तुमच्याकरता महत्त्वाचा असलेला एक विधी
तुमच्याकरता महत्त्वाचा असलेला एक विधी
पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने देवाचे गौरव करणाऱ्या एका विधीची सुरवात केली. केवळ हाच एक धार्मिक प्रसंग पाळण्याची थेट आज्ञा त्याने आपल्या अनुयायांना दिली. तो प्रसंग होता, प्रभूचे सांज भोजन. याला शेवटले भोजन असेही म्हणतात.
कल्पना करा की, या प्रसंगाच्या आधीच्या घटनांचे तुम्ही अदृश्य साक्षीदार आहात. येशू आणि त्याचे प्रेषित जेरूसलेममध्ये एका माडीवरील खोलीत यहुदी वल्हांडण साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत. भाजलेले मांस, कडू भाजी, बेखमीर भाकर आणि लाल द्राक्षारस यांचा समावेश असलेले वल्हांडणाचे पारंपरिक भोजन करून झाले आहे. बेईमान प्रेषित यहूदा इस्कार्योत याला बाहेर पाठवण्यात आले आहे आणि लवकरच तो आपल्या धन्याचा विश्वासघात करणार आहे. (मत्तय २६:१७-२५; योहान १३:२१, २६-३०) येशू आपल्या ११ विश्वासू प्रेषितांसोबत एकटा आहे. मत्तय त्यांच्यापैकी एक आहे.
मत्तयाच्या प्रत्यक्ष अहवालानुसार येशूने प्रभूच्या सांज भोजनाची सुरवात अशाप्रकारे केली: “येशूने [बेखमीर] भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे; आणि त्याने [द्राक्षारसाचा] प्याला घेतला व उपकारस्तुति करून तो त्यांस दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.”—मत्तय २६:२६-२८.
येशूने प्रभूच्या सांज भोजनाची सुरवात का केली होती? असे करताना त्याने बेखमीर भाकर आणि लाल द्राक्षारसाचा वापर का केला? ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांनी या बोधचिन्हांचे सेवन करायचे होते का? या भोजनाचा विधी किती वेळा पाळायचा होता? शिवाय तुमच्याकरता खरोखर याचा काही अर्थ आहे का?