आपण मदतीसाठी देवदूतांना प्रार्थना करावी का?
आपण मदतीसाठी देवदूतांना प्रार्थना करावी का?
संकटात असताना देवदूतांना प्रार्थना करणे उचित आहे का? पुष्कळ लोकांना असे वाटते. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “आपण देवदूतांना . . . प्रार्थना करतो . . . ती या उद्देशाने की त्यांनी आपल्या वतीने देवाशी बोलावे.” पण आपल्या वतीने बोलण्यासाठी आपण देवदूतांना प्रार्थना करावी का?
देवाच्या वचनात त्याच्या केवळ दोन विश्वासू देवदूतांची नावे देण्यात आली आहेत; मीखाएल आणि गब्रीएल. (दानीएल ८:१६; १२:१; लूक १:२६; यहूदा ९) बायबलमध्ये या नावांचा उल्लेख केला असल्यामुळे आपण समजू शकतो, की प्रत्येक देवदूत, केवळ व्यक्तिभावरहित शक्ती नव्हे तर नाव असलेली एक अनोखी व्यक्ती आहे. पण इतर देवदूतांनी आपली नावे सांगण्यास नकार दिला. जसे की, याकोबाने जेव्हा एका देवदूताला त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने नकार दिला. (उत्पत्ति ३२:३९; शास्ते १३:१७, १८) मानवांनी देवदूतांचा उदोउदो करू नये म्हणून बायबलमध्ये त्यांच्या नावांची यादी देण्यात आलेली नाही.
देवदूतांच्या कर्तव्यांपैकी एक कर्तव्य आहे देवाचा संदेश मानवांना सांगणे. वास्तविक पाहता, ज्यांचे भाषांतर “देवदूत” करण्यात आले आहे त्या मूळ इब्री व ग्रीक शब्दांचा अक्षरशः अर्थ “संदेश देणारा” असा होतो. परंतु, देवदूत हे परात्पर देवाच्या सिंहासनापर्यंत मानवांच्या प्रार्थना पोचवणारे मध्यस्थ म्हणून सेवा करत नाहीत. देवाने हे ठरवले आहे, की प्रार्थना आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याच्याकडे आल्या पाहिजेत; येशूने याविषयी असे म्हटले: “जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.”—योहान १५:१६; १ तीमथ्य २:५.
आपल्या प्रार्थना ऐकायला यहोवाकडे वेळ नसतो असे नाही; उचित मार्गाने प्रार्थना केली तर तो नक्की आपली प्रार्थना ऐकतो. बायबल अशी हमी देते: “जे कोणी त्याचा धावा करितात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.”—स्तोत्र १४५:१८.