व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

पहिले करिंथकर १०:८ येथे म्हटले आहे की जारकर्म केल्यामुळे एका दिवसांत २३,००० मारले गेले, तर गणना २५:९ मध्ये २४,००० मारले गेले असे म्हटले आहे; असे का?

या दोन वचनांच्या संख्येतील तफावतीचे स्पष्टीकरण देऊ शकणारी अनेक कारणे आहेत. सर्वात साधे कारण हे असू शकते, की मेलेल्यांची संख्या २३,००० व २४,००० च्या आसपास कुठे तरी असावी; त्यामुळे पूर्ण संख्या देण्यासाठी २३,००० व २४,००० असे लिहिले असावे.

दुसऱ्‍या शक्यतेचा विचार करा. प्रेषित पौलाने शिट्टिम येथील इस्राएलांच्या अहवालाचा, प्राचीन करिंथमधील ख्रिश्‍चनांसाठी इशारेवजा उदाहरण म्हणून उपयोग केला; करिंथ शहरातील लोक त्यांच्या अनैतिक जीवनशैलीसाठी कुविख्यात होते. पौलाने लिहिले: “त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.” जारकर्म केल्यामुळे यहोवाने ज्यांना ठार मारले फक्‍त त्यांच्या संख्येविषयी पौल म्हणाला की ते २३,००० जण होते.—१ करिंथकर १०:८.

परंतु, गणना पुस्तकातील २५ व्या अध्यायात आपल्याला असे सांगण्यात येते की “इस्राएल बाल-पौराशी जडला, म्हणून इस्राएलावर यहोवाचा राग पेटला.” तेव्हा यहोवाने मोशेला “लोकांतल्या सर्व प्रमुखांना” फाशी देण्याची आज्ञा दिली. मोशेने, यहोवाने जी आज्ञा दिली ती पूर्ण करण्यास न्यायाधीशांना सांगितले. सरतेशेवटी, एका इस्राएली पुरुषाने एका मिद्यानी बाईला छावणीत आणल्यामुळे फीनहासने जेव्हा तत्परतेने त्याला ठार मारले तेव्हा इस्राएल लोकांमध्ये पसरलेली “पटकी बंद झाली.” अहवालाचे शेवटचे वाक्य असे आहे: “जे पटकीने मेले ते चोवीस हजार होते.”—गणना २५:१-९, पं.र.भा.

गणना पुस्तकात दिलेली संख्या ही, न्यायाधिशांनी ‘लोकांच्या सर्व प्रमुखांना’ ठार मारलेल्यांची आणि थेट यहोवाने ठार मारलेल्या लोकांची संख्या आहे. न्यायाधीशांच्या हातून मारले गेलेल्या प्रमुखांची संख्या एक हजार असावी, ज्यामुळे मरणाऱ्‍यांची २४,००० इतकी संख्या झाली. या प्रमुखांनी जारकर्म केलेले असो, सणासुदींत भाग घेतलेला असो, किंवा ज्यांनी भाग घेतला त्यांना पाठिंबा दिलेला असो हे आपल्याला माहीत नसले तरी, ‘बाल-पौराशी जडल्याचा’ त्यांच्यावर दोष होता.

‘जडणे’ या शब्दाविषयी एका बायबल संदर्भग्रंथात असे म्हटले, की या शब्दाचा अर्थ, “दुसऱ्‍या व्यक्‍तीला चिकटणे” असाही होऊ शकतो. इस्राएली लोक यहोवाला समर्पित असे लोक होते; पण त्यांनी जेव्हा ‘बाल-पौराशी संबंध जोडला’ तेव्हा त्यांनी देवाबरोबरचा त्यांचा समर्पित नातेसंबंध तोडला. सुमारे ७०० वर्षांनंतर संदेष्टा होशेय याच्याद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना म्हटले: “ते बआलपौराकडे आले आणि त्यांनी लज्जास्पद मूर्तीला आपणास वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.” (होशेय ९:१०) असे अमंगळ कृत्य करणारे सर्व जण देवाकडून प्रतिकूल न्यायदंडास पात्र होते. म्हणून मोशेने इस्राएलपुत्रांना अशी आठवण करून दिली: “बआलपौराच्या प्रकरणी परमेश्‍वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआलपौराच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्या मधून नष्ट केले.”—अनुवाद ४:३.