व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची भरभराट होत आहे

खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची भरभराट होत आहे

खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची भरभराट होत आहे

पहिल्या शतकात, येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्याने जगाला अचंबित करून सोडले. त्याचा संदेश इतका उत्साहवर्धक, प्रबोधनकारक आणि प्रेरणा देणारा होता की लोक थक्क होत असत. त्याचे भाषण ऐकणाऱ्‍या पुष्कळांच्या अंतःकरणाला त्याचे शब्द भिडले.—मत्तय ७:२८, २९.

येशूने त्या वेळेच्या धार्मिक आणि राजकीय व्यवस्थेत भाग घेण्यास निडरतेने नकार दिला पण सामान्य माणसांना मदत करायला त्याने केव्हाही तयारी दर्शवली. (मत्तय ११:२५-३०) पृथ्वीवर दुष्ट आत्म्यांचा व्यापक प्रभाव असल्याचे त्याने उघडपणे कबूल केले आणि त्यांच्यावर देवाने त्याला अधिकार दिल्याचे दर्शवले. (मत्तय ४:२-११, २४; योहान १४:३०) येशूने कुशलतेने दुःख आणि पाप यांमधील मूलभूत संबंध स्पष्ट करून दाखवला आणि कायमचा विसावा देवाच्या राज्यातर्फे मिळेल हे त्याने प्रेमळपणे दर्शवले. (मार्क २:१-१२; लूक ११:२, १७-२३) त्याने आपल्या पित्याचे खरे व्यक्‍तिमत्त्व ज्याने झाकले होते तो अंधःकाराचा पडदा उचलला आणि ज्या कोणाला देवासोबत व्यक्‍तिगत नातेसंबंध राखण्याची इच्छा होती त्या सर्वांना देवाचे नाव प्रकट केले.—योहान १७:६, २६.

यामुळे, यात काही आश्‍चर्य नाही की, तीव्र धार्मिक आणि राजकीय विरोध असतानाही, येशूच्या शिष्यांनी त्याचा अतुलनीय संदेश झपाट्याने पसरवला. केवळ ३० वर्षांच्या कालावधीत, आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये उत्साही ख्रिस्ती मंडळ्यांची सुरवात झाली. (कलस्सैकर १:२३) येशूने शिकवलेल्या साध्या सत्यांनी संपूर्ण रोमन साम्राज्यातील नम्र, योग्य अंतःकरणाच्या लोकांना प्रज्वलित केले.—इफिसकर १:१७, १८.

विविध आर्थिक, सांस्कृतिक, बहुभाषिक व धार्मिक पार्श्‍वभूमींतून येणारे नवीन शिष्य, प्रेषित पौलाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास खऱ्‍या अर्थाने संघटित असलेल्या ‘एकाच विश्‍वासात’ एकत्रित कसे होतील? (इफिसकर ४:५) त्या “सर्वांचे बोलणे सारखे” कसे असेल ज्यामुळे ते एकमेकांपासून दूर होणार नाहीत? (१ करिंथकर १:१०) आज तथाकथित ख्रिश्‍चनांमधील गंभीर फुटींमुळे येशूने शिकवलेल्या गोष्टींचे परीक्षण करणे सुज्ञपणाचे आहे.

ख्रिस्ती ऐक्यासाठी आधार

येशू पंतय पिलातासमोर चौकशीसाठी उभा असताना त्याने ख्रिस्ती ऐक्याचा आधार स्पष्ट केला. तो म्हणाला: “मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” (योहान १८:३७) यास्तव, देवाचे प्रेरित वचन अर्थात बायबल यासोबत येशूच्या शिकवणुकी स्वीकारल्याने ख्रिस्ताच्या खऱ्‍या शिष्यांमध्ये जबरदस्त एकोप्याचे वातावरण निर्माण होते.—१ करिंथकर ४:६; २ तीमथ्य ३:१६, १७.

अर्थात, येशूच्या शिष्यांना काही वेळा प्रामाणिक प्रश्‍न पडतील किंवा त्यांच्यात मतभेद होतील. तेव्हा काय? येशूने स्पष्ट केले: “तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणाऱ्‍या गोष्टी तुम्हाला कळवील.” (योहान १६:१२, १३) अशाप्रकारे, देवाचा पवित्र आत्मा येशूच्या खऱ्‍या शिष्यांना देवाकडून हळूहळू प्रकट होणारे सत्य समजण्यास मदत करणार होता. शिवाय, तो आत्मा, प्रीती, आनंद आणि शांती यांसारखे फळ देखील उत्पन्‍न करणार होता ज्यामुळे त्यांच्यात एकता निर्माण होणार होती.—प्रेषितांची कृत्ये १५:२८; गलतीकर ५:२२, २३.

येशूने आपल्या शिष्यांमध्ये फुटी किंवा गट होण्यास परवानगी दिली नाही; शिवाय, त्यांना भेटणाऱ्‍या लोकांच्या सांस्कृतिक किंवा धार्मिक परंपरा सामावून घेण्याकरता ईश्‍वरी सत्यांना नवीन अर्थ लावण्याचा अधिकारही त्याने दिला नाही. उलट, त्यांच्यासोबत घालवलेल्या शेवटल्या रात्री त्याने उत्कटतेने प्रार्थना केली: “मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्यांच्यासाठीहि विनंती करितो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीहि तुझ्यामाझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्‍वास जगाने धरावा.” (योहान १७:२०, २१) आत्मा आणि खरेपणातील अस्सल एकता हे ख्रिस्ताच्या शिष्यांचे सुरवातीपासून आतापर्यंत ओळख चिन्ह असावयाचे होते. (योहान ४:२३, २४) तरीपण, आजची चर्चेस संघटित नसून विभाजित आहेत. असे का आहे?

चर्चेस विभाजित का आहेत?

आज स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍यांचे विश्‍वास आणि चालीरीती एकमेकांपासून इतक्या वेगळ्या का आहेत याचे स्पष्ट उत्तर म्हणजे ते येशूच्या शिकवणुकींना धरून राहिलेले नाहीत. एका लेखकाने असे निरीक्षण केले: “गतकाळाप्रमाणे, आजचे नवीन ख्रिस्ती आपल्या गरजांसाठी सोयीस्कर असलेल्या गोष्टी बायबलमधून स्वीकारतात—आणि स्वतःच्या मूळ धार्मिक परंपरांशी ज्या गोष्टी जुळत नाहीत त्यांकडे दुर्लक्ष करतात.” हेच घडेल असे येशूने आणि त्याच्या प्रेषितांनी भाकीत केले होते.

उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने प्रेरित होऊन आपला सह-पर्यवेक्षक, तीमथ्य याला लिहिले: “ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.” याचा अर्थ, सर्व ख्रिस्ती मार्गभ्रष्ट होतील का? नाही. पौलाने पुढे म्हटले: “तू तर सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीमथ्य ४:३-५; लूक २१:८; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ पेत्र २:१-३) तीमथ्य आणि इतर विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी हा प्रेरित सल्ला अनुसरला.

खरे ख्रिस्ती अजूनही संघटित

तीमथ्याप्रमाणे, आज खरे ख्रिस्ती मानवी तर्काला झिडकारून व केवळ शास्त्रवचनांनुसार उचित असलेले सिद्धान्त स्वीकारून सावध राहतात. (कलस्सैकर २:८; १ योहान ४:१) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे अनुकरण करून, यहोवाचे साक्षीदार २३० हून अधिक राष्ट्रांमध्ये आपली सेवा पूर्ण करून येशूचा मूळ संदेश अर्थात राज्याची सुवार्ता सगळीकडील लोकांपर्यंत पोंहचवत आहेत. ते संघटित होऊन येशूचे अनुकरण करतात आणि कोठेही राहत असले तरी खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे पालन करतात याचे चार महत्त्वपूर्ण मार्ग आता पाहा.

त्यांचे विश्‍वास देवाच्या वचनावर आधारित आहेत. (योहान १७:१७) बेल्जियममधील एका पॅरिश पाद्रीने त्यांच्याविषयी असे लिहिले: “त्यांच्याकडून [यहोवाच्या साक्षीदारांकडून] आपण एक गोष्ट शिकू शकतो; ती म्हणजे, देवाचे वचन ऐकण्याची त्यांची इच्छा आणि त्याविषयी साक्ष देण्याचे त्यांचे धैर्य.”

जागतिक समस्यांपासून मुक्‍तता प्राप्त करण्याकरता ते देवाच्या राज्याची आस धरून आहेत. (लूक ८:१) बारानक्विला, कोलंबिया येथे एक साक्षीदार आन्टोन्योशी बोलला जो राजकीय चळवळीचा पक्का समर्थक होता. साक्षीदाराने त्याचा पक्ष घेतला नाही किंवा इतर कोणत्याही राजकीय धारणेचे समर्थन केले नाही. उलट, आन्टोन्योशी आणि त्याच्या बहिणींशी बायबलचा अभ्यास विनामूल्य करण्यास तो तयार झाला. लवकरच, आन्टोन्योच्या लक्षात आले की, कोलंबियातील तसेच संपूर्ण जगातील गरीब लोकांकरता देवाचे राज्य हीच एकमेव आशा आहे.

ते देवाच्या नावाचे गौरव करतात. (मत्तय ६:९) यहोवाचे साक्षीदार, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्‍या मारिया नावाच्या एका प्रांजळ कॅथलिक स्त्रीला भेटले तेव्हा तिने साक्षीदारांना बायबलमधून देवाचे नाव दाखवण्यास अनुमती दिली. मग तिचा काय प्रतिसाद होता? “मी पहिल्यांदा देवाचे नाव बायबलमध्ये पाहिले तेव्हा मला रडू आवरले नाही. देवाचे नाव आता मला माहीत झाले आणि ते मी घेऊ शकते हे जाणून माझं अंतःकरण भरून आलं.” मारियाने बायबलचा अभ्यास जारी ठेवला आणि आपल्या जीवनात प्रथमतःच ती यहोवाला एक व्यक्‍ती म्हणून जाणू शकली व त्याच्यासोबत एक कायमचा नातेसंबंध निर्माण करू शकली.

ते प्रेमाच्या बंधनात संघटित आहेत. (योहान १३:३४, ३५) कॅनडाच्या द लेडिस्मीथ-शमेनस क्रॉनिकल, यातील एका संपादकीय लेखात म्हटले होते: “आपण कोणत्याही धार्मिक विश्‍वासाचे असलो किंवा नसलो तरी ज्या ४,५०० यहोवाच्या साक्षीदारांनी गेल्या दीड आठवड्यात रात्रंदिवस मेहनत करून २,३०० चौरस मीटरचे कॅसिडी येथील संमेलन गृह बांधले त्यांची प्रशंसा केलीच पाहिजे . . . हसतमुखाने, वादविवाद न करता, भांडणतंटा न करता किंवा स्वतःकरता गौरव प्राप्त करण्याचा प्रयत्न न करता हे कार्य करणे खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे चिन्ह आहे.”

तर मग, या पुराव्याचा विचार करा. एकीकडे ख्रिस्ती धर्मजगतातील तत्त्ववेत्ते, मिशनरी, आणि चर्चला जाणारे लोक आपल्या चर्चमधील वादाच्या भोवऱ्‍याचा सामना करण्याचा संघर्ष करत आहेत तर दुसरीकडे खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची जगभरात भरभराट होत आहे. होय, खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा प्रचार करून व त्याविषयी शिकवून आपली नेमलेली सेवा पार पाडत आहेत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) सध्या घडत असलेल्या अमंगळ कृत्यांबद्दल “उसासे टाकून विलाप” करणाऱ्‍यांपैकी तुम्ही असला आणि ख्रिस्ती धर्मांतील फुटींमुळे अशांत असला तर एकमेव खऱ्‍या देवाची अर्थात यहोवाच्या संघटित ख्रिस्ती उपासनेत यहोवाच्या साक्षीदारांसोबत सामील होण्यास आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो.—यहेज्केल ९:४; यशया २:२-४.