व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रतिफळ तुमच्या दृष्टिक्षेत्रात केंद्रस्थानी आहे का?

प्रतिफळ तुमच्या दृष्टिक्षेत्रात केंद्रस्थानी आहे का?

प्रतिफळ तुमच्या दृष्टिक्षेत्रात केंद्रस्थानी आहे का?

हा रोग नकळत वाढतो. सुरवातीला, त्याने बाजूची दृष्टी कमी होत जाते. यावर उपचार न केल्यास समोरची दृष्टी देखील नष्ट होऊ शकते. सरतेशेवटी, त्याने पूर्ण अंधत्व येऊ शकते. हा कोणता रोग आहे? काचबिंदू. अंधत्वाचे हे प्रमुख कारण आहे.

आपली खरी दृष्टी ज्याप्रमाणे हळूहळू आणि नकळत नष्ट होऊ शकते त्याचप्रमाणे याहून आणखी महत्त्वाची असलेली दुसरी एक दृष्टी—आपली आध्यात्मिक दृष्टी—देखील नष्ट होऊ शकते. यास्तव, आध्यात्मिक गोष्टींना आपल्या दृष्टिक्षेत्रात केंद्रस्थानी ठेवण्याची गरज आहे.

प्रतिफळ, दृष्टिक्षेत्राच्या केंद्रस्थानी ठेवणे

आपल्या खरोखरच्या डोळ्यांना दिसणाऱ्‍या ‘अदृश्‍य गोष्टींमध्ये’ सार्वकालिक जीवनाचे भव्य प्रतिफळ आहे जे यहोवा आपल्या विश्‍वासू जनांना देऊ करतो. (२ करिंथकर ४:१८) अर्थात, ख्रिस्ती प्रामुख्याने देवाबद्दल प्रेम असल्यामुळे त्याची सेवा करतात. (मत्तय २२:३७) परंतु, आपण आपल्या प्रतिफळाची उत्सुकतेने वाट पाहावी अशी यहोवाची इच्छा आहे. आपण त्याला उदार पिता समजावे व “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ” देतो असे मानावे अशी त्याची इच्छा आहे. (इब्री लोकांस ११:६) यास्तव, देवाला खरोखर ओळखणारे आणि त्याच्यावर प्रेम करणारे त्याने वचन दिलेल्या आशीर्वादांना मौल्यवान समजतात आणि त्यांची पूर्णता होण्याची वाट पाहतात.—रोमकर ८:१९, २४, २५.

या पत्रिकेचे व याच्या सोबतीचे नियतकालिक, सावध राहा! याचे अनेक वाचक येणाऱ्‍या परादीस पृथ्वीच्या चित्रांचा आनंद लुटतात. अर्थात, परादीस पृथ्वी नेमकी कशी दिसेल हे आम्हाला माहीत नाही आणि प्रकाशित केलेली चित्रे यशया ११:६-९ सारख्या बायबलमधील उताऱ्‍यांवर आधारलेली कलाकाराची रेखाटने आहेत. तरीसुद्धा एका ख्रिस्ती स्त्रीने असे म्हटले: “टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यात येणाऱ्‍या परादीसची चित्रे मी पाहते तेव्हा मी त्यांचे एखाद्या पर्यटन पुस्तिकेतील चित्रांप्रमाणे बारकाईने परीक्षण करते. मी स्वतःला त्या चित्रात पाहायचा प्रयत्न करते कारण देवाच्या नियुक्‍त वेळी मी तेथेच असण्याची अपेक्षा करते.”

प्रेषित पौलाला देखील आपल्या ‘वरील पाचारणाविषयी’ असेच वाटले. आपल्याला ते मिळाले आहे असे गृहीत धरून तो चालत नव्हता कारण त्याकरता त्याला शेवटपर्यंत विश्‍वासू असल्याचे सिद्ध करून दाखवायचे होते. परंतु, तो “पुढील गोष्टींकडे लक्ष लावून” राहिला. (फिलिप्पैकर ३:१३, १४) त्याचप्रमाणे, येशूने, “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता” वधस्तंभावरील मृत्यू सहन केला.—इब्री लोकांस १२:२.

नवीन जगात प्रवेश मिळण्याबाबत तुमच्या मनात कधी शंका आली आहे का? फाजील आत्मविश्‍वास बाळगणे निश्‍चितच चांगले नाही कारण जीवनाचे बक्षीस मिळवणे हे आपण शेवटपर्यंत विश्‍वासू राहतो की नाही यावर अवलंबून आहे. (मत्तय २४:१३) तथापि, देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण होता होईल तितका प्रयत्न केला तर प्रतिफळ प्राप्त करण्याविषयी आपण पूर्ण शाश्‍वती बाळगू शकतो. हे लक्षात ठेवा की, “कोणाचा नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) यहोवावर आपण भरवसा ठेवला तर आपले ध्येय प्राप्त करण्यास तो आपल्याला मदत करेल. जे प्रामाणिकपणे त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात अशांना अयोग्य ठरवण्यासाठी निमित्त शोधणे हे त्याच्या व्यक्‍तिमत्वाच्या उलट आहे.—स्तोत्र १०३:८-११; १३०:३, ४; यहेज्केल १८:३२.

यहोवाला आपल्या लोकांबद्दल कसे वाटते हे जाणल्यावर आपल्याला आशा मिळते आणि हा गुण विश्‍वासाइतकाच महत्त्वाचा आहे. (१ करिंथकर १३:१३) बायबलमध्ये “आशा” असे भाषांतरित केलेल्या ग्रीक शब्दामध्ये, उत्कंठेने “चांगल्या गोष्टीची अपेक्षा” करणे ही कल्पना येते. हीच आशा मनात बाळगून प्रेषित पौलाने लिहिले: “आमची अशी इच्छा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्‍त करावी; म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्‍वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” (इब्री लोकांस ६:११, १२) लक्ष द्या की, आपण यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहिलो तर आपली आशा वास्तविकतेत उतरण्याची खातरी आपण बाळगू शकतो. जगातील पुष्कळ आकांक्षांप्रमाणे “या आशेची निराशा होत नाही.” (रोमकर ५:५, मराठी कॉमन लँग्वेज) तर मग आपण आपली आशा जिवंत आणि दृष्टिक्षेत्राच्या केंद्रस्थानी कशी ठेवू शकतो?

आपली आध्यात्मिक दृष्टी तीक्ष्ण कशी करावी

आपले शारीरिक डोळे एकाच वेळी दोन वस्तूंवर केंद्रीत होऊ शकत नाहीत. आध्यात्मिक दृष्टीच्या बाबतीतही हेच खरे आहे. सध्याच्या व्यवस्थीकरणातील वस्तूंवर आपण केंद्रीत झालो तर देवाने वचन दिलेले नवीन जग आपल्या मनातून काहीसे धुसर होईल यात शंका नाही. कालांतराने, धुसर झालेले हे बाजूकडील चित्र तितकेसे आकर्षक वाटणार नाही आणि ते नाहीसे होऊन जाईल. ही किती दुःखाची गोष्ट ठरेल! (लूक २१:३४) त्यामुळे, आपला “डोळा निर्दोष”—देवाच्या राज्यावर आणि सार्वकालिक जीवनाच्या प्रतिफळावर केंद्रीत असावा—हे किती महत्त्वाचे आहे!—मत्तय ६:२२.

आपला डोळा निर्दोष ठेवणे हे नेहमीच सोपे नाही. दररोजच्या समस्यांकडे लक्ष देणे भाग पडते आणि आपले लक्ष विचलित करणाऱ्‍या—मोहात पाडणाऱ्‍या गोष्टी देखील—आपल्या मार्गात असतील. या परिस्थितींमध्ये, आवश्‍यक कार्यहालचालींकडे दुर्लक्ष न करता, देवाचे राज्य आणि त्याने वचन दिलेले नवीन जग आपल्या दृष्टिक्षेत्राच्या केंद्रस्थानी ठेवणे कसे शक्य आहे? आपण तीन मार्गांचा विचार करू या.

देवाच्या वचनाचा दररोज अभ्यास करणे. नियमितपणे बायबल वाचल्याने आणि बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास केल्याने आध्यात्मिक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रीत राहण्यास मदत मिळते. हे खरे असेल की, आपण कित्येक वर्षांपासून देवाच्या वचनाचा अभ्यास करत असू, पण तो अभ्यास तसाच चालू ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे जिवंत राहण्याकरता शारीरिक भोजन खात राहावे लागते त्याप्रमाणेच हे आहे. आपण गतकाळात हजारो वेळा जेवलो आहोत म्हणून आपण खाण्याचे बंद करत नाही. म्हणून बायबलबद्दल आपण कितीही बारकाईने जाणत असलो तरी आपली आशा जिवंत राहण्यासाठी आणि आपला विश्‍वास व प्रेम मजबूत राहण्यासाठी सतत आध्यात्मिक पोषण घेत राहण्याची गरज आहे.—स्तोत्र १:१-३.

देवाच्या वचनाबद्दल कदर बाळगून मनन करा. मनन करणे आवश्‍यक का आहे? दोन कारणांसाठी. पहिले, मनन केल्याने वाचलेल्या गोष्टी आत्मसात करण्यास आणि त्याबद्दल मनापासून कदर बाळगण्यास मदत मिळते. दुसरे, मनन केल्याने यहोवाबद्दल, त्याच्या अद्‌भुत कार्यांबद्दल आणि त्याने आपल्याला दिलेल्या आशेबद्दल आपण विसरून जाणार नाही. उदाहरणार्थ: मोशेसोबत ईजिप्त सोडलेल्या इस्राएलांनी यहोवाच्या अद्‌भुत शक्‍तीचे प्रदर्शन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यांना त्यांच्या वतनापर्यंत पोहंचवताना त्यांनी त्याच्या प्रेमळ संरक्षणाचा अनुभव देखील घेतला होता. तरीही, इस्राएली वाग्दत्त देशाकडे जाताना अरण्यात पोहंचले न पोहंचले तोच त्यांच्या तक्रारी सुरू झाल्या; यावरून त्यांना मुळीच विश्‍वास नव्हता हे स्पष्ट झाले. (स्तोत्र ७८:११-१७) त्यांची समस्या काय होती?

लोकांनी, यहोवा आणि त्याने दिलेल्या अद्‌भुत आशेवर केंद्रीत राहण्याचे सोडले आणि तात्कालिक ऐषाराम व शारीरिक चिंतांवर ते केंद्रित झाले. अनेक इस्राएलांनी स्वतः चमत्कारिक चिन्हे व अद्‌भुत गोष्टी पाहिल्या होत्या परंतु ते विश्‍वासहीन लोकांप्रमाणे तक्रार करू लागले. स्तोत्र १०६:१३ यात म्हटले आहे की, “ते [यहोवाची] कृत्ये लवकरच विसरले.” (तिरपे वळण आमचे.) असा क्षमा न करता येण्याजोगा हलगर्जीपणा दाखवल्यामुळे ते वाग्दत्त देशात प्रवेश करू शकले नाहीत.

यास्तव, शास्त्रवचने किंवा बायबल अभ्यासाची साधने वाचताना वाचलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी वेळ काढा. अशाप्रकारे चिंतन तुमच्या आध्यात्मिक आरोग्याकरता आणि वाढीकरता आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, वरती स्तोत्र १०६ चा काही भाग उद्धृत केला आहे तो वाचताना यहोवाच्या गुणांवर मनन करा. इस्राएलांबरोबर तो किती सहनशील आणि दयाळु होता याचे निरीक्षण करा. वाग्दत्त देशात त्यांना पोहंचवण्यासाठी त्याने त्यांची किती मदत केली ते पाहा. त्यांनी सतत त्याच्याविरुद्ध बंड कसा केला ते पाहा. अशा कृतघ्न व कोडग्या वृत्तीच्या लोकांनी यहोवाच्या दयेची आणि सहनशीलतेची टोकापर्यंत परीक्षा घेतल्यामुळे यहोवाला किती मनोवेदना आणि दुःख झाले असेल ते समजण्याचा प्रयत्न करा. शिवाय, ३० आणि ३१ वचनांचे मनन केल्याने, ज्यात फीनहासाने नीतिमत्त्वाकरता घेतलेल्या खंबीर, धीट भूमिकेचे वर्णन केले आहे, आपल्याला खातरी पटते की यहोवा त्याच्या विश्‍वासू जनांना विसरत नाही आणि तो बहुतप्रमाणात प्रतिफळ देतो.

तुमच्या जीवनात बायबल तत्त्वांचे पालन करा. बायबल तत्त्वांचे आपण पालन करतो तेव्हा यहोवाचा सल्ला खरोखर फायदेकारक ठरतो याचा प्रत्यय आपल्याला येतो. नीतिसूत्रे ३:५, ६ यात म्हटले आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” अनेक लोकांनी अनैतिक जीवन जगल्यामुळे त्यांना मानसिक, भावनिक आणि शारीरिक दुष्परिणाम कसे भोगावे लागले आहेत याचा विचार करा. क्षणिक सुखाचा उपभोग घेतल्याने अशा लोकांना कित्येक वर्षे—आयुष्यभर देखील—पीडा भोगावी लागते. याच्याच अगदी उलट, ‘संकोचित मार्गावरून’ जे लोक चालत जातात त्यांना नवीन व्यवस्थेतील जीवनाची पूर्वझलक मिळते आणि यामुळे त्यांना जीवनाच्या मार्गावर चालत राहण्यास उत्तेजन मिळते.—मत्तय ७:१३, १४; स्तोत्र ३४:८.

बायबल तत्त्वांचे पालन करणे आव्हानात्मक असू शकते. अडचणीत असताना काही वेळा, शास्त्रवचनाच्या एकवाक्यतेत नसलेला उपाय समस्येवरचा तात्कालिक तोडगा आहे असे भासू शकते. उदाहरणार्थ, आर्थिक अडचण येते तेव्हा राज्याच्या हितांना दुय्यम स्थान देण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. परंतु, विश्‍वासाचे कार्य करणाऱ्‍यांना व आपली आध्यात्मिक दृष्टी कायम ठेवणाऱ्‍यांना खातरी मिळते की, शेवटी ‘देवाचे भय बाळगणाऱ्‍यांचे कल्याणच होईल.’ (उपदेशक ८:१२) काही वेळा एखाद्या ख्रिश्‍चनाला ओव्हरटाईम करावा लागेल पण त्याने एसावासारखे बनू नये ज्याने आध्यात्मिक गोष्टींना क्षुल्लक समजून त्या तुच्छ लेखल्या.—उत्पत्ति २५:३४; इब्री लोकांस १२:१६.

ख्रिस्ती या नात्याने आपली काय जबाबदारी आहे हे येशूने स्पष्टपणे समजावले आहे. आपण ‘पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटले’ पाहिजे. (मत्तय ६:३३) आपण असे केल्यास, यहोवा, आपल्या भौतिक गरजा पुरवण्याची खातरी करून आपल्याला पित्यासमान प्रेम दर्शवेल. ज्या गोष्टी त्याच्या चिंतेच्या आहेत त्यांविषयी काळजी करून आपण स्वतःवर दबाव आणावा अशी त्याची इच्छा नाही. अशाप्रकारची अनावश्‍यक चिंता आध्यात्मिक काचबिंदुसारखी असू शकते—तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास हळूहळू आपली दृष्टी कमी होऊन आपल्याला केवळ भौतिक चिंता दिसू लागतील आणि सरतेशेवटी आपल्याला आध्यात्मिक अंधत्व येऊ शकते. आपण त्याच स्थितीत राहिल्यास, यहोवाचा दिवस आपल्यावर पाशाप्रमाणे येईल. ही केवढी दुःखाची गोष्ट असेल!—लूक २१:३४-३६.

यहोशवाप्रमाणे केंद्रीत असा

आपली भव्य राज्य आशा आपण आपल्या दृष्टिक्षेत्राच्या केंद्रस्थानी ठेवू या आणि बाकीच्या जबाबदाऱ्‍यांना योग्य स्थानी ठेवू या. अभ्यास, मनन आणि बायबलच्या तत्त्वांचा अवलंब करण्याचा नित्यक्रम सातत्याने चालू ठेवल्याने आपण यहोशवाप्रमाणे आपल्या आशेविषयी आत्मविश्‍वास बाळगू शकतो. तो इस्राएल राष्ट्राला वाग्दत्त देशात घेऊन गेल्यावर म्हणाला: “आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.”—यहोशवा २३:१४.

राज्याच्या आशेमुळे तुम्हाला आणखी उत्साह आणि आनंद मिळो व हे तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये, निर्णयांमध्ये आणि कार्यांमध्ये दिसो.—नीतिसूत्रे १५:१५; रोमकर १२:१२.

[२१ पानांवरील चित्र]

नवीन जगात तुमचा प्रवेश होईल की नाही अशी शंका कधी तुम्हाला आली आहे का?

[२२ पानांवरील चित्र]

मनन हा बायबल अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे

[२३ पानांवरील चित्र]

राज्याच्या हितांवर केंद्रीत राहा