व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंतःकरणाचे रक्षण करून शुद्ध चारित्र्य राखा

अंतःकरणाचे रक्षण करून शुद्ध चारित्र्य राखा

अंतःकरणाचे रक्षण करून शुद्ध चारित्र्य राखा

“सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.”—नीतिसूत्रे ४:२३.

१-३. (अ) बरेचजण आपल्या चारित्र्याचे खरे मोल जाणत नाहीत हे ते कशाप्रकारे दाखवून देतात? उदाहरण देऊन स्पष्ट करा. (ब) नैतिक शुद्धतेच्या मोलाचे परीक्षण करणे का महत्त्वाचे आहे?

ते चित्र काहीसे जुनाट प्रकारचे वाटत असावे. कदाचित घराच्या एकंदर सजावटीसोबत त्याचा नीटसा मेळ बसत नसावा. पण इतके मात्र खरे की या चित्राच्या मालकाला ते निरुपयोगी वाटू लागले. त्यामुळे एका धर्मार्थ संस्थेने लावलेल्या जुन्या वस्तूंच्या बाजारात १,४०० रुपयांना हे चित्र विकायला काढण्यात आले. काही वर्षांनंतर समजले, की त्या चित्राचे खरे मूल्य ४.७ कोटी रुपये होते! ते चित्र मुळात एका महान चित्रकाराचे दुर्मिळ चित्र होते. अशी मौल्यवान चीज कवडीमोल लेखणाऱ्‍या त्या चित्राच्या पहिल्या मालकाला नंतर कसे वाटले असेल याची कल्पना करा!

बऱ्‍याचदा चारित्र्याच्या बाबतीत, म्हणजे एका व्यक्‍तीच्या नैतिक शुद्धतेच्या बाबतीतही असेच घडते. आज कित्येक लोक स्वतःच्या चारित्र्याला अक्षरशः कवडीमोल लेखतात. नैतिक शुद्धतेची संकल्पना काहींना जुनाट वाटते; एकंदर, आजच्या आधुनिक जीवनशैलीशी तिचा नीटसा मेळ बसत नाही असे त्यांना वाटते. त्यामुळे ते आपल्या चारित्र्याला अगदी क्षुल्लक किंमत लावतात. क्षणिक शरीरसुखाच्या मोबदल्यात ते आपले चारित्र्य गमावून बसतात. इतरजण, आपल्या समवयस्कांच्या नजरेत किंवा एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीच्या नजरेत आपले महत्त्व वाढवण्याच्या आशेने चारित्र्याचा त्याग करतात.—नीतिसूत्रे १३:२०.

चारित्र्य किती मोलवान आहे याची बऱ्‍याच जणांना नंतर जाणीव होते, पण तोवर खूप उशीर झालेला असतो. परिणाम सहसा अत्यंत दुःखदायक असतात. बायबलच्या शब्दांत अनैतिकतेचे दुष्परिणाम जहाल विषासारखे, ‘दवण्यासारखे कडू’ असतात. (नीतिसूत्रे ५:३, ४) आजच्या जगातील भ्रष्ट नैतिक वातावरणात तुम्हाला आपल्या चारित्र्याचे जतन व रक्षण कसे करता येईल? यासाठी, आपल्याला करता येतील अशा तीन गोष्टी आता आपण विचारात घेऊ या.

आपल्या अंतःकरणाचे रक्षण करा

४. अंतःकरण कशास सूचित करते आणि आपण त्याचे रक्षण का करावे?

शुद्ध चारित्र्य राखण्याचा सर्वात मुख्य मार्ग म्हणजे आपल्या अंतःकरणाचे रक्षण करणे. बायबल म्हणते: “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) येथे जे ‘आपले अंतःकरण’ म्हटले आहे ते कशास सूचित करते? तुम्ही आतून कशाप्रकारची व्यक्‍ती आहात, तुमचे विचार, भावना व हेतू यांस ते सूचित करते. बायबल म्हणते: “तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्‍तीने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर.” (तिरपे वळण आमचे.) (अनुवाद ६:५, पं.र.भा.) येशूने या आज्ञेला सर्वात मोठी आज्ञा म्हटले. (मार्क १२:२९, ३०) स्पष्टपणे आपले हे अंतःकरण अत्यंत मौल्यवान आहे. ते नक्कीच रक्षण करण्याजोगे आहे.

५. हृदय हे एकाच वेळी उपयोगी व धोकेदायक कसे असू शकते?

पण बायबल असेही म्हणते की “हृदय [अंतःकरण] सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) पण हृदय कपटी आणि त्याअर्थी आपल्याकरता धोकेदायक कसे ठरू शकते? हे समजण्याकरता एका गाडीचे उदाहरण घ्या. गाडी अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे, आणीबाणीच्या परिस्थितीत तिच्यामुळे कोणाचा जीव देखील वाचू शकतो. पण जर चालकाने गाडीवर नीट नियंत्रण ठेवले नाही, किंवा स्टिअरिंग व्हीलवर सतत लक्ष ठेवून तिला योग्य दिशेने नेले नाही तर तीच गाडी सहज जीवघेणी ठरू शकते. त्याचप्रकारे, तुम्ही आपल्या हृदयाचे रक्षण केले नाही तर तुमच्या मनात येणारी प्रत्येक इच्छा आणि लहर तुमच्यावर नियंत्रण करू लागेल आणि तुमचे जीवन अधोगतीच्या मार्गाला लागेल. देवाचे वचन म्हणते: “जो आपल्या मनावर भरवसा ठेवितो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.” (नीतिसूत्रे २८:२६) होय, ज्याप्रकारे प्रवासाला निघण्याआधी तुम्ही नकाशा पाहता त्याच प्रकारे जर तुम्ही देवाच्या वचनाचा एक मार्गदर्शक म्हणून उपयोग केला तर तुम्ही सुज्ञतेच्या मार्गावर वाटचाल करू शकाल आणि संकटे टाळू शकाल.—स्तोत्र ११९:१०५.

६, ७. (अ) पावित्र्याचा काय अर्थ होतो आणि यहोवाच्या सेवकांकरता हा गुण महत्त्वाचा का आहे? (ब) अपरिपूर्ण मानव यहोवाच्या पावित्र्याचे अनुकरण करू शकतात असे आपण का म्हणू शकतो?

आपल्या हृदयाचा स्वाभाविक कल नैतिक शुद्धतेकडे नसतो. आपण त्याला त्या दिशेने नेले पाहिजे. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे शुद्ध चारित्र्याच्या खऱ्‍या मोलावर मनन करणे. हा गुण पावित्र्याशी निगडित आहे. पावित्र्य हे स्वच्छता, शुद्धता व पापापासून दूर असण्याचा आशय सूचित करते. पावित्र्य एक बहुमूल्य गुण आहे व तो यहोवा देवाच्या मूळ स्वभावात अंतर्भूत आहे. बायबलमधील शेकडो वचने यहोवाच्या संदर्भात या गुणाचा उल्लेख करतात. किंबहुना बायबल म्हणते की “पावित्र्य यहोवाचे आहे.” (निर्गम २८:३६, NW) पण या उत्कृष्ट गुणाचा अपरिपूर्ण मानवांशी काय संबंध आहे?

यहोवा आपल्याला त्याच्या वचनात सांगतो: “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” (१ पेत्र १:१६) होय, आपण यहोवाच्या पावित्र्याचे अनुकरण करू शकतो; आपल्या शुद्ध चारित्र्याचे रक्षण करण्याद्वारे आपण त्याच्यापुढे निष्कलंक राहू शकतो. त्याअर्थी, जेव्हा आपण अशुद्ध, मलीन कृत्यांपासून स्वतःला आवरतो तेव्हा खरे तर आपण एक अत्यंत उत्कृष्ट बहुमान प्राप्त करतो—अर्थात, परात्पर देवाच्या एक सुंदर गुणाचे अनुकरण करण्याचा बहुमान! (इफिसकर ५:१) हे आपल्याला कधी जमणारच नाही असे आपण गृहित धरू नये कारण यहोवा एक बुद्धिमान व समजूतदार पिता आहे जो आपल्याकडून अवाजवी अपेक्षा करत नाही. (स्तोत्र १०३:१३, १४; याकोब ३:१७) आध्यात्मिक व नैतिकरित्या शुद्ध राहण्याकरता अर्थातच प्रयास करावे लागतात. पण प्रेषित पौलाने म्हटले की ‘ख्रिस्ताला सरळपण व शुद्धता देणे [आपल्याला] भाग आहे.’ (२ करिंथकर ११:३) खरोखर, नैतिकरित्या निष्कलंक राहण्याचा हर तऱ्‍हेने प्रयत्न करणे हे ख्रिस्त व त्याच्या पित्याप्रती आपले कर्तव्यच नव्हे का? शेवटी, त्यांनी आपल्यावर जे प्रेम दाखवले आहे त्याची परतफेड तर आपण कधीच करू शकणार नाही. (योहान ३:१६; १५:१३) पण नैतिकरित्या शुद्ध जीवन व्यतीत करण्याद्वारे आपली कृतज्ञता व्यक्‍त करणे हे योग्यच नव्हे का? शुद्ध चारित्र्य राखण्याविषयी या दृष्टिकोनातून विचार केल्यास आपल्या नजरेत त्याचे मोल वाढेल आणि आपण आपल्या हृदयाचे रक्षण करू.

८. (अ) आपल्या हृदयाला आपण कशाप्रकारे पोषित करू शकतो? (ब) आपल्या संभाषणांवरून आपल्याविषयी काय प्रगट होऊ शकते?

हृदयाचे रक्षण करण्याकरता, आपण कशाप्रकारच्या गोष्टी आत्मसात करतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या मनाला उत्तम आध्यात्मिक अन्‍नाने नियमितरित्या पोषित करणे गरजेचे आहे आणि असे करताना आपण सदोदित देवाच्या राज्याच्या सुवार्तेवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. (कलस्सैकर ३:२) आपण असे करत आहोत हे आपल्या संभाषणातूनही दिसून आले पाहिजे. जर आपण नेहमी ऐहिक, अनैतिक विषयांवर बोलतो अशी आपली ख्याती असेल तर आपण आपल्या हृदयाच्या स्थितीविषयी काहीतरी दाखवून देत आहोत. (लूक ६:४५) त्याऐवजी आपण नेहमी आध्यात्मिक व दुसऱ्‍यांना प्रोत्साहन मिळेल अशा विषयांवर बोलतो अशी ख्याती मिळवण्याचा प्रयत्न करू या. (इफिसकर ५:३) आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी काही गंभीर धोके आपण टाळले पाहिजेत. यांपैकी दोन धोक्यांविषयी येथे चर्चा करू या.

जारकर्मापासून पळ काढा

९-११. (अ) जे १ करिंथकर ६:१८ यातील मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करतात ते गंभीर अनैतिकतेत गुंतण्याची अधिक शक्यता का आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा. (ब) जर आपण जारकर्मापासून पळ काढत असू तर आपण काय टाळू? (क) विश्‍वासू ईयोबाने आपल्याकरता कोणता उत्तम आदर्श ठेवला?

यहोवाने प्रेषित पौलाला प्रेरित करून जे मार्गदर्शन त्याच्याकडून लिहून घेतले, त्यामुळे अनेकांना आपल्या हृदयाचे व चारित्र्याचे रक्षण करण्यास मदत मिळाली आहे. पौलाने म्हटले: “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा.” (१ करिंथकर ६:१८) लक्ष द्या, पौलाने केवळ “जारकर्म टाळा” असे म्हटले नाही. ख्रिश्‍चनांना यापेक्षा एक पाऊल पुढे जायचे आहे. जिवावर बेतलेल्या एखाद्या प्रसंगातून ज्याप्रमाणे आपण पळ काढतो त्याचप्रमाणे अनैतिक कृत्यांपासून आपण पळ काढला पाहिजे. या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केल्यास, आपण गंभीर अनैतिक कृत्यांत गुंतून देवाची मर्जी गमवण्याचा धोका पत्करतो.

१० उदाहरणार्थ: एका विशेष कार्यक्रमाला जाण्याआधी आईने आपल्या लहान मुलाला अंघोळ घालून तयार केले आहे अशी कल्पना करा. कार्यक्रमाला जाण्याकरता घराबाहेर पडायला अजून थोडा अवकाश असल्यामुळे, लहान मुलगा आईला बाहेर जाऊन खेळण्याची परवानगी मागतो. आई परवानगी देते, पण एका अटीवर. ती त्याला बजावून सांगते: “पाणी साचलेल्या त्या खड्ड्याच्या जवळही जाऊ नकोस. अंगावर चिखल उडवून आलास तर शिक्षा मिळेल!” पण काही क्षणांतच तिला मुलगा त्या खड्ड्याच्या अगदी कडेला कसाबसा तोल सांभाळून उभा असलेला दिसतो. अजून त्याच्या अंगावर चिखल उडालेला नाही. पण तरीसुद्धा, खड्ड्याच्या जवळही जाऊ नकोस असे जे तिने त्याला बजावले होते त्याकडे तो दुर्लक्ष करत आहे आणि तो खड्ड्यात पडणार यात काही शंका नाही. (नीतिसूत्रे २२:१५) बरेच तरुण व प्रौढ, ज्यांनी खरे तर अधिक सांभाळून वागले पाहिजे, ते अशीच चूक करून बसतात. कशाप्रकारे?

११ या काळात अधिकाधिक लोक आपल्या “दुर्वासनांच्या” आहारी गेले आहेत; आणि त्यामुळे अनैतिक शारीरिक संबंधांची जाहिरात करणारा एक नवीन उद्योगच विकसित झाला आहे. (रोमकर १:२६, २७) मासिके, पुस्तके, व्हिडिओ व इंटरनेट यांतून अश्‍लील साहित्याची जणू साथ पसरली आहे. जे अशाप्रकारची दृश्‍ये पाहतात व त्याद्वारे आपल्या मनावर त्याची छाप पडू देतात ते जारकर्मापासून पळ काढत आहेत असे नक्कीच म्हणता येणार नाही. ते त्याच्याशी खेळ करत आहेत, खड्ड्याच्या कडेकडेने कसाबसा तोल सांभाळत चालण्याचा प्रयत्न करत आहेत, बायबलमध्ये दिलेल्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करत आहेत. आपल्या हृदयाचे रक्षण करण्याऐवजी ते त्यावर अशा प्रक्षोभक दृश्‍यांची छाप पाडत आहेत जी स्मृतीपटलावरून पुसून टाकण्यास कदाचित कित्येक वर्षे लागतील. (नीतिसूत्रे ६:२७) या संदर्भात, विश्‍वासू ईयोबाकडून आपण एक धडा शिकू शकतो. ज्या गोष्टी पाहिल्यावर वाईट कृत्य करण्याचा मोह होईल अशा गोष्टींकडे न पाहण्याचा त्याने स्वतःच्याच डोळ्यांशी एक करार केला होता. (ईयोब ३१:१) खरोखर, ईयोबाचे उदाहरण अनुकरण करण्यासारखे नाही का?

१२. प्रणयभेटींच्या काळात ख्रिस्ती जोडपी कशाप्रकारे ‘जारकर्मापासून पळ काढू’ शकतात?

१२ खासकरून लग्नाआधी प्रणयभेटी करताना ‘जारकर्मापासून पळ काढणे’ अत्यंत महत्त्वाचे आहे. हा काळ आशा-आकांक्षांनी भरलेला स्वप्नील आनंदी काळ असला पाहिजे, पण काही तरुण जोडपी अनैतिकतेशी खेळ करून याला बट्टा लावतात. निःस्वार्थ प्रीती, आत्मनियंत्रण व यहोवा देवाचे आज्ञापालन या गुणांवर आधारित असलेला नातेसंबंध उत्तम विवाहाकरता सर्वोत्कृष्ट आधार असू शकतो; पण अनैतिकतेशी खेळ करणारी जोडपी एकमेकांना यापासून वंचित करतात. एका ख्रिस्ती जोडप्याने आपल्या लग्नाआधीच्या प्रणयभेटींच्या काळात अनैतिक वर्तन केले. त्यांचे लग्न झाल्यानंतर पत्नीने कबूल केले की तिचा विवेक तिला सतावत होता, अगदी त्यांच्या लग्नाच्या दिवशीही ती दोषभावनेमुळे दुःखी होती. तिने सांगितले: “मी कित्येकदा यहोवाची क्षमा मागितली पण आता सात वर्षे झाली तरीसुद्धा माझा विवेक अजूनही मला दोषी ठरवतो.” जे अशाप्रकारचे पाप करतात त्यांनी ख्रिस्ती वडिलांची मदत घेणे महत्त्वाचे आहे. (याकोब ५:१४, १५) पण अनेक ख्रिस्ती सुज्ञतेने वागतात आणि प्रणयभेटींच्या काळात अशाप्रकारचे धोके टाळतात. (नीतिसूत्रे २२:३) ते प्रणय व्यक्‍त करण्याच्या बाबतीत काही मर्यादा पाळतात. आपल्यासोबत ते आणखी एखाद्या व्यक्‍तीला घेतात आणि एकांत असलेल्या ठिकाणी एकमेकांसोबत एकटे राहण्याचे ते विचारपूर्वक टाळतात.

१३. ख्रिस्ती व्यक्‍तींनी यहोवाची सेवा न करणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत प्रणयाराधन का करू नये?

१३ जे यहोवाची सेवा न करणाऱ्‍या व्यक्‍तींसोबत प्रणयाराधन करू लागतात त्यांना भयंकर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. उदाहरणार्थ, यहोवावर प्रेम नसलेल्या एका व्यक्‍तीसोबत तुम्ही कसे जुळवून घेऊ शकाल? ख्रिश्‍चनांनी केवळ अशाच व्यक्‍तींसोबत संबंध जोडला पाहिजे, ज्यांचे यहोवावर प्रेम आहे आणि जे नैतिकतेसंबंधी त्याच्या दर्जांना मान देतात. देवाचे वचन आपल्याला सांगते: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्‍यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार?”—२ करिंथकर ६:१४.

१४, १५. (अ) “जारकर्म” या शब्दाच्या अर्थासंबंधाने काही लोकांचा कोणता गैरसमज आहे? (ब) “जारकर्म” या शब्दात कोणत्या प्रकारची कृत्ये मोडतात आणि ख्रिस्ती “जारकर्मापासून पळ” कसा काढू शकतात?

१४ ज्ञानही आवश्‍यक आहे. जारकर्म म्हणजे नेमके काय याविषयी ज्ञान नसल्यास आपण त्यापासून पळ काढू शकणार नाही. आजच्या जगात काही लोकांनी ‘जारकर्माविषयी’ चुकीची कल्पना आत्मसात केली आहे. त्यामुळे बरेच जण असे समजतात की ते विवाह बंधनात न अडकता आपल्या लैंगिक वासना तृप्त करू शकतात, फक्‍त लैंगिक संबंध टाळला पाहिजे. काही सुप्रसिद्ध आरोग्य संस्थांनी देखील अल्पवयीन मुलींच्या अनावश्‍यक गर्भधारणांना आळा घालण्यासाठी तरुणांना अशाप्रकारचे लैंगिक अपवर्तन करण्याचे प्रोत्साहन दिले आहे. पण अशाप्रकारच्या मार्गदर्शनामुळे तरुणांची दिशाभूल होते आणि ही एक खेदजनक गोष्ट आहे. विवाहाच्या बंधनाबाहेर, केवळ गर्भधारणा टाळणे म्हणजे चारित्र्याचे रक्षण करणे नव्हे आणि ‘जारकर्माची’ खरी व्याख्या इतकी संकुचित किंवा मर्यादित नाही.

१५ “जारकर्म” असे भाषांतर केलेल्या पोर्निया या ग्रीक शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. त्याचा संबंध एकमेकांसोबत विवाहित नसलेल्या व्यक्‍तींमधील लैंगिक संबंधांशी असून, खासकरून त्याचा रोख जननेंद्रियांच्या गैरवापरावर आहे. उदाहरणार्थ मुखमैथुन, गुदमैथुन आणि दुसऱ्‍या व्यक्‍तीसोबत केलेला हस्तमैथुन ही—सहसा वेश्‍यावृत्तीशी संबंधित असलेली लैंगिक गैरकृत्ये पोर्निया या प्रकारात मोडतात. अशी कृत्ये “जारकर्म” नाही असे समजणारे स्वतःची फसगत करत आहेत आणि सैतानाच्या एका पाशाला बळी पडले आहेत. (२ तीमथ्य २:२६) शिवाय, चारित्र्याचे रक्षण करणे हे केवळ जारकर्मात मोडणाऱ्‍या कृत्यांपासून दूर राहण्यापर्यंत मर्यादित नाही. ‘जारकर्मापासून पळ काढण्याकरता,’ पोर्नियाचे घोर पाप जिच्यामुळे घडू शकेल अशी सर्व प्रकारची लैंगिक अशुद्धता आणि गैरवर्तन आपण टाळले पाहिजे. (इफिसकर ४:१९) अशाप्रकारे आपण चारित्र्याचे रक्षण करू शकतो.

प्रणयचेष्टेचे धोके टाळा

१६. प्रणय व्यक्‍त करणे कोणत्या ठिकाणी योग्य आहे आणि हे शास्त्रवचनांतील कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट होते?

१६ चारित्र्याचे रक्षण करण्याकरता आणखी एका धोकेदायक गोष्टीपासून आपण सावध राहिले पाहिजे आणि ती म्हणजे प्रणयचेष्टा. काहीजणांचे म्हणणे आहे की प्रणयचेष्टा करण्यामागे कोणताही वाईट हेतू नसतो, त्यामुळे काही नुकसान होत नाही आणि विरुद्धलिंगी व्यक्‍तींमध्ये केवळ मौज म्हणून केला जाणारा हा प्रकार आहे. अर्थात, श्रृंगारिक प्रीती व्यक्‍त करण्याची एक योग्य वेळ व प्रसंग असतो. इसहाक व रिबका एकदा “प्रणयलीला” करताना लोकांच्या दृष्टीस पडले आणि त्या पाहणाऱ्‍यांना स्पष्ट दिसून आले की हे दोघे भाऊबहीण निश्‍चितच नव्हते. (उत्पत्ति २६:७-९) पण ते दोघे पतीपत्नी होते. त्यांचे आपसात प्रणय व्यक्‍त करणे योग्यच होते. पण प्रणयचेष्टेच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.

१७. प्रणयचेष्टा म्हणजे काय आणि या समस्येला आळा कसा घालता येईल?

१७ प्रणयचेष्टेची व्याख्या अशाप्रकारे करता येईल: लग्नाचा इरादा नसताना दुसऱ्‍या व्यक्‍तीबद्दल प्रणयभावना असल्याचे भासवणे. मानवांची घडण अतिशय जटिल आहे त्यामुळे प्रणयचेष्टा करण्याचे मार्ग असंख्य आहेत आणि त्यांपैकी काही, वरवर पाहिल्यास अजिबात लक्षात न येणारे असे आहेत. (नीतिसूत्रे ३०:१८, १९) तेव्हा या विषयावर कोणतेही निश्‍चित नियम ठरवता येत नाहीत. पण केवळ नियमांचे पालन करण्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी येथे गरजेचे आहे—प्रामाणिक आत्म-परीक्षण आणि बायबल तत्त्वांचे जाणीवपूर्वक पालन.

१८. काहीजण प्रणयचेष्टा करण्यास कशामुळे प्रवृत्त होतात आणि प्रणयचेष्टा करणे नुकसानकारक का आहे?

१८ प्रामाणिकपणे विचार केल्यास, आपल्यापैकी बहुतेकांना हे कबूल करावे लागेल की एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीला आपल्याबद्दल प्रणयभावना असल्याची चाहूल लागते तेव्हा आपण मनोमन सुखावतो. हे स्वाभाविक आहे. पण दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या मनात अशा भावना उत्पन्‍न करण्यासाठी—केवळ स्वतःच्या स्वाभिमानाला गोंजारण्याच्या किंवा इतरांची खुशामत करण्याच्या उद्देशाने आपण प्रणयचेष्टा करतो का? जर आपण असे करत असू, तर दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या भावना आपण किती दुखावतो याचा आपण विचार केला आहे का? उदाहरणार्थ, नीतिसूत्रे १३:१२ म्हणते: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.” जाणूनबुजून कोणाशी प्रणयचेष्टा केल्यास, त्या व्यक्‍तीवर याचा नेमका कसा परिणाम होईल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. त्याच्या किंवा तिच्या कदाचित अपेक्षा वाढतील आणि तो किंवा ती लग्नाचा विचार करू लागेल. पण शेवटी निराशा पदरी पडेल आणि तो किंवा ती कदाचित त्यातून सावरू शकणार नाही. (नीतिसूत्रे १८:१४) हेतूपुरस्सर दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या भावनांशी खेळणे क्रूरपणाचे लक्षण आहे.

१९. प्रणयचेष्टेमुळे ख्रिस्ती विवाह कशाप्रकारे धोक्यात येऊ शकतात?

१९ विवाहित व्यक्‍तींसोबत प्रणयचेष्टा करणे अधिकच धोकेदायक आहे. एखाद्या विवाहित व्यक्‍तीबद्दल—किंवा एखाद्या विवाहित व्यक्‍तीने आपल्या जोडीदाराला सोडून इतर कोणा व्यक्‍तीबद्दल प्रणयभावना असल्याचे भासवणे अयोग्य आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे काही ख्रिश्‍चनांना देखील असा चुकीचा ग्रह आहे की आपल्या जोडीदाराला सोडून इतर विरुद्धलिंगी व्यक्‍तीबद्दल प्रणयभावना उत्पन्‍न करण्यात काही गैर नाही. काहीजण अशा एखाद्या “मित्र” अथवा “मैत्रिणीजवळ” आपली सुखदुःखे सांगतात व अशा काही अंतरंग भावना व्यक्‍त करतात ज्या ते आपल्या जोडीदाराजवळही व्यक्‍त करत नाहीत. परिणामस्वरूप, प्रणय भावना उत्पन्‍न होऊन त्यातून भावनिक अवलंबन निर्माण होते आणि यामुळे वैवाहिक संबंध कमजोर होऊन पूर्णपणे नष्टही होऊ शकतो. विवाहित ख्रिश्‍चनांनी व्यभिचाराबद्दल येशूने दिलेला हा सुज्ञ इशारा लक्षात ठेवला पाहिजे—व्यभिचाराची सुरवात मनात होते. (मत्तय ५:२८) तेव्हा, आपण आपल्या हृदयाचे रक्षण करू या आणि असे भयंकर परिणाम ज्यांमुळे घडू शकतील असे सर्व प्रसंग टाळू या.

२०. आपल्या चारित्र्याबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगण्याचा संकल्प करावा?

२० आजच्या अनैतिक जगात शुद्ध चारित्र्य राखणे तितके सोपे नाही हे खरे आहे. पण आठवणीत असू द्या, एकदा चारित्र्य गमवल्यावर पुन्हा ते मिळवण्यापेक्षा आधीच त्याचे रक्षण करणे जास्त सोपे आहे. अर्थात, यहोवा “भरपूर क्षमा” करतो आणि जे मनःपूर्वक पश्‍चात्ताप करतात त्यांची पापे तो धुऊन टाकण्यास समर्थ आहे. (यशया ५५:७) पण अनैतिक कृत्ये करणाऱ्‍यांना त्यांच्या वर्तनामुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांपासून यहोवा रक्षण देत नाही. हे दुष्परिणाम अनेक वर्षे, कधीकधी तर आयुष्यभरही टिकू शकतात. (२ शमुवेल १२:९-१२) तेव्हा आपल्या हृदयाचे रक्षण करण्याद्वारे आपल्या चारित्र्याचे रक्षण करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. यहोवा देवासमोर एक शुद्ध, चारित्र्यवान व्यक्‍ती म्हणून उभे राहण्याचा बहुमान अत्यंत मोलवान आहे—तो कधीही गमावू नका!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• चारित्र्याचा काय अर्थ होतो आणि ते इतके महत्त्वाचे का आहे?

• आपण आपल्या हृदयाचे रक्षण कशाप्रकारे करू शकतो?

• जारकर्मापासून पळ काढणे म्हणजे काय?

• प्रणयचेष्टा आपण का टाळली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

गाडीला योग्य दिशा न दिल्यास तिच्यामुळे नुकसान होऊ शकते

[१२ पानांवरील चित्रे]

धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास काय घडू शकते?

[१३ पानांवरील चित्र]

दोन चारित्र्यवान व्यक्‍तींचे प्रणयाराधन आनंददायक असते व त्यामुळे देवाचे गौरव होते