व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वासू व बुद्धिमान दास

विश्‍वासू व बुद्धिमान दास

विश्‍वासू व बुद्धिमान दास

‘ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवारावर नेमिले आहे असा कोण?’—मत्तय २४:४५.

१, २. आज आपल्याला आध्यात्मिक अन्‍नाचा नियमित पुरवठा मिळणे का आवश्‍यक आहे?

सा.यु. ३३ सालच्या, मंगळवार निसान ११ रोजी दुपारी येशूच्या शिष्यांनी त्याला एक प्रश्‍न विचारला होता. हा प्रश्‍न आज आपल्याकरता अतिशय अर्थसूचक आहे. त्यांनी त्याला विचारले: “आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” या प्रश्‍नाचे उत्तर देताना, येशूने एक उल्लेखनीय भविष्यवाणी केली. त्याने अशा एका उलथापालथीच्या काळाविषयी सांगितले जेव्हा युद्धे, दुष्काळ, भूकंप होतील आणि रोगराई पसरेल. आणि ह्‍या गोष्टी केवळ “वेदनांचा प्रारंभ” असतील. याचा अर्थ, त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट होईल. भविष्याचे किती हे भयप्रेरक चित्र!—मत्तय २४:३, ७, ८, १५-२२; लूक २१:१०, ११.

येशूच्या भविष्यवाणीचे बहुतेक पैलू १९१४ पासून पूर्ण होण्यास सुरवात झाली. मानवजात आज त्या भाकीत केलेल्या ‘वेदना’ मोठ्या प्रमाणात सोसत आहे. पण, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही. येशूने आश्‍वासन दिले होते की तो त्यांना पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न देऊन शक्‍ती पुरवेल. येशू आता स्वर्गात असल्यामुळे, या पृथ्वीवर आपल्याला आध्यात्मिक अन्‍नाचा पुरवठा मिळण्याकरता त्याने कोणती तरतूद केली आहे?

३. आपल्याला “यथाकाळी खावयास” मिळावे म्हणून येशूने कोणती तरतूद केली आहे?

स्वतः येशूने या प्रश्‍नाचे उत्तर सुचवले. युगाच्या समाप्तीविषयीची उल्लेखनीय भविष्यवाणी करताना येशूने असा प्रश्‍न विचारला: “ज्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण?” मग त्याने म्हटले: “धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:४५-४७) होय, आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यास ज्याला नेमण्यात आले आहे असा एक “दास” असणार होता आणि हा “दास” विश्‍वासू बुद्धिमान असणार होता. हा दास कोणा विशिष्ट व्यक्‍तीस, किंवा एकापाठोपाठ येणार असलेल्या अनेक व्यक्‍तींस सूचित करतो का? की तो आणखी कशास सूचित करतो? याचे उत्तर शोधणे आपल्या हिताचे आहे कारण हा विश्‍वासू दास आध्यात्मिक अन्‍न पुरवतो, जे आजच्या काळात अत्यावश्‍यक आहे.

व्यक्‍ती की समूह?

४. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ एक व्यक्‍ती असू शकत नाही असे आपण का म्हणू शकतो?

‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ एक व्यक्‍ती असूच शकत नाही. का नाही? कारण या दासाने पहिल्या शतकातच आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यास सुरवात केली; आणि १९१४ साली धनी येईल तेव्हाही हा दास हेच काम करत असेल असे येशूने सांगितले होते. याचा असा अर्थ होतो की एकच व्यक्‍ती जवळजवळ १,९०० वर्षे विश्‍वासू सेवा करत होती. पण इतके दीर्घायुष्य तर मथुशलहलाही लाभले नव्हते!—उत्पत्ति ५:२७.

५. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ ही संज्ञा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला का लागू होत नाही याचे स्पष्टीकरण द्या.

मग ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ ही संज्ञा सर्वसामान्य अर्थाने प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला वैयक्‍तिकरित्या सूचित करत असावी का? सर्व ख्रिश्‍चनांनी विश्‍वासू व बुद्धिमान असले पाहिजे हे खरे आहे; पण, येशू ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी’ बोलला तेव्हा त्याच्या मनात वेगळेच काही होते हे अगदी स्पष्ट आहे. आपण असे का म्हणू शकतो? कारण त्याने म्हटले की “धनी येईल तेव्हा” तो या दासाला, “आपल्या सर्वस्वावर” नेमील. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती, सर्व गोष्टींवर अर्थात प्रभू येशूच्या “सर्वस्वावर” कशी काय नेमली जाऊ शकते? अर्थातच हे शक्य नाही!

६. इस्राएल राष्ट्र कशाप्रकारे देवाचा “सेवक” किंवा “दास” म्हणून कार्य करणार होते?

त्याअर्थी, सर्वात तर्कशुद्ध निष्कर्ष हाच निघतो की ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ हे संबोधन येशूने ख्रिश्‍चनांच्या एका समूहाच्या संदर्भात वापरले. असा अनेक व्यक्‍तींचा समावेश असलेला दास असू शकतो का? होय. ख्रिस्तापूर्वी सातशे वर्षांआधी यहोवाने सबंध इस्राएल राष्ट्राला “माझे साक्षी” आणि “माझा निवडलेला सेवक” असे म्हणून संबोधले. (तिरपे वळण आमचे.) (यशया ४३:१०) सा.यु.पू. १५१३ साली मोशेचे नियमशास्त्र देण्यात आले तेव्हापासून सा.यु. ३३ सालाच्या पेन्टेकॉस्टपर्यंत इस्राएल राष्ट्राचा प्रत्येक सदस्य या सेवक वर्गात सामील होता. अर्थात, इस्राएल राष्ट्रातील बहुतेक लोक राष्ट्राच्या प्रशासकीय कारभारांत किंवा आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याच्या कार्यक्रमात थेटपणे भाग घेत नव्हते. ही कार्ये पार पाडण्याकरता यहोवाने राजे, शास्ते, संदेष्टे, याजक व लेवी यांचा उपयोग केला. तरीसुद्धा, एक राष्ट्र या नात्याने यहोवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिनिधीत्व करण्याचे व राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव सांगण्याचे कर्तव्य इस्राएल राष्ट्राचे होते. प्रत्येक इस्राएली यहोवाचा साक्षी होता.—अनुवाद २६:१९; यशया ४३:२१; मलाखी २:७; रोमकर ३:१, २.

एका ‘दासाची’ हकालपट्टी

७. प्राचीन इस्राएल राष्ट्राला देवाचा “सेवक” या नात्याने अयोग्य का ठरवण्यात आले?

कित्येक शतकांपूर्वी इस्राएल देवाचा “सेवक” होता, त्याअर्थी येशूने ज्याच्याविषयी सांगितले तो दास देखील इस्राएल राष्ट्रालाच सूचित करत होता का? नाही, कारण दुःखाची गोष्ट म्हणजे प्राचीन इस्राएल ना विश्‍वासू निघाले ना बुद्धिमान. या वस्तुस्थितीचा सारांश, यहोवाने इस्राएल राष्ट्राला उद्देशून बोललेल्या व पौलाने उद्धृत केलेल्या पुढील शब्दांत मिळतो: “तुम्हामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे.” (रोमकर २:२४) शतकानुशतके यहोवाविरुद्ध विद्रोह केल्यानंतर इस्राएल राष्ट्राने जेव्हा येशूला धिक्कारले तेव्हा त्यांच्या या विद्रोहाने कळस गाठला आणि या खेपेला यहोवाने त्यांना कायमचे अव्हेरले.—मत्तय २१:४२, ४३.

८. इस्राएलऐवजी एक दुसरा “सेवक” केव्हा नेमण्यात आला आणि तेव्हा काय परिस्थिती होती?

या ‘सेवकाच्या’ अर्थात इस्राएल राष्ट्राच्या अविश्‍वासूपणामुळे, विश्‍वासू उपासकांकरता असलेला आध्यात्मिक अन्‍नाचा पुरवठा कायमचा बंद झाला नाही. सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी, म्हणजेच येशूच्या पुनरुत्थानानंतर पन्‍नास दिवसांनी त्याच्या शिष्यांपैकी १२० जणांवर जेरूसलेममधील एका माडीवरच्या खोलीत पवित्र आत्मा ओतण्यात आला. त्या क्षणी एक नवे राष्ट्र जन्माला आले. आणि त्याचे सदस्य जेव्हा जेरूसलेमच्या रहिवाशांना ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ निर्भयपणे सांगू लागले तेव्हा उचितपणे, या नव्या राष्ट्राच्या स्थापनेची जणू जाहीर घोषणा करण्यात आली. (प्रेषितांची कृत्ये २:११) अशाप्रकारे ते नवे राष्ट्र, अर्थात एक आत्मिक राष्ट्र, इतर राष्ट्रांना यहोवाच्या गौरवाची घोषणा करण्याकरता व यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याकरता नेमण्यात आलेला “सेवक” बनले. (१ पेत्र २:९) आणि त्याअर्थी त्याला ‘देवाचे इस्राएल’ हे अगदी उचित नाव देण्यात आले.—गलतीकर ६:१६.

९. (अ) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासांत’ कोणाचा समावेश आहे? (ब)‘परिवारात’ कोण सामील आहेत?

‘देवाच्या इस्राएलापैकी’ प्रत्येक सदस्य एक समर्पित, बाप्तिस्मा घेतलेला, आत्म्याने अभिषेक झालेला व स्वर्गीय आशा असलेला ख्रिस्ती आहे. ज्याप्रकारे ख्रिस्तपूर्व काळातील सेवक वर्गात सा.यु.पू. १५१३ ते सा.यु. ३३ सालाच्या पेन्टेकॉस्ट पर्यंतच्या काळातील प्रत्येक इस्राएल व्यक्‍तीचा समावेश होता, त्याचप्रकारे, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ ही संज्ञा सा.यु. ३३ पासून आतापर्यंत कोणत्याही कालावधीतील त्या अभिषिक्‍त आत्मिक राष्ट्राच्या सर्व सदस्यांना सामूहिक अर्थाने लागू होते. पण या सेवकाकडून आत्मिक आहार मिळवणाऱ्‍या ‘परिवारात’ कोणाचा समावेश होतो? सा.यु. पहिल्या शतकात प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला स्वर्गीय आशा होती. त्यामुळे परिवार देखील या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सामुहिकरित्या नव्हे तर वैयक्‍तिकरित्या सूचित करत होता. सर्वांना, त्या दासाकडून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाची गरज होती; यात मंडळीत जबाबदार पदांवर असलेल्यांचाही समावेश होता.—१ करिंथकर १२:१२, १९-२७; इब्री लोकांस ५:११-१३; २ पेत्र ३:१५, १६.

“प्रत्येकाला त्याचे काम”

१०, ११. दास वर्गाच्या सर्व सदस्यांना एकसारखेच कार्य नेमण्यात आलेले नाही हे आपल्याला कसे कळते?

१० ‘देवाचे इस्राएल’ विश्‍वासू व बुद्धिमान दास आहे व या नात्याने त्यांना काही कार्य नेमण्यात आले आहे, पण यासोबतच प्रत्येक सदस्याच्या काही वैयक्‍तिक जबाबदाऱ्‍या देखील आहेत. मार्क १३:३४ (पं.र.भा.) यातील येशूच्या शब्दांवरून हे स्पष्ट होते. त्याने म्हटले: “दूरचा प्रवास करणाऱ्‍या माणसाने आपले घर सोडताना आपल्या दासांना अधिकार देऊन प्रत्येकाला त्याचे काम नेमून दिले आणि द्वारपाळाला जागे राहायला आज्ञा केली, तसे हे आहे.” (तिरपे वळण आमचे.) त्याअर्थी, दास वर्गातील प्रत्येक सदस्याला एक कार्य नेमण्यात आले आहे—ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील संपत्तीत भर पाडण्याचे कार्य. प्रत्येक सदस्य हे कार्य आपल्या वैयक्‍तिक सामर्थ्यानुसार व आपल्याला मिळणाऱ्‍या संधीनुसार करतो.—मत्तय २५:१४, १५.

११ शिवाय, प्रेषित पेत्राने त्याच्या काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असे सांगितले: “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.” (तिरपे वळण आमचे.) (१ पेत्र ४:१०) त्याअर्थी, त्या अभिषिक्‍त जनांवर, देवाने त्यांना दिलेल्या कृपादानांचा उपयोग करून एकमेकांची सेवा करण्याची जबाबदारी होती. शिवाय, पेत्राच्या शब्दांवरून दिसून येते की सगळ्याच ख्रिश्‍चनांजवळ सारखीच कौशल्ये, जबाबदाऱ्‍या अथवा विशेषाधिकार असणार नव्हते. तरीपण प्रत्येक सदस्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या आत्मिक राष्ट्राच्या वाढीला हातभार लावू शकत होता. तो कशाप्रकारे?

१२. दास वर्गाच्या प्रत्येक सदस्याने, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, दासाच्या वाढीला कशाप्रकारे हातभार लावला?

१२ पहिली गोष्ट म्हणजे, प्रत्येक सदस्यावर यहोवाचा साक्षीदार असण्याची, व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी होती. (यशया ४३:१०-१२; मत्तय २४:१४) स्वर्गारोहण होण्याआधी येशूने आपल्या सर्व विश्‍वासू शिष्यांना, पुरुषांना तसेच स्त्रियांनाही शिक्षक होण्याची आज्ञा दिली. त्याने म्हटले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय २८:१९, २०.

१३. सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कोणता विशेषाधिकार अनुभवण्यास मिळाला?

१३ नवे शिष्य सापडल्यावर, ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी पाळण्यास त्यांना काळजीपूर्वक शिकवायचे होते. या शिक्षणाला प्रतिसाद देणाऱ्‍या व्यक्‍ती कालांतराने इतरांना शिकवण्यास पात्र बनल्या. अनेक राष्ट्रांमध्ये दास वर्गाच्या भावी सदस्यांना पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यात आले. शिष्य बनवण्याची कामगिरी पार पाडण्यात सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी भाग घेतला, मग ते पुरुष असोत अथवा स्त्रिया. (प्रेषितांची कृत्ये २:१७, १८) दासाने आपले कार्य सुरू केले तेव्हापासून या व्यवस्थीकरणाचा अंत होईपर्यंत हे कार्य चालणार होते.

१४. मंडळीत शिकवण्याचा अधिकार कोणापुरता मर्यादित होता आणि विश्‍वासू अभिषिक्‍त स्त्रियांची याविषयी कशी प्रतिक्रिया होती?

१४ नव्यानेच बाप्तिस्मा झालेल्या अभिषिक्‍त व्यक्‍ती दास वर्गात सामील होत गेल्या. सुरवातीला त्यांना कोणीही शिकवलेले असले तरीसुद्धा बाप्तिस्मा झाल्यानंतरही त्यांना मंडळीतील काही विशिष्ट सदस्यांकडून मार्गदर्शन मिळत राहिले. हे असे सदस्य होते ज्यांनी वडील म्हणून सेवा करण्याकरता आवश्‍यक असलेल्या अपेक्षा पूर्ण केलेल्या होत्या. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:६-९) अशारितीने या नियुक्‍त पुरुषांना त्या राष्ट्राच्या वाढीला एका खास अर्थाने हातभार लावण्याची सुसंधी मिळाली. मंडळीत शिकवण्याचे कार्य केवळ ख्रिस्ती पुरुषांनाच नेमले जाते याबद्दल विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिस्ती स्त्रियांना नाराजी नव्हती. (१ करिंथकर १४:३४, ३५) उलट, मंडळीतील पुरुषांच्या परिश्रमांमुळे मिळणारे फायदे त्यांनी आनंदाने स्वीकारले आणि स्त्रियांजवळ असलेल्या विशेषाधिकारांबद्दल, उदाहरणार्थ, इतरांना सुवार्ता सांगण्याच्या विशेषाधिकाराबद्दल त्यांनी कृतज्ञता बाळगली. आजही आवेशी अभिषिक्‍त स्त्रिया त्याचप्रकारची नम्र मनोवृत्ती बाळगतात; मंडळीतील वडील अभिषिक्‍त आहेत किंवा नाहीत हे त्या पाहात नाहीत.

१५. पहिल्या शतकात आध्यात्मिक अन्‍नाचा एक मुख्य स्रोत कोणता होता आणि हे अन्‍न पुरवण्यात कोण पुढाकार घेत होते?

१५ पहिल्या शतकात दिले जाणारे मूलभूत आध्यात्मिक अन्‍न मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍या प्रेषितांच्या व इतर शिष्यांच्या लेखणीतून सरळ मंडळीच्या सदस्यांपर्यंत पोचत असे. या वडिलांची पत्रे, विशेषतः ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत समावेश असलेली २७ प्रेरित पुस्तके—सर्व मंडळ्यांना पाठवण्यात आली आणि स्थानिक वडिलांनी याच पत्रांच्या आधारावर आपापल्या मंडळ्यांना मार्गदर्शन केले असेल यात शंका नाही. अशाप्रकारे, दासाच्या प्रतिनिधींनी प्रामाणिक ख्रिश्‍चनांना पोषक आध्यात्मिक अन्‍न विश्‍वासूपणे पुरवले. पहिल्या शतकातील दास वर्ग आपल्याला नेमण्यात आलेले कार्य अगदी विश्‍वासूपणे पार पाडत होता.

एकोणीस शतकांनंतरचा “दास”

१६, १७. एकोणीसशे चवदापर्यंतच्या वर्षांत दास वर्गाने आपल्याला नेमण्यात आलेले कार्य विश्‍वासूपणे करत असल्याचे कशाप्रकारे शाबीत केले?

१६ आजच्या काळाविषयी काय म्हणता येईल? १९१४ साली येशूच्या उपस्थितीला सुरवात झाली तेव्हा त्याला विश्‍वासूपणे यथाकाळी अन्‍न पुरवत असलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा समूह आढळला का? निश्‍चितच. हा समूह अगदी सहज ओळखता येण्यासारखा होता कारण त्यांनी उत्पन्‍न केलेली उत्तम फळेच तशी होती. (मत्तय ७:२०) आजपर्यंतचा इतिहास सिद्ध करतो की तो निष्कर्ष अचूक होता.

१७ येशूच्या येण्याच्या काळादरम्यान परिवारापैकी जवळजवळ ५,००० जण बायबल सत्यांचा प्रसार करण्यात व्यग्र होते. कामकरी थोडे होते, पण या दासाने सुवार्ता पसरवण्याकरता अनेक अभिनव पद्धतींचा उपयोग केला. (मत्तय ९:३८) उदाहरणार्थ, जवळजवळ २,००० वृत्तपत्रांत बायबलमधील वेगवेगळ्या विषयांवरील उपदेश प्रकाशित करण्याची व्यवस्था करण्यात आली. अशाप्रकारे, देवाच्या वचनातील सत्य एकाच वेळी लक्षावधी वाचकांपर्यंत पोचले. याशिवाय, रंगीत चित्रे व चलचित्रपटांचा उपयोग करून एक आठ तासांचा कार्यक्रम तयार करण्यात आला. या अभिनव कार्यक्रमामुळे, निर्मितीपासून ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या अंतापर्यंत बायबलचा संदेश, तीन खंडांतील ९० लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात आला. सुवार्ता पसरवण्याचा आणखी एक मार्ग होता छापील साहित्य. उदाहरणार्थ १९१४ साली याच नियतकालिकाच्या सुमारे ५०,००० प्रती प्रकाशित करण्यात आल्या.

१८. येशूने दासाला आपल्या सर्वस्वावर केव्हा नेमले आणि का?

१८ होय, धनी आला तेव्हा विश्‍वासू दास त्याच्या परिवाराला प्रामाणिकपणे अन्‍न पुरवत असल्याचे व सुवार्तेचा प्रसार करत असल्याचे त्याला आढळले. आता या दासावर आणखी मोठ्या जबाबदाऱ्‍या सोपवण्यात येणार होत्या. येशूने म्हटले: “मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:४७) १९१९ साली, दासाला परीक्षेच्या काळातून जावे लागल्यानंतर येशूने असेच केले. पण ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाला’ आणखी मोठ्या जबाबदाऱ्‍या का देण्यात आल्या? कारण धन्याच्या संपत्तीत भर पडली होती. येशूला १९१४ साली राजा नेमण्यात आले होते.

१९. ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ आध्यात्मिक गरजा कशाप्रकारे पुरवण्यात आल्या आहेत हे स्पष्ट करा.

१९ नव्यानेच राजमुकूट धारण केलेल्या धन्याने आपल्या विश्‍वासू दासाला ज्या सर्वस्वावर नेमले ते कशास सूचित करते? हे पृथ्वीवर त्याच्या मालकीच्या सर्व आध्यात्मिक गोष्टींना सूचित करते. उदाहरणार्थ, १९१४ साली ख्रिस्त सिंहासनावर विराजमान झाल्याच्या दोन दशकांनंतर, ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असलेला एक “मोठा लोकसमुदाय” उजेडात आला. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) हे ‘देवाच्या इस्राएलापैकी’ अभिषिक्‍त सदस्य नव्हते, तर ते पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले प्रामाणिक स्त्रीपुरुष होते ज्यांचे यहोवावर प्रेम होते आणि अभिषिक्‍त जनांप्रमाणेच यहोवाची सेवा करण्याची त्यांनाही इच्छा होती. एका अर्थाने, ते ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाला’ असे म्हणत होते, की “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखऱ्‍या ८:२३) नव्यानेच बाप्तिस्मा घेतलेल्या या ख्रिश्‍चनांनीही अभिषिक्‍त परिवाराच्या सदस्यांप्रमाणेच सकस आध्यात्मिक अन्‍न ग्रहण केले आणि तेव्हापासून या दोन समूहांचे सदस्य या आध्यात्मिक मेजावरून अन्‍न ग्रहण करत आले आहेत. ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ सदस्यांकरता केवढा हा मोठा बहुमान!

२०. प्रभूच्या संपत्तीत भर पाडण्यात ‘मोठ्या लोकसमुदायाची’ काय भूमिका राहिली आहे?

२० ‘मोठ्या लोकसमुदायाचे’ सदस्य आनंदाने अभिषिक्‍त दास वर्गासोबत सुवार्तेचे प्रचारक या नात्याने कार्य करतात. त्यांच्या प्रचारामुळे धन्याच्या पृथ्वीवरील संपत्तीत भर पडली आहे आणि यामुळे ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ जबाबदाऱ्‍याही वाढल्या आहेत. सत्य शोधणाऱ्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बायबल साहित्याची वाढती मागणी पूर्ण करण्याकरता विस्तारित मुद्रण केंद्रांची गरज भासू लागली. ही गरज भागवण्याकरता एकापाठोपाठ एक अशा अनेक राष्ट्रांत यहोवाच्या साक्षीदारांची शाखा दफ्तरे स्थापन करण्यात आली. मिशनऱ्‍यांना “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पाठवण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये १:८) १९१४ साली जवळजवळ पाच हजार अभिषिक्‍त जनांपासून, देवाच्या स्तुतीकर्त्यांची संख्या आज साठ लाखांपेक्षा अधिक झाली आहे आणि यांपैकी बहुतेक जण ‘मोठ्या लोकसमुदायापैकी’ आहेत. होय, १९१४ साली राजाचा राज्याभिषेक झाल्यापासून त्याच्या संपत्तीत उत्तरोत्तर वाढच होत गेली आहे!

२१. आपल्या पुढील अभ्यासात कोणते दोन दृष्टान्त विचारात घेतले जातील?

२१ या सर्वांवरून दिसून येते की हा दास ‘विश्‍वासू व बुद्धिमानही’ ठरला आहे. येशूने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी’ सांगितल्यावर लगेच दोन दृष्टान्त सांगितले ज्यांवरून या दोन गुणांवर भर देण्यात आला: शहाण्या व मूर्ख कुमाऱ्‍यांचा दृष्टान्त आणि परदेशी जाताना आपल्या सेवकांना रुपये देऊन जाणाऱ्‍या धन्याचा दृष्टान्त. (मत्तय २५:१-३०) या दृष्टान्तांचा आज आपल्याकरता काय अर्थ असावा बरे? हे जाणून घेण्याकरता आपली उत्सुकता वाढली आहे. याच प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात विचारात घेतले जाईल.

तुम्हाला काय वाटते?

• ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासांत’ कोणाचा समावेश आहे?

• ‘परिवारात’ कोण सामील आहेत?

• विश्‍वासू दासाला प्रभूच्या सर्वस्वावर केव्हा नेमण्यात आले आणि तेव्हा नेमण्यात आले असे आपण का म्हणू शकतो?

• अलीकडील दशकांत प्रभूच्या संपत्तीत भर पाडण्यास कोणी मदत केली आणि कशी?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

पहिल्या शतकातील दास वर्गाने आपल्यावर सोपवलेले कार्य विश्‍वासूपणे पार पाडले