व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रंजक सौंदर्य खुलवणारी प्राचीन क्रिया

रंजक सौंदर्य खुलवणारी प्राचीन क्रिया

रंजक सौंदर्य खुलवणारी प्राचीन क्रिया

कनानी सैन्याचा सेनापती सीसरा ह्‍याची आई, तो लढाईतून घरी कधी येतोय म्हणून अगदी आतुरतेने वाट पाहत होती. त्याने ज्यांना जिंकले आहे त्यांच्याकडून लुटलेल्या महागड्या वस्तुंची तिने कल्पना केली. त्यांपैकी, “रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी एकदोन रंगीबेरंगी वस्रे” तो आणेल असे तिला वाटले. (शास्ते ५:३०) मनुष्यप्राणी नेहमी सौंदर्याकडे आकर्षित झाला आहे व रंगसंगतीमुळेच प्रथम सौंदर्य खुलले आहे. म्हणून प्राचीन काळापासूनच मानवाला कपडे व घरातील वस्तू रंगवण्याची इच्छा असल्याचे दिसून येते. यातूनच रंजनक्रियेचा जन्म झाला.

रंगदायी द्रव्यांचा उपयोग करून धागे, कापड आणि इतर पदार्थांना विशिष्ट रंग आणि रंगछटा आणण्याच्या कलेला रंजनक्रिया म्हणतात. अब्राहाम हयात होता त्याच्याही आधीपासूनच ही कला ज्ञात होती व प्रचलित होती; ती कदाचित विणण्याच्या कलेइतकीच जुनी आहे. इस्राएलांनी निवासमंडपासाठी आणि याजकांच्या वस्रांसाठी, निळ्या, किरमिजी, जांभळ्या रंगाच्या सूताचा उपयोग केला. (निर्गम अध्याय २५-२८, ३५, ३८, ३९ पाहा) अगदी सुरवातीला रंजनक्रियेचे काम घरगुती स्वरूपाचे होते परंतु कालांतराने ते विविध ठिकाणी एक व्यवसाय बनले. प्राचीन ईजिप्शियन लोक, त्यांच्या खास भडक रंगवलेल्या वस्तुंसाठी प्रसिद्ध होते. यहेज्केलाच्या २७ व्या अध्यायाच्या ७ व्या वचनात आपण असे वाचतो: “तुझे शीड मिसर देशाहून आणिलेल्या वेलबुट्टीदार उत्तम तागाचे होते, तुला ते निशाणादाखल होते; तुझे छत एलीशा बेटांतील निळ्या व जांभळ्या रंगांच्या कापडाचे होते.” ईजिप्तच्या अवनतीनंतर, सोर आणि इतर फुनीकेची शहरे रंजनक्रिया करणारी महत्त्वाची केंद्र बनली. पण रंजक नेमके कसे बनवले जात होते?

प्राचीन पद्धती

रंजन क्रिया ही एका ठिकाणापासून दुसऱ्‍या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जायची. काही ठिकाणी सूत रंगवले जात असे तर काही ठिकाणी तयार कापडालाच रंग लावला जाई. असे दिसते, की धाग्याच्या गुंड्या दोनदा रंगदायी द्रवात बुडवल्या जात; दुसऱ्‍यांदा पिंपातून काढल्यानंतर त्यातील जादा पाणी पिळून काढले जाई जेणेकरून इच्छित रंग मिळत असे. त्यानंतर या गुंड्या सुकण्यासाठी ठेवल्या जात.

प्रत्येक पदार्थाची रंजनक्रिया वेगवेगळी करावी लागत असे. कधीकधी, रंजकद्रव मूळचा रंग असलेल्या पदार्थास धरून राहत; परंतु हे क्वचितच घडायचे. असे होत नसे तेव्हा, तंतू आणि रंजक या दोघांच्या बाबतीत आसक्‍ती असलेला रंगबंधक आधी पदार्थाला लावण्यात येई. विशिष्ट पदार्थांच्या बाबतीत आसक्‍ती असलेला रंजकद्रवच रंगबंधक होऊ शकतो; यामुळे तो रंजकद्रवाशी मिसळेल आणि विरघळणार नाही असा पक्का रंग तयार होईल. संशोधनात असे दिसून आले आहे, की ईजिप्शियन लोक रंजनक्रियेत रंगबंधकांचा उपयोग करीत असत. जसे की, ते लाल, पिवळा आणि निळा या तीन रंगांचा उपयोग करीत आणि असे म्हटले जाते, की आर्सेनिक, लोह आणि कथिल या ऑक्साईडांचा रंगबंधक म्हणून उपयोग न करता रंजकद्रव्ये लावणे शक्य नव्हते.

चामडे आधी तयार करून मग रंगवले जात असे. अगदी अलीकडे सिरियामध्ये, मेंढ्यांच्या चामड्याला सुमेकने कातवण्यात आले आणि मग त्यावर रंग लावण्यात आला. रंग वाळल्यानंतर, या चामड्याला तेलाने घासून पॉलिश करण्यात आले. बिडोईन लोक वापरत असलेले शूज आणि चामड्याच्या इतर वस्तूंना अशाचप्रकारे लाल रंगाने रंगवण्यात आले आहे; यावरून निवासमंडपासाठी वापरण्यात आलेल्या ‘लाल रंगविलेल्या मेंढ्यांच्या कातडीची’ आठवण होते.—निर्गम २५:५.

रंगवलेल्या पदार्थांच्या संबंधाने एक अतिशय रोचक अहवाल, अश्‍शूरी राजा तिग्लथपिलेसर तिसरा, याच्या इमारतीवर कोरलेला अहवाल आहे. पॅलेस्टाईन व सिरिया यांच्याविरुद्ध आपल्या सैनिकी मोहिमेविषयी सांगितल्यानंतर तो म्हणतो, की त्याला सोरच्या कोणा हिराम नावाच्या राजाकडून व इतर शासकांकडून भेटवस्तू मिळाल्या. या भेटवस्तूंमध्ये, “अनेक रंगांनी सुशोभित केलेले वस्र, . . . निळ्या, जांभळ्या रंगाची लोकर, . . . जांभळा रंग लावलेली मेंढ्यांची कातडी, (आणि) जंगली पक्ष्यांचे निळा रंग लावून पसरवून ठेवलेले पंख,” यांचा समावेश होता.—जे. प्रिटचर्ड यांचे, १९७४ एन्शंट नियर इस्टर्न टेक्स्ट्‌स पृष्ठे २८२, २८३.

रंजकद्रव्ये

वेगवेगळ्या गोष्टींतून रंजकद्रव्ये मिळवली जात असत. पॅलेस्टाईनमध्ये, बदामाच्या पानांपासून व डाळिंबाच्या कुटलेल्या सालीपासून पिवळा रंग मिळवला जाई; फुनीके येथील लोक पिवळा रंग मिळवण्यासाठी हळद आणि करडईच्या फुलांचा उपयोग करीत असत. हिब्रू लोक, डाळिंबाच्या झाडाच्या सालीपासून काळा रंग आणि मंजिष्ठाच्या (रूबिया टिंक्टोरम) मुळांपासून लाल रंग मिळवत असत. ईजिप्त किंवा सिरियाहून पॅलेस्टाईनला आणलेल्या नील वनस्पतींमधून (इंडिगोफेरा टिंक्टोरिया) कदाचित निळा रंग काढला जाई. लोकराला जांभळा रंग येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या पद्धतींत असेही केले जात, की लोकराला द्राक्षाच्या रसात रात्रभर भिजत ठेवले जाई आणि मग त्यावर मंजिष्ठाची पूड शिंपडली जाई.

कॉकस किरमिजी आणि गडद लाल रंजकद्रव्ये, कॉकिडी (कॉकस ईलिसिस) या कीटकापासून मिळवले जात; ही ज्ञात असलेली सर्वात जुनी कीटकजन्य रंजकद्रव्ये आहेत. चेरीच्या आतील भोकाच्या आकाराची जिवंत मादी बेरी सारखी दिसत असल्यामुळे ग्रीकांनी या रंजकद्रवाला कोकोस म्हणजे “बेरी” हे नाव दिले. अरबी भाषेत या कीटकाचे नाव किरमीझ किंवा करमीझ आहे आणि यातूनच इंग्रजीतील “क्रिमसन” हा शब्द आला आहे. हे कीटक मध्यपूर्वेत सगळीकडे मिळतात. या कीटकांच्या फक्‍त अंड्यातच कर्मिसिक ॲसिड भरपूर प्रमाणात असलेले जांभळे रंजकद्रव्य असते. एप्रिल महिन्याच्या शेवटी, अंडी असलेली पंखहीन मादी कर्मीस ओकच्या (क्वेरकस कॉकीफेरा) झाडाच्या एखाद्या डहाळीला आणि कधीकधी पानांना आपल्या सोंडेने घट्ट पकडून राहते. मग हे डिंबक गोळा करून वाळवले जातात आणि त्यानंतर पाण्यात उकळल्यानंतर मौल्यवान रंजकद्रव प्राप्त होतो. या लाल रंजकद्रवाचा, निवासमंडपाच्या उपांगांसाठी आणि इस्राएली महायाजक घालत असलेल्या पोषाखांसाठी बहुतप्रमाणात उपयोग करण्यात आला होता.

एक प्रकारच्या शिंपल्यातून (आकाशी रंगाचा कालवा) निळा रंग मिळवता येतो असे म्हटले जाते. म्यूरेक्स ट्रंक्यूलस आणि म्यूरेक्स ब्रॅण्डारीस सारख्या शिंपल्यातून किंवा मृदुकाय प्राण्यांतून जांभळा रंग मिळवला जाई. या प्राण्यांच्या मानेत एक लहानशी गाठ असते ज्यात फ्लावर नावाचे केवळ एक थेंबभर द्रव असतो. सुरवातीला हे द्रव्य दिसायला साईप्रमाणे दिसते पण हवा व प्रकाशाशी त्याचा संपर्क आल्यावर त्याचा हळूहळू रंग बदलून ते गडद जांभळे किंवा लालसर जांभळे दिसू लागते. ही शिंपले भूमध्य समुद्राच्या किनाऱ्‍यावर सापडतात; आणि त्यांच्यातून मिळालेल्या रंगात, किनाऱ्‍यावर ती जिथे सापडतात त्यानुसार फरक आढळतो. एक एक करून मोठ्या आकाराचे शिंपले फोडून मग त्यातला मौल्यवान द्रव काढण्यात येई; लहान आकाराच्या शिंपल्यांना एकत्र ठेचून त्यातला द्रव काढण्यात येत असे.

प्रत्येक शिंपल्यातून फार कमी प्रमाणात रंगद्रव मिळत असे, त्यामुळे भरपूर प्रमाणात रंगद्रव मिळवणे महाग होते. त्यामुळे या रंजकाची किंमत जास्त होती आणि जांभळ्या रंगात रंगवलेली वस्रे ही केवळ धनसंपन्‍न किंवा उच्च पदावर असलेल्या लोकांचेच चिन्ह होते. अहश्‍वेरोश राजाने मर्दखयला मोठे पद दिले तेव्हा मर्दखय “निळ्या, पांढऱ्‍यारंगांची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून, व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला.” (एस्तेर ८:१५) लूक अध्याय १६ आणि १९ ते ३१ वचनांतील येशूने दिलेल्या दाखल्यातील “श्रीमंत मनुष्य” सुद्धा “जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे.”

टायर देशाचा जांभळा रंग

प्राचीन टायर देश, टायरीयन किंवा इंम्पेरियन पर्पल नावाच्या जांभळ्या किंवा गडद लाल रंजकासाठी प्रसिद्ध होता. असे म्हटले जाते, की टायर देशातील लोकांनी, दुहेरी रंजनक्रिया शोधून काढली होती; परंतु हा रंग मिळवण्यासाठी ते नेमके काय काय करत असत हे मात्र समजू शकलेले नाही. एवढे मात्र खरे आहे, की रंजकद्रव म्यूरेक्स आणि पर्पुरा या मृदुकायांतून मिळवले जाई; टायर देशाच्या किनाऱ्‍यावर आणि सायडोनजवळ म्यूरेक्स ट्रंक्यूलस या मृदुकायाच्या शिंपल्यांचे ढीगच्या ढीग मिळाले आहेत. यहोवाने, टायरमधील फुनीके शहराचे वर्णन, जांभळ्या रंगांचे कापड, इतर रंगीबेरंगी वस्तू असलेले आणि या सर्वांचा व्यापार करणारे शहर असे केले आहे.—यहेज्केल २७:२, ७, २४.

होय, केवळ सीसराच्या आईलाच नव्हे तर इतर अनेक स्त्रियांना—आणि त्यांच्या पुरुषमंडळीला देखील—उत्तम, नजरेत भरतील अशी रंगीबेरंगी वस्रे आणि घरगुती सामानसुमान हवेहवेसे वाटले असावे. आजही ही गोष्ट खरी आहे, की रंजनक्रियेद्वारे रंग भरल्याने सौंदर्य खुलते आणि डोळ्यांना ते सुखद वाटते.