व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फसवणुकीपासून सावध

फसवणुकीपासून सावध

फसवणुकीपासून सावध

“पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सैकर २:८.

१-३. (अ) फसवणुकीच्या प्रकारांचा दैनंदिन जीवनाच्या जवळजवळ सर्वच क्षेत्रांत शिरकाव झाला आहे हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते? (ब) जगात दिसणाऱ्‍या फसवणुकीबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटण्याचे कारण का नाही?

“तुमच्यापैकी किती जणांना असे क्लायंट भेटले आहेत जे तुमच्याशी खोटे बोलले नाहीत?” कायदेशास्त्राच्या एका प्राध्यापकांनी काही वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण घेताना हा प्रश्‍न विचारला. उत्तर काय होते? ते सांगतात: “हजारो वकिलांपैकी केवळ एकजण असा होता ज्याने म्हटले की त्याला खोटे बोलणारा क्लायंट आजवर भेटलेला नव्हता.” कारण काय होते? “या वकीलाने नुकतीच एका मोठ्या फर्ममध्ये प्रॅक्टिस सुरू केली होती आणि अजून त्याला एकाही क्लायंटशी बोलण्याची संधी मिळालेली नव्हती.” या अनुभवावरून एक खेदजनक वस्तुस्थिती उघड होते—आजच्या जगात खोटे बोलणे आणि फसवणूक करणे अगदी सर्वसामान्य झाले आहे.

फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत आणि आधुनिक जीवनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रांत तिचा शिरकाव झाला आहे. प्रसिद्धी माध्यमांतून सतत याची उदाहरणे पाहायला मिळतात—आपल्या हालचालींविषयी खोटे बोलणारे राजकीय नेते, औद्योगिक नफ्याविषयी अवाजवी अहवाल सादर करणारे अकाउन्टंट आणि वकील, उपभोक्‍त्‌यांची दिशाभूल करणारे जाहिरातदार, विमा कंपन्यांची फसवणूक करणारे फिर्यादी आणि अशीच इतर अनेक उदाहरणे आहेत. याशिवाय धार्मिक वर्तुळातही फसवणूक आहेच. पाळकवर्ग सामान्य लोकांना आत्म्याचे अमरत्व, नरकाग्नी व त्रैक्य यांसारख्या खोट्या शिकवणुकी देऊन त्यांना चुकीचा मार्ग दाखवत आहेत.—२ तीमथ्य ४:३, ४.

हे सर्व फसवणुकीचे प्रकार पाहून आपल्याला आश्‍चर्य वाटावे का? तसे वाटण्याचे खरे तर कारण नाही. ‘शेवटल्या काळाविषयी’ बायबलने हा इशारा दिला होता: “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य ३:१, १३) ख्रिस्ती या नात्याने आपण अशा दिशाभूल करणाऱ्‍या विचारांपासून सावध राहिले पाहिजे ज्या आपल्याला सत्याच्या मार्गातून विचलित करू शकतील. पण साहजिकच दोन प्रश्‍न उभे राहतात: आजच्या काळात फसवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात का आहे आणि आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण कोणती सावधगिरी बाळगू शकतो?

आज इतकी फसवणूक का आहे?

४. आजच्या जगात फसवणूक इतकी सर्वसामान्य का आहे याचा बायबल कशाप्रकारे खुलासा करते?

या जगात फसवणूक इतकी सर्वसामान्य का झाली आहे याचा बायबल स्पष्टपणे खुलासा करते. प्रेषित योहानाने लिहिले की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) “त्या दुष्टाला” म्हणजे दियाबल सैतानाला. त्याच्याविषयी येशूने म्हटले: “तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” तेव्हा, हे जग आपल्या शासकाच्याच वृत्तीप्रमाणे, त्याच्या नीतीमूल्यांप्रमाणे व फसवणूक करण्याच्या त्याच्या खुबीप्रमाणे वागते यात नवल ते काय?—योहान ८:४४; १४:३०; इफिसकर २:१-३.

५. या शेवटल्या काळात सैतानाने आपले फसवेगिरीचे प्रयत्न कशाप्रकारे अधिक तीव्र केले आहेत आणि त्याने कोणाला आपले निशाण बनवले आहे?

या शेवटल्या काळात सैतान अधिकच जोमाने कार्य करत आहे. त्याला पृथ्वीवर फेकण्यात आले आहे. आपला काळ थोडाच आहे हे जाणून तो “अतिशय संतप्त” झाला आहे. शक्य होईल तितक्या मानवांचा नाश करण्याच्या इराद्याने तो ‘सर्व जगाला ठकवित’ आहे. (प्रकटीकरण १२:९, १२) सैतान हा अधूनमधून फसवणूक करतो अशातला भाग नाही. तर तो मानवजातीला ठकविण्याच्या प्रयत्नांत जराही खंड पडू देत नाही. * अविश्‍वासू लोकांची मने अंधळी करण्यासाठी आणि त्यांना देवापासून दूर नेण्यासाठी तो लबाडी, विश्‍वासघात व यांशिवाय, आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक कावेबाज पद्धतीचा अवलंब करतो. (२ करिंथकर ४:४) फसवणुकीत धुरंधर असणाऱ्‍या सैतानाने, देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करणाऱ्‍यांना गिळंकृत करण्याचा निश्‍चय केला आहे. (योहान ४:२४; १ पेत्र ५:८) एका अर्थाने, सैतानाने असा दावा केला आहे, की ‘मी कोणत्याही व्यक्‍तीला देवापासून दूर नेऊ शकतो.’ (ईयोब १:९-१२) सैतानाच्या काही “फसव्या युक्‍त्‌या” कोणत्या आहेत आणि त्यांच्यापासून आपण कसे सावध राहू शकतो याविषयी विचार करू या.—इफिसकर ६:११, ज्युइश न्यू टेस्टमेंट.

धर्मत्यागी व्यक्‍तींच्या फसवणुकीपासून सावध राहा

६, ७. (अ) धर्मत्यागी कदाचित कोणता दावा करतील? (ब) धर्मत्यागी व्यक्‍तींचे हेतू काय आहेत हे शास्त्रवचनांत कशाप्रकारे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे?

सैतानाने देवाच्या सेवकांची भूलवणूक करण्यासाठी बऱ्‍याच काळापासून धर्मत्यागी व्यक्‍तींचा व संस्थांचा उपयोग केला आहे. (मत्तय १३:३६-३९) या धर्मत्यागी व्यक्‍ती यहोवाची उपासना करण्याचा आणि बायबलवर विश्‍वास असल्याचा कदाचित दावा करतील, पण देवाच्या संघटनेचा जो भाग पृथ्वीवर आहे त्याचा ते अव्हेर करतात. काहीजण तर ‘मोठी बाबेल’ अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यातील, देवाचा अवमान करणाऱ्‍या शिकवणुकींकडे परत जातात. (प्रकटीकरण १७:५; २ पेत्र २:१९-२२) देवाच्या प्रेरणेने बायबल लेखकांनी धर्मत्यागी व्यक्‍तींचे हेतू व कार्यपद्धती उघडकीस आणण्याकरता अतिशय जोरदार शब्दांचा वापर केला.

धर्मत्यागी व्यक्‍तींचा हेतू काय असतो? एकेकाळी आपण ज्याला खरे मानत होतो तो विश्‍वास ते सोडून देतात, पण तेवढ्याने त्यांचे समाधान होत नाही. बहुतेकदा त्यांना इतरांनाही आपल्यासोबत ओढून न्यायचे असते. बाहेर जाऊन नवे शिष्य शोधण्यापेक्षा बरेच धर्मत्यागी “शिष्यांना [अर्थात, खिस्ताच्या शिष्यांना] आपल्यामागे ओढून” घेण्याचा प्रयत्न करतात. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) खोट्या शिक्षकांविषयी प्रेषित पौलाने ही निकडीची सूचना दिली: “तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८) बरेच धर्मत्यागी याच प्रयत्नात नसतात का? अपहरण करणारी व्यक्‍ती ज्याप्रमाणे एखाद्या बेसावध व्यक्‍तीला तिच्या कुटुंबीयांपासून दूर नेते त्याच प्रकारे धर्मत्यागी व्यक्‍ती देखील मंडळीतील भोळ्या सदस्यांना सावज बनवून त्यांना कळपापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात.

८. आपले हेतू साध्य करण्याकरता धर्मत्यागी कोणत्या पद्धतींचा वापर करतात?

आपले हेतू साध्य करण्यासाठी धर्मत्यागी व्यक्‍ती कोणत्या पद्धतींचा वापर करतात? ते सहसा सत्याचा विपर्यास करून, अर्धसत्ये सांगून किंवा सरळसरळ असत्य सांगून लोकांना फसवतात. आपल्या शिष्यांविरुद्ध ‘सर्व प्रकारची वाईट लबाडी’ बोलून त्यांचा छळ केला जाईल हे येशूला माहीत होते. (मत्तय ५:११) हे दुष्टबुद्धीने वागणारे विरोधक इतरांना फसवण्याच्या उद्देशाने ज्या खऱ्‍या नाहीत अशा गोष्टी सांगतील. प्रेषित पेत्राने धर्मत्यागी व्यक्‍तींबद्दल ताकीद दिली जे “बनावट गोष्टी” बोलतील व “फसव्या शिकवणुकी” पसरवून आपल्या स्वार्थाकरता ‘शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावतील.’ (२ पेत्र २:३, १३, NW; ३:१६) दुःखाची गोष्ट म्हणजे हे धर्मत्यागी “कित्येकांच्या विश्‍वासाचा नाश करितात.”—२ तीमथ्य २:१८.

९, १०. (अ) धर्मत्यागी लोकांच्या फसवणुकींपासून आपण कशाप्रकारे स्वतःला वाचवू शकतो? (ब) देवाच्या उद्देशाच्या आपल्या समजुतींत फेरबदल करण्याची गरज पडल्यास आपण अस्वस्थ का होत नाही?

धर्मत्यागी व्यक्‍तींकडून आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण कशारितीने सावध राहू शकतो? देवाच्या वचनातील या सल्ल्याचे पालन करण्याद्वारे: “जे फुटी व अडथळे घडवून आणीत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.” (रोमकर १६:१७) त्यांच्यापासून ‘दूर होण्याचा’ अर्थ असा की आपण त्यांच्या तर्कवादाचा धिक्कार केला पाहिजे, मग तो मौखिक असो, छापील साहित्याच्या अथवा इंटरनेटच्या माध्यमाने असो. आपण अशी भूमिका का घेतो? एकतर, देवाचे वचन आपल्याला असे करण्यास सांगते आणि यहोवा जे काही सांगतो ते नेहमी आपल्या भल्याकरताच सांगतो याविषयी आपल्याला भरवसा आहे.—यशया ४८:१७, १८.

१० दुसरे कारण म्हणजे, मोठ्या बाबेलमध्ये व आपल्यामध्ये ज्यांमुळे स्पष्ट फरक दिसून येतो, त्या सत्यांचे ज्ञान आपल्याला देणाऱ्‍या संघटनेवर आपले प्रेम आहे. पण त्याच वेळेस देवाच्या उद्देशाविषयी आपले ज्ञान परिपूर्ण नाही हे आपण कबूल करतो; गतकाळात आपल्या समजुतींत बऱ्‍याचदा फेरबदल झाला आहे. एकनिष्ठ ख्रिस्ती आपली समज अधिक स्पष्ट करण्याकरता यहोवाच्या योग्य वेळेची प्रतीक्षा करण्यास तयार आहेत. (नीतिसूत्रे ४:१८) तोपर्यंत देव ज्या संघटनेचा उपयोग करून घेत आहे तिला आपण जडून राहू कारण यहोवाचा आशीर्वाद तिच्यावर आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे.—प्रेषितांची कृत्ये ६:७; १ करिंथकर ३:६.

स्वतःची फसगत करण्यापासून सावध

११. अपरिपूर्ण मानवांना स्वतःची फसगत करण्याची प्रवृत्ती का असते?

११ अपरिपूर्ण मानवांची एक प्रवृत्ती आहे जिचा सैतान गैरफायदा उचलतो, अर्थात स्वतःचीच फसगत करण्याची प्रवृत्ती. यिर्मया १७:९ म्हणते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” आणि याकोबाने लिहिले: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो.” (याकोब १:१४) आपले हृदय मोहात पडते तेव्हा ते आपल्याला पापी वासनेचे आमीष दाखवते, तिला आकर्षक बनवते व त्या वासनेला बळी पडल्यास काही नुकसान होणार नाही असे आपल्याला भासवते. असा दृष्टिकोन एका व्यक्‍तीला बहकवू शकतो कारण पापी वासनेला बळी पडल्याने शेवटी नाश ठरलेला आहे.—रोमकर ८:६.

१२. स्वतःची फसगत करण्याच्या पाशात आपण कशाप्रकारे अडकू शकतो?

१२ स्वतःची फसवणूक करण्याची ही प्रवृत्ती सहज आपल्याकरता एक पाश बनू शकते. कपटी हृदय एखाद्या गंभीर गुणदोषाकरता काहीतरी सबब सांगून तो लपवण्याचा प्रयत्न करते किंवा एखादे गंभीर पाप झाकण्याचा प्रयत्न करते. (१ शमुवेल १५:१३-१५, २०, २१) तसेच आक्षेपार्ह वर्तनाच्या बाबतीतही, असाध्य रोगाने ग्रस्त असलेले आपले हृदय काही ना काही सबब शोधण्यासाठी धडपडते. मनोरंजनाचे उदाहरण घ्या. काही मनोरंजनाचे प्रकार अनपायकारक आणि आनंददायक आहेत. पण जगातले बरेच मनोरंजनाचे प्रकार—उदाहरणार्थ चित्रपट व टीव्ही कार्यक्रम तसेच इंटरनेट साईट्‌सवर सापडणारे मनोरंजन बीभत्स व अनैतिक असते. आपण अशाप्रकारचे बाजारू मनोरंजन पाहिले तरीही आपल्याला काही नुकसान होणार नाही अशी स्वतःची समजूत घालणे फार सोपे आहे. काहीजण असाही तर्क करतात, “माझा विवेक मला बोचत नाही, मग काय हरकत आहे?” पण अशाप्रकारे विचार करणाऱ्‍या व्यक्‍ती “स्वतःची फसवणूक” करत आहेत.—याकोब १:२२.

१३, १४. (अ) आपला विवेक नेहमीच विश्‍वासार्ह मार्गदर्शन पुरवत नाही हे शास्त्रवचनांतील कोणत्या उदाहरणावरून दिसून येते? (ब) स्वतःची फसगत करण्यापासून आपण कशाप्रकारे सावध राहू शकतो?

१३ स्वतःची फसवणूक करण्यापासून आपण कशाप्रकारे सावध राहू शकतो? सर्वप्रथम आपण आठवण ठेवली पाहिजे की मनुष्याच्या विवेकावर नेहमीच भरवसा ठेवता येत नाही. प्रेषित पौलाचे उदाहरण घ्या. ख्रिस्ती बनण्याआधी, तो ख्रिस्ताच्या अनुयायांचा छळ करत होता. (प्रेषितांची कृत्ये ९:१, २) त्या वेळी कदाचित त्याच्या विवेकाला बोचणी झाली नसेल. अर्थात, तेव्हा तो अयोग्यप्रकारे विचार करत होता. पौल म्हणतो, “मी जे केले ते न समजून अविश्‍वासामुळे केले.” (१ तीमथ्य १:१३) त्याअर्थी, विशिष्ट मनोरंजनाबद्दल आपला विवेक बोचणी करत नाही म्हणजे ते योग्य आहे असे म्हणता येणार नाही. केवळ देवाच्या वचनाच्या साहाय्याने प्रशिक्षित केलेला सुदृढ विवेक आपल्याला विश्‍वासार्ह मार्गदर्शन देऊ शकतो.

१४ स्वतःची फसगत करण्याचे टाळायचे असेल तर आपण काही उपयुक्‍त सूचना आठवणीत ठेवल्या पाहिजेत. प्रार्थनापूर्वक स्वतःचे परीक्षण करा. (स्तोत्र २६:२; २ करिंथकर १३:५) प्रामाणिक आत्मपरीक्षणामुळे कदाचित आपल्या विचारसरणीत किंवा वर्तनात कोणते बदल केले पाहिजेत हे आपल्याला दिसून येईल. इतरांचे ऐका. (याकोब १:१९) आत्मपरीक्षण करताना आपण त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहू शकत नसल्यामुळे, परिपक्व, अनुभवी सह ख्रिस्ती बांधवांची मते ऐकून घेणे सुज्ञतेचे आहे. जर तुमचे निर्णय किंवा वर्तन अनुभवी बांधवांना आक्षेपार्ह वाटत असेल, तर तुम्ही स्वतःला असे विचारू शकता, ‘असे तर नाही ना, की माझा विवेक योग्यरित्या प्रशिक्षित नाही, किंवा माझे हृदय मला फसवत आहे?’ बायबलचे व बायबलवर आधारित असणाऱ्‍या प्रकाशनांचे नियमित वाचन करा. (स्तोत्र १:२) असे केल्याने तुम्ही आपले विचार, मनोवृत्ती, व भावना देवाच्या तत्त्वांच्या सामंजस्यात ठेवू शकाल.

सैतानाच्या लबाडींपासून सावध राहा

१५, १६. (अ) आपल्याला फसवण्याच्या प्रयत्नात सैतान कोणत्या लबाडींचा वापर करतो? (ब) अशा लबाडींमुळे आपली फसगत होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

१५ सैतान आपली फसवणूक करण्याच्या प्रयत्नात निरनिराळ्या प्रकारच्या लबाडींचा उपयोग करतो. तो आपल्याला असे पटवून देण्याचा प्रयत्न करतो की भौतिक वस्तूंमुळे जीवनात समाधान व आनंद मिळतो, पण खरे पाहता, बहुतेकदा याउलटच घडते. (उपदेशक ५:१०-१२) आपण आज ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत याविषयी स्पष्ट पुरावा असूनही, तो आपल्याला असे मानायला लावू इच्छितो की हे दुष्ट जग असेच कायम चालत राहील. (२ तीमथ्य ३:१-५) तसेच, चैनबाजीच्या मागे लागणाऱ्‍यांना बहुतेकदा दुःखदायक परिणाम सोसावे लागतात तरीसुद्धा, सैतान लोकांना असा विचार करायला लावतो की अनैतिक जीवनशैलीमुळे काहीही नुकसान होत नाही. (गलतीकर ६:७) अशाप्रकारच्या लबाडींमुळे आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय करता येईल?

१६ बायबलमधील उदाहरणांतून बोध घ्या. बायबलमध्ये अनेक व्यक्‍तींची उदाहरणे आहेत ज्यांना सैतानाने असत्य सांगून फसवले. ही उदाहरणे जणू आपल्याला धोक्याची सूचना देतात. कारण या व्यक्‍तींनी भौतिक गोष्टींचा मोह केला, काळाची निकड त्यांनी लक्षात घेतली नाही, काहीजण अनैतिकतेला बळी पडले आणि या सर्वांना दुःखद परिणाम भोगावे लागले. (मत्तय १९:१६-२२; २४:३६-४२; लूक १६:१४; १ करिंथकर १०:८-११) आधुनिक काळातील उदाहरणांपासून धडा घ्या. दुःखाची गोष्ट म्हणजे काही ख्रिस्ती बांधव देखील कधीकधी काळाची निकड विसरून असा विचार करू लागतात की देवाची सेवा केल्यामुळे जगातल्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या हातून गेल्या आहेत. मग ते जगातल्या या ऐषारामाच्या मागे लागून सत्य सोडून देतात. पण असे पाऊल उचलणाऱ्‍या व्यक्‍ती “निसरड्या जागांवर” उभ्या आहेत कारण आज ना उद्या त्यांना आपल्या अधार्मिक वर्तनाची किंमत मोजावी लागते. (स्तोत्र ७३:१८, १९) इतरांच्या चुकांपासून धडा शिकण्यात सुज्ञता आहे.—नीतिसूत्रे २२:३.

१७. यहोवाचे आपल्यावर प्रेम नाही आणि त्याला आपली किंमतही नाही अशी लबाडी सैतान का पसरवतो?

१७ सैतानाने आणखी एका लबाडीचा परिणामकारक वापर केला आहे. तो आपल्याला असा विचार करायला लावतो की यहोवाचे आपल्यावर प्रेम नाही आणि त्याला आपली किंमत नाही. सैतानाने हजारो वर्षे अपरिपूर्ण मानवांचे निरीक्षण केले आहे. त्याला चांगले ठाऊक आहे की निराशा आपल्याला कमजोर बनवू शकते. (नीतिसूत्रे २४:१०) म्हणूनच, तो ही लबाडी पसरवतो की देवाच्या नजरेत आपण कवडीमोल आहोत. आपण ‘खाली पडलेल्या’ स्थितीत असताना यहोवाला आपली काळजी नाही अशी जर आपली खात्री झाली तर साहजिकच आपण वर उठण्याचा प्रयत्नच सोडून देण्याची शक्यता आहे. (२ करिंथकर ४:९) आणि फसवण्यात तरबेज असणाऱ्‍या सैतानाला नेमके हेच हवे आहे! मग सैतानाच्या या लबाडीमुळे आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

१८. बायबल आपल्याला यहोवाच्या प्रेमाविषयी कशाप्रकारे आश्‍वासन देते?

१८ आपल्यावर असलेल्या देवाच्या प्रेमाबद्दल बायबलमध्ये जे सांगितले आहे त्याचा वैयक्‍तिक दृष्टिकोनातून विचार करा. बायबल अतिशय हृदयस्पर्शी शब्दचित्रांच्या माध्यमाने आपल्याला हमी देते की यहोवा आपली वैयक्‍तिकरित्या दखल घेतो आणि त्याचे आपल्यावर वैयक्‍तिकरित्या प्रेम आहे. तो तुमची आसवे आपल्या “बुधलीत” भरून ठेवतो. याचा अर्थ, त्याला विश्‍वासू राहण्याकरता संघर्ष करताना तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तो पाहतो आणि त्यांची आठवण ठेवतो. (स्तोत्र ५६:८) तुम्ही “भग्नहृदयी” असता तेव्हा त्याला माहीत असते आणि अशा वेळी तो तुमच्या जवळ असतो. (स्तोत्र ३४:१८) त्याला तुमच्याविषयी एकूणएक गोष्ट माहीत आहे, इतकेच काय तुमच्या “डोक्यावरले सर्व केस देखील” त्याने मोजलेले आहेत. (मत्तय १०:२९-३१) सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाने तुमच्याकरता “आपला एकुलता एक पुत्र दिला.” (योहान ३:१६; गलतीकर २:२०) कधीकधी ही वचने आपल्यालाही लागू होतात यावर विश्‍वास ठेवणे कदाचित तुम्हाला कठीण वाटेल. पण आपण यहोवाच्या वचनांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. तो आपल्यावर केवळ एक समूह या नात्याने नव्हे तर वैयक्‍तिकरित्या प्रेम करतो यावर आपण विश्‍वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे.

१९, २०. (अ) यहोवा तुमच्यावर प्रेम करत नाही ही सैतानाची लबाडी ओळखून तिच्या वाऱ्‍यासही उभे न राहणे का महत्त्वाचे आहे? (ब) एका प्रवासी पर्यवेक्षकाने निराश व्यक्‍तींना कशाप्रकारे मदत केली आहे?

१९ लबाडी ओळखा व तिच्या वाऱ्‍यास उभे राहू नका. एखादी व्यक्‍ती खोटे बोलत आहे असे जर तुम्हाला माहीत असेल तर साहजिकच तुम्ही आपली फसवणूक होऊ देणार नाही. त्याचप्रकारे यहोवा तुमच्यावर प्रेम करत नाही या लबाडीवर तुम्ही विश्‍वास ठेवावा अशी सैतानाची इच्छा आहे हे माहीत असणेच तुम्हाला अतिशय साहाय्यक ठरू शकते. सैतानाच्या डावपेचांविषयी ताकीद देणाऱ्‍या एका टेहळणी बुरूज लेखाविषयी प्रतिक्रिया व्यक्‍त करणाऱ्‍या एका ख्रिस्ती बहिणीने असे म्हटले: “सैतान माझ्याच भावनांच्या साहाय्याने मला निराश करण्याचा प्रयत्न करतो हे कधीच माझ्या लक्षात आले नव्हते. हे समजल्यावर मला त्या भावनांना तोंड देण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

२० दक्षिण अमेरिकेतील एका देशात प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य करणाऱ्‍या एका बांधवाचा अनुभव लक्षात घ्या. निराश झालेल्या सहविश्‍वासी बांधवांना मेंढपाळ भेटी देताना ते सहसा त्यांना असे विचारतात, ‘त्रैक्यावर तुमचा विश्‍वास आहे का?’ ही तर सैतानाची एक खोटी शिकवण आहे याची जाणीव असल्यामुळे निराश व्यक्‍ती सहसा उत्तर देते, की ‘अर्थातच नाही.’ मग हे प्रवासी वडील त्यांना विचारतात, ‘नरकाग्नीवर तुमचा विश्‍वास आहे का?’ पुन्हा उत्तर तेच असते, ‘अर्थातच नाही!’ तेव्हा प्रवासी वडील त्यांना सांगतात की अशाचप्रकारे सैतानाची आणखी एक खोटी शिकवण आहे जी सहसा लोकांना सहज ओळखता येत नाही. मग ते यहोवाच्या जवळ या * या पुस्तकातील पृष्ठ २४९ वरील २१ व्या परिच्छेदाकडे त्यांचे लक्ष वेधतात. यात स्पष्टपणे सांगितले आहे की यहोवाचे आपल्यावर वैयक्‍तिकरित्या प्रेम नाही ही एक लबाडी आहे. निराश व्यक्‍तींना सैतानाची ही लबाडी ओळखून तिच्या वाऱ्‍यासही उभे न राहण्यास मदत केल्यामुळे बरेच चांगले परिणाम दिसून आल्याचे हे प्रवासी पर्यवेक्षक सांगतात.

फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करा

२१, २२. सैतानाच्या कावेबाज युक्‍त्‌यांविषयी आपण अंधारात का नाही आणि आपण कोणता संकल्प केला पाहिजे?

२१ शेवटल्या काळाच्या या अंतिम भागात सैतान लबाड्या व कपटी युक्‍त्‌यांचा भडिमार करेल हे अपेक्षितच आहे. पण आपण कृतज्ञ आहोत की यहोवाने सैतानाच्या या कावेबाज युक्‍त्‌यांविषयी आपल्याला अंधारात ठेवलेले नाही. बायबल आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ तयार केलेली बायबल आधारित प्रकाशने दियाबलाच्या दुष्ट पद्धतींचा पर्दाफाश करतात. (मत्तय २४:४५) धोक्याची आगाऊ सूचना मिळाल्यामुळे आपण धोका टाळण्यास सुसज्ज होतो.—२ करिंथकर २:११.

२२ तेव्हा, धर्मत्यागी व्यक्‍तींच्या तर्कवादापासून आपण सावध राहू या. तसेच स्वतःची फसगत करण्याच्या पाशात पडू नये म्हणून काळजी घेण्याचाही आपण संकल्प करू या. आणि सैतानाच्या सर्व लबाड्या ओळखून त्यांच्या वाऱ्‍यासही न उभे राहण्याचा आपण सदोदित प्रयत्न करू या. असे केल्यास, ‘सत्यस्वरूप देव’ यहोवा याच्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधाचे आपण रक्षण करू शकतो कारण त्याला कुटिलतेचा वीट आहे.—स्तोत्र ३१:५; नीतिसूत्रे ३:३२.

[तळटीपा]

^ परि. 5 प्रकटीकरण १२:९ यात ‘ठकविणे’ या अर्थाच्या मूळ क्रियापदाबद्दल एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे की हा शब्द, “एखादी क्रिया वारंवार केल्यामुळे व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वात रुजलेल्या सवयीला सूचित करतो.”

^ परि. 20 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्हाला आठवते का?

• आज जगात फसवणूक इतकी सर्वसामान्य का झाली आहे?

• धर्मत्यागी व्यक्‍तींकडून फसवणूक होऊ नये म्हणून आपण कशाप्रकारे सावध राहू शकतो?

• स्वतःची फसगत करण्याच्या प्रवृत्तीविषयी आपण कशाप्रकारे सावध राहू शकतो?

• सैतानाच्या लबाडीमुळे फसवणूक होण्याचे आपण कसे टाळू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

मनोरंजनाच्या बाबतीत स्वतःची फसगत करू नका

[१८ पानांवरील चित्रे]

स्वतःची फसगत करण्याचे टाळण्याकरता प्रार्थनापूर्वक स्वतःचे परीक्षण करा, इतरांचे ऐका आणि देवाच्या वचनाचे नियमित वाचन करा