यहोवाचे साक्षीदार तुमच्या घरी वारंवार का येतात?
यहोवाचे साक्षीदार तुमच्या घरी वारंवार का येतात?
संपूर्ण जगभरात, यहोवाचे साक्षीदार घरोघरच्या कार्यात चिकाटीने भाग घेतात यासाठी प्रसिद्ध आहेत. काही लोकांच्या मनात असा प्रश्न येतो, की आपण साक्षीदारांनी सांगितलेल्या संदेशात इतकी आवड आधी दाखवली नव्हती तरीसुद्धा ते आपल्या घरी नेहमी का येतात. रशियाहून आलेल्या दोन पत्रांद्वारे आपल्याला याचे कारण कळते.
खाबारोव्हस्क येथील १९ वर्षीय माशा नावाच्या मुलीने कबूल केले: “खरं सांगायचं तर पूर्वी मी यहोवाच्या साक्षीदारांना एक पीडा समजून टाळायचे.” परंतु, साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या नियतकालिकांच्या काही प्रती वाचल्यानंतर तिची मनोवृत्ती बदलली. ती लिहिते: “या नियतकालिकांतील माहिती आकर्षक आणि प्रबोधनकारक आहेच, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही माहिती वाचल्यानंतर जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. आपल्या जीवनाचा काय उद्देश आहे हे मला हळूहळू समजू लागले.”
व्लादीवोसतोकच्या उत्तरेकडे सुमारे ८० किलोमीटर दूर असलेल्या उसूरेस्क शहरातून, स्वेतलाना हिने लिहिले: “मी अलीकडेच, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके वाचू लागले आहे. या काळात आपल्याला खरोखरच अशा नियतकालिकांची आवश्यकता आहे. मला यांतील सर्वच लेख वाचायला खूप आवडतात. ते अतिशय रोचक, माहितीकारक व प्रबोधनकारक आहेत. मी तुमचे आभार मानते! तुमच्यासारखे लोक या जगात अस्तित्वात आहेत आणि इतके दयाळूपणाचे व जरूरी काम पार पाडत आहेत याबद्दल मी खरोखरच आभारी आहे.”
संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार प्रेषित पौलाचा हा विचारप्रवर्तक प्रश्न गांभिर्याने घेतात: “घोषणा करणाऱ्यावाचून ते कसे ऐकतील?” (रोमकर १०:१४) तेव्हा, पुढच्या वेळी यहोवाचे साक्षीदार तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून घ्यायला काय हरकत आहे? देवाचे वचन बायबल यांतील सांत्वनदायक संदेश ऐकून कदाचित तुम्हालाही आनंद वाटेल.