व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वेस्टफेलियातील शांती तह युरोपमधील कलाटणी देणारा काळ

वेस्टफेलियातील शांती तह युरोपमधील कलाटणी देणारा काळ

वेस्टफेलियातील शांती तह युरोपमधील कलाटणी देणारा काळ

“युरोपच्या विविध राज्यातील अधिकाऱ्‍यांचे, आज जसे एकत्र जमले आहेत तसे एकत्र जमणे, खरोखरच एक दुर्मिळ प्रसंग आहे.” असे, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे भूतपूर्व अध्यक्ष, रोमन हर्टसोक ऑक्टोबर १९९८ मध्ये म्हणाले. अधिकारी म्हणताना ते, चार राजे, चार राण्या, दोन युवराज, एक ग्रॅण्ड ड्यूक आणि अनेक अध्यक्ष यांना उद्देशून बोलत होते. काऊन्सल ऑफ युरोपने आयोजित केलेला हा कार्यक्रम, जर्मनीच्या आधुनिक स्थितीच्या ५० वर्षांच्या इतिहासातला अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम होता. कोणता कार्यक्रम?

सन १९९८ च्या ऑक्टोबरमध्ये, वेस्टफेलियाच्या शांती तहाला ३५० वर्ष पूर्ण झाली. शांतीसाठी केलेले तह सहसा महत्त्वाचे असतात कारण तेव्हाच इतिहासावर उल्लेखनीयरीत्या प्रभाव पाडणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात आणि या बाबतीत वेस्टफेलियाचा तह खरोखरच खास होता. १६४८ मध्ये झालेल्या या तहात तीस वर्षांचे युद्ध समाप्त झाले आणि तेव्हाच सार्वभौम राज्यांचा प्रदेश म्हणून आधुनिक युरोपचा जन्म झाला.

स्थिरावलेल्या जुन्या व्यवस्थीकरणाला हादरा बसतो

मध्य युगांदरम्यान, रोमन कॅथलिक चर्च आणि पवित्र रोमन साम्राज्य ही युरोपातील सर्वात शक्‍तिशाली संस्थाने होती. या साम्राज्यात, विविध आकाराचे शेकडो भूखंड होते. साम्राज्याच्या सीमा, आताचे ऑस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, पूर्व फ्रान्स, जर्मनी, स्वीत्झरलंड, लो कंट्रीज म्हटलेले देश आणि इटलीचे काही भाग एथपर्यंत होत्या. साम्राज्याचा बहुतेक भूखंड जर्मन असल्यामुळे त्याला जर्मन राष्ट्राचे पवित्र रोमन साम्राज्य असे नाव पडले. प्रत्येक भूखंडावर एक राजपुत्र अर्धस्वयंशासन करीत. खुद्द सम्राट हा रोमन कॅथलिक व ऑस्ट्रियन हॅब्सबर्ग कुटुंबाचा होता. त्यामुळे पाळकवर्ग आणि सम्राट दोघांची सत्ता असल्यामुळे युरोपवर रोमन कॅथलिकांचे वर्चस्व होते.

परंतु, १६ व्या आणि १७ व्या शतकात या स्थिरावलेल्या व्यवस्थीकरणाला हादरा बसला. संपूर्ण युरोपभर रोमन कॅथलिक चर्चच्या बेलगाम वागणुकीवर नाराजी पसरली. मार्टीन ल्यूथर आणि जॉन कॅल्व्हिनसारख्या धर्मसुधारकांनी, बायबल तत्त्वांकडे लोकांनी वळाले पाहिजे असे म्हटले. ल्यूथर आणि कॅल्व्हिन यांना भरपूर साथ मिळाली आणि याच चळवळीतून धर्मसुधारणा आणि प्रॉटेस्टंट धर्माचा विस्तार झाला. धर्मसुधारणेमुळे साम्राज्याचे तीन पंथ झाले—कॅथलिक, ल्यूथरन आणि कॅल्व्हिनीस्ट.

कॅथलिकांनी प्रॉटेस्टंट लोकांवर अविश्‍वास दाखवला आणि प्रॉटेस्टंट लोकांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कॅथलिकांना तुच्छ लेखले. अशा वातावरणामुळे, १७ व्या शतकाच्या सुरवातीला प्रॉटेस्टंट युनियन आणि कॅथलिक लीग तयार झाली. साम्राज्यातील काही राजपुत्र युनियनला जाऊन मिळाले तर काही लीगला जाऊन मिळाले. युरोपमध्ये—आणि खासकरून साम्राज्यात—शंकेचे वातावरण खदखदत होते; युद्धाचा उद्रेक व्हायला एकच ठिणगी हवी होती. ठिणगी पडली तेव्हा युद्धाला सुरवात झाली आणि हे युद्ध पुढील ३० वर्षे चालू राहिले.

युरोपला आग लावणारी प्राणघातक ठिणगी

प्रॉटेस्टंट शासकांनी, उपासनेचे आणखी स्वातंत्र्य द्यावे म्हणून कॅथलिक हॅब्सबर्ग कुटुंबावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नाराजीनेच सूट दिली आणि सन १६१७-१८ मध्ये बोहेमियातील (चेक प्रजासत्ताक) दोन ल्यूथर चर्चेस जबरदस्तीने बंद पाडण्यात आली. यामुळे प्रॉटेस्टंट शिष्टजनांची मने दुखावली; ते प्रागमधील एका राजमहाल शिरले आणि त्यांनी तीन कॅथलिक अधिकाऱ्‍यांना धरून वरच्या खिडकीतून खाली फेकून दिले. हे कृत्य युरोपला आग लावणारी ठिणगी ठरले.

हे सर्व शांतीचा राजकुमार, येशू ख्रिस्त याचे अनुयायी असल्याचा दावा करत होते; पण आता, विरुद्ध पक्षांच्या धर्मातील सदस्य एकमेकांच्या जीवावर उठले होते. (यशया ९:६) व्हाईट मौंटनच्या युद्धात, कॅथलिक लीगने प्रॉटेस्टंट युनियनचा पराभव केल्यामुळे प्रॉटेस्टंट युनियनमध्ये फूट निर्माण झाली. प्रॉटेस्टंट शिष्टजनांना प्रागच्या भर बाजारात फाशी देण्यात आली. संपूर्ण बोहेमियात, आपल्या विश्‍वासाचा त्याग न करणाऱ्‍या प्रॉटेस्टंटांची मालमत्ता जप्त करून कॅथलिकांमध्ये आपापसात वाटली जाऊ लागली. १६४८—क्रेक उन्ट फ्रीडन इन ओईरोपा (१६४८—युरोपमधील युद्ध आणि शांती) नावाच्या पुस्तकात, या जप्तीचे वर्णन “मध्य युरोपमध्ये मालकी हक्कात कधी झाला नाही असा महान बदल,” असे करण्यात आले.

बोहेमियात धार्मिक युद्ध म्हणून ज्याची सुरवात झाली त्याची परिणती आंतरराष्ट्रीय प्रदेशव्याप्तीत झाली. पुढील ३० वर्षांसाठी डेन्मार्क, फ्रान्स, नेदरलँड्‌स, स्पेन आणि स्वीडन या राष्ट्रांनाही या युद्धात खेचण्यात आले. लोभ आणि सत्ताप्राप्तीसाठी हपापलेल्या कॅथलिक व प्रॉटेस्टंट शासकांनी, राजकीय श्रेष्ठत्व आणि व्यापारी लाभ मिळवण्यासाठी खूप धडपड केली. तीस वर्षांच्या युद्धाचे चार कालखंड पडतात; प्रत्येक कालखंडाला सम्राटाच्या मुख्य शत्रूचे नाव देण्यात आले आहे. पुष्कळ संदर्भग्रंथ, या युद्धाचे चार कालखंड आहेत असे सांगतात: बोहेमियन आणि पॅलेटाईन युद्ध, डॅनिश-लोव्हर सॅक्सनी युद्ध, स्वीडीश युद्ध आणि फ्रेन्च-स्वीडीश युद्ध. बहुतेक युद्धे पवित्र रोमन साम्राज्याच्या क्षेत्रातच झाली.

त्या काळी, पिस्तुले, बंदुका, लहान आणि मोठे तोफ या शस्त्रांचा उपयोग करण्यात आला आणि स्वीडनने मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा पुरवठा केला. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट एकमेकांशी युद्ध करण्यात गुंतले होते. युद्धातील सैनिक, एकतर “सांता मरिया” किंवा “देव आमच्याबरोबर आहे,” असे नारे लावत होते. सैन्यदल जर्मन वस्त्यांमधून लूटमार करीत गेले, त्यांनी शत्रूंना व नागरिकांना पशूंप्रमाणे वागवले. हे युद्ध सर्वात क्रूर होते. हे बायबलमधील भविष्यवाणीच्या किती उलट होते: “एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—मीखा ४:३.

जर्मनांची एक पिढी युद्धाच्या वातावरणात लहानाची मोठी झाली; युद्धाला कंटाळलेल्या पिढीला शांती केव्हा येते असे झाले होते. शासकांचा राजकीय सत्ता मिळवण्याचा हेतू नसता तर शांती केव्हाच आली असती. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमध्ये सुरू झालेल्या धार्मिक युद्धाला नंतर राजकीय स्वरूप आले. उपरोधिकपणे, हा बदल ज्याने घडवून आणला तो मनुष्य कॅथलिक चर्चचा उच्च अधिकारी होता.

कार्दीनाल रीशल्य आपला अधिकार दाखवतो

अर्मान-झान ड्यू प्लिसीसची अधिकृत पदवी कार्दीनाल डी रीशल्य ही होती. ते १६२४ ते १६४२ पर्यंत फ्रान्सचे मुख्यमंत्री देखील होते. फ्रान्सला युरोपमधील प्रमुख सत्ता बनवण्याचा रीशल्य यांचा हेतू होता. त्यासाठी त्यांनी आपल्या सहकॅथलिकांची अर्थात हॅब्सबर्ग्सची सत्ता नाहीशी करण्याचा प्रयत्न केला. कसा? हॅब्सबर्ग्सविरुद्ध लढणाऱ्‍या जर्मन इस्टेटींच्या प्रॉटेस्टंट सैन्याला, नेदरलँड्‌सला आणि स्वीडनला आर्थिक मदत देण्याद्वारे.

१६३५ मध्ये रीशल्यने पहिल्यांदा या युद्धात फ्रेन्च सैन्यदल पाठवले. वीवाट पाक्स—एस लेब डे फ्रीड! (शांतीचा जय असो!) नावाच्या पुस्तकात म्हटले आहे, की “तीस वर्षांचे युद्ध शेवटल्या टप्प्यांत, धार्मिक पार्टींमधील संघर्ष राहिले नाही. . . . युरोपमध्ये राजकीय सत्ता मिळवणे हा या युद्धाचा उद्देश ठरला.” कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यामध्ये सुरू झालेले हे युद्ध सुरवातीला धार्मिक होते आणि शेवटी मग कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट इतर कॅथलिकांबरोबर युद्ध करू लागले. १६३० च्या दशकात कमजोर झालेले कॅथलिक लीग १६३५ मध्ये पार विस्कळीत झाले.

वेस्टफेलियातील शांती परिषद

लूटमार, खून, बलात्कार, रोगराई यांनी युरोपला उद्ध्‌वस्त केले होते. हळूहळू, लोकांमध्ये शांतीची उत्कंठा वाढू लागल्यामुळे त्यांना अशी जाणीव होऊ लागली, की हे असे युद्ध आहे ज्यात कोणालाही विजय मिळू शकणार नाही. वीवाट पाक्स—एस लेब डे फ्रीड! पुस्तकात म्हटले आहे, की “१६३० च्या दशकाच्या अंताला, शासन करणाऱ्‍या राजपुत्रांनी सरतेशेवटी ओळखले, की सैनिकी बळ त्यांना आपले हेतू साध्य करण्यात कसलीही मदत देणार नव्हते.” पण मग सर्वांनाच जर शांती हवी होती तर ती कशी काय साध्य करता येत होती?

पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट फर्डीनंड तिसरा, फ्रान्सचा राजा लुई तेरावा आणि स्वीडनची राणी ख्रिस्टीना या सर्वांचे एकमत झाले, की युद्धातील सर्व पक्ष एकत्र येऊन शांतीची बोलाचाली करण्यासाठी जेथे येतील तेथे एक परिषद भरवण्यात यावी. बोलाचालीसाठी दोन ठिकाणे निवडण्यात आली होती—वेस्टफेलिया या जर्मन प्रांतातील ओस्नाब्रुक आणि मुन्स्टर शहरे. ही शहरे स्वीडन आणि फ्रान्सच्या राजधानींच्या मध्ये अर्ध्या वाटेवर होती. १६४३ पासून सुमारे १५० प्रतिनिधी या दोन शहरांमध्ये यायला सुरू झाले; यांपैकी काही सल्लागारांचे मोठमोठे गट होते. कॅथलिक दूत मुन्स्टर येथे जमू लागले तर प्रॉटेस्टंट प्रतिनिधी ओस्नाब्रुक येथे येऊ लागले.

दूतांच्या पदव्या, हुद्दा, बसण्याचा क्रम, पद्धती यासारख्या गोष्टी ठरवण्यासाठी आधी एक योजना-पद्धत आखण्यात आली. त्यानंतर मग शांती चर्चा सुरू झाल्या, मध्यस्थांकरवी एका प्रतिनिधी मंडळापासून दुसऱ्‍या प्रतिनिधी मंडळाला मागण्या सांगण्यात आल्या. जवळजवळ पाच वर्षांनंतर—युद्ध अद्याप चालू असताना—शांतीच्या अटी मान्य करण्यात आल्या. वेस्टफेलियाच्या तहाचे एकापेक्षा अधिक दस्ताऐवज होते. एका तहात सम्राट फर्डीनंड तिसरा याने आणि स्वीडनने सह्‍या केल्या आणि दुसऱ्‍या तहात, सम्राटाने व फ्रान्सने सह्‍या केल्या.

तहाची बातमी जसजशी पसरत गेली तसतशी आनंद साजरा करण्याची तयारी सुरू झाली. जीवघेण्या ठिणगीने सुरवात झालेल्या युद्धाची समाप्ती खऱ्‍याखुऱ्‍या फटाक्यांनी झाली. विविध शहरांमध्ये आकाशात प्रकाशच प्रकाश होता. चर्चच्या घंटा निनादू लागल्या, तोफांनी सलामी ठोकली आणि रस्त्यांवर लोक गाऊ लागले. युरोप कायमच्या शांतीची अपेक्षा करू शकत होता का?

कायमची शांती शक्य आहे का?

वेस्टफेलियाच्या तहात, सार्वभौमत्वाचे तत्त्व मान्य करण्यात आले. याचा अर्थ असा झाला, की तहात सही केलेल्या प्रत्येक पार्टीने इतर सर्व पार्टींच्या प्रादेशिक हक्कांचा आदर करण्यास व त्यांच्या आंतरिक बाबींमध्ये ढवळाढवळ न करण्यास सहमती दर्शवली. यातूनच सार्वभौम राज्यांचा खंड म्हणून आधुनिक युरोपचा जन्म झाला. या राज्यांपैकी काहींना तहामुळे इतरांपेक्षा अधिक फायदा झाला.

फ्रान्सला प्रमुख सत्ता म्हणून ठरवण्यात आले आणि नेदरलँड्‌स व स्वीत्झरलँड यांना स्वातंत्र्य मिळाले. युद्धात ज्यांचे बरेच नुकसान झाले होते त्या जर्मन इस्टेट्‌सना या तहामुळे समस्यांचा सामना करावा लागला. काही प्रमाणात जर्मनीचे भवितव्य इतर राष्ट्रांनीच ठरवले. द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका म्हणते: “जर्मन राजपुत्रांचा लाभ आणि तोटा, फ्रान्स, स्वीडन आणि ऑस्ट्रिया या मुख्य सत्तांना फायदेशीर ठरेल त्याप्रमाणे ठरवण्यात आला.” जर्मन इस्टेट्‌सना एकत्र आणून त्यांचे एक राष्ट्र बनवण्याऐवजी पहिल्याप्रमाणे त्यांचे विभाजन करण्यात आले. शिवाय, ऱ्‍हाईन, एल्ब आणि ओडर या जर्मनीच्या मुख्य नद्यांचे भाग जसे परदेशी शासकांच्या हवाली करण्यात आले तसेच जर्मनीचा काही भाग देखील हवाली करण्यात आला.

कॅथलिक, ल्यूथरन, कॅल्व्हिनीस्ट धर्मांना सममान्यता देण्यात आली. यामुळे सर्व खूष झाले नाहीत. पोप इनोसंट दहावे यांनी या तहाचा कडाडून विरोध केला, तो अवैध आहे असे त्यांनी म्हटले. पण, ठरवलेल्या धार्मिक परिसीमा पुढील तीन शतकांपर्यंत बदलल्या नाहीत. वैयक्‍तिक धार्मिक स्वातंत्र्य अद्याप मिळालेले नसले तरी ते त्याच दिशेने वाटचाल करीत होते.

तहामुळे तीस वर्षांचे युद्ध समाप्त झाले आणि त्याबरोबर बहुतेक शत्रुत्वही थांबले. हे युरोपातील शेवटले मोठे धार्मिक युद्ध होते. युद्धे तशी थांबली नाहीत तरीपण, युद्ध होण्यामागची कारणे मात्र धर्माऐवजी राजनीती किंवा व्यापार ही होती. याचा अर्थ असा होत नाही, की युरोपीयन शत्रुत्वात धर्माचा काहीच प्रभाव राहिला नाही. पहिल्या आणि दुसऱ्‍या महायुद्धात, जर्मन सैनिकांनी घातलेल्या बेल्टच्या बक्कलवर एका वर्तुळात “देव आमच्याबरोबर आहे,” असे ओळखीचे शब्द कोरलेले होते. या धक्कादायक युद्धादरम्यान, कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट पुन्हा विरुद्ध बाजूच्या कॅथलिक व प्रॉटेस्टंट लोकांशी लढायला उभे राहिले.

स्पष्टतः, वेस्टफेलियाच्या तहाने कायमची शांती आणली नाही. परंतु, लवकरच आज्ञाधारक मानवजात शांतीचा उपभोग घेणार आहे. यहोवा देव आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या मशीही राज्याद्वारे मानवजातीसाठी सर्वकाळची शांती आणणार आहे. या शासनात, एकच खरा धर्म, विभाजनाचे नव्हे तर एकतेचे कारण असेल. तेव्हा कोणीही, धार्मिक किंवा इतर कोणत्याही कारणासाठी युद्ध करणार नाहीत. सर्व पृथ्वीवर राज्य शासनाचा ताबा असेल आणि “शांतीला अंत” नसेल तेव्हा सर्वांना किती हायसे वाटेल!—यशया ९:६, ७.

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

सुरवातीला कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यामध्ये झगडा सुरू झाला आणि नंतर, कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट मिळून इतर कॅथलिकांविरूद्ध झगडा करू लागले

[२२ पानांवरील संक्षिप्त आशय]

“सांता मरिया” किंवा “देव आमच्याबरोबर आहे” अशी घोषणा करीत सैनिक युद्धाला गेले

[२१ पानांवरील चित्र]

कार्दीनाल रीशल्य

[२३ पानांवरील चित्र]

ल्यूथर, कॅल्व्हिन आणि पोप यांच्यामधील झगडा चित्रित करणारे सोळाव्या शतकातील रेखाटन

[२० पानांवरील चित्राचे श्रेय]

स्पामर्स इलस्ट्रेरटे वेल्टगेशिच्टे ६ या पुस्तकातून

[२३ पानांवरील चित्राचे श्रेय]

झगडणारे धार्मिक नेते: वायडर डाय फाफनहरशाफ्ट या पुस्तकातून; नकाशा: द कम्प्लीट एन्सायक्लोपिडिआ ऑफ इलस्ट्रेशन/ जे. जी. हेक