व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवतो

देवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवतो

देवावर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवतो

देवाबद्दल प्रेम उत्पन्‍न करणे हे केवळ ज्ञान मिळवण्यापुरते मर्यादित नाही. सबंध जगातील देवाचे सेवक या गोष्टीला पुष्टी देऊ शकतात की जेव्हा एका व्यक्‍तीला देवाच्या व्यक्‍तिमत्वाची ओळख घडते तेव्हा तिच्या मनात देवाबद्दल खरे प्रेम उत्पन्‍न होऊ लागते; आणि देवाला काय आवडते, त्याला कशाचा वीट आहे, तो काय पसंत करतो आणि त्याच्या अपेक्षा काय आहेत याच्याशी जसजशी ती व्यक्‍ती परिचित होऊ लागते तसतसे हे प्रेम अधिकच उत्कट होऊ लागते.

प्रेमळपणे यहोवाने आपल्याला त्याचे वचन बायबल दिले आहे व त्याच्याद्वारे तो स्वतःला प्रकट करतो. त्यातूनच आपल्याला समजते की यहोवाने वेगवेगळ्या प्रसंगांत कशाप्रकारे कार्य केले. एखाद्या प्रिय व्यक्‍तीचे पत्र वाचून आपल्याला आनंद वाटतो त्याचप्रकारे बायबल वाचताना यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू स्पष्ट होत जातात तसतसा आपला आनंदही वाढत जातो.

पण, आपल्या सार्वजनिक सेवाकार्यात कधीकधी आपल्याला अनुभव येतो त्याप्रमाणे, देवाविषयी ज्ञान मिळवल्याने एका व्यक्‍तीला त्याच्याबद्दल प्रेम वाटेलच असे नाही. येशूने त्याच्या काळातील काही कृतघ्न यहुद्यांना म्हटले: “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते . . . परंतु मी तुम्हाला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीति नाही.” (योहान ५:३९, ४२) काहीजण वर्षानुवर्षे यहोवाच्या प्रेमळ कृत्यांविषयी शिकत राहतात आणि तरीसुद्धा त्यांचे त्याच्यावर जराही प्रेम नसते. का? कारण आपण जे शिकत आहोत त्याचे तात्पर्य काय हे ते समजून घेत नाहीत. त्याउलट, आपण ज्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करतो त्यांच्यापैकी लाखो प्रामाणिक लोक, देवाबद्दलचे त्यांचे प्रेम वृद्धिंगत झाल्याचे अनुभवतात. का? कारण आपण सर्वांनी केले त्याप्रमाणे ते देखील आसाफाच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. कशाप्रकारे?

कृतज्ञ मनोवृत्तीने मनन करा

आसाफाने यहोवाबद्दल आपल्या मनात प्रेम उत्पन्‍न करण्याचा निर्धार केला. त्याने लिहिले: “मी आपल्या मनात चिंतन करितो; . . . मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्‌भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.” (स्तोत्र ७७:६, ११, १२) या स्तोत्रकर्त्याप्रमाणे जो कोणी यहोवाच्या मार्गांविषयी मनन करतो त्याच्या मनात देवाबद्दलचे प्रेम निर्माण होईल.

शिवाय, यहोवाची सेवा करत असताना आपल्याला जे अनुभव आले त्यांच्याविषयी मनन केल्यानेही आपला यहोवासोबतचा नातेसंबंध बळकट होत जातो. प्रेषित पौलाने म्हटले की आपण देवाचे “सहकारी” आहो आणि सहकाऱ्‍यांमध्ये उत्पन्‍न होणारी मैत्री अगदी अनोखी असते. (१ करिंथकर ३:९) आपण यहोवाबद्दल प्रेम व्यक्‍त करतो तेव्हा तो याची कदर करतो आणि यामुळे त्याचे मन आनंदित होते. (नीतिसूत्रे २७:११) मग एखाद्या कठीण प्रसंगातून जात असताना जेव्हा आपण यहोवाची मदत मागतो आणि तो आपले मार्गदर्शन करतो तेव्हा आपल्याला खात्री असते की तो आपल्या पाठीशी आहे आणि आपोआपच आपल्याला त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम आणखी दृढ होते.

दोन व्यक्‍ती एकमेकांजवळ आपल्या भावना व्यक्‍त करतात तेव्हा त्यांची मैत्री वाढते. त्याचप्रकारे आपण जेव्हा यहोवाला सांगतो की आपण त्याची भक्‍ती इतकी मनोभावे का करतो तेव्हा त्याच्याबद्दलचे आपले प्रेम बळकट होते. आपण येशूच्या या शब्दांवर चिंतन करू लागतो: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” (मार्क १२:३०) आपल्याला पुढेही सतत यहोवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रेम करता यावे म्हणून आपण काय करू शकतो?

संपूर्ण मनाने यहोवावर प्रेम करणे

शास्त्रवचनांत मन हा शब्द सहसा आंतरिक व्यक्‍तीच्या संदर्भात—तिच्या इच्छाआकांशा, प्रवृत्ती व भावनांच्या संदर्भात वापरला जातो. त्याअर्थी, यहोवावर संपूर्ण मनाने प्रेम करण्याचा असा अर्थ होतो की दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा आपली देवाला संतुष्ट करण्याची इच्छा आहे. (स्तोत्र ८६:११) त्याची स्वीकृती मिळण्याकरता जेव्हा आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करण्यास तयार होतो तेव्हा आपण दाखवतो की आपण त्याच्यावर मनस्वी प्रेम करतो. आपण त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठी आपण ‘वाईटाचा वीट मानून बऱ्‍याला चिकटून राहतो.’—रोमकर १२:९.

देवाबद्दल आपल्याला असणारे प्रेम जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दलच्या आपल्या भावनांवर प्रभाव करते. उदाहरणार्थ, आपला व्यवसाय कदाचित आपल्याला अतिशय आव्हानात्मक आणि रोचक वाटत असेल; पण आपल्या मनात आपण त्यालाच सर्वात प्रथम स्थान देतो का? नाही. आपण यहोवावर संपूर्ण मनाने प्रेम करत असल्यामुळे सर्वप्रथम आपण त्याचे सेवक आहोत. त्याचप्रमाणे आपले आईवडील, विवाह जोडीदार आणि कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ यांना संतुष्ट करावेसे आपल्याला निश्‍चितच वाटते, पण सर्वप्रथम यहोवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आपण दाखवतो की आपण संपूर्ण मनाने त्याच्यावर प्रेम करतो. काही झाले तरी आपल्या मनात प्रथम स्थान मिळवण्यास तो योग्य आहे.—मत्तय ६:२४; १०:३७.

संपूर्ण जीवाने यहोवावर प्रेम करणे

शास्त्रवचनांत, “जीव” हा शब्द एका व्यक्‍तीच्या सबंध व्यक्‍तिमत्त्वाच्या व जीवनाच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. त्याअर्थी यहोवावर संपूर्ण जीवाने प्रेम करण्याचा अर्थ असा होतो की आपण त्याची स्तुती करण्याकरता व त्याच्यावर आपल्याला किती प्रेम आहे हे सिद्ध करण्याकरता आपल्या जीवनाचा उपयोग करतो.

अर्थात जीवनात आपण स्वतःच्या हिताकरता अनेक गोष्टी करतो, उदाहरणार्थ काही काम शिकून घेणे, एखादा उद्योग करणे किंवा कुटुंबाचे पालनपोषण करणे. पण जेव्हा आपण सर्व गोष्टी यहोवाला आवडेल अशा पद्धतीने करतो आणि आपल्या जीवनात इतर सर्व गोष्टींना योग्य स्थानी ठेवून ‘पहिल्याने राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्याचा’ प्रयत्न करतो तेव्हा आपण यहोवावर पूर्ण जीवाने प्रेम करत असल्याचे सिद्ध करतो. (मत्तय ६:३३) पूर्ण जीवाने उपासना करण्याचा अर्थ आवेशी असणे असाही होतो. आपण राज्याच्या संदेशाची आवेशीपणे घोषणा करतो, सभांमध्ये इतरांना प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारची उत्तरे देतो, किंवा आपल्या ख्रिस्ती बंधू व भगिनींना मदत करतो तेव्हा देखील आपण यहोवावर प्रेम असल्याचे दाखवतो. सर्व गोष्टींत आपण ‘देवाची इच्छा मनापासून [“जिवेभावे,” NW] पूर्ण करतो.’—इफिसकर ६:६.

येशूने स्वतःचा त्याग करण्याद्वारे देवावर जिवेभावे प्रेम करत असल्याचे दाखवले. देवाच्या इच्छेसमोर त्याने स्वतःच्या वैयक्‍तिक गरजांना दुय्यम स्थान दिले. येशूने आपल्याला त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. त्याने म्हटले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.” (मत्तय १६:२४, २५) स्वतःचा त्याग करण्याचा अर्थ स्वतःचे समर्पण करणे. याचा अर्थ, आपण देवावर इतके प्रेम करतो की जणू आपण स्वतःला त्याच्या स्वाधीन करतो; बायबल काळांत, आपल्या मालकावर जिवापाड प्रेम करणारा इस्राएली त्याचा कायमचा दास होण्याकरता स्वेच्छेने वचन देत असे. (अनुवाद १५:१६, १७) आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करतो तेव्हा आपणही त्याच्यावर प्रेम करतो हे शाबीत होते.

संपूर्ण बुद्धीने यहोवावर प्रेम करणे

संपूर्ण बुद्धीने यहोवावर प्रेम करण्याचा अर्थ असा होतो की यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी, त्याच्या उद्देशांविषयी व अपेक्षांविषयी समजून घेण्याकरता लागेल तो प्रयत्न करण्यास आपण तयार आहोत. (योहान १७:३; प्रेषितांची कृत्ये १७:११) इतरांनाही यहोवाबद्दल प्रीती उत्पन्‍न करता यावी म्हणून त्यांना मदत करण्यासाठी आपल्या संपूर्ण मानसिक क्षमतेचा उपयोग करण्याद्वारे आणि शिकवण्याच्या कलेत आणखी निपुण होण्याचा प्रयत्न करण्याद्वारेही आपण यहोवाबद्दल आपले प्रेम व्यक्‍त करतो. प्रेषित पेत्राने “आपली मनरूपी कंबर बांधा” असे प्रोत्साहन दिले. (१ पेत्र १:१३) तसेच, आपण इतरांबद्दल विशेषतः आपल्यासोबत देवाची सेवा करणाऱ्‍या बांधवांबद्दल स्वारस्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला त्यांच्या परिस्थितीची जाणीव असते आणि त्यांची प्रशंसा केव्हा करता येईल व त्यांना सांत्वनाची गरज आहे याविषयी आपण जागरूक असतो.

यहोवावर आपण संपूर्ण बुद्धीने प्रेम करतो हे आपण त्याला बौद्धिकरित्या अधीन होण्याद्वारे दाखवतो. आपण त्याच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, निर्णय घेताना त्याला विचारात घेतो आणि त्याने दाखवलेला मार्गच सर्वात उत्तम आहे अशी खात्री बाळगतो. (नीतिसूत्रे ३:५, ६; यशया ५५:९; फिलिप्पैकर २:३-७) पण देवाबद्दल आपले प्रेम आहे हे दाखवत असताना आपण आपल्या शक्‍तीचा कशाप्रकारे वापर करू शकतो?

यहोवावर संपूर्ण शक्‍तीने प्रेम करणे

ख्रिस्ती मंडळीत अनेक तरुण यहोवाची स्तुती करण्याकरता आपल्या शक्‍तीचा उपयोग करतात. (नीतिसूत्रे २०:२९; उपदेशक १२:१) अनेक ख्रिस्ती तरुण, पूर्ण वेळेच्या पायनियर सेवेत सहभाग घेण्याद्वारे यहोवावर संपूर्ण शक्‍तीने प्रेम करत असल्याचे दाखवतात. मुले असलेल्या अनेक भगिनी देखील, मुलांना शाळेला पाठवल्यानंतर या सेवेत सहभाग घेतात. विश्‍वासू वडील स्वतःच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासोबतच मंडळीतल्या बंधूभगिनींना मेंढपाळ भेटी देण्याद्वारे, यहोवावर पूर्ण शक्‍तीने प्रेम करत असल्याचे प्रदर्शित करतात. (२ करिंथकर १२:१५) यहोवाची आस धरणाऱ्‍यांना तो सामर्थ्य देतो जेणेकरून त्यांना त्याची स्तुती करण्याकरता आपल्या संपूर्ण शक्‍तीचा उपयोग करण्याद्वारे त्याच्याबद्दल प्रेम व्यक्‍त करता यावे.—यशया ४०:२९; इब्री लोकांस ६:११, १२.

योग्यप्रकारे प्रेम उत्पन्‍न केल्यास ते वाढते. म्हणूनच आपण मनन करण्याकरता वेळ काढतो. यहोवाने आपल्याकरता काय केले आहे आणि तो आपल्या भक्‍तीला योग्य का आहे हे आपण आठवणीत ठेवतो. अर्थात, आदामाचे अपरिपूर्ण वंशज असल्यामुळे, “आपणावर प्रीती करणाऱ्‍यांसाठी देवाने [जे] सिद्ध केले आहे” ते मिळवण्याकरता आपण कधीही लायक ठरू शकत नाही, पण आपण यहोवावर प्रेम करतो हे आपल्या अस्तित्वाच्या कणाकणातून आपण दाखवू शकतो. आपण सदोदित असेच करत राहू या!—१ करिंथकर २:९.

[२० पानांवरील चित्र]

देवावरील आपले प्रेम आपण आपल्या कृत्यांद्वारे व्यक्‍त करतो