व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लहान त्याग केले मोठे आशीर्वाद मिळाले

लहान त्याग केले मोठे आशीर्वाद मिळाले

जीवन कथा

लहान त्याग केले मोठे आशीर्वाद मिळाले

जॉर्ज आणि ॲन अल्जन यांच्याद्वारे कथित

मी आणि माझ्या पत्नीनं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की एके दिवशी आम्ही “शिक्षिका” या शब्दासाठी “उंदीर” हा शब्द वापरू. वयाच्या साठीत आम्ही, अतिपूर्वेतील लोकांबरोबर संभाषण करण्याच्या प्रयत्नांत विचित्र दिसणाऱ्‍या अक्षरांकडे तासन्‌तास पाहत बसणार आहोत याची कल्पना देखील केली नव्हती. पण १९८० च्या दशकाच्या अंताला मी आणि ॲननं हेच केलं. आम्ही करत आलेल्या लहान त्यागांसाठी आम्हाला मोठे आशीर्वाद कसे मिळाले ते आम्ही तुम्हाला सांगतो.

मी आर्मीनियन वंशाचा आहे व अमेरिकन चर्चचा सदस्य होतो. ॲन रोमन कॅथलिक होती. १९५० साली आमचा विवाह झाला तेव्हा आम्ही दोघांनी आमच्या धार्मिक विश्‍वासाच्या संबंधाने समझोता केला. मी २७ वर्षांचा होतो आणि ॲन २४. अमेरिकातील न्यू जर्झी येथील जर्झी सीटीतील माझ्या ड्राय-क्लिनींगच्या दुकानावरच्या अर्पाटमेंटमध्ये आम्ही राहायला आलो. जवळजवळ चार वर्षांपासून मी ड्राय-क्लिनिंगचा माझा धंदा चालवत होतो.

१९५५ साली आम्ही न्यू जर्झी मधील मिडलटाऊन येथे एक तीन-बेडरूमचं टुमदार घर विकत घेतलं. माझ्या दुकानापासून आमचं हे घर ६० किलोमीटर दूर होतं; मी आठवड्यातून सहा दिवस काम करायचो. मला दररोज घरी यायला उशिरा व्हायचा. यहोवाच्या साक्षीदारांबरोबर माझा संपर्क फक्‍त तेव्हा यायचा जेव्हा ते अधूनमधून माझ्या दुकानावर येऊन मला बायबल साहित्य द्यायचे. त्यांनी दिलेली प्रकाशने मी मोठ्या आवडीनं वाचायचो. माझा बहुतेक वेळ आणि लक्ष कामात असलं तरी, मला बायबलबद्दल गोडी निर्माण होऊ लागली होती.

मला हेही समजलं, की दुकानावर जाताना आणि घरी येताना वॉचटावर रेडिओ स्टेशनवर म्हणजे डब्ल्यूबीबीआरवर बायबल भाषणे लागतात. मी ही भाषणे लक्ष देऊन ऐकायचो आणि माझी आस्था वाढू लागली व मी साक्षीदारांना मला येऊन भेटायला सांगितलं. १९५७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात जॉर्ज ब्लॅन्टन माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला.

आमचं कुटुंब शुद्ध उपासनेत एकजूट होतं

ॲनला या सर्वाविषयी कसे वाटत होते? ॲनच तुम्हाला सांगेल.

“सुरवातीला मी या अभ्यासाला खूपच विरोध केला. जॉर्ज बायबल अभ्यास करताना मी इतका व्यत्यय आणायचे की त्यानं दुसऱ्‍या ठिकाणी अभ्यास करण्याचं ठरवलं; आठ महिने तो दुसरीकडे अभ्यास करायचा. त्या कालावधीत जॉर्जनं रविवारच्या दिवशी राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहायला सुरवात केली. मला माहीत होतं, की त्यानं बायबल अभ्यास करण्याचं खरोखरच मनावर घेतलं होतं कारण रविवारचा दिवसच फक्‍त त्याला सुटी होती. पण तो मात्र एक चांगला पती व पिता होत चालला होता—म्हणून माझीही मनोवृत्ती बदलू लागली. खरं तर, कधीकधी टेबल स्वच्छ करताना, जॉर्ज टेबलावर नेहमी जे सावध राहा! नियतकालिकं ठेवायचा ते मी चोरून वाचायचे. इतर वेळी, जॉर्ज मला सावध राहा! नियतकालिकातले, ख्रिस्ती शिकवणींशी थेट संबंधित नसलेले परंतु निर्माणकर्त्याविषयी असलेले लेख वाचून दाखवायचा.

“एकदा संध्याकाळी जॉर्ज, बंधू ब्लॅन्टन यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्यासाठी बाहेर गेला होता तेव्हा माझ्या पलंगाशेजारच्या टेबलावर आमच्या दोन वर्षांच्या मुलानं जॉर्जनं आणून ठेवलेलं प्रकाशन उचललं. त्यात, मेलेल्या लोकांसाठी असलेल्या आशेविषयी काहीतरी सांगितलं होतं. मी खूप थकले होते तरीपण मी ते वाचायला लागले कारण, माझी आजी नुकतीच वारली होती आणि मी अजूनही उदास होते. मृत लोक कुठेही पीडा सहन करत नाहीत आणि भविष्यात पुनरुत्थानात ते पुन्हा जिवंत होतील, हे बायबलमधील सत्य मला त्या प्रकाशनातून लगेच समजलं. मी खाडक्‌न उठून बसले आणि आणखी आवडीनं वाचू लागले; व जॉर्ज आपल्या बायबल अभ्यासानंतर येईल तेव्हा त्याला दाखवण्याकरता मी काही मुद्दे अधोरेखीत केले होते.

“जॉर्जला दोन मिनिटं विश्‍वास बसेना की ही ॲनच आहे की आणखी कोण. कारण एरवी मी त्याला विरोध करत होते आणि आता मी शिकलेल्या बायबल सत्यांविषयी इतकी उत्साही वाटत होते! आम्ही पहाटेपर्यंत बायबलविषयी बोलत राहिलो. जॉर्जनं मला पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे ते समजावून सांगितलं. त्याच रात्री मी त्याला विचारलं, की तू इथूनपुढे घरीच अभ्यास करशील का जेणेकरून मलाही अभ्यासाला बसता येईल.

“बंधू ब्लॅन्टन यांनी सुचवलं, की अभ्यासाला बसताना आम्ही मुलांनाही सोबत घेऊन बसावं. आमचं एक मूल दोन वर्षांचं आणि दुसरं चार वर्षांचं होतं त्यामुळे आम्हाला वाटत होतं, की मूलं लहान आहेत. पण बंधू ब्लॅन्टन यांनी अनुवाद ३१:१२ आम्हाला वाचून दाखवलं ज्यात म्हटलं आहे: “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके . . . ह्‍यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील.” आम्हाला ही गोष्ट पटली; इतकंच नव्हे तर आम्ही अशी व्यवस्था देखील केली जेणेकरून ते बायबल अभ्यासाच्या वेळी उत्तरे देऊ शकतील. आम्ही एकत्र उत्तरांची तयारी करायचो पण त्यांनी काय म्हटलं पाहिजे हे आम्ही त्यांना कधी सांगितलं नाही. यामुळेच आम्हाला वाटतं, की मुलांना सत्य आपलसं करण्यास मदत मिळाली. आमच्या कुटुंबाला आध्यात्मिकरीत्या वाढत जाण्यासाठी बंधू ब्लॅन्टन यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही नेहमी त्यांचे आभारी राहू.”

त्याग करावी लागणारी आव्हाने

बायबलचा अभ्यास तर आम्ही एकजुटीनं करू लागलो होतो; पण आमच्यासमोर अनेक नवीन आव्हाने आली. माझं दुकान घरापासून बरंच लांब असल्यामुळे मी नेहमीच रात्री नऊपर्यंत घरी येऊ शकत नव्हतो. त्यामुळे आठवड्यांतल्या सभांना मी उपस्थित राहू शकत नव्हतो; रविवारच्या दिवशी मला सभांना जाता येत होतं. आता तर ॲनही सर्व सभांना उपस्थित राहू लागली होती व ती खूप प्रगती करत होती. मलाही मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्याची, अर्थपूर्ण कौटुंबिक अभ्यास संचालित करण्याची इच्छा होती. यासाठी मला काही त्याग करावे लागतील हे मला माहीत होतं. त्यामुळे मी माझं दुकान लवकर बंद करायचं ठरवलं; याचा अर्थ मला काही गिऱ्‍हाईकं गमवावी लागणार होती.

ही व्यवस्था अगदी उत्तम होती. आम्ही राज्य सभागृहात होणाऱ्‍या इतर पाच साप्ताहिक सभांप्रमाणेच आमच्या कौटुंबिक अभ्यासाला गंभीर समजत होतो. याला आम्ही आमची सहावी सभा असं म्हणायचो. यासाठी आम्ही एक खास दिवस आणि वेळही ठरवला—दर बुधवारी रात्री ८ वाजता. कधीकधी, रात्रीचं जेवण आटोपून भांडीकुंडी केल्यानंतर आमच्यातील कोणीतरी म्हणायचं: “चला, ‘सभेची’ वेळ झाली!” मला घरी यायला उशीर झाला तर ॲन अभ्यास सुरू करायची आणि मग मी घरी आल्याबरोबर पुढचा अभ्यास घ्यायचो.

कुटुंब या नात्यानं आम्हाला बळकट व एकजूट ठेवणारी आणखी एक गोष्ट होती, सकाळी एकत्र मिळून केलेली दैनिक पाठाची चर्चा. सुरवातीला हे इतकं सोपं नव्हतं. कारण प्रत्येकाची उठण्याची वेळ वेगवेगळी होती. त्यामुळे आम्ही एकत्र मिळून यावर विचार केला आणि ठरवलं, की सर्वांनी एकाच वेळी उठायचं, सकाळी ६:३० वाजता नाश्‍ता करायचा आणि त्यानंतर दैनिक पाठाची चर्चा करायची. या व्यवस्थेमुळे आम्हाला सर्वांनाच फायदा झाला. आमची मुलं मोठी झाली आणि त्यांनी बेथेल सेवा निवडली. दैनिक चर्चांनी त्यांच्या आध्यात्मिकतेत भर घातली असं आम्हाला वाटतं.

बाप्तिस्म्यानंतर मिळालेल्या विशेषाधिकारांसाठी मोठे त्याग करावे लागले

१९६२ साली माझा बाप्तिस्मा झाला आणि २१ वर्षं सांभाळलेला माझा व्यापार मी विकला आणि एक नोकरी धरली जेणेकरून मला माझ्या कुटुंबाच्या जवळ राहता येईल आणि आम्ही सर्व मिळून यहोवाची सेवा करू शकू. यानंतर आम्हाला अनेक आशीर्वाद मिळत गेले. आम्ही सर्वांनी पूर्ण-वेळेची सेवा सुरू करण्याचं ध्येय ठेवलं. आमचा मोठा मुलगा एडवर्ड यानं माध्यमिक शाळेतील शिक्षण संपवल्याबरोबर १९७० च्या दशकाच्या सुरवातीला पूर्ण वेळेचा सेवक किंवा सामान्य पायनियर बनण्याद्वारे सेवेला सुरवात केली. त्याच्यानंतर आमचा दुसरा मुलगा जॉर्ज यानं आणि मग ॲननंही लगेच पायनियरींग सुरू केली. हे तिघंही मला क्षेत्र सेवेतले अनुभव सांगायचे तेव्हा मला खूप प्रोत्साहन मिळायचं. सर्वांना पूर्ण वेळेची सेवा करता यावी म्हणून आपण आपलं जीवन साधं कसं करू शकतो यावर कुटुंब या नात्यानं आम्ही चर्चा केली. आम्ही आमचं घर विकायचं ठरवलं. या घरात आम्ही १८ वर्षं राहिलो होतो, याच घरात आम्ही आमचं कुटुंब वाढवलं होतं. आम्हाला आमचं घर खरंच खूप आवडायचं, पण आम्ही ते विकायचा निर्णय घेतला तेव्हा यहोवानं आमच्या निर्णयाला आशीर्वाद दिला.

१९७२ साली एडवर्डला बेथेलला बोलवण्यात आलं आणि १९७४ साली जॉर्जला. ॲनला व मला त्यांची खूप आठवण यायची; ते आमच्या जवळपास कुठंतरी राहायला असते तर, त्यांनी लग्नं केलं असतं तर, त्यांना मुलं असती तर, यावर आम्ही विचार करत बसलो नाही. उलट, आमची दोन्ही मुलं बेथेलमध्ये यहोवाची सेवा करत आहेत म्हणून आम्ही खूप आनंदी होतो. * नीतिसूत्रे २३:१५ मधील शब्दांशी आम्ही सहमत आहोत जिथं म्हटलं आहे: “माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असले तर माझ्या, माझ्याच चित्ताला आनंद होईल.”

आम्ही खास पायनियर सेवा सुरू करतो

आमची दोन्ही मुलं बेथेलमध्ये गेल्यावरही आम्ही दोघांनी आमची पायनियर सेवा चालू ठेवली. मग १९७५ सालच्या एके दिवशी आम्हाला, इलिनॉईस येथील क्लिन्टन काऊन्टीतील न नेमलेल्या क्षेत्रात खास पायनियर म्हणून कार्य करण्याचे आमंत्रण पत्र मिळाले. आम्हाला दोघांना खूप आश्‍चर्य वाटलं! याचा अर्थ आम्हाला न्यू जर्झी सोडावं लागणार होतं; न्यूयॉर्कमध्ये आम्ही आमच्या मुलांच्या जवळ होतो; शिवाय आमची मित्रमंडळी, नातेवाईक सर्वजण होते. पण आम्ही ही नेमणूक यहोवाकडून आली आहे असं समजलो आणि हा त्याग केला ज्यामुळे आम्हाला अनेक नवीन आशीर्वाद मिळाले.

न नेमलेल्या क्षेत्रात अनेक महिने सेवा केल्यानंतर आम्ही ईलिनॉईसमधील कार्लाईल येथील एका हॉलमध्ये सभा भरवू लागलो. पण आम्हाला सभेसाठी एक कायमचे ठिकाण हवे होते. एका स्थानीय बांधवाला व त्यांच्या पत्नीला जागा मिळाली ज्यावर एक लहानसं घर होतं; ते आम्ही भाड्यानं घेतलं. घराला आतून बाहेरून आम्ही स्वच्छ केलं आणि तोच आमचा लहानसा सभागृह बनला; बाहेर एक शौचालय होतं, तेही आम्ही स्वच्छ करून घेतलं. आम्हाला चांगलं आठवतं, तिथं एक घोडा होता ज्याला खूप कुतूहल वाटायचं. सभा चालू असताना आत काय चाललय म्हणून तो खिडकीतून नेहमी आत डोकावून पाहायचा!

कालांतरानं, कार्लाईल मंडळी स्थापन झाली; आमचाही यात भाग होता म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला. आम्हाला एका तरुण जोडप्यानं साहाय्य केलं—स्टीव्ह आणि कॅरल थॉम्पसन; तेही न नेमलेल्या क्षेत्रात कार्य करायला आले होते. हे दोघं इथं अनेक वर्षं राहिले आणि मग वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेत उपस्थित राहिल्यानंतर पूर्व आफ्रिकेत मिशनरी नेमणुकीसाठी गेले; तेथे ते प्रवासी कार्यात सेवा करत आहेत.

आमचं हे लहानसं सभेचं ठिकाण काही दिवसातच गच्च भरू लागलं, आता आम्हाला एका मोठ्या सभागृहाची आवश्‍यकता होती. आधी ज्या स्थानीय बांधवानं व त्यांच्या पत्नीनं आम्हाला मदत केली होती त्यांनी ह्‍या वेळेलासुद्धा आम्हाला मदत केली; राज्य सभागृहासाठी उचित असलेली जागा त्यांनी विकत घेतली. काही वर्षांनंतर कार्लाईल येथील एका नव्या राज्य सभागृहाच्या समर्पणासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला! मला समर्पणाचे भाषण देण्याचा सुहक्क मिळाला! तेथील नेमणूक आमच्यासाठी एक सुरेख अनुभव होता, यहोवाकडून एक आशीर्वाद होता.

आमच्यासमोर एक नवे क्षेत्र खुले होते

१९७९ साली आम्हाला न्यू जर्झीमधील हॅरिसन शहरात नवीन नेमणूक मिळाली. तेथे आम्ही जवळजवळ १२ वर्षं सेवा केली. त्या काळादरम्यान आम्ही एका चिनी स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला; यामुळे आम्हाला अनेक चिनी भाषेच्या लोकांचे अभ्यास मिळू लागले. हळूहळू आम्हाला समजले, की आमच्या क्षेत्रात हजारो चिनी विद्यार्थी आणि कुटुंबे राहत होती. यामुळे आम्ही चिनी भाषा शिकण्यास प्रोत्साहित झालो. ही भाषा शिकण्यासाठी आम्हाला दररोज बराच वेळ खर्च करावा लागत होता; पण आमच्या क्षेत्रातील अनेक चिनी लोकांबरोबर आम्ही बायबलचा अभ्यास सुरू करू शकल्यामुळे आम्हाला आनंद वाटला.

त्या दिवसांत, अनेक मजेशीर घटना घडल्या; खासकरून आम्ही चिनी भाषा बोलायचा प्रयत्न करत होतो तेव्हा. एके दिवशी ॲननं स्वतःची ओळख करून देताना मी एक बायबल “शिक्षिका” आहे असं म्हणण्याऐवजी मी एक बायबल “उंदीर” आहे असं म्हटलं. शिक्षिका आणि उंदीर हे दोन शब्द जवळजवळ सारखेच आहेत. घरमालकीण ॲनकडे पाहून हसली आणि म्हणाली: “या, आत या ना. मी पूर्वी कधी बायबल उंदारांबरोबर बोलले नव्हते.” अजूनही आम्ही कधीकधी चुका करतो.

यानंतर आम्हाला न्यू जर्झीतील दुसऱ्‍या एका ठिकाणी नेमण्यात आलं जेणेकरून तिथल्या चिनी क्षेत्रात आम्ही सेवा करू शकू. याच्यानंतर आम्हाला मॅसच्यूसिट्‌समधील बॉस्टन येथे जायला सांगण्यात आले; तेथे सुमारे तीन वर्षांपासून एक चिनी लोकांचा गट आध्यात्मिक प्रगती करत होता. गेल्या सात वर्षांपासून आम्हाला या गटाला साहाय्य देण्याचा सुहक्क मिळाला आहे आणि जानेवारी १, २००३ रोजी त्या गटाची एक मंडळी झाल्याचे पाहून आनंदही लाभला.

आत्म-त्यागी जीवन जगल्यामुळे आशीर्वाद मिळाले

मलाखी ३:१० येथे यहोवा आपल्या लोकांना म्हणतो, की आपली अर्पणे व बलिदाने आणा म्हणजे मी जागा पुरणार नाही इतके आशीर्वाद वर्षितो की नाही ते पाहा. आम्ही आमच्या आवडीचा व्यापार सोडून दिला. आम्हाला सर्वांना खूप आवडत असलेलं घर आम्ही विकलं. शिवाय इतरही गोष्टींचा त्याग केला. तरीपण आम्हाला मिळालेल्या आशीर्वादांच्या तुलनेत हे सर्व छोटे त्याग आहेत.

खरंच, यहोवानं आमच्यावर किती महान आशीर्वादांचा वर्षाव केला आहे! आमच्या मुलांनी सत्य स्वीकारल्याचं समाधान आम्हाला मिळालं आहे; जीवन वाचवणाऱ्‍या सेवेत पूर्ण वेळ भाग घेण्याचा आनंद आम्हाला मिळाला आहे; शिवाय यहोवानं आमच्या गरजा पूर्ण केल्याचं आम्ही पाहिलं आहे. होय, आम्ही केलेल्या लहान त्यागांबद्दल आम्हाला मोठे आशीर्वाद मिळाले!

[तळटीप]

^ परि. 20 ते आजही विश्‍वासूपणे बेथेलमध्ये सेवा करत आहेत—एडवर्ड आपली पत्नी कॉनी हिच्याबरोबर पॅटरसन येथे आणि जॉर्ज आपली पत्नी ग्रेस हिच्याबरोबर ब्रुकलिन येथे सेवा करत आहे.

[२५ पानांवरील चित्र]

ॲनबरोबर १९९१ साली, लुईस आणि जॉर्ज ब्लॅन्टन

[२६ पानांवरील चित्र]

जून ४, १९८३ साली ज्याचे समर्पण झाले ते कार्लाईल येथील राज्य सभागृह

[२७ पानांवरील चित्र]

नव्याने बनलेल्या बॉस्टन चिनी मंडळीबरोबर

[२८ पानांवरील चित्र]

एडवर्ड, कॉनी, जॉर्ज आणि ग्रेस यांच्याबरोबर