुळे या संदर्भातही आपल्याला थांबून काय घडते ते पाहावे लागेल. पण लक्षवेधक गोष्ट अशी की ‘शांती व निर्भय’ अशी घोषणा झाल्यावर जो आकस्मिक नाश होईल, त्याची तुलना पौलाने गरोदर स्त्रीला होणाऱ्‍या अकस्मात वेदनेशी केली. नऊ महिन्यांच्या काळात गरोदर स्त्रीला आपल्या उदरात वाढत असलेल्या बाळाच्या अस्तित्वाची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तिला बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात किंवा त्याच्या हालचालींची जाणीव होते. कधीकधी बाळ तिला हळूच लाथही मारते. ही सगळी लक्षणे दिवसेंदिवस जास्तच स्पष्ट होऊ लागतात आणि शेवटी एके दिवशी तिला एक तीव्र वेदना जाणवते; तेव्हा तिला कळते की अपेक्षेचा काळ संपला आहे आणि बाळाचा जन्म होण्याची वेळ आली आहे. त्याअर्थी, ‘शांती व निर्भय’ या घोषणेविषयीची पूर्णता कोणत्याही पद्धतीने झाली तरीसुद्धा, त्यानंतर एक आकस्मिक, वेदनादायक पण जिचा शेवट आनंदायक असेल अशी घटना घडेल; अर्थात दुष्टाईचा नाश आणि एका नव्या जागतिक व्यवस्थीकरणाची सुरवात.

१४. भविष्यातील घटनांचा क्रम कसा असेल आणि त्यांचा शेवट कसा होईल?

१४ प्रेक्षक या नात्याने सर्व घटनांकडे पाहणाऱ्‍या विश्‍वासू ख्रिश्‍चनांसाठी येणारा नाश हा भयप्रद असेल. सर्वप्रथम पृथ्वीवरील राजे (सैतानाच्या संघटनेचा राजकीय घटक) मोठ्या बाबेलच्या समर्थकांवर (धार्मिक घटक) हल्ला करतील व त्यांचा नाश करतील. (प्रकटीकरण १७:१, १५-१८, पं.र.भा.) अशाप्रकारे कथेला अचानक वेगळेच वळण लागेल. सैतानाचे राज्य विभाजित होईल, त्याचे समर्थक एकमेकांविरुद्ध उठतील आणि सैतान हे घडण्यापासून रोखू शकणार नाही. (मत्तय १२:२५, २६) यहोवा “आपली इच्छा पूर्ण करण्याचे,” (तिरपे वळण आमचे.) म्हणजे पृथ्वीवरून आपले धार्मिक शत्रू नष्ट करण्याचे पृथ्वीवरील राजांच्या मनात घालेल. खोट्या धर्माचा नाश झाल्यानंतर येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय सैन्यांचे नेतृत्व करील व ते सैतानाच्या संघटनेचे जे काही उरले आहे, अर्थात व्यापारिक व राजकीय घटक, त्यांचा सर्वनाश करील. शेवटी खुद्द सैतानाला निष्क्रिय केले जाईल. हे घडले म्हणजे पडदा पडेल आणि दीर्घकाळ चाललेला नाट्यप्रयोग संपुष्टात येईल.—प्रकटीकरण १६:१४-१६; १९:११-२१; २०:१-३.

१५, १६. “काळ थोडाच आहे” याची जाणीव करून देण्यात आल्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडला पाहिजे?

१५ या सर्व घटना केव्हा घडतील? तो दिवस व ती घटका आपल्याला ठाऊक नाही. (मत्तय २४:३६) पण “काळ थोडाच आहे,” हे मात्र आपल्याला ठाऊक आहे. (१ करिंथकर ७:२९) तेव्हा उरलेल्या वेळेचा सुज्ञपणे उपयोग करणे अत्यावश्‍यक आहे. तो आपल्याला कसा करता येईल? प्रेषित पौलाने स्पष्ट केल्याप्रमाणे जे महत्त्वाचे नाही त्याच्या बदल्यात ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांसाठी आपण ‘प्रसंग साधून घेतला’ पाहिजे व प्रत्येक दिवसाचे चीज केले पाहिजे. का? “कारण दिवस वाईट आहेत.” आपल्याकरता ‘प्रभूची काय इच्छा आहे हे समजून’ घेतल्यास, जो थोडासा मौल्यवान वेळ उरला आहे त्याचा अपव्यय आपण करणार नाही.—इफिसकर ५:१५-१७; १ पेत्र ४:१-४.

१६ हे सबंध जागतिक व्यवस्थीकरण आपल्या उच्चाटनाची वाट पाहात आहे हे समजल्यावर व्यक्‍तिशः आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे? प्रेषित पेत्राने आपल्या बोधाकरता लिहिले: “ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११) खरोखर अशाच प्रकारच्या व्यक्‍ती बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे! पेत्राच्या सुज्ञ सल्ल्यानुसार, आपण (१) आपल्या वर्तणुकीवर सातत्याने लक्ष दिले पाहिजे जेणेकरून ती पवित्र राहावी आणि (२) यहोवाच्या सेवेत आपल्या आवेशी कार्याद्वारे त्याच्याबद्दल वाटणारे मनस्वी प्रेम व्यक्‍त करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे.

१७. सैतानाच्या कोणत्या पाशांपासून विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी सावध राहिले पाहिजे?

१७ देवावर असलेले प्रेम आपल्याला या जगाकडे व त्यातील मोहक गोष्टींकडे आकर्षित होण्यापासून आवरेल. सद्य व्यवस्थीकरणाचा शेवट ठरलेला आहे, त्यामुळे जगिक चंगळवादी जीवनशैलीची चमकधमक पाहून त्यात स्वतःला गुरफटणे धोकेदायक आहे. जगात राहात असताना व उदरनिर्वाह करत असताना जगाचा पुरेपूर उपयोग न करण्याचा सुज्ञ सल्ला आपण पाळला पाहिजे. (१ करिंथकर ७:३१) उलट, या जगाच्या खोट्या प्रचारामुळे आपली दिशाभूल होणार नाही याची आपण होता होईल तितकी काळजी घेतली पाहिजे. हे जग आपल्या समस्यांवर उपाय काढण्यात कधीही यशस्वी होणार नाही. ते कायम निभावू शकणार नाही. हे आपण इतक्या खात्रीने कसे म्हणू शकतो? कारण देवाचे प्रेरित वचन तसे सांगते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.

भविष्यातील रोमांचकारी घटना!

१८, १९. नव्या जगात तुम्ही कोणते बदल होण्याची वाट पाहात आहात आणि प्रतिक्षेचे सार्थक झाले असे तेव्हा का म्हणता येईल?

१८ लवकरच सैतान व त्याच्या समर्थकांचा यहोवा नाश करेल. त्यानंतर देवाच्या आशीर्वादाने या व्यवस्थीकरणाच्या नाशातून बचावलेले विश्‍वासू जन रंगमंचावरील “दृश्‍य” बदलण्याच्या कामाला लागतील. जगाचे दृश्‍य कायमचे बदलेल. देव “दिगंतापर्यंत लढाया बंद” करेल, त्यामुळे युद्धाचे अनर्थकारी दृश्‍य पुन्हा कधी पाहावे लागणार नाही. (स्तोत्र ४६:९) दुष्काळाऐवजी “भूमीत भरपूर पीक येईल. . . . ते ओसंडून वाहील.” (स्तोत्र ७२:१६, NW) तुरुंगे, पोलिस स्थानके, लैंगिकरित्या संक्रमित रोग, ड्रग्जचे व्यापारी, घटस्फोट मिळवून देणारे कोर्ट, दिवाळखोरीचे व्यवहार, आणि दहशतवाद या गोष्टी कायमच्या नाहीशा होतील.—स्तोत्र ३७:२९; यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:३-५.

१९ स्मृतीकबरा रिकाम्या केल्या जातील आणि लक्षावधी पुनरुत्थित जनांच्या रूपात नाटकातील आणखी पात्रे पृथ्वीवर येतील. एका पिढीचे दुसऱ्‍या पिढीशी पुनर्मिलन होईल व दीर्घकाळापासून एकमेकांपासून ताटातूट झालेले प्रियजन पुन्हा भेटतील व आनंदाने एकमेकांना बिलगतील तेव्हा तो किती आनंददायक समय असेल! शेवटी अशी वेळ येईल जेव्हा जिवंत असलेली प्रत्येक व्यक्‍ती यहोवाची उपासक असेल. (प्रकटीकरण ५:१३) हे बदल पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा पडदा वर जाईल, आणि रंगमंचावरील दृश्‍य असेल ते सबंध पृथ्वीवरील एका रम्य परादीसाचे! तो देखावा पाहताना तुमच्या नेमक्या भावना काय असतील? निश्‍चितच, तुम्ही म्हणाल, ‘या दिवसाची मला बरीच प्रतीक्षा करावी लागली, पण प्रतिक्षेचे शेवटी सार्थक झाले!’

[तळटीपा]

^ परि. 4 एका वेगळ्या संदर्भात पौलाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांविषयी असे म्हटले होते की “आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहो.”—१ करिंथकर ४:९.

^ परि. 4 उदाहरणार्थ, दानीएल ११:४०, ४४, ४५ यात उल्लेख केलेला “उत्तरेचा राजा” कोण आहे यासंबंधी दानीएलच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या (इंग्रजी), या पुस्तकातील पृष्ठे २८०-१ पाहा.

^ परि. 6 खुद्द बायबल दाखवते की बंदिवासात गेलेले यहुदी सा.यु.पू. ५३७ साली मायदेशी परतले त्याच्या ७० वर्षांआधी जेरूसलेमचा नाश झाला होता. (यिर्मया २५:११, १२; दानीएल ९:१-३) ‘परराष्ट्रीयांच्या नियुक्‍त काळांविषयी’ सविस्तर चर्चेकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद करणे (इंग्रजी) यातील पृष्ठे ९५-७ पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• “जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत जात आहे” हे प्रेषित पौलाचे शब्द आपल्या काळात कसे काय खरे ठरत आहेत?

• बायबलमधील कालक्रम ‘परराष्ट्रीयांच्या नियुक्‍त काळांच्या’ समाप्तीकडे कशाप्रकारे स्पष्ट संकेत करतो?

• जगाची बदलती परिस्थिती १९१४ साली ‘अंतसमयाची’ सुरवात झाल्याचे कशाप्रकारे शाबीत करते?

• “काळ थोडाच आहे” या वस्तुस्थितीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होण्यास हवा?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२० पानांवरील चित्र]

शेवटी—रहस्य उलगडले!