व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनातल्या चढउतारांना तोंड देताना पवित्र आत्म्यावर विसंबून राहा

जीवनातल्या चढउतारांना तोंड देताना पवित्र आत्म्यावर विसंबून राहा

जीवनातल्या चढउतारांना तोंड देताना पवित्र आत्म्यावर विसंबून राहा

“देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.”—२ तीमथ्य २:१५.

१. कोणत्या बदलांमुळे आपल्या आध्यात्मिक कल्याणाकरता आव्हान निर्माण होऊ शकते?

आपल्या भोवतालचे जग सतत बदलत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विलक्षण प्रगती झाली आहे; पण त्याच वेळेस नैतिक मूल्यांचा ऱ्‍हास होत असतानाही आपण पाहात आहोत. याआधीच्या लेखात आपण विचारात घेतल्याप्रमाणे जगातल्या देव-विरोधी आत्म्याचा आपण प्रतिकार केला पाहिजे. पण जसजसे जग बदलते तसतसे आपल्यातही अनेक बदल होत जातात. आपण बालपणातून प्रौढावस्थेत जातो. आपली आर्थिक स्थिती, शारीरिक प्रकृती एकतर सुधारते किंवा ढासळते; नवी नाती जुळतात, तर काही माणसे कायमची दुरावतात. यांपैकी बरेच बदल आपल्या नियंत्रणापलीकडले असतात. आणि आपल्या आध्यात्मिक कल्याणाच्या दृष्टीने हे बदल काही नवी व कठीण आव्हाने निर्माण करू शकतात.

२. दाविदाच्या जीवनात कशाप्रकारचे बदल घडून आले?

पण यिशैचा पुत्र दावीद याच्या जीवनात आले तितके टोकाचे चढउतार फार कमी लोकांच्या जीवनात आले असतील. अल्पावधीतच दावीद एका सामान्य मेंढपाळापासून अचानक राष्ट्रीय ख्यातीचा वीरपुरुष बनला. यानंतर, शिकारी सावजाचा करतो त्याप्रमाणे एका मत्सरी राजाने त्याचा पाठलाग सुरू केल्यामुळे त्याला फरार व्हावे लागले. कालांतराने दावीद एक राजा व पराक्रमी विजेता बनला. गंभीर पाप केल्यामुळे त्याला दुःखदायी परिणाम भोगावे लागले. त्याच्या कुटुंबात अनर्थकारी घटना घडल्या आणि फाटाफूट झाली. त्याने अमाप संपत्ती साठवली, म्हातारा झाला आणि वृद्धापकाळाची दुर्बलता अनुभवली. हे सर्व बदल दाविदाच्या जीवनात झाले तरीसुद्धा त्याने यहोवावर व त्याच्या आत्म्यावर भरवसा असल्याचे जीवनभर दाखवले. देवाच्या “पसंतीस उतरलेला” असा स्वतःला सादर करण्याकरता त्याने मनस्वी प्रयत्न केले आणि देवानेही त्याला आशीर्वादित केले. (२ तीमथ्य २:१५) आपली परिस्थिती दाविदापेक्षा वेगळी असली तरीसुद्धा त्याने आपल्या जीवनातल्या घटनांना ज्याप्रकारे तोंड दिले त्यावरून आपण बरेच काही शिकू शकतो. त्याचे उदाहरण आपल्याला हे समजण्यास मदत करेल की आपल्या जीवनातील चढउतारांना तोंड देताना आपण देवाच्या आत्म्याची मदत कशाप्रकारे सदोदित मिळवू शकतो.

दाविदाची नम्रता—एक उत्तम आदर्श

३, ४. एका सामान्य मेंढपाळापासून दावीद राष्ट्रीय ख्यातीचा पुरुष कसा बनला?

बालपणी, दाविदाला त्याच्या स्वतःच्या कुटुंबातही फारसे महत्त्व नव्हते. संदेष्टा शमुवेल बेथलेहेमला आला तेव्हा दाविदाच्या पित्याने आपल्या आठ मुलांपैकी सात जणांना त्याच्यासमोर आणले. पण सर्वात धाकटा दावीद जो मेंढरे राखीत होता, त्याला बोलवण्याची कोणालाही गरज वाटली नाही. यहोवाने मात्र दाविदालाच इस्राएलचा भावी राजा होण्याकरता निवडले होते. दाविदाला शेतातून बोलावण्यात आले. यानंतर बायबलच्या वृत्तान्तात असे म्हटले आहे: “शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्‍वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला.” (१ शमुवेल १६:१२, १३) दावीद आपल्या सबंध जीवनात याच आत्म्यावर विसंबून राहिला.

लवकरच हा लहानगा मेंढपाळ राष्ट्रीय ख्याती मिळवणार होता. त्याला राजासमोर हजर राहून त्याच्याकरता संगीतवादन करण्याकरता बोलावणे आले. इस्राएलचे अनुभवी सैनिक देखील ज्याला तोंड देण्यास धजत नव्हते त्या गल्याथ नावाच्या एका क्रूर राक्षसी शत्रूला त्याने जिवे मारले. दाविदाला योद्ध्‌यांवर नेमण्यात आले तेव्हा त्याने पलिष्ट्यांवर विजय मिळवला. त्याने लोकांचे मन जिंकले होते. ते गीत रचून त्याची स्तुती करत. काही काळाआधी शौल राजाच्या एका सेवकाने दाविदाचे वर्णन करताना, तो “वादनकलेत निपुण” आहे असे म्हणण्यासोबतच तो “प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्‍ता असून रूपवान आहे,” असेही म्हटले.—१ शमुवेल १६:१८; १७:२३, २४, ४५-५१; १८:५-७.

५. कोणत्या गोष्टी दाविदाला गर्विष्ठ बनवू शकल्या असत्या पण तो गर्विष्ठ बनला नाही हे आपण का म्हणू शकतो?

प्रसिद्धी, रूप, तारुण्य, वक्‍तृत्वकला, संगीतकलेत नैपुण्य, लष्करी कौशल्य, देवाची कृपा—दाविदाजवळ काय नव्हते? यांपैकी कोणतीही एक गोष्ट त्याला गर्विष्ठ बनवण्याकरता पुरेशी होती, पण सर्व असूनही तो गर्विष्ठ बनला नाही. शौल राजाने आपली उपवर मुलगी दाविदाला देऊ केली तेव्हा दाविदाने काय उत्तर दिले ते पाहा. खरी नम्रता दाखवून दाविदाने म्हटले: “राजाचा जावई व्हावे असा मी कोण? माझे जीवित ते काय? आणि इस्राएलात माझ्या बापाचे कूळ ते काय?” (१ शमुवेल १८:१८) या वचनावर एका विद्वानाने अशी टिप्पणी केली: “दाविदाला म्हणायचे होते, की वैयक्‍तिक योग्यता, सामाजिक प्रतिष्ठा किंवा कूळ यांपैकी कोणत्याच आधारावर तो राजाचा जावई बनण्याचा बहुमान स्वीकारण्यास लायक असल्याचा दावा करू शकत नव्हता.”

६. आपण नम्रता का उत्पन्‍न करावी?

दावीद नम्र होता, कारण अपरिपूर्ण मानवापेक्षा प्रत्येक बाबतीत यहोवा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे हे त्याने ओळखले होते. किंबहुना, देव माणसाची दखल घेतो याबद्दल दाविदाने आश्‍चर्य व्यक्‍त केले. (स्तोत्र १४४:३) शिवाय, यहोवाने नम्रपणे वाकून आपला सांभाळ केला, आपले संरक्षण केले व आपली काळजी वाहिली म्हणूनच आपल्याजवळ जी काही थोरवी आहे, ती आपल्याला मिळवता आली याचीही दाविदाला जाणीव होती. (स्तोत्र १८:३५) आपल्याकरता किती सुरेख आदर्श! आपल्याजवळ असलेले गुण, आपण साध्य केलेल्या गोष्टी, आणि आपल्या विशेषाधिकारांनी कधीही आपल्याला गर्विष्ठ बनवू नये. प्रेषित पौलाने लिहिले, “जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” (१ करिंथकर ४:७) देवाचा पवित्र आत्मा मिळवण्याकरता व त्याच्या पसंतीस उतरण्याकरता आपण नम्रता उत्पन्‍न करून ती कायम राखली पाहिजे.—याकोब ४:६.

“सूड उगवू नका”

७. शौल राजाचा वध करण्याची संधी कशाप्रकारे दाविदाकडे आपोआप चालून आली?

दाविदाच्या ख्यातीमुळे त्याच्या मनात गर्व उत्पन्‍न झाला नाही, पण शौल राजा, ज्याच्यापासून देवाचा आत्मा निघून गेला होता, त्याच्या मनात मात्र द्वेष निर्माण झाला; इतका की तो दाविदाच्या जिवावर उठला. दाविदाने कोणतीही चूक केली नसताना त्याला आपला जीव घेऊन पळावे लागले व तो रानावनात राहू लागला. एकदा, दाविदाचा पाठलाग करत असताना राजा शौल एका गुहेत शिरला. या गुहेतच दावीद व त्याचे सोबती लपले आहेत हे त्याला माहीत नव्हते. दाविदाच्या माणसांनी, जणू देवानेच दिली आहे असे भासणाऱ्‍या या सुसंधीचा फायदा उचलून शौलाचा वध करण्यास त्याला आग्रह केला. त्या अंधाऱ्‍या गुहेत दाविदाच्या कानात पुढील शब्द ते कसे कुजबुजले असतील याची आपण कल्पना करू शकतो: “परमेश्‍वराने आपणाला सांगितले होते की पाहा, मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर; हे घडून येण्याचा दिवस आज प्राप्त झाला आहे.”—१ शमुवेल २४:२-६.

८. सूड घेण्याच्या संधी मिळूनही दाविदाने स्वतःवर ताबा का ठेवला?

दाविदाने शौलाला कोणत्याही प्रकारे इजा करण्यास नकार दिला. त्याने विश्‍वास व संयम दाखवला व सर्व गोष्टी स्वखुषीने यहोवाच्या हाती सोपवल्या. राजा गुहेतून बाहेर पडल्यावर दावीदाने त्याला हाक मारून म्हटले: “परमेश्‍वर माझ्यातुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्‍वरच मजबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपणावर पडावयाचा नाही.” (१ शमुवेल २४:१२) शौलाचे चुकले आहे हे माहीत असूनही दाविदाने सूड उगवला नाही; शिवाय, तो शौलाशी किंवा त्याच्याविषयी इतर कोणाशी अपमानास्पद रितीने बोलला देखील नाही. यानंतर आणखी कित्येक प्रसंगी, दाविदाने सूड उगवण्याची संधी मिळूनही स्वतःवर ताबा ठेवला. त्याऐवजी, यहोवाच्या न्यायाकरता तो त्याच्यावरच विसंबून राहिला.—१ शमुवेल २५:३२-३४; २६:१०, ११.

९. विरोध किंवा छळ सहन करावा लागल्यास आपण जशास तशी वागणूक का देऊ नये?

दाविदाप्रमाणे तुमच्यावरही कठीण प्रसंग येऊ शकतात. कदाचित शाळासोबती, सहकर्मचारी, कुटुंबीय किंवा वेगळ्या विश्‍वासाच्या अन्य व्यक्‍ती तुमचा विरोध किंवा छळही करतील. अशा वेळी जशास तशी वागणूक देऊ नका. यहोवावर भरवसा ठेवा आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता प्रार्थना करा. कोण जाणे, कदाचित विश्‍वास न ठेवणाऱ्‍या त्या व्यक्‍ती तुमचे चांगले वर्तन पाहून प्रभावित होतील व सत्य मानू लागतील. (१ पेत्र ३:१) असे घडले नाही तरीही, यहोवा तुमची परिस्थिती जाणतो आणि त्याला योग्य वाटेल त्या वेळी तो जरूर काहीतरी कारवाई करेल याची खात्री बाळगा. प्रेषित पौलाने लिहिले: “सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन.’”—रोमकर १२:१९.

‘बोध ऐक’

१०. दावीद पापात कसा पडला आणि त्याने आपले पाप लपवण्याचा कशाप्रकारे प्रयत्न केला?

१० अनेक वर्षे लोटली. दावीद लोकप्रिय व अतिशय प्रतिष्ठित राजा बनला. त्याचे उल्लेखनीय विश्‍वासू मार्गाक्रमण तसेच यहोवाच्या स्तुतीकरता त्याने लिहिलेली सुरेख स्तोत्रे यामुळे कोणालाही असे वाटले असते की हा माणूस कधीही गंभीर पाप करू शकत नाही. पण तो पापात पडला. एके दिवशी दाविद राजाने आपल्या महालाच्या छतावरून एका सुंदर स्त्रीला स्नान करत असताना पाहिले. त्याने तिच्याविषयी चौकशी केली. तिचे नाव बथशीबा असून तिचा पती उरीया युद्धाला गेला आहे हे कळल्यावर दाविदाने आपल्या माणसांना तिला महालात आणण्यास सांगितले आणि त्याने तिच्यासोबत प्रसंग केला. नंतर तिला दिवस गेल्याचे त्याला कळले. हे प्रकरण उघडकीस आल्यास केवढी बदनामी होईल! मोशेच्या नियमशास्त्रानुसार जारकर्म करणाऱ्‍यास मृत्यूदंड दिला जात असे. राजाने विचार केला की कदाचित हे पाप लपवून टाकता येईल. म्हणून त्याने सैन्यास निरोप पाठवून उरीयाला जेरूसलेमला येण्याचा हुकूम दिला. दाविदाला वाटले की उरीया रात्री बथशेबेकडे जाईल पण तसे घडले नाही. नाईलाजास्तव, दाविदाने उरीयाला परत युद्धास पाठवले आणि त्याच्या हाती सैन्यप्रमुख यवाबाकरता पत्र पाठवले. या पत्रात त्याने युद्धात उरीयास अशा ठिकाणी ठेवण्याची सूचना दिली की जेथे तो हमखास मारला जाईल. यवाबाने या आज्ञेप्रमाणे केले आणि उरीया मारला गेला. नवऱ्‍याच्या मृत्यूचा शोक करणाऱ्‍या बथशेबाचे सुतक संपल्यावर दाविदाने तिच्याशी लग्न केले.—२ शमुवेल ११:१-२७.

११. नाथानाने दाविदासमोर कोणती समस्या मांडली आणि यावर दाविदाची काय प्रतिक्रिया होती?

११ राजाची युक्‍ती कामी पडली असे भासले तरीसुद्धा यहोवासमोर सर्वकाही उघड होते याची जाणीव दाविदाला असायला हवी होती. (इब्री लोकांस ४:१३) काही महिन्यांनंतर मूल जन्माला आले. मग देवाने नाथान संदेष्ट्याला दाविदाकडे पाठवले. संदेष्ट्याने राजासमोर एक उदाहरण मांडले, ज्यात एक श्रीमंत माणूस आपल्याजवळ अनेक मेंढरे असूनही एका गरीब माणसाजवळ असलेली एकुलती एक व प्रिय मेंढी घेतो व तिला कापतो. ही गोष्ट ऐकल्यावर दाविदाची न्यायबुद्धी जागी झाली खरी, पण गोष्टीचे तात्पर्य काय असावे त्याविषयी त्याला शंकासुद्धा आली नाही. दाविदाने लगेच त्या श्रीमंत माणसाविरुद्ध निवाडा दिला. संतप्त होऊन तो नाथानाला म्हणाला: “ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे.”—२ शमुवेल १२:१-६.

१२. यहोवाने दाविदाविरुद्ध कशाप्रकारे न्याय दिला?

१२ “तो मनुष्य तूच आहेस,” संदेष्ट्याने उत्तर दिले. दाविदाने स्वतःचाच न्याय केला होता. आता मात्र त्याला संताप नव्हे तर घोर लज्जा व तीव्र खेद वाटला असेल. नाथान यहोवाचा अटळ न्यायदंड विदीत करू लागला तेव्हा दावीद केवळ अवाक होऊन ऐकत राहिला. नाथानाजवळ दाविदासाठी सांत्वनाचे किंवा दिलासा देणारे शब्द मुळीच नव्हते. दाविदाने वाईट कृत्य केले होते व त्याद्वारे यहोवाच्या वचनाला तुच्छ लेखले होते. त्याने उरीयाचा शत्रूच्या तरवारीने घात केला होता ना? तर आता तरवार त्याचे घर सोडणार नाही. त्याने गुप्तपणे उरीयाच्या पत्नीला आपल्या घरात घेतले होते ना? त्याच्यावरही असेच अरिष्ट येईल, तेसुद्धा गुप्ततेत नव्हे तर सर्वांच्या देखत.—२ शमुवेल १२:७-१२.

१३. यहोवाने दिलेल्या शासनाला दाविदाची काय प्रतिक्रिया होती?

१३ पण एक मात्र होते, दाविदाने आपल्या पापावर पांघरूण घातले नाही. तो उलटून संदेष्टा नाथानाला भलेबुरे बोलला नाही. त्याने आपल्या पापांचा दोष इतरांवर टाकण्याचा किंवा आपण जे केले त्याकरता सबब देण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे पाप त्याच्या समोर मांडण्यात आले तेव्हा दाविदाने ते पदरी घेतले व म्हणाला: “मी परमेश्‍वराविरुद्ध पातक केले आहे.” (२ शमुवेल १२:१३) या पापामुळे त्याला झालेल्या मानसिक यातना आणि त्याचा मनस्वी पश्‍चाताप स्तोत्र ५१ यातील शब्दांतून प्रतिबिंबित होतो. यहोवाची करुणा भाकीत तो म्हणाला: “मला आपल्यापुढून घालवून देऊ नको; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.” दयाळू परमेश्‍वर यहोवा एक “भग्न व अनुतप्त हृदय” तुच्छ लेखणार नाही याची दाविदाला खात्री होती. (स्तोत्र ५१:११, १७) तो देवाच्या आत्म्यावर विसंबून राहिला. यहोवाने दाविदाला त्याच्या पापाच्या दुष्परिणामांपासून वाचवले नाही तरीसुद्धा त्याने दाविदाला क्षमा केली.

१४. यहोवाच्या अनुशासनाला आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवावी?

१४ आपण सर्व अपरिपूर्ण आहोत आणि आपल्या सर्वांच्या हातून पाप घडते. (रोमकर ३:२३) कधीकधी, दाविदाप्रमाणे आपल्या हातून गंभीर पापही घडण्याची शक्यता आहे. एक प्रेमळ पिता आपल्या मुलांना शिस्त लावतो त्याप्रमाणे यहोवा देखील त्याची सेवा करू इच्छिणाऱ्‍यांच्या चुका सुधारतो. त्याचे शासन हितकारक असले तरीसुद्धा ते स्वीकारण्यास नेहमीच सोपे नसते. किंबहुना, कधीकधी त्याची शिक्षा “खेदाची वाटते.” (इब्री लोकांस १२:६, ११) पण जर आपण ‘बोध ऐकला’ तर यहोवासोबत आपला दुरावलेला संबंध पूर्ववत होऊ शकतो. (नीतिसूत्रे ८:३३) यहोवाच्या आत्म्याचा आशीर्वाद सदोदित आपल्याला मिळत राहण्याकरता आपण त्याच्या सुधारणुकीचा बोध मनावर घेऊन त्याच्या पसंतीस उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चंचल धनावर आशा ठेवू नका

१५. (अ) काही लोक आपल्या धनाचा कशाप्रकारे वापर करतात? (ब) दाविदाला आपल्या संपत्तीचा कशाप्रकारे वापर करण्याची इच्छा होती?

१५ दावीद एका प्रतिष्ठित घराण्यातून आला होता किंवा त्याचे कुटुंब अतिशय धनाढ्य होते असे कोठेही सूचित केलेले नाही. अर्थात राजपदावर आल्यानंतर दाविदाने अमाप संपत्ती मिळवली. बरेचजण आपली संपत्ती साठवून ठेवतात, ती कसेही करून वाढवण्याकरता काहीजण हपापलेले असतात, तर काहीजण केवळ आपले स्वार्थ पुरे करण्यासाठी ती खर्च करतात. इतरजण स्वतःचे नाव करण्याकरता आपल्या पैशाचा वापर करतात. (मत्तय ६:२) पण दावीदाने आपल्या संपत्तीचा वेगळ्याप्रकारे वापर केला. त्याला यहोवाचे गौरव करण्याची लालसा होती. त्याने यहोवाकरता एक मंदिर बांधण्याची आपली इच्छा नाथानाजवळ बोलून दाखवली. जेणेकरून जेरूसलेममध्ये “तंबूत” ठेवलेला कराराच्या कोश त्यात स्थापन करता येईल. दाविदाच्या या इराद्याविषयी ऐकून यहोवाला संतोष वाटला पण त्याने नाथानाच्याद्वारे दाविदाला सांगितले की मंदिराचे बांधकाम त्याचा पुत्र शलमोन करेल.—२ शमुवेल ७:१, २, १२, १३.

१६. दाविदाने मंदिराच्या बांधकामाकरता काय काय तयारी केली?

१६ या भव्य बांधकाम प्रकल्पाकरता दाविदाने साहित्य गोळा केले. शलमोनाला त्याने म्हटले: “परमेश्‍वराच्या मंदिराप्रीत्यर्थ एक लक्ष किक्कार सोने व दहा लक्ष किक्कार चांदी सिद्ध केली आहे; पितळ व लोखंड ही तर अतिशयित आहेत, ती अपरिमित आहेत; लाकूड व चिरे ही मी तयार केली आहेत, तुलाहि त्यात भर घालिता येईल.” आपल्या स्वतःच्या संपत्तीतून त्याने तीन हजार किक्कार सोने व सात हजार किक्कार रूपे दिले. * (१ इतिहास २२:१४; २९:३, ४) दाविदाने हे उदारपणे दिलेले दान केवळ दिखावा नसून यहोवा देवावर त्याला असलेल्या विश्‍वासाचा व त्याच्या भक्‍तिभावाचा पुरावा होता. आपल्या धनाचा उगम यहोवाच आहे हे कबूल करून दाविदाने त्याला म्हटले: “सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते; तुझ्या हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहो.” (१ इतिहास २९:१४) शुद्ध उपासनेच्या वृद्धीकरता जे काही शक्य होते ते करण्यास दाविदाच्या उदार मनाने त्यास प्रवृत्त केले.

१७. पहिले तीमथ्य ६:१७-१९ यातील सल्ला श्रीमंत व गरीब दोन्ही प्रकारच्या लोकांना कशाप्रकारे लागू होतो?

१७ आपणही आपल्या भौतिक संपत्तीचा वापर चांगल्या कार्यांसाठी करावा. भौतिकवादी जीवनशैलीच्या मागे लागण्याऐवजी देवाच्या पसंतीस उतरण्याचा प्रयत्न करणे केव्हाही चांगले—हाच खऱ्‍या सुज्ञतेचा व आनंदाचा मार्ग आहे. पौलाने लिहिले: “प्रस्तुत युगातल्या धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी; चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.” (१ तीमथ्य ६:१७-१९) आपली आर्थिक स्थिती कशीही असो, आपण देवाच्या आत्म्यावर विसंबून राहू या व “देवविषयक बाबतीत धनवान” होता येईल अशाप्रकारे जीवन व्यतीत करू या. (लूक १२:२१) आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्यासमोर आपल्याला स्वच्छ मनाने उभे राहता यावे व त्याने आपल्याला मान्य करावे यापेक्षा अधिक मोलाचे काहीही नाही.

देवाच्या पसंतीस उतरलेला असा स्वतःला सादर कर

१८. दाविदाने ख्रिश्‍चनांकरता एक उत्तम आदर्श कशाप्रकारे मांडला?

१८ दाविदाने जीवनभर यहोवाची संमती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. एका स्तोत्रात त्याने अशी याचना केली: “हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करितो.” (स्तोत्र ५७:१) यहोवावर त्याने ठेवलेला भरवसा व्यर्थ ठरला नाही. दावीद वृद्ध व “आयुष्यात तृप्त” झाला. (१ इतिहास २३:१, NW) त्याच्या हातून गंभीर चुका झाल्या तरीसुद्धा, देवावर उल्लेखनीय विश्‍वास प्रकट केलेल्या अनेक साक्षीदारांमध्ये त्याची आठवण केली जाते.—इब्री लोकांस ११:३२.

१९. देवाच्या पसंतीस उतरलेले असे आपण स्वतःला कशाप्रकारे सादर करू शकतो?

१९ जीवनातल्या चढउतारांना तोंड देत असताना आठवणीत असू द्या की जसे यहोवाने दाविदाला सांभाळले, सामर्थ्य दिले व सुधारले त्याचप्रकारे तो तुमच्याकरताही करू शकतो. दाविदाप्रमाणे प्रेषित पौलानेही जीवनात अनेक चढउतारांना तोंड दिले होते. पण देवाच्या आत्म्यावर विसंबून तो देखील विश्‍वासू राहिला. त्याने असे लिहिले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१२, १३) आपण यहोवावर विसंबून राहिल्यास तो आपल्याला यशस्वी होण्यास मदत करेल. आपण यशस्वी व्हावे अशीच त्याची इच्छा आहे. जर आपण त्याचे ऐकले व त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता सामर्थ्य देईल. आणि जर आपण देवाच्या आत्म्यावर सदोदित विसंबून राहिलो तर आपल्याला आता व सर्वकाळ ‘देवाच्या पसंतीस उतरलेले असे स्वतःला सादर करणे’ शक्य होईल.—२ तीमथ्य २:१५.

[तळटीप]

^ परि. 16 आजच्या मापदंडाने दाविदाने उभा केलेला निधी ५,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होता.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• गर्विष्ठपणापासून आपण कशाप्रकारे सांभाळून राहू शकतो?

• आपण सूड उगवण्याचा प्रयत्न का करू नये?

• आपल्याला मिळणाऱ्‍या शासनाविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा?

• धनापेक्षा आपण देवावर भरवसा का ठेवावा?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चित्र]

दावीद देवाच्या आत्म्यावर विसंबून राहिला आणि देवाची संमती मिळवण्यास झटला. तुम्ही असेच करत आहात का?

[१८ पानांवरील चित्र]

“सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते; तुझ्या हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहो”