व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईश्‍वरी समाधानामुळं मी टिकून राहिलो

ईश्‍वरी समाधानामुळं मी टिकून राहिलो

जीवन कथा

ईश्‍वरी समाधानामुळं मी टिकून राहिलो

बेंजामीन ईकेचुक्वू ओसूएके यांच्याद्वारे कथित

ख्रिस्ती सेवेत भाग घ्यायला सुरवात केल्यानंतर मी माझ्या आईवडिलांना भेटायला घरी गेलो. मला बघताच माझ्या वडिलांनी माझ्या शर्टची कॉलर धरली आणि “चोर!” असं ओरडू लागले. त्यांनी कोयता घेतला आणि त्याच्या चपट्या बाजूनं मला मारलं. गोंधळ ऐकून गावातले आजूबाजूचे लोक आमच्या घरासमोर गोळा झाले. पण मी काय चोरलं होतं? सांगतो मी तुम्हाला.

आग्नेय नायजेरीयातील उमुरियाम गावात १९३० साली माझा जन्म झाला. सात मुलामुलींमध्ये मी थोरला होतो. माझी थोरली बहीण वयाच्या १३ व्या वर्षी मरण पावली. माझे आईवडील अँग्लीकन होते. बाबा शेतकरी होते आणि आई लहान व्यापार करायची. ती, आमच्या गावापासून सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या स्थानीय बाजारात चालत जाऊन पाम तेलाचा डबा विकत घेऊन त्याच दिवशी उशिरा पुन्हा घरी परतायची. आणि मग, दुसऱ्‍या दिवशी पहाटे, ४० किलोमीटर दूर असलेल्या एका रेल्वे-स्टेशनवर पायी जाऊन ते तेल विकायची. तेल विकलं गेलं तर त्याच पैशातून घरी परतताना कुटुंबासाठी धान्यधुन्य आणायची; असे तिला मिळायचे तरी किती, जवळजवळ १५ (यु.एस.) सेंटहून कमी. असे सतत १५ वर्षे, १९५० साली तिचा मृत्यू होईपर्यंत चालले.

आमच्या गावात अँग्लीकन चर्च चालवत असलेल्या एका शाळेत मी शिक्षण घेऊ लागलो, पण प्राथमिक शाळेतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला सुमारे ३५ किलोमीटर दूर असलेल्या एका बोर्डिंगमध्ये राहावे लागले. पुढील शिक्षणासाठी आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी नोकरी शोधू लागलो. पहिल्यांदा मी उत्तर नायजेरीयातील लागोस येथील एका रेल्वे गार्डच्या घरी आणि नंतर उत्तर नायजेरीयातील कडूना येथील एका सिव्हिल सर्व्हंटच्या घरी गड्याचं काम केलं. मध्य-पश्‍चिम नायजेरीयातील बेनीन शहरात मला एका वकीलाकडे क्लार्कची नोकरी मिळाली; त्यानंतर एका वखारीत कामगार म्हणून मी काम केलं. त्यानंतर मी १९५३ साली कॅमेरून येथे माझ्या सावत्र मामाकडे राहायला गेलो; त्यानं मला रबराची लागवड जिथं करतात तिथं काम लावलं. माझा महिन्याचा पगार नऊ डॉलर (यु.एस.) इतका होता. तशी मी छोटीमोठीच कामं करत होतो पण, मला खाण्या-पिण्यासाठी पुरेसे मिळत असल्यामुळे मी तृप्त होतो.

एक गरीब मनुष्य मला धनसंपत्ती देतो

सिल्वेनस ओकेमिरी नावाचा एक मनुष्य माझ्याबरोबर काम करायचा; तो यहोवाचा साक्षीदार होता. आम्ही दोघं गवत कापताना आणि ते रबराच्या झाडांभोवतीच्या आळ्यात घालताना सिल्वानस संधी मिळाल्याबरोबर मला बायबलविषयी सांगायचा. मी त्याचं फक्‍त ऐकून घ्यायचो. मग माझ्या मामाला साक्षीदारांबरोबर माझा संपर्क आल्याचं कळलं तेव्हा त्यानं मला, तू त्याच्यापासून दूर राहा असं त्याच्यापरीनं होता होईल तितकं सांगण्याचा प्रयत्न केला. तो मला म्हणाला: “बेन्जी, तू त्या ओकेमिरीला भेटू नकोस. तो यहोवाचा माणूस आहे, शिवाय गरीब आहे. त्याच्याबरोबर जे राहतील तेही त्याच्यासारखेच होतील.”

१९५४ सालच्या सुरवातीला, कंपनीतलं कष्टाचं काम मी सहन करू शकलो नाही त्यामुळे मी घरी परतलो. त्या दिवसांत, अँग्लीकन चर्च नैतिक दर्जांविषयी कडक होतं. त्यामुळे लहानपणापासून मलाही अनैतिकतेची घृणा वाटत होती. पण, आमच्याबरोबर चर्चला जाणाऱ्‍या इतर लोकांचा दांभिकपणा मी पाहिला तेव्हा मला उबग आला. ते बायबलच्या नैतिक नियमांचे काटेकोर पालन करत असल्याचा दावा करत होते तरी त्यांची वागणूक मात्र याच्या उलट होती. (मत्तय १५:८) यावर माझे आणि माझ्या वडिलांचे नेहमीच खटके उडायचे, यामुळे आमच्या दोघांतला नातेसंबंध खूपच बिघडला. एके रात्री तर मी घरच सोडलं.

मी रेल्वेस्टेशन असलेल्या ओमोबा नावाच्या एका लहानशा गावात राहायला गेलो. तिथं पुन्हा माझी भेट यहोवाच्या साक्षीदारांशी झाली. आमच्या गावातली प्रिसिल्ला ईसिओचा जिला मी ओळखत होतो, तिनं मला “राज्याची ही सुवार्ता” आणि “हर्मगिदोनानंतर—देवाचे नवे जग” (इंग्रजी)  * या पुस्तिका दिल्या. मी अधाशासारख्या या पुस्तिका वाचून काढल्या; मला सत्य सापडलं आहे, अशी माझी खात्री पटली. आमच्या चर्चमध्ये आम्ही बायबलचा अभ्यास करत नव्हतो; मानवी परंपरांवरच आमचं जास्त लक्ष असायचं. परंतु साक्षीदारांच्या प्रकाशनांत तर बायबलमधील भरपूर वचनं होती.

एक महिन्याच्या आतच मी बंधू आणि भगिनी ईसिओका यांना, तुम्ही तुमच्या चर्चला केव्हा जाता असं विचारलं. मग मी पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेलो पण मला एक शब्दही कळला नाही. टेहळणी बुरूज अभ्यास लेख, भविष्यसूचक पुस्तक यहेज्केल यात उल्लेखलेल्या ‘मागोग देशातील गोगच्या हल्ल्याविषयी’ होता. (यहेज्केल ३८:१, २) लेखातील पुष्कळ शब्द माझ्या परिचयाचे नव्हते, पण तिथल्या बंधूभगिनींनी माझं स्वागत किती प्रेमानं केलं होतं ते पाहून मी इतका प्रभावीत झालो की मी पुढच्या रविवारीसुद्धा जाण्याचं ठरवलं. दुसऱ्‍या सभेच्या वेळी मी प्रचार कार्याविषयी ऐकलं. तुम्ही प्रचाराला केव्हा जाता, असं मी प्रिसिल्लाला विचारलं. तिसऱ्‍या रविवारी, मी त्यांच्याबरोबर हातात एक बायबल घेऊन गेलो. माझ्याजवळ प्रचारासाठी बॅग नव्हती, प्रकाशनं नव्हती. तरीपण मी राज्य प्रचारक बनलो आणि महिन्याच्या शेवटी माझा क्षेत्र सेवेचा अहवाल दिला.

माझ्याबरोबर कोणीही बायबलचा रीतसर अभ्यास केला नाही पण जेव्हा जेव्हा मी ईसिओका यांना भेटायला जायचो तेव्हा तेव्हा मी शास्त्रवचनांतून विश्‍वासाचे व उत्तेजनाचे शब्द शिकलो आणि काही बायबल साहित्य देखील घेतले. डिसेंबर ११, १९५४ साली आबा येथे झालेल्या एका प्रांतीय अधिवेशनात मी यहोवाला केलेल्या माझ्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला. मी ज्याच्याबरोबर राहत होतो व ज्याच्यासाठी अप्रेन्टीस म्हणून काम करत होतो त्या माझ्या चुलत भावानं माझं जेवण बंद केलं, माझं प्रशिक्षण बंद केलं आणि मी त्याच्यासाठी जे काम केलं होतं त्याचा एक नया पैसाही त्यानं मला दिला नाही. पण मी त्याच्याबद्दल मनात राग बाळगला नाही; मला देवाबरोबर व्यक्‍तिगत नातेसंबंध जोडण्याचा सुहक्क मिळाला होता म्हणून मी कृतज्ञ होतो. यामुळे मला सांत्वन आणि मानसिक शांती मिळाली. स्थानीय साक्षीदारांनी मला लगेच मदत केली. ईसिओका जोडपं मला जेवण देत, दुसऱ्‍यांनी मला लहानसा धंदा सुरू करण्यासाठी पैसे दिले. १९५५ सालच्या मध्यात, मी एक जुनी सायकल विकत घेतली आणि मार्च १९५६ साली मी सामान्य पायनियर कार्य सुरू केले. त्यानंतर हळूहळू मी माझ्या डोक्यावरचं कर्ज फेडलं. माझ्या धंद्यातून मला होत असलेला नफा तसा पाहिला तर इतका जास्त नव्हता तरीपण आता मी माझ्या पायावर उभा होतो. यहोवा मला जे देत होता त्यात मी तृप्त होतो.

माझ्या भावंडांना ‘चोरणे’

वेगळं राहायला गेल्याबरोबर मी सर्वात आधी, माझ्या भावंडांना आध्यात्मिक मदत देण्याचं ठरवलं. बाबांच्या मनात माझ्याबद्दल पूर्वग्रह होता, शंका होती त्यामुळे मी साक्षीदार झाल्यावर त्यांनी मला खूप विरोध केला. मग मी माझ्या भावंडांना सत्य शिकायला कशी मदत केली असावी? मी, अर्नस्टला (माझा धाकटा भाऊ) सांभाळेन, असं मी बाबांना सांगितल्यामुळे त्यांनी त्याला माझ्याकडे राहायला पाठवलं. अर्नस्टनं लगेच सत्य स्वीकारून १९५६ साली बाप्तिस्मा घेतला. हे पाहून बाबा आणखीनच विरोध करू लागले. असे असतानाही, माझी एक धाकटी बहीण जिचं लग्न झालं होतं, तिनंही आपल्या नवऱ्‍याबरोबर सत्य स्वीकारलं. माझी दुसरी धाकटी बहीण फेलीशीया हिला जेव्हा मी तिच्या शाळेच्या सुटीत माझ्याकडे येऊन राहायला सांगितलं तेव्हा बाबांनी फार मुश्‍किलीनं हो म्हटलं. लवकरच, फेलीशीयाचासुद्धा यहोवाची साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला.

१९५९ साली, मी माझी तिसरी बहीण बर्निस हिला अर्नस्टबरोबर राहायला म्हणून आणायला घरी गेलो. तेव्हा बाबांनी मला मारलं, आणि मी त्यांची मुलं चोरल्याचा आरोप त्यांनी माझ्यावर लावला. पण माझ्या भावंडांनी यहोवाची सेवा करण्याची स्वतःहून निवड केली होती, हे ते समजू शकले नाहीत. मी बर्निसला मुळीच पाठवणार नाही, अशी बाबांनी शपथच घेतली. पण यहोवाचा हात तोकडा नव्हता; दुसऱ्‍याच वर्षी, बर्निस आपल्या शाळेच्या सुटीत अर्नस्टबरोबर राहायला आली. तिच्या इतर बहिणींप्रमाणे तिनंही सत्य स्वीकारून बाप्तिस्मा घेतला.

‘रहस्य शिकणे’

१९५७ सालच्या सप्टेंबर महिन्यात मी खास पायनियर म्हणून सेवा सुरू केली; मी दर महिन्याला प्रचार कार्यात १५० तास खर्च करू लागलो. माझ्याबरोबर संडे इरोबेलाकी हा बांधव यायचा आणि मी अक्पुनाओबुओ एचे नावाच्या मोठ्या क्षेत्रात सेवा करायचो. तेथून आम्ही पहिल्यांदा एका विभागीय संमेलनाला उपस्थित राहिलो; आमच्या गटातील १३ जणांचा बाप्तिस्मा झाला. याच भागात आज २० मंडळ्या आहेत हे पाहून आम्हाला किती आनंद होतोय!

१९५८ साली माझी क्रिस्ट्याना अझुईके हिच्याबरोबर ओळख झाली; ती अबा ईस्ट मंडळीत सामान्य पायनियर म्हणून सेवा करत होती. तिचा आवेश पाहून मी प्रभावीत झालो आणि त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात आमचं लग्न झालं. १९५९ सालच्या सुरवातीला, मला प्रवासी पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं; मी आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींच्या मंडळ्यांना भेटी देऊन उत्तेजन द्यायचो. तेव्हापासून १९७२ सालापर्यंत आम्ही दोघांनी पूर्व आणि मध्य-पश्‍चिम नायजेरियातील यहोवाच्या लोकांच्या जवळजवळ सर्व मंडळ्यांना भेटी दिल्या.

एक मंडळी दुसऱ्‍या मंडळीपासून बरीच दूर असायची; आणि आम्ही सहसा सायकलीनं प्रवास करायचो. मोठ्या शहरांतील मंडळ्यांना आम्ही भेटी द्यायला जायचो तेव्हा दुसऱ्‍या मंडळीला जाताना बांधव आम्हाला भाड्याच्या टॅक्सीनं पाठवायचे. काही वेळा तर आम्ही अशा खोल्यांमध्ये राहिलो आहोत जिथं फरशी नसायची, फक्‍त मातीनं सारवलेलं असायचं तर वर छप्पर नसायचं. राफिया झाडाच्या तंतुंपासून बनवलेल्या पलंगांवर आम्ही झोपायचो. काही पलंगांवरील गवताच्या गादीवर चटई असायची तर काही पलंगांवर गाद्याच नसायच्या. जेवणाविषयी आम्हाला काही समस्या नव्हती; थोडं असो की जास्त, चमचमतीत असो की एकदम साधे आम्हाला सगळंच चालत होतं. परिस्थितीमुळे आम्ही आहे त्यात संतुष्ट राहायला शिकलो असल्यामुळे, आम्हाला जे काही खायला दिलं जायचं ते आम्ही आनंदानं खायचो; त्यामुळे आमचा पाहुणचार करणाऱ्‍या बांधवांना खूप आनंद व्हायचा. त्या दिवसांत काही शहरांमध्ये वीज नव्हती त्यामुळे आम्ही जिथं जाऊ तिथं आमचा कंदील सोबतच न्यायचो. आम्हाला कठीण परिस्थितीत दिवस काढावे लागत होते तरीपण मंडळ्यांबरोबर आम्ही अनेक आनंदी प्रसंगांचा अनुभव घेतला.

या दिवसांत, प्रेषित पौलाने दिलेल्या सल्ल्याचे मूल्य आम्हाला समजले; त्याने म्हटले होते: “आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीमथ्य ६:८) पौलाला अनेक कष्टमय काळातून जावे लागल्यामुळे समाधानी राहण्यास त्याला मदत करणारी एक गुरूकिल्ली मिळाली होती. ती काय होती? तो म्हणतो: “दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्‍नतेतहि राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्‍नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्‍न असणे व विपन्‍न असणे, ह्‍यांचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे.” आम्ही देखील हे रहस्य शिकलो! पौल असेही म्हणाला: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१२, १३) हे आमच्याबाबतीत अगदी खरे ठरले! आम्ही समाधानी होतो, ख्रिस्ती कार्यांत उभारणीकारक सहभाग घेण्यात व्यस्त होतो, आमच्याजवळ मानसिक शांती होती.

कुटुंब या नात्याने मंडळ्यांची सेवा करणे

१९५९ सालच्या अंताला, जोएल जन्मला आणि नंतर १९६२ साली दुसरा मुलगा सॅम्युएलचा जन्म झाला. क्रिस्ट्याना आणि मी मुलांना सोबत घेऊन मंडळ्यांना भेटी देण्याचे प्रवासी कार्य चालूच ठेवले. १९६७ साली नायजेरीयन मुलकी युद्ध अचानक सुरू झालं. हवेतून सतत हल्ला होत असल्यामुळं शाळा बंद पडल्या होत्या. माझ्याबरोबर प्रवासी कार्यात येण्याआधी माझी बायको शाळेत शिक्षिका असल्यामुळे, युद्धाच्या काळांत ती आमच्या मुलांना घरीच शिकवायची. वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत तर सॅम्युएल लिहा-वाचायला सुद्धा शिकला. युद्धानंतर तो पुन्हा शाळेत जाऊ लागला तेव्हा त्याच्या बरोबरच्या इतर मुलांपेक्षा त्याला दोन वर्ग पुढं टाकण्यात आलं.

प्रवासी कार्यात असताना, मुलांचं पालनपोषण करणं सोपं नाही हे आम्हाला तेव्हा इतकं जाणवलं नाही. पण १९७२ साली आम्हाला खास पायनियर म्हणून नेमण्यात आल्यामुळं आमचा खूप फायदा झाला. यामुळं आम्ही एकाच ठिकाणी राहू शकलो जेणेकरून आम्ही आमच्या कुटुंबाकडे पुरेसे आध्यात्मिक लक्ष देऊ शकलो. लहानपणापासूनच आम्ही आमच्या मुलांनाही ईश्‍वरी समाधानाचं महत्त्व शिकवलं. १९७३ साली सॅम्युएलचा बाप्तिस्मा झाला आणि त्याच वर्षी जोएलनं सामान्य पायनियरींग सुरू केली. त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनी उत्तम ख्रिस्ती स्त्रियांबरोबर लग्न केलीत आणि आता दोघंही स्वतःचं कुटुंब सत्यातच वाढवत आहेत.

मुलकी संघर्षामुळे आलेलं दुःख

मुलकी युद्धाला सुरवात झाली तेव्हा मी ओनीशामधील एका मंडळीत विभागीय पर्यवेक्षक म्हणून आपल्या कुटुंबाबरोबर गेलो होतो. भौतिक गोष्टी जमा करणं किंवा त्यांच्यावर भरवसा ठेवणं किती व्यर्थ आहे, ही आमची खात्री या युद्धामुळं तर आणखीनच पक्की झाली. तेव्हा आपल्या मौल्यवान वस्तू रस्त्यावर तशाच टाकून आपला जीव मुठीत धरून पळणाऱ्‍या लोकांना मी पाहिलं.

युद्ध उग्र रूप धारण करत गेलं तेव्हा सर्व धडधाकट पुरुषांना युद्धात सामील होण्याचा हुकूम देण्यात आला. आपलं नाव नोंदवण्यास नकार देणाऱ्‍या अनेक बांधवांचा छळ करण्यात आला. आम्ही मुक्‍तपणे इकडे-तिकडे फिरू शकत नव्हतो. अन्‍नटंचाईमुळे सगळीकडे गोंधळ माजला होता. अर्ध्या किलो कसावाचा भाव (टप्योका) ३ रुपयांहून ६६० रुपये [७ सेंटहून १४ डॉलर (यु.एस.)] इतका वाढला तर एक कप मीठाची किंमत ३८० रुपयांहून २००० पर्यंत [८ डॉलर हून ४२ डॉलर (यु.एस.)] वाढली. दुध, मस्का, साखर तर औषधालाही नव्हती. कसेतरी दिवस काढण्यासाठी आम्ही कच्ची पपई वाटून त्यात थोडंसं कसावाचं पीठ मिसळून खात होतो. याशिवाय नाकतोडे, कसावाची सालपटं, जास्वंदीची पानं, पाणकणीस—मिळतील ती पानं आम्ही खायचो. मटण-मच्छीसुद्धा महागच असल्यामुळे मी मुलांसाठी पाली पकडायचो. इतक्या हलाखीच्या परिस्थितीत देखील यहोवानं आम्हाला नेहमीच तारलं.

परंतु युद्धामुळे आध्यात्मिक अन्‍नाचा जो तुटवडा जाणवला तो जास्त धोकेदायक होता. पुष्कळ बांधवांना युद्ध चाललेलं ठिकाण सोडून जंगलांत किंवा दुसऱ्‍या गावांमध्ये आश्रय घ्यावा लागला आणि असं करताना त्यांनी त्यांच्याजवळची बहुतेक सर्व बायबल प्रकाशनं गमावली. याशिवाय, सरकारी तुकड्यांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकेबंदीमुळे बायफ्रान क्षेत्रातून नवीन बायबल साहित्यही आत आणले जाऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीत बहुतेक मंडळ्यांनी सभा भरवण्याचे चालूच ठेवले असले तरी, बांधवांच्या आध्यात्मिकतेवर मात्र परिणाम झाला कारण शाखा दफ्तराकडून येणारे मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत पोंहचत नव्हते.

आध्यात्मिक अन्‍नटंचाईवर मात करणे

प्रवासी पर्यवेक्षकांनी प्रत्येक मंडळीला भेट देण्याची व्यवस्था चालू ठेवण्याचा बराच प्रयत्न केला. पुष्कळ बांधव शहर सोडून गेले असल्यामुळे, ते भेटतील तिथं मी त्यांना शोधायचा प्रयत्न केला. एकदा मी, क्रिस्ट्याना आणि मुलांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि एकटाच सहा आठवडे, वेगवेगळ्या गावांमध्ये, जंगलाच्या काही भागांमध्ये बांधवांना शोधत फिरलो.

ओगबुंका येथील एका मंडळीला भेट देताना मी ऐकलं, की ओकिग्वे प्रांताच्या इसुओची क्षेत्रात साक्षीदारांचा एक मोठा समूह आहे. मी त्यांना उमुआकू गावातील काजूच्या बागेत एकत्र जमण्याचा निरोप पाठवला. मग मी आणि आणखी एक वयस्कर बांधव असे आम्ही दोघं जवळजवळ १५ किलोमीटर सायकलीनं त्या काजूच्या बागेपर्यंत गेलो; तिथं २०० साक्षीदार आणि स्त्रिया व मुले असे जमले होते. एका पायनियर भगिनीच्या साहाय्यानं मी, लोमारा जंगलात आसरा घेतलेल्या जवळजवळ शंभर साक्षीदार असलेल्या आणखी एका गटाला शोधून काढू शकलो.

ओवेरीच्या युद्धग्रस्त गावात राहणाऱ्‍या धाडसी बांधवांच्या गटांतील एक होता लॉरन्स उग्वुएगबु. त्यानं ओहाजी या क्षेत्रात अनेक साक्षीदार असल्याचं मला सांगितलं. सैनिकांनी त्यांचे क्षेत्र काबीज केल्यामुळे हे बंधूभगिनी बाहेर पडू शकत नव्हते. मग आम्ही दोघं रात्री निघालो आणि एका बांधवाच्या कंपाऊण्डमध्ये जमलेल्या सुमारे १२० साक्षीदारांना भेटलो. त्याच वेळेला आम्ही इतर साक्षीदार जिथं लपले होते तिथंही त्यांना भेटायला गेलो.

बंधू आयझक वाग्वु यांनी आपला जीव धोक्यात घालून मला इतर बांधवांना शोधून काढायला मदत केली. त्यांनी मला नावेतून ओटामिरी नदी पार करून एग्बु-एचा येथे जमलेल्या १५० पेक्षा अधिक साक्षीदारांना भेटायला नेलं. तिथं पोहंचल्यावर एका बांधवानं म्हटलं: “आज हा दिवस माझ्या जीवनातला सर्वात उत्तम दिवस आहे! मी प्रवासी पर्यवेक्षकांना पुन्हा पाहायला जिवंत राहीन असा विचारही केला नव्हता. या युद्धाच्या झळीमुळे मी आता मेलो तरी समाधानानं मरेन.”

मला सैन्यात भरती होण्याचा धोका होता, पण मी वारंवार यहोवाचे संरक्षण अनुभवले. एके दिवशी दुपारी मी जवळजवळ २५० बांधवांना भेटून घरी परतत असताना नाकेबंदीवर एका सैनिकी सुरक्षा पथकानं मला अडवलं. त्यांनी मला विचारलं, “तुम्ही सैन्यात भरती का झाला नाहीत?” मी त्यांना समजावून सांगितलं, की मी देवाच्या राज्याचा प्रचार करणारा एक मिशनरी आहे. आता हे लोक मला अटक करतील अशी माझी पक्की खात्री होती. मनातल्या मनात एक लहानशी प्रार्थना केल्यावर मी त्या पथकाच्या प्रमुखाला म्हणालो: “साहेब, मला कृपया जाऊ द्या.” तो मला म्हणाला: “तुम्हाला जाऊ देऊ असं म्हणता?” मी म्हणालो: “हो, सोडा मला.” त्यावर तो म्हणाला: “ठीक आहे, जा.” यावर एकाही सैनिकानं ब्र शब्द काढला नाही.—स्तोत्र ६५:१, २.

समाधानी राहिल्यामुळे आणखी आशीर्वाद मिळाले

१९७० साली युद्ध समाप्त झाल्यानंतर मी पुन्हा विभागीय कार्य सुरू केलं. सर्व मंडळ्यांचे पुन्हा संघटन करणं खरोखर एक सुहक्क होता. मग, १९७६ पर्यंत मी आणि क्रिस्ट्यानानं खास पायनियर म्हणून सेवा केली आणि त्यानंतर पुन्हा मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. त्याच वर्षाच्या मध्याला, मला प्रांतीय पर्यवेक्षकांचे कार्य करण्यासाठी नेमण्यात आलं. सात वर्षांनंतर, आम्हा दोघांना यहोवाच्या साक्षीदारांच्या नायजेरिया शाखा दफ्तरात काम करण्यासाठी बोलावण्यात आलं; सध्या आम्ही इथंच आहोत. इथं, मुलकी युद्धाच्या वेळी आणि इतर वेळी आम्ही ज्या ज्या बंधूभगिनींना भेटलो होतो त्यांना पुन्हा भेटण्याची संधी मिळत असल्यामुळे आम्हाला नेहमी खूप आनंदी होतो; हे सर्वजण अजूनही यहोवाची सेवा विश्‍वासूपणे करत आहेत.

या सर्व वर्षांत क्रिस्ट्यानानं मात्र मला खूप आधार व साथ दिली आहे. १९७८ सालापासून तिला आरोग्याच्या समस्या असतानाही तिच्या सकारात्मक व निश्‍चियी मनोवृत्तीमुळे मला माझ्या जबाबदाऱ्‍या पार पाडता आल्या आहेत. “रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्‍वर त्याला संभाळील” हे स्तोत्रकर्त्याचे शब्द आमच्याबाबतीत खरे ठरले आहेत.—स्तोत्र ४१:३.

देवाच्या सेवेत मी घालवलेल्या वर्षांचा विचार करतो तेव्हा, यहोवानं दिलेल्या आशीर्वादांसाठी त्याचे आभार मानल्याशिवाय मी राहू शकत नाही. त्यानं जे काही दिलं आहे त्यात समाधानी राहिल्यामुळे मी म्हणू शकतो की मला खूप आनंद मिळाला आहे. माझी भावंडं आणि आपल्या परिवारासहित असलेली माझी मुलं या सर्वांना जेव्हा मी माझ्याबरोबर यहोवाची सेवा करताना पाहतो तेव्हा मला आणि माझ्या पत्नीला मोठा अतुलनीय आशीर्वाद मिळाल्यासारखा वाटतो. यहोवानं मला सुखी, अर्थपूर्ण जीवन देऊन तृप्त केलं आहे. माझी एकही इच्छा अधुरी राहिली नाही.

[तळटीप]

^ परि. 10 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले. सध्या छापले जात नाही.

[२७ पानांवरील चौकट]

बंधूवर्गाला टिकवून ठेवणारी समयोचित योजना

१९६० च्या मध्यात, उत्तर आणि पूर्व नायजेरियातील वांशिक गटांत द्वेषभावना उत्पन्‍न झाल्यामुळे गोंधळ, बंड, अत्याचार, वांशिक हिंसा घडली. यांमुळे, तटस्थ राहण्याचा दृढनिश्‍चय केलेल्या यहोवाच्या साक्षीदारांवर खूप दबाव आला. जवळजवळ २० साक्षीदारांची हत्या करण्यात आली. बहुतेकांनी आपली सगळी मालमत्ता गमावली.

मे ३०, १९६७ रोजी, संघराज्यातून निघालेल्या नायजेरियाच्या पूर्वेकडील प्रांतांचे बायफ्राचे प्रजासत्ताक बनले. संघराज्याचे सैन्य तयार झाले आणि बायफ्राविरुद्ध पूर्ण नाकेबंदी करण्यात आली. यामुळे रक्‍तरंजित व हिंसक मुलकी युद्ध पेटले.

बायफ्रा क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांच्या तटस्थतेमुळे ते हल्ल्याचे निशाण बनले. बातमीपत्रांमध्ये त्यांच्याविरुद्ध संतप्त टीका करण्यात आली, लोकांना त्यांच्याविरुद्ध चेतवण्यात आले. परंतु, आपल्या सेवकांना वेळेवर आध्यात्मिक अन्‍न मिळत आहे याची यहोवानं खात्री केली. ती कशी?

१९६८ सालच्या सुरवातीला, एका सिव्हिल सर्व्हंटला युरोपमध्ये आणि दुसऱ्‍या सिव्हिल सर्व्हंटला बायफ्रन विमान धावपट्टीवर थांबण्यास सांगण्यात आले. हे दोघंही साक्षीदार होते. बायफ्रा आणि बाहेरचे जग यांतील एकच दुवा असलेल्या ठिकाणी यांना, एक या टोकाला तर दुसरा त्या टोकाला असे नेमण्यात आले होते. या दोघा साक्षीदारांनी धोका पत्करून, बायफ्रामध्ये आध्यात्मिक अन्‍न आणण्याची स्वेच्छा दाखवली होती. त्यांनी संकटग्रस्त बांधवांना मदत सामग्री देण्याचं कामही केलं. या दोन बांधवांनी, १९७० साली थांबलेल्या युद्धादरम्यानच्या काळात ही महत्त्वपूर्ण व्यवस्था चालू ठेवली. त्यांपैकी एकाने असे उद्‌गार काढले: “मानवांच्या कोणत्याही योजनांपेक्षा वरचढ अशी ही व्यवस्था होती.”

[२३ पानांवरील चित्र]

१९५६ साली

[२५ पानांवरील चित्र]

१९६५ साली, जोएल आणि सॅम्युएलबरोबर

[२६ पानांवरील चित्र]

कुटुंब मिळून यहोवाची सेवा करणं खरोखर एका मोठ्या आशीर्वादासारखे आहे!

[२७ पानांवरील चित्र]

आज, क्रिस्ट्याना व मी नायजेरिया शाखा दफ्तरात सेवा करताना