व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘विश्‍वासू दास’ परीक्षा पार करतो!

‘विश्‍वासू दास’ परीक्षा पार करतो!

‘विश्‍वासू दास’ परीक्षा पार करतो!

“देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे.”—१ पेत्र ४:१७.

१. येशूने ‘दासाचे’ परीक्षण केले तेव्हा त्याला काय आढळले?

सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूने आपल्या ‘परिवाराला’ यथाकाळी अन्‍न पुरवण्याकरता एका ‘दासाची’ नियुक्‍ती केली. १९१४ साली येशूने राजा या नात्याने मुकूट धारण केला आणि लवकरच या दासाचे परीक्षण करण्याची वेळ आली. येशूला आढळले की या ‘दासापैकी’ बहुतेकजण “विश्‍वासू व बुद्धिमान” होते. त्यामुळे त्याने या दासाला “आपल्या सर्वस्वावर” नेमले. (मत्तय २४:४५-४७) परंतु, एक वाईट दास देखील होता, जो ना विश्‍वासू होता ना बुद्धिमान.

“तो वाईट दास”

२, ३. “तो वाईट दास” कोठून आला आणि हे कसे घडले?

‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी’ चर्चा केल्यावर लगेच येशूने वाईट दासाबद्दल सांगितले. तो म्हणाला: “जर तो वाईट दास आपल्या अंतःकरणात म्हणेल की माझा धनी येण्यास उशीर लावीत आहे, आणि तो आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल, आणि झिंगलेल्यांबरोबर खाईल व पिईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी, व त्याला माहीत नाही अशा घटकेत, त्या दासाचा धनी येईल, आणि त्याला छेदून टाकील व ढोंग्यांबरोबर त्याचा वाटा नेमील; तेथे रडणे व दात खाणे होईल.” (मत्तय २४:४८-५१, पं.र.भा.) “तो वाईट दास” ही संज्ञा विश्‍वासू व बुद्धिमान दासाबद्दल येशूने याआधी उद्‌गारलेल्या शब्दांकडे आपले लक्ष वेधते. होय, “वाईट दास” विश्‍वासू दासांतूनच होता. * तो कसा?

विश्‍वासू दास वर्गापैकी अनेक सदस्यांना १९१४ साली स्वर्गात जाऊन नवरदेवाला भेटण्याची तीव्र अपेक्षा होती, पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. यामुळे व इतर काही घडामोडींमुळे बरेचजण निराश झाले आणि काही नाराज झाले. यांपैकी काहीजण आपल्या पूर्वीच्या बांधवांना मौखिक निंदा करण्याद्वारे “मारू” लागले आणि “झिंगलेल्यांबरोबर” अर्थात ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक गटांसोबत मिलाफ करू लागले.—यशया २८:१-३; ३२:६.

४. येशूने ‘वाईट दासाशी’ आणि त्यांच्यासारखी मनोवृत्ती दाखवणाऱ्‍या सर्वांशी कसा व्यवहार केला?

हे पूर्वीचे ख्रिश्‍चन “वाईट दास” असल्याचे स्पष्ट झाले आणि येशूने त्यांना “छेदून टाकले.” कसे? त्याने त्यांना धिक्कारले आणि अशारितीने ते आपली स्वर्गीय आशा गमावून बसले. अर्थात त्यांचा लगेच नाश करण्यात आला नाही. आधी त्यांना काही काळ ख्रिस्ती मंडळीच्या “बाहेरील अंधारात” रडणे व दात खाणे हे अनुभवावे लागले. (मत्तय ८:१२) त्या सुरवातीच्या दिवसांनंतर आणखी काही तुरळक अभिषिक्‍त व्यक्‍तींनी अशीच वाईट प्रवृत्ती दाखवून स्वतःला ‘वाईट दासासोबत’ सामील करून घेतले आहे. ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकीही’ काहींनी त्यांच्या अविश्‍वासूपणाचे अनुकरण केले आहे. (योहान १०:१६) हे सर्व ख्रिस्ताचे शत्रू त्याच आध्यात्मिक स्वरूपाच्या “बाहेरील अंधारात” जातात.

५. ‘वाईट दासाच्या’ तुलनेत विश्‍वासू व बुद्धिमान दासाची प्रतिक्रिया कशाप्रकारे वेगळी होती?

परंतु, ‘त्या वाईट दासाला’ ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागले त्याच परीक्षांना विश्‍वासू व बुद्धिमान दासालाही तोंड द्यावे लागले. पण ते नाराज झाले नाहीत, उलट त्यांनी आपल्या मनोवृत्तीत सुधारणा केली. (२ करिंथकर १३:११) यहोवाबद्दल व बांधवांबद्दल त्यांचे प्रेम अधिक बळकट झाले. परिणामस्वरूप, या उलथापालथीच्या ‘शेवटल्या काळात’ ते “सत्याचा स्तंभ व पाया” ठरले आहेत.—१ तीमथ्य ३:१५; २ तीमथ्य ३:१.

शहाण्या व मूर्ख कुमाऱ्‍या

६. (अ) येशूने त्याच्या विश्‍वासू दास वर्गाच्या बुद्धिमत्तेविषयी कशाप्रकारे स्पष्ट केले? (ब) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी १९१४ च्या आधी कोणता संदेश घोषित केला?

काही अभिषिक्‍त जन विश्‍वासू व बुद्धिमान ठरतील पण इतरजण ठरणार नाहीत; असे का घडते हे दाखवण्याकरता ‘त्या वाईट दासाविषयी’ सांगितल्यानंतर लगेच येशूने आणखी दोन दृष्टान्त दिले. * बुद्धिमान असण्याविषयी स्पष्टीकरण देताना त्याने म्हटले: “स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्‍या जाण्यास निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपणाबरोबर तेल घेतले नाही; शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलहि घेतले.” (मत्तय २५:१-४) त्या दहा कुमाऱ्‍या आपल्याला १९१४ च्या आधीच्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची आठवण करून देतात. नवरदेव अर्थात येशू ख्रिस्त लवकरच प्रकट होणार आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच ते त्याला भेटायला ‘निघाले’ आणि “परराष्ट्रीयांची सद्दी” १९१४ साली संपेल असे त्यांनी निर्भयपणे घोषित केले.—लूक २१:२४.

७. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना केव्हा व का “झोप लागली”?

त्यांचा अंदाज बरोबर होता. परराष्ट्रीयांचे नियुक्‍त काळ खरोखरच १९१४ साली संपुष्टात आले आणि ख्रिस्त येशूच्या नेतृत्त्वाखाली देवाचे राज्य कार्यशील झाले. पण हे तर अदृश्‍य स्वर्गात घडले. पृथ्वीवर मानवजातीला पूर्वी भाकीत केल्याप्रमाणे “अनर्थ” सोसावा लागला. (प्रकटीकरण १२:१०, १२) परीक्षेचा काळ सुरू झाला. काही गोष्टींविषयी स्पष्ट समज नसल्यामुळे, ‘वराला विलंब लागत आहे’ असे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना वाटू लागले. ते गोंधळात पडले; त्याच वेळी जगाकडूनही त्यांना बराच विरोध सहन करावा लागत होता. यामुळे हळूहळू त्यांचा उत्साह मंदावला आणि त्यांचे संघटित सार्वजनिक प्रचार कार्य जवळजवळ बंद पडले. दृष्टान्तातील कुमाऱ्‍यांप्रमाणे, आध्यात्मिक अर्थाने बोलायचे झाल्यास, त्यांना “डुलक्या आल्या व झोप लागली.” येशूच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर, ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्‍या अविश्‍वासू ख्रिश्‍चनांनीही असेच केले होते.—मत्तय २५:५; प्रकटीकरण ११:७, ८; १२:१७.

८. काय घडले ज्यामुळे “पाहा, वर आला आहे!” अशी घोषणा करण्यात आली आणि अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांकरता ही काय करण्याची वेळ होती?

मग १९१९ साली काहीतरी अनपेक्षित घडले. दृष्टान्तात म्हटल्याप्रमाणे: “तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, पाहा, वर आला आहे! त्याला सामोऱ्‍या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या.” (मत्तय २५:६, ७) परिस्थिती अगदीच निराशाजनक वाटत असतानाच, क्रियाशील होण्याचे आवाहन देण्यात आले! ‘करार घेऊन येणारा निरोप्या’ येशू, देवाच्या मंडळीचे परीक्षण करून तिला शुद्ध करण्याकरता १९१८ साली यहोवाच्या आत्मिक मंदिरात आला होता. (मलाखी ३:१) आता अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्याला त्या मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात जाऊन भेटायचे होते. ‘प्रकाशमान’ होण्याची वेळ आली होती.—यशया ६०:१; फिलिप्पैकर २:१४, १५.

९, १०. काही ख्रिस्ती १९१९ मध्ये ‘शहाणे’ तर काही “मूर्ख” का ठरले?

पण थांबा! दृष्टान्तातील काही कुमाऱ्‍यांना काहीतरी समस्या होती. येशूने पुढे असे सांगितले: “मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.” (मत्तय २५:८) तेल नसल्यामुळे दिवे प्रकाश देऊ शकत नव्हते. दिव्यांतील तेल आपल्याला देवाच्या सत्य वचनाची व त्याच्या पवित्र आत्म्याची आठवण करून देतात; यांच्याच साहाय्याने खरे उपासक प्रकाश वाहक ठरतात. (स्तोत्र ११९:१३०; दानीएल ५:१४) १९१९ च्या आधी बुद्धिमान अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी, आपल्या तात्पुरत्या कमजोर स्थितीतही देवाची आपल्याकरता काय इच्छा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे, प्रकाशमान होण्याचे आवाहन करण्यात आले तेव्हा ते तयार होते.—२ तीमथ्य ४:२; इब्री लोकांस १०:२४, २५.

१० पण, काही अभिषिक्‍त जन, वरासोबत असण्याची मनःपूर्वक इच्छा असूनही, त्याग करण्याकरता किंवा वैयक्‍तिकरित्या परिश्रम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुवार्तेच्या प्रचार कार्यात क्रियाशील होण्याची वेळ आली तेव्हा ते तयार नव्हते. (मत्तय २४:१४) किंबहुना, त्यांनी आपल्या आवेशी सोबत्यांनाही त्यांच्यातील थोडे तेल देण्याची विनंती करून त्यांचीही गती कमी करण्याचा प्रयत्न केला. येशूच्या दृष्टान्तात, शहाण्या कुमाऱ्‍यांनी कसा प्रतिसाद दिला? त्या म्हणाल्या: “कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही; तुम्ही विकणाऱ्‍याकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे.” (मत्तय २५:९) त्याचप्रकारे १९१९ साली एकनिष्ठ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी असे काहीही करण्यास नकार दिला, ज्यामुळे प्रकाश वाहण्याची त्यांची क्षमता मंदावेल. अशारितीने, ते कसोटीला खरे उतरले.

११. मूर्ख कुमाऱ्‍यांच्या बाबतीत काय घडले?

११ येशूने असे म्हणून समारोप केला: “त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्‍याहि कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभुजी, आम्हासाठी दास उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही.” (मत्तय २५:१०-१२) होय, काहीजण वराच्या आगमनाकरता तयार नव्हते. त्यामुळे ते कसोटीला खरे उतरू शकले नाहीत आणि त्यामुळे स्वर्गातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी ते गमावून बसले. किती खेदजनक!

रुपयांचा दृष्टान्त

१२. (अ) येशूने विश्‍वासूपणाविषयी खुलासा करण्याकरता कशाचा उपयोग केला? (ब) ‘परदेशी जाणारा’ मनुष्य कोण होता?

१२ शहाणपणाविषयी दृष्टान्त दिल्यानंतर येशूने विश्‍वासूपणाबद्दल स्पष्टीकरण दिले. त्याने म्हटले: “ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्‍या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला.” (मत्तय २५:१४, १५) या दृष्टान्तातील मनुष्य येशू आहे; सा.यु. ३३ साली त्याचे स्वर्गारोहण झाले तेव्हा तो जणू “परदेशी” गेला. पण स्वर्गारोहणाआधी येशूने आपली “मालमत्ता” विश्‍वासू शिष्यांच्या हाती सोपवली. ती कशी?

१३. येशूने कशाप्रकारे कार्याचे भलेमोठे क्षेत्र तयार केले आणि आपल्या “दासांना” व्यापार करण्याचा अधिकार दिला?

१३ पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूने इस्राएल देशाच्या कानाकोपऱ्‍यात सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे कार्याचे एक भलेमोठे क्षेत्र तयार करण्यास सुरवात केली. (मत्तय ९:३५-३८) ‘परदेशी जाण्याआधी’ त्याने आपली जमीन विश्‍वासू शिष्यांच्या हाती सोपवून म्हटले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१८-२०) अशाप्रकारे येशूने आपल्या “दासांना” आपण परत येईपर्यंत “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” व्यापार करण्याचा अधिकार दिला.

१४. सर्वांकडून तितक्याच प्रमाणात व्यापार करण्याची अपेक्षा का करण्यात आली नाही?

१४ “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” ही संज्ञा असे सूचित करते की पहिल्या शतकातील सर्व ख्रिश्‍चनांची एकसारखी परिस्थिती नव्हती. काही पौल व तीमथ्य यांच्यासारखे प्रचार व शिकवण्याच्या कार्यात पुरेपूर सहभाग घेण्याकरता मोकळे होते. तर इतरांना त्यांच्या परिस्थितीमुळे फार कमी सहभाग घेणे शक्य होते. उदाहरणार्थ, काही ख्रिस्ती दास होते, इतरांना आरोग्याच्या समस्या होत्या, काहीजण वृद्ध होते किंवा त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्‍या होत्या. अर्थात मंडळीतील काही विशेषाधिकार सर्व शिष्यांना उपलब्ध नव्हते. अभिषिक्‍त स्त्रिया व काही अभिषिक्‍त पुरुष देखील मंडळीत शिकवत नव्हते. (१ करिंथकर १४:३४; १ तीमथ्य ३:१; याकोब ३:१) पण त्यांची वैयक्‍तिक परिस्थितीही कशीही असली तरीसुद्धा ख्रिस्ताचे सर्व अभिषिक्‍त शिष्य—मग त्या स्त्रिया असोत वा पुरुष—त्या सर्वांना व्यापार करण्याकरता नेमण्यात आले होते; अर्थात ख्रिस्ती सेवाकार्याकरता त्यांना आपल्यासमोर असलेल्या संधींचा व परिस्थितीचा सदुपयोग करायचा होता. आधुनिक काळातले ख्रिस्ताचे शिष्य देखील असेच करतात.

परीक्षणाचा काळ सुरू होतो!

१५, १६. (अ) हिशेब करण्याची वेळ केव्हा आली? (ब) विश्‍वासू जनांना कशाप्रकारे ‘व्यापार करण्यास’ नव्याने वाव देण्यात आला?

१५ दृष्टान्तात पुढे म्हटले आहे: “मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला.” (मत्तय २५:१९) १९१४ साली, सा.यु. ३३ नंतर निश्‍चितच बराच काळ लोटल्यावर ख्रिस्त येशूने राजा या नात्याने आपल्या उपस्थितीला आरंभ केला. साडेतीन वर्षांनंतर, १९१८ साली तो देवाच्या आत्मिक मंदिरात आला व त्याने पेत्राचे पुढील शब्द पूर्ण केले: “देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे.” (१ पेत्र ४:१७; मलाखी ३:१) हिशेब घेण्याची वेळ आली होती.

१६ दासांनी, अर्थात, येशूच्या अभिषिक्‍त बांधवांनी राजाने दिलेल्या ‘रुपयांचा’ कशाप्रकारे उपयोग केला होता? सा.यु. ३३ पासून, तसेच १९१४ च्या आधीच्या वर्षांत अनेकजण येशूच्या ‘व्यापारात’ वृद्धी करण्याकरता मेहनत घेत होते. (मत्तय २५:१६) पहिले महायुद्ध सुरू असतानाही त्यांनी धन्याची चाकरी करण्याची मनःपूर्वक इच्छा असल्याचे प्रदर्शित केले होते. आता या विश्‍वासू जनांना ‘व्यापार करण्यास’ नव्याने वाव देणे योग्य होते. या व्यवस्थीकरणाचा अंतसमय आला होता. सुवार्तेचा जगभरात प्रचार करायचा होता. “पृथ्वीचे पीक” कापण्याची वेळ आली होती. (प्रकटीकरण १४:६, ७, १४-१६) गहू वर्गाच्या अंतिम सदस्यांना शोधायचे होते आणि दुसऱ्‍या मेंढरांचा एक “मोठा लोकसमुदाय” एकत्रित करायचा होता.—प्रकटीकरण ७:९; मत्तय १३:२४-३०.

१७. विश्‍वासू अभिषिक्‍त जन कशाप्रकारे ‘आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी’ झाले?

१७ कापणीचा काळ हा आनंदाचा काळ असतो. (स्तोत्र १२६:६) त्यामुळे, १९१९ साली येशूने आपल्या विश्‍वासू अभिषिक्‍त बांधवांना अधिक जबाबदाऱ्‍या सोपवल्या तेव्हा उचितपणे त्याने असे म्हटले: “तू थोडक्या गोष्टीत विश्‍वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २५:२१, २३) शिवाय, देवाच्या राज्याचा नव्यानेच सिंहासनारूढ झालेला राजा या नात्याने धन्याला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. (स्तोत्र ४५:१, २, ६, ७) विश्‍वासू दास वर्ग राजाचे प्रतिनिधीत्व करण्याद्वारे आणि पृथ्वीवरील त्याच्या उत्पन्‍नात वाढ करण्याद्वारे त्याच्या आनंदात सहभागी होतात. (२ करिंथकर ५:२०) त्यांचा आनंद यशया ६१:१० यातील भविष्यसूचक शब्दांतून व्यक्‍त होतो: “मी परमेश्‍वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण . . . त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत.”

१८. काहीजण कसोटीस का उतरले नाहीत आणि याचा काय परिणाम झाला?

१८ दुःखाने म्हणावे लागते, पण काहीजण कसोटीस उतरले नाहीत. दृष्टान्तात आपण असे वाचतो: “ज्याला एक हजार मिळाले होते तोहि येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा; जेथे तुम्ही पेरिले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता; म्हणून ती भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत.” (मत्तय २५:२४, २५) त्याचप्रकारे, काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी ‘व्यापार’ केला नव्हता. १९१४ च्या आधी त्यांनी आपली आशा उत्साहीपणे इतरांना सांगितली नव्हती आणि १९१९ नंतरही त्यांना असे करण्याची इच्छा नव्हती. त्यांच्या या उद्दामपणाला येशूने कशाप्रकारे प्रतिसाद दिला? त्याने त्यांच्याकडून सर्व विशेषाधिकार काढून घेतले. त्यांना ‘बाहेरील अंधारात टाकण्यात आले, जेथे रडणे व दातखाणे चालत होते.’—मत्तय २५:२८, ३०.

परीक्षण संपलेले नाही

१९. परीक्षण कशाप्रकारे सुरूच राहते आणि सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा काय करण्याचा निर्धार आहे?

१९ अर्थात, जे अंतसमयात ख्रिस्ताचे अभिषिक्‍त दास बनणार होते त्यांच्यापैकी बहुतेकजण १९१८ साली येशूने परीक्षण सुरू केले तेव्हा अद्याप यहोवाची सेवा करत नव्हते. मग त्यांना कसोटीचा सामना करावा लागला नाही का? नाही याचा असा अर्थ नाही. १९१८/१९ मध्ये परीक्षणाला केवळ सुरवात झाली आणि तेव्हा विश्‍वासू व बुद्धिमान दास एक वर्ग या नात्याने कसोटीस उतरला. पण व्यक्‍तिगतरित्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे परीक्षण त्यांच्यावर कायमचा शिक्का मारला जात नाही तोपर्यंत सुरूच राहते. (प्रकटीकरण ७:१-३) हे ओळखून, ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांचा विश्‍वासूपणे ‘व्यापार करत’ राहण्याचा निर्धार आहे. शेवटपर्यंत आपला प्रकाश चकाकत राहावा म्हणून तेलाचा पुरेसा पुरवठा आपल्याजवळ ठेवून बुद्धिमान राहण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांना ठाऊक आहे की त्यांच्यापैकी प्रत्येक जण विश्‍वासूपणे आपले जीवन संपवतो तेव्हा येशू त्यांना स्वर्गातील स्थानांत घेईल.—मत्तय २४:१३; योहान १४:२-४; १ करिंथकर १५:५०, ५१.

२०. (अ) आज दुसऱ्‍या मेंढरांचा काय करण्याचा निर्धार आहे? (ब) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कशाची जाणीव आहे?

२० दुसऱ्‍या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायाने आपल्या अभिषिक्‍त बांधवांचे अनुकरण केले आहे. देवाच्या उद्देशांबद्दल ज्ञान मिळाल्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी आली आहे याची त्यांना जाणीव आहे. (यहेज्केल ३:१७-२१) त्यामुळे यहोवाच्या वचनाच्या व त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने ते देखील अभ्यास व ख्रिस्ती सहवासाद्वारे आपल्याकडे पुरेसा तेलाचा साठा ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रचार व शिकवण्याच्या कार्यात सहभाग घेऊन आपल्या अभिषिक्‍त बांधवांसोबत ‘व्यापार करण्याद्वारे’ ते आपला प्रकाश चमकू देतात. पण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना जाणीव आहे की रुपये त्यांच्या हातात देण्यात आले होते. त्याअर्थी, प्रभूच्या पृथ्वीवरील मालमत्तेचा कशाप्रकारे उपयोग केला जातो याविषयी त्यांना हिशेब द्यायचा आहे. त्यांची संख्या कमी असली तरीसुद्धा, ते आपली जबाबदारी मोठ्या लोकसमुदायावर टाकू शकत नाहीत. हे आठवणीत ठेवून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ राजाच्या व्यापाराची देखरेख करण्यात सातत्याने पुढाकार घेतात आणि मोठ्या लोकसमुदायाच्या विश्‍वासू सदस्यांचा आधार मिळाल्यामुळे ते कृतज्ञ आहेत. ते देखील आपल्या अभिषिक्‍त बांधवांची जबाबदारी ओळखतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्यास ते एक बहुमान समजतात.

२१. कोणती आज्ञा १९१९ च्या आधीपासून आपल्या काळापर्यंत सर्व ख्रिश्‍चनांना लागू होते?

२१ अशारितीने हे दोन्ही दृष्टान्त १९१९ च्या आसपास घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकत असले तरीसुद्धा यांतील तत्त्वे शेवटल्या काळादरम्यान राहत असलेल्या सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांना लागू होतात. अशा रितीने, दहा कुमाऱ्‍यांच्या दृष्टान्ताच्या शेवटी येशूने जी आज्ञा दिली ती जरी सर्वप्रथम १९१९ च्या आधी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होत असली तरीसुद्धा त्यातील तत्त्व प्रत्येक ख्रिश्‍चन व्यक्‍तीला अजूनही लागू होते. तेव्हा येशूचे पुढील शब्द आपण सर्वांनी लक्ष देण्याजोगे आहेत: “जागृत राहा कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”—मत्तय २५:१३.

[तळटीपा]

^ परि. 2 प्रेषितांच्या मृत्यूनंतर “क्रूर लांडगे” अभिषिक्‍त ख्रिस्ती वडीलांतून ज्याप्रकारे आले त्याच्याशी याची तुलना करता येईल.—प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०.

^ परि. 6 येशूच्या दृष्टान्ताविषयी आणखी एक चर्चा यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या ‘शांतीच्या राजकुमाराच्या’ शासनाखाली जागतिक सुरक्षितता (इंग्रजी) या प्रकाशनात अध्याय ५ व ६ यात आढळेल.

तुम्हाला स्पष्ट करता येईल का?

• येशूने आपल्या अनुयायांचे परीक्षण केव्हा केले आणि त्याला काय आढळले?

• काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी ‘त्या वाईट दासाची’ मनोवृत्ती आपल्यात का येऊ दिली?

• आपण आध्यात्मिकरित्या बुद्धिमान आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?

• येशूच्या विश्‍वासू अभिषिक्‍त बांधवांचे अनुकरण करून आपण कशाप्रकारे “व्यापार” करत राहू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चौकट]

येशूचे येणे—केव्हा?

मत्तयाच्या २४ व २५ अध्यायांत वेगवेगळ्या अर्थाने येशूच्या ‘येण्याविषयी’ आपण वाचतो. ‘येण्याकरता’ येशूला आपले स्थान सोडण्याची गरज नाही. तो ‘येतो’ ते या अर्थाने की तो सहसा न्याय करण्याकरता एकतर मानवजातीकडे किंवा आपल्या अनुयायांकडे लक्ष केंद्रित करतो. या अर्थाने १९१४ साली तो मुकूट धारण केलेल्या राजाच्या नात्याने आपली उपस्थिती सुरू करण्याकरता ‘आला.’ (मत्तय १६:२८; १७:१; प्रेषितांची कृत्ये १:११) १९१८ साली तो करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्याच्या भूमिकेत ‘आला’ आणि यहोवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्‍यांचा न्याय करण्यास त्याने सुरवात केली. (मलाखी ३:१-३; १ पेत्र ४:१७) हर्मगिद्दोनात तो यहोवाच्या शत्रूंविरुद्ध न्यायदंड बजावण्याकरता ‘येईल.’—प्रकटीकरण १९:११-१६.

मत्तय २४:२९-४४ व २५:३१-४६ येथे येण्याविषयी अनेक वेळा आढळणारे उल्लेख ‘मोठ्या संकटाच्या’ संदर्भात आहेत. (प्रकटीकरण ७:१४) दुसरीकडे पाहता, मत्तय २४:४५ ते २५:३० येथे अनेक वेळा आढळणारे येण्याविषयीचे उल्लेख १९१८ पासून यहोवाची सेवा करण्याचा दावा करत असलेल्या शिष्यांच्या न्यायासंबंधी आहेत. उदाहरणार्थ, विश्‍वासू दासाला प्रतिफळ देणे, मूर्ख कुमाऱ्‍यांचा न्याय, आणि धन्याचा पैसा लपवून ठेवणाऱ्‍या आळशी दासाचा न्याय हे सर्व मोठ्या संकटाच्या वेळी येशू ‘येईल’ तेव्हा घडेल असे म्हणणे तर्कशुद्ध ठरणार नाही. याचा अर्थ असा होईल की त्या वेळी अनेक अभिषिक्‍त जन अविश्‍वासू असल्याचे आढळतील आणि त्यांच्या जागी नव्या व्यक्‍तींची नेमणूक करावी लागेल. पण प्रकटीकरण ७:३ सूचित करते की तोपर्यंत ख्रिस्ताच्या सर्व अभिषिक्‍त दासांवर कायमचा ‘शिक्का मारण्यात’ आलेला असेल.

[१४ पानांवरील चित्र]

‘वाईट दासाला’ १९१९ साली कोणतेही आशीर्वाद मिळाले नाहीत

[१५ पानांवरील चित्र]

वराचे आगमन झाले तेव्हा शहाण्या कुमाऱ्‍या तयार होत्या

[१७ पानांवरील चित्र]

विश्‍वासू दासाने “व्यापार” केला होता

आळशी दासाने केला नव्हता

[१८ पानांवरील चित्र]

अभिषिक्‍त व मोठा लोकसमुदाय सातत्याने आपला प्रकाश चमकवतात