व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे होईल तेव्हा

पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे होईल तेव्हा

पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे होईल तेव्हा

येशूने आपल्या शिष्यांना “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो” अशी प्रार्थना करायला शिकवले तेव्हा पित्यासोबत स्वर्गात राहिलेल्या व्यक्‍तीप्रमाणे तो बोलत होता. (मत्तय ६:१०; योहान १:१८; ३:१३; ८:४२) मानवपूर्व अस्तित्व असताना, स्वर्ग आणि पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही होत असल्याचे येशूने पाहिले होते. तो समाधानाचा व अनेक गोष्टी साध्य करण्याचा आनंदमय काळ होता.—नीतिसूत्रे ८:२७-३१.

देवाने प्रथम आत्मिक प्राणी निर्माण केले; ते ‘दूत असून बलसंपन्‍न होते आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालत’ होते. ते “त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस” नेणारे त्याचे सेवक होते आणि आजही आहेत. (स्तोत्र १०३:२०, २१) त्या प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा होती का? निश्‍चितच होती, आणि पृथ्वी निर्माण केल्यावर या “सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” (ईयोब ३८:७) त्यांच्या जयजयकारातून देवाच्या इच्छेबद्दल त्यांचा व्यक्‍तिगत आनंद व्यक्‍त झाला व त्यांनी देवाची इच्छा मान्य केली.

पृथ्वी निर्माण केल्यावर, देवाने मानवांच्या वसतीसाठी ती तयार केली आणि शेवटी पहिला पुरुष व स्त्री निर्माण केली. (उत्पत्ति अध्याय १) ही निर्मिती देखील जयजयकार करण्याच्या योग्यतेची होती का? प्रेरित अहवाल म्हणतो: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” होय, सर्वकाही दोषरहित, परिपूर्ण असे होते.—उत्पत्ति १:३१.

आपल्या पहिल्या पालकांकरता आणि त्यांच्या संततीकरता देवाची काय इच्छा होती? उत्पत्ति १:२८ नुसार ती देखील चांगलीच होती: “देवाने त्यास आशीर्वाद दिला; देव त्यास म्हणाला: फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” ही सुंदर कामगिरी पूर्ण करण्याकरता, आपल्या मूळ पालकांना आणि त्यांच्या संततीलाही सर्वकाळ जगण्याची गरज होती. दुर्घटना, अन्याय, दुःख किंवा मृत्यू यांचा कोठेही उल्लेख नव्हता.

या काळात, देवाची इच्छा खरोखर स्वर्गात आणि पृथ्वीवरही पूर्ण होत होती. जे त्याची इच्छा पूर्ण करत होते त्यांना खूप सुख मिळत होते. मग काय बिघडले?

देवाच्या इच्छेला एक अनपेक्षित आव्हान देण्यात आले. त्याला उत्तर देता येत नव्हते अशातली गोष्ट नव्हती. परंतु, यामुळे विलाप आणि दुःखाच्या दीर्घ कालावधीची सुरवात झाली ज्यामुळे मानवजातीसाठी देवाची काय इच्छा आहे याविषयी खूप गोंधळ माजणार होता. याचा आपल्या सर्वांवर परिणाम झाला आहे. हे आव्हान काय होते?

बंडखोरीदरम्यान देवाची इच्छा

‘देवाच्या आत्मिक पुत्रांपैकी’ एकाने, मानवांसाठी असलेल्या देवाच्या इच्छेच्या आड येण्याची शक्यता ओळखली. स्वतःचा फायदा करून घेणे हा त्याचा हेतू होता. याविषयी तो जितका अधिक विचार करू लागला तितकेच त्याला ते सहज आणि हवेहवेसे वाटू लागले. (याकोब १:१४, १५) त्याने कदाचित असा तर्क केला असावा की, पहिल्या मानवी जोडप्याला देवाचे ऐकण्याऐवजी आपले ऐकण्यास आपण परावृत्त करू शकलो तर देवाला प्रतिस्पर्धी शासन सहन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. त्याला वाटले असावे की, देव त्यांना मृत्यूची शिक्षा देणार नाही, नाहीतर देवाचा उद्देश अपयशी ठरला असे होईल. या उलट, यहोवा देवालाच आपला उद्देश बदलावा लागेल आणि या आत्मिक पुत्राचे स्थान मान्य करावे लागेल कारण तोपर्यंत देवाची मानव निर्मिती त्याला आज्ञाधारक झालेली असेल. म्हणूनच, या बंडखोराला नंतर सैतान अर्थात “विरोधक” असे उचितपणे म्हणण्यात आले.—ईयोब १:६.

आपली मनिषा पूर्ण करण्यासाठी सैतानाने पहिल्या स्त्रीला गाठले. त्याने तिला देवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करून नैतिकरित्या स्वतंत्र होण्याचे प्रोत्साहन देऊन म्हटले: “तुम्ही खरोखर मरणार नाही. . . . तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ति ३:१-५) हे ऐकून स्त्रीला एकदम आपण मुक्‍त होऊ असे वाटले आणि तिने त्याचा स्वीकार केला कारण ते जीवन उत्तम आहे असे तिला वाटले. नंतर तिने आपल्या पतीलाही आपली साथ द्यायला गळ घातली.—उत्पत्ति ३:६.

त्या जोडप्याकरता देवाने असे इच्छिले नव्हते. तर ती इच्छा त्यांची स्वतःची होती व यामुळे त्यांच्यावर अनर्थकारी परिणाम ओढवणार होते. देवाने त्यांना आधीच सांगितले होते की, अशाने त्यांच्यावर मृत्यू ओढवेल. (उत्पत्ति ३:३) देवापासून स्वतंत्र होऊन यशस्वी ठरण्यास त्यांची निर्मिती करण्यात आली नव्हती. (यिर्मया १०:२३) उलट, ते अपरिपूर्ण बनणार होते, आणि आता त्यांच्या संततीलाही अपरिपूर्णता आणि मृत्यू मिळणार होता. (रोमकर ५:१२) हे परिणाम उलटवण्याचे सामर्थ्य सैतानाकडे नव्हते.

या घटनांमुळे मानवजातीकरता आणि पृथ्वीकरता असलेला देवाचा उद्देश किंवा इच्छा कायमची बदलली का? नाही. (यशया ५५:९-११) पण यामुळे असे प्रश्‍न उपस्थित झाले ज्यांना सोडवण्याची गरज होती; जसे की: सैतानाच्या दाव्यानुसार, मानव “देवासारखे बरेवाईट जाणणारे” होऊ शकतात का? म्हणजेच, आपल्याला पुरेसा वेळ दिल्यास, जीवनातल्या सर्व क्षेत्रांत बरोबर काय आणि चूक काय, फायदेकारक काय आणि हानीकारक काय हे आपण स्वतः ठरवू शकतो का? देवाची शासनपद्धत उत्तम असल्यामुळे आपल्याकडून पूर्ण अधीनता प्राप्त करण्यास तो योग्य आहे का? त्याच्या इच्छेचा पूर्णपणे स्वीकार करणे उचित आहे का? तुम्ही या प्रश्‍नांना कसे उत्तर द्याल?

सर्व बुद्धिमान प्राण्यांदेखत या वादविषयांचे निरसन करण्याचा एकच मार्ग होता: ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना ते शाबीत करून दाखवण्याची संधी देणे. त्यांना मृत्यूदंड देऊन या वादविषयांचे निरसन होणार नव्हते. तर, पुरेशा कालावधीपर्यंत मानवांना आपला स्वतंत्र मार्ग अनुसरण्याची अनुमती देऊन हे वादविषय मिटवता येऊ शकत होते कारण स्वतंत्रतेचे परिणाम स्पष्ट दिसणार होते. पहिल्या स्त्रीला मुले जन्मतील असे देवाने तिला सांगितले तेव्हा आपण अशारितीने समस्येचे निरसन करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. तेथून मानवी कुटुंबाची सुरवात होणार होती. यामुळेच, आज आपण जिवंत आहोत!—उत्पत्ति ३:१६, २०.

पण, देव मानवांना आणि बंडखोर आत्मिक पुत्राला पूर्णपणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्याची परवानगी देईल असा त्याचा अर्थ नव्हता. देवाने आपल्या सार्वभौमत्वाचा त्याग केला नाही, किंवा आपला उद्देश सोडून दिला नाही. (स्तोत्र ८३:१८) बंडाळीची ज्याने सुरवात केली त्याचा तो सरतेशेवटी नाश करेल आणि सर्व वाईट परिणाम रद्द करून टाकेल याचे भाकीत करून त्याने हे स्पष्ट केले. (उत्पत्ति ३:१५) त्यामुळे, सुरवातीपासूनच मानवी कुटुंबाला सुटका मिळण्याचे वचन मिळाले होते.

आपल्या पहिल्या पालकांनी आणि त्यांच्या भावी संततीने देवाच्या शासनापासून स्वतःला वेगळे केले होते. त्यांच्या निर्णयाचे सर्व वाईट परिणाम रोखण्यासाठी देवाला प्रत्येक वेळी आपली इच्छा त्यांच्यावर थोपवावी लागली असती. हे तर, स्वातंत्र्य न देण्यासारखेच झाले असते.

अर्थात, लोक देवाचे शासन निवडू शकत होते. या काळात, लोकांसाठी देवाची काय इच्छा आहे हे जाणून त्यानुसार राहण्याचा ते होता होईल तितका प्रयत्न करू शकत होते. (स्तोत्र १४३:१०) परंतु, मानवजातीला पूर्ण स्वातंत्र्य मिळण्यासंबंधीचा वादविषय सोडला जात नव्हता तोपर्यंत ते समस्यांपासून वाचू शकत नव्हते.

व्यक्‍तिगत निवडीचे परिणाम सुरवातीलाच दिसू लागले. मानवी कुटुंबाचा ज्येष्ठपुत्र, काईन, ह्‍याने आपला बंधू हाबेल याचा वध केला कारण त्याची “कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती.” (१ योहान ३:१२) ही देवाची इच्छा नव्हती कारण देवाने काईनाला ताकीद दिली होती आणि मगच त्याला शिक्षा केली. (उत्पत्ति ४:३-१२) काईनाने, सैतानाने दाखवलेले नैतिक स्वातंत्र्य स्वीकारले होते; म्हणून तो “त्या दुष्टाचा होता.” इतरांनीही असेच केले.

मानवी इतिहासाला १,५०० वर्षे झाली होती तेव्हा “देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.” (उत्पत्ति ६:११) पृथ्वीला वाचवण्यासाठी निर्णायक पाऊल उचलण्याची गरज होती. देवाने जागतिक प्रलय आणून व त्या काळी राहत असलेल्या एका नीतिमान कुटुंबाचे अर्थात नोहा, त्याची पत्नी, त्याचे मुलगे आणि त्यांच्या बायका यांचे संरक्षण करून कार्यवाही केली. (उत्पत्ति ७:१) आपण सर्वजण त्यांचे वंशज आहोत.

तेव्हापासून, ज्यांना देवाची मर्जी जाणण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांना त्याने मार्गदर्शन पुरवले आहे. त्याने त्याच्याजवळ मार्गदर्शनासाठी येणाऱ्‍या सर्वांसाठी, विश्‍वासू पुरुषांना आपले संवाद लिहून ठेवण्यास प्रेरित केले. हे संवाद बायबलमध्ये नमूद आहेत. (२ तीमथ्य ३:१६) त्याने प्रेमळपणे विश्‍वासू मानवांना आपल्यासोबत नातेसंबंध जोडण्याची आणि त्यांना आपले मित्र होऊ देण्याची अनुमती दिली. (यशया ४१:८) शिवाय, स्वातंत्र्याच्या या हजारो वर्षांदरम्यान मानवांनी सोसलेल्या क्लेशदायक अडचणींचा सामना करण्यासाठी आवश्‍यक असलेले सामर्थ्य देखील त्याने त्यांना पुरवले. (स्तोत्र ४६:१; फिलिप्पैकर ४:१३) या सर्वाकरता आपण किती कृतज्ञ असावे!

“तुझ्या इच्छे प्रमाणे होवो”—पूर्णपणे

देवाने आतापर्यंत जे काही केले आहे तीच मानवजातीसाठी त्याची पूर्ण इच्छा नाही. ख्रिस्ती प्रेषित पेत्राने लिहिले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) ही लाक्षणिक भाषा, मानवजातीवर अधिकार गाजवणाऱ्‍या एका नवीन शासनाला आणि त्या सरकाराधीन असलेल्या नवीन मानवी समाजाला सूचित करते.

उघड शब्दांत, संदेष्ट्या दानीएलाने लिहिले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) ही भविष्यवाणी आजच्या निकामी व्यवस्थीकरणाचा अंत आणि त्याची जागा देवाचे राज्य किंवा सरकार घेणार असल्याचे पूर्वघोषित करते. ही खरोखर सुवार्ता नव्हे काय? आजच्या जगात हिंसेला कारणीभूत असलेले व पृथ्वीची नासाडी करण्याचा धोका निर्माण करणारे संघर्ष आणि स्वार्थ एके दिवशी गतकाळात जमा होईल.

या घटना केव्हा घडतील? येशूच्या शिष्यांनी विचारले: “ह्‍या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय”? येशूने दिलेल्या उत्तरात त्याने असेही म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:३, १४.

हे प्रचाराचे कार्य आज संपूर्ण जगभरात होत आहे हे सर्वज्ञात आहे. कदाचित तुम्ही आपल्या परिसरात हे कार्य होत असल्याचे पाहिले असेल. हे देखील विश्‍वास करतात (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात, प्राध्यापक चार्ल्झ एस. ब्रॅडन लिहितात: “यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या साक्षकार्याने प्रत्यक्षात संपूर्ण पृथ्वी व्यापली आहे. . . . राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांइतका आवेश आणि चिकाटी जगातील इतर कोणत्याही धार्मिक गटाने दाखवलेली नाही.” साक्षीदार २३० पेक्षा अधिक देशांत आणि सुमारे ४०० भाषांत सुवार्तेची सक्रियपणे घोषणा करत आहेत. हे भाकीत केलेले कार्य अशा जगव्याप्त प्रमाणावर पूर्वी कधीही साध्य करण्यात आले नव्हते. त्या राज्याने मानवी सरकारांची जागा घेण्याची वेळ आता जवळ आली आहे याचा पुरावा देणाऱ्‍या कारणांपैकी हे एक कारण आहे.

ज्या राज्याचा प्रचार केला जाईल असे येशूने सांगितले होते त्याच राज्याविषयी त्याने प्रभूच्या प्रार्थनेत आपल्याला प्रार्थना करायला शिकवले होते: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) होय, त्या राज्याचा साधन म्हणून उपयोग करून देव मानवजातीकरता व पृथ्वीकरता आपला उद्देश आणि आपली इच्छा पूर्ण करील.

याचा अर्थ काय? प्रकटीकरण २१:३, ४ याचे उत्तर देते: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” मग निश्‍चितच देवाची इच्छा पृथ्वीवर आणि स्वर्गात निष्पन्‍न होईल—तीही पूर्णार्थाने. * त्यात तुम्ही सामील असावे असे तुम्हाला वाटत नाही का?

[तळटीप]

^ परि. 26 देवाच्या राज्याविषयी तुम्हाला अधिक शिकायचे असल्यास, आपल्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा या पत्रिकेच्या पृष्ठ २ वरील पत्त्यांमधील कोणत्याही एका पत्त्यावर पत्रव्यवहार करा.

[५ पानांवरील चित्र]

देवाच्या इच्छेपासून स्वातंत्र्य मिळवल्यामुळे अनर्थ ओढवला