देवाच्या लोकांनी दयेची प्रीती धरली पाहिजे
देवाच्या लोकांनी दयेची प्रीती धरली पाहिजे
“न्यायाने वागणे, दयेची प्रीती धरणे व आपल्या देवासंगती नम्रपणाने चालणे यावाचून यहोवा तुझ्यापाशी काय मागतो?”—मीखा ६:८, पं.र.भा.
१, २. (अ) यहोवा आपल्या लोकांकडून दया दाखवण्याची अपेक्षा करतो हे आपल्याला आश्चर्याचे का वाटू नये? (ब) दयेविषयी कोणते प्रश्न विचारात घेण्याजोगे आहेत?
यहोवा दयेचा सागर आहे. (रोमकर २:४; ११:२२) याचा आदाम व हव्वा या प्रथम जोडप्याला किती जवळून अनुभव आला असेल! एदेन बागेत त्यांच्याभोवती देवाने निर्माण केलेल्या गोष्टींतून त्याच्या दयेचे अनेक पुरावे स्पष्ट दिसत होते; आणि या सर्व गोष्टींचा आनंद लुटण्याची क्षमता त्यांच्याजवळ होती. आजही देव दया दाखवत आहे; केवळ चांगल्या नव्हे तर कृतघ्न व दुष्ट लोकांनाही.
२ मनुष्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले असल्यामुळे देवाच्या गुणांचे अनुकरण करण्याची त्याच्याठायी क्षमता आहे. (उत्पत्ति १:२६) त्यामुळे यहोवा आपल्याकडून दयाळू असण्याची अपेक्षा करतो हे नवल करण्यासारखे नाही. मीखा ६:८ म्हणते त्याप्रमाणे, देवाच्या लोकांनी “दयेची प्रीती” धरली पाहिजे. पण दया म्हणजे काय? देवाच्या इतर गुणांशी तिचा काय संबंध आहे? मनुष्यांना दया दाखवणे शक्य आहे तरीपण हे जग इतके क्रूर व निष्ठुर का आहे? ख्रिस्ती या नात्याने आपण इतरांशी वागताना दया दाखवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?
दया म्हणजे काय?
३. दयेचे तुम्ही कशाप्रकारे वर्णन कराल?
३ दया दाखवणे म्हणजे इतरांचे भले होण्याकरता उत्सुकतेने प्रयत्न करणे. कोणाला मदत होईल अशाप्रकारची कृत्ये व सहानुभूतीशील शब्द यांतून दया व्यक्त होते. दयाळू असणे म्हणजे अपाय करण्याऐवजी भले करणे. दयाळू व्यक्ती सहसा मैत्रीपूर्ण, सौम्य, सहानुभूतीशील आणि सदाचरणी असते. ती उदार आणि इतरांप्रती विचारशील असते. प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी ल्या.” (कलस्सैकर ३:१२, पं.र.भा.) तेव्हा दयाळूपणा हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या लाक्षणिक पेहरावात सामील आहे.
४. यहोवाने मानवांना दया दाखवण्यात कशाप्रकारे पुढाकार घेतला आहे?
४ यहोवा देवाने दया दाखवण्यात पुढाकार घेतला आहे. पौलाने म्हटल्याप्रमाणे, ‘आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा त्याने नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे आपल्या दयेनुसार आपणास तारिले.’ (तीत ३:४, ५) देव अभिषिक्त ख्रिश्चनांना येशूच्या रक्ताने धुतो, म्हणजे ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञाचे मोल तो त्यांच्याकरता लागू करतो. तसेच त्यांना पवित्र आत्म्याने नवे केले जाते व अशारितीने ते देवाचे आत्म्याने अभिषिक्त पुत्र या नात्याने “नवी उत्पत्ती” बनतात. (२ करिंथकर ५:१७) शिवाय, देवाची दया व प्रेम ‘मोठ्या लोकसमुदायासही’ समावते, ज्यांनी “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.”—प्रकटीकरण ७:९, १४; १ योहान २:१, २.
५. जे देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतात त्यांनी दयाळू का असावे?
५ देवाच्या पवित्र आत्म्याच्या किंवा सक्रिय शक्तीच्या फळांतही दया सामील आहे. पौलाने म्हटले: “आत्मा या गोष्टी निर्माण करतो; प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व आत्मसंयमन.” (गलतीकरांस ५:२२, २३, ईजी-टू-रीड व्हर्शन) तेव्हा, जे देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतात त्यांनी दयाळू असू नये का?
खरा दयाळूपणा दुर्बलतेचे लक्षण नाही
६. दयाळूपणा एक दुर्बलता केव्हा बनतो आणि का?
६ काही लोकांच्या मते, इतरांना आपल्या व्यक्तित्वाची ताकद दाखवण्याकरता कधीकधी निष्ठुरपणे व उद्धटपणेही
बोलणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या मते दयाळूपणा हे दुर्बलतेचे लक्षण आहे. पण वास्तविक पाहता, खरा दयाळूपणा दाखवण्याकरता व अयोग्य दया दाखवण्याचे टाळण्याकरता खरी ताकद लागते. खरा दयाळूपणा हा देवाच्या आत्म्याच्या फळांत सामील असल्यामुळे, त्यात दुराचरणाप्रती तडजोड करण्याचा अर्थ असू शकत नाही. दुसरीकडे पाहता, अयोग्य दया एक दुर्बलता असून ती दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करते.७. (अ) एलीने कशाप्रकारे तडजोड केली? (ब) वडिलांनी अयोग्य प्रकारचा दयाळूपणा दाखवण्याचा पाश का टाळावा?
७ उदाहरणार्थ, इस्राएलचा महायाजक एली याचे उदाहरण घ्या. त्याने आपली मुले हफनी व फिनहास यांना अनुशासन देण्याविषयी नरमाई दाखवली. त्याची मुले निवासमंडपात याजक म्हणून सेवा करत होती. देवाच्या नियमशास्त्रानुसार बलिदानातून त्यांना मिळणाऱ्या एका भागाने ते संतुष्ट नव्हते; तर वेदीवर वपेचे हवन करण्याआधीच ते यज्ञ अर्पण करणाऱ्याकडून कच्चे मांस जबरीने घेण्याकरता आपला चाकर पाठवीत. तसेच निवासमंडपाच्या प्रवेशद्वाराशी सेवा करणाऱ्या स्त्रियांशी त्यांनी कुकर्म केला. पण हफनी व फिनहास यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याऐवजी एलीने केवळ सौम्य शब्दांत त्यांना ताडन केले. (१ शमुवेल २:१२-२९) म्हणूनच त्या काळात, “परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते”! (१ शमुवेल ३:१) ख्रिस्ती वडिलांनी अशाप्रकारे चूक करून मंडळीची आध्यात्मिकता धोक्यात आणणाऱ्यांना अयोग्य प्रकारची दया दाखवू नये. खरा दयाळूपणा देवाच्या दर्जांचे उल्लंघन करणाऱ्या दुष्ट शब्दांकडे व कृत्यांकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही.
८. येशूने खरा दयाळूपणा कशाप्रकारे दाखवला?
८ आपला आदर्श येशू ख्रिस्त याने कधीही अयोग्य प्रकारची दया दाखवण्याची चूक केली नाही. खऱ्या दयाळूपणाविषयी त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. उदाहरणार्थ “लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’, ते गांजलेले व पांगलेले होते.” प्रामाणिक मनोवृत्तीचे लोक येशूकडे येण्यास कचरत नव्हते; ते आपल्या लहान मुलांनाही त्याच्याजवळ आणीत. “त्याने [बाळकांस] कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला,” तेव्हा किती दयाळूपणे व कनवाळूपणाने तो वागला असेल याची कल्पना करा. (मत्तय ९:३६; मार्क १०:१३-१६) पण येशू दयाळू असला तरीसुद्धा जे आपल्या स्वर्गीय पित्याच्या नजरेत योग्य आहे, त्याविषयी त्याने कधीही तडजोड केली नाही. त्याने कधीही दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष केले नाही; उलट ढोंगी धार्मिक पुढाऱ्यांचा पर्दाफाश करण्याची व त्यांची अवहेलना करण्याची देवाकडून मिळालेली ताकद त्याच्याजवळ होती. मत्तय २३:१३-२६ येथे सांगितल्याप्रमाणे त्याने कित्येकदा म्हटले: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!”
दया व देवाचे इतर गुण
९. दयाळूपणाचा सहनशीलता व चांगुलपणाशी कशाप्रकारे संबंध आहे?
९ दया ही देवाच्या आत्म्याद्वारे उत्पन्न होणाऱ्या इतर गुणांशीही संबंधित आहे, उदाहरणार्थ, “सहनशीलता” व “चांगुलपणा.” किंबहुना, जी व्यक्ती दया हा गुण उत्पन्न करते ती सहनशीलतेने वागण्याद्वारे तो प्रगट करते. अशी व्यक्ती तिच्यासोबत दयाळूपणे न वागणाऱ्या व्यक्तीचेही सहन करून घेते. दयाळूपणाचा संबंध चांगुलपणाशी आहे कारण तो बऱ्याचदा इतरांच्या भल्यासाठी केलेल्या मदतीतून व्यक्त होतो. “दयाळूपणा” यासाठी बायबलमध्ये वापरलेल्या ग्रीक
शब्दाचे कधीकधी “चांगुलपणा” असेही भाषांतर केले जाऊ शकते. सुरवातीच्या ख्रिश्चनांमध्ये या गुणाचे प्रदर्शन पाहिल्यावर गैर ख्रिस्ती लोकांना इतके आश्चर्य वाटत असे, की टर्टुलियन अनुसार त्यांनी येशूच्या अनुयायांना ‘दयाळू लोक’ असे नावच ठेवले होते.१०. दयाळूपणा व प्रीती यांचा कशाप्रकारे संबंध आहे?
१० दयाळूपणा व प्रीतीचाही संबंध आहे. आपल्या अनुयायांबद्दल येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) आणि या प्रीतीविषयी पौलाने म्हटले: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी [“दयाळू,” NW] आहे.” (१ करिंथकर १३:४) शास्त्रवचनांत बऱ्याचदा आढळणाऱ्या “प्रेमदया” या शब्दातही प्रेमाचा संबंध दयेशी लावण्यात आला आहे. ही दया एकनिष्ठ प्रीतीतून उत्पन्न होते. “प्रेमदया” असे भाषांतर केलेल्या इब्री संज्ञेत केवळ प्रेमळ भावना असण्याचा आशय नाही. तर हा दयाळूपणा असा आहे की जो एखाद्या गोष्टीशी स्वतःला तोपर्यंत प्रेमळपणे जोडतो जोपर्यंत त्या गोष्टीचा उद्देश पूर्ण होत नाही. यहोवाची प्रेमदया अथवा एकनिष्ठ प्रीती अनेक मार्गांनी प्रगट होते. उदाहरणार्थ, तो सुटका व संरक्षण देतो तेव्हा हे गुण प्रगट होतात.—स्तोत्र ६:४; ४०:११; १४३:१२.
११. देवाच्या प्रेमदयेमुळे आपल्याला कोणते आश्वासन मिळते?
११ यहोवाची प्रेमदया लोकांना त्याच्याकडे आकर्षित करते. (यिर्मया ३१:३) देवाच्या विश्वासू सेवकांना सुटकेची अथवा मदतीची गरज असते तेव्हा त्यांना जाणीव होते की त्याची प्रेमदया ही खरोखर एकनिष्ठ प्रीती आहे. या प्रीतीवर ते पूर्णपणे विसंबू शकतात. म्हणूनच ते स्तोत्रकर्त्याप्रमाणे अशी प्रार्थना करू शकतात: “मी तर तुझ्या प्रेमदयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुझ्या तारणात उल्लासेल.” (स्तोत्र १३:५) देवाचे प्रेम एकनिष्ठ असल्यामुळे त्याचे सेवक त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतात. त्यांच्याजवळ हे आश्वासन आहे: “परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; तो आपले वतन सोडून देणार नाही.”—स्तोत्र ९४:१४.
हे जग इतके क्रूर का आहे?
१२. एका जुलमी शासनाला केव्हापासून सुरवात झाली?
१२ या प्रश्नाच्या उत्तराचा संबंध एदेन बागेत जे घडले त्याच्याशी आहे. मानव इतिहासाच्या आरंभास एका आत्मिक प्राण्याने स्वार्थापोटी व गर्विष्ठपणाने जगाचा शासक बनण्याचा कट रचला. त्याच्या कारस्थानामुळे तो खरोखरच “ह्या जगाचा अधिकारी,” अतिशय जुलमी अधिकारी बनला. (योहान १२:३१) त्याला दियाबल सैतान हे नाव पडले; तो देवाचा व मनुष्याचाही आद्य विरोधक बनला. (योहान ८:४४; प्रकटीकरण १२:९) यहोवाच्या दयाळू शासनाच्या तोडीचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा स्वार्थी कट हव्वेच्या निर्मितीनंतर काही काळातच उघडकीस आला. अशारितीने, आदामाने देवाच्या शासनापासून स्वतंत्र असा मार्ग निवडला व त्याच्या दयाळूपणाला पूर्णपणे धिक्कारले तेव्हा सैतानाच्या अधर्मी शासनाला सुरवात झाली. (उत्पत्ति ३:१-६) पण स्वतःवर शासन करण्याऐवजी आदाम व हव्वा वास्तविक पाहता दियाबलाच्या स्वार्थी व गर्विष्ठ प्रभावाखाली आले; एका अर्थाने ते त्याच्या राज्याची प्रजा बनले.
१३-१५. (अ) यहोवाच्या नीतिमान शासनाचा धिक्कार केल्यामुळे भोगावे लागलेले काही दुष्परिणाम कोणते होते? (ब) या जगात इतका निर्दयीपणा का आहे?
१३ यामुळे घडलेल्या काही दुष्परिणामांचा विचार करा. आदाम व हव्वा यांना पृथ्वीवरील परादीस असलेल्या क्षेत्रातून हाकलण्यात आले. त्या हिरव्यागार बगीच्यातून, जेथे त्यांना पोषक आहार पुरवणाऱ्या वनस्पती उपलब्ध होत्या तेथून त्यांना एदेन बागेच्या बाहेरील कठीण परिस्थितीत जावे लागले. देवाने आदामाला म्हटले: “तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल.” भूमीला शाप आल्यामुळे तिच्यातून काहीही उत्पन्न करणे अत्यंत कठीण जाणार होते. आदामाच्या वंशजांना या शापित भूमीतून उत्पन्न झालेल्या काट्या-कुसळांचा परिणाम इतका जाणवला की नोहाचा पिता लामेख याने “जी भूमि परमेश्वराने शापिली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट” असा एके ठिकाणी उल्लेख केला.—उत्पत्ति ३:१७-१९; ५:२९.
१४ तसेच आदाम व हव्वेने जीवनातील शांती गमावली आणि त्यांचे जीवन दुःखाने भरले. देवाने हव्वेला म्हटले: “मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि उत्पत्ति ३:१६; ४:८.
तो तुझ्यावर स्वामित्व चालविल.” नंतर, काईन या आदाम व हव्वेच्या पहिल्या पुत्राने आपलाच भाऊ हाबेल याला जिवे मारण्याचे अघोरी कृत्य केले.—१५ प्रेषित योहानाने म्हटले: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) जगाच्या अधिकाऱ्याप्रमाणेच आजच्या जगातले लोक स्वार्थ व गर्विष्ठपणासारख्या दुष्ट प्रवृत्ती प्रगट करतात. म्हणूनच आज जगात इतका निर्दयीपणा व क्रूरता पाहायला मिळते! पण ही परिस्थिती सर्वकाळ राहणार नाही. यहोवा लवकरच याची खात्री करेल की त्याच्या राज्याद्वारे या जगात निर्दयीपणा व क्रूरता नव्हे तर दयाळूपणा व कनवाळूपणा राहील.
देवाच्या राज्यात दयाळूपणाचे वर्चस्व असेल
१६. दयाळूपण हे ख्रिस्त येशूच्या माध्यमाने देवाच्या राज्याचे वैशिष्ट्य का आहे आणि यामुळे आपल्यावर कोणती जबाबदारी येते?
१६ यहोवा व त्याच्या राज्याचा नियुक्त राजा येशू ख्रिस्त, या राज्याच्या प्रजेकडून अशी अपेक्षा करतात की त्यांनी दयाळूपणा दाखवणाऱ्या व्यक्ती म्हणून ओळखले जावे. (मीखा ६:८) आपल्या पित्याने आपल्यावर सोपवलेल्या प्रशासनात कशाप्रकारे दयाळूपणाचे वर्चस्व राहील याची येशू ख्रिस्ताने आपल्याला एक झलक दाखवली. (इब्री लोकांस १:३) लोकांवर ओझी लादणाऱ्या खोट्या धार्मिक नेत्यांचा येशूने पर्दाफाश केला तेव्हा त्याने जे म्हटले त्यावरून हे स्पष्ट होते. तो म्हणाला: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०) पृथ्वीवरील अनेक धार्मिक व इतर प्रकारचे शासक लोकांवर असंख्य नियमांची व ज्याची कोणाला कदर नसते अशा कामांची जड ओझी लादतात. पण येशू आपल्या अनुयायांकडून त्यांच्या गरजांनुरूप व क्षमतेनुरूप अपेक्षा करतो. खरोखर त्याचे जू सोयीचे व विसावा देणारे आहे! त्याच्यासारखेच होऊन इतरांना दया दाखवण्यास आपण प्रवृत्त होत नाही का?—योहान १३:१५.
१७, १८. जे स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करतील व पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधीत्व करतील ते सर्वजण दयाळूपणा दाखवतील असा विश्वास आपण का बाळगू शकतो?
१७ आपल्या प्रेषितांना उद्देशून केलेल्या येशूच्या लक्षवेधक विधानांवरून दिसून येते की देवाचे राज्य मानवी राज्यापेक्षा किती वेगळे आहे. बायबल म्हणते: “आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीहि त्यांच्यामध्ये [शिष्यांमध्ये] वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करितात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवितात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुम्हांमध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा. मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हांमध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.”—लूक २२:२४-२७.
१८ मानवी राजे लोकांवर ‘अधिकार गाजवून’ व आपल्या प्रजेपेक्षा आपण श्रेष्ठ आहो हे दाखवण्याकरता मोठमोठ्या पदव्या धारण करून आपले वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. पण येशूने म्हटले की जो इतरांची—परिश्रमाने व सातत्याने सेवा करतो तोच खरे तर श्रेष्ठ आहे.
जे ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करतील किंवा पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधीत्व करतील त्या सर्वांनी त्याच्या नम्रतेचे व दयाळूपणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.१९, २०. (अ) यहोवाच्या दयाळूपणाचा अवाका येशूने कशाप्रकारे दाखवला? (ब) दयाळूपणा दाखवण्यात आपण यहोवाचे अनुकरण कशाप्रकारे करू शकतो?
१९ येशूने दिलेल्या इतर प्रेमळ मार्गदर्शक सूचनांकडे आपण लक्ष देऊ या. यहोवाच्या दयाळूपणाचा अवाका दाखवण्याकरता येशूने म्हटले: “जे तुमच्यावर प्रीति करितात त्यांच्यावर तुम्ही प्रीति केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकहि आपणावर प्रीति करणाऱ्यांवर प्रीति करितात. जे तुमचे बरे करितात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकहि तसेच करितात. ज्याच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकहि पापी लोकांस उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यावर प्रीति करा, त्यांचे बरे करा, निराश न होता, उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरहि उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीहि दयाळू व्हा.”—लूक ६:३२-३६, तिरपे वळण आमचे.
२० देवाची दया निःस्वार्थ आहे. ती काहीसुद्धा अपेक्षा करत नाही आणि मोबदल्यात काहीही मागत नाही. यहोवा दयाळूपणे “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४३-४५; प्रेषितांची कृत्ये १४:१६, १७) आपल्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करून, आपण कृतघ्न जनांना काही अपाय करण्यापासून स्वतःला आवरले पाहिजे, उलट आपण त्यांचे, किंबहुना जे आपल्याशी वैऱ्यांप्रमाणे वागले त्यांचेही भले करावे. दयाळूपणा दाखवण्याद्वारे आपण यहोवाला व येशूला हे दाखवतो की आपण खरोखरच देवाच्या राज्यात राहू इच्छितो; जेथे सर्व मानवी नातेसंबंधांवर दयाळूपणा व देवाच्या इतर गुणांचे वर्चस्व असेल.
आपण दयाळूपणा का दाखवला पाहिजे?
२१, २२. आपण दयाळूपणा का दाखवावा?
२१ कोणत्याही खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीकरता दयाळूपणा दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवाचा आत्मा आपल्या जीवनात सक्रिय आहे याचा हा पुरावा आहे. शिवाय,
जेव्हा आपण खरा दयाळूपणा दाखवतो तेव्हा आपण यहोवा देवाचे व येशू ख्रिस्ताचे अनुकरण करत असतो. तसेच जे कोणी देवाच्या राज्याच्या प्रजेत सामील होऊ इच्छितात त्या सर्वांकडून दयाळू असण्याची अपेक्षा केली जाते. या सर्व कारणांसाठी आपण दयेची प्रीती धरली पाहिजे व हा गुण प्रगट करण्यास शिकून घेतले पाहिजे.२२ दैनंदिन जीवनात आपण कोणत्या व्याव्हारिक मार्गांनी दयाळूपणा दाखवू शकतो? पुढील लेख या विषयावर प्रकाश टाकील.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• दयाळूपणा म्हणजे काय?
• हे जग इतके क्रूर व निर्दयी का आहे?
• देवाच्या राज्यात दयाळूपणाचे वर्चस्व राहील हे आपण कशावरून म्हणू शकतो?
• देवाच्या राज्यात राहण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी दयाळूपणा दाखवणे महत्त्वाचे का आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती वडील कळपाशी व्यवहार करताना दयाळू असण्याचा प्रयत्न करतात
[१५ पानांवरील चित्र]
यहोवाची प्रेमदया कठीण परिस्थितीत त्याच्या सेवकांना निराश करणार नाही
[१६ पानांवरील चित्रे]
यहोवा दयाळूपणे सर्व मानवांना सूर्याचा प्रकाश व पावसाचे पाणी देतो