व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एहूद जुलूम करणाऱ्‍याचे जू मोडतो

एहूद जुलूम करणाऱ्‍याचे जू मोडतो

एहूद जुलूम करणाऱ्‍याचे जू मोडतो

ही एक सत्य कथा आहे ज्यात धाडस आणि डावपेच आहे. ही सुमारे ३,००० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शास्त्रवचनातील अहवाल अशाप्रकारे सुरू होतो: “पुन्हा इस्राएल लोक परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले; त्यांनी परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्‍वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्‍याचे इस्राएलावर वर्चस्व स्थापले. तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्‍यांना आपल्याबरोबर घेऊन इस्राएलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले. म्हणून इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्‍याचे अठरा वर्षे दास्य केले.”—शास्ते ३:१२-१४.

मवाब्यांचे क्षेत्र यार्देन नदी आणि मृत समुद्र याच्या पूर्वेस होते. पण त्यांनी नदीच्या पलीकडचे आणि “खजुरीचे नगर” असलेल्या यरिहोच्या आसपासचे क्षेत्रही काबीज केल्यामुळे इस्राएली लोकही त्यांच्या अधिकाराखाली आले. (अनुवाद ३४:३) “फार लठ्ठ” असलेला मवाबी राजा एग्लोन, इस्राएलकडून जवळजवळ दोन दशकांपासून जबरदस्तीने नजराणा घेत होता; इस्राएलांना हा नजराणा पेश करणे एका ओझ्याप्रमाणे व अपमानजनक वाटत होते. (शास्ते ३:१७) परंतु, एग्लोनने नजराणा मागितल्यामुळे इस्राएलांना या जुलूमी राजाचा अंत करायची संधी मिळाली.

अहवाल म्हणतो: “इस्राएल लोकांनी परमेश्‍वराचा धावा केला, तेव्हा परमेश्‍वराने गेराचा मुलगा एहूद ह्‍याला त्यांना सोडविणारा म्हणून उभे केले; तो बन्यामिनी असून डावरा होता, त्याच्या हस्ते इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्‍याला नजराणा पाठविला.” (शास्ते ३:१५) नजराणा द्यायला एहूदची निवड केली जाईल, याची यहोवाने खात्री केली असावी. एहूद पूर्वी अशाप्रकारे नजराणा पेश करायला राजासमोर हजर झाला होता की नाही याविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु, एग्लोन राजाला भेटण्याची एहूदने केलेली तयारी आणि त्याने वापरलेले डावपेच यावरून हे सूचित होते, की त्याला एग्लोनच्या राजमहालाची आणि तेथे तो काय काय अपेक्षा करू शकतो याची माहिती होती. या सर्व बाबतीत, त्याचे डावरे असणे महत्त्वाचे होते.

अपंग की योद्धा?

हिब्रू भाषेत, “डावरा” याचा अर्थ ‘उजव्या हाताची मुठ बंद असलेला, अपंग किंवा हात बांधलेला’ असा होतो. एहूद अधू, उजव्या हाताने अपंग असलेला होता का? बन्यामिनी वंशातल्या “सातशे निवडक” डावऱ्‍या पुरुषांविषयी बायबल काय म्हणते त्याचा विचार करा. शास्ते २०:१६ म्हणते की: “त्यांच्या गोफणीचा नेम तसूभर देखील चुकत नसे.” त्यांच्या प्राविण्यामुळे त्यांना युद्धासाठी निवडले जाण्याची दाट शक्यता आहे. काही बायबल विद्वानांच्या मते “डावरा,” यावरून “आपला उजवा आणि डावा हातही वापरणारी व्यक्‍ती” असे सूचित होते.—शास्ते ३:१५, डुए व्हर्शन.

बन्यामिनी कुळातले बहुतेक पुरुष डावरे असल्याचे प्रसिद्ध होते. १ इतिहास १२:१, २ मध्ये सांगितले आहे, की बन्यामिनी “शूर वीर . . . धनुर्धारी असून उजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारीत असत.” एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे, की हे कौशल्य प्राप्त करण्याकरता, “लहान मुलांचे ‘उजवे हात बांधले’ जात व त्यांना आपल्या डाव्या हाताचा उपयोग करण्याची कला शिकवली जात.” इस्राएलच्या शत्रूंना सहसा उजव्या हाताचा उपयोग करणाऱ्‍या योद्ध्‌यांचा सामना करण्याचे प्रशिक्षण दिले जात. त्यामुळे, त्यांच्यासमोर अचानक एखादा डावरा सैनिक आल्यावर त्यांचे सर्व प्रशिक्षण वाया जायचे.

राजासाठी एक “गुप्त गोष्ट”

एहूदला पहिल्यांदा आपल्यासाठी एक “तरवार” बनवावी लागणार होती; एक अशी तलवार जी लहान आकाराची व दुधारी होती आणि कपड्यांच्या आत लपवता येऊ शकत होती. आपली कदाचित झडती घेतली जाईल अशी त्याने अपेक्षा केली असावी. तलवारी सहसा शरीराच्या डाव्या बाजूला लटकवल्या जात ज्यामुळे उजव्या हाताचा उपयोग करणाऱ्‍यांना ती उपसायला सोपी जात. एहूद डावरा असल्यामुळे त्याने आपली तलवार राजाचे सेवक तपासणार नाहीत अशा ठिकाणी म्हणजे “आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली.” त्यामुळे कसल्याही अडखळणाविना त्याने “मवाबाचा राजा एग्लोन ह्‍याच्यापुढे नजराणा सादर केला.”—शास्ते ३:१६, १७.

एग्लोनच्या राजमहालात सुरवातीपासून काय काय घडले याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले नाही. बायबल फक्‍त इतकेच सांगते, की “नजराणा दिल्यानंतर त्याने नजराणा घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली.” (शास्ते ३:१८) एहूदने नजराणा दिला आणि नजराणा घेऊन आलेल्या लोकांबरोबर तो एग्लोनच्या घरापासून सुरक्षित अंतरापर्यंत चालत गेला आणि त्यांची रवानगी केल्यावर पुन्हा आला. तो पुन्हा का आला? ते लोक त्याला सुरक्षा देण्यासाठी आले होते, केवळ शिष्टाचार म्हणून ते त्याच्यासोबत आले होते, की फक्‍त नजराणा वागवण्यासाठी म्हणून आले होते? आणि आपला डाव साधण्याआधी तो त्यांना सुरक्षितपणे पाठवू इच्छित होता का? यांपैकी काहीही कारण असो, एहूद मात्र धाडसीपणे पुन्हा राजमहालात एकटाच आला.

“गिलगालाजवळील पाषाणमूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, ‘महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे.’” राजा एग्लोनसमोर तो पुन्हा कसा काय येऊ शकला याविषयी शास्त्रवचनांत काही सांगितलेले नाही. रक्षकांना संशय कसा आला नाही? एकटा इस्राएली आपल्या राजाला काय करू शकेल असा त्यांनी विचार केला? एहूदचे एकटे येणे, तो आपल्या देशबांधवांचा विश्‍वासघात करत असल्याची छाप देत होते का? परिस्थिती काहीही असो, एहूदने राजाला एकांतात भेटण्याची परवानगी मागितली आणि ती त्याला मिळाली देखील.—शास्ते ३:१९.

ईश्‍वरप्रेरित अहवाल पुढे म्हणतो: “एहूद त्याच्याजवळ [एग्लोनजवळ] गेला. तो तर आपल्या शीतळ माडीवर एकटा बसला होता आणि एहूद म्हणाला, मला तुझ्याशी देवाचा संदेश बोलायचा आहे.” एहूद देवाकडून आलेल्या संदेशाविषयी बोलत नव्हता. एहूद आपली तलवार वापरण्याचा विचार करीत होता. आपला देव किमोश याच्याकडून काही संदेश असेल असे समजून राजा एग्लोन “आपल्या आसनावरून उठला.” एका झटक्यात एहूदने आपली तलवार उपसली आणि एग्लोनच्या पोटात खुपसली. तलवारीच्या मुठीजवळ आडवी पट्टी नव्हती. त्यामुळे “पात्याबरोबर मूठही आत गेली आणि मांदे पात्यावर . . . लगटले . . . आणि विष्ठा बाहेर आली.” विष्ठा त्याच्या जखमेतून बाहेर पडली असावी किंवा कदाचित नकळत बाहेर पडली असावी.—शास्ते ३:२०-२२, पं.र.भा.

एहूद सहजपणे निसटतो

खुपसलेली तलवार बाहेर काढण्यात वेळ घालवण्याऐवजी एहूद ‘देवडीवर जातो आणि माडीचे दरवाजे लावून कुलूप लावतो. तो निघून गेल्यावर हुजरे येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांना वाटले की तो [एग्लोन] आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.’—शास्ते ३:२३, २४.

एहूद जेथून पळाला ती ‘देवडी’ काय होती? एक संदर्भ ग्रंथ म्हणतो: “या इब्री शब्दाचा नेमका अर्थ अज्ञात आहे, पण ती कदाचित ‘स्तंभावली,’ ‘दिवाणखाना’ असू शकतो, असे सुचवण्यात आले आहे.” एहूदने दाराला आतून कुलूप लावून तो दुसऱ्‍या ठिकाणाहून बाहेर पडला असावा का? किंवा त्याने मेलेल्या राजाकडच्या चावीने बाहेरून दाराला कुलूप लावले? आणि रक्षकांसमोरून तो, जसे काहीच झाले नाही अशा आविर्भावात चालत गेला का? शास्त्रवचने याविषयी काही सांगत नाहीत. एहूदने कोणत्याही पद्धतीचा अवलंब केलेला असला तरी, एग्लोनच्या सेवकांना दाराला कुलूप पाहून लगेचच संशय आला नाही. त्यांना फक्‍त असे वाटले, की राजा “हवेशीर खोलीच्या संडासात गेला” असावा.

राजाचे सेवक फेऱ्‍या मारत होते तेव्हाच एहूदने तेथून पळ काढला. मग त्याने आपल्या देशबांधवांना बोलावून म्हटले: “माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्‍वराने तुमचे मवाबी शत्रु तुमच्या हाती दिले आहेत.” यार्देनच्या उतारावरून आपल्या मायदेशात पळून जाणारे मवाबी लोक ज्यांचा कोणी नेता राहिला नाही त्यांना एहूदच्या लोकांनी रोखून धरले. “त्या समयी [इस्राएली लोकांनी] मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते त्यांच्यातला कोणीहि बचावला नाही. अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्राएलाच्या काबूत आला. ह्‍यानंतर देशाला ऐंशी वर्षे स्वास्थ्य लाभले.”—शास्ते ३:२५-३०.

आपल्यासाठी धडा

एहूदच्या दिवसांत जे घडले त्यावरून आपल्याला हा धडा शिकायला मिळतो, की यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे ते आपण करतो तेव्हा आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. पण, जे पश्‍चात्ताप करून यहोवाकडे वळतात त्यांना तो मदत करतो.

एहूदच्या योजना सफल ठरल्या त्या त्याच्या हुशारपणामुळे किंवा शत्रूच्या अक्षमतेमुळे नव्हे. देवाच्या उद्देशांची पूर्ती मानवी कारणांवर निर्भर नाही. एहूदला सफलता प्राप्त होण्याचे प्रमुख कारण हे होते, की त्याने, देवाच्या लोकांना मुक्‍त करण्याकरता त्याच्या इच्छेच्या एकवाक्यतेत कार्य केले. देवाने एहूदला उभे केले होते आणि “जेव्हा जेव्हा परमेश्‍वर [आपल्या लोकांसाठी] शास्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्‍वर असे.”—शास्ते २:१८; ३:१५.