व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लाइबीरिया युद्ध होत असतानाही राज्य प्रचारकांच्या संख्येत वाढ

लाइबीरिया युद्ध होत असतानाही राज्य प्रचारकांच्या संख्येत वाढ

लाइबीरिया युद्ध होत असतानाही राज्य प्रचारकांच्या संख्येत वाढ

लाइबीरियात एक दशकापेक्षा अधिक काळापासून मुलकी युद्धाने धुमाकूळ घातला आहे. २००३ सालच्या मध्यात, बंडखोरांची लढाई, राजधानी शहर मनरोवियापर्यंत पोहंचली होती. अनेक यहोवाच्या साक्षीदारांना पुष्कळदा आपली घरेदारे सोडून पळून जावे लागले. अनेकदा सामानांची लूटमार झाली.

दुःखाची गोष्ट म्हणजे, राजधानीतील लढाईत हजारो लोक मारले गेले. यांपैकी दोन साक्षीदार होते; एक बंधू आणि एक भगिनी. इतर बांधवांनी या परिस्थितीचा सामना कशाप्रकारे केला आणि त्यांना मदत करण्यासाठी काय करण्यात आले?

गरज असलेल्यांना मदत

संपूर्ण युद्धकाळादरम्यान, यहोवाच्या साक्षीदारांच्या लाइबीरियातील शाखा दफ्तराने गरज असलेल्यांना मदत पुरवण्याची व्यवस्था केली. अन्‍न, आवश्‍यक असलेल्या घरगुती वस्तू आणि औषधपाण्याचा साठा पुरवला जात होता. बंदर क्षेत्रावर बंडखोरांचा कब्जा असताना अन्‍नाचा तुटवडा होता. असे होईल हे शाखा दफ्तराने पाहिले असल्यामुळे त्यांनी संपूर्ण शहरातील राज्य सभागृहांमध्ये आश्रय घेतलेल्या दोन हजार साक्षीदारांसाठी आवश्‍यक वस्तू आधीच जमवल्या. बांधवांनी अन्‍नधान्याचा पुरवठा सीमित केला ज्यामुळे बंदर पुन्हा खुले होईपर्यंत सर्वांसाठी साठा पुरला. बेल्जियम आणि सिएरा लियोन येथील शाखा दफ्तरांनी विमानाने औषधांचा साठा पाठवला आणि ब्रिटन व फ्रान्स शाखा दफ्तरांनी कपडे पाठवले.

परिस्थिती अतिशय हलाखीची होती तरीपण आपले बांधव सकारात्मक व आनंदी राहिले. एका बांधवाला तीनदा आपल्या घरातून पळून जावे लागले; तरीपण त्याने म्हटले: “आपण याच तर परिस्थितीविषयी प्रचार करत नाही का? आपण शेवटल्या दिवसात जगत आहोत.”

सुवार्तेला प्रतिसाद

संपूर्ण राष्ट्रात गोंधळ माजला होता पण साक्षीदारांना क्षेत्रात उत्तम परिणाम मिळत आहेत. जानेवारी २००३ मध्ये ३,८७९ राज्य प्रचारकांचा उच्चांक होता आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी १५,२२७ गृह बायबल अभ्यास संचालित केले.

लोक राज्याच्या सुवार्तेला लगेच प्रतिसाद देतात. याचे एक उदाहरण, राष्ट्राच्या आग्नेय भागांतल्या एका गावातले आहे. एका मंडळीने, ते नेहमी जेथे एकत्र होतात त्या ठिकाणापासून जवळजवळ पाच तास चालत जावे लागेल अशा ठिकाणी म्हणजे बव्हानच्या एका मोठ्या गावात ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याचे ठरवले. बांधवांनी गावांतील लोकांना स्मारकविधीचे आमंत्रण देण्याआधी बव्हानच्या महापौरांना आमंत्रण दिले. हे आमंत्रण मिळाल्यावर, या महापौरांनी आपले बायबल घेतले आणि ते गावकऱ्‍यांकडे गेले, आमंत्रण पत्रिकेतील शास्त्रवचन उघडून वाचले आणि त्यांना स्मारकविधीसाठी येण्याचे उत्तेजन दिले. त्यामुळे जेव्हा प्रचारक गावकऱ्‍यांना आमंत्रण द्यायला आले तेव्हा त्यांना समजले, की त्यांचे काम आधीच कोणीतरी केले होते! हे महापौर आपली मुले आणि आपल्या दोन पत्नी यांच्यासमवेत स्मारकविधीसाठी उपस्थित राहिले. एकूण २७ लोक या विधीसाठी उपस्थित होते. तेव्हापासून, या महापौरांनी मेथडिस्ट चर्चला जाण्याचे सोडून दिले आहे; ते साक्षीदारांबरोबर अभ्यास करीत आहेत आणि त्यांनी राज्य सभागृह बांधण्यासाठी जागा देण्याची इच्छा दर्शवली आहे.

मनोवृत्तीत बदल

आपल्या बांधवांचे वर्तनही इतके प्रभावशाली ठरले आहे, की सत्याचा विरोध करणाऱ्‍या काहींचा दृष्टिकोन बदलला आहे. ओपोकू नावाच्या एका गृहस्थाचे उदाहरण घ्या. क्षेत्र सेवा करताना एक खास पायनियर ओपोकूंना भेटले आणि त्यांनी त्यांना एक टेहळणी बुरूज नियतकालिक दिले. ओपोकूंना त्यातील एक लेख आवडला पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. पायनियर बांधवाने त्यांना सांगितले, की या नियतकालिकाचे पैसे नसल्यामुळे तुम्ही हे नियतकालिक ठेवा आणि त्यांची पुन्हा भेट घेण्याची व्यवस्था करण्यात आली. पुनर्भेटीच्या वेळी ओपोकूंनी पायनियर बांधवाला विचारले: “तुम्ही मला ओळखता का? हार्पर गावांतील तुमचे बहुतेक लोक मला ओळखतात. मी तुमच्या मुलांना शाळेतून बाहेर काढायचो!” त्यांनी पुढे सांगितले, की ते त्या गावांतील एका शाळेत मुख्याध्यापक होते आणि त्यांनी, यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांचा, झेंडा वंदन न केल्यामुळे छळ केला होता.

परंतु, यहोवाच्या साक्षीदारांनी तीन वेगवेगळ्या प्रसंगी दाखवलेल्या ख्रिस्ती प्रीतीने, ओपोकूंना आपली मनोवृत्ती बदलण्यास प्रवृत्त केले. पहिल्या प्रसंगी, ओपोकूंनी साक्षीदारांना गंभीररीत्या आजारी असलेल्या आपल्या एका आध्यात्मिक बांधवाची काळजी घेताना पाहिले. साक्षीदारांनी या बांधवाला उपचारासाठी जवळच्या देशात पाठवण्याची देखील व्यवस्था केली. ओपोकूंना वाटले, की हा आजारी बांधव साक्षीदारांमधला कोणीतरी “मोठा” माणूस असावा; पण त्यांना नंतर समजले, की तो एक साधा साक्षीदार होता. दुसऱ्‍या प्रसंगी, ओपोकू १९९० च्या दशकात कोट दि वार येथे एक निर्वासित म्हणून राहत होते. एके दिवशी त्यांना खूप तहान लागली होती तेव्हा ते एका तरुण माणसाकडून पाणी विकत घ्यायला गेले. ओपोकूंकडे त्या तरुण माणसाला पाण्याचे सुटे पैसे द्यायला नव्हते आणि त्या तरुणाकडेही सुटे पैसे नव्हते त्यामुळे त्याने ओपोकूंना पाणी फुकट दिले. पाणी देत असताना त्या तरुण माणसाने ओपोकूंना विचारले: “तुमच्या आणि माझ्यासारखे लोक पैसे न मागता एकमेकांना वस्तू देतील असा एक काळ आपण पाहू, असं तुम्हाला वाटतं का?” ओपोकूंनी लगेच ओळखले, की हा तरुण मनुष्य यहोवाचा साक्षीदार आहे; आणि त्याने तसे बोलूनही दाखवले. या बांधवाचा उदारपणा व दयाळुपणा पाहून ओपोकू खूप प्रभावीत झाले. आणि तिसऱ्‍या प्रसंगी, त्या खास पायनियरने पैसे न घेता ओपोकूंना नियतकालिक घेऊ दिल्यावर ओपोकूंची पूर्ण खात्री पटली, की साक्षीदारांबद्दल आपला दृष्टिकोन चुकीचा होता व आपण बदलले पाहिजे. त्यांनी आध्यात्मिक प्रगती केली आणि आता ते बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक आहेत.

लाइबीरियातील बांधव अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत असले तरी, देवावर त्यांचा पूर्ण भरवसा आहे व ते विश्‍वासूपणे देवाच्या राज्यातील धार्मिक शासनातील सुकाळाची घोषणा करत आहेत. यहोवा त्यांचे परिश्रम आणि त्याच्या नावासाठी ते दाखवत असलेली प्रीती केव्हाही विसरणार नाही.—इब्री लोकांस ६:१०.

[३० पानांवरील नकाशे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

मनरोविया

[३१ पानांवरील चित्रे]

संकटकाळात, यहोवाचे लोक गरज असलेल्यांना आध्यात्मिक आणि शारीरिक मदत पुरवतात