व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर”

“विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर”

“विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर”

युद्ध होत असताना, एका सैनिकाला, “जा, घरी जा आणि आपल्या बायकोमुलांबरोबर राहा,” असा आदेश दिला जातो तेव्हा तो सैनिक घरी जायला नाखूष आहे, अशी तुम्ही कल्पना करू शकता का?

इस्राएलमधील राजा दावीदाच्या काळातील एका सैनिकाला असा आदेश देण्यात आला होता. उरीया हित्ती या सैनिकाला स्वतः राजानेच बोलावून घेतले. पण उरीयाने घरी जाण्यास नकार दिला. उरीयाच्या या विचित्र वाटणाऱ्‍या वागणुकीचे कारण विचारले असता तो म्हणाला, की देवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या कराराचा कोश आणि इस्राएली सैन्य मैदानांत असताना, “मी घरी जाऊन खाऊपिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय?” निकडीच्या समयी असे करण्याची उरीया कल्पनासुद्धा करू शकत नव्हता.—२ शमुवेल ११:८-११.

उरीयाच्या अशा वागण्यामुळे महत्त्वपूर्ण प्रश्‍न उभे राहतात; कारण आज आपणही एका युद्धाच्या काळात जगत आहोत. सध्या एक युद्ध चालले आहे परंतु ते जगातील राष्ट्रे लढत असलेल्या युद्धांपेक्षा वेगळे आहे. या युद्धापुढे, झालेली दोन महायुद्धेसुद्धा फिक्की पडतात; आणि या युद्धात तुम्ही देखील सामील आहात. यात धोक्याचे प्रमाण जास्त आहे आणि शत्रू भयावह आहे. या युद्धात, गोळीबार किंवा बाँबफेकी होत नसली तरी या युद्धाचे व्यूहतंत्र हे सोपे नाही.

या युद्धात सामील होण्याआधी, युद्धात सामील होणे नैतिकरीत्या बरोबर आहे की नाही आणि आपण कशासाठी युद्ध करत आहोत हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. या युद्धात भाग घेतल्याने आपला काही फायदा होणार आहे का? प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या पत्रात या अनोख्या युद्धाच्या उद्देशाचे स्पष्टीकरण दिले: “विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर.” होय, या युद्धात तुम्हाला एखाद्या गडासाठी नव्हे तर ‘विश्‍वासासाठी,’ अर्थात बायबलमध्ये प्रकट केलेल्या सर्व ख्रिस्ती सत्यासाठी लढायचे आहे. तुम्ही या विश्‍वासाच्या सत्यतेवर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे आणि त्याच्यासाठी लढून ते जिंकले पाहिजे.—१ तीमथ्य ६:१२.

एक सुज्ञ योद्धा शत्रूला ओळखण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. आपण ज्याच्याशी युद्ध करत आहोत त्या शत्रूला युद्धनीतीचा अनेक वर्षांचा अनुभव आहे; त्याच्याजवळ भरपूर साठा आणि शस्त्रास्रे आहेत. शिवाय तो मानवांपेक्षा वरचढ आहे. हा क्रूर, हिंसक आणि उलट्या काळजाचा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द सैतान आहे. (१ पेत्र ५:८) त्याच्यासमोर सर्व शस्रास्रे, मानवी कावेबाजपणा व चतुराई काही कामाची नाहीत. (२ करिंथकर १०:४) मग या युद्धात तुम्ही कशाचा उपयोग करू शकता?

सर्वात प्रमुख शस्त्र आहे, “आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन.” (इफिसकर ६:१७) ते किती प्रभावशाली आहे हे प्रेषित पौल दाखवतो: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री लोकांस ४:१२) एखाद्या व्यक्‍तीच्या अगदी आंतील विचार आणि हेतू यांना भेदून जाणारे धारदार व अचूक शस्त्र नक्कीच कौशल्याने व सांभाळून वापरण्याची गरज आहे.

तुम्हाला कदाचित माहीत असेल, की एखाद्या सैन्याकडे सर्वात आधुनिक शस्त्रे असली, परंतु त्या सैन्यातील सैनिकांना ती शस्त्रे वापरण्याचे कौशल्य नसेल तर त्या शस्त्रांचा काही उपयोग होणार नाही. तसेच, तुमच्याजवळ असलेल्या तरवारीचा प्रभावशाली उपयोग करण्याकरता तुम्हाला आधी प्रशिक्षणाची गरज आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला सर्वात अनुभवी लढवय्यांकडून प्रशिक्षण मिळू शकेल. येशूने या लढवय्यांना ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ म्हटले; या दासवर्गावर त्याने आपल्या अनुयायांना यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न खावयास देण्याची अर्थात मार्गदर्शन देण्याची जबाबदारी सोपवली आहे. (मत्तय २४:४५) या सामूहिक दासवर्गाला तुम्ही, शिकवण्यासाठी आणि शत्रूच्या रणनीतीविषयी समयोचित इशारे देण्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीवरून ओळखू शकता. पुरावे शाबीत करतात, की हा दासवर्ग यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळ्यांच्या आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या सदस्यांचा मिळून बनलेला आहे.—प्रकटीकरण १४:१.

हा सामूहिक दासवर्ग केवळ प्रशिक्षणच देत नाही. तर, थेस्सलनीकामधील मंडळीला पत्र लिहिणाऱ्‍या प्रेषित पौलाप्रमाणे मनोवृत्ती दाखवतो; प्रेषित पौलाने असे लिहिले: “आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्‍या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हाला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवहि देण्यास राजी होतो.” (१ थेस्सलनीकाकर २:७, ८) या प्रेमळ प्रशिक्षणाचा फायदा घेण्याची प्रत्येक ख्रिश्‍चनाची जबाबदारी आहे.

संपूर्ण शस्त्रसामग्री

तुमच्या संरक्षणाकरता एक लाक्षणिक संपूर्ण शस्त्रसामग्री पुरवण्यात आली आहे. इफिसकर ६:१३-१८ यात या शस्त्रसामग्रीची यादी देण्यात आली आहे. एक सावध सैनिक, आपल्या शस्त्रसामग्रीत काही गोष्टी नसतील किंवा त्यांची दुरूस्ती करायची असेल तर त्या धारण केल्याविना तो बाहेर पडणार नाही.

ख्रिश्‍चनाजवळ देखील त्याची संरक्षक शस्त्रसामग्री आणि विशेषेकरून मौल्यवान असलेली विश्‍वासाची मोठी ढाल असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच पौलाने असे लिहिले: “ह्‍या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्‍वासाची [मोठी] ढाल हाती घ्या व उभे राहा.”—इफिसकर ६:१६.

संपूर्ण शरीराचे रक्षण करू शकणारी मोठी ढाल विश्‍वास या गुणाला चित्रित करते. यहोवाच्या मार्गदर्शनावर तुमचा पूर्ण विश्‍वास असला पाहिजे, त्याने दिलेली सर्व अभिवचने पूर्ण होतील याबद्दल तुमच्या मनात यत्किंचितही शंका असू नये. ती वचने जणू काय पूर्ण झाली आहेत, इतका तुम्हाला पक्का विश्‍वास असला पाहिजे. सैतानाच्या या संपूर्ण व्यवस्थीकरणाचा नाश लवकर होईल, पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर होईल, देवाशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांना परिपूर्ण केले जाईल, याविषयी क्षणभरही शंका बाळगू नका.—यशया ३३:२४; ३५:१, २; प्रकटीकरण १९:१७-२१.

परंतु सध्या चाललेल्या युद्धाच्या वेळी तुम्हाला आणखी कशाची तरी गरज आहे; तुम्हाला एका साथीदाराची गरज आहे. युद्धकाळांत, लढवय्ये एकमेकांना उत्तेजन आणि संरक्षण देतात आणि कधीकधी तर स्वतःचा जीव धोक्यात घालून एकमेकांना वाचवतात तेव्हा त्यांच्यामध्ये मित्रत्वाचे एक घनिष्ठ नाते निर्माण होते. या युद्धात सोबत्यांची साथ ही महत्त्वाची असली तरीसुद्धा, खुद्द यहोवाची साथ असणे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणूनच शस्त्रसामग्रीची यादी दिल्यानंतर पौलाने शेवटी असे का म्हटले ते आपल्याला कळते; तो म्हणाला: “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा.”—इफिसकर ६:१८.

आपल्याला जिवलग मित्राबरोबर राहायला आवडते. आपण त्याच्याबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. यहोवाबरोबर प्रार्थनेद्वारे नियमित बोलल्याने एखाद्या भरवशालायक मित्राप्रमाणे तो आपल्याला खरा वाटू लागतो. शिष्य याकोब आपल्याला अशाप्रकारे उत्तेजन देतो: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.

शत्रूचे डावपेच

या जगाचा सामना करणे हे, सुरूंग पेरलेल्या जमिनीवरून चालण्याप्रमाणे असू शकते. आपल्यावर कोणत्याही बाजूने हल्ला होऊ शकतो आणि आपण बेसावध असतो तेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु यहोवाने आपल्याला लागणारे संरक्षण दिले आहे याची आपण खात्री बाळगू शकतो.—१ करिंथकर १०:१३.

आपल्या विश्‍वासाचा पाया असलेल्या बायबल सत्यांची टीका करण्याद्वारे हा शत्रू हल्ला करेल. धर्मत्यागी लोक, लाघवी शब्दांचा उपयोग करून, तुमची खुशामत करून व विपर्यस्त तर्क करून तुमचा पराजय करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना तुमच्या कल्याणाची चिंता नसते. नीतिसूत्रे ११:९ म्हणते: “अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्‍याचा नाश करितो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्‍त होतात.”

आपण धर्मत्यागी लोकांचे बोलणे ऐकले पाहिजे किंवा त्यांनी लिहिलेले लेख वाचले पाहिजेत तरच आपण त्यांचे युक्‍तिवाद खोटे शाबीत करू शकतो, असा विचार करणे साफ चुकीचे आहे. धर्मत्यागी लोकांचा विपर्यस्त, विषारी तर्क आपल्याला आध्यात्मिकरीत्या हानी करू शकतो आणि झपाट्याने पसरणाऱ्‍या काळपुळीसारखे [गँग्रीन] आपल्या विश्‍वासाला दूषित करू शकतो. (२ तीमथ्य २:१६, १७) त्यापेक्षा धर्मत्यागी लोकांबद्दल देवाचा जो दृष्टिकोन आहे तो आपण बाळगला पाहिजे. ईयोब यहोवाविषयी असे म्हणाला: “भक्‍तिहीन [धर्मत्यागी] त्याच्यासमोर येणार नाही.”—ईयोब १३:१६.

आपला शत्रू कदाचित ज्या डावपेचामुळे त्याला बरेच यश मिळाले आहे अशा वेगळ्या डावपेचाचा उपयोग करील. स्वैराचाराचे, अनैतिक वर्तनाचे आमिष दाखवल्याने शिस्तीने चाललेले सैनिक रांग सोडून भलतीकडेच चालू लागतात तेव्हा गोंधळ माजू शकतो.

अनैतिक चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील कार्यक्रम, भन्‍नाट संगीत यासारखे जगिक मनोरंजन सर्वात प्रभावशाली आमिष आहे. काही असा दावा करतात, की ते अनैतिक दृश्‍ये किंवा अनैतिक साहित्य वाचू शकतात कारण याचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. उघडपणे दाखवली जाणारी अश्‍लील दृश्‍ये असलेले अनैतिक चित्रपट नियमितरीत्या पाहणाऱ्‍या एका व्यक्‍तीने कबूल केले: “ही दृश्‍ये तुमच्या मनातून कधीच निघत नाहीत; तुम्ही जितक्यांदा अशी दृश्‍ये पाहता तितक्यांदा तुम्हाला तुम्ही जे पाहिले आहे ते करावेसे वाटते. . . . असे चित्रपट पाहताना तुम्हाला सतत असं वाटत राहतं, की तुमच्या जीवनात काहीतरी चुकतंय.” अशा धूर्त हल्ल्याने जखमी होण्याचा धोका पत्करण्यात काही अर्थ आहे का?

भौतिकवादाचे आमिष हे, शत्रूच्या शस्त्रसाठ्यांतील आणखी एक अस्त्र आहे. भौतिकवादाचा धोका सहज कळणार नाही कारण आपल्या सर्वांनाच भौतिक गोष्टींची गरज आहे. आपल्या सर्वांना घराची, अन्‍नाची, वस्राची गरज आहे आणि चांगल्या गोष्टी असणे चुकीचे नाही. परंतु या गोष्टींबद्दल एखाद्याची मनोवृत्ती काय आहे यात धोका दडलेला आहे. आध्यात्मिक गोष्टींना जे प्राधान्य दिले पाहिजे ते पैशाला दिले जाऊ शकते. आपण पैशावर प्रेम करणारे होऊ शकतो. आपण स्वतःला संपत्तीच्या मर्यादांची वेळोवेळी आठवण करून दिली पाहिजे. भौतिक संपत्ती ही क्षणिक आहे, परंतु आध्यात्मिक संपत्ती ही चिरकाल टिकणारी आहे.—मत्तय ६:१९, २०.

सैन्याचे मनोबल खचले तर विजय मिळण्याची शक्यता कमी होते. “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय.” (नीतिसूत्रे २४:१०) निरुत्साह या शस्त्राचा सैतानाने अतिशय प्रभावीपणे उपयोग केला आहे. “तारणाची आशा हे शिरस्त्राण” घातल्याने तुम्हाला निरुत्साहाचा सामना करण्यास मदत मिळेल. (१ थेस्सलनीकाकर ५:८) अब्राहामाप्रमाणे तुम्ही देखील भक्कम आशा बाळगा. आपल्या एकुलत्या एका पुत्राचा बली देण्यास अब्राहामाला सांगण्यात आले तेव्हा तो कचरला नाही. तुझ्या संततीद्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वादित केले जाईल असे जे वचन देवाने त्याला दिले होते ते तो निश्‍चित पूर्ण करील, शिवाय हे वचन पूर्ण करण्याकरता आवश्‍यकता भासल्यास इसहाकाचे पुनरुत्थानही करेल, असा अब्राहामाचा भक्कम विश्‍वास होता.—इब्री लोकांस ११:१७-१९.

हार मानू नका

अनेक वर्षांपासून धैर्याने लढा देणारे काही कदाचित थकून गेले असावेत म्हणून त्यांनी पूर्वीसारख्या आवेशाने लढण्याचे सोडून दिले आहे. या लेखाच्या सुरवातीला उल्लेखलेल्या उरीयाचे उदाहरण, युद्धात भाग घेतलेल्या सर्वांना योग्य दृष्टिकोन बाळगून लढत राहण्यास मदत करू शकेल. आपल्या अनेक सहख्रिस्ती योद्ध्‌यांना, आपत्तीचा, धोक्यांचा, थंडीवाऱ्‍याचा, उपासमारीचा सामना करावा लागत आहे. उरीयाप्रमाणे, आपण आता उपभोगू शकत असलेल्या सर्व सुखसोयींचा विचार करू नये किंवा आरामाचे जीवन जगण्याच्या मोहाला बळी पडू नये. आपण यहोवाच्या विश्‍वव्यापी एकनिष्ठ योद्ध्‌यांच्या सैन्यात राहू इच्छितो आणि आपल्यासाठी राखून ठेवलेले अद्‌भुत आशीर्वाद आपण जोपर्यंत प्राप्त करत नाही तोपर्यंत लढत राहू इच्छितो.—इब्री लोकांस १०:३२-३४.

शेवटला हल्ला होण्यासाठी अजून अवकाश आहे असा विचार करून आपले हात ढिले करणे धोकेदायक ठरू शकते. किती धोकेदायक ठरू शकते हे राजा दावीदाच्या उदाहरणावरून आपल्याला कळू शकेल. काही कारणास्तव तो आपल्या सैन्याबरोबर लढायला गेला नाही. याचा परिणाम असा झाला, की त्याने असे गंभीर पाप केले ज्यामुळे त्याला आयुष्यभर पीडा आणि दुःख सहन करावे लागले.—२ शमुवेल १२:१०-१४.

या युद्धात भाग घेण्यात, युद्धामुळे सहन कराव्या लागणाऱ्‍या हालअपेष्टांचा सामना करण्यात, थट्टामस्करी सहन करण्यात व आक्षेपार्ह जगिक सुखांचा त्याग करण्यात खरोखरच काही अर्थ आहे का? आध्यात्मिक युद्धात जे यशस्वीरीत्या लढत आले आहेत त्यांनी कबूल केले आहे की जगिक गोष्टी आकर्षक, चमकी धाग्यांप्रमाणे वाटतील परंतु त्यांना जवळून पाहिल्यास त्या कवडी-मोलाच्या आहेत हे आपल्याला दिसून येईल. (फिलिप्पैकर ३:८) शिवाय, अशा सुखांचा अंत अनेकदा दुःख आणि निराशा यातच होतो.

आध्यात्मिक लढाईत भाग घेणारा ख्रिस्ती, खऱ्‍या मित्रांबरोबर निकटचा सहवास, शुद्ध विवेक आणि एक अद्‌भुत आशा यांचा आनंद लुटतो. आत्म्याने अभिषिक्‍त असलेले ख्रिस्ती, येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात अमर जीवनाची वाट पाहतात. (१ करिंथकर १५:५४) बहुतांश ख्रिस्ती लढवय्ये परादीस पृथ्वीवर परिपूर्ण मानवी जीवनाची आशा बाळगतात. तेव्हा, अशी बक्षिसे प्राप्त करण्यासाठी आपण कोणतेही त्याग करायला तयार असले पाहिजे. शिवाय, जगिक युद्धांपेक्षा हे युद्ध वेगळे आहे; कारण या युद्धात विजय ठरलेला आहे; परंतु त्यासाठी आपण शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले पाहिजे. (इब्री लोकांस ११:१) सैतानाच्या कह्‍यात असलेल्या या युगाचे भविष्य—संपूर्ण विनाश हेच आहे.—२ पेत्र ३:१०.

या युद्धात भाग घेत असताना तुम्ही येशूचे हे शब्द कायम आठवणीत ठेवू शकता: “धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) परीक्षेत असतानाही सक्रिय व एकनिष्ठ राहण्याद्वारे तो विजयी ठरला. आपणही असेच करू शकतो.

[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]

गोळीबार किंवा बाँबफेकी होत नसली तरी युद्धाचे व्यूहतंत्र सोपे नाही

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

या युद्धात विजय ठरलेला आहे; परंतु त्यासाठी आपण शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले पाहिजे

[२६ पानांवरील चित्र]

तारणाची आशा हे शिरस्त्राण घातल्याने आपल्याला निरुत्साहाचा सामना करण्यास मदत मिळेल

[२६ पानांवरील चित्र]

सैतानाकडून येणारे “जळते बाण” विझवण्यासाठी विश्‍वासाच्या मोठ्या ढालीचा उपयोग करा

[२८ पानांवरील चित्र]

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल”

[२९ पानांवरील चित्र]

देवाने दिलेली अभिवचने पूर्ण होतील, असा पक्का विश्‍वास आपण बाळगला पाहिजे