व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जंगली श्‍वापद आणि त्याचे चिन्ह ओळखणे

जंगली श्‍वापद आणि त्याचे चिन्ह ओळखणे

जंगली श्‍वापद आणि त्याचे चिन्ह ओळखणे

तुम्हाला कोडे सोडवायला आवडते का? कोडे सोडवताना तुम्ही कदाचित सुगावे शोधण्याचा प्रयत्न करता. प्रकटीकरण, अध्याय १३ मधील जंगली श्‍वापदाची ६६६ संख्या, त्याचे नाव, किंवा चिन्ह यासंदर्भात देवाने आपल्या प्रेरित वचनात आवश्‍यक सुगावे दिले आहेत.

या लेखात आपण कारणमीमांसेचे चार मुख्य मार्ग—महत्त्वाचे सुगावे पाहू या जे आपल्याला श्‍वापदाच्या चिन्हाचा अर्थ प्रकट करतील. (१) बायबलमधील नावे काही वेळा कशी निवडली जातात, (२) जंगली श्‍वापदाची ओळख, (३) ६६६ ही ‘माणसांची संख्या’ आहे याचा अर्थ काय, आणि (४) ६ या संख्येचा अर्थ काय व तीन वेळा ती का लिहिण्यात आली आहे अर्थात, ६०० अधिक ६० अधिक ६ किंवा ६६६.—प्रकटीकरण १३:१८.

बायबलमधील नावे—केवळ उपाधी नाहीत

बायबलमधील नावे सहसा खास अर्थ राखून असतात; विशेषतः देवाने ती दिली असल्यास. उदाहरणार्थ, अब्राम हा राष्ट्रांचा पिता बनणार होता म्हणून देवाने या पूर्वजाचे नाव बदलून अब्राहाम केले, अर्थात, “समूहाचा जनक.” (उत्पत्ति १७:५) देवाने योसेफ आणि मरीयेला, मरीयेच्या भावी बाळाला, येशू, अर्थात “यहोवा तारण आहे” हे नाव ठेवायला सांगितले. (मत्तय १:२१; लूक १:३१) त्या अर्थपूर्ण नावाच्या सुसंगतेत, येशूच्या सेवाकार्याद्वारे आणि बलिदानरूपी मृत्यूद्वारे, यहोवाने तारण शक्य केले.—योहान ३:१६.

त्याचप्रमाणे, ६६६ हे देवाने दिलेले संख्यारूपातील नाव, देवाच्या मते श्‍वापदाची ओळख पटवणाऱ्‍या गुणांना सूचित करत असावे. हे गुण समजण्याकरता, साहजिकच, आपल्याला श्‍वापद कोणाला संबोधले आहे आणि त्याची कार्ये काय आहेत याविषयी शिकायची गरज आहे.

श्‍वापदाची ओळख

बायबलमधील दानीएलाच्या पुस्तकात लाक्षणिक श्‍वापदांच्या अर्थावर बराच प्रकाश पाडण्यात आला आहे. ७ व्या अध्यायात, “चार मोठाली श्‍वापदे”—एक सिंह, एक अस्वल, एक चित्ता आणि मोठाले लोखंडी दात असलेले विक्राळ श्‍वापद—यांचे सविस्तर वर्णन दिले आहे. (दानीएल ७:२-७) दानीएल आपल्याला सांगतो की ही श्‍वापदे, विस्तारित साम्राज्यांवर एकामागोमाग एक राज्य करणारे “राजे” किंवा राजकीय शासने आहेत.—दानीएल ७:१७, २३.

प्रकटीकरण १३:१, २ च्या श्‍वापदाविषयी, द इंटरप्रेटर्स डिक्शनरी ऑफ द बायबल यात असे म्हटले आहे की, “दानीएलाच्या दृष्टान्तातील चार श्‍वापदांचे गुण या एकात आहेत . . . त्याचप्रमाणे, [प्रकटीकरणाचे] पहिले श्‍वापद, जगामध्ये देवाच्या विरोधात असलेल्या सर्व राजकीय शासनाच्या संघटित शक्‍तीला सूचित करते.” या निरीक्षणाला प्रकटीकरण १३:७ या वचनाने पुष्टी मिळते; तेथे श्‍वापदाविषयी असे म्हटले आहे: “सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्‍यांवर त्याला अधिकार देण्यात आला.” *—तिरपे वळण आमचे.

मानवी शासनाला सूचित करण्यासाठी बायबल श्‍वापदांचा उपयोग का करते? निदान दोन कारणांसाठी. पहिले कारण म्हणजे, सरकारांनी अनेक शतकांमध्ये पाशवी रक्‍तपाताचा लांबलचक इतिहास बनवून ठेवला आहे. इतिहासकार विल आणि एरिअल ड्यूरंट यांनी लिहिले, “युद्ध ही इतिहासातली स्थायी गोष्ट आहे आणि संस्कृती किंवा लोकशाहीने तिच्यावर जराही परिणाम झालेला नाही.” “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो,” यात किती सत्य आहे! (उपदेशक ८:९) दुसरे कारण म्हणजे, “[श्‍वापदाला] अजगराने [सैतानाने] आपली शक्‍ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला.” (प्रकटीकरण १२:९; १३:२) यानुसार, मानवी शासन हे दियाबलातर्फे आहे; यामुळे ते त्याची पाशवी, अजगरासारखी वृत्ती प्रदर्शित करते.—योहान ८:४४; इफिसकर ६:१२.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, प्रत्येक मानवी शासक सैतानाचे थेट साधन आहे. उलट, एका अर्थाने, मानवी सरकारे “देवाचा सेवक” म्हणून कार्य करतात व मानवी समाजाला स्थैर्य देतात नाहीतर अराजकता माजली असती. शिवाय काही नेत्यांनी मूलभूत मानवी हक्कांचे रक्षण केले आहे; यात खरी उपासना करण्याचा हक्क देखील आहे, जो सैतानाला नको आहे. (रोमकर १३:३, ४; एज्रा ७:११-२७; प्रेषितांची कृत्ये १३:७) तरीपण, दियाबलाच्या प्रभावामुळे, कोणत्याही मानवाने किंवा मानवी संस्थेने लोकांना कायमची शांती-सुरक्षा देण्यात आतापर्यंत यश मिळवलेले नाही. *योहान १२:३१.

“मनुष्यांची संख्या”

६६६ ही संख्या ‘माणसाची संख्या’ आहे किंवा ईजी-टू-रीड व्हर्शननुसार “मनुष्यांची संख्या” आहे यामध्ये त्या संख्येचा तिसरा सुगावा दडलेला आहे. ही अभिव्यक्‍ती कोणा मनुष्याला सूचित होत नाही कारण श्‍वापदावर कोणा मनुष्याचे नव्हे तर सैतानाचे वर्चस्व आहे. (लूक ४:५, ६; १ योहान ५:१९; प्रकटीकरण १३:२, १८) या उलट, श्‍वापदावर “मनुष्यांची संख्या” किंवा चिन्ह होते यावरून असे सूचित होते की त्याचा स्वभाव मानवी होता, आत्मिक किंवा दुरात्मिक नव्हता आणि म्हणून ते विशिष्ट मानवी गुण प्रदर्शित करते. हे गुण कोणते असावेत? बायबल याचे उत्तर देते: “सर्वांनी [मानवांनी] पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) या श्‍वापदाला “मनुष्यांची संख्या” आहे यावरून पाप आणि अपरिपूर्णतेच्या पतित मानवी स्थितीला सरकारे सूचित करत असल्याचे दिसते.

इतिहास याला पुष्टी देतो. माजी यु.एस. राज्य सचिव हेन्री किसिंगर म्हणाले, “आतापर्यंत अस्तित्वात आलेली प्रत्येक संस्कृती सरतेशेवटी नाहीशी झाली आहे. इतिहास हा फसलेल्या प्रयत्नांची, वास्तविकतेत न उतरलेल्या आकांक्षांची कथा आहे . . . म्हणून, इतिहासकार या नात्याने, दुर्घटना अपरिहार्य आहे ही जाणीव ठेवून जगावे लागते.” किसिंगर यांनी प्रामाणिकपणे केलेले मूल्यमापन बायबलमधील पुढील मूलभूत सत्याला दुजोरा देते: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

आता आपल्याला श्‍वापदाची ओळख पटली आहे आणि देवाचा त्याच्याविषयी कसा दृष्टिकोन आहे हे देखील आपण जाणून घेतले आहे, तर मग, आपण कोड्याच्या शेवटल्या भागाचे परीक्षण करू शकतो—सहा या संख्येचे आणि ती तीन वेळा म्हणजेच ६६६, किंवा ६०० अधिक ६० अधिक ६ अशी का लिहिण्यात आली आहे याचे परीक्षण करू शकतो.

तीन वेळा सहा—का?

शास्त्रवचनांमध्ये, विशिष्ट संख्येला लाक्षणिक अर्थ आहे. उदाहरणार्थ, सात हा आकडा देवाच्या नजरेत पूर्ण किंवा परिपूर्ण असलेल्या गोष्टीला सूचित करण्यासाठी सहसा वापरला जातो. जसे की, देवाचा निर्मिती सप्ताह सात ‘दिवसांचा’ किंवा विस्तारित कालावधींचा आहे ज्या कालावधींदरम्यान देव पृथ्वीविषयी आपला निर्मितीचा उद्देश पूर्णपणे पार पाडतो. (उत्पत्ति १:३–२:३) देवाची “वचने . . . सात वेळा शुद्ध” केलेल्या रुप्यासारखी आहेत अर्थात ती पूर्णपणे शुद्ध आहेत. (स्तोत्र १२:६; नीतिसूत्रे ३०:५, ६) कोड झालेल्या नामानला यार्देन नदीत सात वेळा स्नान करायला सांगण्यात आले होते आणि मग तो पूर्णपणे बरा झाला.—२ राजे ५:१०, १४.

सहा ही संख्या सातपेक्षा एकाने कमी आहे. त्यामुळे, देवाच्या नजरेत अपरिपूर्ण किंवा दोषपूर्ण गोष्टीचे ती उचित चिन्ह ठरत नाही का? निश्‍चितच! (१ इतिहास २०:६, ७) शिवाय, तीन वेळा सहा अर्थात ६६६ असे लिहून त्या अपरिपूर्णतेवर जोर देण्यात आला आहे. हा दृष्टिकोन योग्य आहे हे, आपण पाहिल्याप्रमाणे, ६६६ ही “मनुष्यांची संख्या” आहे या वस्तुस्थितीने सिद्ध होते. अशाप्रकारे, श्‍वापदाचा इतिहास, त्याची “मनुष्यांची संख्या,” आणि ६६६ ही संख्या एकाच गोष्टीला सूचित करतात—यहोवाच्या नजरेत पूर्णपणे दोषी व अपयशी असण्याला.

श्‍वापदाच्या दोषांचे चित्रण प्राचीन बॅबिलोनमधील राजा बेलशस्सरविषयी जे म्हटले होते त्याची आठवण करून देते. दानीएलाकरवी यहोवाने त्या शासकाला म्हटले: “तुला तागडीत तोलिले व तू उणा भरलास.” त्याच रात्री बेलशस्सरचा वध झाला आणि शक्‍तिशाली बॅबिलोनी साम्राज्यावर कब्जा करण्यात आला. (दानीएल ५:२७, ३०) त्याचप्रमाणे, ते राजकीय श्‍वापद आणि त्याचे चिन्ह बाळगणाऱ्‍या सर्वांकरता देवाच्या न्यायाचा अर्थ त्या श्‍वापदाचा व त्याच्या समर्थकांचा अंत असा ठरणार आहे. परंतु या वेळी, देव केवळ एकच राजकीय व्यवस्था नष्ट करणार नाही तर मानवी शासनाचा जराही मागमूस राहू देणार नाही. (दानीएल २:४४; प्रकटीकरण १९:१९, २०) तर मग, या श्‍वापदाचे जीवघेणे चिन्ह आपल्यावर येऊ न देणे किती महत्त्वाचे आहे!

चिन्हाची ओळख पटते

प्रकटीकरणात, ६६६ ही संख्या प्रकट केल्यानंतर लगेचच कोकरा अर्थात येशू ख्रिस्त याच्या १,४४,००० अनुयायांचा उल्लेख केला आहे ज्यांच्या कपाळावर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे अर्थात यहोवाचे नाव लिहिलेले आहे. ही नावे स्पष्ट करतात की, नाव धारण करणारे लोक ज्यांच्याविषयी अभिमानाने साक्ष देतात त्या यहोवाच्या व त्याच्या पुत्राच्या मालकीचे आहेत. त्याचप्रमाणे, श्‍वापदाचे चिन्ह ज्यांच्यावर आहे ते श्‍वापदाच्या अधीन असल्याचे दर्शवतात. अशाप्रकारे, उजव्या हातावर किंवा कपाळावर असलेले हे चिन्ह, लाक्षणिकदृष्ट्या, हे सूचित करते की चिन्ह धारण करणारी व्यक्‍ती जगातील श्‍वापदरूपी राजकीय व्यवस्थांना आराधनेच्या बरोबरीचा आदर देते. हे चिन्ह धारण करणारे, ज्यावर देवाचा हक्क आहे ते “कैसराला” देतात. (लूक २०:२५; प्रकटीकरण १३:४, ८; १४:१) कसे? राष्ट्राला, त्याच्या चिन्हांना व त्याच्या लष्करी बळाला आराधनेच्या बरोबरीचा आदर देतात आणि त्यांच्यावर आशा ठेवून तारणाची अपेक्षा करतात. खऱ्‍या देवाला ते केवळ नाममात्र सेवा देतात.

याच्या उलट, बायबल आपल्याला उत्तेजन देते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्र १४६:३, ४) या सल्ल्याकडे जे लक्ष देतात ते, सरकारे आपली वचने ठेवत नाहीत किंवा तडफदार व्यक्‍तिमत्त्वाचे नेते आपले स्थान गमावतात तेव्हा निराश होत नाहीत.—नीतिसूत्रे १:३३.

याचा असा अर्थ होत नाही की, खरे ख्रिस्ती हातावर हात ठेवून मानवांच्या या दयनीय स्थितीबद्दल काहीच करत नाहीत. उलट, मानवांच्या समस्यांचे निरसन करणारे सरकार ज्याचे ते प्रतिनिधीत्व करतात—देवाचे राज्य—त्याविषयी ते सक्रियतेने घोषणा करतात.—मत्तय २४:१४.

देवाचे राज्य—मानवजातीची एकमेव आशा

पृथ्वीवर असताना येशू आपल्या प्रचारात प्रामुख्याने देवाच्या राज्याविषयी बोलत होता. (लूक ४:४३) येशूने नमुन्यादाखल दिलेल्या प्रार्थनेत (काही वेळा ज्याला प्रभूची प्रार्थना म्हटले जाते) त्याने आपल्या अनुयायांना त्या राज्यासाठी आणि देवाची इच्छा या पृथ्वीवर होण्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९, १०) देवाचे राज्य हे एक सरकार आहे जे संपूर्ण पृथ्वीवर राज्य करील आणि ते पृथ्वीवरील कोणत्याही राजधानीवरून नव्हे तर स्वर्गातून राज्य करील. यास्तव, येशूने त्यास ‘स्वर्गाचे राज्य’ असे म्हटले.—मत्तय ११:१२.

जो आपल्या भावी प्रजेसाठी मरण पावला त्या येशू ख्रिस्ताशिवाय या राज्याचा आणखी कोण उत्तम राजा ठरू शकेल? (यशया ९:६, ७; योहान ३:१६) हा परिपूर्ण राजा, जो सध्या एक शक्‍तिशाली आत्मिक व्यक्‍ती आहे, तो लवकरच श्‍वापद, त्याचे राजे आणि त्याचे सैन्य यांना संपूर्ण नाशास सूचित करणाऱ्‍या “जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात” टाकेल. पण तो एवढ्यावरच थांबणार नाही. कोणा मानवाला न जमलेले काम तो करणार आहे—तो सैतानाला नष्ट करणार आहे.—प्रकटीकरण ११:१५; १९:१६, १९-२१; २०:२, १०.

देवाचे राज्य आपल्या सर्व आज्ञाधारक प्रजेसाठी शांतीचे राज्य आणेल. (स्तोत्र ३७:११, २९; ४६:८, ९) दुःख, शोक आणि मरण देखील राहणार नाही. श्‍वापदाचे चिन्ह स्वतःवर लावून न घेणाऱ्‍यांकरता किती भव्य आशा!—प्रकटीकरण २१:३, ४.

[तळटीपा]

^ परि. 9 या वचनांवरील तपशीलवार चर्चेसाठी, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पुस्तकाचा अध्याय २८ पाहा.

^ परि. 11 मानवी शासन हे सहसा पशूसमान असते याची जाणीव असतानाही खरे ख्रिस्ती, बायबलच्या आदेशानुसार सरकारी “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या” अधीन राहतात. (रोमकर १३:१) हे अधिकारी त्यांना देवाच्या नियमाविरुद्ध कार्य करायला लावतात तेव्हा मात्र ते “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा” मानतात.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

[५ पानांवरील चौकट]

६६६ चा अर्थ शोधण्यासाठी सुगावे

१. बायबलमधील नावे सहसा ते नाव धारण करणाऱ्‍याच्या गुणांचे किंवा जीवनाचे वर्णन करतात; जसे की, अब्राहाम, येशू आणि इतर अनेकांच्या बाबतीत केले आहे. त्याचप्रमाणे, श्‍वापदाचे संख्यारूपी नाव त्याच्या गुणांचे सूचक आहे.

२. बायबलमधील दानीएलाच्या पुस्तकात, विविध श्‍वापदे एकामागोमाग आलेल्या मानवी राज्यांचे किंवा साम्राज्यांचे प्रतिनिधीत्व करतात. प्रकटीकरण १३:१, २ मधील संमिश्र श्‍वापद जागतिक राजकीय व्यवस्थेला सूचित करते ज्याला सैतानाकडून अधिकार मिळाला आहे आणि जो त्याच्या हातात आहे.

३. त्या श्‍वापदाची संख्या ‘माणसाची संख्या’ किंवा “मनुष्यांची संख्या” असल्यामुळे ते दुरात्म्याला नव्हे तर मानवाला सूचित करते. अशाप्रकारे, ते पाप आणि अपरिपूर्णतेमुळे निर्माण होणाऱ्‍या मानवी अपरिपूर्णतेला सूचित करते.

४. देवाच्या नजरेत, सहा ही संख्या, बायबलनुसार संपूर्ण किंवा परिपूर्ण याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या सात या संख्येपेक्षा कमी असल्यामुळे ती अपरिपूर्णतेला सूचित करते. या संख्येची तीन वेळा पुनरुक्‍ती करून ६६६ हे चिन्ह त्या अपरिपूर्णतेवर जोर देते.

[६ पानांवरील चित्रे]

मानवी शासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे हे ६६६ या संख्येने सूचित होते

[चित्राचे श्रेय]

उपाशी मूल: UNITED NATIONS/Photo by F. GRIFFING

[७ पानांवरील चित्रे]

येशू ख्रिस्त पृथ्वीवर परिपूर्णतेचे राज्य आणील