व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बदलत चाललेल्या जगाच्या आत्म्याचा विरोध करा

बदलत चाललेल्या जगाच्या आत्म्याचा विरोध करा

बदलत चाललेल्या जगाच्या आत्म्याचा विरोध करा

“आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे.”—१ करिंथकर २:१२.

१. हवा कशाप्रकारे भुलवली गेली?

“सर्पाने मला भुरळ घातली.” (उत्पत्ति ३:१३) या लहानशा वाक्यातून पहिली स्त्री हवा हिने यहोवा देवाविरुद्ध आपण विद्रोह का केला याची सबब देण्याचा प्रयत्न केला. आणि मुळात हे खरे असले तरीसुद्धा यामुळे तिचा दोष कमी झाला नाही. प्रेषित पौलाला नंतर असे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले की “[हव्वा] भुलून अपराधात सापडली.” (१ तीमथ्य २:१४) तिची भुलवणूक झाली कारण आज्ञा मोडून तिने, मना केलेले फळ खाऊन तिचा फायदा होईल व ती देवासारखी होईल यावर विश्‍वास ठेवला. आणखी एका बाबतीत तिची भुलवणूक झाली, ती अशी की आपल्याला फसवणारा कोण हे ती ओळखू शकली नाही. सर्पाचा आड घेऊन खरे तर दियाबल सैतान बोलत होता याची तिला कल्पनाही नव्हती.—उत्पत्ति ३:१-६.

२. (अ) सैतान आज लोकांना कशाप्रकारे ठकवीत आहे? (ब) “जगाचा आत्मा” काय आहे आणि आपण आता कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

आदाम व हव्वेच्या काळापासून सैतानाने लोकांना भुलवण्याचे थांबवलेले नाही. किंबहुना, तो ‘सर्व जगाला ठकवित आहे.’ (प्रकटीकरण १२:९) त्याचे डावपेच बदललेले नाहीत. आज जरी तो खरोखरच्या सर्पाचा उपयोग करत नसला तरी आपली ओळख लपवण्याचा तो आजही प्रयत्न करतो. मनोरंजन, प्रसारमाध्यमे आणि इतर माध्यमांतून सैतान लोकांना ठकवून असे मानण्यास लावतो की देवाच्या प्रेमळ मार्गदर्शनाची त्यांना गरज नाही आणि त्यापासून त्यांना काहीएक फायदा होणार नाही. सैतानाच्या या ठकबाजीमुळे जगात सर्वत्र लोकांमध्ये बायबलच्या नियमांविरुद्ध व तत्त्वांविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे. बायबलच्या भाषेत या प्रवृत्तीला “जगाचा आत्मा” म्हटले आहे. (१ करिंथकर २:१२) देवाची ओळख नसलेल्या लोकांच्या विश्‍वासांवर, मनोवृत्तींवर, आणि वागणुकीवर या आत्म्याचा जबरदस्त पगडा आहे. हा आत्मा कशाप्रकारे व्यक्‍त होतो आणि त्याच्या वाईट प्रभावाचा आपल्याला कशाप्रकारे विरोध करता येईल? पाहू या.

नैतिक मूल्यांचा ऱ्‍हास

३. आधुनिक काळात “जगाचा आत्मा” अधिकाधिक स्पष्टपणे का दिसू लागला आहे?

आधुनिक काळात “जगाचा आत्मा” अधिकाधिक स्पष्टपणे दिसू लागला आहे. (२ तीमथ्य ३:१-५) नैतिक मूल्यांचा ऱ्‍हास होत आहे हे कदाचित तुमच्याही लक्षात आले असेल. असे का घडत आहे याविषयी शास्त्रवचने स्पष्टीकरण देतात. १९१४ साली देवाच्या राज्याची स्थापना झाल्यानंतर स्वर्गात युद्ध झाले. सैतान व त्याच्या दुरात्मिक दूतांचा पराजय झाला व त्यांना खाली पृथ्वीच्या क्षेत्रात फेकून देण्यात आले. त्यामुळे क्रोधित होऊन सैतान आता जगातल्या लोकांना ठकवण्याचा अधिकच जोराने प्रयत्न करत आहे. (प्रकटीकरण १२:१-९, १२, १७) “साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून” तो जमेल त्या मार्गाने प्रयत्न करतो. (मत्तय २४:२४) देवाचे लोक असलेले आपण त्याचे मुख्य लक्ष्य आहोत. यहोवाची स्वीकृती व सार्वकालिक जीवनाची आशा आपण गमावून बसावी म्हणून तो आपल्या आध्यात्मिकतेचा नाश करण्याचा प्रयत्न करतो.

४. यहोवाचे सेवक बायबलकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात आणि जगाचा त्याकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे?

आपल्याला आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याविषयी सांगणाऱ्‍या मोलवान ग्रंथाबद्दल म्हणजेच बायबलबद्दल अविश्‍वास उत्पन्‍न करण्याचा सैतान प्रयत्न करतो. यहोवाच्या साक्षीदारांना बायबल अतिशय प्रिय व मोलवान वाटते. आपल्याला माहीत आहे की हे कोणा मनुष्याचे नसून देवाचे प्रेरित वचन आहे. (१ थेस्सलनीकाकर २:१३; २ तीमथ्य ३:१६) पण सैतानाचे जग मात्र आपल्याला याविषयी उलट विचार करण्यास लावू इच्छिते. उदाहरणार्थ बायबलच्या सत्यतेवर हल्ला करणाऱ्‍या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे: “‘पवित्र’ म्हणता येईल असे बायबलमध्ये काहीही नाही, आणि ते ‘देवाचे वचन’ देखील नाही. त्याचे लिखाण देवाने प्रेरित केलेल्या संतांनी नव्हे तर सत्ताप्रिय धर्माधिकाऱ्‍यांनी केले.” अशा दाव्यांवर विश्‍वास ठेवणारे, सहज या गैरसमजुतीला बळी पडू शकतात की आपण देवाची उपासना आपल्याला आवडेल त्या पद्धतीने करू शकतो—इतकेच नव्हे, तर त्याची उपासना न करण्याचा निर्णय घेण्यासही आपण स्वतंत्र आहोत.—नीतिसूत्रे १४:१२.

५. (अ) बायबलसोबत संबंधित असणाऱ्‍या धर्मांबद्दल एका लेखकाने कोणते विधान केले? (ब) काही जगिक कल्पना बायबलमध्ये जे सांगितले आहे त्यापेक्षा कशाप्रकारे वेगळ्या आहेत? (पुढच्या पृष्ठावरील चौकोन पाहा.)

बायबलवर थेटपणे किंवा अप्रत्यक्षरित्या केले जाणारे हल्ले, तसेच त्याचे समर्थन करण्याचा दावा करणाऱ्‍यांचा दांभिकपणा यामुळे एकंदरीत धर्माबद्दल लोकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे; यांत बायबलशी संबंधित असलेला धर्मही सामील आहे. वृत्त माध्यमांत व बुद्धीजीवी वर्गांत धर्मावर हल्ला केला जात आहे. एका लेखकाने असे म्हटले: “जनसामान्यांत यहुदी व ख्रिस्ती धर्मांबद्दल प्रतिकूल दृष्टिकोन आहे. बरेचजण त्यांना जुनाट समजतात; काही तर म्हणतात की त्या पुरोगामी विचारधारा असून बौद्धिक विकासात व वैज्ञानिक प्रगतीत अडथळा आहेत. हा तिटकारा अलीकडील वर्षांत इतका वाढला आहे की लोक धर्माची उघडपणे थट्टा व विरोध करू लागले आहेत.” हा विरोध सहसा अशा लोकांकडून व्यक्‍त केला जातो, जे देवाचे अस्तित्व नाकारतात आणि जे “आपल्या तर्कवितर्कांनी निरर्थक झाले” आहेत.—रोमकर १:२०-२२, पं.र.भा.

६. देवाने निंदा केलेल्या लैंगिक वर्तनाबद्दल जगातल्या लोकांचा कसा दृष्टिकोन आहे?

तेव्हा, आचरणासंबंधी देवाच्या दर्जांपासून लोक अधिकाधिक वाहवत जात आहेत यात नवल वाटण्यासारखे काही नाही. उदाहरणार्थ, समलैंगिक संबंधांना बायबल “अनुचित” म्हणते. (रोमकर १:२६, २७) तसेच, जे व्यभिचार व जारकर्म करतात त्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही असेही ते सांगते. (१ करिंथकर ६:९) तरीसुद्धा, बऱ्‍याच देशांत अशाप्रकारचे लैंगिक वर्तन सर्वसामान्य मानले जाते; इतकेच नव्हे, तर पुस्तके, मासिके, गाणी, चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांतून त्याला अतिशय आकर्षक स्वरूप दिले जाते. शिवाय जे अशा गोष्टींच्या विरोधात बोलतात त्यांना संकुचित, पूर्वग्रही आणि जुनाट विचारांचे म्हटले जाते. देवाच्या नियमांतून खरे तर त्याचे प्रेम व काळजी व्यक्‍त होते, असे मानण्याऐवजी जगातले लोक त्यांना वैयक्‍तिक स्वातंत्र्य व यशाच्या मार्गातले अडथळे समजतात.—नीतिसूत्रे १७:१५; यहूदा ४.

७. आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारावेत?

दिवसेंदिवस देवाचा अधिकाधिक विरोध करणाऱ्‍या या जगात राहत असताना आपल्या स्वतःच्या मनोवृत्तीचे व नीतिमूल्यांचे परीक्षण करणे सुज्ञतेचे ठरेल. वेळोवेळी, आपण प्रार्थनापूर्वक व प्रामाणिकपणे स्वतःला तपासून पाहिले पाहिजे की हळूहळू आपण यहोवाच्या विचारसरणीपासून व दर्जांपासून दूर तर जात नाही ना? उदाहरणार्थ, आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘काही वर्षांआधी ज्या साहित्याला मी हातही लावला नसता, त्याचाच वापर आज मी आपल्या मनोरंजनासाठी करत आहे का? देव ज्याची निंदा करतो असे वर्तन चालण्यासारखे आहे असे आता मला वाटू लागले आहे का? आध्यात्मिक गोष्टी पूर्वीच्या तुलनेत आता मला काहीशा कमी महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत का? माझ्या जीवनशैलीवरून, मी आपल्या जीवनात राज्याच्या कार्यांना प्राधान्य देतो हे दिसून येते का?’ (मत्तय ६:३३) अशाप्रकारे विचार केल्याने आपल्याला जगाच्या आत्म्याचा विरोध करण्यास मदत होईल.

‘वाहवत जाऊ नका’

८. एक व्यक्‍ती यहोवापासून कशाप्रकारे वाहवत जाऊ शकते?

सह ख्रिस्ती बांधवांना प्रेषित पौलाने असे लिहिले: “ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.” (इब्री लोकांस २:१) ठरलेल्या मार्गापासून वाहवत गेलेले जहाज आपल्या इष्ट स्थळी पोचत नाही. शिवाय, जहाजाच्या कप्तानाने वाऱ्‍याच्या व पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेकडे लक्ष दिले नाही तर त्याचे जहाज सुरक्षित आश्रयस्थानापासून वाहवत जाऊन खडकाळ समुद्रकिनाऱ्‍यावर आपटू शकते. त्याचप्रकारे, देवाच्या वचनातील मोलवान सत्यांकडे आपण लक्ष दिले नाही, तर आपणही नकळत यहोवापासून वाहवत जाऊ शकतो आणि आपले आध्यात्मिक जहाज फुटू शकते. सत्याचा उघडउघड नकार केल्यानेच एका व्यक्‍तीला असे दुष्परिणाम सहन करावे लागतात असे नाही. किंबहुना, बरेचजण अचानक आणि जाणूनबुजून यहोवाकडे पाठ फिरवत नाहीत. सहसा, ते हळूहळू एखाद्या अशा गोष्टीत गुंतत जातात, जी देवाच्या वचनापासून त्यांचे लक्ष विचलीत करते. आणि अगदी नकळत ते पापात पडतात. झोपी गेलेल्या जहाजाच्या कप्तानाप्रमाणे, अशा व्यक्‍ती आपल्या झोपेतून जाग्या होईपर्यंत बराच उशीर होऊन गेलेला असतो.

९. यहोवाने शलमोनाला कशाप्रकारे आशीर्वादित केले?

शलमोनाच्या जीवनाकडे अंमळ लक्ष देऊ या. यहोवाने त्याला इस्राएलाचे राज्य सोपवले होते. तसेच त्याने त्याला मंदिर बांधण्याची परवानगी दिली आणि बायबलमधील काही पुस्तके लिहिण्याचाही बहुमान दिला. यहोवा स्वतः त्याच्याशी दोनदा बोलला आणि त्याने त्याला अमाप संपत्ती व प्रसिद्धी दिली आणि त्याच्या राज्य कारकीर्दीत शांती बहाल केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाने शलमोनाला विलक्षण बुद्धी दिली. बायबल म्हणते: “देवाने शलमोनास अलोट शहाणपण व बुद्धि दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी यांच्याहून अधिक होते.” (१ राजे ४:२१, २९, ३०; ११:९) कोणी म्हणेल, की शलमोनासारखी व्यक्‍ती तर देवाला विश्‍वासू राहीलच राहील. पण, शलमोनही यहोवापासून वाहवत गेला व शेवटी त्याने धर्मत्याग केला. हे कसे घडले?

१०. शलमोनाने कोणत्या मार्गदर्शनाचे पालन केले नाही आणि याचा काय परिणाम झाला?

१० शलमोनाला देवाच्या नियमशास्त्राविषयी पूर्ण ज्ञान व समज होती. इस्राएलावर राज्य करणाऱ्‍या राजांकरता जे मार्गदर्शन त्यात होते त्याकडे नक्कीच शलमोनाने विशेष लक्ष दिले असेल. या मार्गदर्शनात पुढील सूचनेचा समावेश होता: “राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे.” (अनुवाद १७:१४, १७) या स्पष्ट सूचनेकडे दुर्लक्ष करून शलमोनाने सातशे बायका, व तीनशे उपपत्नी केल्या. यांपैकी बऱ्‍याच स्त्रिया विदेशी देवतांच्या उपासक होत्या. शलमोनाने इतक्या बायका का केल्या किंवा असे करणे त्याला कोणत्या आधारावर योग्य वाटले हे आपल्याला माहीत नाही. पण इतके मात्र आपल्याला माहीत आहे, की त्याने देवाच्या सुस्पष्ट निर्देशनाकडे दुर्लक्ष केले. याचा परिणाम यहोवाने बजावल्याप्रमाणेच घडला. बायबल सांगते: “[शलमोनाच्या] बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले.” (१ राजे ११:३, ४) हळूहळू त्याची ईश्‍वरी बुद्धी नाहीशी झाली. तो वाहवत गेला. कालांतराने, आपल्या विदेशी पत्नींना संतुष्ट करण्याची शलमोनाची इच्छा, देवाचे आज्ञापालन करण्याच्या व त्याला संतुष्ट करण्याच्या इच्छेवर प्रबळ ठरली. “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन,” हे शब्द लिहिणाऱ्‍या शलमोनाच्याच बाबतीत असे घडावे ही केवढी दुःखाची गोष्ट!—नीतिसूत्रे २७:११.

जगाचा आत्मा शक्‍तिशाली आहे

११. आपण जे काही मनात आत्मसात करतो त्याचा आपल्या विचारांवर कशाप्रकारे प्रभाव पडतो?

११ शलमोनाच्या उदाहरणावरून आपण एक धडा शिकतो: आपल्याला सत्य माहीत आहे त्याअर्थी जगिक प्रभावांचा आपल्या विचारसरणीवर परिणाम होणारच नाही असे आपण गृहित धरू शकत नाही. ज्याप्रमाणे शारीरिक आहाराचा आपल्या शरीरावर परिणाम होतो त्याप्रमाणे मानसिक आहाराचा आपल्या मनावर परिणाम हा होतोच. आपण ज्याप्रकारचा मानसिक आहार घेतो त्यानुसार आपली विचारसरणी व मनोवृत्ती घडवली जाते. म्हणूनच तर, मोठमोठे उद्योजक आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरता दर वर्षी कोट्यवधी डॉलर खर्च करतात. सर्वात परिणामकारक जाहिराती, ग्राहकांच्या इच्छा व आकांक्षा लक्षात ठेवून मनोवेधक शब्दांचा व चित्रांचा उपयोग करतात. जाहिरातदारांना आणखी एका गोष्टीची जाणीव असते, ती अशी, की कोणतीही जाहिरात केवळ एखाददोन वेळा पाहिल्यावर ग्राहक सरळ उठून ते उत्पादन विकत घेण्यासाठी दुकान गाठणार नाही. पण वारंवार एखादी जाहिरात पाहिल्यावर कालांतराने सहसा ग्राहक त्या उत्पादनाकडे आकर्षित होतो. जाहिरातींत निश्‍चितच ताकद आहे—नाहीतर उत्पादकांनी त्यांत इतका पैसा खर्च केलाच नसता. त्या जनतेच्या विचारांवर व मनोवृत्तींवर जबरदस्त प्रभाव पाडतात.

१२. (अ) लोकांच्या विचारसरणीवर सैतान कशाप्रकारे प्रभाव पाडतो? (ब) ख्रिस्ती लोकांवरही तो प्रभाव पाडू शकतो हे कशावरून दिसून येते?

१२ जाहिरातदाराप्रमाणे सैतान देखील आपल्या कल्पना आकर्षक स्वरूपात मांडतो; कारण कालांतराने आपण लोकांची मने जिंकून त्यांना आपल्या कह्‍यात घेऊ शकतो हे त्याला माहीत आहे. मनोरंजन व इतर माध्यमांद्वारे सैतान लोकांची भुलवणूक करून त्यांना चांगले ते वाईट आणि वाईट ते चांगले मानायला लावतो. (यशया ५:२०) सैतानाच्या या भुलवणुकीला खरे ख्रिस्ती देखील बळी पडल्याची उदाहरणे आहेत. बायबल ताकीद देते: “पुढील काळी विश्‍वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; ज्या माणसांची सद्‌सद्विवेकबुद्धि तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणाऱ्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.”—१ तीमथ्य ४:१, २; यिर्मया ६:१५.

१३. कुसंगती म्हणजे काय आणि संगतीचा आपल्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो?

१३ जगाच्या आत्म्याचा माझ्यावर परिणाम होऊ शकत नाही असे आपल्यापैकी कोणीही म्हणू शकत नाही. सैतानाच्या व्यवस्थीकरणाचे प्रवाह अत्यंत शक्‍तिशाली आहेत. बायबल आपल्याला हा सुज्ञ सल्ला देते: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) कुसंगतीत अशा कोणत्याही गोष्टीचा अथवा व्यक्‍तीचा समावेश होऊ शकतो की जी जगाचा आत्मा प्रतिबिंबित करते; ती मंडळीच्या आत देखील असू शकते. अशा कुसंगतीचा आपल्यावर वाईट प्रभाव पडूच शकत नाही असा आपण तर्क केल्यास दुसरीकडे आपल्याला हे देखील कबूल करावे लागेल की चांगल्या संगतीचाही आपल्याला फायदा होऊ शकत नाही. पण हे तर साफ खोटे ठरेल! कारण बायबल अगदी स्पष्टपणे सांगते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.

१४. आपण जगाच्या आत्म्याचा कशाप्रकारे विरोध करू शकतो?

१४ जगाच्या आत्म्याचा विरोध करण्याकरता आपण सुज्ञांची, अर्थात यहोवाची सेवा करणाऱ्‍यांची संगती धरली पाहिजे. आपण अशा गोष्टींनी आपले मन भरले पाहिजे की ज्या आपल्या विश्‍वासाला पुष्टी देतील. प्रेषित पौलाने लिहिले: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.” (फिलिप्पैकर ४:८) आपल्याला इच्छा-स्वातंत्र्य देण्यात आले आहे; त्याअर्थी कोणत्या गोष्टींवर मनन करावे याची निवड आपण करू शकतो. तेव्हा मनन करण्याकरता आपण अशाच गोष्टींची निवड करूया की ज्या आपल्याला यहोवाच्या आणखी जवळ आणतील.

देवाचा आत्मा अधिक शक्‍तिशाली

१५. प्राचीन काळच्या करिंथ शहरातील ख्रिस्ती त्या शहरातील इतर रहिवाशांपेक्षा कशाप्रकारे वेगळे होते?

१५ बरेच जण जगाच्या आत्म्यामुळे पथभ्रष्ट झाले आहेत पण खरे ख्रिस्ती देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतात. करिंथच्या मंडळीला पौलाने असे लिहिले: “आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; ह्‍यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.” (१ करिंथकर २:१२) प्राचीनकाळच्या करिंथ शहराला जगाच्या आत्म्याने पुरते व्यापले होते. त्यातील बहुतेक रहिवासी इतके दुराचारी होते की इंग्रजी भाषेतील “करिंथिकरण करणे” या अर्थाच्या क्रियापदाला “अनैतिकता आचरणे” असा अर्थ आला. सैतानाने त्या लोकांची मने अंधळी केली होती. त्यामुळे, खऱ्‍या देवाबद्दल त्यांना काहीही समजणे शक्य नव्हते. (२ करिंथकर ४:४) तरीसुद्धा, आपल्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने यहोवाने त्याच करिंथकरांपैकी काहींचे डोळे उघडले; ज्यामुळे त्यांना सत्याचे ज्ञान घेणे शक्य झाले. देवाची स्वीकृती व आशीर्वाद मिळवण्याकरता आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यास देवाच्या आत्म्याने त्यांना प्रवृत्त व मार्गदर्शित केले. (१ करिंथकर ६:९-११) जगाचा आत्मा निश्‍चितच प्रबळ होता, पण यहोवाचा आत्मा त्याहीपेक्षा प्रबळ होता.

१६. देवाचा आत्मा मिळवून तो आपल्याजवळ कायम राहावा म्हणून आपण काय केले पाहिजे?

१६ आजच्या काळातही हीच परिस्थिती आहे. यहोवाचा पवित्र आत्मा या विश्‍वातली सर्वात प्रबळ शक्‍ती आहे आणि जो कोणी विश्‍वासाने यहोवाकडे याकरता विनंती करतो त्याला यहोवा मुक्‍तहस्ते आपला पवित्र आत्मा देतो. (लूक ११:१३) पण देवाचा आत्मा आपल्याला मिळण्याकरता केवळ जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करणे पुरेसे नाही. त्यासोबत आपण नियमितपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्याप्रमाणे जीवनात आचरण केले पाहिजे जेणेकरून आपला आत्मा, अर्थात आपली मनोवृत्ती देवाच्या विचारसरणीशी सुसंगत होईल. असे आपण केल्यास, आपल्या आध्यात्मिकतेचा नाश करण्याकरता सैतानाने वापरलेल्या कोणत्याही डावपेचाला यशस्वीपणे तोंड देण्याचे सामर्थ्य यहोवा आपल्याला देईल.

१७. लोटाचा अनुभव आपल्याला कशाप्रकारे सांत्वन देऊ शकतो?

१७ ख्रिस्ती या जगाचे भाग नसले तरीही ते या जगातच राहतात. (योहान १७:११, १६) त्यामुळे, आपल्यापैकी कोणीही या जगाच्या आत्म्याला पूर्णपणे टाळू शकत नाही; कारण आपण कदाचित अशा लोकांसोबत काम करत असू किंवा राहत असू, की ज्यांना देवाबद्दल किंवा त्याच्या मार्गांबद्दल जराही आस्था वाटत नाही. सदोमच्या लोकांमध्ये राहात असताना त्यांच्या अभक्‍त कृत्यांकडे पाहून ‘विटलेल्या,’ नव्हे, कासावीस झालेल्या लोटाप्रमाणे आपल्याला वाटते का? (२ पेत्र २:७, ८) असल्यास, आपण हिंमत हरण्याचे कारण नाही. यहोवाने लोटाचे रक्षण केले व त्याची सुटका केली आणि आपल्या बाबतीतही असेच करण्यास तो समर्थ आहे. आपला प्रेमळ पिता आपली परिस्थिती पाहतो व जाणतो आणि आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्याकरता जी काही मदत व शक्‍ती आवश्‍यक आहे ती तो अवश्‍य पुरवेल. (स्तोत्र ३३:१८, १९) आपली परिस्थिती कितीही कठीण असली तरीसुद्धा, जर आपण यहोवावर विसंबून राहिलो, त्याच्यावर भरवसा ठेवला आणि मदतीकरता त्याचा धावा केला तर तो आपल्याला या जगाच्या आत्म्याचा विरोध करण्यास मदत करेल.—यशया ४१:१०.

१८. यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आपण का जपावा?

१८ देवापासून दुरावलेल्या आणि सैतानाने बहकवलेल्या या जगात, यहोवाचे लोक या नात्याने आपण आशीर्वादित आहोत कारण आपल्याला सत्याचे ज्ञान मिळाले आहे. या ज्ञानामुळे आपण जो आनंद व जी शांती अनुभवतो ती या जगाकडे नाही. (यशया ५७:२०, २१; गलतीकर ५:२२) या मरणोन्मुख जगाच्या आत्म्याचा मागमूसही जेथे नसेल अशा परादिसात सार्वकालिक जीवन अनुभवण्याची अद्‌भुत आशा आपण हृदयाशी कवटाळून आहोत. म्हणूनच, देवासोबतचा आपला मोलवान नातेसंबंध आपण शेवटपर्यंत जपावा आणि आध्यात्मिकरित्या बहकण्याचे चिन्ह दिसताच पुन्हा मार्गावर येण्याकरता सतत जागरूक राहावे. यहोवाच्या अधिकाधिक जवळ येण्याचा आपण प्रयत्न करावा, तेव्हा तोच आपल्याला या जगाच्या आत्म्याचा विरोध करण्यास मदत करेल.—याकोब ४:७, ८.

तुम्हाला स्पष्ट करता येईल का?

• सैतानाने कोणत्या मार्गांनी लोकांची भुलवणूक करून त्यांना बहकवले आहे?

• यहोवापासून वाहवत जाऊ नये म्हणून आपण काय करावे?

• जगाचा आत्मा शक्‍तिशाली आहे हे कशावरून दिसून येते?

• देवापासून असणारा आत्मा आपल्याला मिळावा व तो आपल्याजवळ टिकून राहावा म्हणून आपण काय करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील तक्‍ता]

जगिक बुद्धी विरुद्ध ईश्‍वरी बुद्धी

सत्य हे सापेक्ष आहे—लोक आपापल्या मताप्रमाणे सत्य काय ते ठरवतात.

“[देवाचे] वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७.

आपल्या मनाला विचारा, तेच तुम्हाला योग्य काय व अयोग्य काय ते सांगेल.

“हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.”—यिर्मया १७:९.

आपल्या मर्जीप्रमाणे वागा.

“मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

अमाप संपत्ती ही आनंदाची गुरूकिल्ली आहे.

“द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे.”—१ तीमथ्य ६:१०.

[१० पानांवरील चित्र]

शलमोन सत्य उपासनेपासून बहकला आणि खोट्या देवतांकडे वळला

[१२ पानांवरील चित्र]

जाहिरातदाराप्रमाणे सैतान या जगाच्या आत्म्याचा पुरस्कर्ता आहे. तुम्ही या आत्म्याचा विरोध करता का?