धर्म सकारात्मक की नकारात्मक प्रभाव?
धर्म सकारात्मक की नकारात्मक प्रभाव?
“ख्रिस्ती धर्माचा मी ऋणी आहे आणि माझ्या मते, आपण गेल्या २,००० वर्षांपासून ज्या जगात राहत आहोत तेही [ख्रिस्ती धर्माचा] ऋणी आहे.”—प्रास्ताविक, टू थाऊसंड इयर्स—द फर्स्ट मिलेनियम: द बर्थ ऑफ ख्रिस्चियॅनिटी टू द क्रूसेड्स.
“ख्रिस्ती धर्माबद्दल” सार्वजनिकरित्या ही संमती, इंग्रज लेखक व प्रसारक मेल्विन ब्रॅग यांनी दिली. पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांना कोणत्या न कोणत्या धर्माप्रती वाटणारा ऋणानुबंध त्यांच्या शब्दांतून व्यक्त होतो. त्यांचा ठाम विश्वास आहे की, धर्माने त्यांच्या जीवनावर चांगला प्रभाव पाडला आहे. उदाहरणार्थ, एक लेखक म्हणतो की, इस्लामने “एका उत्कृष्ट संस्कृतीला चालना दिली आहे . . . [जे] संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरले आहे.”
धर्माची भूमिका—सकारात्मक की नकारात्मक?
परंतु, ब्रॅग यांच्या पुढील शब्दांनी, धर्म खरोखर एक सकारात्मक प्रभाव राहिला आहे का याविषयी गंभीर प्रश्न निर्माण केला. ते म्हणतात: “ख्रिस्ती धर्मही मला उत्तर देण्यास जबाबदार आहे.” कसले उत्तर? “त्याचा ‘इतिहास’ ज्याने रंगला आहे त्या असहिष्णुतेचे, दुष्टतेचे, अमानवी कृत्यांचे आणि मुद्दामहून दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीचे उत्तर.”
पुष्कळ लोक म्हणतील की, संपूर्ण इतिहासात जगातील बहुतेक धर्मांनी असहिष्णुता, दुष्टता, अमानवी कृत्ये आणि मुद्दामहून दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दाखवली आहे. त्यांच्या मते, धर्म, मानवजातीचा उपकारकर्ता असल्याचा केवळ आव आणतो. सद्गुण आणि पवित्रतेच्या फसव्या रूपामागे त्याचा दांभिकपणा आणि खोटेपणा दडलेला आहे. (मत्तय २३:२७, २८) अ रॅशनलिस्ट एन्सायक्लोपिडिया म्हणतो, “धर्म हा संस्कृतीसाठी खास महत्त्व राखून आहे हे विधान आपल्या साहित्यात इतर कशाहीपेक्षा जास्त सामान्यपणे आढळते. पण तेच इतर कशाहीपेक्षा इतिहासाच्या वास्तविकतांनी खोटे शाबीत करण्यात आले आहे.”
आज कोणतेही वर्तमानपत्र हातात घेतले तर तुम्हाला, एकीकडे धार्मिक पुढारी प्रेम, शांती आणि करुणा दाखवण्यावर भाषण देतात पण दुसरीकडे द्वेषाला प्रोत्साहन देतात आणि आपल्या निर्दयी युद्धांना पवित्रतेचे रूप देण्यासाठी देवाच्या नावाचा धावा करतात याची असंख्य उदाहरणे मिळतील. म्हणूनच, पुष्कळ लोकांना धर्म म्हणजे जीवनातली विनाशकारी शक्ती वाटते यात काहीच नवल नाही!
धर्म नसलेला बरा?
इंग्रज तत्त्ववेत्ता, बर्ट्रंड रस्सलप्रमाणे काहींना असेही वाटू लागले आहे की, “हळूहळू सगळेच धर्म नाहीसे झाले”
तर फार बरे होईल. त्यांच्या मते, धर्म नाहीसा करणे हाच मानवजातीच्या समस्यांवरील एकमेव खात्रीशीर उपाय आहे. पण ते एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की, धर्म त्यागणारे देखील धर्म समर्थकांइतकाच द्वेषभाव आणि असहिष्णुता दाखवू शकतात. धार्मिक विषयांवर लेखन करणाऱ्या कॅरन आर्मस्ट्राँग अशी आठवण करून देतात: “नात्सींच्या शासनकाळात झालेल्या हत्याकांडाने हे दाखवून दिले की, धर्मनिरपेक्ष विचारसरणी देखील धर्मयुद्धाइतकीच घातक असू [शकते.]”—देवाकरता युद्ध, यहूदी, ख्रिस्ती आणि इस्लाममध्ये मूलतत्त्ववाद (इंग्रजी).तर मग, धर्माला खरोखर एक चांगला प्रभाव म्हणता येईल का? की, या उलट, तोच मानवजातीच्या समस्यांचे मूळ कारण आहे? सर्व धर्मांचा नायनाट करणे हा या समस्यांवर उपाय आहे का? याविषयी बायबलचे काय मत आहे हे पुढील लेखात पाहा. याचे उत्तर वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.