व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर”

“तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर”

“तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर”

“तुझी सेवा पूर्णपणे कर.”—२ तीमथ्य ४:५, बाइंग्टन भाषांतर.

१, २. सर्वच ख्रिस्ती, सुवार्तिक असले तरीसुद्धा शास्त्रवचनांनुसार वडिलांकडून कोणती अपेक्षा केली जाते?

तुम्ही एक राज्य प्रचारक आहात का? जर असाल, तर या अद्‌भुत बहुमानाबद्दल यहोवा देवाचे आभार माना. तुम्ही मंडळीत एक वडील आहात का? हा यहोवाकडून मिळणारा आणखी एक बहुमान आहे. पण आपण कधीही हे विसरता कामा नये की आपण आपल्या शैक्षणिक पात्रतेमुळे किंवा उत्तम वक्‍तृत्वामुळे सेवाकार्याकरता किंवा मंडळीत पर्यवेक्षकाच्या जबाबदारीकरता योग्य ठरत नाही. सेवाकार्याकरता आपल्याला यहोवा योग्य ठरवतो आणि आपल्यातील काही पुरुष शास्त्रवचनातील अपेक्षा पूर्ण करतात त्यामुळे त्यांना पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचा बहुमान मिळतो.—२ करिंथकर ३:५, ६; १ तीमथ्य ३:१-७.

सुवार्तिकांचे कार्य तर सर्वच समर्पित ख्रिस्ती करतात, पण खासकरून पर्यवेक्षकांनी किंवा वडिलांनी सेवाकार्यात उत्तम आदर्श मांडण्याची गरज आहे. जे वडील “उपदेश व शिक्षण ह्‍या बाबतीत श्रम घेतात” त्यांची देव व ख्रिस्त तर कदर करतातच पण त्यांचे सहसाक्षीदार देखील करतात. (१ तीमथ्य ५:१७; इफिसकर ५:२३; इब्री लोकांस ६:१०-१२) सर्व परिस्थितींत एका वडिलाचे शिक्षण आध्यात्मिकरित्या आरोग्यकारक असले पाहिजे कारण प्रेषित पौलाने पर्यवेक्षक असणाऱ्‍या तीमथ्याला असे सांगितले: “ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.”—२ तीमथ्य ४:३-५.

३. खोट्या शिकवणुकींमुळे मंडळीची आध्यात्मिकता धोक्यात येऊ नये म्हणून काय करणे गरजेचे आहे?

मंडळीची आध्यात्मिकता कोणत्याही खोट्या शिकवणुकींमुळे धोक्यात येणार नाही याची खात्री करण्यासाठी एका पर्यवेक्षकाने पौलाच्या या मार्गदर्शनाच्या एकवाक्यतेत वागावे: “सर्व बाबतीत सावध राहा . . . तुझी सेवा पूर्णपणे कर.” (२ तीमथ्य ४:५, बाइंग्टन) होय, वडिलाने ‘आपली सेवा पूर्णपणे केली पाहिजे.’ त्याने ती पूर्णार्थाने पार पाडली पाहिजे. आपली सेवा पूर्ण करणारा वडील आपल्या सर्व जबाबदाऱ्‍यांकडे लक्ष देतो; कोणतीही जबाबदारी तो अर्धवट राहू देत नाही. असा मनुष्य अगदी क्षुल्लक गोष्टींच्या बाबतीतही विश्‍वासू असतो.—लूक १२:४८; १६:१०.

४. कोणती गोष्ट आपल्याला आपली सेवा पूर्ण करण्यास सहायक ठरू शकते?

आपली सेवा पूर्ण करण्याकरता गरज आहे ती जास्त वेळेची नव्हे, तर, आहे त्या वेळेचा सदुपयोग करण्याची. नेमस्तपणा सर्वच ख्रिश्‍चनांना सेवेचे निरनिराळे पैलू पार पाडण्यास सहायक ठरू शकतो. क्षेत्र सेवेत अधिक वेळ खर्च करण्याच्या उद्देशाने, आपल्या वेळापत्रकात योग्य संतुलन ठेवण्याकरता व निरनिराळी कामे कोणाकोणावर व कशी सोपवायची हे समजण्याकरता एका वडिलाने उत्तम वैयक्‍तिक समायोजन केले पाहिजे. (इब्री लोकांस १३:१७) अर्थात, इतरांवर कामे सोपवली तरीसुद्धा, आदरास पात्र असणारे वडील स्वतःची वैयक्‍तिक जबाबदारी विसरत नाहीत; ते नहेम्याच्या उदाहरणाचे अनुकरण करतात ज्याने जेरूसलेमच्या भिंती बांधण्यात स्वतः सहभाग घेतला. (नहेम्या ५:१६) आणि यहोवाच्या सर्वच सेवकांनी राज्य प्रचाराच्या कार्यात नियमित सहभाग घेतला पाहिजे.—१ करिंथकर ९:१६-१८.

५. सेवाकार्याबद्दल आपला दृष्टिकोन कसा असावा?

स्वर्गात स्थापित झालेल्या राज्याचे उद्‌घोषक या नात्याने आपल्यावर सोपवण्यात आलेले काम किती आनंददायक आहे! अंत येण्याआधी सबंध पृथ्वीवर सुवार्तेची घोषणा करण्याच्या कार्यात सहभाग घेण्याचा जो विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे तो निश्‍चितच आपल्याला अत्यंत मोलाचा वाटतो. (मत्तय २४:१४) आपण अपरिपूर्ण असलो तरीही पौलाचे पुढील शब्द आपल्याला दिलासा देतात: “ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे.” (२ करिंथकर ४:७) होय, देवाला स्वीकार्य ठरेल अशी सेवा आपण जरूर सादर करू शकतो, पण केवळ त्याच्याकडून मिळणाऱ्‍या सामर्थ्याने व बुद्धीने.—१ करिंथकर १:२६-३१.

देवाचे गौरव प्रकट करणे

६. स्वाभाविक इस्राएल व आत्मिक इस्राएल यांच्यात कोणती विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली?

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या संदर्भात पौल म्हणतो की देवाने “आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले.” येशू ख्रिस्ताद्वारे आत्मिक इस्राएलशी केलेल्या नव्या कराराची तुलना, प्रेषित पौल, मोशेद्वारे नैसर्गिक इस्राएलशी करण्यात आलेल्या जुन्या नियमशास्त्राच्या कराराशी करतो. तो पुढे म्हणतो की जेव्हा मोशे दहा आज्ञा असलेल्या दगडाच्या पाट्या घेऊन सिनाय पर्वतावरून खाली आला, तेव्हा त्याचा चेहरा इतका तेजस्वी होता की इस्राएल लोकांना त्याच्याकडे एकटक पाहवेना. कालांतराने मात्र यापेक्षाही अधिक गंभीर अशी समस्या निर्माण झाली कारण ‘त्यांची मने मंद झाली’ आणि त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन आले. पण एक व्यक्‍ती जेव्हा यहोवाकडे वळते व मनापासून त्याची भक्‍ती करते तेव्हा हे आच्छादन काढून टाकले जाते. म्हणूनच पौल नव्या कराराच्या सदस्यांवर सोपवण्यात आलेल्या सेवेच्या संदर्भात पुढे असे म्हणतो: “आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशांप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो.” (२ करिंथकर ३:६-८, १४-१८; निर्गम ३४:२९-३५) आज येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ देखील यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.—योहान १०:१६.

७. मानव देवाचे गौरव कसे प्रतिबिंबित करू शकतात?

देवाचे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही; मग पापी मनुष्य देवाचे गौरव कसे प्रतिबिंबित करू शकतात? (निर्गम ३३:२०) यासाठी प्रथम हे समजून घेणे आवश्‍यक आहे की यहोवा स्वतः एक तेजस्वी व्यक्‍ती असण्यासोबतच, आपल्या राज्याद्वारे आपल्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याचा त्याचा उद्देश देखील अत्यंत वैभवशाली आहे. म्हणूनच सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टला पवित्र आत्मा मिळालेल्यांनी जी “देवाची महत्कृत्ये” घोषित केली त्यांत राज्यासंबंधीच्या सत्यांचा समावेश होता. (प्रेषितांची कृत्ये २:११) आत्म्याच्या मार्गदर्शनाने, ते आपल्यावर सोपवण्यात आलेली सेवा पूर्ण करण्यास समर्थ झाले.—प्रेषितांची कृत्ये १:८.

८. सेवाकार्यासंबंधी पौलाचा काय निश्‍चय होता?

पौल कोणत्याही गोष्टीला आपली सेवा पूर्ण करण्याच्या आड येऊ देण्यास तयार नव्हता. त्याने लिहिले: “आम्हावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही; आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही; तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्‌द्विवेकाला आपणास पटवितो.” (२ करिंथकर ४:१, २) पौलाने म्हटलेल्या ‘या सेवेमुळेच’ सत्य प्रकट होते व आत्मिक प्रकाश सर्वत्र पसरवला जातो.

९, १०. यहोवाचे गौरव प्रतिबिंबित करणे कसे शक्य आहे?

शारीरिक व आत्मिक प्रकाशाच्या उगमासंबंधी पौल लिहितो: ‘अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे देव बोलला; तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.’ (२ करिंथकर ४:६; उत्पत्ति १:२-५) आपल्याला देवाचे सेवक होण्याचा अमूल्य विशेषाधिकार देण्यात आला असल्यामुळे आपण स्वतःला शुद्ध ठेवू या जेणेकरून आपल्याला आरशाप्रमाणे यहोवाचे गौरव प्रतिबिंबित करता येईल.

१० आध्यात्मिकरित्या अंधारात असणाऱ्‍या व्यक्‍ती यहोवाचे गौरव, किंवा थोर मोशे अर्थात येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याच्या गौरवाचे प्रतिबिंब पाहू शकत नाहीत. पण यहोवाचे सेवक या नात्याने आपण शास्त्रवचनांतून तो वैभवी प्रकाश ग्रहण करतो आणि तो इतरांवर प्रतिबिंबित करतो. सध्या आध्यात्मिक अंधारात असणाऱ्‍यांना नाशातून बचावयाचे असल्यास त्यांना देवाकडील प्रकाशाची गरज आहे. म्हणूनच आपण अत्यंत आनंदाने व आवेशाने, अंधारातून प्रकाश चमकू देण्याची व अशारितीने यहोवाचे गौरव करण्याची आज्ञा पाळतो.

गृह बायबल अभ्यासांतून प्रकाश चमकवणे

११. आपला प्रकाश चमकू देण्याविषयी येशूने काय म्हटले आणि आपल्या सेवाकार्यात असे करण्याचा एक मार्ग कोणता आहे?

११ येशूने आपल्या अनुयायांना सांगितले: “तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो; त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१४-१६) आपल्या उत्तम आचरणामुळे देवाचे गौरव करण्याची इतरांना प्रेरणा मिळू शकते. (१ पेत्र २:१२) आणि आपल्या सुवार्तिक कार्याच्या विविध प्रकारांत सहभागी होतानाही आपल्याला आपला प्रकाश चमकू देण्याच्या अनेक संधी मिळतात. आपले एक मुख्य ध्येय म्हणजे परिणामकारक गृह बायबल अभ्यास संचालित करण्याद्वारे देवाच्या वचनातील आत्मिक प्रकाश प्रतिबिंबित करणे. हा आपली सेवा पूर्णपणे करण्याचा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. सत्याच्या शोधात असणाऱ्‍यांच्या अंतःकरणापर्यंत पोचता येईल अशाप्रकारे बायबल अभ्यास संचालित करण्याकरता कोणत्या सूचना कामी पडू शकतात?

१२. गृह बायबल अभ्यास चालवण्याच्या कार्याशी प्रार्थनेचा कशाप्रकारे संबंध आहे?

१२ यासंबंधात यहोवाला प्रार्थना केल्याने आपल्याला बायबल अभ्यास चालवण्याची खरोखरच मनापासून इच्छा आहे हे दिसून येते. इतरांना देवाचे ज्ञान घेण्यास मदत करणे किती महत्त्वाचे आहे याची आपल्याला जाणीव असल्याचेही यावरून दिसून येते. (यहेज्केल ३३:७-९) यहोवा अवश्‍य आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल आणि सेवाकार्यातील आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देईल. (१ योहान ५:१४, १५) पण ज्याच्यासोबत गृह बायबल अभ्यास घेता येईल अशी एक व्यक्‍ती सापडावी इतक्यासाठीच आपण प्रार्थना करत नाही. तर अभ्यास सुरू केल्यानंतर त्या बायबल विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजांसंबंधी प्रार्थना व मनन केल्याने आपल्याला प्रत्येक वेळी अभ्यास परिणामकारक पद्धतीने चालवता येईल.—रोमकर १२:१२.

१३. परिणामकारक गृह बायबल अभ्यास चालवण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१३ परिणामकारक बायबल अभ्यास चालवण्याकरता आपण प्रत्येक वेळी अभ्यासाला जाण्याआधी चांगली तयारी केली पाहिजे. जर आपल्याजवळ अभ्यास चालवण्याचे कौशल्य नाही असे वाटत असेल तर मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक दर आठवड्याचा भाग कशाप्रकारे हाताळतात याचे निरीक्षण केल्यास आपल्याला बरेच साहाय्य मिळेल. कधीकधी आपण अशा राज्य प्रचारकांसोबत सेवेला जाऊ शकतो ज्यांना गृह बायबल अभ्यास चालवण्यात उत्तम परिणाम मिळाले आहेत. अर्थात, येशू ख्रिस्ताच्या मनोवृत्तीवर व शिकवण्याच्या पद्धतींवर आपण सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे.

१४. आपण एका बायबल विद्यार्थ्याच्या मनापर्यंत कसे पोचू शकतो?

१४ आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास व देवाबद्दल इतरांशी बोलण्यास येशूला आनंद वाटे. (स्तोत्र ४०:८) तो सौम्य होता आणि त्याचे ऐकणाऱ्‍यांच्या अंतःकरणाचा तो ठाव घेई. (मत्तय ११:२८-३०) तेव्हा आपण देखील आपल्या बायबल विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू या. असे करण्यासाठी आपण प्रत्येक अभ्यासाकरता त्या विद्यार्थ्याच्या खास परिस्थितीची आठवण ठेवून तयारी केली पाहिजे. उदाहरणार्थ, विशिष्ट संस्कृतीचा असल्यामुळे जर त्याला बायबलविषयी फारसे ज्ञान नसेल तर आपल्याला आधी त्याला याची खात्री पटवून द्यावी लागेल की बायबल हे विश्‍वासार्ह आहे. अर्थातच यासाठी आपल्याला त्याच्यासोबत अनेक शास्त्रवचने वाचून त्यांचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.

विद्यार्थ्यांना दृष्टान्त समजून घेण्यास मदत करा

१५, १६. (अ) बायबलमधील एखादा दृष्टान्त विद्यार्थ्याला न समजल्यास आपण त्याला कशी मदत करू शकतो? (ब) आपल्या एखाद्या प्रकाशनात वापरलेले उदाहरण जर बायबल विद्यार्थ्याला समजायला कठीण वाटत असेल तर आपण काय करू शकतो?

१५ शास्त्रवचनांतील विशिष्ट दृष्टान्त कदाचित एखाद्या बायबल विद्यार्थ्याच्या परिचयाचा नसेल. उदाहरणार्थ, येशूने एक दिवा दिवठणीवर ठेवण्याविषयी सांगितले तेव्हा त्याचा काय अर्थ होता हे कदाचित त्याला समजणार नाही. (मार्क ४:२१, २२) येशू प्राचीन काळच्या तेलाच्या व वातीच्या दिव्यासंबंधी बोलत होता. हा दिवा एका खास दिवठवणीवर ठेवला जात असे, ज्यामुळे घरात प्रकाश पडेल. येशूच्या या उदाहरणाचा अर्थ स्पष्टपणे समजण्याकरता कदाचित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) यासारख्या एखाद्या प्रकाशनात “दिवा” व “दिवठण” या विषयांवर संशोधन करण्याची गरज पडेल. * पण अशाप्रकारे संशोधन करून आपण बायबल विद्यार्थ्याकडे त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर घेऊन जातो आणि त्याला ते समजते तेव्हा आपल्याला किती समाधान मिळते!

१६ एखाद्या बायबल अभ्यासाच्या प्रकाशनात कदाचित एखादे असे उदाहरण वापरलेले असेल जे विशिष्ट विद्यार्थ्याला समजायला कठीण वाटत असेल. अशा वेळी ते समजावून सांगण्याकरता पुरेसा वेळ द्या किंवा तोच मुद्दा स्पष्ट करणारे दुसरे एखादे उदाहरण वापरा. कदाचित एखाद्या प्रकाशनात, यशस्वी विवाहाकरता एक सुयोग्य जोडीदार व परस्पर योगदान आवश्‍यक आहे या मुद्द्‌यावर जोर दिला असेल. हे स्पष्ट करण्यासाठी टांगलेल्या झोक्यांवर कसरत करणाऱ्‍या कलाकारांचे उदाहरण दिले असेल. एकजण काठी धरून हवेत झुलतो आणि त्याने काठी सोडताच दुसरा कलाकार त्याचे हात धरतो. याऐवजी, चांगल्या जोडीदाराची आणि एकजूट प्रयत्नांची गरज स्पष्ट करण्यासाठी एखाद्या बोटीवरून सामान उतरवताना मजूर कशाप्रकारे पेट्या एकमेकांच्या हातात देतात व परस्पर मदतीने कार्य करतात हे उदाहरण देता येईल.

१७. येशूपासून आपण उदाहरणांच्या बाबतीत काय शिकू शकतो?

१७ दुसरे उदाहरण देण्याकरता कदाचित तुम्हाला आधीपासून तयारी करावी लागेल. पण आपल्या बायबल विद्यार्थ्याबद्दल आपल्याला वाटणारी वैयक्‍तिक आस्था व्यक्‍त करण्याचा हा एक मार्ग आहे. येशूने कठीण विषय स्पष्ट करण्याकरता अगदी साधी उदाहरणे वापरली. याची उदाहरणे त्याच्या डोंगरावरील प्रवचनात सापडतात आणि बायबलमध्ये दाखवले आहे की त्याच्या शिकवणुकींचा त्याचे ऐकणाऱ्‍यांवर कशाप्रकारे उत्तम परिणाम झाला. (मत्तय ५:१–७:२९) येशू धीराने उदाहरणांचे स्पष्टीकरण देत असे कारण त्याला इतरांबद्दल मनस्वी आस्था होती.—मत्तय १६:५-१२.

१८. आपल्या प्रकाशनांत उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांसंबंधी कोणता सल्ला देण्यात आला आहे?

१८ इतरांबद्दल वाटणारी आस्था आपल्याला ‘शास्त्रवचनावरून वादविवाद’ करण्यास प्रेरित करेल. (प्रेषितांची कृत्ये १७:२, ३) यासाठी प्रार्थनापूर्वक अभ्यास आणि ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याकडून’ मिळणाऱ्‍या प्रकाशनांचा विचारपूर्वक उपयोग करण्याची गरज आहे. (लूक १२:४२-४४) उदाहरणार्थ, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकात अनेक शास्त्रवचने उद्धृत केलेली आहेत. * पुरेशी जागा नसल्यामुळे काहींचा केवळ उल्लेख केला आहे. बायबल अभ्यासादरम्यान, या उल्लेखलेल्या शास्त्रवचनांपैकी निदान काही वचने वाचून त्यांचा खुलासा करणे महत्त्वाचे आहे. काही झाले तरी, आपले शिक्षण हे देवाच्या वचनावर आधारित आहे आणि त्याच्या वचनात विलक्षण ताकद आहे. (इब्री लोकांस ४:१२) परिच्छेदात सापडणाऱ्‍या शास्त्रवचनांचा वारंवार वापर करण्याद्वारे प्रत्येक अभ्यासादरम्यान सुरवातीपासून शेवटपर्यंत बायबलचा संदर्भ घ्या. विशिष्ट विषयावर किंवा विशिष्टप्रकारे वागण्यासंबंधी बायबल काय म्हणते हे विद्यार्थ्याला समजून घेण्यास मदत करा. देवाचे आज्ञापालन करणे त्याच्या हिताचे का आहे हे त्याला समजवण्याचा प्रयत्न करा.—यशया ४८:१७, १८.

विचार करायला भाग पाडणारे प्रश्‍न

१९, २०. (अ) गृह बायबल अभ्यास चालवताना दृष्टिकोनात्मक प्रश्‍न का विचारावेत? (ब) विशिष्ट विषयावर अधिक सविस्तर चर्चा करणे आवश्‍यक असल्यास काय करता येईल?

१९ येशूने प्रश्‍नांचा कौशल्यपूर्ण वापर करून लोकांना तर्कशुद्ध विचार करण्यास मदत केली. (मत्तय १७:२४-२७) बायबल विद्यार्थ्याला लाजिरवाणे वाटणार नाही याची काळजी घेऊन जर आपण विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारले तर त्याच्या उत्तरांवरून एखाद्या विशिष्ट विषयावर तो कसा विचार करतो हे आपल्याला कळून येईल. कदाचित आपल्याला कळून येईल की अद्यापही त्याच्यावर गैरशास्त्रीय विचारसरणीचा पगडा आहे. उदाहरणार्थ, त्याचा त्रैक्यावर विश्‍वास असेल. ज्ञान पुस्तकाच्या ३ ऱ्‍या अध्यायात स्पष्ट केल्याप्रमाणे “त्रैक्य” हा शब्द बायबलमध्ये आढळत नाही. पुस्तकात अनेक शास्त्रवचने उद्धृत केली आहेत व काहींचा उल्लेख केला आहे व त्यांद्वारे दाखवण्यात आले आहे की यहोवा येशूपासून वेगळा असून पवित्र आत्मा एक व्यक्‍ती नव्हे तर देवाची कार्यकारी शक्‍ती आहे. कदाचित ही बायबल वचने वाचून त्यांवर चर्चा करणे पुरेसे ठरेल. पण अधिक स्पष्टीकरणाची आवश्‍यकता असल्यास काय करता येईल? कदाचित पुढच्या अभ्यासाच्या दिवशी, अभ्यास झाल्यानंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या दुसऱ्‍या प्रकाशनातून, उदाहरणार्थ तुम्ही त्रैक्य मानावे का? या माहितीपत्रकातून, या विषयावर बोधकारक चर्चा करण्यासाठी काही वेळ देता येईल. यानंतर आपण ज्ञान पुस्तकातून पुढील अभ्यास सुरू करू शकतो.

२० एखाद्या विषयावर विद्यार्थ्याला दृष्टिकोनात्मक प्रश्‍न विचारला असता, त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला आश्‍चर्य अथवा निराशा होण्याची शक्यता आहे. जर धूम्रपानाविषयी अथवा इतर संवेदनशील प्रश्‍नाविषयी हे उत्तर असल्यास आपण अभ्यास मध्ये न थांबवता या विषयावर नंतर चर्चा करण्याविषयी सुचवू शकतो. विद्यार्थी अद्यापही धूम्रपान करत आहे हे समजल्यामुळे आपल्याला या विषयावर एखाद्या प्रकाशनातून अशी माहिती शोधणे शक्य होईल जिच्यामुळे त्याला आध्यात्मिक प्रगती करता येईल. विद्यार्थ्याच्या अंतःकरणाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो की त्याने या विद्यार्थ्याला आध्यात्मिकरित्या उन्‍नती करण्यास साहाय्य करावे.

२१. आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धती बायबल विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजांनुरूप जुळवून घेतल्यास काय होईल?

२१ उत्तम तयारी आणि जोडीला यहोवाची मदत मिळाल्यामुळे निश्‍चितच आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धती बायबल विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजांनुरूप जुळवून घेण्यात यशस्वी होऊ. हळूहळू, आपण त्याला देवाबद्दल मनस्वी प्रेम उत्पन्‍न करण्यास मदत करू शकू. इतकेच नव्हे तर यहोवाच्या संघटनेबद्दलही आदर व कृतज्ञता विकसित करण्यात आपण सफल होऊ. जेव्हा बायबल विद्यार्थी ‘तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे कबूल करतात तेव्हा किती कृतार्थ वाटते! (१ करिंथकर १४:२४, २५) तेव्हा आपण परिणामकारक बायबल अभ्यास चालवूया आणि इतरांना येशूचे शिष्य बनण्याकरता जे काही करता येईल ते करूया.

जतन करण्याजोगी संपत्ती

२२, २३. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी कशाची गरज आहे?

२२ आपली सेवा पूर्ण करण्याकरता आपण देवाकडून मिळणाऱ्‍या सामर्थ्यावर अवलंबून राहिले पाहिजे. सेवेच्या संदर्भात पौलाने अभिषिक्‍त सहबांधवांना असे लिहिले: “ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.”—२ करिंथकर ४:७.

२३ आपण अभिषिक्‍तांपैकी असोत किंवा ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असोत आपण नाजूक मातीच्या भांड्यांप्रमाणे आहोत. (योहान १०:१६) तरीपण, आपल्याला नेमलेले काम पूर्ण करण्याकरता व आपल्याविरुद्ध आणल्या जाणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या दबावाला तोंड देण्याकरता लागणारी ताकद देण्यास यहोवा समर्थ आहे. (योहान १६:१३; फिलिप्पैकर ४:१३) तेव्हा आपण पूर्ण मनाने यहोवावर भरोसा ठेवू, आपल्या सेवेच्या संपत्तीचे जतन करू आणि आपली सेवा पूर्ण करू.

[तळटीपा]

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

^ परि. 18 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपली सेवा पूर्ण करण्याकरता वडील काय करू शकतात?

• आपल्या गृह बायबल अभ्यासांची परिणामकारकता वाढवण्याकरता आपण काय करू शकतो?

• बायबल विद्यार्थ्याला एखादा दृष्टान्त समजला नाही, किंवा एखाद्या विषयावर त्याला अधिक माहितीची गरज असल्यास तुम्ही काय कराल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती वडील मंडळीत शिकवतात आणि सहविश्‍वासू बांधवांना सेवेकरता प्रशिक्षित करतात

[१८ पानांवरील चित्र]

परिणामकारक गृह बायबल अभ्यास चालवणे हा आपला प्रकाश चमकवण्याचा एक मार्ग आहे