व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सुवार्तिकाचे काम कर”

“सुवार्तिकाचे काम कर”

“सुवार्तिकाचे काम कर”

“सर्व गोष्टींविषयी सावध ऐस . . . सुवार्तिकाचे काम कर.”—२ तीमथ्य ४:५.

१. येशूने आपल्या अनुयायांना कोणती आज्ञा दिली?

यहोवाचे नाव व उद्देश सबंध पृथ्वीभरात घोषित केले जात आहेत. कारण देवाच्या समर्पित लोकांनी, येशूने आपल्या अनुयायांना दिलेली पुढील आज्ञा मनावर घेतली आहे: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.

२. पर्यवेक्षक असणाऱ्‍या तीमथ्याला कोणते मार्गदर्शन देण्यात आले आणि ख्रिस्ती पर्यवेक्षक ज्याद्वारे आपले सेवाकार्य पूर्ण करू शकतात असा एक मार्ग कोणता आहे?

येशूच्या पहिल्या शतकातील शिष्यांनी त्या आज्ञेकडे गांभीर्याने लक्ष दिले. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने आपला सोबती असलेल्या तीमथ्य या ख्रिस्ती पर्यवेक्षकाला असा आग्रह केला: “सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीमथ्य ४:५) आज एक पर्यवेक्षक ज्या एका मार्गाने आपली सेवा पूर्ण करू शकतो तो म्हणजे क्षेत्र सेवाकार्यात नियमित भाग घेणारा आवेशी राज्य प्रचारक असण्याद्वारे. उदाहरणार्थ, मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकाकडे प्रचार कार्यात पुढाकार घेऊन इतरांना प्रशिक्षित करण्याचा समाधानदायी विशेषाधिकार आहे. पौलाने सुवार्तेची घोषणा करण्याची आपली वैयक्‍तिक जबाबदारी पूर्णार्थाने पार पाडली आणि त्याने इतरांनाही सेवाकार्याकरता प्रशिक्षित केले.—प्रेषितांची कृत्ये २०:२०; १ करिंथकर ९:१६, १७.

गतकाळातील आवेशी सुवार्तिक

३, ४. एक सुवार्तिक या नात्याने फिलिप्पाला कोणते अनुभव आले?

सुरवातीचे ख्रिस्ती आवेशी सुवार्तिक म्हणून सुविख्यात होते. सुवार्तिक असणाऱ्‍या फिलिप्पाचे उदाहरण घ्या. जेरूसलेमधील ग्रीक व इब्री भाषिक विधवांना दररोज निष्पक्षपणे अन्‍नवाटप करण्याकरता निवडलेल्या ‘पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशा सात प्रतिष्ठित पुरुषांपैकी’ तो एक होता. (प्रेषितांची कृत्ये ६:१-६) त्या खास सेवेनंतर, व छळामुळे प्रेषितांच्या खेरीज सर्व ख्रिस्ती लोकांची पांगापांग झाली तेव्हा फिलिप्प शोमरोन येथे गेला. तेथे त्याने सुवार्तेची घोषणा केली आणि पवित्र आत्म्याकरवी त्याला दुष्टात्मे काढण्याची व पांगळ्या व पक्षघाती माणसांना बरे करण्याची शक्‍ती देण्यात आली. अनेक शोमरोनी लोकांनी राज्याचा संदेश स्वीकारला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला. याविषयी ऐकल्यावर जेरूसलेममधील प्रेषितांनी पेत्र व योहान यांस शोमरोनात पाठवले जेणेकरून नव्यानेच बाप्तिस्मा झालेल्यांना पवित्र आत्मा मिळावा.—प्रेषितांची कृत्ये ८:४-१७.

यानंतर देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला गज्जाकडे जाणाऱ्‍या वाटेवर कुशी षंढाला भेटण्याकरता पाठवले. फिलिप्पाने यशयाच्या भविष्यवाणीवर स्पष्ट खुलासा केल्यानंतर ‘राणी कांदके हिचा मोठा अधिकारी’ असणाऱ्‍या त्या माणसाने येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-३८) यानंतर फिलिप्प अजोत व त्यानंतर कैसरीया येथे गेला आणि “वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.” (प्रेषितांची कृत्ये ८:३९, ४०) सुवार्तिकाचे कार्य करण्यासंबंधी निश्‍चितच त्याने एक उत्तम आदर्श मांडला!

५. फिलिप्पाच्या चार मुली खासकरून कशाविषयी सुविख्यात होत्या?

सुमारे २० वर्षांनंतर फिलिप्प कैसरीयातच होता व सेवाकार्यात अद्यापही सक्रिय होता. पौल व लूक यांनी त्याच्या घरी मुक्काम केला तेव्हा त्याला “चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्‍वरी संदेश देत असत.” (प्रेषितांची कृत्ये २१:८-१०) निश्‍चितच त्यांना उत्तम आध्यात्मिक प्रशिक्षण मिळाले होते, सेवाकार्याकरता त्या आवेशी होत्या आणि त्यांना भविष्यवाद करण्याचाही विशेषाधिकार मिळाला होता. आजच्या काळातही, आईवडिलांचा सेवाकार्याकरता असलेला आवेश त्यांच्या मुलामुलींवर उत्तम प्रभाव करू शकतो व आवेशी सुवार्तिक कार्यास आपले जीवनध्येय बनवण्यास त्यांना प्रवृत्त करू शकतो.

आजच्या काळातील आवेशी सुवार्तिक

६. पहिल्या शतकातील सुवार्तिकांना कितपत सफलता मिळाली?

आपल्या काळाकडे आणि अंतसमयाकडे संकेत करणाऱ्‍या महान भविष्यवाणीत येशू ख्रिस्ताने असे घोषित केले: “प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) सुवार्ता “सर्व जगात” गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल. (मत्तय २४:१४) पौल व पहिल्या शतकातील इतर सुवार्तिकांनी सुवार्तेची घोषणा केल्यामुळे अनेकजण सत्य मानू लागले आणि सबंध रोमी साम्राज्यात एकापाठोपाठ एक अशा अनेक शहरांत मंडळ्यांची स्थापना झाली. या मंडळ्यांत सेवा करण्याकरता नियुक्‍त करण्यात आलेले वडील, सुवार्तिक कार्यात आपल्या बंधु भगिनींसोबत सहभागी झाले आणि अशारितीने प्रचार कार्याचा दूरदूरपर्यंत विस्तार होत गेला. त्याकाळात ज्याप्रमाणे यहोवाचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले त्याचप्रमाणे आजही होत आहे कारण लाखो यहोवाचे साक्षीदार सुवार्तिक कार्य करत आहेत. (प्रेषितांची कृत्ये १९:२०) यहोवाच्या त्या आनंदी स्तुतीकर्त्यांमध्ये तुम्हीही सामील झाला आहात का?

७. राज्याचे उद्‌घोषक आज काय करत आहेत?

आज अनेक राज्य उद्‌घोषक सुवार्तिक कार्यात आपला सहभाग वाढवण्याकरता त्यांच्यापुढे असलेल्या संधीचा फायदा उचलत आहेत. त्यांच्यापैकी हजारोंनी मिशनरी कार्यात प्रवेश केला आहे आणि लाखोजण सामान्य व सहायक पायनियर कार्यात सहभागी होण्याद्वारे पूर्ण वेळेच्या सुवार्तिक कार्यात सामील होतात. शिवाय, आवेशी राज्य प्रचारक या नात्याने सेवा करणारे पुरुष, स्त्रिया व मुले किती उत्तम कार्य करत आहेत! यहोवाचे सर्व लोक ख्रिस्ती सुवार्तिक या नात्याने खांद्याला खांदा लावून सेवा करत असल्यामुळे त्यांना खरोखर त्याचे विपुल आशीर्वाद मिळत आहेत.—सफन्या ३:९.

८. कोणते चिन्ह लावण्याचे काम आता केले जात आहे आणि हे काम कोण करत आहे?

देवाने येशूच्या अभिषिक्‍त अनुयायांना सबंध पृथ्वीवर सुवार्तेची घोषणा करण्याची जबाबदारी दिली आहे. या सुवार्तिक कार्यात त्यांना पाठिंबा देत आहेत ख्रिस्ताची “दुसरी मेंढरे,” ज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (योहान १०:१६) भविष्यवाणीत या जीवनदायक कार्याची तुलना आज घडत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करत असलेल्यांच्या कपाळावर चिन्ह लावण्याशी करण्यात आली आहे. लवकरच दुष्टांचा नाश केला जाईल. तोपर्यंत पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्वांपर्यंत जीवनदायक सत्ये पोचवण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे!—यहेज्केल ९:४-६, ११.

९. नवीन सदस्यांना सेवाकार्यात कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते?

जर आपल्याजवळ सुवार्तिक कार्यात अनुभव असेल तर मंडळीतल्या नवीन सदस्यांना मदत करण्यासाठी आपण निश्‍चितच काही ना काही करू शकतो. वेळोवेळी आपण सेवाकार्यात त्यांना सोबत घेऊन जाऊ शकतो. वडील या नात्याने सेवा करणाऱ्‍यांनी सहविश्‍वासू बांधवांना आध्यात्मिकरित्या वर आणण्याकरता जमेल ते करावे. नम्र पर्यवेक्षकांच्या उत्तम योगदानामुळे इतरांना आवेशी व फलदायी सुवार्तिक होण्याच्या दिशेने बरीच मदत लाभू शकते.—२ पेत्र १:५-८.

घरोघर साक्ष देणे

१०. ख्रिस्ताने व त्याच्या आरंभीच्या अनुयायांनी सेवाकार्यासंबंधी कशाप्रकारचा आदर्श ठेवला?

१० येशू ख्रिस्ताने सुवार्तिक कार्यात उत्कृष्ट आदर्श पुरवला. ख्रिस्ताच्या व त्याच्या प्रेषितांच्या सेवाकार्यासंबंधी देवाचे वचन असे म्हणते: “तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता; तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित [होते].” (लूक ८:१) प्रेषितांविषयी काय? सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टला पवित्र आत्मा ओतण्यात आल्यानंतर, “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.”—प्रेषितांची कृत्ये ५:४२.

११. प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१ यात सांगितल्यानुसार प्रेषित पौलाने आपल्या सेवाकार्यात काय केले?

११ प्रेषित पौलाच्या आवेशी सुवार्तिक कार्यामुळेच तो इफिसस येथील ख्रिस्ती वडिलांना असे म्हणू शकला की “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.” पौल ‘घरोघरी शिकवत’ होता याचा अर्थ तो यहोवाची उपासना करणाऱ्‍या आपल्या बांधवांच्या घरोघरी जाऊन त्यांना मेंढपाळ भेटी देत होता का? नाही; कारण तो पुढे स्पष्ट सांगतो की “पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे ह्‍यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्‍यांस मी साक्ष देत होतो.” (प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१) सामान्यतः, जे आधीच यहोवाला समर्पित होते त्यांना “पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे ह्‍यासंबंधाने” शिकवण्याची गरज नव्हती. पौलाने इफिसस येथील ख्रिस्ती वडिलांना घरोघरच्या साक्षकार्याकरता प्रशिक्षित केले आणि अविश्‍वासी लोकांना, पश्‍चात्ताप करणे व विश्‍वास ठेवणे यासंबंधाने शिक्षण दिले. असे करण्याद्वारे पौल, येशूने स्थापित केलेल्या पद्धतीचे अनुकरण करत होता.

१२, १३. फिलिप्पैकर १:७ यानुसार यहोवाच्या लोकांनी प्रचार करण्याच्या त्यांच्या हक्कासंबंधी काय केले आहे?

१२ घरोघरचे साक्षकार्य सोपे नाही. उदाहरणार्थ, काही लोक, त्यांच्या दारावर आपण बायबलचा संदेश घेऊन जातो तेव्हा चिडतात. लोकांना चिडवण्याची आपली इच्छा नाही. पण घरोघरचे सेवाकार्य शास्त्रावर आधारित आहे आणि देवावर व शेजाऱ्‍यावर असलेल्या प्रेमामुळे आपण या पद्धतीने साक्ष देण्यास प्रवृत्त होतो. (मार्क १२:२८-३१) घरोघर प्रचार करण्याच्या आपल्या हक्कासंबंधीच्या “प्रत्युत्तरात व समर्थनात” आपण अनेक न्यायालयांसमोर खटले मांडले आहेत; यांत संयुक्‍त संस्थानांचे सर्वोच्च न्यायालय देखील सामील आहे. (फिलिप्पैकर १:७) जवळजवळ प्रत्येक वेळी न्यायालयाने आपल्याच बाजूने निर्णय दिला आहे. पुढील निवाडा याचे उत्तम उदाहरण आहे:

१३ “धार्मिक हस्तपत्रिकांचे वाटप हा मिशनरी सुवार्तिक कार्याचा एक जुना प्रकार आहे—छपाई यंत्रांचा शोध लागला तेव्हापासूनच हा प्रकार अवलंबण्यात आला आहे. आजवर अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या धार्मिक चळवळींत या पद्धतीचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आजही या पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात केला जातो कारण निरनिराळ्या धार्मिक पंथांचे फिरते सुवार्तिक हजारो लोकांच्या घरी शुभवर्तमान नेतात व वैयक्‍तिक भेटी देण्याद्वारे लोकांना आपल्या धर्माचे सदस्य बनवण्याचा प्रयत्न करतात . . . चर्चमधील उपासना व व्यासपीठावरून दिल्या जाणाऱ्‍या धार्मिक उपदेशाप्रमाणेच या विशिष्ट प्रकारच्या धार्मिक कार्यालाही [संयुक्‍त संस्थानांच्या घटनेतील] फर्स्ट अमेंडमेंटने उच्च दर्जा दिला आहे.”—मरडॉक वि. पेनसिलव्हेनिया, १९४३.

प्रचार करत राहणे का महत्त्वाचे?

१४. आपल्या सेवाकार्याचा उत्तरोत्तर परिणाम कसा होऊ शकतो?

१४ घरोघर प्रचार करण्यामागे अनेक कारणे आहेत. आपण एका घरमालकाला भेटतो तेव्हा शास्त्रवचनीय सत्याचे बीज पेरण्याचा प्रयत्न करतो. पुनर्भेटी करण्याद्वारे आपण त्याला पाणी घालतो. यामुळे घरमालकावर होणारा परिणाम उत्तरोत्तर अधिक प्रभावशाली होत जातो कारण पौलाने असे लिहिले: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला.” (१ करिंथकर ३:६) तेव्हा, आपण नवी रोपे ‘लावत व पाणी घालत’ राहू, या आत्मविश्‍वासाने, की यहोवा त्यांना ‘वाढवत जाईल.’

१५, १६. आपण वारंवार लोकांच्या घरी भेटी का देतो?

१५ सुवार्तिक कार्य आपण यासाठी करतो, कारण हा अनेकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न आहे. आपल्या प्रचार कार्याद्वारे आपण स्वतःचे व आपले ऐकणाऱ्‍यांचे जीवन वाचवतो. (१ तीमथ्य ४:१६) एखाद्या माणसाचा जीव जात आहे हे माहीत असताना आपण त्याला मदत करण्याचा फक्‍त एकदाच आणि तोसुद्धा अनिच्छेने प्रयत्न करू का? निश्‍चितच नाही! त्याचप्रकारे, लोकांच्या तारणाचा प्रश्‍न असल्यामुळे आपण त्यांच्या घरी वारंवार भेटी देतो. परिस्थिती बदलत राहते. आज एखादा खूप कामात व्यस्त असल्यामुळे बायबलचा संदेश ऐकून घेणार नाही, पण तोच माणूस दुसऱ्‍या वेळी कदाचित आनंदाने ऐकेलही. एखाद्या घरी आपण दुसऱ्‍यांदा जाऊ तेव्हा कुटुंबातला दुसराच सदस्य दार उघडेल आणि या वेळी आपल्याला शास्त्रवचनीय चर्चा सुरू करता येईल.

१६ परिस्थितीच नव्हे तर घरमालकांची वृत्ती देखील बदलू शकते. उदाहरणार्थ, प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूचा शोक एखाद्याला राज्याचा संदेश ऐकून घेण्यास प्रवृत्त करू शकतो. आपण या व्यक्‍तीला सांत्वन देऊ इच्छितो, तिला तिच्या आध्यात्मिक गरजेची जाणीव करून देऊ इच्छितो आणि ही गरज कशी भागवता येईल हे देखील दाखवू इच्छितो.—मत्तय ५:३, ४.

१७. आपल्या प्रचार कार्याचे सर्वात मुख्य कारण कोणते आहे?

१७ पण घरोघरचे साक्षकार्य करण्याचे अथवा ख्रिस्ती सेवाकार्याच्या इतर कोणत्याही प्रकारात सामील होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपण यहोवाचे नाव घोषित करण्यात सहभागी होऊ इच्छितो. (निर्गम ९:१६; स्तोत्र ८३:१८) आपल्या सुवार्तिक कार्यामुळे सत्याची व नीतिमत्त्वाची आवड असलेल्यांना यहोवाचे स्तुतीकर्ते बनण्यास मदत मिळते तेव्हा आपल्याला किती समाधान मिळते! स्तोत्रकर्त्याने आपल्या स्तोत्रात म्हटले: “कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्‍वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे.”—स्तोत्र १४८:१२, १३.

सुवार्तिक कार्यामुळे वैयक्‍तिक लाभ मिळतात

१८. सुवार्तिक कार्य केल्याने आपल्याला कोणते लाभ मिळतात?

१८ सुवार्तिक कार्य केल्याने वैयक्‍तिकरित्या आपल्याला अनेक लाभ मिळतात. घरोघर जाऊन सुवार्ता सांगितल्यामुळे आपल्याला नम्रतेचा गुण आत्मसात करण्यास मदत मिळते, खासकरून अशा वेळी जेव्हा घरमालक आदराने आपले स्वागत करत नाहीत. परिणामकारक सुवार्तिक होण्याकरता आपण पौलाप्रमाणे झाले पाहिजे कारण त्याने म्हटले, “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.” (१ करिंथकर ९:१९-२३) सेवाकार्यातील अनुभव आपल्याला व्यवहारचातुर्याने वागण्याचे प्रशिक्षण देतो. यहोवावर विसंबून राहण्याद्वारे आणि अचूक शब्द निवडण्याद्वारे आपण पौलाचा पुढील सल्ला व्यवहारात आणू शकतो: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.”—कलस्सैकर ४:६.

१९. सुवार्तिकांना पवित्र आत्म्याची मदत कशाप्रकारे मिळते?

१९ सुवार्तिक कार्य आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहण्यासही प्रेरित करते. (जखऱ्‍या ४:६) असे केल्यामुळे आपल्या सेवाकार्यातून पवित्र आत्म्याचे फळ—“प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारख्या गुणांच्या रूपात प्रकट होते. (गलतीकर ५:२२, २३) याचा परिणाम लोकांशी आपल्या वागणुकीवर होतो, कारण आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे आपल्याला सुवार्तेचा प्रचार करताना प्रेमाने वागण्यास, आनंदी व शांतीप्रिय असण्यास, सहनशीलता व दयाळूपणा दाखवण्यास, चांगुलपणा व विश्‍वास व्यक्‍त करण्यास तसेच सौम्यता व इंद्रियदमन प्रदर्शित करण्यास मदत मिळते.

२०, २१. सुवार्तिक कार्यात व्यस्त राहिल्यामुळे मिळणारे काही आशीर्वाद कोणते आहेत?

२० सुवार्तिक या नात्याने आपल्याला मिळणारा आणखी एक आशीर्वाद म्हणजे आपण अधिक सहानुभूतीशील बनतो. लोक आपल्याला त्यांच्या समस्यांविषयी सांगतात, उदाहरणार्थ आजारपण, बेकारी, कौटुंबिक समस्या यांविषयी ते आपल्याला सांगतात तेव्हा आपण सल्लागाराची भूमिका घेत नाही तर त्यांना प्रोत्साहन व सांत्वन देतील अशी शास्त्रवचने दाखवतो. ज्या लोकांना आध्यात्मिकरित्या अंधारात ठेवण्यात आले आहे, पण ज्यांच्या मनात नीतिमत्त्वाविषयी आवड असल्याचे दिसून येते अशा लोकांबद्दल आपल्याला कळकळ आहे. (२ करिंथकर ४:४) आणि अशा ‘सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती’ असलेल्यांना आध्यात्मिकरित्या मदत करता येणे हा आपल्याकरता किती मोठा आशीर्वाद आहे!—प्रेषितांची कृत्ये १३:४८.

२१ सुवार्तिक कार्यात नियमित सहभाग घेतल्याने आपल्याला आध्यात्मिक गोष्टींवर आपले मन केंद्रित ठेवण्यास मदत मिळते. (लूक ११:३४) हे खरोखरच आपल्या हिताचे आहे कारण त्याशिवाय या जगातील भौतिक मोहांना आपण सहज बळी पडू शकतो. प्रेषित योहानाने ख्रिश्‍चनांना असा आग्रह केला: “जगावर व जगांतल्या गोष्टींवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) सुवार्तिक कार्यात व्यस्त व प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर राहिल्यामुळे जगावर प्रीती न करण्यास मदत मिळते.—१ करिंथकर १५:५८.

स्वर्गीय संपत्ती साठवा

२२, २३. (अ) ख्रिस्ती सुवार्तिक कोणती संपत्ती साठवतात? (ब) पुढील लेख आपल्याला कशाप्रकारे साहाय्य करेल?

२२ आवेशी राज्य प्रचाराच्या कार्यामुळे कायमस्वरूपी लाभ मिळतात. येशूच्या पुढील शब्दांतून हे स्पष्ट होते: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ति साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात, आणि चोर घर फोडून चोरी करितात; तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ति साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीहि करीत नाहीत; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनहि लागेल.”—मत्तय ६:१९-२१.

२३ तर मग आपण स्वर्गात संपत्ती साठवत राहू या, हे जाणून की सार्वभौम प्रभू यहोवा याचे साक्षीदार म्हणून त्याचे प्रतिनिधीत्व करण्यापेक्षा मोठा बहुमान कोणताच असू शकत नाही. (यशया ४३:१०-१२) देवाचे सेवक या नात्याने आपल्याला नेमलेले कार्य सोपवताना आपल्या भावना कदाचित नव्वदी पार केलेल्या एक ख्रिस्ती स्त्रीसारख्या असतील जिने देवाच्या सेवेत घालवलेल्या आपल्या आयुष्याबद्दल असे म्हटले: “या सर्व वर्षांत यहोवाने माझ्या कमतरतांकडे दुर्लक्ष करून माझी सेवा स्वीकारली म्हणून मी त्याचे उपकार मानते आणि माझ्या प्रेमळ पित्याची सावली सर्वकाळ माझ्यावर राहावी अशी कळकळीने प्रार्थना करते.” आपल्यालाही देवासोबतचे आपले नाते इतकेच मोलवान वाटत असेल तर नक्कीच आपण सुवार्तिक कार्यात पुरेपूर सहभाग घेण्यास प्रवृत्त होऊ. आपण आपली सेवा कशी पूर्ण करू शकतो हे समजण्यास पुढील लेख सहायक ठरेल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपण सुवार्तिक कार्य का केले पाहिजे?

• गतकाळातील व आधुनिक काळातील सुवार्तिकांच्या कार्याविषयी तुम्ही काय म्हणू शकता?

• आपण घरोघरचे साक्षकार्य का करतो?

• सुवार्तिक कार्य केल्याने तुम्हाला कोणते वैयक्‍तिक लाभ मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्रे]

फिलिप्प व त्याच्या मुलींप्रमाणेच आधुनिक काळातही आनंदी सुवार्तिक आहेत

[१४ पानांवरील चित्र]

इतरांना सुवार्ता सांगताना तुम्हाला वैयक्‍तिकरित्या कसा लाभ होतो?